उबुंटु ८.०४: हार्डी हेरॉन
साधारण ८ महिने मी उबुंटू ७.१ वापरले. त्याला प्रचलित नाव म्हणजे गट्सी गिबन. अतिशय आनंददायी अनुभव. माझा ल्यापटॉप ड्युएल बूट आहे. मात्र तरीही उबुंटूमध्ये जीटॉकवर 'बोलता' येणे शक्य नव्हते म्हणूनच नाईलाजाने मी विंडोज एक्सपी मी आठ महिन्यात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत वेळा वापरले असेल.
कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टम मध्ये हव्या त्या सर्व गोष्टी गट्सी गिबन मध्ये होत्या. अर्थात त्यात एक मोठी त्रुटी होती. वायरलेस राऊटरद्वारे, विंडोज एक्सपी मध्ये जितक्या सहजतेने तुम्ही वाय-फाय वापरू शकता तितक्या सहज गट्सी मध्ये वापरू शकत नाही. वायरलेस नेटवर्किंगसाठी आवश्यक असलेले ड्रायव्हर गट्सीमध्ये नव्हते. त्यावर एकच उपाय म्हणजे विंडोज ड्रायव्हर उबुंटुमध्ये घेऊन एनडीआयएसरॅपर वापरणे. अशा द्राविडी प्राणायामामध्ये नेटवर्कचा वेग फार कमी होतो असा मला अनुभव आला. त्यामुळे वायरलेस राऊटर असूनही वायर खोचूनच आंतरजालावरचे अस्तित्त्व सिद्ध करत होतो.
मात्र अचानक एके दिवशी, "तुमच्यासाठी गोड बातमी. तुमचा संगणक 'उर्ध्वश्रेणीकरणाकरता' तयार आहे. ८.०४ एलटीएस उपलब्ध. टिचकी मारा आणि सगळेकाही आपोआप होईल." असा संदेश आला. हार्डीचे सगळे गुण पाहिले आणि मला आवश्यक असलेले सर्व काही त्यात आहे याची खात्री झाली.
गट्सी टाकताना मला एक आणि एकच अप्रिय अनुभव आला होता. मात्र लाईव्ह सीडी वापरून तो त्वरित सोडवला आणि उबुंटू वापरायला सुरुवात केली होती. ( रेडहॅट आणि मँड्रेकच्या तुलनेत हे फारच सोयीचे होते. )
आणि आता तर काय अगदी गट्सीमधून हार्डीमध्ये जाणे हा अगदी माऊसचा खेळ वाटत होता. नाहीतरी दिवसाला १० सेक्युरिटी पॅचेस टाकणे, अँटीव्हायरसमध्ये पॅचेस टाकणे वगैरे 'अपग्रेडेबल' गोष्टींचा विंडोज वापरताना सराव झालाच होता. 'डू यू वॉन्ट टू अपग्रेड' वर डोळे झाकून टिचकी मारली आणि पुन्हा जालावर फेरफटका मारणे सुरु केले. साधारण २८ मिनिटात हार्डीचे पॅकेजेस ल्यापटॉपवर आले. सगळी ऍप्लिकेशनं बंद केली आणि 'अपग्रेड नाऊ' वर टिचकी मारली. साधारण ४० मिनिटात सर्व पॅकेजेस व्यवस्थित टाकून झाली. शेवटचा एक मिनिट राहिला. आणि 'अपडेटिंग लोकेल यूटीएफ ८' या संदेशावर घोडे अडले. गाडी पुढे सरकेचना. पटकन मागे फाफॉ उघडून शोधून पाहिले तर पहिला महत्त्वाचा धडा मिळाला.
गट्सी ते हार्डी प्रवासामध्ये खड्डे. गट्सीमार्गे हार्डीला जाऊ नका. थेट हार्डीचीच गाडी पकडा.
थोडक्यात काय, जुने देऊळ पाडून नवे बांधा. जुन्यालाच रंगरंगोटी करू नका. मात्र इथे माझ्याकडे हार्डीची सीडी नव्हती. आणि एव्हाना उबुंटूच्या अपडेट म्यानेजरने अर्धवट हार्डी टाकून गट्सीचे बूच लावले होते.
ल्यापटॉप पुन्हा चालू करून पाहिला. ड्युअल बूटचा मेनू येत होता. मात्र उबुंटु चालू होत नव्हते. दुसरा उपाय नसल्याने अखेर विंडोज चालू केले. बूट व्हायला २ मिनिट लागले. नंतर अँटीव्हायरस चालू झाला. त्याला मिनिटभर. विंडोजला कुठूनतरी माझा ल्यापटॉप असुरक्षित आहे ही माहिती मिळाली आणि त्याने केबी सतराशे साठ हा प्याच टाकणे आवश्यक आहे हे सांगितले. चूपचाप तो प्याच टाकला. पण तेवढ्यावर साहेब गप्प बसणार नव्हते. ल्यापटॉप पुन्हा चालू करा. केला. बूटलोडरमध्ये उबुंटूचे नाव दिसत असूनही तो मी वापरू शकत नाही हे मनाला फारच बोचत होते. पुन्हा विंडोज, नंतर परत २ प्याच. अँटिव्हायरसने माझी सिस्टीम गेले ५ महिने स्क्यान केलेली नाही हा संदेश दिला. स्क्यान केले. एव्हाना ल्यापटॉपही गरम झाला. शेवटी कंटाळुन बंद केला. आरती, पूजा सगळं करूनही प्रसाद मिळाला नाही की जशी चिडचिड होते तसं झालं.
संध्याकाळी जिममध्ये मित्राने विचारलं. अरे आज ऑनलाईन दिसला नाहीस. सगळी कर्मकहाणी सांगितली. यावर तो म्हणाला, मी पण हार्डीच वापरतो. माझ्याकडे सीडी आहे.
संध्याकाळी पुन्हा बसलो.
सीडी वापरून हार्डी टाकणे म्हणजे 'मक्खन'. मराठी फाँटही टाकले. हार्डीमध्ये फाफॉची तिसरी आवृत्ती मिळते. गट्सीमध्ये फाफॉ सोबत कॉन्कररही देत होते. इथे तो वेगळा टाकावा लागतो.
फाफॉ उघडला. नोस्क्रिप्ट, फायरबग, पद्मा वगरे टाकले. गेले काही दिवस 'सिंहासन' बघत होतो, तो पूर्ण करावा म्हणून युट्यूबवर गेलो. तर तुमच्याकडे ऍडोब प्लेअर नाही असा संदेश आला.
इन्स्टॉल करताना त्या प्लेअरने फाफॉचा पत्ता विचारला. दिला. पण तो घेईना.
मग दुसरा धडा मिळाला
हार्डी मध्ये फाफॉ सोबत 'components' ही डिरेक्टरी आपोआप येत नाही. विशेषतः ऍडोबचे प्लगिन टाकताना ही डिरेक्टरी आवश्यक आहे. ती तयार करा.
असेच काही अनुभव, म्युझिकइंडियाऑनलाईन साठी लागणारा रिअलप्लेअर, ऑनलाईन टीव्ही बघण्यासाठी लागणारा विंडोज मिडिया प्लेअर हे टाकताना आले. मात्र त्यासाठी फारसा त्रास झाला नाही.
काही अडचणी सोडवताना फारच शोधाशोध करावी लागली. त्यात काही अनपेक्षित गोष्टीही हाती लागल्या.
१. हार्डी मध्ये गूगल टॉक मध्ये 'बोलता' येणे शक्य आहे. पिडगिन ऐवजी एम्पथी वापरा.
२. उबुंटूमध्ये म्याकसारखा त्रिमिती डेस्क लाँचर मिळतो. एडब्लूएन वापरा.
३. उबुंटूमध्ये व्हिस्टा आणि म्याकपेक्षाही (हो हो म्याकपेक्षाही) प्रगत ग्राफिक्स इफेक्ट आहेत. कॉम्पिझ म्यानेजर वापरा.
४. उबुंटूमध्ये आयपॉड थेट वापरता येतो (रिदमबॉक्स, अमॅरॉक किंवा जीटीकेपॉड सोबत) ही गोष्ट नवी नाही. मात्र लिसन वापरून आयट्यूनपेक्षाही कितीतरी प्रगत सॉफ्टवेअर वापरल्याचा आनंद तुम्हाला मिळेल.
५. आणि हो हे सगळे फुकट आहे. :)
हार्डी हेरॉनबद्दल सर्व माहिती तुम्हाला इथे आणि इथे मिळेल. काही मदत हवी असल्यास उबुंटू फोरम्स आहेच.
सध्या एकच अडचण आहे. ऑपेरामध्ये मराठी नीट दिसत नाही. आणि फाफॉ मध्ये आमचे लाडके लोकसत्ता हे दैनिक. बाकी ठीक चालले आहे.
हार्डी हेरॉनची एक झलक पहा आणि ठरवा तुम्हालाही उबुंटू वापरायचे आहे का ते. :) माझा ल्यापटॉप अगदी खाली दाखवल्याप्रमाणे वागतो. विंडोज उडवून लावावे हा माझा विचार अधिकच बळकट होऊ लागला आहे.
Comments
मस्त! / कुबुंटू
अनुभव सही आहे. सुचना आणि युक्त्यांबद्दल धन्यवाद! नेटवर्क इंस्टॉल ची कल्पना भारतात अजून तरी न केलेलीच बरी :( पण सीडी मिळवण्याचा प्रयत्न करेन.
कॉम्पिझ 'आयकँडी' गेल्या कित्येक दिवसांपासून उपलब्ध आहे. (२००६ मध्ये कॉम्पिझ वापरून पाहिल्याचे आठवते.)
उबुंटू चांगले आहे यात वाद नाही पण तरीही माझे पर्सनल फेवरेट फेडोरा आहे :प् (सध्या फिचर्स मध्ये जवळपास काहीच फरक नसतो म्हणा)
उबुंटू बरोबरच कुबुंटू पण इंस्टॉल करून बघ. केडीई हा एक वेगळाच अनुभव आहे. विशेषतः ऍमरॉक हा म्युझिक प्लेयर आणि केडेवलप (प्रोग्रॅमिंग वगैरे साठी) इ.
ऍमरॉक/लिसन
लिसन हा ऍमरॉकचे जीनोम रूप आहे. :़ सर्व फीचर सारखेच आहेत.
मला उबुन्टू जीनोम त्याच्या सोपेपणामुळे अधिक आवडते. :)
नेटवर्कवरून इन्स्टॉल करण्यापेक्षा सीडी वापरणे सोयीचे आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
केडीई-लूक
केडीई-लूक हे संकेतस्थळ पाहून केडीई च्या वैविध्याची कल्पना येईल. केडीई मध्ये उपलब्ध ऍप्लिकेशन्स ची यादी.
जीनोम वरून केडीई
जीनोम वरून केडीई कसे इन्स्टॉल करावे?मिळाले. येथे पहा:
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अरेरे..!
अरे देवा.. हे मला सगळं २ महीन्यापूर्वी कळलं असतं तर् मी उडवलं नसतं उबंटू..! :( हे असेच प्रॉब्लेम्स आले अन् वैतागून एक्सपीच टाकलं.. असो.. उबंटू मलाही खूप आवडलं होतं.. हार्डी हेरॉनही.. परत वापरून पाहीन..
धीर धरा धीरापोटी | फळे रसाळ गोमटी ||
येशू ख्रिस्ताने म्हटलेच आहे.
शोधा म्हणजे सापडेल.
( ठोका म्हणजे उघडेल
मागा म्हणजे मिळेल. )
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मस्त
मस्त रे, माझ्याकडे आहे ती तबकडी. छानच अनुभव आहे. नवशिक्यांसाठी आणखी काही माहिती.
उबुंटु ८.०४ हे विंडोज एक्स पी वर एका अप्लिकेशन प्रमाणेच टाकता येते आणि डायरेक्ट ड्युअल बुट. बाकी काहीच कटकट नाही. हे म्हणजे पाहुणा बनुन यायंच आणि मालकच बनायच अस आहे. पण विंडोजच्या कटकटींपेक्षा उबुंटुचा अनुभव एकदमच मस्त.
डाऊनलोड करताना भारतासाठीचे स्थळ नाही? असे का बुवा?
बहुधा
साधारणपणे विद्यापीठे किंवा संशोधन संस्था यांची संकेतस्थळे ओपनसोर्स सॉफ्टवेअर उतरवून देण्याच्या सोयी देतात. भारतात याची कमतरता असावी. पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ किती प्राथमिक स्वरुपाचे आहे यावरून कल्पना यावी :) तैवान वगैरे निवडा. चांगला वेग मिळेल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
ह्म्म्म..
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःची पताका फडकवणार्यांच्या देशात अशी कमतरता म्हणजे धन्यच... तसे पहायला गेले तर भारतातल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांनी एकत्र येऊन पुढाकार घेतल्यास आपल्या येथे अशी उत्पादने नक्कीच तयार होतील.
चिमुकली पताका
तथाकथित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय पताका २०१५ पर्यंत जागतिक सॉफ्टवेअर बाजाराच्या फक्त दोन टक्के होण्याची शक्यता आहे! भारताला आयटी सुपरपावर वगैरे म्हणणे हास्यास्पद म्हणण्याच्याही लायकीचे नाही. तसे म्हणणे बंद करावे असे बहुतेक नारायण मूर्ती यांनी म्हटले होते.
प्रसिद्धी माध्यमे
अहो आम्ही नाही हो, प्रसिद्धी माध्यमे म्हणतात. या क्षेत्रातले लोक सध्या घर कर्जाच्या वाढीव व्याज दराने ग्रासले आहेत.:)
भारतीयांची मानसिकता
भारतीयांच्या सर्वसाधारण मानसिकतेत मुक्तस्रोताची कल्पना बसणे तशी अवघड आहे. मुळात फुकटात दुसर्याला काही देणे मग तो फक्त वेळ का असेना बहुतेकांना पटत/आवडत नाही. त्यातल्या त्यात तमिळ आणि बंगाली लोक या क्षेत्रात आघाडीवर आहेत. शैक्षणिक संस्थांमधूनच मुक्तस्रोताची ओळख झाली, आवड लागली तरच हे शक्य आहे.
अस्स...
खर सांगायचं तर थोडं वाईट वाटलं. वर्षागणिक हजारो अभियंते तयार करणार्या भारतातल्या एकाही विद्यापीठाचा येथे सहभाग नाही.
इंटरनेट म्हणजे फुकटात काहीतरी मिळते हि मानसिकता जास्त असावी कदाचित. देणे हि दुरची गोष्ट आहे.
उंबटूमुळे अडलो.
वरील माहितीच्या उत्सुकतेच्या भरात उंबटूची चकती करुन लॅप्टॉवर उंबटू उतरवले, आता बाकी ड्रायव्हर आवाजाचे आणि इतरही इंन्ष्टॉल होत नाही. काय चुकत आहे ? काय केले पाहिजे ? उपाय सांगा !!!
आवाजाचे ड्रायव्हर
ल्यापटॉप कोणता आहे? इथेपहा. एखादी छोटी स्टेप करावी लागेल. ऍल्सामिक्सर बहुतेक सर्व इंटेलच्या हार्डवेअरसाठी चालतो.
ड्रायव्हर इन्स्टॉल होत नाही म्हणजे नक्की काय होत आहे? नक्की काय एरर येत आहे? तुम्ही रूट पासवर्ड योग्य देत आहात का?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
काहीच नाही
डॉट इएक्स इ या फाइल्सना डबल क्लिक केल्यावर कुठलीच प्रोसेस होत नाही. काही एरर नाही, काही संदेश नाही.
डॉट इएक्सई
उबुन्टू ही लिनक्स प्रणाली आहे तिथे डॉट इएक्सई फाईल चालणार नाहीत. (तुम्हाला डॉट इक्सई चालवण्याची गरजही पडणार नाही. मात्र चालवायच्याच असतील तर त्याचेही मार्ग उपलब्ध आहेत.)
तुम्हाला हवी असलेली सगळी ऍप्लिकेशन्स वेगळ्या नावाने इथे आहेत. उदा. विनअँप ऐवजी ऑडॅशिअस वापरून बघा. इन्स्टॉल कसा करावा ही माहिती इथे.
सुरुवातीला थोडेसे अडखळल्यासारखे होईल - जे विंडोज वापरायला सुरु करतानाही झाले असेल. पण थोड्याश्या सवयीनंतर अडचणी येणार नाहीत.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आभारी आहोत.
उंबटूचे सर्व प्रयोग आम्ही संपवत आहोत. विंडोजचे ऍप्लिकेशन्स लिनक्सवर चालवण्याचा प्रयत्नामुळे आम्ही अजुन नवीन आज्ञावलीच्या ज्ञानापासून कोसो दुर आहोत असे वाटते. लिनक्सवरील प्रणाल्या रन करणे आम्हाला जमणार नाही. तो आमचा विषयही नाही. भविष्यात कदाचित पुन्हा उत्साहाने प्रयत्न करुन पाहु. सदरील आज्ञावली लॅप्टॉवरवर उतरवतांना मदत केल्याबद्दल कर्णाचे आणि चाणक्य यांचे आभारी आहोत.
अवांतर : उंबटूचा लुक मस्त होता.
-धन्यवाद !!!
-दिलीप बिरुटे
(हताश )
अर्रर्र
जाऊद्या आता. :(
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
लाईव्ह सिडी
नवीन लोकांनी थेट उबंटु वापरायला सुरवात न करता आधी लाईव्ह सिडी वापरून या लिनक्स प्रणालीची ओळख करून घ्यावी. खिडक्यांना (विंडोज) धक्का न लावता झरोक्यातून थोडी गार हवा आत येऊ द्यायची असेल तर नोपिक्स ही लाईव्ह सिडी संगणकात टाकून तो सुरू करा. नोपिक्स अथवा "पपी" लाईव्ह सिडी म्हणजे काय याची चर्चा उपक्रमावरच यापूर्वी झाली आहे.
http://mr.upakram.org/node/308
आपल्याला ही प्रणाली आवडेल याची मला खात्री आहे. नोपिक्स वापरून देवनागरीत किती सोप्या पद्धतिने लिहिता येते हे येथे वाचा.
लेखाचा परिणाम
लेखाचा परिणाम म्हणून नवीन ल्यापटॉपवर उबंटू हार्डी टाकले आहे. अजून व्यवस्थित कॉन्फिगर करायचे आहे, शिवाय काही NVIDIA ड्रायव्हर्स उपलब्ध नाहीत. असे असूनही चार जीबी र्यामवर उबंटू ज्या वेगाने पळते आहे ते पाहून संतोष जाहला आणि व्हिस्टाची कीव यायला लागली :)
लेखाबद्दल अनेक धन्यवाद.
----
ड्रायव्हर
NVIDIA ड्रायव्हर असे टाका.
फार त्रास होऊ नये. माझ्याकडे इंटेलचेच हार्डवेअर असल्याने ते टाकावे लागले नाहीत पण एका मित्राचे कॉन्फिगर करून दिले होते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
धन्यवाद
टाकून बघतो. विशेष अवघड जाऊ नये.
विस्टाच्या (अनंत) अडचणी तशाच असतानाच मायक्रोसॉप्फ्टने नवीन खिडक्यांची घोषणा केल्याचे वाचून हसावे की रडावे तेच कळेना. खिडक्या कायमच्या बंद करण्याचा विचार यामुळे बळावत चालला आहे. अन्यथा दर दोन वर्षांनी नवीन खिडक्यांच्या नवीन अडचणी सोडवण्यातच उरलेले आयुष्य जाईल असे वाटते. :)
----
चित्रलिप्या
अनेक संकेतस्थळे ही आय-ई समोर ठेवून विंडोजवर उपलब्ध असणारे फॉन्ट वापरून व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने सजवलेली असतात. शिवाय फायरफॉक्समध्ये डायनामिक फाँट दिसण्यास कधीकधी त्रास होऊ शकतो. हे फाँट मुक्तस्रोत नसल्याने उबुंटूमध्ये आपोआप येत नाहीत.
मात्र इथे आणि इथे दिलेल्या युक्त्या वापरल्या की बहुतेक सर्व संकेतस्थळांवर वापरले जाणारे फाँट तुमच्या मशीनवर येतील आणि इंटरनेट एक्स्प्लोरर समोर ठेवून सजवलेली संकेतस्थळेही फायरफॉक्सवर तितकीच चांगली दिसू लागतील.
याचबरोबर वरील फाँटांचा वापर ओपनऑफिसमध्ये कोणतेही वर्ड/एक्सेल डॉक्युमेंट 'तसेच्या तसे' दिसण्यासाठी होईल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
उबंटू ८.१०
उबंटू ८.१० रिलीज झाल्याचे आत्ताचे वाचले. ८.०४ असणार्यांना हवे असल्यास अपग्रेड म्हणून हे इन्स्टॉल करता येईल.
----
उबंटू इंट्रेपिड् आयबेक्स्
आजच चढवले - चढवताना अजिबात त्रास झाला नाही. फक्त नंतर रेझोल्युशन ८००/६०० असे झाले - एटीआयचे नियंत्रक (ड्रायव्हर) चढवल्यावर सगळे व्यवस्थित चालू झाले. (तुमची xorg.conf file बॅकअप करायला विसरु नका) एकंदरीत अनुभव उत्तम आहे.
--------------------------------------
http://kuthekay.fortunecity.com