तेलही गेलं ... (भाग - अंतिम)

यापूर्वीही मी म्हटल्याप्रमाणे तेल कंपन्या त्यांच्याकडे असलेल्या तेल साठ्यांबाबत कधीही खरं बोलत नाहीत. कारण त्यांच्या समभागांचे बाजारभाव त्यांच्या तब्येतीवरच अवलंबून असतात. दुसरं म्हणजे या कंपन्यांच्या ख्यालीखुशालीवर देशाचं (विशेषतः अमेरिकेसारख्या) अर्थकारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. त्यामुळे यांच्या थापेबाजीला सरकारं आणि राजकारणीही पाठिंबा देतात. वरचं मजेशीर चित्र असंच या कंपन्या चोर आणि थापेबाज असतात असं दर्शवणारं आहे!

या साऱ्या कारणांमुळे हे सांगता येणं अवघडच आहे की नक्की तेल आणि वायूचे साठे कधी आणि कसे कसे संपत जातील. पण एक गोष्ट निर्विवाद आहे की आपण आता अशा एका भविष्याला सामोरे जातोय की जिथे संपूर्ण अनिश्चितता, असुरक्षितता आणि अंधःकार भरलेला असेल. या अनिश्चितता आणि असुरक्षिततेच्या पोटीच अमेरिकेनं इराकवर हल्ला केला असणार असं तर्कशास्त्र मांडणारे जगात बरेच लोक आहेत. हेच कारण अमेरिका आणि इराण यांच्यातल्या धुसफुशीमागे असण्याची शक्यताही दाट असणार.

जगातल्या शिल्लक तेलसाठ्यांपैकी दोन तृतीयांश किंवा अधिक साठे आता मध्यपूर्वेत शिल्लक आहेत. अमेरिकेकडे आता लक्षणीय तेल साठे जवळ जवळ नाहीतच आणि त्यामुळे मध्य पूर्वेत आपली दादागिरी चालू राहण्याची तीव्र इच्छा अमेरिकेला असणार यात कुठलीही शंका नाही. या इच्छेपोटीच आपली एक चौकी (इराक) अमेरिकेनं या भागात बसवली असणार. संपूर्ण जगाच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकणाऱ्या नीतीची ही पहिली पायरी असावी असं वाटतं. इस्रायलच्या अरब राष्ट्रांशी असणाऱ्या शत्रुत्वाला त्याची स्वतःची अशी कारणं आहेत. या कारणांसाठीच इस्त्रायल अमेरिकेवर (आणि इंग्लंडवर) या भागात त्यांची (सैन्याची) कारवाई करायला दबाव टाकत आहे. खरं तर मागचे बरेच वर्षं इस्त्रायल अमेरिकेवर हा दबाव टाकतंय पण आता आताच अमेरिकेनं इस्त्रायलची विनंती लक्षात घ्यायला सुरवात केली आहे आणि याचंही खरं कारण या भागातली आपली दादागिरी वाढवणं आणि त्यायोगे तेलावरचं आपलं नियंत्रण कमी होऊ न देणं हेच असावं असं दिसतंय. आता हेच सारं तर्कशास्त्र आणखी पुढे ताणलं आणि तेलाची टंचाई वाढीला लागली तर येत्या काही वर्षात अमेरिकेनं सौदी अरेबियाची सत्ता काबीज केल्यासही नवल वाटण्याचं कारण नाही.

दुसऱ्या बाजूला जसं जसं अमेरिका मध्य पूर्वेतलं आपलं स्थान बळकट करत जाईल तसतसं मुस्लीम मूलतत्ववाद्यांचा अमेरिकेच्या विरोधातला रोषही वाढत जाईल. आणि मुस्लीम देशांमधला या मुलतत्ववाद्यांचा पाठिंबा वाढत जाईल. या पार्श्वभूमीवर लष्कर-ए-तैय्यबा सारख्या अतिरेकी संघटनांचं उद्दिष्टं- न्यूयॉर्क, दिल्ली आणि तेल अव्हीव वर इस्लामचा झेंडा फडकावणं - लक्षात येण्यासारखं आहे आणि मागच्या काही वर्षांमधल्या त्यांच्या आपल्या देशातल्या वाढत असलेल्या हल्ल्यांमागची विचारसरणीही लक्षात येऊ शकते.

या सगळ्याचा भारताच्या दृष्टीनं अर्थ काही फारसा चांगला नाही. भारताची तेलाची भूक दिवसेंदिवस वाढतच जातीये. आपल्या आर्थिक प्रगतीचा वेगही तेलाच्या किंमतींवर आणि तेलाच्या उपलब्धतेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. दुसरं म्हणजे रॉकेल सारखं इंधन जे सर्वसाधारण मनुष्य वापरतो ते राजकीय कारणांमुळे महाग करणं (आंतरराष्ट्रीय किंमतींच्या बरोबरच) आपल्याला अशक्य आहे. त्यामुळे सरकारचा यावरचा खर्च वाढतच जाईल. याबरोबरच आपली वाढत जाणारी लोकसंख्या आपल्यासाठी ही समस्या जटील करू शकते. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला तेल उत्पादक (मुख्यत्वे अरब) देशांबरोबरही मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतील आणि अमेरिकेसारख्या विकसीत देशांशीही संबंध बिघडून चालणार नाही. ही खरंच अवघड तारेवरची कसरत असेल. याबरोबरच अमेरिकेनं मध्य पूर्वेतलं आपलं बस्तान जर घट्ट करायला सुरवात केली तर अमेरिकेच्या बरोबरच आपल्या देशातही अतिरेकी हल्ले वाढत जाऊ शकतील आणि ही एक डोकेदुखीच होऊन बसेल. पाकिस्तानशी युद्धजन्य परिस्थिती ही पण एक कायमचीच गोष्ट होऊ शकेल आणि याचाही आर्थिक प्रगतीला फटका बसेल.

जागतिक नेत्यांनी आता तरी जागं होणं आवश्यक आहे आणि या समस्येकडे काळजीपूर्वक बघणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खरंतर या समस्येकडे एक नवीन उर्जा शोधून काढण्याची एक सुवर्णसंधी म्हणून बघितलं तर पर्याय सापडूही शकेल. सामुदायिकरित्या पर्यायी उर्जेच्या संशोधनावर पुढची पंधरा वीस वर्षं जर लक्ष केंद्रीत केलं आणि यासाठी लागणारा पैसा उपलब्ध करून दिला गेला तर उत्तर सापडणं अवघड नाही.

या लेखमालेच्या शेवटी पुन्हा एकदा थोडसं हा प्रश्न कशानं थोडासा हलका होऊ शकेल आणि कशानं जास्त अवघड होऊन बसेल हे बघूया. प्रथम कुठच्या गोष्टींनी हा प्रश्न सुटेल किंवा हलका होईल -

१) 'तेल पराकोटी' दाखवून देणारं हब्बर्ट आणि इतर भूगर्भ तज्ञांचं संशोधन चुकीचं असल्याचं सिद्ध झालं.

२)मध्य पूर्वेत आताच्या अंदाजांपेक्षा खूप जास्त तेल साठे सापडले.

३)मध्य पूर्वेत किंवा जगात इतरत्र कुठेही तेलाचे अतिप्रचंड साठे सापडले.

४)तेल संवर्धनावर संशोधन होऊन तेलाची गरज कमी करण्यात यश मिळालं.

५)आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्रीतरित्या संशोधन करून नवीन आणि पुरेशी उर्जा उपलब्ध झाली.

६)चीन आणि भारतानं वाहनांच्या आणि औद्योगिक संयंत्रांच्या कार्यक्षमतेवर कडक निर्बंध लागू केले.

७)सँड ऑईल, शेल ऑईल, कोळसा यावर अधिक संशोधन होऊन या इंधनाची शुद्धीकरणाची कार्यक्षम पद्धती शोधून काढण्यात आली.

आता कुठच्या गोष्टी या समस्येला अधिक अवघड बनवतील -

१) तेल पराकोटी या संशोधनाप्रमाणेच किंवा त्याआधीच झाली असेल.

२)मध्य पूर्वेतले तेल साठे घोषित साठ्यांपेक्षा कमी असतील.

३)अतिरेकी हल्ले आणि युद्धं.

४)तेल उत्पादक देशांमध्ये राजकीय अस्थैर्य.

५)तेल पराकोटीच्या समस्येवर तोडगा शोधण्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायांकडून होणारा उशीर.

६)ग्राहकांची वाढती भोगलोलुपता.

७)लोकसंख्येत अमर्यादित वाढ.

वरचे हे दोन्ही मुद्दे आणि त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी बघितल्या तर ही समस्या अवघड बनवणारे जे मुद्दे वर मांडले आहेत ते दुर्दैवानं आज तरी जास्त सयुक्तिक वाटतात आणि ही गोष्ट या जगासाठी चांगली नाहीच.

शेवटी, आपल्या भविष्यात नक्की काय लिहिलंय? खरं तर कुणास ठावूक. पण एक गोष्ट नक्की की तेल संपणार आहे आणि त्यामुळे खूप मोठे घोटाळे होणार आहेत. या घोटाळ्यांची सुरवात झालीही असेल किंवा कदाचित येत्या काही वर्षातच होईल. वर्षं, दोन वर्ष, दहा वर्षं किंवा अगदी वीस वर्षं... मानवतेच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर या आकड्यांना फारसं काहीच महत्त्व नाही. आपण किंवा आपली मुलं किंवा अगदी फार तर फार आपली नातवंडं या वैश्विक होळीत होरपळून निघणार यात कुठचीच शंका नाही. या शतकात अशा रितीनं संपूर्ण पणे आपण ही जीवाश्म इंधनं वापरून संपवून टाकली तर आणि तरीही ही पृथ्वी वास्तव्य करण्याजोगी उरली असली तर संपूर्ण नवीन इंधनरहित अशी जीवनपद्धती आपल्याला शोधून मात्र काढायला लागेल.

- समाप्त.

संदर्भ
१)http://www.peak-oil-crisis.com/
२)http://www.peak-oil-crisis.com/peakeconomics_article.htm
३)http://www.peak-oil-crisis.com/hubbert_link.htm
४) पीक ऑईल - अ प्रेझेंटेशन - ली बार्नेस आणि निक जिफीन
५) पीकींग ऑफ वर्ल्ड ऑईल प्रॉडक्शन - रॉबर्ट एल हिर्श
६) एंड ऑफ द एज ऑफ ऑईल - डेव्हिड गूनस्टाईन
७) ऑईल अँड गॅस जर्नल - वेगवेगळे अंक
८) इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी चे संकेतस्थळ

Comments

धन्यवाद

मिलिंदजी,
एरव्ही सर्वसामान्यांच्या चर्चेत केवळ त्याच्या वाढणार्‍या किंमती संदर्भात सीमीत असलेला तेलाचा मुद्दा आपण प्रत्यक्षात किती जटील आहे व होत जाणार आहे हे या लेखमालेतून दाखवून दिले त्याबद्दल धन्यवाद.
जयेश

असेच म्हणतो

मिलिंद जोशी यांना धन्यवाद. लेखाने मुद्दे स्पष्टपणे मांडले आहेत, आणि अधिक माहितीचे स्रोतही दिलेले आहेत.

सहमत

सुरेख लेखमाला.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हेच म्हणतो

हेच म्हणतो

लेखमाला

लेखमाला आवडली.

धन्यवाद मिलिंद जोशी.

आभार

जयेश, धनंजय, आजानुकर्ण, चाणक्य, सहज

आपणा सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!

- मिलिंद

उत्तम लेखमाला

यापेक्षा सविस्तर प्रतिसाद जरा वेळ झाला की लिहिनच परंतु लेखमाला उत्तम आहे इतके सांगावेसे वाटले.

थोडेफार संपादन करून वृत्तपत्रांत लेख पाठवण्याबद्द्ल विचार केला आहे का?

धन्यवाद

धन्यवाद.

सविस्तर प्रतिसादाची वाट पहात आहे. लोकप्रभानं बर्‍याच वेळेस माझं लिखाण फारसे आढेवेढे न घेता छापलं आहे. त्यांनाच देण्याचा विचार आहे.

मिलिंद

माहितीपूर्ण

लेखमाला अतिशय उत्तम.
"पण एक गोष्ट निर्विवाद आहे की आपण आता अशा एका भविष्याला सामोरे जातोय की जिथे संपूर्ण अनिश्चितता, असुरक्षितता आणि अंधःकार भरलेला असेल" हे भविष्य फारच भितीदायक आहे.

आपण दिलेल्या माहितीच्या स्त्रोतांबद्दल धन्यवाद.

भविष्य

भविष्य भीतीदायक आहेच. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांना या बाबतीत जागृत करणं आवश्यक आहे. प्रस्तुत लेखाचाही तोच मुख्य उद्देश्य आहे.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मिलिंद

जागृती

आपला उद्देश अतिशय योग्य आहे, मलाही यापैकी बरीच माहिती नव्हती. ती तुमच्या या लेखाने दिली, याबद्दल मनापासून धन्यवाद. लेखमाला आधीच म्हटल्याप्रमाणे अतिशय उत्तम आहे. आणि आपली लिहीण्याची पद्धतही आवडली.

आपण दिलेल्या काही संदर्भांचा अधिक शोध घेतला त्यातून काही माहिती हाती लागली ती पुढे देत आहे.

एकच सावधानतेचा इशारा - हे वाचत असताना लक्षात आले की त्यातील काहीजण काही राजकीय पक्षांशी संलग्न आहेत. उदा: निक ग्रिफिन हा ब्रिटीश नॅशनल पार्टीचा चेअरमन आहे. http://bnp.org.uk/ या पार्टीचा अजेंडा हा मला तरी वाचल्यानंतर इमिग्रेशनविरोधी आहे असे वाटले. तसेच रॉबर्ट हर्श ह्यांनी अमेरिकन सरकारी क्षेत्रात आणि प्रामुख्याने तेलकंपन्यांच्या मॅनेजरपदी अनेकदा कामे केली आहेत असे दिसले. याचा अर्थ त्यांच्या निष्कर्षांच्या खरेपणाबद्दल मी शंका घेत आहे असा कृपया घेऊ नये. जसे मी इतर काही महत्त्वाचे निष्कर्ष काढण्याआधी ते महत्त्वाचे निष्कर्ष ज्या कोणी काढले आहेत त्या व्यक्तींच्या अफिलिएशन्सबद्दल प्रश्न विचारेन, सावध राहीन किंवा त्यांच्या इतर लिहीण्यासंबंधी अधिक माहिती करून घेईन, तसेच याइथेही++. अनेकदा लोक पांढर्‍यावरचे काळे (हा मायबोलीला टोमणा नाही) हे काळ्या दगडावरची रेघ म्हणून स्विकारतात. आणि या लेखातून इतके महत्त्वाचे निष्कर्ष निघत असल्याचे दिसल्याने अधिक बारकाईने पाहिले गेले एवढेच.

मुख्य सांगायचे ते असे -
रॉबर्ट हर्श यांच्या http://www.energybulletin.net/node/4638 येथील सारांशातून खालील महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

4. Peaking will result in dramatically higher oil prices, which will cause protracted economic hardship in the United States and the world. However, the problems are not insoluble. Timely, aggressive mitigation initiatives addressing both the supply and the demand sides of the issue will be required.
.......

7. While greater end-use efficiency is essential, increased efficiency alone will be neither sufficient nor timely enough to solve the problem. Production of large amounts of substitute liquid fuels will be required. A number of commercial or near-commercial substitute fuel production technologies are currently available for deployment, so the production of vast amounts of substitute liquid fuels is feasible with existing technology.

हे जर असले तर थोडेसे आशादायक चित्र आहे, अगदीच भितीदायक नाही. पण हे तरी पूर्ण सत्य आहे का केवळ काही कंपन्यांना स्वतःच्या रिसर्चला व्यापारी स्वरूपात बघण्याची घाई झाली आहे? मी पूर्ण रिपोर्ट वाचला नाही, त्यामुळे आत्तातरी यावरून काही बोलत नाही. वेळ मिळाल्यास अधिक वाचन करून मला काही प्रश्न असले तर विचारीन***. धन्यवाद.

++अवांतर - आधीच्या लेखातही आलेखांबाबतीत संदर्भ विचारण्याचा हेतू एवढाच होता. त्यात "विदा" या उपक्रमावरील प्रचलित केलेल्या "मराठी" शब्दाच्या वापराने उपक्रमावर नवागत असलेल्या आपला घोळ झाला हे समजण्यासारखे आहे. चाणक्य, आजानुकर्ण, गुंडोपंत यांनी विदा या शब्दाचा अर्थ माझ्याआधी सांगितला याबद्दल त्यांचेही आभार!
***या उत्तम मालेचा शेवट केवळ लेखमाला आवडली एवढाच नको तर त्यातून आपण काही करू शकतो का या प्रश्नाचे उत्तर निदान स्वतःपुरते मिळण्याने व्हावा असे वाटते..

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

धन्यवाद

चित्रा

सर्वात प्रथम आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! आपल्याला लेखमाला आवडली हे वाचून फार छान वाटलं. त्याचबरोबर मी लेखाच्या शेवटी दिलेल्या स्त्रोत संदर्भांवर जिज्ञासूपणे जाऊन आपण अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केलात ही गोष्टही वाखाणण्यासारखी आहे. अशा संदर्भांचा हाच खरा उपयोग असतो.

तुम्ही म्हणताय ते खरं आहे. कुठचाही निष्कर्ष काढण्याआधी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी बघणं आवश्यक असतं. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे या लेखात मला फक्त सोप्या शब्दात ही समस्या लोकांपुढे मांडायची होती. या लेखात फार तांत्रिक खोलात शिरण्याची इच्छा नव्हती कारण ते कदाचित या विषयाशी संबंधित नसणार्‍या लोकांसाठी ते कंटाळवाणं ठरलं असतं. या ठिकाणी (फक्त या लेखापुरता) निक ग्रिफिथ हा बीएनपीचा सदस्य आहे किंवा रॉबर्ट हिर्श हा तेल कंपन्यांमधला अधिकारी होता या सगळ्यापेक्षा त्यांचे विचार या लेखाच्या एकंदर प्रकृतीशी कितपत जुळतात एवढाच विचार मी समोर ठेवला होता. दुसरी गोष्ट म्हणजे, रॉबर्ट हिर्श तेल कंपन्यांमधे नोकरीला असला तरीही, त्याच्या कामामुळे पर्यावरणवाद्यांमधे त्याला मानाचं स्थान आहे. मी त्याचा एनर्जी बुलेटीनवरचा लेख वाचलेला नाही. पण त्यानं अमेरिकन सरकारला जो रिपोर्ट या संदर्भात सादर केला होता तो मुद्दाम वाचण्यासारखा आहे. या लेखात या प्रश्नाचं अतिशय संतुलित विवेचन केलेलं दिसेल. (व्य. नि. वर ऍटॅचमेंटस् पाठवता येतात का? अन्यथा तुमचा mail id सांगितलात तर मी तो तुम्हाला पाठवू शकेन. अजूनही या संदर्भातले एक दोन चांगले लेख पाठवू शकेन.)

याशिवाय तुमच्या वरच्या म्हणण्याला दुजोरा देणारी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. कुठचाही निष्कर्ष काढण्याआधी या प्रश्नाची दुसरी बाजू पण बघणं आवश्यक असतं. या प्रश्नाबाबत दुसरी बाजू म्हणजे असा काही प्रश्नच नाही किंवा याचा केला जाणारा बाऊ अनाठायी आहे असं मानणारे काही लोक आहेत. अर्थात याला फारशी शास्त्रीय किंवा तार्किक बैठक नाही पण जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाचा सर्व बाजूनी विचार करता तेव्हा अशा बाजूंचा विचार होणंही आवश्यक असतं. मी या लेखात ही बाजू दाखवायची का नाही याचा खूप विचार केला आणि शेवटी असं ठरवलं की वाचकांना या प्रश्नाबाबत जागं करणं हा लेखाचा उद्देश आहे आणि ही दुसरी बाजू लिहून कदाचित हा उद्देश थोडा लंगडा होईल. ही बाजू तशीही फारशी तार्किक नाही त्यामुळे ज्याला खरंच रस निर्माण होईल तो अर्थातच अधिक माहिती गोळा करून स्वत: चं याबाबतीतलं मत तयार करेल.

या उत्तम मालेचा शेवट केवळ लेखमाला आवडली एवढाच नको तर त्यातून आपण काही करू शकतो का या प्रश्नाचे उत्तर निदान स्वतःपुरते मिळण्याने व्हावा असे वाटते..

हा तुमचा शेवट आणि हे उत्तर मिळवण्याची इच्छा फारच आवडली. तुम्हाला हे उत्तर सापडलं तर ते समजून घ्यायला मलाही आवडेल. मी स्वतः हा प्रश्न स्वतःला बर्‍याच वेळा विचारलाय आणि समाधानकारक उत्तर सापडलेलं नाही. त्यामुळे उत्तर म्हणून मी या आणि अशा विषयांवर जसं जमेल तसं लिखाण करत रहातो. पण हे ही कदाचित उत्तर नसेल.

- मिलिंद

हर्श

अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे या लेखात मला फक्त सोप्या शब्दात ही समस्या लोकांपुढे मांडायची होती.
नक्कीच योग्य विचार आहे.

त्यामुळे उत्तर म्हणून मी या आणि अशा विषयांवर जसं जमेल तसं लिखाण करत रहातो. पण हे ही कदाचित उत्तर नसेल.
प्रत्येकाचे उत्तर हे वेगळे असेल असेही वाटते तरीही तुम्हाला मिळालेले आहे ते उत्तरच आहे अशी माझी खात्री आहे.

माझ्या दृष्टीने उत्तर मी माझ्या पद्धतीने उर्जेचा वापर कमीत कमी करायला तयार होणे एवढे बेसिक मिनिमम आहे. पण याखेरीज सरकारी हस्तक्षेपही काही प्रमाणात जरूर आहे याला माझी सहमती, विशेषतः काही व्यापारी क्षेत्रांच्या बाबतीत.

हर्श यांचा रिपोर्ट मला मिळाला आहे. - http://www.netl.doe.gov/publications/others/pdf/Oil_Peaking_NETL.pdf हाच ना? दुसरा असल्यासही वाचायला आवडेल. एनर्जी बुलेटिनवर वरील रिपोर्टाची एक्झिक्युटिव्ह समरी म्हणतात तशी आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, रॉबर्ट हिर्श तेल कंपन्यांमधे नोकरीला असला तरीही, त्याच्या कामामुळे पर्यावरणवाद्यांमधे त्याला मानाचं स्थान आहे.
हे मलाही थोड्या वाचनानंतर समजले होते, तरी त्यांचे सर्व मुद्दे पटले नाहीत (कळले नाहीत).

खालील उतारा हर्श यांच्या एका (२००८ मधील) इंटरव्ह्युमधील - http://knowledge.allianz.com/en/globalissues/safety_security/energy_secu... वरून साभार.

हर्श यांना पुढील प्रश्न विचारला असता -Why do you think peak oil is such a taboo?

The thing that is foremost in people’s mind when it comes to energy is climate change. People have pushed hard and governments have taken actions to cut down on the emissions of CO2. But in many cases, decisions are opposite to what we need to mitigate the problem of declining world oil supplies.

For example, coal liquefaction will make very good sense in many areas of the world. Using and liquefying coal is an available technology, but under current conditions, there would be a great deal of CO2 released from making liquids out of coal. So people say, “no, we are not going do these things because of CO2.” They do not recognize that if we don’t take action on the impending oil decline, populations are going to suffer beyond what most can imagine.

खरे तर मला हे मुद्दे नीट कळले नाही आहेत (तेवढे वाचन नाही). कोळशाचे द्रवीभवन करायचे याचे परिणाम होणारच ना? शिवाय तेलाप्रमाणेच कोळशालाही मर्यादा आहेत - पुढील काळात किती प्रमाणात तो उपलब्ध असेल याला. म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखे मला वाटले. त्यामुळे मला हे आत्तातरी पटले नाही. पण पटवून दिले तर हवेच आहे. तेव्हा मला अधिक वाचन करायला हवे आणि ही दिशा तुमच्या लेखाने दिली हे या लेखाचे यश.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

छान

छान लेखमाला...
या महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल जागृकता + भीती + जाणीव निर्माण करणारी (किंबहुना जर प्रसिद्धी मिळाली तर हे निर्माण करू शकेल अशी) लेखमाला..

१. प्रियालीताई म्हणतात त्याप्रमाणे वृत्तपत्रांत लेख जरूर पाठवा
२. इंधन बचतीसाठी जरी प्रत्येकाने वैयक्तीक रित्या हातभार उचलणे योग्य आणि गरजेचे असले तरी पुरेसे नक्कीच नाहि त्यासाठी सरकार पातळीवर घाऊक प्रयत्न होणे गरजेचे आहे. सरकारला कोणतीहि क्रिया करण्यास लोकशाहित भाग पाडाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दबाव तयार करणे. आपल्या लेखांसारखे लेख असे कार्य करू शकतात. तेव्हा लेखाच्या समारोपात "सरकारवर दबाब आणला पाहिजे' हा निष्कर्षदेखील अजून ठळकपणे आला पाहिजे असे वाटते

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

 
^ वर