दुसरे जाळे - वेब २.०: आंतरजालाचा संक्षिप्त इतिहास

आंतरजाल किंवा इंटरनेट हा एका रात्रीत जन्माला आलेला आविष्कार नाही. पण त्याच वेळी इंटरनेटच्या जन्माची गोष्ट म्हणजे एखादी मनोरंजक परीकथाही नाही. आज आहे त्या स्वरूपातले आंतरजाल अस्तित्त्वात येण्यासाठी अनेक दूरदर्शी संकल्पना, अविरत संशोधन, अनेक शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तंत्रज्ञ यांचे विचारमंथन, प्रचंड पैसा, राजकीय पाठबळ यांचा संगम व्हायला लागला, हे वेगळे सांगणे न लगे. आणि या तांत्रिक नवनिर्माणाची किंवा उत्क्रान्तीची सुरुवात अमेरिकेत होणे, हे सुद्धा तत्कालीन वैश्विक राजकारण, अर्थकारण, शिक्षणक्षेत्र व संशोधनातील अमेरिकेची समृद्धी यांना अनुसरूनच होते.

मुळात आंतरजालाची दूरदर्शी कल्पना मांडली गेली ती फार पूर्वी , म्हणजे जवळजवळ पंचेचाळीस वर्षांपूर्वी, १९६२ मध्ये. अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एम आय टी विद्यापिठाचे तत्कालीन प्राध्यापक जे सी आर् लिकलायडर यांनी वैश्विक संगणक जालाची (ग्लोबल नेटवर्क ऑफ कम्प्यूटर्स) कल्पना मांडली आणि त्या दृष्टीने पुढले काम करण्याच्या दृष्टीने आर्थिक निधी उभारण्यासाठी संरक्षणविषयक आधुनिक संशोधन प्रकल्प संस्था - डार्पा (डिफेन्स ऍडवान्स्ड् रिसर्च प्रॉजेक्ट्स् एजन्सी - DARPA) कडे धाव घेतली. त्या काळी अमेरिकन विद्यापिठांमध्ये चालणारे वैज्ञानिक संशोधन, त्यातून हाती येणारे निकाल, उत्पादन यांचा अमेरिकन संरक्षणाच्या, लष्करी फायद्याच्या दृष्टीने होणारा उपयोग यांचे महत्त्व लक्षात घेता या संशोधनांना लागणारे आर्थिक व राजकीय पाठबळ पुरवण्याचे काम डार्पा करीत असे. लिकलायडर यांना अपेक्षित असलेले संगणकजाल अस्तित्त्वात येण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे दोन संगणक एकमेकांशी 'इलेक्ट्रॉनिकली बोलू शकणे' , इलेक्ट्रॉनिक संवाद साधू शकणे. त्यासाठी आवश्यक होते ते एका संगणकावरील माहिती दुसर्‍या संगणकापर्यंत पोचणे. आणि त्या दोन संगणकांच्या मध्ये अपे़क्षित होते त्यांना जोडणारे एक अनामिक, अज्ञात निर्वात (क्लाउड) (या निर्वाताचेच पुढे आंतरजालात रुपांतर आणि अर्थातच नामकरणही झाले.) हे निर्वात वास्तविक संवादशील संगणकांना जोडणार्‍या टेलिफोन वायरींच्या जाळ्याचे होते. एम आय टीच्या लॉरेन्स रॉबर्ट्सने १९६५ मध्ये मॅसॅच्युसेट्स (अमेरिकेचे पूर्वोत्तर टोक) आणि कॅलिफोर्निया (अमेरिकेचे पश्चिम टोक) मधील संगणकांना टेलिफोन वायरींचा माध्यमातून 'बोलते केले'. या चमत्कृतीने दोन गोष्टी सिद्ध केल्या. एक, जगातील असे दूरस्थित संगणक एकमेकांशी संवाद साधू शकतील, आणि त्यायोगे लिकलायडरना अपेक्षित असलेले संगणकजाल नक्कीच विणता येईल. आणि दोन, संगणक एकमेकांशी बोलायला हवे असतील, तर त्यासाठी एका संगणकाने दुसर्‍या संगणकाला 'कॉल करणे' आवश्यक आहे.

आता असा कॉल करायचा म्हटला म्हणजे संवादशील संगणक एकमेकांशी टेलिफोन वायरींनी थेट जोडलेले असणे आलेच. तसेच प्रत्येक वेळी अशी माहिती दूरस्थ संगणकापर्यंत पोचवायची म्हणजे प्रत्येक वेळी त्याला कॉल करणे, माहिती पोचवणे आणि मग फोन खाली ठेवून आपण कॉल बंद करतो, तसा कॉल संपवणे आलेच. थोडक्यात, ते दोन संगणक 'कनेक्टेड' हवेत. पण जगभरातले सगळेच संगणक एकमेकांशी असे टेलिफोन वायरींनी थेट जोडणे शक्य नाही. जगातले सोडा, पण खुद्द अमेरिकेतील सगळे संकगणकही असे एकमेकांना थेट जोडलेले असणे शक्य नव्हते. एम आय टीचेच लिओनार्ड क्लाइनरॉक आणि युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलेस (यूसीएलए) यांनी यावर उपाय म्हणून पॅकेट स्विचिंग तंत्रज्ञान शोधून काढले. पॅकेट स्विचिंग म्हणजे जी माहिती एका संगणकावरून दुसर्‍या संगणकापर्यंत पोचवायची आहे, ती असंख्य छोट्या पाकिटांमध्ये विभाजित करायची. प्रत्येक पाकिटावर प्रति म्हणून दूरस्थ संगणकाचा पत्ता लिहायचा, प्रेषक म्हणून तुमच्या संगणकाचा पत्ता लिहायचा आणि ती पाकिटे एकेक करून दूरस्थ संगणकाकडे 'निर्वातात भिरकावायची'. पण असे केले म्हणजे माहिती दुसर्‍या ठिकाणी पोचली का? नक्कीच नाही. ती पाकिटे योग्य दूरस्थ संगणकापर्यंत पोचवणारा 'निर्वातातला पोस्टमन' नको का? असा पोस्टमन म्हणजे 'राउटर' आणि अशा पोस्टमन्सची यंत्रणा म्हणजेच आंतरजाल किंवा इंटरनेट. प्रेषक संगणक ज्या संगणकाशी थेट जोडलेला आहे, त्या संगणकाकडे पाकिट सर्वप्रथम पोहोचणार. मग हा पोस्टमन पाकिटावरचा दूरस्थ संगणकाचा पत्ता पाहून ते पाकिट कुठल्या पोस्ट हापिसात पाठवायचे ते ठरवणार. मग त्या हापिसातला पोस्टमन पुन्हा तो दूरस्थ पत्ता वाचून हीच कृती करणार. असे करत करत शेवटी पाकिट इच्छित स्थळी पोहोचणार; आणि अशी सगळी पाकिटे एकदा का इच्छित स्थळी पोचली, की त्यातून सगळी माहितीही पोहोचणार. या पद्धतीचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला माहिती कुठेही पोचवायची असली, तरी थेट त्या संगणकाला कॉल न करता तुम्ही तुमच्या जवळच्या (तुम्हाला थेट जोडलेल्या) पोस्टमन संगणकाकडे - राउटरकडे - पाकिटे द्या आणि निर्धास्त रहा. हा पोस्टमन आणि त्याचे असंख्य सहकारी तुमची पाकिटे तुमच्या दूरस्थ संगणकापर्यंत पोचवतील. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रिय दूरस्थ संगणकाशी थेट जोडलेले असायला नको, की प्रत्येक वेळी छोट्या छोट्या माहितीसाठी त्याला कॉल करा रे, बोला रे, कॉल संपवा रे अशी 'मगजमारी'ही नको.

पॅकेट स्विचिंग तंत्रज्ञान सर्वमान्य झाल्यानंतर १९६६ मध्ये रॉबर्ट्स डार्पाकडे गेला आणि 'आर्पानेट' स्थापन करण्याच्या प्रयत्नांना वेग येऊ लागला. आंतरजालाची केवळ संरक्षण आणि लष्करी क्षेत्रातीलच नव्हे तर शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, पत्रकारिता, कला, वाणिज्य अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये असलेली उपयुक्तता, संवादक्षमता जाणकारांनी केव्हाच ओळखलीच होती. डार्पाचे रुपांतर केवळ 'डिफेन्स' पुरते मर्यादित न राहू देता सर्वसमावेश 'आर्पा' (ऍडवान्स्ड् रिसर्च प्रॉजेक्ट्स् एजन्सी - ARPA) मध्ये झाले आणि या संस्थेने पुढे जे संवादजाल निर्माण केले त्याचे - 'आर्पानेट'चे - पुढे आंतरजाल -इन्टरनेट - झाले. आर्पानेट १९६९ मध्ये अस्तित्त्वात आले. आर्पाने हे संवादजाल बनवण्याच्या कामाचे कंत्राट मॅसॅच्युसेट्समधील केंब्रिजस्थित (एम आय टी केंब्रिज येथे आहे) बोल्ट बर्नाक ऍन्ड न्यूमन इन्कॉर्पोरेटेड (BB&N Inc.) या कंपनीला दिले होते. बॉब काह्न याच्या नेतृत्त्वाखाली बीबीएन् ला असे जाळे विणण्यात यश आले. सुरुवातीला आर्पाच्या जाळ्यात नैऋत्य अमेरिकेतील चार प्रसिद्ध विद्यापिठांचे संगणक होते (कॅलिफोर्निया विद्यापिठाच्या लॉस एंजेलिस आणि सांता बार्बॅरा च्या शाखा, पालो आल्टोचे जगप्रसिद्ध स्टॅनफर्ड विद्यापीठ आणि सॉल्ट लेक सिटीचे यूटाह विद्यापीठ) पुढे जून १९७० च्या सुमारापर्यंत एम आय टी, हार्वर्ड विद्यापिठे, बीबीएन् स्वत: आणि सांता मॉनिका येथील सिस्टम्स् डेवलपमेन्ट् कॉर्पोरेशन यांचे संगणक या जाळ्यात विणण्यात आले. जानेवारी १९७१ च्या सुमारापर्यंत अख्खे स्टॅनफर्ड् विद्यापीठ, एम आय टीची लिंकन प्रयोगशाळा, कार्नेगी मेलन विद्यापीठ (पिट्स्बर्ग्, पेनसिल्वेनिया) आणि केस वेस्टर्न रिजर्व् विद्यापीठ (क्लिवलन्ड्, ओहायो) या जाळ्याला जोडले गेले. पुढे नासा, बरॉ, इलिनॉय विद्यापीठ आणि इतरही जाळ्याला जोडले गेले. आंतरजालाचा प्रसार झपाट्याने व्हायला सुरुवात झाली.

बीबीएन् च्या रे टॉम्लिन्सन् ने १९७२ मध्ये विरोप सुविधा (ई-मेल) आंतरजालात सामावून घेतली. ८०च्या दशकात आंतरजाल प्रगल्भ व्हायला सुरुवात झाली. विद्यापिठांच्या मागोमाग अनेक वाचनालये, प्रयोगशाळा यांची खाजगी संवादजाळी आंतरजालाला जोडली जाऊ लागली. आय पी आणि टीसीपी या संवादसंकेतांच्या (प्रोटोकॉल्सच्या) शोधानंतर तर आंतरजालावरील संवादसाधन इतके सहज आणि सर्वदूर झाले की आंतरजालाचा प्रसार जगभर व्हायला वेळ लागला नाही. १९८३ मध्ये आर्पाच्या आंतरजालावर टीसीपी संवादसंकेताचा वापर हा अनिवार्य झाला. १९८० मध्ये संरक्षण खात्याने हा संकेत वापरायला प्रथम सुरुवात केली. टीसीपी चा वापर सुरू झाल्यावर त्याआधीच्या नेटवर्क कन्ट्रोल प्रोटोकॉलचा वापरही थांबला. आंतरजालाच्या जडणाघडणीत सुरुवातीच्या काळात संवादसंकेतांचे महत्त्व विशेष लक्षात घेतले गेले नव्हते; मात्र आंतरजालाचा प्रसार ज्या वेगाने होऊ लागला, ते लक्षात आल्यावर नवनवे संकेत तयार व्हायला आणि त्यांचा वापर संवाद साधताना करायला, ते आंतरजालात समाविष्ट करून घ्यायला सुरुवात झाली. या सगळ्यात आय पी आणि त्यावर काम करणारा टीसीपी हे दोन प्रमुख संकेत सुस्थापित, सुनियोजित आणि प्रगल्भ झाले; आणि त्यांनी उभारलेल्या भक्कम पायावर इतर संवादसंकेतांचा जन्म झाला, पालनपोषण झाले आणि वाढही झाली. विरोप, एफ् टी पी, टेलनेट् या संकेतांच्या जन्मातून आणि वाढत्या वापरातून आंतरजाल हे विद्यापिठे, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंते, प्रयोगशाळा यांच्यापुरते मर्यादित न राहता सामान्य जनतेच्या संगणकापर्यंत पोचायला लागले. खाली दिलेल्या चलत् चित्राच्या माध्यमातून आंतरजालाच्या झपाट्याने झालेल्या वैश्विक प्रसाराची कल्पना यावी. या चित्रातल्या निळ्या रंगाच्या प्रसाराकडे लक्ष द्या. तो रंग आंतरजाल दर्शवितो. १९९१ च्या सुरुवातीला अख्खे उत्तर अमेरिका खंड, ऑस्ट्रेलिया, लॅटिन अमेरिकेतील बरेच देश, भारत, युरोप यांच्यापुरते मर्यादित असलेल्या आंतरजालाने आपले हातपाय आफ्रिका खंडातही पसरवायला सुरुवात केली आणि आंतरजाल खर्‍या अर्थाने वैश्विक होऊ लागले. सुरुवातीला केवळ विरोपापर्यंत किंवा त्याहीपेक्षा कमी अशी मर्यादित स्वरूपात स्वीकृती लाभलेल्या रशिया, चीन, श्रीलंका, जवळजवळ सगळे आफ्रिका खंड, पूर्व आशियातील काही देश यांनीही कालौघात आंतरजालाला आपलेसे केले.१९९७ साल उजाडेपर्यंत या चलत् चित्रामध्ये जागोजागी पसरलेला निळा रंग पाहून आंतरजाल अख्ख्या जगात कुठवर कसे पसरले होते, याची कल्पना वाचकांना येईलच.

आंतरजाल प्रसार
झपाट्याने हातपाय पसरणारे आंतरजाल - सौजन्य: लॅरी लॅन्डवेबर आणि इन्टरनेट सोसायटी

आंतरजाल म्हटले की लगेच संकेतस्थळांचा विचार मनात येणे, त्यावर थोडीशी माहिती पुरविणे क्रमप्राप्त ठरते. संकेतस्थळे म्हटली की न्याहाळकही (ब्राउजर) आलाच. कच्च्या अवस्थेतील न्याहाळकाचा जन्म मिनेसोटा विद्यापिठाच्या गोफर प्रकपल्पातून झाला. वास्तविक गोफर हा न्याहाळक नव्हताच. संवाद साधणे, माहिती संगणकावर उतरवून घेणे, विरोपांची देवाणघेवाण यासाठी एक इन्टरफेस उपलब्ध करून द्यायचे काम गोफरने केले. त्यावरच आधारीत गोफरसाठीची वेरॉनिका नावाची शोधसूची रेनोच्या नेवाडा विद्यापिठाने तयार केली. १९८९ मध्ये टिम बर्नेस ली आणि त्याच्या सरकार्‍यांनी युरोपियन लॅबोरेटरी फॉर पार्टिकल फिजिक्स येथे माहितीसंच दुव्यांद्वारे (हायपरलिन्क्स्)एकमेकांना जोडण्याचे तंत्र आणि संबंधित डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू संकेत (संकेतस्थळाच्या नावातील www) विकसित केला. गोफर आणि वेरॉनिकानंतर १९९३ मध्ये नॅशनल सेन्टर फॉर् सुपरकम्प्यूटिंग ऍप्लिकेशन्स् येथे मोजाइक नावाचा न्याहाळक मार्क ऍन्ड्रीसन आणि त्याच्या चमूने तयार केला ज्यातून डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू ला बळकटी मिळाली. ऍन्ड्रीसन् नंतर नेटस्केपचा प्रणेता झाला आणि नेटस्केप नॅविगेटर् या प्रसिद्ध न्याहाळकाचा जन्म झाला. मायक्रोसॉफ्टने नेटस्केपबरोबर युद्ध पुकारले आणि मायक्रोसॉफ्ट इन्टरनेट एक्स्प्लोरर् चे ब्रह्मास्त्र अस्तित्त्वात आणले. मॉजिला फायरफॉक्सच्या जन्मापर्यंत डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू = मायक्रोसॉफ्ट इन्टरनेट् एक्स्लप्लोरर् हे जणू समीकरणच बनले होते. नेट्स्केप् नॅविगेटर अस्तंगत झाला नाही; पण त्याची प्रसिद्धी मात्र घटली. पुढील आलेखावरून आंतरजालावरील संकेतस्थळांच्या घातांकीय वाढीची (एक्स्पोनेन्शल् ग्रोथ्) कल्पना यावी.

कालानुक्रमे संकेतस्थळ प्रसार
संकेतस्थळांचा झपाट्याने प्रसार - सौजन्य: हॉब्ज इन्टरनेट टाइमलाइन - रॉबर्ट झॅकॉन

संकेतस्थळांची वाढ आणि न्याहाळकांचा पाठिंबा यांच्या पायावर आंतरजालाचा कळस चढला. तुम्हाआम्हां सर्वसामान्यांना परिचित असलेल्या आंतरजालाचा इतिहास येथे सुफळ संपूर्ण होतो खरा; पण तो सुद्धा नव्याने रचल्या जाणार्‍या वेब २.० ची नांदी ठरूनच!

संदर्भ आणि अधिक माहितीसाठी:

 1. आंतरजालाचा संक्षिप्त इतिहास
 2. आंतरजालाचा इतिहास - इन्टरनेट सोसायटी
 3. आंतरजालाचा इतिहास - विकीपिडिया

गृहपाठ:

 1. नवनवीन संवादसंकेत, आंतरजाल संरचना इ. आंतरजाल आणि संवादजालांशी संबंधित संकल्पना, नमुने, विचारमंथन यांच्या दृष्टीने इंटरनेट इंजिनिअरिंग टास्क फोर्स (आय् ई टी एफ्) ही संस्था अविरत कार्यरत असते. नव्या संकल्पना, संरचनांसंबंधीच्या चर्चा, काय असावे नि काय नसावे तसेच काय अपेक्षित आहे स्वरूपाच्या सूचना या सगळ्यांनी परिपूर्ण असे आंतरजालाशी संबंधित संकल्पनांचे प्रस्तावित आराखडे रिक्वेस्ट् फॉर् कमेन्ट्स् (आर एफ सी) म्हणून ओळखले जातात. या संस्थेच्या संकेतस्थळास भेट देऊन संस्थेच्या कार्याची तोंडओळख करून घ्या.

प्रयोगः

 1. पोस्टमनचा आणि पोस्टल सर्विसचा शोधः तुमचा पोस्टमन कोण? तुमची पोस्टल सर्विस कोणती?
  तुमच्या संगणकाच्या स्टार्ट मेनू मध्ये जा. तेथे 'रन्'वर टिचकी मारा. जी छोटी खिडकी उघडेल त्यात 'कमान्ड' (command) असे टंकित करून एंटर दाबा. एक खिडकी उघडेल. त्या खिडकीत ipconfig -all अशी आज्ञा टंकित करा. या आज्ञेचे पालन तुमच्या संगणकाने पुढील स्वरूपात केल्याचे दिसेल. (सुरक्षेच्या कारणास्तव बरेच निकाल लपवले आहेत)

  या निकालांमधील 'डिफॉल्ट गेटवे' आणि 'डी एन् एस् सर्वर्स' यांची नोंद करून ठेवा. हे त्या संगणकांचे आय पी पत्ते आहेत. या पत्त्यांवरून आपण तुमचा पोस्टमन कोण, हे शोधायचा प्रयत्न करूया. आता या संकेतस्थळाला भेट द्या. तेथे Look up an IP address अंतर्गत Enter IP address असे म्हटले आहे, तेथे आळीपाळीने 'डिफॉल्ट गेटवे' आणि 'डी एन् एस् सर्वर' यांचे मागच्या निकालात गवसलेले पत्ते टाका. प्रथम 'डिफॉल्ट गेटवे'चा पत्ता भरा. या चौकशीचा निकाल म्हणून जे नाव समोर येईल तो तुमचा एक महत्त्वाचा पोस्टमन आहे. वास्तविक पाकिटावरील दूरस्थ संगणकाचा पत्ता पाहून तुमचा संगणक त्याच्या सेवेला हजर असणार्‍या अनेक पोस्टमन्स् पैकी कोणाकडे पाकिट पाठवायचे हे ठरवतो. जेव्हा तुमच्या संगणकाला उपलब्ध पोस्टमन्स् पैकी नक्की कोणाकडे पाकिट द्यायचे, हे ठरवता येत नाही, तेव्हा तो 'डिफॉल्ट गेटवे' नावाच्या पोस्टमनकडे पाकिट सुपूर्त करतो. हा तुमचा एक महत्त्वाचा पोस्टमन.
  ज्या वाचकांकडे वायरलेस् किंवा वर्च्युअल लॅन उपलब्ध आहे, त्यांना कदाचित त्यांच्या पोस्टमनचे नाव सापडायचे नाही (अमेरिकेतील वाचकांना हा अनुभव प्रकर्षाने यायची शक्यता आहे) आणि सापडलेच तर हा पोस्टमन जगाच्या दुसर्‍या कानाकोपर्‍यात तुमची पाकिटे पाठवणारा खराखुरा पोस्टमन असेलच, असेही नाही (असे आभासी पोस्टमनही असतात बरे!) त्यांनी आता डी एन् एस् सर्वर चा पत्ता एंटर करावा. जे नाव समोर येईल, ती बहुदा तुमची पोस्टल सर्विस कंपनी असणार. त्या कंपनीचा पोस्टमन शक्यतो तुमच्या सेवेला हजर असतो. हे तांत्रिकदॄष्ट्या तितकेसे परिपूर्ण आणि समाधानकारक उत्तर नसले, तरी वास्तव जगात बर्‍याच अंशी खरा ठरणारा अनुभव आहे.
  प्रयोग करताना काही अडचणी आल्याच, तर त्यांवर येथे चर्चा करता येईल. शंकांचे माझ्या कुवतीनुसार निराकरण करायचा प्रामाणिक प्रयत्न करेन.

Comments

माहिती आवडली !


परीवश,
माहिती आवडली !!! आंतरजालाच्या पाठीमागे बराच मोठा इतिहास आहे, तो आपण त्यामानाने बराच संक्षिप्त सांगितला . :)
आपण ही माहिती इथे टंकतांना ,गोळा केलेले संदर्भ आणि आपण केलेल्या विवेचनाचे, मेहनतीचे आम्हाला कौतुक वाटते !

असेच म्हणतो.

गोळा केलेले संदर्भ आणि आपण केलेल्या विवेचनाचे, मेहनतीचे कौतुक वाटते. -
असेच म्हणतो. संग्राह्य माहिती.

संवादसंकेत आणि प्रणाली

प्रतिसादाबद्दल आभार.
आंतरजालाची स्थापना आणि न्याहाळकाचा शोध व वापर यांच्या मधल्या काळात नवनवे संवादसंकेत जन्मास येणे आणि त्यांचा वापर हा एक महत्त्वाचा आणि मोठा टप्पा आहे. त्याचबरोबर युनिक्स सारख्या कार्यप्रणालीचे संवादजालामधल्या स्थानावरही काम होत असल्याचे संदर्भ आहेत. संवादसंकेत हे आंतरजालाच्या जडणघडणीतील एक महत्त्वाचा घटक असले, तरी त्यांच्यावरील चर्चा, त्यांचा इतिहास हे स्वतंत्र लेखनाचा विषय ठरत असल्यामुळे, तसेच त्यांच्याविषयी चर्चा करताना संगणक व संवादजालाशी संबंधित इतर मूलभूत शास्त्रीय माहितीची तोंडओळख होणेही आवश्यक असल्याने, या कालखंडाचा समावेश आंतरजालाच्या इतिहासात न करता हा इतिहास संक्षिप्त स्वरूपातच ठेवला आहे.

+१

असेच म्हणतो.

माहितीपूर्ण

जालाचा रोचक इतिहास माहितीपूर्ण आहे.
पुढील भागा विषयी उत्सुकता.

सहमत

निनादशी सहमत.

असे लेख आणखी येऊ द्यात.

लष्कर

आपला लेख वाचला छानच लिहिला आहे.
फक्त माझ्या अल्पस्वल्प ज्ञानानुसार,
याची सुरुवात अमेरिकन लष्कराला त्यांचे सर्व मिलिटरी व क्षेपणास्त्र संबंधीत ज्ञान ठेवण्यासाठी झाली. शीत युद्धाचा काळ. रशियाने जर आपले क्षेपणास्त्र ज्ञानाचे भांडार उडवले तर ते ज्ञान इतर ठिकाणी कसे पोहोचवावे... तसेच हे ज्ञान एकाचवेळी सर्व ठिकाणी सारखे असावे हा ही हेतु होता.
यामुळे जालामध्ये आधी मिलिटरी बेसेस जोडले गेले होते असे मी ऐकले होते.
मला युनिव्हर्सिटीज जोदल्या गेल्या होत्या याची कल्पना नव्हती!
अर्थात गुंडोपंत यात अज्ञ आहेत हे जाणून माहीती चुकीची असल्यास त्वरीत माफ करावे.

आपला
गुंडोपंत

आवांतर : अमेरिकन्स १९७३ साली इ-मेल्स करत होते, तेंव्हा गुंडोपंताना 'तार च' लै भारी वाटत होती! त्या आधीच्या काळात भारतात रेडियोला लायसन्स लागत असे! :)) )

संरक्षण

प्रतिसादाबद्दल आभार.
अमेरिकेतील तत्कालीन संशोधनाला असलेले शीतयुद्धाचे संदर्भ बव्हंशी बरोबरच असावेत. आजही अनेक संशोधन प्रकल्पांना संरक्षण खात्याकडून वित्तपुरवठा होतोच. आंतरजालाच्या निर्मितीमागे प्रेरणा म्हणून रशियाबरोबरच्या शीतयुद्धात असलेला धोका वगैरेचा संदर्भ बरोबर आहे, पण जे संगणक आर्पानेटमध्ये जोडण्यात आले, त्यात सुरुवातीला विद्यापिठांच्या संगणकांचा समावेश होता, असे संदर्भ सांगतात. याबाबत जास्त काही माहिती मिळाल्यास ती येथे देण्याचा प्रयत्न करेनच. मात्र संरक्षणविषयक संशोधनाला वाहून घेतलेले प्रकल्प वित्तपुरवठा आणि राजकीय पाठबळाद्वारे सुरू ठेवायचे काम संरक्षण खाते (डिपार्टमेन्ट ऑफ डीफेन्स - DoD)आजही करीतच आहे. डार्पा चे आर्पा होणे आणि डॉड पूर्णतया सध्याच्या डार्पाचे नियंत्रण / व्यवस्थापन करणे, असे विभाजनही संशोधन प्रकल्पांना पाठिंबा देण्याच्या आणि काही विशिष्ट खास प्रकल्प वगळता बरेच प्रकल्प संरक्षणापुरते मर्यादित राहू न देता सर्वसमावेशक करण्याच्याच प्रयत्नांचा भाग आहे, असे वाटते.

उत्तम लेख

आवडला. मी देखील गुंडोपंतांप्रमाणेच (मिलिटरी) ऐकले होते.
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

प्रयोग अन गृहपाठ

चांगले दिले आहेत (कार्यालयातुन आंतरजाल वापरणार्यांना अडचणी येतात). पुढील अधिक महत्वाच्या लेखनाच्या प्रतिक्षेत आहे.

अगदी

असेच म्हणतो.

आता पुढचा भाग येऊ द्यात.

असेच

म्हणतो. उत्तम लेख आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

माहितीपूर्ण

माहितीपूर्ण् आणि सोप्या भाषेतील् जाळ्याचा इतिहास् आवडला.
धन्यवाद्

माहितीपुर्ण लेखन

अशा प्रकारचे प्रा.मोहन आपटे यांनी मराठीत मला उत्तर हवं - संगणक , अवकाश, खगोल इत्यादी वर संकलीत केले आहे. परिवश यांच्या लेखनातून आमच्या ज्ञानात भर नक्कीच पडेल. आमचही खर्‍या अर्थाने प्रशिक्षण होईल. अभिनंदन आणी आभार.
प्रकाश घाटपांडे

+१

+१ + काळा तीट

अगदी असेच

सर्वप्रथम ही नितांत सुंदर लेखमाला उपक्रमावर प्रकाशित केल्याबद्दल परीवश ह्यांचे कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. पहिल्या पुष्पावरूनच मीठमिरच्या ओवाळून टाकाव्यात असे वाटते आहे.

................

तांत्रिक विषयांवर लिखाण करणे किती कठीण असते, हे मला स्वानुभवावरून माहिती आहे. हे कष्ट परीवश ह्यांनी घेतले, आणि तंत्रज्ञानाबद्दल मराठीत लिहून त्यांनी मराठीला एक सुरेख दागिनाच चढवला आहे.

असेच म्हणतो. हा लेख कसा काय वाचायचा राहिला होता कोणास ठाऊक. उत्तम तांत्रिक लेखनाचा हा लेख वस्तुपाठ आहे.

सहमत

हा लेख वाचायचा राहून गेला होता. अतिशय सुंदर लेख...


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर