पॅकेज डील ऑफ विपश्यना (भाग - ३)

विपश्यनेच्या कोर्समध्ये दहा दिवस रोज जवळ जवळ दहा अकरा तास मांडी घालून बसल्यामुळे पाय, मान पाठ जबरदस्त दुखतात. कारण आपल्याला एवढी बसायची सवय नसते. कोर्स मध्ये सांगितलं गेलं की तुमच्या मनातल्या जुन्या उणीवा (निगेटिव्हिटीज) मनाच्या तळातून वरती येतायत आणि हे पाय, पाठ दुखणं वगैरे त्याचंच प्रत्यंतर (मॅनिफेस्टेशन) आहे. तत्त्वतः हे बरोबरही आहे. पण या पातळीपर्यंत कुठल्याही सामान्य साधकाला सहा दिवसात पोहोचणं शक्य आहे का? कोर्स करून घरी आल्यावर दोन वेळा रविवारी असंच दहा दहा तास मी बैठक मारून बघितली. ध्यानाशिवायच. त्याही वेळेस पाय, मान, पाठ वगैरे अगदी तशीच दुखली! म्हणजे ध्यानाशिवायच आमच्या निगेटिव्हीटीज वर आल्या वाटतं!!

बुद्ध तत्त्वज्ञानावरच्या किंवा इतर कुठल्याही विशिष्ट विषयांवरच्या पुस्तकांमध्ये सर्वसाधारणपणे पुस्तकाच्या शेवटी इतर संदर्भ ग्रंथांची, संस्थांची नावं, पत्ते दिलेले असतात. परंतु विपश्यना रिसर्च इंस्टिट्यूटच्या पुस्तकांमध्ये इतर संदर्भ ग्रंथांचा, पुस्तकांचा, संस्थांचा ओझरता सुद्धा उल्लेख नाही. दहा दिवसाच्या कोर्सच्या शेवटी पुस्तकांची आणि कॅसेटसची विक्री असते. यातही फक्त याच संस्थेची पुस्तकं आणि कॅसेटस ठेवल्या होत्या. बुद्धाचं समग्र जीवन किंवा समग्र तत्त्वज्ञान यावर एकही पुस्तक नव्हतं. माझं तर अस मत झालं की मुद्दामहून बुद्धाचं संपूर्ण तत्त्वज्ञान तुमच्या समोर येऊ दिलं जात नाही. ओशो रजनीशांच्या पुस्तक प्रदर्शनातसुद्धा फक्त त्यांचीच पुस्तकं ठेवली जातात. पण सर्वात महत्त्वाचा फरक असा आहे की ओशो - बुद्ध, झेन, पतंजली, भगवद गीता, संत वाङ्मय या सगळ्या तत्त्वज्ञानांचा स्वतःच्या दृष्टिकोनातून टीकार्थ सांगतात आणि यातून स्वतःचं असं संपूर्ण स्वतंत्र तत्त्वज्ञान तुमच्यापुढे ठेवतात. त्यामुळे तसं जाहीर करून ते फक्त स्वतःच्याच तत्त्वज्ञानाची पुस्तकं विक्रीला ठेवतात. परंतु गोएंकाजी बुद्धाचं तत्त्वज्ञान, त्यात आपलं काहीच नाही असं सांगत तुमच्या पुढे ठेवतात. हे सारं बुद्धानंच लिहून ठेवलंय, मी फक्त ते भारतात परत आणण्याचं काम केलंय असं म्हणतात. बुद्ध तत्त्वज्ञानावर शेकडो पुस्तकं लिहिली गेली आहेत. जर विपश्यना रिसर्च इंस्टिट्यूट धम्मचक्र फिरत राहावं म्हणून आणि जास्तीत जास्त लोकांना या तत्त्वज्ञानाचा लाभ मिळावा म्हणून काम करतीये तर अशी चांगली पुस्तकं साधकांना देण्यात या संस्थेला स्पर्धात्मक धोका वाटतो का?

विपश्यनेच्या संदर्भात माझ्या वाचनात दोन उत्कृष्ट पुस्तकं आली. (आणि सदर लेखातले बुद्ध तत्त्वज्ञानाचे बरेच संदर्भ या दोन पुस्तकांमधले आहेत. ) या पुस्तकांचे लेखक दोघंही वेगवेगळ्या विचार शाखांचे. पण माझ्या मते कुठली विचार शाखा योग्य किंवा कुठली अयोग्य असा विचार करण्यापेक्षा, जे आपल्याला भावतं ते तत्त्वज्ञान आत्मसात करणं इष्ट. या दोन पुस्तकांपैकी पहिलं होतं मिशेल जिन्सबर्ग या लेखकाचं. जिन्सबर्ग महायानवादी. त्याने विपश्यनेवर लिहिलेलं 'द फार शोअर' हे पुस्तक तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीतच आमूलाग्र बदल घडवतं. मी तर म्हणेन कामधंदा करणाऱ्या तुमच्या माझ्या सारख्यानं रोज वाचावं इतकं चांगलं हे पुस्तक आहे. दुसरं पुस्तक थिश न्हात हान यांचं. हान हे थेरवादाचे पुरस्कर्ते. त्यांची खरं तर बुद्ध तत्त्वज्ञानावर पुस्तकांची मालिकाच आहे. पण त्यातही 'ब्रीद! यू आर अलाइव्ह' हे सर्वात उत्कृष्ट. आनापान सती सूत्र अगदी सोप्या शब्दात त्यांनी सांगितलंय आणि अक्षरशः संपूर्ण मानसिक यशस्वितेची गुरुकिल्लीच जणू तुमच्या हातात दिलीय. पण दोन्ही लेखकांचं मोठेपण याच्यातच आहे की यांचा कुठलाही दावा नाही, दर्पोक्ती नाही, मार्केटिंग गिमिक्स नाहीत. अशा प्रकारच्या पुस्तकांच्या तुलनेत विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूटचा पोकळ पणा लक्षात आल्यावाचून राहत नाही.

दहा दिवसाचा विपश्यनेचा कोर्स मी पूर्ण केला, परंतु यातल्या बऱ्याच गोष्टी मनाला पटल्या नाहीत. याचा अर्थ अगदी हे बुद्ध तत्त्वज्ञान नाहीच असं मी म्हणत नाही परंतु एक गोष्ट अगदी वादातीत आहे की या संपूर्ण कोर्स मध्ये जसं चित्र उभं केलं जातं, त्यापेक्षा बुद्ध तत्त्वज्ञान कित्येक पटींनी समृद्ध आणि अथांग आहे. नीटशी विपश्यना शिकण्यासाठी दहा दिवस हा अगदीच तुटपुंजा वेळ आहे. त्यामुळे या दहा दिवसात आपण विपश्यना तंत्र शिकलो किंवा आपल्या मनाचं शुद्धीकरण केलं गेलं किंवा आपल्यातल्या जुन्या निगेटिव्हिटीज बाहेर पडायला लागल्या असा समज साधकांच्या मनात संमोहन शास्त्राचा वापर करून निर्माण केला जातो. खरं तर विपश्यना म्हणजे फक्त मनाचं निरीक्षण करणं आणि संमोहन म्हणजे मनाला दावणीला बांधणं. त्यामुळे या दोन विरुद्ध टोकाच्या गोष्टी एकत्र आणल्या नसत्या तर फार बरं झालं असतं. आनापान सती सूत्र हे बुद्धाच्या महत्त्वाच्या सूत्रांपैकी एक. आणि विपश्यनेसाठी तर ही पूर्वतयारी आवश्यक. यात सांगितलेल्या श्वासोच्छ्वासाच्या सोळा पद्धती किंवा मनसमृद्धीच्या आस्थापनांवर आधारित त्यांचं वर्गीकरण या साऱ्या गोष्टींचा विपश्यना कोर्स मध्ये ओझरता उल्लेखही येत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे वेदना आणि संवेदना याबाबतीत गुरुजी आणि स्वतः गौतम बुद्ध यांच्यात मतभिन्नता असावी असं वाटतं! अर्थात संमोहन या मतभिन्नतेवरही झाकण घालतं.

विपश्यनेचा हा कोर्स करावा की करू नये हा पूर्णपणे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या कोर्समध्ये बुवाबाजी, अंधश्रद्धा वगैरे असली फसवा फसवी काही नाही. पण हे म्हणणं म्हणजे या औषधाचा उपाय काहीही झाला नाही तरी साइड इफेक्ट काही नाही असं म्हणण्यासारखं आहे. प्रश्न साइड इफेक्टचा नसतो तर मूळ इफेक्टचा असतो. आणि इथे मूळ इफेक्ट नक्की काहीच नाही. हा लेख लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की गोएंकाजींच्या विपश्यना कोर्समध्ये शिकवलं जाणारं तत्त्वज्ञान हे म्हणजे एक 'पॅकेज ऑफ इंस्टंट विपश्यना मिक्स' आहे हे तुमच्या लक्षात आणून द्यावं. तदनंतरही खऱ्या आणि रसभरित बुद्ध तत्त्वज्ञानाची गोडी चाखायची का कॅंड फूड खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

- समाप्त

Comments

अनुभवकथन

आवडले.

विपश्यनेचा हा कोर्स करावा की करू नये हा पूर्णपणे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या कोर्समध्ये बुवाबाजी, अंधश्रद्धा वगैरे असली फसवा फसवी काही नाही. पण हे म्हणणं म्हणजे या औषधाचा उपाय काहीही झाला नाही तरी साइड इफेक्ट काही नाही असं म्हणण्यासारखं आहे. प्रश्न साइड इफेक्टचा नसतो तर मूळ इफेक्टचा असतो. आणि इथे मूळ इफेक्ट नक्की काहीच नाही.

याबाबतीत :

विपश्यनेबद्दलच्या एका अभ्यासप्रकल्पात माझा दूरान्वये संबंध आहे (दुवा).

प्रकल्पाची योजना निश्चित करताना योजनेतच कुठला पूर्वग्रह चुकून घुसू नये, म्हणून आकडेशास्त्राच्या दृष्टीने अभ्यासकांनी माझ्याशी सल्लामसलत केली होती - पण मला विपश्यनेबद्दल काही माहीत नाही. (थेटर बांधणार्‍याला असे करावे लागते - अभिनयाचा ओ-का-ठो न कळणार्‍या गवंड्याला भिंत बांधण्यासाठी कंत्राट द्यावे लागते. तसा काही प्रकार.)

पण अर्थातच, या अभ्यासाचे जे काही निष्कर्ष पुढे कधी निघतील त्याबद्दल मला कुतूहल आहेच :-)

छान

अनुभव आवडला. पुस्तके घेऊन वाचण्यासारखी दिसतात.
मीही सध्या काही पुस्तके वाचते आहे, त्यात दलाई लामांचे एक पुस्तक आहे. त्यात अशा प्रकारच्या साधनेबद्दल लिहीले आहे. बौद्ध विचारांची ओळख करून घेण्यासाठी मला हे पुस्तक उपयुक्त वाटले.

माझ्या भाच्याची आजी विपश्यनेला गेली होती. दहा दिवसांचा कोर्स पूर्ण न करता चार दिवसांतच परत आली. तिला विपश्यना करताना माझा लहान भाचाच डोळ्यासमोर दिसू लागला, तो रडल्यासारखे वाटू लागले, आणि आजीला रहावेना! :)

चांगली लेखमाला

लेखमाला आवडली.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

जे आहे ते..

कोणतेहि निष्कर्ष काढण्याची घाई न करता, जे आहे ते हे असं आहे असे सरळ आणि स्पष्टपणे सांगणारी लेखमाला आवडली!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

धन्यवाद

लेखमाला वाचायला आवडली.

ओळखीतले काही जण जाउन आले आहेत व काही जण जाणार त्यांना नक्की वाचायला देईन.

सरळ

सरळ साध्या सोप्या शब्दातले आणि आमच्यासाठी वेगळ्या विषयावरचे अनुभवकथन आवडले. लेखाचा शेवट खुपच आवडला. लेख मालेच्या सुरुवातीला जे मत होते आणि आता जे आहे त्यात बराच फरक आहे. असो, लेखमाले बद्दल धन्यवाद.

प्रचंड अपयश.

ही लेखमाला म्हणजे मिलिंदरावांचे प्रचंड अपयश आहे असेच खेदाने म्हणावे लागेल. विपश्यनाचे नेमके तंत्र, त्याचा आवाका आणि पथ्ये ही नेमकी न समजल्यामुळे विपश्यनेचा मूळ गाभाच या लेखमालेतून हरवला गेला आहे.

ज्याकोणी अद्यापही विपश्यना हे ११ दिवसाचे शिबीर केले नसतील त्यांनी आपल्या आयुष्यातील कधीतरी ११ दिवस काढावे आणि प्रत्यक्ष अनूभव घ्यावा असे सूचवावेसे वाटते. अश्या ऐकिव आणि पूर्वग्रहावरील लेखावर अवलंबून न राहता आपला अनुभव आपण स्वताच घ्यावा हेच खरे.

गोयंकागुरुजीच्या एका मताबद्दल मीही माझ्या अल्पमतिप्रमाणे वेगळे मत मांडेल. गोयकांजीच्या कथनानूसार विपश्यना हेच तंत्र मनाच्या शुद्धीसाठी आहे तर माझ्या माहितीप्रमाणे पातंजलीच्या अष्टांग योग, नामस्मरण, ध्यान, सेवा इत्यादींनी माणसाचे अतःकरण शुद्ध होऊ शकते आणि त्याला जन्ममृत्युच्या फेर्‍यातून सूटका मिळु शकते.

बुद्धाने आपल्या जिवनात एकुण २५० पद्धतीच्या ध्यानपद्धतीचा आढावा घेतला आहे, त्यापैकी विपश्यना हे एक तंत्र विकसित केले गेले आहे.

कसं काय?

द्वारकानाथजी

आपलं म्हणणं नीटसं कळलं नाही. मी विपश्यनेचा दहा दिवसाचा कोर्स गोएंकाजींच्या केंद्रातून केला आणि बर्‍याच गोष्टी खटकल्यामुळे बुध्द तत्वज्ञानावरची काही पुस्तकं वाचली. हे सगळं करून माझा अनुभव आणि मतं मांडली. ती तुम्हाला पटलीच पाहिजेत असा माझा काही आग्रह नाही. पण माझी मतं म्हणजे माझं 'प्रचंड अपयश' हे कसं काय ते कळलं नाही. ते जरा विशद कराल का?
विपश्यनाचे नेमके तंत्र, त्याचा आवाका आणि पथ्ये ही नेमकी न समजल्यामुळे विपश्यनेचा मूळ गाभाच या लेखमालेतून हरवला गेला आहे.

'विपश्यनेचे' म्हणजे गोएंकाजी शिकवतात त्या विपश्यनेचे तंत्र, आवाका आणि पथ्य मला कळली नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय की सर्वसाधारण बुध्द तत्वज्ञानातल्या विपश्यनेबद्दल तुम्ही म्हणताय? मूळ विपश्यनेचे तंत्र, आवाका आणि पथ्य ही गोएंकाजींच्या विपश्यनेत कुठेच दिसत नाहीत हाच तर माझा या संपूर्ण लेखमालेतला दावा आहे. बुध्द तत्वज्ञानात वर्णन केलेल्या विपश्यनेच्या तंत्राबद्दल मी भरपूर माहिती माझ्या लेखात दिली आहे. बुध्द तत्वज्ञानातल्या दोन विचारधारा (थेरवाद आणि महायानवाद), या विचारधारांची मी वाचलेली पुस्तकं आणि या दोन्ही विचारधारांच्या दृष्टिकोनातून दिसणारं विपश्यनेची पूर्वतयारी, श्वासोश्वासावर आधारित विपश्यना तंत्र आणि आवाका यांचा बराच उहापोह मी केला आहे. यावर अधिक चर्चा करायची असल्यास त्यासही माझी तयारी आहे. या सार्‍या मूळ तत्वज्ञानासमोर गोएंकाजींच्या कोर्समधे शिकवल्या जाणार्‍या विपश्यनेचा पोकळपणा माझ्या लेखात मी दाखवायचा प्रयत्न केलाय. विपश्यनेचा मूळ गाभाच या कोर्समधून निघून गेलाय असं माझं स्पष्ट मत आहे.

अश्या ऐकिव आणि पूर्वग्रहावरील लेखावर अवलंबून न राहता.....
माझा लेख ऐकिव आणि पूर्वग्रहावर आधारित कसा काय आहे जरा सांगाल का? मी स्वतः हा कोर्स पूर्ण केला, त्यानंतर मी यासंदर्भात पुरेसं वाचनही केलं आणि मग माझी मतं तयार केली, याला ऐकिव माहिती म्हणतात का? हा कोर्स मी मोठ्या अपेक्षेने केला होता. माझ्या लेखात मी म्हटलंय की माझ्या मोठ्या भावानं आणि दोन चार इतर विचारी मित्रांनी या कोर्सबद्दल चार चांगल्या गोष्टी सांगितल्यामुळेच मी हा कोर्स करायला उद्युक्त झालो. माझा आधीच काही पूवग्रह होता हा निष्कर्ष आपण कसा काढलात हे काही कळलं नाही.

....आपला अनुभव आपण स्वताच घ्यावा हेच खरे

मी हा कोर्स कुणी करूच नये असं माझ्या लेखात म्हटलंच नाहीये. पण बुध्द तत्वज्ञान अथांग आहे आणि त्याची गोडी अवीट आहे त्यामुळे त्याची ही खरी गोडी चाटायची का कॅन केलेलं फूड खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं म्हटलंय. मला वाटतं याचा अर्थ अगदी सरळ आहे. त्याचबरोबर ही माझी मतं आहेत, जी मी सगळ्यांच्या समोर ठेवलीयेत. बुध्द तत्वज्ञानाच्या कुणा अभ्यासकानं माझी मतं कशी चूक आहेत हे मला दाखवून दिलं तर ते समजून घेऊन सुधारणा करण्याची माझी तयारी आहे. पण अभ्यास न करता किंवा फक्त गोएंकाजींच्या पठडीतलाच म्हणजे फक्त एकाच बाजूचा अभ्यास संपूर्ण बुध्द तत्वज्ञान म्हणून करुन केलेली टीका मात्र पटण्यासारखी नाही.

- मिलिंद

नीटसं कळलं नाही

मला सुद्धा त्यांनी असे का म्हटले कळले नाही. अर्थात आम्हाला त्याची सवय आहे. आमच्या सारख्या सर्वसामान्यांना त्यांची अशी वाक्ये नेहमीच कोड्यात टाकून जातात. स्पष्टीकरण विचारल्यास विषय भरकटत जातो अथवा उत्तर मिळतच नाही अथवा वादासाठी वाद घातला जातो असे ऐकावे लागते असा आजवरचा अनुभव आहे. असो. आपले वैयक्तिक मत इतरांना पटावे हा हट्ट मात्र मला वैयक्तिकरित्या पटत नाही. तुमची लेखमाला आणि मांडण्याची पद्धत मला तरी पारदर्शक वाटते. आपण द्वारकानाथांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला सुद्धा अपेक्षित आहेत.

उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रिय चाणक्य,

मिलिंदरावाना विपश्यनेचा नेमका गाभा काय आहे, त्याचे तंत्र काय आहे आणि नेमके त्यांचे काय चुकले याबद्दल माझ्या शक्तिप्रमाणे लिहिण्याचा एका वेगळ्या लेखात प्रयत्न केला आहे.

माझा हा प्रयत्न गोड करुन घ्यावा. त्रुटी असल्यास सांगाव्या.

आपण माझ्या दोषांना सवय असे सांगितले आहे हा आपला मोठेपणा आहे. अहो, ही खोड आहे. जित्याची खोड असा काहीसा वाक्यप्रचार ऐकल्यासारखा वाटतो.

असो.

सस्नेह,

द्वारकानाथ कलंत्री

शब्दाची चुक मागे घेतो.

मिलिंदराव्,

याबाबतीत मी माझे म्हणणे मांडत राहीलच. तुर्त "प्रचंड" हे विशेषण मागे घेतो.

चुक आणि अपयश मध्ये तौलनिक असा फरक आहे. चुक सुधारता येते पण अपयशासाठी परत एकदा प्रयत्न करावा लागतो. या दृष्टीकोनातून माझ्या शब्दाकडे पहावे. ( परत एकदा मरकळवारी करायला हरकत नाही, जातांना मला घेऊन जा....हलके घ्या.)

शक्यतो आपल्या जास्तीत जास्त मुद्द्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेन. मलाही प्रचंड हा शब्दाचा वापर चुकीचाच वाटतो म्हणून हा प्रतिसाद देत आहे.

विपश्यना तंत्राबद्दल आदर ठेवणारा..( द्वारकानाथ कलंत्री)पुणे.

यशापयश

ही लेखमाला म्हणजे मिलिंदरावांचे प्रचंड अपयश आहे असेच खेदाने म्हणावे लागेल. विपश्यनाचे नेमके तंत्र, त्याचा आवाका आणि पथ्ये ही नेमकी न समजल्यामुळे विपश्यनेचा मूळ गाभाच या लेखमालेतून हरवला गेला आहे.

याचा अर्थ द्वारकानाथांना अभिप्रेत असलेल्या अनुभवानुसार जी मते त्यांची आहेत ती मिलिंदरावांची नाहीत. आपल्या मताशी सहमत नसलेल्यांना मुद्द्याचा गाभाच समजला नाही असे म्हणणे ही बाब नवीन नाही. ही मिलिंदरावांची ही त्यांच्या अनुभवावर आधारित मते असल्याने त्यात यशापयाशाचा भाग ही बाब सापेक्ष आहे
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद.

प्रकाशराव,

आपण मध्यममार्ग स्विकारला आहे. मिलिंद इतका स्वता:चा वेळ देऊन गेले आणि त्यांना त्याचे योग्य ते लाभ मिळाले नाही या गोष्टीबद्दल मला वाईट वाटते म्हणून मी असे लिहिले. दुसरे म्हणजे बर्‍याचदा आपण कोणाच्या तरी तोंडी प्रसिद्धी ऐकुन असे कार्यक्रमात सहभागी होत असतो. मिलिंद यांचा प्रतिसाद / लेख वाचुन कदाचित कोणी नवोदित या तंत्राचा लाभ घेणार नाही अशी शंका माझ्या मनात आल्यामूळे मी असे मत व्यक्त केले.

बाकी त्यांच्या मुद्द्यांचा प्रतिवाद कसा करावा याचा विचार करत आहे. तो योग्य वेळी लिहिनच, तुर्त धन्यवाद.

द्वारकानाथ कलंत्री

धन्यवाद

लेखावर आलेले प्रतिसाद, त्या प्रतिसादांवर आलेले प्रतिसाद आणि त्यावर पुन्हा आलेल्या प्रतिसादांसाठी सगळ्यांचेच मनापासून आभार!

मिलिंद

काही वेळा

मी काही वेळा काही गोष्टींच्या पुढे मेंदू घासण्यापेक्षा,
मेंदू त्या गोष्टीच्या मागे ठेवून काही जमते का ते पाहतो.

आपला
गुंडोपंत

बुवाबाजीचे वेगळे स्वरूप!

मिलिंदजींच्या कथनावरून गोयेंकाजींचे विपश्यना शिबीर हाही बुवाबाजीचा एक वेगळाच प्रकार वाटला असे माझे प्रामाणिक मत बनलंय. हल्ली तसेही बरेच बाबा-बुवा आपापल्या पद्धतीने योग,ध्यान-धारणा शिकवत असतातच. कुणी त्याला अष्टांगयोग म्हणतो,कुणी त्याला ब्रह्मविद्या म्हणतो,कुणी पातंजल योग तर कुणी अजून काही. ह्यातून काही प्रमाणात मन आणि शरीरशुद्धी होते हा एक फायदा मात्र नजरेआड करता येणार नाही.
मात्र शरीराला कष्टाची अजिबात सवय नसताना वाट्टेल् तसा शारिरिक व्यायाम करणे अथवा आपले शरीर हवे तसे वळत नसताना जबरदस्तीने ते एकाच स्थितीत कैक तास ठेवण्याचा अथवा वळवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शरीररावरचा अत्त्याचारच आहे आणि त्यामुळे निसर्गनियमानुसार शरीर तक्रार करणारच(दुखणार). अशा बाबतीत मनातल्या निगेटिव्हज वर आल्या म्हणणे म्हणजे शुद्ध फसवणूक आहे.
अशाच तर्‍हेचा अनुभव मला १० दिवसांच्या रिकी शिबिराबाबतही आला होता. कोणतेही शास्त्र कुणालाही सहज जमू शकते...असा जो गैरसमज ह्या असल्या शिबिरांनी निर्माण केला जातो तोच मुळात चुकीचा आहे. म्हणूनच मी ह्याला बुवाबाजी म्हणतो.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

 
^ वर