बिग बॅग प्रयोगावर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी

लार्ज हॅड्रॉन कोलायडर (Large Hadron Collider, LHC), बिग बँग यंत्र या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वैज्ञानिक प्रयोगाने संपूर्ण जगाचे लक्ष बर्‍यावाइट कारणांनी वेधून घेतले आहे. सर्वात महत्त्वाकांक्षी वैज्ञानिक प्रयोग इथपासून त्सुनामी, भूकंप, कृष्णविवर, मानवजातीचा शेवट अश्या अफवांपर्यंत हा प्रयोग चर्चेत राहिला आहे. नुकताच आणखी एका घटनेने हा प्रयोग पुन्हा चर्चेत आला. हा प्रयोग ज्यांनी सुरू केला आहे त्या संस्थेच्या संकेतस्थळांपैकी एक संकेतस्थळ सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य बनले होते. Compact Muon Solenoid (CMS) प्रयोगाचे संकेतस्थळ ज्या सर्वरवर होते त्या सर्वरची सुरक्षाव्यवस्था काही प्रमाणात भेदून GST: Greek Security Team या संघटनेच्या काही लोकांनी त्या संकेतस्थळावर ताबा मिळवला होता. त्यामुळे काही काळ हे संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न केला असता खालील पान दिसत होते.

CMS संकेतस्थळाचे बदललेले मुखपृष्ठ

मोठ्या चित्रासाठी वरील चित्रावर टिचकी मारा.

एक लक्षवेधक घटना यापलीकडे याचे फारसे महत्त्व नाही कारण कोणत्याही महत्त्वाच्या संस्थांमध्ये, कंपन्यांमध्ये संगणक सुरक्षेच्या अनेक पातळ्या असतात आणि प्रत्येक पातळीवर हल्ला झाल्याचे तातडीने शोधण्याच्या आणि उपाय करण्याच्या योजना असतात. या महत्त्वपूर्ण प्रयोगावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिल्याने या प्रयोगाच्य संकेतस्थळांवर हल्ल्याचे प्रयत्न होणे साहजिक होते. प्रयोगाच्या सेवादात्यांवर काही प्रमाणात ताबा मिळवण्यासाठी या प्रयोगाशी संबंधित लोकांच्या ओळखीचा (access details) दुरुपयोग झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

या प्रयोगाची संबंधित टीम या सायबर गुन्हेगारांनी चढवलेल्या फाइल्स काढून टाकण्यापूर्वी त्यांचा अभ्यास करत आहे. पुन्हा काही करण्यासाठी या लोकांनी काही छुपे मार्ग तर ठेवले नाहीत ना याची काळजी घेतली जात आहे.

सर्न सारख्या संस्था आणि मोठमोठी विद्यापीठे, विद्यालये ही नेहमीच सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर असतात. त्यात प्रामुख्याने त्यांच्या शक्तिशाली संगणन क्षमतेचा आपल्या कामासाठी वापर करण्याचा या गुन्हेगारांचा उद्देश असतो. या मोठ्या संगणक जाळ्यात दूरच्या ठिकाणाहून (इंटरनेटच्या माध्यमातून) लॉगिन करणार्‍या अधिकृत वापरकर्त्यांचे परवलीचे शब्द मिळवून त्यांच्या मार्फत हे गुन्हेगार अश्या संगणक जाळ्यात शिरकाव करतात.

स्रोत आणि अधिक माहिती : http://www.telegraph.co.uk/earth/main.jhtml?xml=/earth/2008/09/12/scicer...

Comments

हॅकिंग

हॅकिंग म्हणजे नक्की काय? त्यात आणि एथिकल हॅकिंग हा एक प्रकार ऐकला आहे. तो नक्की काय आहे?





प्रसिद्धी

वाहत्या गंगेत हात धुऊन प्रसिद्धी मिळवण्याचे विवीध मार्ग.

या प्रकारांमुळे अनेक स्थळांविषयी रुप बदलले की प्रश्न चिन्ह उभे राहू शकते असे वाटले.

-निनाद

 
^ वर