दुसरे जाळे - वेब २.०: अशील-सेवक कार्यप्रणाली (क्लायन्ट्-सर्वर् सिस्टम्)

या लेखमालेच्या मागच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे दोन संगणक परस्परांशी 'इलेक्ट्रॉनिकली' संवाद साधायला लागल्यानंतर, अशी अनेक स्थानिक संवादजाळी एकमेकांना जोडली गेल्यानंतर सद्य स्थितीतले आंतरजाल अस्तित्त्वात आले. आज आंतरजालाचा वापर घरबसल्या कार्यालयातले काम कार्यालयात असल्यागत उरकणे, विरोपांतून साधला गेलेला संवाद, आपली आवडती छायाचित्रे तसेच गाणी, चलत् चित्रे यांची साठवणूक इ. साठी होत असला, तरी स्थापनाकालापासून बरीच वर्षे आंतरजालाचा वापर मुख्यत्त्वे माहितीच्या देवाणघेवाणीसाठी होत होता. आणि देवाणघेवाण म्हणजे चक्क एक संगणक माहिती स्वतःकडे साठवून ठेवायचा, आणि दुसर्‍या संगणकाने ती देण्याची विनंती केली, की त्याला द्यायचा. या सहजसोप्या प्रणालीला अशील-सेवक प्रणाली (क्लायन्ट-सर्वर सिस्टम) म्हणतात. जो संगणक माहिती स्वतःकडे साठवतो, आणि विनंतीनुसार ती दुसर्‍या संगणकाला उपलब्ध करून देतो, त्या संगणकाला सेवक (सर्वर) म्हणतात; तर जो संगणक अशी माहिती उपलब्ध व्हावी म्हणून सेवकाला विनंती करतो, त्यास अशील (क्लायन्ट) म्हणतात. या कार्यप्रणालीची सुरुवात १९८०च्या आसपास झाल्याचे संदर्भ सांगतात.

कालानुरूप अशील तसेच सेवकाचे स्वरूप एका संगणकापर्यंत - म्हणजे एक यंत्र म्हणून - मर्यादित न राहता उपयोजनांपर्यंत (ऍप्लिकेशन्स) विस्तारले. थोडक्यात सांगायचे झाले, तर एकाच संगणकावरील अनेक उपयोजने (जसे न्याहाळक (वेब ब्राउजर), याहू व गूगलसारखे निरोपक इ.) विविध सेवांचे उपभोक्ते अशील म्हणून काम करू लागली. तीच गोष्ट सेवकांच्या बाबतीत. याचाच अर्थ असाही होतो, की एकच संगणक त्यावरील उपलब्ध उपयोजने आणि सेवा यांच्या संचावर अवलंबून एकाच वेळी काही सुविधांसाठी अशील म्हणून आणि काहींसाठी सेवक म्हणून काम करू शकतो. एकाच संगणकावर कार्यरत असणारे अनेक अशील तसेच सेवक अवतरले आणि अशील-सेवक प्रणाली खर्‍या अर्थाने विकसित झाली.

सर्वसामान्यपणे अशीलाची त्याच्या कार्याच्या दृष्टीने प्राथमिक असलेली लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील -

 1. एखाद्या सेवेचा/माहितीचा उपयोग करून घेण्यासाठी ती उपलब्ध असलेल्या सेवकाकडे विनंती पाठवणे
 2. सेवकाकडून ती सेवा/माहिती उपलब्ध होण्याची वाट पाहणे
 3. सेवकाने पुरवलेली सेवा/माहिती आहे त्या स्वरूपात अगर आवश्यक असल्यास योग्य ती प्रक्रिया करून मग इच्छित उपभोक्त्यास पुरवणे

याच धर्तीवर सर्वसामान्यपणे सेवकाची त्याच्या कार्याच्या दृष्टीने प्राथमिक असलेली लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील -

 1. अशीलांकडून एखाद्या माहितीसाठी/सेवेसाठी विनंती येण्याची वाट पाहणे
 2. अशीलाने पाठवलेल्या विनंतीनुसार स्वतःकडे असलेल्या योग्य त्या माहितीची/सेवेची उपलब्धता तपासणे
 3. उपलब्ध असलेल्या योग्य त्या माहितीवर योग्य ती प्रक्रिया करून ती अशीलाकडे सुपूर्त करण्याची तयारी करणे
 4. योग्य ती माहिती अशीलाकडे सुपूर्त करणे/सेवा अशीलास उपलब्ध करून देणे

जसजसा या पद्धतीचा वापर वाढू लागला आणि तिचा विकास होत गेला तसतसे पुढील मुद्दे ठळकपणे जाणवू लागले -

 1. एकच सेवक किती अशीलांना सेवा पुरवू शकेल? माझ्याकडील अशिलांची संख्या किती मर्यादेपर्यंत वाढल्यास एकच सेवक पुरू शकेल? कोणत्या कमाल मर्यादेबाहेर अशिलांची संख्या वाढल्यास आणखी एका सेवकाची किंवा एकापेक्षा जास्त सेवकांची गरज पडेल? याला रचनाविस्ताराचा किंवा नुसताच विस्ताराचा मुद्दा म्हणता येईल. इंग्रजीमध्ये - स्केलेबिलिटी
 2. काही कारणास्तव सेवकावर अतिकामाचा ताण आला तर तो बंद पडेल. असे झाल्यास त्याने केलेल्या कामाचा उपभोग घेणारे अशील नुकसानीत जातील. संपूर्ण प्रणालीत त्यायोगे सेवक हा एकमेव, केंद्रीय अपयशबिंदू ठरेल (सिंगल पॉइन्ट् ऑफ् फेल्युअर्)
 3. विस्तारीय आंतरजालीय जोडणीमध्ये अशील-सेवकांच्या अशा बहुसंख्य उपजोडण्या असतील. मग अशा छोट्या छोट्या जोडण्या एकमेकींशी संवाद कशा साधू शकतील? म्हणजे जोडणी१ मधला एखादा अशील जोडणी२ मधल्या एखाद्या अशीलाशी संवाद कसा साधेल? साहजिकच अशा जोडण्यांमधील सेवक एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे झाले. म्हणजे जोडण्यांच्या जोडणीसाठी आणखी एक जोडणी. याला हवे तर महाजोडणी म्हणू. मग सेवकांच्या या महाजोडणीत कोण अशील आणि कोण सेवक? आपणा पुन्हा वरील क्र्. १ मध्ये नमूद केलेल्या जोडणीविस्ताराच्या - स्केलेबिलीटीच्या - मुद्याशी येऊन पोचलो.
 4. एकाच सेवकाकडे गाणी, चलत् चित्रे, सांख्यिक व इतर स्वरूपाची माहिती, छायाचित्रे इ. विविध प्रकारची माहिती एकवटलेली असावी की कोणत्या प्रकारची माहिती साठवावी आणि हाताळावी यावर अवलंबून सेवकांचेही वर्गीकरण करावे? जसे - गाणी व चलत् चित्रांसाठी एक सेवक, सांख्यिक व इतर माहितीसाठी विशिष्ट सेवक, विविध प्रकारच्या माहिती असलेल्या संचिका (फाइल्स्) साठवणारा एक सेवक (फाइल् सर्वर्, एफ् टी पी सर्वर् इ.) इ.
 5. इतर काही मुद्दे जे कालौघात या लेखमालेच्या पुढच्या पुष्पांमधील स्पष्टीकरनंमधून पुढे येतील व पुरेसे स्पष्टही होतील.

अशील-सेवक कार्यप्रणाली वापरून तयार झालेल्या छोट्या आंतरजालीय जोडण्या, त्यांच्या परस्परांशी झालेल्या इतर जोडण्या या सगळ्यांचा परिपाक म्हणजे वेब् १.०. वेब् १.० म्हणजे जोडण्यांमधील सहभागी सेवक-अशील भूमिका वठवणारे संगणक, त्यांची उद्दिष्टाधिष्ठित कार्यप्रणाली ('कोणीतरी' (सेवकाने) माहिती साठवणे, त्या माहितीबाबत 'कोणीतरी' (अशीलाने) विचारणा करणे आणि माहिती साठवणार्‍याने (सेवकाने) केलेल्या विचारणेचे समाधान करणे) यांचा एकत्रित अभ्यास आहे. या अभ्यासाला या पुष्पात नमूद केल्याव्यतिरिक्त अनेक पैलू आहेत, त्यांची सविस्तर स्पष्टीकरणे आहेत; पण मूळ लेखमालेचा विषय व त्याच्याशी सुसंगती आणि विस्तारभय या दोन मुद्यांपोटी हे पुष्प येथेच आटोपते घेतलेले बरे, असे प्रामाणिकपणे वाटते. यातून अशील-सेवक प्रणालीची,तिच्या कार्यपद्धतीची झालेली ओळख हीच लेखमालेसाठी पुरेशी आहे,याबाबत खात्री बाळगावी.

गृहपाठ व प्रयोगः
http://mr.upakram.org/ या आपल्या लाडक्या संकेतस्थळाचा आय् पी पत्ता आणि हे संकेतस्थळ जेथे 'होस्ट' होते, त्या सेवकासंबंधी (सर्वरसंबंधी) अधिक माहिती मिळवा. याचा वापर त्यासाठी अतिशय सुलभ होईल.
मिळालेल्या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या -

 1. हा सेवक कोणत्या देशात, कोणत्या शहरात आहे?
 2. सेवकाचा प्रकार कोणता?(अपाचे वेब् सर्वर्, फाइल् सर्वर् इ.)
 3. 'उपक्रम' चा आय् पी पता काय?
 4. याचे सेक्युअर् सॉकेट् लेअर् (एस् एस् एल्) प्रमाणपत्र किती दिवसात अवैध ठरणार (एक्स्पायर् होणार)?

Comments

चांगला लेख

लेख छान आहे. पुढील लेखांची वाट पाहतो आहे. लेख समुदायांतर्गत लिहिल्यास उतम.
सेवक (Sever) आणि अशील (Client) ही नावे फारशी योग्य वाटत नाहीत. सेवक म्हटले की शिपाई येतो डोळ्यासमोर. मलातरी अजुन चांगला शब्द सुचत नाही.

सहमत

वाटल्यास सेवादाता आणि घेता असे वापरता येईल.

चांगला पर्याय आहे

या पुढील पुष्पांमध्ये जसे संदर्भ येतील तसे दाता-घेता प्रणाली म्हणेन.
- परीवश

फार कीस पाडत नाही पण

यजमान मध्ये जो आदर अपेक्षित आहे तो सर्वर् मध्ये नाही/नसावा. त्यातून यजमान=होस्ट् हा सरळसोट अर्थ आणि होस्ट् चा संगणकीय/आंतरजालीय परिभाषेतला अर्थ वेगळे आहेत असे वाटते. तसेच क्लायन्ट् म्हणजे याचक हे पटले नाही; क्लायन्ट् रिक्वेस्ट् करतो सर्वर् कडे आणि रिक्वेस्ट् करणे != भीक मागणे/याचना करणे. असो.
मला तरी सध्या दाता-घेता बरे वाटते आहे. धन्यवाद.
- परीवश

माहितीपूर्ण लेख

धन्यवाद परीवश.

गृहपाठ करायला सोपा असला तरी सुयोग्य आहे. केल्यानंतर मजकूर अधिक समजतो.

पुढील पुष्पांची वाट बघतो आहे.

उत्तम लेख

उत्तम लेख. क्लायंट-सर्वर यांची कार्यप्रणाली चांगली आणि सोप्या शब्दात समजावून दिली आहे. हे पुष्प आवडले. पुढील पुष्पांची उत्सुकता आहे.

 
^ वर