सॅलिटी .वाय चा दणका

मला वाटतं साधारण दोन तीन आठवड्यांपूर्वीच कोलबेर यांच्या सुपर अँटीस्पायवेअर या लेखात मी, माझ्या संगणकावर कसा स्पायबॉट, अविरा अँटीव्हायरस वापरतो आणि माझा संगणक कसा दगडासारखा ठणठणीत/टणटणीत आहे असे विधान केले होते. वेल, ते विधान एवढ्या लवकर मागे घेण्याची वेळ येइल असे वाटले नव्हते ;-)

कालपरवाच २६ जानेवारीला भारताच्या प्रजासत्ताक दिनी, मामाने मला भाच्याला एक काम करायला सांगितले. एका परिचितांनी दिलेल्या पेन ड्राईव्ह मधील दोन चित्रपट रिरायटेबल डीवीडीवर बर्न करुन देणे. एकदमच सोपे काम!

पण पेन ड्राईव्ह संगणकाला जोडताच अविराने बोंबलायला सुरुवात केली. w32.sality.y ने आमच्या संगणकात इतमामात प्रवेश केलेला होता. पुढच्या हालचाली भराभर घडायला सुरुवात झाली. परिस्थितीचे गंभीर वळण वगैरे घेतले. वातावरणात गांभीर्य आले. तोपर्यंत सॅलिटीने हातपाय पसरलेले होते. ताबडतोब अविराने स्कॅन करतानाच कित्येक फाईल्स करप्ट झालेल्या दिसून आल्या. सगळ्यात पहिला नंबर लागला तो अविराच्याच avira.exe फाईलचा! हीच फाईल करप्ट होऊन बसली. पुढे मग अविराने करप्ट फाईल delete करणे आणि quarantine मध्ये हलवणे एवढे एकच काम उरले. रिपेअर वगैरे काही भानगडच अविरा मध्ये नाही. तो ऑप्शनच ग्रे आऊट होऊन गेला.
स्कॅन करतानाच सॉफ्टवेअर फोल्डरमधल्या बहुतांश .exe फाईल्सची वाट लागलेली दिसून आली. एक एक
सॉफ्टवेअर गंडत होते आणि नुसते बघण्य़ावाचून काहीच करता येईना. सीक्लिनर, स्पायबॉट वगैरे उघडायचे नाव घेईना. .exe फाईल्स Delete केल्या असल्याने ऍप्लिकेशन्स उघडताना फाईल शोधण्यासाठी ब्राऊझ करुन मदत करा अशी खिडकी उघडायला लागली.
आता पर्यंत आमच्या तोंडचे पाणी बर्‍यापैकी पळालेले होते. संगणक परत सुरु होईल की नाही याची खात्री नसतानाही करुन बघितला आणि तो सुदैवाने सुरु झालाही. मात्र कोणताच ऍंटीव्हायरस काम करेना. खुद्द संगणकावरच नॉर्टन ३६० होता. तो वापरता असताना संगणक खूपच हळू चालत असल्याने तो सोडून अविरा वापरायला सुरुवात केली होती. (आणि अविराने असा दणका दिला) शेवटी तो इन्स्टॉल करण्याचे प्रयत्नही विफल गेले. नेटवरुनही क्लॅमवीन, विंडोज डिफेंडर डाऊनलोड करुन पाहिले पण त्यांच्या सेटअप वर क्लिक करुन काहीच होईना. संगणक पुरता सॅलिटीच्या ताब्यात गेलेला होता. ऑनलाईन स्कॅन करण्याची काही संकेतस्थळांवर सुविधा असल्याचे पाहिले होते मात्र अशी पाने अर्धा अर्धा तास झाला तरी उघडेनात. म्हणजे असा काही प्रयत्न कुणी केलाच तर त्याला मदत न मिळण्याची खबरदारी विषाणूकर्त्याने घेतलेली होती.
सुपरऍंटीस्पायवेअर लेखातच राजेंद्र यांनी एका फोरमचा दुवा दिलेला होता. सरतेशेवटी तिथे मदत मागण्यासाठी सदस्यत्व घेतलं आणि लेख टाकला. पण त्यांनी दिलेल्या उपायाने काहीच झाले नाही. तिथे वापरायला सुचवलेल्या मालवेअरबाईटस ऍंटीमालवेअरला आख्खा संगणक पिंजूनही काहीच सापडले नाही.अर्थात शेवटचा उपाय म्हणून तिथेही कॉंम्बोफिक्स वापरायला सुचवलेले होते. मात्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय असले जहाल उपाय वापरु नका असे हात जोडून सांगणारे राजेंद्रच डोळ्यांसमोर उभे रहायला लागले. (आजही ते चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभे आहे) :-) म्हणून त्याचाही नाद सोडून दिला.
संगणक चालू असताना मात्र टास्क मॅनेजरमध्ये बर्‍याच चित्रविचित्र प्रोसेस सिस्टीममध्ये चालू असल्याचे दिसत होते. त्या end करुनही काही फायदा होत नव्हता. अखेरशेवटी स्टार्टमधून msconfig रन करुन सिलेक्टीव स्टार्टअप मधून सिलेक्टेड प्रोसेससह संगणक सुरु करण्याचा मार्ग आमच्या बंधूंनी शोधून काढला. हा प्रयत्न मात्र यशस्वी झाल्याने सॅलिटीची घटका भरलेली दिसू लागली. पुढे थोड्याच वेळात ccleaner, spyware cease इ. ने संगणकावरचा बराच कचरा साफ झाला. तोपर्यंत नेटवरुन उतरवलेला Avast antivirus तयार होताच. शेवटी कुठे त्याने स्कॅनिंगला सुरुवात केली तेव्हा २७ जानेवारीचे रात्रीचे अकरा वाजलेले होते.

रात्री साडेबारा वाजता जवळजवळ दीड लाख फाईल्स स्कॅन केल्यावर avast ने तब्बल ३३० इतक्या w32.sality.gen ने पछाडलेल्या फाईल्स शोधून काढल्या. जवळजवळ सगळ्या सॉफ्टवेअरच्या .exe फाईल्सचा यामध्ये समावेश होता. avast मध्येही रिपेअर पर्याय चालत नसल्याने त्या सगळ्या Delete कराव्या लागल्या. मात्र एवढं सगळं होऊनही विंडोज मात्र सुरक्षित राहिले होते. त्यामुळे संगणक तरी सुरु झाला.
एवढं जालमाल का नुकसान होने के बाद आता कुठे संगणकाचे जीवन पूर्वपदावर येत आहे. उडलेली सॉफ्टवेअर्स मी परत गोळा करतो आहे.

पण आता असा प्रश्न पडलाय की दररोज virus definitions update करणे,स्पायबॉट, सीक्लिनर वापरणे असले उपाय करुनही शेवटी virus संगणकात शिरलाच. केवळ detect करणे यापलीकडे त्याला कुठलाही अटकाव करणे अविराला जमले नाही. मग असल्या फ्री antiviruses चा उपयोग तरी काय? २००७ मधला हा विषाणू २००९ मध्येपण इतका त्रास देतो आहे आणि तो काढायला मला दोन तीन दिवस लागले. काही वर्षांपूर्वी व्हायरसचा उद्देश फक्त लोकांना त्रास देणे इतकाच होता पण आता एकदा आत शिरल्यावर स्वत:ला बदलत राहणारे विषाणू निघाले आहेत. संघटित गुन्हेगारीला हे एक चांगले क्षेत्र मिळाले आहे.
व्हायरस मार्फत तुम्ही टंकलेली माहिती सर्व्हरवर अपलोड केली जाऊ शकते अशा अमर्याद शक्यता निर्माण झालेल्या आहेत. विकीवरचं हे पान वाचून अजून बरीच माहिती मिळाली.

वर्षभर ठणठणीत चालण्याच्या संगणकाच्या विक्रमाला खीळ बसली असली तरी व्हायरसचे काही फायदेही झाले. यातून मिळालेलं शहाणपण बरंच मोलाचं आहे. माझी चिंतनशील वृत्तीही जरा वाढली. जीवनातली क्षणभंगुरता वगैरे लक्षात आली. सुष्ट प्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तींवर विजय इत्यादी विचार मनात आले. :-)
म्हणूनच सगळ्याच लोकांनी जरा काळजी घ्यावी, चांगलासा ऍंटीव्हायरस बसवावा (मलाही सुचवावा ;-) म्हणून हा लेख लिहला आहे. पेन ड्राईव्ह सारखी उपकरणे वापरताना पण काळजी घेणे गरजेचे आहे.

टीप: युएसबी स्तरावरील विदा हस्तांतरण केले जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी( Data transfer on USB level, will not be entertained :-) अशी पाटी मी बनवायला टाकायचा विचार करतो आहे. संगणकाच्या वर लावायला चांगली शोभून दिसेल.

-सौरभ.

Comments

हम्म

सौरभदा,
एकूणात प्रकार धक्कादायक आहे. अविरा त्यातल्यात्यात चांगले आहे असे वाटते आणि त्यांचे अपडेट ऑटोमॅटीक असतात. नॉर्टनमध्ये काहीही अर्थ नाही. नॉर्टन असताना दोनतीनदा व्हायरस आल्याचा अनुभव आहे.
फोरमबाबत. त्यांच्या उपायाचा उपयोग झाला नाही हे त्यांना सांगितले का? बरेचदा हा उपाय नाही तर तो, नाही तर दुसरा असे करावे लागते. आणि कॉम्बोफिक्स त्यांनी वापरायला सांगितले तर कसे वापरायचे हे ही सांगतात.
फुकट मिळणार्‍यांपैकी एव्हीजीचा रिपोर्ट चांगला आहे. आणि विकत घ्यायचा असेल तर कास्पेर्स्की चांगला आहे. आणखी एक आजकाल बहुतेक सर्व अँटीव्हायरस ऑनलाईन स्क्यान करून देतात, पण यात फक्त डिटेक्शन होते. व्हायरस काढायचा असेल तर सॉफ्ट्वेअर विकत घ्यावे लागते.
शेवटी वेळच्यावेळी ब्याकअप हवा म्हणजे तशी वेळ आलीच तर फॉरमॅट करता येईल.

आणखी एक : अविराने पहिली बोंब मारली तेव्हा पर्याय दिले असतील फाईल इग्नोअर/डिलीट/क्चारंटाइन वगैरे? तुम्ही कोणता पर्याय निवडला?

----
"Is there a pinkish hue?" -- George Costanza

अविरा.....

अविराने पहिल्यांदा बोंब मारली तेव्हा डिलीट सोडून सगळे पर्याय वापरुन पाहिले होते. माझ्या स्मरणशक्तीनुसार इतर पर्याय चाललेच नाहीत.
त्या फोरमवर अजून प्रतिसाद द्यायचा आहे.
एव्हीजी वापरुन पहावा म्हणतो. कास्पर्की चांगला असेल पण तो स्कॅन करताना काही सापडलं की इतके भयंकर आवाज काढतो, दचकायला होतं आणि डोकंही दुखतं. माझ्या आतेभावाकडे होता.

सौरभ.

==================

कास्पेर्स्की

मी कास्पेर्स्की वापरलेला नाही त्यामुळे आवाजांबद्दल कल्पना नाही. एव्हीजी नक्कीच चांगला आहे.
----

ए व्ही जी

ए व्ही जी चांगला आहे पण भयंकर मेमरी खातो तो.
पुण्याचे पेशवे

ए. व्ही. जी.

एव्हीजी खरंच चांगलं अँटी-व्हायरस आहे. त्यात फाईल रिपेअर करण्याचा पर्याय असल्याचा ही फायदा होतो.
क्लॅमविन(clamwin) हे फुकट मिळणारे आणि मुक्त स्रोत अँटीव्हायरस आहे. थोडे मंद गतीने काम करते, पण त्यामुळे संगणकाची शक्तीही फारशी वापरली जात नाही. जुनं कॉन्फिग्युरेशन असेल, तर् हा एक् चांगला पर्याय ठरू शकतो.

||वाछितो विजयी होईबा||

धन्यवाद

एव्हीजीतला फाईल रिपेअर पर्याय चालतो का पण? तुम्हाला काही अनुभव आहे का?

पायरेटेड सीडीज वगैरे बद्दल तुम्ही म्हणता ते योग्यच आहे. पण नवीन डीवीडी द्या आणि डेटा घेऊन जा असे केल्यास त्रास होणार नाही! ;-)

सौरभ.
==================

फाईल रिपेअर

होय. मी वापरून पाहिला आहे. ईमेल स्कॅनिंग, ऑनलाईन सुरक्षा, बाह्य-उपकरणांची(उदा.यु.एस्.बी. आणि सीडी-डीव्हीडी) स्कॅनिंग हे सर्व करतो. आणि समजा एखादा व्हायरस एव्हीजी टाकायच्या आधीपासून असेल आणि त्याने काही फाईल्स करप्ट केल्या अस्तील तर त्याही दुरुस्त करतो.(काही वेळा फाईल्स दुरुस्त होण्यापलिकडे बाधित झालेल्या असतात, तेव्हा मात्र नाही होत रिपेअर. पण बहुतेक फाईल्स रिपेअर होतात.)

नवीन डीव्हीडी-विषयी: आपल्याला कोणाकडून डेटा आणायचा असेल तर त्या डेटाबरोबर अवांच्छित व्हायरस येण्यावर आपण उपाय करू शकत नाही. पण आलेल्या व्हायरस पासून आपल्या सिस्टम ची सुरक्षा मात्र नक्की करू शकतो.

||वाछितो विजयी होईबा||

पायरेटेड सीडीज्

टीप: युएसबी स्तरावरील विदा हस्तांतरण केले जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी( Data transfer on USB level, will not be entertained :-) अशी पाटी मी बनवायला टाकायचा विचार करतो आहे. संगणकाच्या वर लावायला चांगली शोभून दिसेल.

युएसबी शिवाय पायरेटेड किंवा दुस-याच्या संगणकावर जाळलेल्या(बर्न केलेल्या) सीडीज, आणि याशिवायही माहिती वहनाचे सर्व मार्ग शेवटी अविश्वसनीयच असतात. पण ते पुर्णपणे टाळता येत नाहीत.(माहितीच आली नाही तर संगणकाचा उपयोग काय?)आपला संगणक अपडेटेड अँटी-व्हायरसने सुसज्ज ठेवणे, हेच उत्तम!

||वाछितो विजयी होईबा||

फुकट ते पौष्टिक

कालपरवा नीलकांतशी बोलताना एका अँटीवायरसच्या फायलीतच वायरस आल्याचे त्याने सांगितले तेव्हा धन्य झालो.

फुकटात उपलब्ध असलेले लायनक्स वापरण्याऐवजी ही विकतची डोकेदुखी कशासाठी हा प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही. :)

लायनक्स वापरताना माणूस आपोआपच चिंतनशील व कष्टाळू बनतो असेही एक निरीक्षण आहे.

उबुंटू वापरणे हे विंडोजपेक्षाही सोपे आहे.

विंडोज वापरत असताना मी म्याकेफीची मोफत आवृत्ती वापरत होतो (पायरेटेड नाही) त्यात कधी अडचण आली नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ह्म्....

लायनक्स वापरण्याच्या माझ्या इच्छेने कालपरवा परत उचल खाल्ली होती. :-) उबंटूवाल्यांनी घरपोच डीवीडी पाठवण्यावर विचार केला पाहिजे.
आपल्याला हवी ती सॉफ्टवेअर्स नाहीत, गेम्स नाहीत, साध्या साध्या गोष्टींसाठी दहा ठिकाणी सर्च करुन बघा असल्याप्रकाराने माणूस नक्कीच चिंतनशील आणि कष्टाळू बनेल. आमचे बंधू म्हणतात की मग संगणक तसाच बंद ठेवलेला काय वाईट? :-) ७/२४/३६५ सलग व्हायरस प्रोटेक्शन मिळेल.

==================

लिनक्स

लिनक्स मध्ये सुरुवातीला थोडाफार त्रास होऊ शकतो, पण एकदा सर्व कोडेक्स, वगैरे टाकल्यावर एक स्थिर सिस्टम तयार होते, जी आपल्याला स्थितप्रज्ञ बनवते. युबंटू खरंच चांगली ओ.एस्. आहे. पण माझ्या मते लाईव्ह सीडी साठी युबंटू पेक्षा स्लॅक्स(SLAX) हा अधिक एफिशिअंट पर्याय आहे. इंटरनेटवर कीडे करायला आम्ही स्लॅक्सला प्राधान्य देतो.

||वाछितो विजयी होईबा||

बरोबर

लिनक्स मध्ये सुरुवातीला थोडाफार त्रास होऊ शकतो

सहमत

एकदा सर्व कोडेक्स, वगैरे टाकल्यावर एक स्थिर सिस्टम तयार होते, जी आपल्याला स्थितप्रज्ञ बनवते.

सहमत

युबंटू खरंच चांगली ओ.एस्. आहे.
सपशेल सहमत

पण माझ्या मते लाईव्ह सीडी साठी युबंटू पेक्षा स्लॅक्स(SLAX) हा अधिक एफिशिअंट पर्याय आहे. इंटरनेटवर कीडे करायला आम्ही स्लॅक्सला प्राधान्य देतो.
हे माहीत नव्हते. स्लॅक्स वापरुन बघायला पाहिजे.

आपला
(संधीसाधू निष्ठावंत) आजानुकर्ण.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

स्लॅक्स

एकदम हलकी-फुलकी ओ.एस्. आहे. २००एम् बी ची सीडी आहे.
अनावश्यक फापटपसारा टाळून आवश्यक ते (बहुतेक) सर्व आहे यात.
फक्त लाईव्ह सीडी म्हणून वापरता येते. इन्स्टॉल करता येत नाही.
||वाछितो विजयी होईबा||

झुबुंटू

उबुंटीची हलकीफुलकी आवृत्तीही झुबुंटू नावाने उपलब्ध आहे. अनावश्यक फापटपसारा नाही आणि इन्स्टॉलही करता येते.

http://www.xubuntu.org/


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हलकीफुलकी

पपी लिनक्स वापरून पाहा आणि मग निर्णय घ्या "हलकीफुलकी" ओ. एस. कोणती ते.
जड बंबाळ ओ. एस. चालणार असेल तर नोपिक्स इज वन ओफ द बेस्ट!
(अवांतर : हलकीफुल्की ओ. एस. हा शब्द चपखल आणि म्हणूनच खूप आवडला)

लिनिक्स

वाचुन पहिला विचार मनात हाच आला की अरे त्या खिडकीच्या वाटेला जाता कशाला? उबंटु सारखी सुंदर ओएस असताना खिडक्यांच्या त्रासाचा एवढा काय विचार करायचा? सवयीने उबंटु नक्कीच जास्त चांगले वाटु लागेल. काही मदत लागल्यास आजनुकर्ण आहेच :) अशाने पैसे वाचतील आणि मनस्ताप सुद्धा.

दणका

फ्लॅश ड्राईव्ह वापरल्यावर आमच्या ल्यापटॉपातील खिडक्या अश्याच बंद झाल्या आहेत. त्यावर लिनक्स- उबंटू आणि विंडोजचे पार्टिशन आहे. उबंटू व्यवस्थित सुरू आहे, मात्र ल्यापटॉप विंडोजमध्ये बूटच होत नाही. त्यामुळे भ्रष्ट फायली कश्या काढाव्या प्रश्नच आहे. काही उपाय असल्यास जरूर कळवा.

सिस्टम रिस्टोअर

तुम्ही उबुंटू टाकल्यानंतर उबुंटूमधील सिस्टम ब्याकपचा पर्याय वापरुन संपूर्ण ल्यापटॉपचा ब्याकप घेतला असेल (ज्याची शक्यता कमी आहे. मी सुद्धा कधीच ब्याकप घेत नाही.) तर विंडोज पुन्हा रिस्टोअर करता येणे शक्य आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माहिती नाही.

विंडोजच्या फायली भ्रष्ट झाल्याने बूट होत नसावे. आणि बूटच होत नाही म्हटल्यावर मला तरी उपाय माहित नाही.
उबंटूतून बूट होऊन विंडोज स्कॅन करता येइल का? मी अगदी थोड्या काळासाठी उबंटू वापरले होते. (विंडोज गंडले की मी लगेच लाईव सीडी बाहेर काढतो :-)

इथे सर्वांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हीही एव्हीजी वापरुन बघा. हे पान एव्हीजीसाठी सापडले. (मला फारसे काही कळाले नाही :-)

सौरभ.

==================

बाह्य-साठवणूक उपकरणे

बाह्य-साठवणूक उपकरणे वापरताना ती जोडल्यानंतर आधी स्कॅन करून घ्यावीत. अगदी २५६एम् बी मेमरी असलेला संगणकही १-२ मिनिटात निकाल जाहीर करतो. त्यामुळे न कंटाळता प्रत्येकवेळी ही छोटीशी खबरदारी घेतल्यास पुढचा ढीगभर त्रास वाचतो.

||वाछितो विजयी होईबा||

फॉरमॅट

एवढं जालमाल का नुकसान होने के बाद आता कुठे संगणकाचे जीवन पूर्वपदावर येत आहे. उडलेली सॉफ्टवेअर्स मी परत गोळा करतो आहे.

सगळी सॉफ्टवेअर जर उडाली असतील तर फॉरमॅटच करुन टाका ना. कशाला रिस्क घेताय?

अवांतर : सॉफ्टवेअरचे अनेकवचन सॉफ्टवेअरच राहते ना?

सॉफ्टवेअरे

सॉफ्टवेअरचे अनेकवचन सॉफ्टवेअरे होईल

उदा.
ते बिस्कीट - ती बिस्किटे
ते संकेतस्थळ - ती संकेतस्थळे
ते पान - ती पाने
ते काम - ती कामे

वगैरे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कदाचित अनेकवचन वापरता येत नसावे

ते सोने - (ती सोनी - फारच कमी संदर्भात चालू शकेल)
ते पाणी - (ती पाण्ये - कधीच ऐकले किंवा वाचले नाही)
ते पितळ - (ती पितळे - फारच कमी संदर्भात चालू शकेल)

इंग्रजीत तरी सॉफ्टवेअरची परिस्थिती अशी आहे. त्यामुळे इंग्रजीत सॉफ्टवेअर शब्दाचे अनेकवचन कधी दिसत नाही. पण मराठीत वेगळा अर्थ (एक सॉफ्टवेअर = सॉफ्टवेअरची एक प्रणाली) असायला काही हरकत नाही.

मोजणे

सोने, पाणी, पितळ ह्यासारख्या गोष्टी एक सोने, दोन सोने वा एक पाणी, दोन पाणी अश्या मोजता येत नाहीत त्यामुळे त्यांचे अनेकवचन करता येत नाही. बिस्किट, पत्र, घर वगैरेंसारख्या वस्तू एक-दोन अश्या संख्येमध्ये मोजता येतात तेव्हा त्यांचे अनेकवचन बिस्किटे, पत्रे, घरे असे होते. तेव्हा माझ्यामते सॉफ्टवेअरे एक, दोन अशी मोजता येत असल्याने एक सॉफ्टवेअर, अनेक सॉफ्टवेअरे हे योग्य अनेकवचन वाटते.

बरोबर

हेच म्हणतो. इंग्रजीत मोजता येणाऱ्या वस्तू आणि न मोजता येणाऱ्या वस्तूंसाठी मेनी/मच/मोअर अशी विशेषणे आहेत. (धनंजयरावांना हे मी सांगणे म्हणजे फारच झाले. त्यामुळे आता पुरे करतो)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

बरोबर

इंग्रजीत -वेअर (म्हणजे माल) अंती असलेले शब्द अगणनीय संकल्पनांबद्दल असतात.

अर्दनवेअर - कुंभारकामाचा माल
हार्डवेअर - हत्यारकामाचा माल
...
कॉम्प्यूटर हार्डवेअर - संगणकासंबंधित जडवस्तूंचा माल
सॉफ्टवेअर - प्रणाली-माल
फ्री-वेअर - मोफत-माल
... वगैरे.

"शी इन्स्टॉल्ड सॉफ्टवेअर/सम् सॉफ्टवेअर" ("शी इन्स्टॉल्ड ए सॉफ्टवेअर/ थ्री सॉफ्टवेअर्स" असे नाही.)

सॉफ्टवेअरपैकी जे गणनीय नग असतात, त्यांना "सॉफ्टवेअर प्रोग्रॅम" असे म्हणतात.
वन् सॉफ्टवेअर प्रोग्रॅम, अ फ्यू सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्स् वगैरे प्रयोग.

इंग्रजीतला शब्द मराठीतही तसाच आला पाहिजे असा काही नियम नाही. "प्रणाली-माल" ऐवजी "प्रणाली-नग" असा अर्थ रूढ आल्यास हरकत नाही. कुठला प्रयोग रूढ होईल ते मराठी सॉफ्टवेअर अभियंत्यांच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे.

थोडेसे मोबाईल प्रमाणे

मोबाईल फोन(सेल फोन किंवा वायरलेस फोन)ला जसे मोबाईल हे रुढ मराठी नाव आहे. तसेच सॉफ्टवेअर प्रणाली/प्रोग्रॅमला फक्त सॉफ्टवेअर असे म्हणता येऊ शकते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फॉरमॅटचा उपयोग होत नाही...

सॅलिटीला फॉरमॅटचा उपयोग होत नाही. याहू आन्सर्स वर एकाने चारवेळा फॉरमॅट करुनही उपयोग न झाल्याचे लिहले होते. आणि आता व्हायरस पूर्णपणे निघाला आहेच बहुतेक! :-)

-सौरभ
==================

 
^ वर