"कुठे काय" विषयी थोडेसे...

नमस्कार
(ह्या संकेतस्थळावर इतर संकेतस्थळांविषयीचा मजकूर वाचला आणि हा लेख लिहिण्यास धीर आला. सदर लेख ही कुठल्याही प्रकारची जाहिरात समजू नये तसेच सदर संकेतस्थळाच्या नियमांत बसत नसल्यास काढून टाकला तरी चालेल.)

मी मराठीतली काही प्रमुख संकेतस्थळे नेहेमी वाचतो. अर्थात प्रत्येक वेळी सर्वच मजकूर वाचायला जमतो असे नाही. पण गेल्या काही महिन्यांमधे मी वैयक्तिकरीत्या जास्त कार्यमग्न झालो आणि त्याचप्रमाणे संकेतस्थळांवर होणार्‍या लिखाणाची वारंवारिताही वाढलेली दिसली. बराच चांगला मजकूर वाचायचा राहून जाउ लागला आणि प्रत्येक वेळी सगळीच्या सगळी स्थळे बघणे अवघड होउन बसले. ह्यावर काही उपाय केला पाहीजे असे माझ्या मनाने घेतले आणि मग मी त्या दृष्टीने शोध घ्यायला सुरुवात केली. सगळ्यात प्रथम विचार मनात आला तो आरएसएस फीड चा. पण त्यात २ अडचणी दिसल्या - सगळ्या संकेतस्थळांचा फीड नव्हता आणि ज्यांचा होता तो माझ्या दृष्टीने उपयोगाचा नव्हता. मग नजर गेली 'मराठी ब्लॉग विश्व ' वर - अर्थात ते फक्त ब्लॉग पुरतेच मर्यादित होते. पण आपणही अशाच प्रकारचे काही तरी करावे ह्या विचाराने उचल खाल्ली.

मग शोधता शोधता नजर पडली - 'स्क्रीन स्क्रेपिंग' वर - तसच काहीसं करुन बघायच अस ठरवल. मग एक संकेतस्थळ निवडल - छोटासा कोड लिहिला आणि संपूर्ण मजकूर माझ्या संगणकावर उतरवून घेण्यात मला यश मिळाले. नंतरची पायरी म्हणजे - त्यातल्या हव्या त्या विभागाच्या हव्या त्या नोंदी वेगळ्या काढणे. हे काम अर्थात थोडे किचकट होते आणि आधी कधी केले नसल्यामुळे नीटशी कल्पना नव्हती. अजून तपास करता 'रेग्युलर एक्स्प्रेशन्स' वापरावी लागतील असे कळले. हे काम थोडे परिचयाचे असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आधी केले नव्हते. इथे मदतीला धावून आले - एक सर्वांगसुंदर एप्लिकेशन 'एक्स्प्रेस्सो ' - रेग्युलर एक्स्प्रेशन्स लिहिणार्‍यांसाठी गरजेची गोष्ट. ह्याच्यामुळे काम खूपच भरभर होउ लागले. एकदाची समस्या एका संकेतस्थळापुरती सुटली आणि मार्ग सापडला.

मग विचार सुरु झाला - की एकापेक्शा अधिक संकेतस्थळे जर जोडायची असतील (आणि तशी गरज अर्थातच होतीच) - तर नीट विचार करुन 'आराखडा' ठरवावा लागेल.
विचारात घेतलेल्या गरजा अशा होत्या -
१ आज्ञावलीत बदल न करता गरजेप्रमाणे संकेतस्थळे जोडता यायला हवीत.
२ संकेतस्थळांचे विभाग (कथा, कविता, चर्चा) नीट हाताळता यायला हवेत.
३ एखादे संकेतस्थळ जर एखाद्या दिवशी उघडत नसेल तर ती बाब नीट हाताळता यायला हवी.
४ बर्‍याच स्थळांवर 'अर्धवट दुवे' असतात - ती व्यवस्थित हाताळली गेली पाहिजे.
५ कुठे कमी तर कुठे जास्त पोस्ट्स ची संख्या नीट हाताळता यायला हवी.
६ आज्ञावलीत कुठेही हार्ड कोडींग नको.
७ मजकूराचे 'बाह्यांग' (दर्शनिय स्वरुप) हे 'साचा' (टेंप्लेट) स्वरुपातच वापरावे.
८ मुख्यपृष्ठावर 'सगळे एकत्रित' दिसले पाहीजे -ते सुद्धा दिलेल्या संख्येच्या प्रमाणातच.

एवढा सगळा विचार केल्यावर मग 'बाह्य विदा मदतीने' (मेटा डाटा) हा प्रश्न बर्‍याच अंशी सोपा करता येईल असा विचार केला आणि 'बाह्य विदा' एक्सएमएल मधे साठवायचे ठरविले. चुकादुरुस्तीस सोपे जावे म्हणून डॉट नेट मधे करायचे ठरविले. जमले. मग अजून संकेतस्थळे जोडली. पहा - "कुठे काय" - सध्या दर दोन तासांनी अद्ययावत होते.

सध्याच्या आवृत्तीतील अडचणी
- सगळ्याच संकेतस्थळांची दिनांक निर्देशन रचना सारखी नसल्यामुळे सगळीकडून नीट तारखा मिळणे कठिण जाते.
- त्याचमुळे (आणि वेगळ्या आराखड्यामुळे / आज्ञायनामुळे) तारीखवार वर्गवारी सध्या शक्य होत नाहीये

उपयोग
- सगळ्या संकेतस्थळांवरील माहिती एकत्रित एकाच ठिकाणी
- संकेतस्थळांवरील भार थोडातरी कमी होईल (अशा गोड स्वप्नात दंग :) )
- अजून कुठल्याही अशाच प्रकारच्या योजनेसाठी उपयोग
(हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे एकतर आपल्यापर्यंत हे पोचवावे आणि ही जी आज्ञावली आहे तीचा इतर बाबतीत अगदी सहज उपयोग करुन घेण्यासारखा आहे. उदाहरणार्थ : सध्या अर्थिक मंदी असल्यामुळे बरेच लोक नोकर्‍या शोधत आहेत - अशावेळी ही आज्ञावली वापरुन एक 'सगळ्या नोकरी शोध संकेतस्थळांवरचा' विदा एकत्र करुन प्रदर्शित करणे सहज शक्य आहे.)

भविष्यातील योजना
१ मुक्तस्त्रोत भाषेत आज्ञायन
२ होस्टींग सर्व्हर वर स्थापना आणि तिथूनच अद्ययावत करण्याची सोय (हा प्रकार महाग आहे असे समजते)
३ गुगल विजेट्स सारखी 'उघड झाप'

आपल्या सूचनांचे स्वागत आहे. कोणाला इच्छा असल्यास आज्ञावली उपलब्ध करुन दिली जाईल.

आपला नम्र
-- वाचक

Comments

उपयोगी

अतिशय उपयोगी संकल्पना मांडली आहे.
आणि ग्रेट काम केले आहे.
मी तर तुमचे स्थळ आता माझ्या फेव्हरिट्स मध्ये टाकले आहे.

आवांतरः
म्हणजे हा कोड तुम्ही इतरांनाही द्यायला उत्सुक आहात असे मानायचे का?
काईंड ऑफ फ्री वेयर?

आपण म्हणता तसे नोकरी विषयक स्थळ काढण्यात मला रस/उत्सुकता आहे.
व्यनि मध्ये बोलु.
-निनाद

पटले नाही

स्क्रीन क्रेपिंग करुनही जर संपूर्ण मजकूर प्रकाशित स्वतःच्या नावाने किंवा अदरवाईज़ करण्याचे काम कुठेकाय वाले करत नसतील तर इथे कायदेशीर कारवाईचा प्रश्नच येत नाही.

हा प्रकल्प फार उत्तम आहे. हार्दिक अभिनंदन. आरएसएस फीड ठेवणे न ठेवणे हा त्या संकेतस्थळाच्या धोरणाचा भाग आहे. उपक्रमाचे आरएसएस फीड असूनही त्याचा मला फारसा फायदा झालेला नाही.

उदा. (दुनियेला फाट्यावर मारणारे) काही संकेतस्थळचालक घाबरुन लोकांचे आयपी वगैरे ब्लॉक करतात त्या संकेतस्थळावर नवीन पाककृती किंवा व्यक्तिचित्र आले आहे काय याची खबर आता मिळेल असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पुन्हा पटले नाही

वाहनक्षमतेला संकेतस्थळचालक स्वतःच्या खिशातून पैसे देतात. म्हणजे, हे परवानगीशिवाय पैसे चोरण्यासारखे झाले. (ता. क. हे पाप आम्हीही केले आहे.) त्यामुळे त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

मुक्तस्रोत प्रणालीचा अध्वर्यू रिचर्ड ष्टॉलमन याचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. मायक्रोसॉफ्ट व तत्सम कंपन्यांनी, सॉफ्टवेअरांवर कायदेशीर बंधने आणून स्वतःच्या शेजाऱ्याला मदत करणे हा एखाद्याचा खून करण्याइतका मोठा गुन्हा आहे असा विचार करणारी मनोवृत्ती निर्माण केली.

जर संकेतस्थळचालकांना स्वतःच्या संकेतस्थळावर लोक येऊ नयेत असे वाटत असेल किंवा विशिष्ट लोक यावेत असे वाटत असेल तर ती काळजी संकेतस्थळचालकांनी घेणे आवश्यक आहे. (आयपी ब्लॉक करणे किंवा फक्त सदस्यांनाच प्रवेश देणे वगैरे). जर संकेतस्थळचालकांनी त्यांचे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले ठेवले असेल तर ती ब्यांडविड्थ वापरण्याचा हक्क सर्वांनाच आहे असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

म्हणजे चेंडू संकेतस्थळचालकांच्या कोर्टात

म्हणजे चेंडू संकेतस्थळचालकांच्या कोर्टात आहे वापरकर्त्याच्या नाही हेच आमचेही सांगणे आहे. रोबोट्स.टेक्स्ट फाईलचा वापर हे संकेतस्थळचालकांचे काम आहे. ः)))


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

स्वागत

१ मुक्तस्त्रोत भाषेत आज्ञायन
२ होस्टींग सर्व्हर वर स्थापना आणि तिथूनच अद्ययावत करण्याची सोय (हा प्रकार महाग आहे असे समजते)
३ गुगल विजेट्स सारखी 'उघड झाप'

श्री वाचकराव,

तुमचा प्रकल्प फारच चांगला आहे. तुम्ही भविष्यकालीन योजनांमध्ये दाखवलेल्या गोष्टी पाहून अपेक्षा फार वाढलेल्या आहेत. या संकेतस्थळावर काही तांत्रिक किंवा इतर स्वरुपाची मदत मिळेल असे वाटते. गूगल विजेट्ससारखी उघडझाप याबरोबरच एखाद्या संकेतस्थळाचा फीड देणारी विजेटे किंवा एखाद्या लेखावरील प्रतिसादांची फीड देणारी विजेटे असे देता यावे. ओंकार यांनी मोरपिसे नावाचा एक सुंदर प्रकल्प चालू केला होता. त्याची माहिती घ्यावी असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

उत्तम

उत्तम उपक्रम. शुभेच्छा आणि अभिनंदन.

----
काय? तुम्ही चित्रपट पाहिलेत? आणि वर फोटोही काढलेत? स्वतःला भौतिकशास्त्रज्ञ कसे म्हणवते तुम्हाला?

असेच म्हणतो

शुभेच्छा आणि अभिनंदन.

धन्यवाद् आणि काही उत्तरे...

उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद...

निनाद
हो ही आज्ञावली कोणालाही मोफत उपलब्ध करुन देण्याची माझी इच्छा आणि तयारी आहे. (अगदीच छोटा कोड आहे - साधारण २० ओळींचा आणि 'बाह्य विदा' (मेटा डाटा) एक्सएमएल फाईल)

सर्किट
आज्ञायन कुठल्याही प्रकारचे 'स्क्रीन स्क्रेपिंग' करत नाही. फक्त त्या त्या दुव्यावर जाउन एचटीएमएल गोळा करते. हीच क्रिया कोणीही त्या संकेतस्थळाला भेट देतो तेव्हा होत असते. ह्यातच वाहनक्षमतेचा मुद्दा अंतर्भूत आहे. शिवाय ह्याच्यावर जाहिराती आणि वर्गणी दोन्ही नाही. आणि श्रेय अव्हेर तळटीपेत दिलेला आहे. त्यातून एखाद्या संकेतस्थळ चालकांनी परवानगी नाकारली तर त्या स्थळाची जोडणी काढून टाकता येईल.

फीडस्

कल्पना छान आहे. कृपया 'कुठे काय' च्या आर. एस. एस. फीडस् उपलब्ध करून द्याव्यात ;)

वा!

वा! चांगल्या कल्पनेला मुर्त रूप दिल्याबद्द्ल आभार आणि चिकाटी आणि यशाबद्दल अभिनंदन :)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

मराठीत गुगल शोधाची खिडकी

याच स्थळावर उपक्रमाप्रमाणेच
मराठीतील गुगल शोधाची खिडकी द्याल काय?
प्रकल्पाशी सुसंगत राहील.

-निनाद

"कुठे काय" ला स्वत:चे घर

नमस्कार

आपल्या सर्वांना कळविण्यास आनंद होतो की "कुठे काय" ह्या संकेतस्थळाला आता स्वत:चे घर मिळाले आहे. नवा पत्ता आहे http://www.kuthekay.com
ह्या ठिकाणी जाहिराती, पॉप-अप्स वगैरे अजिबात नाहीत.
जरुर भेट द्या आणि आपला अभिप्राय (टीका, सूचना) नक्की कळवा.

आपला नम्र
-- वाचक

 
^ वर