किती वाढते आहे ही लोकसंख्या - कुठे गेल्या त्या महामार्‍या ?

थोडक्यात : वेगवेगळ्या देशांत लोकसंख्या वाढीचा आणि संसर्गजन्य/जुनाट रोग दिसण्याचा क्रम समांतर असतो. त्याविषयी मांडलेल्या संक्रमण सिद्धांतांचे वर्णन या लेखात केलेले आहे.

प्रस्तावना
वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न वारंवार आपल्यासमोर येत असतो. मित्रपरिवारामधील चर्चेत, वर्तमानपत्रांत, भिंतीभिंतीवरच्या कुटुंबनियोजनाच्या जाहिरातींत, कितीतरी ठिकाणी... लोकसंख्या वाढत आहे, त्याबद्दल आपल्याला काळजी वाटते - कधीपर्यंत ही वाढत जाणार? वाटते, बेसुमार वाढत जाणे हाच लोकसंख्येचा गुणधर्म आहे काय? या बाबतीत आपल्या देशातल्या समाजातच काही विशेष दोष आहे का? असे प्रश्न पडता वेगवेगळ्या समाजातील लोकसंख्येच्या कालक्रमाचे निरीक्षण करणे मार्गदर्शक ठरते. विचारांना चौकट मिळाली की भूतकाळातील लोकसंख्यावाढीचे वर्णन करणे सोयीचे जाते, आणि भविष्यातील नियोजनासाठी काही आधार मिळू शकतो.

लोकसंख्येच्या संक्रमणाचा सिद्धांत (demographic transition theory)
याबद्दल विचारांची एक उपयोगी चौकट वॉरन थॉमसन या लोकसंख्यातज्ञाने १९२९ साली आखली. औद्योगिकीकरणापूर्वीचा समाज जसाजसा औद्योगिक होतो, तसातसा वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातो असे त्याने प्रतिपादन केले. समाजातील जन्म आणि मृत्युदराच्या वजाबाकीला अनुसरून त्याने टप्प्यांची व्याख्या केली. पुढे अन्य तज्ञांनी त्यात केलेल्या बदलांसह ते टप्पे पुढील तक्त्यात दिलेले आहेत.

तक्ता १

टप्पा जन्मदर मृत्युदर (जन्मदर - मृत्युदर) वजाबाकी एकूण लोकसंख्या
मोठी संख्या मोठी संख्या (मोठी - मोठी संख्या)=बदल नाही लहान आणि स्थिर
मोठी संख्या घटती संख्या (मोठी - घटती संख्या)=वाढ लहान आणि वाढती
घटती संख्या लहान संख्या (घटती - लहान संख्या)=वाढ मोठी आणि वाढती
लहान संख्या लहान संख्या ( लहान - लहान संख्या)=बदल नाही मोठी आणि स्थिर
घटती संख्या स्थिर संख्या ( घटती - स्थिर संख्या)=घट मोठी आणि घटती

या "लोकसंख्येच्या संक्रमणाच्या सिद्धांता (demographic transition theory)" प्रमाणे सांगितलेले वेगवेगळे टप्पे आकृती १ मध्ये चित्ररूपात दाखवले आहेत.
आकृती १

"लोकसंख्येच्या संक्रमणाच्या सिद्धांता (demographic transition theory)" प्रमाणे सांगितलेले वेगवेगळे टप्पे

हे वर्णन जरी अतिसुलभ असले, तरी वेगवेगळ्या देशातील आकडेवारीला चांगले लागू पडते. उदाहरणार्थ स्वीडनचे औद्योगीकरण १९व्या शतकापासून २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत झाले, तर भारताचे औद्योगिकीकरण २०व्या शतकाच्या अखेरीस सुरू झाले, आणि अजून चालू आहे. २०व्या शतकातील भारत आणि स्वीडन मधील जन्म/मृत्यू दरांची आणि लोकसंख्येची आकडेवारी आकृती २अ व २आ मध्ये दाखवलेली आहे.

आकृती २अ

भारत : जन्म/मृत्यू दरांची आणि लोकसंख्येची २०व्या शतकातील आकडेवारी
भारत : जन्म/मृत्यू दरांची आणि लोकसंख्येची २०व्या शतकातील आकडेवारी

आकृती २अ

स्वीडन : जन्म/मृत्यू दरांची आणि लोकसंख्येची २०व्या शतकातील आकडेवारी
स्वीडन : जन्म/मृत्यू दरांची आणि लोकसंख्येची २०व्या शतकातील आकडेवारी

(आलेख बघताना लहान-मोठ्या देशांमधील फरकाची ही बाब लक्षात असू द्यावी : स्वीडन हा लहान देश असल्यामुळे एखाद्या मोठ्या घटनेमुळे [उदाहरणार्थ - युद्ध व युद्धानंतरच्या शांती] वाढणारे-घटणारे जन्म/मृत्यू दर आकडेवारीत स्पष्ट दिसतात. चार-पाच वर्षे दर कमी जास्त झाले, तरी दीर्घकालिक मार्गक्रमण सिद्धांताला अनुसरूनच होताना दिसते. भारतासारख्या महाकाय देशात मात्र संख्याचे कालक्रमण बरेचसे एकदिक् असते, आणि सिद्धांताला अनुसरून असल्याचे दिसते. )

पण का? जनस्वास्थ्य-संक्रमण (epidemiologic transition)
लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आकडेवारीचे ठीकठाक वर्णन करतो खरे. पण "औद्योगिकीकरण" या आर्थिक संकल्पनेची जन्म-मृत्यू या जैविक घटनांशी सांगड नेमकी कशी पडत असावी? जनस्वास्थ्यमिती (epidemiology) च्या शास्त्रातून याबद्दल आपल्याला काहीतरी उमजू शकते. लोकसंख्या-संक्रमणाच्या आकड्यांना समांतर जनस्वास्थ्य-संक्रमणही (epidemiologic transition) होत असते.

पहिला टप्पा
उद्योगपूर्व देशांमध्ये मृत्यूचा दर मोठा असतो इतकेच नव्हे तर बहुतेक मृत्यूंचे कारण साथीचे आणि संसर्गजन्य रोग (epidemics of infectious diseases) असतात. हे मृत्यू मोठ्या प्रमाणात अर्भकांचे आणि बालकांचे असतात. संतती मोठ्या प्रमाणात जन्माला घातली तरी जोडप्याची एक-दोन मुलेच प्रौढ होईस्तोवर जगतात. या काळात मध्यम आणि वृद्ध वयात होणारे जुनाट रोग (chronic diseases of old age) कमी प्रमाणात दिसतात, कारण त्या वयापर्यंत पोचणारे लोक थोडेच असतात. प्लेग किंवा कोलेराने लोक आधीच जवळजवळ संपवल्यावर, मधुमेहाने आणि कर्करोगाने ग्रसण्यासाठी उरले-सुरले थोडेच लोक असतात.

दुसरा टप्पा
आर्थिक प्रगती जशी होते, तशी मुले जगण्याचे प्रमाण वाढते, मृत्यूचा दर कमी होतो. तरी पिढीजात अनुभवाच्या शहाणपणामुळे जोडपी मोठ्या प्रमाणात संतती उत्पन्न करतच राहातात, जन्मांचा दर पूर्वीसारखाच राहातो.

तिसरा टप्पा
पुढे संसर्गजन्य रोगांमुळे बालकांच्या मृत्यूचा दर खूप कमी होतो, एक-दोन पिढ्यांना याची खात्री पटू लागते, आणि आर्थिक प्रगती झालेली काही जोडपी संततिनियमन करू लागतात. यामुळे जन्मांचा दरही कमी होऊ लागतो. मध्यवयापर्यंत आणि वार्धक्यापर्यंत खूप लोक जगू लागतात, तसे त्या वयात होणारे रोग अधिक दिसू लागतात. बहुतेक मृत्यू संसर्गजन्य आणि साथीच्या रोगांमुळे न होता, आता बहुतेक मृत्यू जुनाट अ-संसर्गजन्य रोगांमुळे झालेले दिसतात. या कालक्रमाला "जनस्वास्थ्य-संक्रमण" म्हणतात.

चवथा टप्पा
जुनाट रोगांनी आणि वृद्धापकाळाने मरण अटळ आहे, त्यापेक्षा मृत्युदर कमी होऊ शकत नाही. जन्मदर कमी-कमी होत-होत मृत्युदराइतका झाला की लोकसंख्या स्थिर होते.

पाचवा टप्पा
पुढे-पुढे काही देशांत असे दिसले आहे, की अनेक जोडपी एकच मूल जन्माला घालतात किंवा एकही मूल जन्माला घालत नाहीत. ही मुले प्रौढ होईपर्यंत जगतात खरी, आणि मत्यूच्या लहान दरात बहुतेक वृद्ध लोकच असतात खरे. पण ही अति-सीमित संतती त्या थोडक्या मृत्यूच्या दराची तूटही भरून काढत नाही. अशा परिस्थितीत देशाची मोठी लोकसंख्या अक्षरशः घटू लागते.

विशिष्ट समाजातील अनुभवांची सिद्धांतापासून फारकत
महत्त्वाच्या घटनांमुळे होणारे अल्पकालिक विचलन आणि आप्रवासन (migration)
लोकसंख्येच्या आणि जनस्वास्थ्याच्या संक्रमणांची ही चौकट इतिहासवर्णनासाठी आणि भविष्यनियोजनासाठी उपयुक्त असली, तरी हा कुठला भौतिकीतला किंवा गणितातला अगतिक कायदा नव्हे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. एखाद्या लहान देशामध्ये कायमस्वरूपी स्थायिक होणाऱ्या लोकांमुळे, किंवा कायमस्वरूपी निघून जाणाऱ्या लोकांमुळे (immigration and emigration मुळे) लोकसंख्या वाढू-घटू शकते, ते या सिद्धांताच्या हिशोबात नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर परतलेल्या सैनिकांनी घरी परतल्यावर १९४५-१९५५ काळात मोठ्या प्रमाणात संतती प्रसवली, अशा मोठ्या घटनांमुळे सिद्धांताने सांगितलेला कालक्रम विचलित होतो - हे वर स्वीडनच्या आकडेवारीत (आकृती २आ) स्पष्टच दिसते. अशा प्रकारे सिद्धांताने सांगितलेली लोकसंख्येची दीर्घकालिक प्रवृत्ती आहे, अनुवार्षिक बदल नव्हेत.

लोकशिक्षणाचा प्रभाव
त्याच प्रकारे मृत्यूचा दर कमी होऊ लागल्यानंतर जन्माचा दर कमी होण्यापूर्वी किती पिढ्यांचा अनुभव स्माजाला लागतो? याबद्दल कुठलाच गणिती कायदा नाही. युरोपातील देशांमध्ये संततिनियमनाबाबत सरकारी लोकशिक्षण मोठ्या प्रमाणात झाले नाही, आणि जन्मदर घटायला (म्हणजे बहुतेक जोडप्यांनी आपोआप तसे ठरवायला) दीड-दोनशे वर्षे लागली असतील. भारतासारखा एखादा देश "एक किंवा दोन मुले पुरे" असे लोकशिक्षण करतो. तेव्हा "तुमची मुले बहुधा मरणार नाहीत" ही माहिती गर्भित रूपाने लोकांच्या मनात लवकर पोचत असते. अशा परिस्थितीत जन्मदर ५०-१०० वर्षांतही कमी होऊ शकतो.

रोगांच्या प्रमाणात सिद्धांतापासून फारकत
लोकशिक्षणाने जन्मदर कमी केलेल्या भारतात जनस्वास्थ्याचे संक्रमणही थोडे वेगळे दिसते. युरोपातील काही देशांत आधी संसर्गजन्य रोगांनी होणारे मृत्यू खूप घटले, मग जुनाट असंसर्गजन्य मृत्यूंची संख्या वाढू लागली. भारतात मात्र अजून संसर्गजन्य रोगही मध्यम प्रमाणात दिसतात, तेव्हाच असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढलेले दिसू लागले आहे.

मुला-मुलींच्या प्रमाणात काही समाजांमध्ये फरक
काही देशांमधील समाजमानसाला मुले हवी असतात, आणि मुली नको असतात. अशा वेळेला स्त्रीभ्रूणहत्येचे असंतुलित "संततिनियमन" होते, त्याचा हिशोबसुद्धा या संक्रमण-सिद्धांतात केलेला नाही.

या चौकटीने विचारांत काय फरक पडतो?
वेगवेगळ्या देशांतील समाजांच्या अनुभवात थोडेबहुत फरक असले, तरी लोकसंख्या आणि जनस्वास्थ्य-संक्रमणाची ढोबळ चौकटीमुळे ते फरक समजणेसुद्धा सुकर होते. आपल्याला सुरुवातीला पडणारी काही कोडी तितकी कूट राहात नाहीत. उदाहरणार्थ आपल्यापैकी काही लोकांना प्रश्न पडतो, "संततिनियमनाचा सर्वाधिक फायदा गरिबीने गांजलेल्या लोकांना होईल, तरी त्यांच्यामध्येच जास्त संतती दिसते. यात गरीब लोकांचा नाठाळपणा दिसतो का?" सिद्धाताच्या आधाराने विचार करता आपल्याला काय दिसते? की उलट अधिक संतती उत्पन्न करणे म्हणजे पूर्वीच्या काळच्या समाजाच्या अनुभवाचा शहाणपणा होता. कालबाह्य झाल्यानंतरही तो चालत राहातो. आपल्या आजा-पणजांच्या काळात सुशिक्षित, सुखवस्तू कुटुंबांतही उदंड लेकरे दिसत. शहाणे सुशिक्षित लोक आपोआपच संतती कमी करणे सुज्ञ समजतील असा पूर्वग्रह तथ्याशी विसंगत आहे. आर्थिक सुस्थितीनंतर एक-दोन पिढ्या मुले जगू लागल्यानंतरच संततिनियमन इतके "स्पष्ट शहाणपण" वाटू लागते. सिद्धांताच्या मदतीने विचार केला, तर मागास समाजांच्या "नाठाळ" संततीविषयी हल्ली संततिनियमन करणारे सुशिक्षित लोक त्रागा करणार नाहीत. उलट वस्तुस्थिती समजून लोकशिक्षणाचे कार्यक्षम मार्ग शोधतील.

इतिवाक्ये
पूर्वीच्या काळी प्लेग-कॉलेरासारख्या महामाऱ्या लोकसंख्या सीमित ठेवत होत्या. महामार्‍या नाहिशा झाल्या तशा लोक म्हातारे होऊ लागले, वृद्धापकाळाचे जुनाट रोग आणि लोकसंख्या वाढ या समस्या आपल्या वाट्याला आल्या. पण त्या महामार्‍यांपेक्षा या नव्या समस्या परवडल्या असेच म्हणावे लागेल. जुन्या काळच्या सीमित पण अल्पजीवी लोकसंख्येबद्दल अपरिपक्व हळहळ आपण बाळगू नये. मोठ्या लोकसंख्येच्या या नव्या समस्यांशी भविष्याकडे तोंड करून लढण्यात आपल्या समाजाची परिपक्वता दिसेल.

- - -
संदर्भ :
१. विकीपेडिया (प्रताधिकार मुक्त चित्र साभार घेतले आहे : इंग्रजी शब्दांच्या जागी मराठी शब्द घातले आहेत) http://en.wikipedia.org/wiki/Demographic_transition
२. (स्वीडनबद्दल आकडेवारी) http://www.demog.berkeley.edu/~bmd/sweden.html
३. (भारताबद्दल आकडेवारी) www.indiahealthstat.com/india/http://www.medindia.net/health_statistics/general/birthdeath.asp

Comments

माहितीपूर्ण / ब्रिदिंगअर्थ.नेट

माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख. औद्योगिकरण आणि भौतिक प्रगतीचा परिणाम लोकसंख्येवर होत असणार असे वाटत होते. पण हा लेख वाचल्यानंतर नेमका संबंध लक्षात आला. (आणि पृथ्वीवरील लोकसंख्या अशीच अनिर्बंध वाढत न राहता कधीतरी थांबेल किंवा कमी होईल असे वाटून हायसे वाटले :) )

नुकतीच ब्रिदिंगअर्थ.नेट ही साइट पाहण्यात आली. लोकसंख्या, जन्मदर, मृत्यूदर, कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जन वगैरे जागतिक आणि देशनिहाय माहिती इथे मिळते. पार्श्वसंगीतही मजेशीर आहे. नक्की पहा.

माहितीपुर्ण

नव्याकोर्‍या विषयावरचा, माहितीपुर्ण लेख. विषयाच्या नाविन्यामुळे येणार्‍या स्वाभाविक तरतरीबरोबरच केलेले नेमके, शास्त्रशुद्ध विवेचन आवडले.. खास उपक्रमवरचा लेख वाटला :)
हा लेख विकीवरहि चढवता यावा.. तसेच वृत्तपत्रांनाहि पाठवावा अशी आग्रही सुचवणी

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

माहितीपूर्ण

माहितीपूर्ण लेख. तो सुद्धा एका अत्यंत चांगल्या विषयावर. पण एक शंका आहे. पुर्वी महामार्‍यांमुळे लोकसंख्या सीमित झाल्या. आता महामार्‍या नाहीत. पण एचाआयव्ही सारखे प्रकार जे आत्ता कळले आहेत. ते पुर्वी नव्हतेच असे म्हणता येईल का? समजा नसलेच, तर जो पर्यंत त्यावर जालीम उपाय मिळत नाही तो पर्यंत अप्रत्यक्षपणे मृत्युदर वाढवण्यात तो कारणीभुत ठरुन लोकसंख्या सीमित नाही का राहणार? खास करुन भारतासारख्या देशात जिथे या बद्दल लोकांना एक सांस्कृतीक तेढ आहे तसेच त्याची व्याप्ती सुद्धा जास्त आहे. मग या बद्दल आपण कोणता सिद्धांत लावायचा? काही रोग माहित नव्हते की लोकसंख्या सीमित करणारे नवे नवे रोग निर्माण होत राहतील?






नवीन संसर्गजन्य रोग - चांगला मुद्दा

संसर्गजन्य रोग हे पूर्वीपेक्षा सीमित झाले तरी अजून संपले नाहीत, हा महत्त्वाचा मुद्दा वरील प्रतिसादातून समोर येतो. इतकेच नव्हे तर जुन्या काळी ठाऊक नसलेले काही रोग आता दिसू लागले आहेत.

तरी दोन मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत : (१) संख्याबळाच्या दृष्टीने आजकालचे हे उपटसुंभ रोग हे पूर्वीच्या माहामार्‍यांसारखे नव्हेत.
(२) हा खरे महत्त्वाचा मुद्दा लेखात स्पष्ट दिलेला नाही - अजूनही मोठ्या संख्येने मारणारे संसर्गजन्य रोग म्हणजे महामार्‍या नसून कुपोषित बालकांना मारणारे गोवर, हागवण वगैरे "साधेसुधे" रोग होत. हा मुद्दा खाली प्रियाली यांच्या प्रतिसादाखाली विशद करणार आहे. त्यामुळे, येथे (१) वरच अधिक सांगतो.

पूर्वीच्या महामार्‍या वि. एड्स : उदाहरणार्थ वरील आकृती २अ बघावी.
१९१० काळात भारतात बर्‍याच साथी येऊन गेल्या, त्यामुळे मृत्युदर हजारी ४० वरून हजारी ४५ पर्यंत गेला, तो आलेखात दिसतो. त्याच आलेखात १९९०-२००० काळ बघूया. या काळात एड्सचा प्रादुर्भाव वाढत चालला होता. कदाचित एड्सपासूनचे मृत्यू नसते तर मृत्यूदरातली घट दिसते त्यापेक्षा अधिक असती. पण १९१० काळातल्या मृत्यूंनी मृत्युदर अक्षरशः वाढवला, तितके संख्याबळ १९९०-२००० काळातल्या एड्स-मृत्यूंचे नव्हते.

वरील परिच्छेदाचा असा अर्थ घेऊ नये की एड्स म्हणजे "किस झाड की पत्ती". १९१० काळातल्या महामार्‍यांइतका तो "महा"मारक नसला, संक्रमण-सिद्धांताचा क्रम उलटवण्याचे संख्याबळ त्याच्यात नसले, तरी आजच्या संदर्भात तो महत्त्वाचा रोग आहेच. सांस्कृतिक तेढ आहे, हे जाणून स्वास्थ्य विभागाने नियोजन करावे, हा विचार योग्यच. या लेखापुरते सांगायचे आहे की एड्समुळे संक्रमण-सिद्धांताच्या टप्प्यांमध्ये फारसा फरक पडत नाही - पण प्रत्येक टप्पा किती काळ लांबेल (म्हणजे मृत्युदर अगदी कमी व्हायला किती वेळ लागेल, आपली मुले जगतील असे ठामपणे समाजातील बहुतेक जोडप्यांना वाटायला किती वेळ लागेल) त्याच्यात फरक पडू शकेल.

हे महत्वाचे

काही देशांमधील समाजमानसाला मुले हवी असतात, आणि मुली नको असतात. अशा वेळेला स्त्रीभ्रूणहत्येचे असंतुलित "संततिनियमन" होते, त्याचा हिशोबसुद्धा या संक्रमण-सिद्धांतात केलेला नाही

याचा विचार केल्यास मात्र सिद्धांतात काही बदल घडु शकतात.
प्रकाश घाटपांडे

माहितीपूर्ण लेख : काही प्रश्न

लेख अत्यंत माहितीपूर्ण वाटला.
भविष्यात कधीकाळी जग पूर्णपणे प्रगत होऊन त्याची एकूण लोकसंख्यावाढ थांबेल असे शक्य आहे का?
असल्यास कधी? जगाची एकूण लोकसंख्या त्यावेळी किती असेल?
असे अंदाज आतापर्यंत कोणी वर्तवले आहेत का? ते कोणते?
वर्तवले नसल्यास लेखक वर्तवू शकेल का?

अवांतर :
संततीनियमनाचा विरोध करणार्‍या विचारांचा पगडा असणार्‍या देशांमधील (प्रगतसुद्धा) लोकसंख्यावाढ
इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे काय?

"भाकिते करणे कठिण - आणि भविष्याविषयी भाकिते ते फारच कठिण"

बहुधा योगी बेर्रा या खेळाडूचे मुक्ताफळ आहे.

पण नियोजनासाठी भाकिते करणे जरुरीचे असते. पण मग "भाकिते करतानाची गृहीतके वेगळी असती तर काय वेगळे भाकीत होईल?" असा विचारही करायचा असतो. मग आशावादी-मध्यम-निराशावादी भाकिते सांगावी लागतात.

संयुक्त राष्ट्र संघाच्या (यू. एन.च्या) लोकसंख्याविषयक माहितीजालाच्या (पॉप्युलेशन इन्फॉर्मेशन नेटवर्कच्या) संकेतस्थळावर (दुवा) अधिक माहिती मिळेल.

सध्या जगाची लोकसंख्या ६-७ बिलियन (अब्ज?) आहे, ती स्थित होईपर्यंत १०-१२ बिलियनपर्यंत वाढेल, असा अंदाज मी वाचला आहे. वरील संकेतस्थळावर वेगवेगळ्या देशांबाबत अंदाज, तसेच "आशावादी/निराशावादी" अंदाज बघता येतील. (२००६ सालाच्या यू. एन. अहवालाचा दुवा)

'धनंजय' शैली

खास 'धनंजय' शैलीतला वेगळ्या विषयावरचा,माहितीपुर्ण, सोप्या भाषेतला, खास मराठी शब्द असलेला लेख.
ऋषिकेशच्या मताला अनुमोदन देतो.
"तुमची मुले बहुधा मरणार नाहीत" ही माहिती गर्भित रूपाने लोकांच्या मनात लवकर पोचत असते.
या वाक्यातल्या 'बहुधा' या शब्दावरुन धनंजयने किती विचारपुर्वक लेख लिहिला आहे ते दिसते.
लाख लाख धन्यवाद.विषेश करुन 'मराठीत' माहिती असणारे आलेख आवडले

उत्तम लेख

लेख माहितीपूर्ण आहे. भारताचा विचार करता -

प्लेग कॉलराच्या साथींत कितीजण दगावत याची आकडेवारी मिळेल काय? जसे, १८९७ला चाफेकर बंधूंनी रँडचा खून करण्याच्या कटामागे पुण्यातील प्लेगच्या काळातील घेतलेले काही निर्णय कारणीभूत होते. त्याकाळी कितीजण दगावले याची आकडेवारी मिळवणे शक्य आहे काय? किंवा इतर कोणत्याही महामारीत दगावलेल्यांची संख्या मिळणे शक्य आहे का?

महामारीनेच लोकसंख्या कमी होत असावी की कुपोषण, वैद्यकीय उपचारांची कमतरता, वैद्यकीय उपचारांकडे न वळण्याचा कल (यात अंधश्रद्धा, औदासिन्य, माहितीचा अभाव वगैरे येईल) या सर्वांमुळेही लोकसंख्या घटत असावी?

कुपोषणाचा मुद्दा कळीचा

तो तुमच्या प्रतिसादात आला आहे. तो लेखात हवा तसा उल्लेखला गेला नाही.

कित्येक संसर्गजन्य रोग कुपोषितांमध्ये जितके घातक असतात, तितके सुदृढ लोकांमध्ये घातक नसतात. संसर्गजन्य रोगांच्या "कारणाचा" (म्हणजे जंतूंचा) नाश करणारी प्रतिजैविके होत. प्रतिजैविकांचा शोध आणि खरा प्रसार १९५० च्या पुढेच झाला. तरी ज्या देशांत सुबत्ता नांदू लागली होती, त्या देशांत संसर्गजन्य रोगांची लागण आणि त्यांच्यापासून मृत्यू फार आधीपासून कमी होऊ लागला होता.

सुदृढ मूल साधारणपणे गोवराने मरत नाही. कुपोषित मूल कित्येकदा गोवर झाला की मरते. प्रौढांमध्ये क्षयाबद्दलही असेच आहे - सुदृढांमध्ये लागण झाल्यास मरण कमी प्रमाणात येते, तर लागण झालेल्या कुपोषितांमध्ये मोठ्या प्रमाणात मरण येते.

आर्थिक प्रगतीबरोबर सुधारणारे पोषण (तसेच पक्की घरे, कमी गजबज, [उत्तम नसले तरी पूर्वीपेक्षा] चांगले नाले/उकिरडे) हे सर्व संसर्गजन्य रोगांची लागणही कमी करतात, आणि त्यातून येणारे मृत्यूसुद्धा.

लेखातील सनसनाटी शीर्षकामुळे ;-) मी प्लेग-कॉलरांचा उल्लेख केला. पण हागवणीने आज (आणि पूर्वीसुद्धा) भारतातली बालके मोठ्या प्रमाणात मरतात. उदाहरणार्थ रोटाव्हायरस या सामान्य विषाणूविरुद्ध प्रतिजैविक नाही, आणि सुदृढ बालकांमध्ये "रोटाव्हायरस" हागवण अगदी साधीसुधी असते - त्रासदायक पण मारक नाही. कुपोषित बालकासाठी, पोरांना भरपूर पाणी-पेज पाजत राहायची सोय नसते त्या घरांमध्ये, हीच हागवण पोराला मारू शकते.

अंधश्रद्धा, वैद्यकीय उपचार न घेण्याकडे कल वगैरे महत्त्वाचे आहेच, पण हेसुद्धा आर्थिक प्रगतीच्या अनुषंगाने बदलताना दिसतात. माझ्या (तोकड्या) अनुभवात एकुलत्या एक मुलाला वाचवायला गरीब गांजलेले लोक जिवाचा आकांत करतात, वाटेल ती वैद्यकीय मदत घ्यायचा प्रयत्न करतात.

- - -

कॉलेराच्या साथींमध्ये मेलेल्यांचे आकडे कॉलेराच्या विकी पानावर दिसले (दुवा). १८९९-१९२३ काळात भारतात ८ लाख मेले असे सांगतात.
ब्रिटिश सरकारची स्वास्थ्यविभागाची कित्येक कागदपत्रे महाजालावर उपलब्ध असल्याचे आजच मला शोधून समजले. त्यात प्लेगविषयी मूळ अहवाल सापडले. पुण्यातील प्लेग साथीविषयी हा आलेख सापडला :

पुण्यातील प्लेग १८९६-१८९७

पुण्यात त्या काळात दर पाच दिवसांत साधारणपणे १० लोक मरत, मार्च ३-७ या काळात साठावर माणसे मेली. मार्च १६-१७ तारखेला प्लेगविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू झाली, साधारण त्याच काळापासून प्लेग मृत्यू कमी होऊ लागले. चाफेकर बंधूंनी २२ जूनला रँडला मारले, तोवर (वरील आलेखाप्रमाणे) पुण्यातला कॉलेरा आटोक्यात आलेला होता.

ब्रिटिश सरकार लोकशाहीचे नव्हते. पण लोकशाही शासनापुढे पडलेला हा कूटप्रश्न असतो : सामाजिक स्वास्थ्यासाठी बळजबरीपेक्षा लोकशिक्षण अधिक उजवे असते, पण अकस्मात आलेल्या साथीमध्ये लोकांत जी घबराट पसरते, तेव्हा तडकाफडकी लोकशिक्षण कसे करावे? मला वाटते याला अल्पकालिक उत्तर नाही. आपत्कालात सरकार जे काही करेल ते जाचक असेल, किंवा अकार्यक्षम असेल (किंवा दोन्ही असेल!) प्रभावी लोकशिक्षण हे आपत्काल नसताना, म्हणजे नेहमीच चालू ठेवायचे असते. म्हणजे आपत्कालातला जाच त्यातल्या त्यात कमी भासेल, आणि अकार्यक्षमतेचे तोटे त्या मानाने कमी असतील.

(राहिला थेट प्रश्न : त्या प्लेगात किती लोक मेले? - ते उत्तर पटकन सापडले नाही पण त्या संकेतस्थळावरील वेगवेगळ्या तक्त्यांची बेरीज करून मिळण्यासारखे आहे. ज्या गावांमध्ये प्लेगची लागण झाली, त्या शहरा-गावांमधील १-१०% [होय, काही गावांत १०%!] लोकसंख्या एका वर्षात प्लेगने मरण पावली. सरासरी ~२% असावी.)

तुमच्या "कुपोषण" या महत्त्वाच्या मुद्द्यापेक्षा हा "प्लेग आणि सरकारचे धोरण" संख्यांच्या दृष्टीने गौण असला, तरी इतिहासाच्या दृष्टीने खूपच रोचक आहे. तो विचारात घेतल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद

तुमच्या लेखाने पुण्याचा प्लेग सहज आठवला म्हणून उल्लेख केला होता. त्याचे संदर्भ शोधून तुम्ही इथे दिलेत म्हणजे कमालच आहे. :-) धन्यवाद.

कॉलेराच्या साथींमध्ये मेलेल्यांचे आकडे कॉलेराच्या विकी पानावर दिसले (दुवा). १८९९-१९२३ काळात भारतात ८ लाख मेले असे सांगतात.

हम्म! सुमारे २५ वर्षांत ८ लाख म्हणजे आकडा बराच मोठा आहे.

हा प्रश्न मनात येण्याचे कारण असे होते की नैसर्गिक आपत्ती - जसे पूर, दुष्काळ, वादळे यात मरणार्‍यांची संख्या किती असावी? सध्या अपघात, दहशतवाद यांत मरणार्‍यांची संख्या किती असावी असे अनेक प्रश्न मनात आले होते परंतु ८ लाखांची संख्या बघून ते प्रश्न विरले असे म्हणता यावे.

१०% हे प्रमाण खरेच खूप झाले पण सरासरी २-३% असल्यास इतरवेळेसही २-३% लोक अपघाताने मरत असावेत का?

तुमच्या "कुपोषण" या महत्त्वाच्या मुद्द्यापेक्षा हा "प्लेग आणि सरकारचे धोरण" संख्यांच्या दृष्टीने गौण असला, तरी इतिहासाच्या दृष्टीने खूपच रोचक आहे.

प्रश्न विचारताना दोन्ही मुद्द्यांवर फार विचार केला नव्हता पण तुमच्याकडून आलेले उत्तर खरेच रोचक आहे. कुतूहल वाढवणारे आहे हे निश्चितच.

दहशतवाद

दहशतवाद हा सुद्धा एक मानसिक संसर्गजन्य रोगच मानला गेला पाहिजे. या पुढच्या आकडेवारीमध्ये त्याचा नक्कीच एक परिणाम दिसून येईल.






फार छान लेख.

फार छान लेख. धनंजय शैलीतीतले शास्त्रीय विश्लेषण.

अवांतर:
जगभरातील लोकसंख्या आणि त्याच्याशी निगडीत विविध विषयांवर एक फार सुंदर व्याख्यान पाहण्यात आलं. यू ट्यूबवर हे व्याख्यान उपलब्ध आहे. प्रा.रोझलिंग ह्यांनी सादरकरणासाठी वापरलेले तंत्रज्ञान पाहून थक्क व्हायला होते. ही चित्रफीत अवश्य पहा.

फारच छान!

रोसलिंग यांच्या गॅपमाइंडर संकेतस्थळावर त्यांचे चलत्-आलेख आपल्याला हवे त्या क्रमाने बघता येतात तसेच विदासुद्धा उतरवून घेता येतो. धन्यवाद कोलबेर.

व्वा!.. धन्यु!

रोचक चित्रफित...धन्यवाद कोलबेर

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

लेख

नेहमीप्रमाणेच उत्तम.

संजय गांधीच्या काळात त्यांनी संततीप्रतिबंधासाठी लोकांवर जबरदस्ती केली असे ऐकून आहे. अशा धाकाने तेवढ्यापुरता बदल घडतो, पण मुळापासून बदल हवे असल्यास आपत्कालीन काळ नसेल तेव्हा लोकशिक्षणाच्या योजना सातत्याने राबवल्या पाहिजेत हे पटण्यासारखे आहे.

युद्धाचे परिणाम

लेख अतिशय माहितीपूर्ण वाटला. त्यामागे खूप विचार आणि मेहनत केल्याचे जाणवले.

भारत आणि स्वीडन मधले ट्रेंड्स् पहाताना एक आणखी गोष्ट जाणवली : या दोन्ही देशात विसाव्या शतकातली दोन महायुद्धे पोचली नव्हती. (स्वीडनबाबत चूभूदेघे.) धनंजय यानी "बेबी बूमर्स्" चा उल्लेख पटतोच ; पण एक युद्ध घडणे , एकूण धामधुमीचा काळ असणे या गोष्टीचा परिणामही होत असावा असे मला वाटते. थॉमसन यांच्या सिद्धांतात काही न बसणार्‍या गोष्टींची यादी धनंजय देतात. युद्ध, धुमश्चक्री , या गोष्टी यात येतील असे वाटते.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धार्मिक विचारांचा प्रभाव. कदाचित हे "लोकशिक्षणाचा प्रभाव" या विभागाखाली यावे. पण कुठल्याही कर्मठ व्यक्तीवर "लेकुरे उदंड व्हावी" या विचारांचा पगडा आहे असे दिसते : मग तो हिंदू असो , मुस्लिम असो की ख्रिश्चन. इस्रायल मधे मुले जन्माला घालण्याबद्दल सरकारी पातळीवर काही "बक्षीस" असावे असे अंधुकसे आठवते. (अर्थात , या मागे नामशेष होऊ घातलेली ज्यू जमात जिवंत राहावी असा उद्देश आहे/असावा.) ज्यूंचेच उदाहरण इतर धर्मीयांना लागू करता येईल. आजही मर्मन्स् , मुस्लिम समाज आणि हिंदूंच्या मधेही , जिथे जिथे धर्माचा पगडा बळकट आहे तिकडे "आपल्या जातीची संख्या वाढवत रहा" असा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष संदेश धर्मपीठे देताना दिसतात. या बाबतीत येशु , पैगंबराचेही दाखले देण्यात येतात.

जर्मनीसारख्या ठिकाणी लोकसंख्येत घट होते आहे असे मी ऐकल्यासारखे वाटते. हे खरे असल्यास , थॉमसन यांच्या सिद्धांतानुसार हे होत असावे काय ?

युद्धे; ना तजु़र्बाकारी से, वाइज़ की यह बातें हैं

बरोबर लहान देशांमध्ये युद्धाचा परिणाम मोठा दिसतो. साधारणपणे देशातील युवकांपैकी मोठी टक्केवारी युद्ध करण्यासाठी रवाना झाली, किंवा देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत फरक पडला, तर तो जन्म/मृत्युदरात दिसून येतो. (म्हणून भारत-पाकिस्तान युद्धाचा फरक भारताच्या आकडेवारीत दिसत नाही - भल्या मोठ्या भारताच्या लोकसंख्येपुढे, सैनिकांची संख्या थोडीच होती.)

संतती उत्पन्न करण्याबाबत धर्मशास्त्रे प्रोत्साहन देतात खरे - पाच पिढ्यांनी तर्पण केल्याशिवाय मृतात्मा तळमळत राहातो. कॅथोलिक चर्चच्या संततिनियमन-विरोधाविषयी हि गमतीदार गाणे बघितलेच असेल :

पण बहुतेक जोडपी स्वतःपुरता विचार करून मुले जन्माला घालत असावेत. "आपली जमात वाढवा/नियमित करा" दोन्ही बाजूचे सल्ले उपचारापुरते ऐकून जोडपी आपल्याला वाटेल तेच करतात. कॅथोलिक आणि मुसलमान देशांची आकडेवारी असलेले आलेख वर कोलबेर यांनी दिलेल्या संकेतस्थळावरून बघता येईल. पोपने कितीही कंठशोष केला, तरी इटालीसारख्या देशातही दर-जोडपे मुलांची संख्या कमी झाली आहे. तीच गोष्ट इजिप्त, पाकिस्तान-वगैरे मुसलमान राष्ट्रांचीसुद्धा बघता येईल.

या बाबतीत त्या संन्यस्त पोपना, मुल्ल्यांना आणि अष्टपुत्रत्वाचा आशीर्वाद देणार्‍या भटाला हेच म्हणावे लागेल "अनुभवाचे नव्हेत हे धर्मोपदेशकाचे सल्ले..." "ना तजु़र्बाकारी से, वाइज़ की यह बातें हैं..." लोक तोंडदेखले धर्मशास्त्र्याला होकार देतात, पण संक्रमणाच्या सिद्धांताचा संख्याक्रम तसाच चालू राहातो.

(अफगानिस्तानात तालिबान काळात संक्रमणाचा क्रम उलटला होता - पण आर्थिक विकासही उलथला होता, त्यामुळे कोंबडी-की-अंडे प्रश्न उद्भवतो.)

माहीतीपूर्ण

माहीतीपूर्ण धागा व प्रतिसाद.

कोलबेर यांनी दिलेला दुवा भारी.

मस्त !

लेख \ प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.
(मानमोडीनावाच्या आजाराने प्लेग,कॉलराच्या प्रमाणे लोक मरण असत म्हणे !)

हीच ती मानमोडी का?

मानमोडी नावाच्या रोगाबाबत मागे अफवा उठल्या होत्या (दुवा)

पूर्वीच्या काळी असा कुठला रोग होता का? की कुठल्या प्रसिद्ध रोगाचे देशी/हल्ली अप्रसिद्ध नाव आहे का? (म्हणजे मेनिंजायटिस वगैरे अशाच कुठल्या रोगासाठी हे नाव आहे काय?)

"मानमोडी" नावाचा पक्ष्यांचा रोग आहे, त्याच्या साथीने पक्षी कधीकधी मोठ्या प्रमाणात मरतात. रोगग्रस्त पक्ष्यांची मान वाकडी होते, म्हणून तसे नाव. पण पक्ष्यांपासून त्या रोगाची लागण मनुष्यांत फारच क्वचित होते, आणि मनुष्यांत त्याची साथही पसरत नाही. शिवाय मनुष्यांत मान वाकडी होत नसावी.

चांगला लेख/जीवनशैलीचे रोग

लेख फार छान झाला आहे. वेळ मिळेल तेव्हा वाचण्यासाठी बाजूला ठेवला होता.

अनेक पुस्तकांमधून (उदा. अभय बंग, अवचट यांची पुस्तके) असे वाचले आहे की मधुमेह, हृदरोग व तत्सम जीवनशैलीशी निगडीत रोगांचे प्रमाण वाढत आहे. भारत ही आगामी काळात अशा रोगांची राजधानी होईल. हे रोग घेऊन जगणे अवघड नसले तरी या पुस्तकांमध्ये पंचविशी-तिशीतील तरुणही मोठ्या प्रमाणावर ह्या रोगांना बळी पडत आहेत अशी अनेक उदाहरणे दिली आहेत.

याबाबत काही संख्याशास्त्रीय माहिती किंवा विवेचन वाचायला आवडेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उत्तम विश्लेषण

श्री धनंजय यांनी औद्योगीकरण आणि लोकसंख्या याच्यातला परस्परसंबंध आलेखातून सविस्तर दाखवला आहे, पण त्याची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कारणे तेवढी स्पष्ट होत नाहीत. औद्योगीकरणामुळे औषधांचे उत्पादन व दळणवळणाची साधने वाढून त्यांचे वितरण चांगल्या प्रकारे होऊ लागले. त्यामुळे साथीचे रोग आटोक्यात आले हे आज खरे असले तरी १९२९ साली अँटिबायॉटिक्स नव्हती, औद्योगीकरणामुळे येणारी सुबत्ता हेच त्या वेळी प्रमुख कारण असावे. राष्ट्र ही संकल्पना एकोणीस-वीसाव्या शतकातच जगभर रूढ झाली असे दिसेल. त्यापूर्वी युरोप सोडल्यास इतर सगळीकडे स्थानिक राजेरजवाडे आपापल्या सैन्याच्या जोरावर एकमेकांशी युद्धे करत असत. रोजच चालत असलेली आक्रमणे आणि लढाया संपून थोडे स्थैर्य आल्यानंतर जीवनाची शाश्वती वाढली ही दुसरी गोष्ट औद्योगीकरणासोबत घडली. महायुद्धामुळे जेंव्हा ती घडी विस्कटली तेंव्हा त्याचा तात्पुरता परिणाम लोकसंखेवर् झाला हे धनंजय यांनी नमूद केलेले आहेमप.

धन्यवाद

विषयाचे वेगवेगळे पैलू उकलून दाखवल्याबद्दल सर्वच प्रतिसादकर्त्यांचे आभार.

आर्थिक प्रगतीबरोबर झालेल्या समाजजीवनातील बदलांचे आनंद घारे यांनी वर्णन केले आहे; आणि त्यातून पुढे आजानुकर्ण म्हणतात तसे जीवनशैलीचे (असंसर्गजन्य) रोग होतात.

शशांक, ऋषिकेश, प्रकाश घाटपांडे, गणा मास्तर, चित्रा सहज, सर्वांनी चर्चा रंगवली, पण त्यांच्या मुद्द्यांची उत्तरे अन्य प्रतिसादांखाली दिलेली आहेत. सर्वांना धन्यवाद.

पोप आणि आफ्रिका

पोपने नुकतेच आफ्रिकेच्या दौर्‍यावर असताना "कंडोममुळे एचायव्ही चा प्रसार होण्यास मदत होते" असे म्हटले. त्यावरून बरेच वादळ उठले आहे. हा लेख वाचल्यावर, सर्वच काही कृष्णधवल नसते, आणि पोपचे खरे असू शकते, हे जाणवले. (कारण प्रमाण कमी झाले, तरी संख्या वाढल्याने, दोघांचा गुणाकार वाढू शकतो.)

--- उपक्रमी
(मराठी संकेतस्थळांवरील सर्व सदस्य तमाशाप्रेमी असतात. काही उघडपणे तमाशा बघतात/करतात, तर काही चोरून, एवढाच फरक!)

गणित महत्त्वाचे खरे - पण पोप बेनेडिक्ट यांचे चुकले असावे

दोन संख्यांचे मिळून गणित होते, तेव्हा परिणामी संख्येत दोन्ही अवयवांचा वाटा लक्षात घ्यायचा असतो. तुमचे म्हणणे योग्य आहे.

वरील लेखात फक्त (जन्मदर - मृत्युदर) = वाढदर अशी वजाबाकीच आहे, पण गुणाकाराबाबतही तुमचे म्हणणे बरोबर आहे.

आफ्रिकेतील एड्सच्या बाबतीत मात्र याचा काय मुद्दा आहे ते कळले नाही. याबाबत पोप बेनेडिक्ट यांनी कुठलेही गणित किंवा संख्या मांडली नाही. त्यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ संख्यात्मक होता असे लक्षात येता व्हॅटिकनच्या वृत्तसंस्थेने त्यांचे शब्द बदलले. परंतु काही वार्ताहारांकडे मूळ शब्दाची नोंद असल्यामुळे गोंधळ झाला. आता ते बदललेले शब्दही व्हॅटिकनच्या संकेतस्थळावर सापडत नाहीत. त्यामुळे पुढील विवेचन वेगवेगळ्या वर्तमानपत्रातूनच (दुवा १, दुवा २) उचलावे लागले आहे.

मुळात पोप बेनेडिक्ट यांनी असे काही म्हटले होते (आता हाच मजकूर व्हॅटिकन संकेतस्थळावरच्या पानावर सापडतो):

...non si può superare con la distribuzione di preservativi che, al contrario, aumentano il problema.

त्यात मध्ये काही दिवस बदल केलेला मजकूर असा होता :
...non si può risolvere il flagello con la distribuzione di profilattici: al contrario, il rischio è di aumentare il problema.

(ठळक ठसा मुख्य फरक दाखवण्यासाठी मी वापरलेला आहे.)

थोडाक्यात पहिला मजकूर म्हणतो :
(एड्सची समस्या) ... काँडोमच्या वाटपातून निवारली जाऊ शकत नाही, उलट त्याने समस्या वाढते.

थोड्या काळापुरता बदललेला मजकूर म्हणतो :
(एड्सची समस्या) ... संततिनियमनाच्या साधनांच्या वाटपातून निवारली जाऊ शकत नाही, उलट त्याने समस्या वाढण्याचा धोका आहे.

प्रथम वाक्य कुठल्याही गणिताने चूक आहे, असे माझ्या वाचनावरून मला वाटते. उपलब्ध संख्याचा गुणाकार करून कुठलेच करडे (कृष्णधवल नसलेले) उत्तर मिळत नाही. काँडोम वापरणार्‍या व्यक्तींमध्ये एड्सचे प्रमाणही कमी असते, आणि एड्सग्रस्तांची संख्याही कमीच असते, असे कृष्णधवल उत्तरच मिळते.

दुसरे वाक्य तसे संख्यात्मक नाही. संततिनियमनाची साधने म्हणजे गोळ्याही आल्या. गोळ्या घेऊन एड्सचा रोगप्रतिबंध होतो, असे कोणीच म्हणत नाही. शिवाय सम्स्या वाढण्याचा धोका आहे, म्हणजे भविष्यात धोका आहे, असा काही सौम्य अर्थ निघू शकतो. भविष्याबद्दल भाकिते ही उपलब्ध आकडेवारीवरून तपासता येत नाहीत.

या बारीकसारीक शाब्दिक तपशिलांचे मूलगामी महत्त्व नाही. तरी त्यातून असे दिसते, की गणित चुकल्याची कल्पना व्हॅटिकनमधील काही व्यक्तींना झालेली होती.

तरी या बाबतीत विचार करताना गुणाकाराच्या गणितातून काही फरक पडतो, असे विश्लेषण तुम्ही वाचले असल्यास जरूर द्यावे. कुठल्याही दोन-आकडी गणितात दोन्ही आकड्यांकडे लक्ष दिले पाहिजे, हे तुमचे निरीक्षण अचूक आहे.

कंडोम आणि संततीनियमनाची साधने

मला वाटते, की बदललेले शब्द गणित जुळवण्यासाठी महत्वाचे आहेत. कंडोमव्यतिरीक्त इतर संततीनियमनाच्या साधनांमुळे (उदाहरणार्थ गर्भनिरोधक गोळ्या) एड्स ची लागण होणे थांबत नाहीत. (हे बर्‍याच लोकांना ठाऊक नसते. ह्या इतर साधनांवर तसे स्पष्ट लिहिलेले असूनसुद्धा.)

--- उपक्रमी
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, मज फूलही रुतावे, हा दैवयोग आहे

लोकसंख्या वाढीचा दर

थॉमसन यांचा सिद्धांत आणि त्यावरील विवेचन आवडले. चर्चाही माहितीपूर्ण होत आहे.
1929 साली केलेला सिद्धांत काही अंशी आजही उपयुक्त आहे. या दरम्यान झालेली तंत्रज्ञानात्मक प्रगती आणि राज्यकारभारातील बदल यामुळे आलेखांचे गणित बदलणार हे स्वाभाविक आहे. पण हे गणित बदलले तरी त्यातील ट्रेंडस कायम राहताना दिसतात हे महत्त्वाचे. तेव्हाच्या जनगणनेच्या प्रक्रिया, विश्लेषणाची पद्धत आणि संगणकीय सहाय्य यामुळे लोकसंख्या बदलातील बारकावे अधिकाधिक उमजू लागले आहेत.

1929 पूर्वीच्या शतकांमध्ये युद्ध ही लोकसंख्येत महत्त्वाचे बदल आणणारा एक मोठा घटक होता. . महामार्‍यां बरोबर त्यांचेही स्थान हल्ली कमी झाले आहे. भारत चीन सारख्या देशात, तंत्रज्ञानामुळे आलेला व्यस्त लिंगभेद हा एक नवीन घटक आला आहे. स्थलांतर हा घटक पूर्वीपासून असला तरी त्याबाबतची माहिती आता अधिक जास्त मिळते.

लोक दाटीवाटीने राहू लागले की संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव वाढतो. लोकसंख्या वाढीचे प्रमाण घटते. देशाची साधन संपत्ती मर्यादित असते. लोकसंख्या वाढीने तिच्यावरच्या ताणामुळे आणि विषम वाटपाने अंतर्गत हिंसाचार/युद्धे होतात लोकसंख्या वाढ कमी होते. लोक समृद्ध होतात वयोमान वाढते, प्रजननक्षम लोकांचे प्रमाण एकंदर लोकसंखेतील प्रमाण घटू लागते, लोकसंख्या मर्यादते. बालमृत्यु अधिक असतात, म्हणून आधिक संतती जन्मास आणली जाते, तंत्रज्ञानामुले बालमृत्युदर कमी होतो लोकसंख्या फुगते. बालमृत्यु कमी झाल्यावर हळू हळू संततीनियमन वाढते लोकसंख्या स्थिरावते.

थॉमसनचा सिद्धांतातील पाच टप्पे हे लोकसंख्येपेक्षा देशाच्या प्रगतीचे निदर्शक असावेत. पूर्वीच्या काळी सर्व देश अप्रगत होते तेव्हा पहिल्या टप्यात होते. (जगाची लोकसंख्या बहुतांशाने स्थिर होती). नंतर पोषणमूल्यात सुधारणा होऊन दुसर्‍या तिसर्‍या टप्यात युरोप गेला (औद्योगिक क्रांती). कदाचित 1929 साली तो चौथ्या टप्यात असेल. थॉमसनच्या सिद्धांतात खरे पाहिले तर पाचव्या टप्याचे भाकित असावे. भारत चीन आज तिसर्‍यातून चौथ्यात जाऊ पाहत आहे. आफ्रिका दुसर्‍या टप्यात आहे. वगैरे.

लोकसंख्या घटाचे भाकित आज युरोप अमेरिकेत खरे होत असावे. जी वाढ दिसते आहे ती स्थलांतरितांमुळे होणारी वाढ आहे असे म्हटले जाते.

प्रमोद

 
^ वर