विज्ञान, अज्ञान आणि अंतर्ज्ञान
पाण्यात दगड टाकला तर तो बुडतो, पण लाकूड पाण्यावर तरंगते, जमीनीवर पडलेला दगड त्याला कोणी ढकलले, ओढले किंवा उचलले तरच तो जागेवरून हलतो, नाही तर जागीच पडून राहतो, सरळ वर उचलून सोडलेला दगड त्याच जागी खाली येतो आणि समोर भिरकवलेला दगड थोड्या अंतरावर जाऊन खाली पडतो वगैरे निसर्गात घडणा-या अनंत गोष्टी अशिक्षित माणसालासुध्दा अनुभवाने समजत असतात. आदिमानवाच्या काळापासून माणसाला त्या माहीत होत्या. जग हे असेच असते असे समजून सहसा त्यावर कोणी जास्त विचार करत नाही. आर्किमिडीज आणि न्यूटन वगैरेंसारख्या विद्वानांनी असा विचार केला आणि त्यातून निसर्गाचे कांही मूलभूत नियम शोधून ते सूत्रांच्या किंवा समीकरणांच्या रूपात जगापुढे मांडले. त्या शोधांची नोंद त्यांच्या नांवावर झाली. अशा प्रकारच्या अनेक अनुभवांचा, निरीक्षणांचा आणि त्यावरून काढलेल्या निष्कर्षांचा विचार करून जे सिध्दांत मांडले गेले त्या सर्वांना एकमेकांशी प़डताळून पाहिल्यानंतर त्यातल्या ज्यांना सर्वमान्यता मिळाली त्यांचा एकत्रित विचार करून त्यातून एक शास्त्र बनत गेले. त्याला 'सायन्स' असे नांव दिले गेले. परीक्षण, निरीक्षण, विश्लेषण आणि निष्कर्ष या पध्दतीने अधिकाधिक माहिती मिळवण्याचे एक प्रभावी तंत्र बनले, ते 'सायंटिफिक मेथड' या नांवाने प्रचारात आले. इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षणपध्दतीतून भारतात आल्यावर 'सायन्स'ला मराठीत 'विज्ञान' या नांवाने संबोधले गेले आणि आजही जात आहे.
वैज्ञानिक पध्दतींचा उपयोग करून माहिती मिळवतांनासुध्दा शारीरिक ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा आड येतातच. जगात जे कांही अस्तित्वात असते वा घडत असते त्यातला अत्यंत थोडा भागच आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवतो. त्यापलीकडे खूप कांही असते. शिवाय आरशात दिसलेले प्रतिबिंब म्हणजे खरी वस्तू नसते किंवा परावर्तनातून आलेला प्रतिध्वनी मूळ आवाज नसतो. त्यामुळे जे जाणवते त्यातलासुध्दा कांही भाग शंकास्पद असतो. यातून मार्ग काढण्यासाठी बुध्दीचा उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ सूर्य पूर्वेला उगवतांना डोळ्यांना दिसतो पण तो एका जागेवर स्थिर आहे आणि आपण फिरत आहोत अशी कल्पना मनाने करावी लागते. अगणित विद्वानांनी अशा विविध कल्पना करून त्यांच्या आधारे निरनिराळे सिध्दांत मांडले आणि तर्काने व प्रयोगाने त्यांची सत्यता पटवली.
न्यूटन, पास्कल वगैरे पूर्वीच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी मांडलेले सिध्दांत अशा प्रकाराने प्रयोगशाळेत सिध्द केले गेले आणि आजही विज्ञानाच्या प्राथमिक शिक्षणासाठी शाळाकॉलेजांमधून ते करून दाखवले जातात. त्यांच्या आधारावर निसर्गातल्या अनेक घटनांचे तसेच विविध पदार्थांच्या गुणधर्मांचे अर्थ समजून घेता आले आणि त्या माहितीचा उपयोग करून नवनवी साधने व यंत्रे बनवण्यात आली. यातून यंत्रयुग सुरू होऊन त्याचा विकास होत गेला. पण कांही निरीक्षणांचे स्पष्टीकरण जुन्या सिध्दांतातून समाधानकारकरीत्या होत नव्हते. ते समजून घेण्यासाठी नवनव्या संकल्पना मांडल्या गेल्या आणि त्यांच्या आधारे तर्कशुध्द विचाराने नवे सिध्दांत मांडले गेले. अणुपरमाणूंची आंतरिक रचना, सापेक्षता सिध्दांत यासारख्या गोष्टी डोळ्यांना किंवा कानाला जाणवू शकत नाहीत, पण त्या तशा आहेत असे गृहीत धरून गणिताच्या आधाराने अनेक दृष्य परिणामांचे स्पष्टीकरण देता येते. विज्ञानातल्या या संकल्पनांनादेखील शंभरावर वर्षे होऊन गेली आहेत. पण त्या नीट समजण्यासाठी उच्च दर्जाच्या गणिताची बैठक तसेच जेवढी कुशाग्र बुध्दीमत्ता लागते त्यांची अपेक्षा सर्वसामान्य लोकांकडून करता येणार नाही. त्यामुळे शाळेत शिकवले जाणारे बहुतेक विज्ञान निदान शंभर वर्षे जुने असते. त्यानंतर झालेल्या विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीबद्दल सामान्य लोकांना फारसे माहीत नसते. विज्ञानाच्या विशिष्ट शाखेत उच्च शिक्षण घेतांना त्याचा अभ्यास केला जातो.
असे असले तरी नवनव्या संशोधनाच्या आधाराने ज्या तंत्रज्ञानाचा विकास होतो त्याचा फायदा सामान्य लोकांना मिळतोच. पूर्वीच्या काळात तलवारबाजीत निपुण असलेल्या वीराला पोलाद कसे बनते ते ठाऊक असण्याची गरज नव्हती, पण कणखर पोलादाची तलवार चालवून तो पराक्रम गाजवू शकत असे. त्याचप्रमाणे हातात मोबाईल धरणा-या माणसाला त्यातल्या मायक्रोप्रोसेसर चिपसंबंधी कांहीही माहिती नसली तरी तो त्या साधनाचा उपयोग करून कोणाशी बोलू शकतो, फोटो काढू शकतो, गाणे ऐकू शकतो आणि आता इंटरनेटसुध्दा पाहू शकतो. हे सगळे कसे साध्य होते याबद्दल मात्र तो अनभिज्ञच असतो. आज ज्या वेगाने विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात रोज नवी भर पडत आहे तो कोणत्याही माणसाच्या आकलनशक्तीच्या असंख्यपटीने अधिक आहे. वैज्ञानिकांच्या विनयामुळे म्हणा किंवा सत्यपरिस्थितीच्या जाणीवेमुळे ते नेहमीच आपण एक प्रवासी आहोत असे सांगत असतात. विज्ञानातल्या सिध्दांतांबद्दल थोडी अनिश्चितता बाळगतात. आज हे असे दिसते आहे, उद्या काय दिसेल ते सांगता येत नाही असा सूर लावतात. या सर्वांमुळे विज्ञानाबरोबरच त्याविषयीचे अज्ञान आणि साशंकता जास्त वाढत चालली आहेत की काय असे कधीकधी वाटते.
ज्ञानसागर अपरंपार असला तरी एक माणूस त्याच्या ओंजळीत येईल तेवढेच त्यातून घेऊ शकतो. त्यामुळे मला असे वाटते की व्यक्तीगत अज्ञान हे अमावास्येच्या रात्रीतल्या काळोखासारखे अथांग असते. आपण आपल्या ज्ञानाच्या पणतीच्या उजेडात आपल्या आसपासच्या कांही गोष्टी स्पष्ट पाहू शकतो, त्यापलीकडच्या धूसर होतात आणि त्यांच्या पलीकडल्या दिसतही नाहीत. यात आणखी अशी गंमत आहे की आपल्या शेजारी एकादा माणूस हजार वॉटचा दिवा लावून लख्ख उजेडात बसला असला तरी आपल्याला तो प्रकाश दिसत नाही. आणखी दूरवर पहायचे असेल तर ज्याने त्याने स्वतःच्या ज्ञानज्योतीतली वातच मोठी करावी लागते. या परिस्थितीत कोणीही सर्वज्ञ होणे असंभवच असते. आपल्याला समजलेल्या गोष्टींच्या पलीकडे आपल्यासाठी अंधारच असतो. त्यामुळे विज्ञानाच्या जागतिक प्रसाराबरोबर सगळ्या माणसांचे त्यासंबंधीचे अज्ञान आणि अविश्वास आपोआप दूर होईल अशी भाबडी आशा बाळगणा-यांची निराशा होते.
आज बहुतेक लोकांच्या घरी टीव्ही, कॉम्प्यूटर आणि खिशात मोबाईल असतात. त्यातल्या प्रत्येक साधनातून तो चित्रे पाहू शकतो आणि ध्वनी ऐकू शकतो. जगभरातून असंख्य ठिकाणांहून आणि अगणित लहरींच्या माध्यमामधून या संदेशांचे प्रसारण होत असते. त्यातले त्याला हवे ते संदेश त्याचे यंत्र ग्रहण करते, पण इतर असंख्य विद्युतचुंबकीय लहरीसुध्दा त्याच्या किंवा आपल्याही आसपास आणि शरीराच्या आरपार सारख्या वहातच असतात. पण आपल्याला त्याचा पत्ता नसतो. आपण त्याबद्दल पूर्णपणे अज्ञानाच्या अंधारात असतो.
मात्र अदृष्यपणे येणारे संदेश व संकेत आपल्याला ठामपणे समजतात असा कांही लोकांचा दावा असतो, किंवा त्यांना ती विद्या प्राप्त आहे अशी इतर लोकांची त्यांच्याविषयी समजूत असते. कोणाला पूर्वपुण्याईने, कोणाला सद्गुरूच्या अनुग्रहाने, कोणाला मंत्रतंत्र, जपतप, ध्यान धारणा वगैरेंमुळे ही सिध्दी प्राप्त होते, कोणाच्या अंगात ही दैवी शक्ती असते तर कोणाकडे पैशाचिक, अशा अनेक शब्दात आपण त्याचा उल्लेख ऐकतो. या सगळ्या प्रकारांचा समावेश सोयीसाठी मी 'अंतर्ज्ञान' या शब्दात करीत आहे. विज्ञानाच्या रूढ असलेल्या निकषांवर या गोष्टी सिध्द करता येत नाहीत. त्यामुळे विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामील करता येत नाही. परामनोलिज्ञान यासारख्या उपशाखांमध्ये त्यांचा अभ्यास केला जातो. पण त्यावरून सर्वमान्य असे निष्कर्ष पुढे येत नाहीत. अमक्या तमरक्या विज्ञानविषयक मासिकात लेख छापून आला याचा अर्थ तज्ज्ञांनी तो मान्य केला असा होत नाही. माझ्या लहानपणी अशा अद्भुत शक्तीबद्दलच्या असंख्य कथा मी ऐकल्या आहेत. पण ती शक्ती धारण करणारे सिध्दपुरुष भूतकाळात कधीकाळी होऊन गेलेले असत किंवा हयात असलेच तर त्यांची भेट घडणे माझ्या आंवाक्याबाहेरचे असे. त्यामुळे मला स्वतःला कसलाही चमत्कार कधी पहायला मिळाला नाही. माझ्या आजूबाजूला असणा-या ज्या व्यक्तींच्या 'अंगात' येत असे त्यांची वागणूक पाहता मला कधीच त्यांचा विश्वास वाटला नाही. अशिक्षित लोकांचा त्यांवर जास्त विश्वास असल्यामुळे शिक्षणाच्या प्रसाराबरोबर चमत्कारांचे प्रमाण कमी होईल अशी माझी समजूत होती.
आज मात्र मला एक वेगळेच चित्र दिसत आहे. एनर्जी (ऊर्जा) आणि व्हायब्रेशन्स ( कंपन) या पदार्थविज्ञानात विशिष्ट अर्थ असलेल्या शब्दांचा सैलसा उपयोग करून त्यातून निर्माण होत असलेल्या अचाट अशा सामर्थ्याबद्दल आजच्या सुशिक्षित लोकांना बोलतांना मी बरेच वेळा ऐकतो. एनर्जी ही वेगवेगळ्या स्वरूपात असते आणि त्यानुसार योग्य त्या परिमाणात ती मोजली जाते. तिच्या वहनाबद्दल निश्चित असे नियम असतात. ती नष्ट होत नाही की निर्माण होत नाही, तिचे एका रूपातून दुस-या रूपात रूपांतर होत असते. तसेच तिच्यामुळे होणारे बहुतेक सर्व परिणाम माहीत आहेत, व्हायब्रेशन्सना एक कंपनसंख्या असते आणि अँप्लिट्यूड असतो, त्यापासून निर्माण झालेल्या लहरींना या दोन्हीशिवाय वेव्हफॉर्म असतो एवढे मी कॉलेजमध्ये असतांना फिजिक्समध्ये शिकलो होतो. आता आत्मिक, प्राणिक, कॉस्मिक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यासारख्या त-हेत-हेच्या एनर्जी तसेच कल्याणकारी, दुःखदायक, मैत्रीपूर्ण, वितुष्ट वाढवणारे, निर्मळ, कलुषित किंवा दूषित वगैरे प्रकारची व्हायब्रेशन्स आणि त्यांचे मानवाच्या व्यवसायातल्या नफ्यातोट्यावर, सुखशातीवर, आरोग्यावर, आयुष्यमानावर होणारे बरेवाईट परिणाम वगैरेंची वर्णने ऐकून मी थक्क होतो. कांही अतिसंवेदनशील महाभागांना ही ऊर्जा आणि ही कंपने नेमकी समजतात आणि त्यावर उपाय करून ते लोक त्यांचे गुणधर्म बदलतात, दुष्ट ऊर्जेला नाहीशी करून सुष्ट ऊर्जा निर्माण करता ही तर त्याहीपेक्षा जास्त स्तिमित करणारी गोष्ट आहे.
या ऊर्जा आणि ही कंपने कशाकशातून निर्माण होतील याचा तर कांहीच नेम नाही. दारावर टांगलेले तोरण, घराची खिडकी, त्यात बसवलेली लोखंडाची जाळी, भिंतीवरची तसबीर, टेबलावरले धातूचे कासव, गळ्यातला रुद्राक्ष किंवा ताईत, मनगटावर बांधलेला दोरा किंवा कडे, कुपणावरची जास्वंदी किंवा बोगनवेल, जन्मपत्रिकेतले ग्रह, तोंडाने किंना मनातल्या मनात एकादा श्लोक म्हणणे वगैरेमधून ती येतातच शिवाय टाळी किंवा चुटकी वाजवणे, डोळ्यांना ओली बोटे लावणे, हात जोडणे, मांडी घालून बसणे वगैरे क्रियांमधून होणा-या नाना प्रकारच्या व्हायब्रेशन्समधून ही एनर्जी वहात राहते असे सांगतात. कोणाच्या पायावर डोके ठेवले की त्याच्या पायातून ती आपल्या मस्तकात येते आणि आपल्या मस्तकावर त्याने हात ठेवला तर त्याच्या पंजातून आपल्या शरीरात त्याचा धोधो ओघ वहात येतो. या गोष्टी आदर व्यक्त करण्यासाठी करतात अशी माझी समजूत होती. त्यातून कंपने निर्माण होऊन ऊर्जेचा प्रवाह वाहता होतो असे कधी वाटले नव्हते. अशा प्रकारच्या तथाकथित विज्ञानाच्या गर्दीत खरेखुरे सायन्स कुठेतरी हरवून जाईल की काय अशी आशंका मला वाटायला लागली आहे.
Comments
विज्ञान,अज्ञान, अंतर्ज्ञान
मराठी असे आमुची मायबोली |
***********************************
श्री.आनंद घारे यांनी सोप्या, ओघवत्या भाषेत लिहिलेला हा लेख मला पहिल्याच वाचनात समजला. अगदी मनापासून आवडला. तत्काळ लिहिलेला हा प्रतिसाद आहे. अधिक विचार करून मागाहून लिहावे असे वाटते.
+१
अगदी असेच.. अजून येऊ द्या!
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
फेंगशुई
.
यावरुन फेंगशुई
ची आठवण झाली. घारे सरांचा सुंदर लेख . त्यामुळे आमच्या मनात सदिच्छा तरंग निर्माण झाले आहेत.
प्रकाश घाटपांडे
लेख आवडला
परंतु व्हायब्रेशन्सचा मानवी मनावर परिणाम होतच नाही असे ठाम सांगणे कठीण वाटले. मधुर संगीत, कर्कश्श संगीत अगदी रातकिड्यांची किरकिर या लहरींचा मानवी मनावर परिणाम घडतो असे वाटते. इथे सूक्ष्मलहरींचा विचार केला जसे मोबाईलच्या लहरी किंवा टिव्ही, संगणकापासून निर्माण होणार्या लहरी तर मात्र लेखात निर्माण होणार्या शंका उत्पन्न होतात.
ऐकू न येणार्यांवर?
या (ध्वनि)लहरींचा ऐकू न येणार्या व्यक्तींच्या मनावर काही परिणाम होणार नाही.
असे नाही
उच्चध्वनीमुळे कंपने निर्माण होतात जी बहिर्या व्यक्तिलाही जाणवू शकतात. अपवादात्मक परिस्थिती विज्ञानही बाजूला ठेवते.
चांगला
चांगला लेख. नवीन संकल्पना जर रूढीत बसत नसल्या तर त्यांना विरोध होतो. नेमके विज्ञान कशाला म्हणायचे आणि कशाला नाही हा निर्णय बरेचदा अवघड असतो. सुरूवातीला विरोध आणि नंतर मान्यता असेही बरेचदा घडले आहे. याची एक् (थोडीशी वादग्रस्त) यादी इथे आहे.
----
एनर्जी
शरद
ती [एनर्जी] नष्ट होत नाही की निर्माण होत नाही
बिग बॅंगच्या आधी श्री. घारे यांना अभिप्रेत असलेली एनर्जी नव्हती , विश्व प्रसारण होता होता, सर्व मॅटर विरळ होत होत
शेवटी नाहिशी होणार ...... खरे की खोटे ?
[ज्ञानेच्छुक ] समित्पाणी
उत्तम लेख : सैल वापरामुळे अनर्थ हा आशय प्रभावी
लेख आवडला.
कंपन आणि ऊर्जा शब्दांच्या सैल वापरामुळे विचारसरणी आळशी झाल्याची उदाहरणे फार दिसतात.
"तोरणामुळे काही सुपरिणाम होतात." असे प्रमेय असणे काही तत्त्वतः चूक नव्हे.
दूरवर परिणाम दिसले की भौतिकशास्त्रात "वायूचे किंवा आकाशाचे कंपन" ही कल्पना वापरली जाते, तो शब्द त्यांनी सामान्य भाषेतून घेतला आहे. त्या शास्त्रात वापर करताना त्या शब्दांचा अर्थ मर्यादित केला जातो, आणि तेवढ्यापुरता वापरला जातो. त्या मर्यादित अर्थाने गणितांची सिद्धी केली जाते.
"तोरणामुळे दूरवर सुपरिणाम होतो" असे शास्त्र सिद्ध करणार्याने त्या कल्पनेला "कंपन" शब्द वापरला, तर त्याला तसा हक्क जरूर आहे. पण जर भौतिकशास्त्रातले गणित वापरायचे असेल, तर ती संकल्पना आणि भौतिकशास्त्रातला मर्यादित अर्थ एकच, हे दाखवून द्यायला पाहिजे. नाहीतर नवीन अर्थाने गणिते/तर्क पुन्हा मांडायला पाहिजेत, सिद्ध करायला पाहिजेत.
वैचारिक आळस हा. "तोरणाचे कंपन" आणि "भौतिशास्त्रातले कंपन" यांचा एकवद्भाव सिद्ध न करता भौतिकशास्त्रातील निष्कर्ष लागू करणे.
अशाच प्रकारे "प्राणिक किंवा आत्मिक नष्ट-न-होणारी-फक्त-बदलणारी कुठलीतरी राशी आहे." असे प्रमेय असणेही तत्त्वतः चूक नव्हे. त्याला "ऊर्जा" असे नाव देणेही चूक नव्हे. पण त्याचा भौतिकशास्त्रातील गणिताशी संबंध जोडायचा, तर नवी व्याख्या आणि भौतिकशास्त्रातली "ऊर्जे"ची व्याख्या जुळतात, एवढा वैचारिक प्रयास अपरिहार्य आहे.
[येथे "प्रमेय" शब्द "सिद्ध करण्याची हायपोथेसिस" या अर्थाने वापरला आहे.]
उत्तम लेख! | शिक्षणपद्धती?
अतिशय उत्तम लेख! विज्ञानाचा प्रचार होऊनही अंधश्रद्धा नवीन रूप धारण करून बोकाळत आहेत ही भीती बर्याच अंशी खरी आहे.
मला एक वेगळाच मुद्दा आढळतो. आपल्या शिक्षणपद्धतीत विषय समजून घेणे अनावश्यक आहे. स्मरणशक्ती चांगली असणे, जास्त प्रयत्न करणे इत्यादींनी शैक्षणिक यश मिळवता येते. शाळा-कॉलेजात शिकलेले विज्ञान फक्त परीक्षेसाठी असते, आपल्या रोजच्या जीवनाशी संबंध काय? अशी अनेकांची धारणा असते त्यामुळेच अनेक उच्चशिक्षित लोकही तुम्ही सांगितल्यासारख्या निर्बुद्ध प्रकारांना बळी पडतात.
उत्तम लेख
लेख उत्तम आहे.
संगीतातली कंपने
विज्ञानात बसतात. त्यांच्या कंपनसंख्या मोजता येतात. सुरांच्या सापेक्ष कंपनसंख्येवर्च संपूर्ण शास्त्रीय संगीत आधारले आहे. मानवी मनावर् आणि कांही प्रमाणात शरीरावरसुद्धा त्याचा परिणाम होतो हे प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. माझा रोख कल्पनिक कंपस्नावर आहे.
बरोबर पण
यापैकी अधोरेखीत गोष्टींनी तरी कंपने निर्माण होत असावीतच ना! आपण दिलेल्या उदाहरणातील सर्वच उदाहरणे कंपने निर्माण करण्यात अक्षम नाहीत एवढेच सांगायचे होते.
स्पर्शाने उर्जेचे संक्रमण होते हे ही खरे आहेच. त्याचा गैरवापर करणे किंवा व्यावसायिक हेतूने इतरांची फसवणूक करणे अयोग्य असले तरी हात जोडणे, डोक्यावरून हात फिरवणे, गळाभेट वगैरे गोष्टीतून उर्जा वाहत नाही हे कसे स्पष्ट होते?
कंपन म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे काय?
>> ... तोंडाने किंना मनातल्या मनात एकादा श्लोक म्हणणे वगैरेमधून ती येतातच
>> शिवाय टाळी किंवा चुटकी वाजवणे, ...
> ... यापैकी अधोरेखीत गोष्टींनी तरी कंपने निर्माण होत असावीतच ना!
> ... हात जोडणे, डोक्यावरून हात फिरवणे, गळाभेट वगैरे गोष्टीतून उर्जा वाहत
> नाही हे कसे स्पष्ट होते?
यात "काहीतरी होते" हे निश्चित. पण जे होते ते "कंपन" आणि "ऊर्जा संक्रमण" असेल तर "कंपन" आणि "ऊर्जा" यांच्या व्याख्या काय हे निश्चित करणे महत्त्वाचे. भौतिकीत ज्या संकल्पनांची व्याख्या आहे, ती "कंपने", ती "ऊर्जा" संक्रमण होणारी असते तेव्हा बर्यापैकी मोजता येते. मोजमापाचे यंत्र वापरले तर "वाहाते/वाहात नाही" याविषयी अस्पष्टता राहात नाही.
आता "कंपन", "ऊर्जा" या शब्द-ध्वनींवर भौतिकीचा एकाधिकार नाही. वेगळ्याच कुठल्यातरी व्याख्येने ते शब्द वापरण्यास कुठलीही बंदी नाही. (उदाहरणार्थ मी वयाने मोठ्या बंधूला "दादा" म्हणतो, पण माझा मामेभाऊ त्याच्या बापाला "दादा" म्हणतो. संदर्भाने, आणि दीर्घ ओळखीमुळे, आमच्या व्याख्या वेगळ्या आहेत, हे माहीत आहे. त्यामुळे गप्पागोष्टी करताना कधीही घोटाळा होत नाही. पण व्याख्यांचा घोटाळा झाला, आणि कोणी मला म्हटले की मी माझ्या "दादा"चा औरस पुत्र आहे, तर माझ्या अख्ख्या कुटुंबाचा घोर अपमान होईल.) गळाभेट घेताना ते जे काय संक्रमते (="ऊर्जा"), आणि भौतिकीतली "ऊर्जा" या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, थोड्याथोड्या वेगळ्या आहेत, की नेमकी एकच गोष्ट आहे, याविषयी गोंधळ करून चालायचा नाही.
त्या गोष्टी एकच असल्या तर मोजमाप सहज आहे. त्या जर वेगवेगळ्या असल्या तर भौतिकीतल्या "लॉ ऑफ कन्झर्व्हेशन ऑफ एनर्जी"चा गळाभेटीतच्या "ऊर्जे"शी संबंध लावण्याने अयोग्य निष्कर्ष निघू शकतात.
मान्य
.
मान्य. वरील प्रतिसादात एक वाक्य टाकणार होते पण आयत्यावेळेस शक्तीचे सूत्र आठवले नाही आणि शोधायचा कंटाळा आला होता म्हणून टाळले.
एखादा मनुष्य बोलताना "स्वतःच्या संवेदनशक्तीचा किंवा सहनशक्तीचा" उल्लेख करतो. ही शक्ती नेमकी कशी मोजावी यासाठी भौतिकशास्त्राचे सूत्र किंवा परिमाण लागू होईलच असे नाही.
असेच ना?
बरोबर
"शक्ती" हा रोजवापरातला शब्द आहे. सहनशक्तीला भौतिकशास्त्रातले परिमाण लागू नाही. (पण तार तुटण्यापूर्वी 'क्ष' ताण सहन करू शकते, वगैरे, नेमकी मोजमापे असलेल्या संकल्पना आहेत, त्या अगदीच वेगळ्या.)
अवांतर : गंमत म्हणजे संस्कृत व्याकरणात "शक्ती"चा तांत्रिक अर्थ आहे "शब्द आणि अर्थ यांच्यात जो संबंध असतो, तो संबंध". तसा "शक्ती" शब्द वापरला तर जवळजवळ कुठल्याही अन्य परिस्थितीत हास्यास्पद होईल. पण त्याच प्रकारे "मराठीत भकाराने सुरू होणार्या शब्दांना विलक्षण शक्ती असते" असे व्याकरणाच्या संदर्भात म्हणणे फारच चूक : ते शब्द "जोरात" वापरले जातात तेव्हा त्यांचा शब्दकोशातला शब्दार्थ (व्याकरणातला शक्तिसंबंध) मुळीच अभिप्रेत नसतो!
बारीकसारीक शाब्दिक फरक
हे वाक्य पटले नाही, पण बहुधा केवळ शब्दांच्या निवडीतला फरक असावा.
मनुष्य म्हणून एकमेकांचे विचार समजण्याइतपत बुद्धिमत्तेची अपेक्षा आपणा सर्वांकडून केली जाऊ शकते. जर मला असे म्हणायचा मोह झाला "ताई, तुम्हाला समजणार नाही, सोडा हा नाद..." म्हणजे ती गोष्ट मलाच नीट समजावून सांगण्याइतकी कळलेली नाही, याचा स्पष्ट संकेत मिळतो. त्याच प्रकारे जर कोणी मला म्हटले "धनंजय, तुला समजणार नाही, सोड हा नाद..." तर ती व्यक्ती काही लपवत आहे, अशी माझी शंका होते.
सामान्य आयुष्यात "तुला-मला टप्प्या-टप्प्याने समजावून घ्यायला वेळ नाही, सोडूया तो नाद..." असे म्हणतच मी ९९.९९% गोष्टींचा अभ्यास (किंवा अध्यापन) थांबवतो.
सर्वांना बुद्धिमत्ता असली तरी सर्वांकडे वेळ असेलच असे नाही. त्या दृष्टीने तुमचा "पोलाद बनवणारा आणि समशेरबहाद्दर" हा दृष्टांत बोलका आहे. पोलाद बनवायचे शिक्षण घेतलेला लोहार त्या अभ्यासात, स्वतःच्या रोजंदारीच्या विवंचनेत पूर्णवेळ गुंतलेला असेल. त्याला तलवारयुद्धातले डावपेच शिकायला वेळ राहाणार नाही. त्याच प्रकारे, समशेरबहाद्दराला पोलादाचे रसायनशास्त्र शिकायला वेळ मिळणार नाही.
येथे मुद्दा "कुशाग्रबुद्धीचा" किंवा "सर्वसामान्यतेचा" नाही, तर "त्या अंगाने सखोल विचार करणे सोयीचे आहे का, तितका वेळ काढता येतो का?" असा आहे - असे मला वाटते.
समशेर चालवायचे नवीन तंत्र विकसित झाले, आणि आपल्या समशेरी तुटायला लागल्या तर लोहाराला त्या नव्या तंत्राचा थोडा अभ्यास करावाच लागेल. वेळात वेळ काढावा लागेल, सोयीत सोय करावी लागेल. तसेच समशेरबहाद्दराला लोहारा-लोहाराच्या पैकी कुठली समशेर घ्यावी त्याबद्दल वेळ काढून अभ्यास करावा लागेल.
तुम्ही हा दृष्टांत निवडला म्हणून वाटते की तुमच्या-माझ्या मतात बहुधा केवळ शब्दांच्या निवडीतला फरक असावा.
लेख आवड्ला
लेख आवडला !!! पण शेवटचे दोन उतारे मनात काही प्रश्न निर्माण करतात. अर्थात विज्ञानाचा गंध नसल्यामुळे त्याचे विवेचन करता येणार नाही. पण उर्जा कशाकशातून निर्माण होते हे शास्त्रीय दृष्ट्या सांगता येत असेल, पण काही उर्जा / कंपने त्याचा परिणाम शरिरावर होतो याचे विश्लेषन करता येते का ? आणि त्यामुळे खरे विज्ञान बाजूला पडेल की माहित नाही पण अशा उर्जांबद्दल अनेकदा आपण ऐकत असतो, मला उल्लेख करण्याचा मोह होतो तो 'रेकी' या उर्जेचा... क्षणभर अशी एक उर्जा बाहेर पडते असे ग्रहीत धरले तर त्याच्या आदराबरोबर विश्लेषन केले पाहिजे म्हणजे विज्ञानाची वाट मोकळी होईल असे वाटते.
लेख आवडला...
लेख छान आहे. आवडला.
अंतर्ज्ञानासंदर्भात वाचलेले आहे. प्रत्यक्ष उदाहरण पाहीलेले नाही. वाचलेले नक्कीच आहे. मात्र संकेतस्थळावर कुठल्या विषयावर काय लेख आल्यास कोणाचे काय प्रतिसाद येऊ शकतात हे समजण्याइतके मला अंतर्ज्ञान आहे असे वाटते :-) मी विश्वास ठेवावा की न ठेवावा या भानगडीत पडत नाही कारण त्यापासून मी अलीप्त आहे.
माझ्या आजूबाजूला असणा-या ज्या व्यक्तींच्या 'अंगात' येत असे त्यांची वागणूक पाहता मला कधीच त्यांचा विश्वास वाटला नाही.
लहानपणी मी नवरात्रात कुतुहलापोटी अनेकदा अष्टमीच्या अंगात आलेल्या बायका पहायला इतरांबरोबर गेलो आहे. त्यात देवी खरेच आहे वगैरे प्रश्न पडले नव्हते मात्र गूढ नक्कीच वाटले होते. आजही मला त्या संदर्भात एक प्रश्न कायम पडतो की कितीजण एखादी घागर पाच मिनिटाच्या वर फुंकत हातात नाचवत राहू शकू... एरव्ही घरातील गृहीणी म्हणून असलेल्या या बायका मग संपूर्ण संध्याकाळ कशा घागरी फुंकू शकतात हा प्रश्न पडायचा आणि आजही याचे उत्तर मिळाले नाही. याचा अर्थ मग त्यांच्यात देवी येते वगैरे असा आहे का? तर मी अंधश्रद्धाळू नाही... याच अर्थाचा प्रश्न डॉ. अनील अवचटांना देखील नवरात्राच्या कार्यक्रमात मी नाही (कारण लहान होतो) पण कोणी तरी विचारला होता आणि देवी नाही हे सांगत असताना नक्की काय होते याचे समाधानकारक उत्तर त्यांना देखील देता आले नाही. इतके आठवते. आपल्या वरील विधाना वरील ही प्रतिक्रीया म्हणजे प्रतिवाद नाही आहे तर याचे नक्की काय कारण असू शकेल हा उत्सुकतेपोटी पडलेला प्रश्न आहे. तसेच आता मला प्रश्न पडतो की अजून पण इतके अंगात येणे चालू आहे का? (नवरात्रात दांडीयाच्या निमित्ताने अंगात येणे हा हल्ली जरा वेगळा प्रकार आहे त्याचा यात समावेश नको!)
कोणाच्या पायावर डोके ठेवले की त्याच्या पायातून ती आपल्या मस्तकात येते आणि आपल्या मस्तकावर त्याने हात ठेवला तर त्याच्या पंजातून आपल्या शरीरात त्याचा धोधो ओघ वहात येतो. या गोष्टी आदर व्यक्त करण्यासाठी करतात अशी माझी समजूत होती. त्यातून कंपने निर्माण होऊन ऊर्जेचा प्रवाह वाहता होतो असे कधी वाटले नव्हते.
उर्जा, कंपनशक्ती वगैरेचा अतिरेक आणि कुठल्यातरी गोष्टींच्या जस्टीफिकेशनसाठी चुकीचा वापर होतो हे अर्थातच मान्य आहे. पण वरील वाक्य वाचताना मला स्वामी विवेकानंदांचा त्यांनीच लिहीलेला अनुभव आठवला ज्यात स्वामी रामकृष्णांनी त्यांच्या निधना आधी त्यांना स्पर्श करून "स्वतःपासून वेगळेकरून (देह विरहीत अवस्था)" दृष्टांत दिला. नंतर म्हणाले की माझ्याकडील मी सर्व तुला दिले आता माझ्याकडे काही राहीले नाही, मी पूर्ण फकीर झालो. हे विवेकानंदांनी लिहीले आहे ज्यांनी हिंदू (आणि इतरही) धर्मावर सभ्यपणे पण कोरडे ओढले आहेत, विज्ञानाची तरफदारी केली आहे त्यांनी सांगितले म्हणून असे काही तरी असू शकते असे राहून राहून वाटते. त्यात श्रद्धा, अंधश्रद्धेचा प्रश्न येत नाही कारण ते असून नसून माझ्या वैयक्तिक जीवनात काही प्रत्यक्ष फरक पडेल असे नाही. पण येथे कोणी म्हणले या संदर्भाने केवळ माझा विश्वास दिसतो. बाकी तसे झाले म्हणून अथवा झाले नसले म्हणून काही असले तरी त्यामुळे मी काही विवेकानंदांची पूजा करत नाही की त्यांच्या नावाने उपवास करत नाही पण त्यांचे लेखन नक्कीच आवडते (थोडक्यात येथे माझा "फेथ बेस्ड कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट " नाही!)
अंगात येणे
एरव्ही घरातील गृहिणी इ. ठीक परंतु घरातील सर्व गृहिणीच असे करू शकतात का? यावर विचार व्हावा.
अंगात येणे म्हणजे काय? याचे उत्तर येथे सापडेल. इथे जो प्रकार सुरू आहे त्याचा आणि अंगात येणे या प्रकाराचा घनिष्ठ संबंध आहे. मानसिक रुग्ण तसेच मतिमंद मुले यांच्या अंगी असणार्या सर्वसामान्यांपेक्षा अधिक शक्तीची माहिती नवी नाही. अनिल अवचटांना इतके साधे उत्तर सुचू नये याचे आश्चर्य वाटले.
व्यक्तिशः मला वाटते की अंगात वगैरे येणार्या बायका या बहुतांश गृहिणीच असतात. घरात अनेक गोष्टींमुळे होणारा कोंडमारा घागरीत फुंकत असतात. (ह. घेऊ नका, गंभीरपणे म्हणते आहे :) )
आता एक सत्य घटना सांगते - नवरात्रीच्या दिवसांत, आमच्या घरासमोर राहणार्या एका गुजराथी गृहिणीच्या अंगात येत असे. ही बाई अंगात आले की उभ्या उभ्या ५-५ फूट उंच उड्या मारी. स्वतः डोळ्याने हा प्रकार पाहिला आहे. इतर दिवसांत हीच गृहिणी नवरा दुकानात गेला की आपल्या मित्राला घरात घेत असे. हे ही डोळ्यांनी पाहिले आहे. अशा देवीचे रक्षण देवच करो! :-)
असो, तुमच्या आमच्या लहानपणापेक्षा आता बायकांनी घागरी फुंकायचे प्रमाण बरेच कमी झाले आहे/असावे याचे कारण बायका मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्या, स्वयंसिद्ध झाल्या, आपले विचार मोकळेपणी मांडू लागल्या हे ही असावे.
आणखी एक पाहिलेली घटना आठवत होते. ती येथे मिळाली.
कार्यालयीन
मी काही कार्यालयीन मावशींना अंगात आलेले पाहिले आहे. हे अंगात येणे याचा अभ्यास/चर्चा झाला तर वाचायला आवडेल.
कार्यालयीन मावशी
कार्यालयीन मावशींनाही अंगात येत असावे, नाही असे नाही पण गृहिणींपेक्षा प्रमाण कमी असावे. शेवटी प्रत्येकाची आपापली डिप्रेशन्स असतात किंवा त्यातून सुटका हवी असते. देवीचं सोंग घेतलं तर नवर्यापासून, सासूपर्यंत आणि शिपायापासून बॉसपर्यंत सर्वच आदरयुक्त वचकून राहात असावेत.
अशा देवी फारा वर्षांपूर्वी ग्रीक संस्कृतीतील काही भविष्यवेत्त्यांच्या अंगात येत असत (ऑरेकल्स ऑफ डेल्फाय) त्याचे मुख्य कारण त्यांच्या पूजेदरम्यान जाळला जाणारा अफीम (किंवा तत्सम नशेचा पदार्थ) असे. अंगात येणार्या काकू-मावश्यांना अशाप्रकारे काही चढत असल्यास कल्पना नाही.
दुवा - फरक
---अंगात येणे म्हणजे काय? याचे उत्तर येथे सापडेल. इथे जो प्रकार सुरू आहे त्याचा आणि अंगात येणे या प्रकाराचा घनिष्ठ संबंध आहे.
आपण वर दिलेला दुवा मला वाटते हिंदू जनजागृती वाल्यांचा आहे आणि आपण तो (मला म्हणून नसेल पण विषयासाठी) उपरोधीक दुवा होता असे वाटले.
अंगात येणे म्हणजे काय या संदर्भातील कुतुहल मात्र वेगळ्या कारणाने आहे. आपण दिलेल्या दुव्यातील प्रकारात अंगात आलेली भूते अथवा देव-देवता या विशेष करून नवरात्राच्या पंचमी अथवा षष्ठीच्या दिवशी जेंव्हा घंटाळीच्या देवळात गोंधळ असायचा तेंव्हा कधीतरी पाहीली आहेत. (तिथे जायचीपण भिती वाटायची कारण अचानक शेजारी उभा असलेली व्यक्ती कधी घुमत उड्या वगैरे मारायला लागेल हे सांगता येयचे नाही :-) ) त्यात आपण म्हणल्याप्रमाणे पाचपाच फूट उड्या मारणारे पण असायचे.
अष्टमीच्या दिवशीचे प्रकरण मात्र नक्कीच् वेगळे असायचे (आपण दिलेल्या दुव्या संदर्भात आणि वर सांगीतलेल्या "गोंधळा"संदर्भातला आचरटपणा त्यात किमान वरकरणी नसायचा). त्यात पण मला वाटते काही कुटूंबात तर त्या रात्री नवीन लग्न झालेल्या स्त्रीया (पहील्या वर्षीच का पहील्या पाच वर्षी) कुळाचार म्हणून पाच वेळेस घागरी फुंकतात/फुंकायच्या. पण त्याच्यापुढे जाऊन त्या कधी नाटक करत नसत अथवा तितका स्टॅमिना त्यांच्यात नसायचा (ज्या काही त्यावेळेस माहीतीतील स्त्रीया होत्या त्यांच्यापुरते निरीक्षण मर्यादीत). बाकी त्यात त्यांचा गाजावाजा अथवा देवी आली अथवा येते वगैरे काहीच नसायचे. पण उरलेल्या अंगात आलेल्या बायका मात्र शांतपणे उभ्याने थोडेफार चालत राहून घागरी फुंकत बसायच्या. मग एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात असलेल्या कधीतरी रस्त्यावरून दिसायच्या. अजीबात भान नसलेल्या (त्याच वेळेस बेभान नसलेल्या) या बायका रस्ते ओलांडायला लागल्यावर - त्यामानाने तेंव्हा रहदारी कमी असूनही त्यांच्या नातेवाईकांना लक्ष ठेवायला भाग पाडायच्या. बाकी जीवन नेहमी सारखे एरवी वर्षभर अंगात येते म्हणून गाजावाजा नाही.... एकंदरीत भोंदूपणा, नाटक दिसेल असे काहीच नाही...तरी अर्थात देवी येणे वगैरे तेंव्हा आणि आजही पटत नाही. मग प्रश्न पडायचा की हाच दिवस (संध्याकाळ रात्री बारा पर्यंत) आणि काहीच बायकांच्या मात्र सर्व वयोगटातील, बाबतीत हा प्रकार कसा, हा स्टॅमिना कुठला वगैरे... अनील अवचटांचे उत्तर हे या विशिष्ठ प्रकारात मोडणार्या अंगात येणार्या स्त्रीयांबद्दल होते. आपण दाखवलेल्या अथवा मी देखील म्हणलेल्या गोंधळातील व्यक्तींबद्दल (ज्यात पुरूषपण असत) त्यांच्याबद्दल नव्हते. त्यांच्यावर त्यांनी कोरडेच ओढले आणि त्यांची भोंदूगिरी कशी उघडकीस आणली याची उदाहरणे पण त्यांनी दिली.
बायका घराबाहेर पडून काम करायला लागल्यावर ही प्रकरणे कमी झाली असावीत असे मला देखील वाटते (वस्तुस्थितीची कल्पना नाही) म्हणूनच तसा प्रश्न विचारला आणि त्याच संदर्भात आपण उत्तर दिले.
उपरोधाने नाही
नाही मी दुवा उपरोधाने नाही दिला (तुम्हालाही नाही आणि हिंजजावाल्यांसाठीही नाही.) क्षणभर असे माना की त्या मुलीला खरेच वाटते आहे की आपला ताबा कोणा सैतानाने घेतला आहे. तिच्या अव्यक्त मनाची तशी "खरी" समजूत असेल तर ती (भूत) अंगात आल्यासारखे वागेल. तिच्यात आणि अंगात देवी येणार्या बाईत मला फरक दिसत नाही.
हे मलाही आठवले होते पण प्रतिसाद त्याबाबत नव्हता म्हणून लिहायचा कंटाळा केला. मला आठवले ते असे, लहानपणी घागरी फुंकणे असा अष्टमीच्या दिवशी कार्यक्रम असायचा. जसे, ६-८ यावेळांत बायका घागरी फुंकतील. म्हणजे, देवी सांगून सवरून त्यावेळात अनेक बायकांच्या अंगी एकावेळेस उत्पन्न होते इ. काही बायका थोड्यावेळ घागरी फुंकत तर काही बायका अगदी तासन् तास. मी अजिबात म्हणत नाही की त्या नाटक करत. एका दुसर्या प्रतिसादात ज्या तरूण मुलीची गोष्ट सांगितली आहे तीही अजिबात नाटक करत नव्हती आणि कदाचित, हिंजजावाली ती मुलगीही नाटक करत नसण्याची शक्यता आहे. (हेच मी त्या आठवल्यांबद्दल म्हणणार नाही हे मात्र निश्चित) आपण बाधित आहोत किंवा देवाचे झाड आहोत अशी कल्पना मनात रूजली असल्यास अर्तक्य कामे हातून घडणे अशक्य नसावे.
उदा. हे उदाहरण अगदी साजेसे आहे असे नाही परंतु अमिताभ बच्चन अनवाणी प्रतीक्षापासून सिद्धीविनायकापर्यंत चालत जातो हा प्रकार प्रत्येकाला वयाच्या पासष्टीत शक्य आहे का? दोन मैल चाललं तर माझ्या डोक्यावर आकाश कोसळतं. मग हे तो कसे करत असावा? त्याच्या मनात असलेली श्रद्धा/ विश्वास बहुधा त्याला हे करण्यास भाग पाडत असावी. अमिताभ हा एक नॉर्मल मनुष्य आहे याबाबत आपले दुमत नसावे. ;-) (की असावे?) याचप्रमाणे या बायकांना असे अर्तक्य प्रकार करणे शक्य आहे असे मला वाटते. (मी सरसकट सर्वांना मानसिक रुग्ण किंवा डिप्रेस्ड म्हणणार नाही)
हे वाक्य जरा मला कळले नाही. म्हणजे त्या अष्टमीच्या दिवशी असे का? लक्ष ठेवायला म्हणजे कोणावर?
नाही भोंदूपणा असे म्हणायचे नाही मला. भोंदूपणा आपला मी तो त्या गुजराथी बाईचा सांगितला की असे होणेही शक्य आहे पण दुसर्या चर्चेतील ज्या मुलीबद्दल सांगितले (शुक्रवारी अंगात देवी येणे) तो प्रकार फार वेगळा होता.
प्रत्येक मानवी मन हे वेगळं असतं. देवीचे खास दिवस, केस मोकळे सोडले, कपाळावर मळवट भरला, अगरबत्ती, धूप, घंटानाद यांनी भारलेले वातावरण यांचा पाचापैकी एखाद्या मानवी मनावर वेगळा परिणाम होणे सहज शक्य आहे. हाच परिणाम इतर चार मनांवर होईल असे नाही. संमोहनातही असे म्हणतात की एखाद्या गटावर संमोहन केले जाते तेव्हा संमोहित झालेल्या व्यक्ती कमी असून, संमोहित न झाल्याने फजिती होऊ नये म्हणून संमोहनतज्ज्ञाने सांगितलेले बरहुकूम करणारे आणि पाळणारे अधिक असतात. म्हणजेच, एकच गोष्ट गटातील सर्वांसाठी चालते असे नाही. प्रत्येक मन त्याला वेगळ्याप्रकारे प्रतिसाद देऊ शकते.
अर्थातच, वर्षातील इतर दिवशी हा प्रकार घडून येईलच असे नाही.
नथिंग इज अनटचेबल
सर्वप्रथम प्रवाही लेखनाबद्दल तुमचे अभिनंदन.
आता तुमच्या मुद्याकडे वळुया.
मी आस्तिक आहे परंतु, सर्व कामधंदे सोडून देवाला व स्वतःच्या शरीराला वेठीस धरुन केल्या जाणार्या कर्मकांडांचा मला तिटकारा आहे. पण बरेचदा काय होत आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव न घेता, त्याचा अभ्यास न करता, शहानिशा न करता थेट निष्कर्षाला पोहचण्याची घाई करतो. (कृपया गैरसमज करुन घेऊ नका हे वाक्य मी सर्वसाधारण संदर्भात वापरले आहे)
आता हेच बघा ना, राजकारण हा शब्द जरी उच्चारला तरी आजकाल त्याचा तिटकारा यावा अशी परिस्थिती आहे. काही (किंवा बर्याच) राजकारण्यांनी राजकीय क्षेत्राची तशी अवस्था केली आहे. याचा अर्थ राजकारण वाईट आहे का?
एका मोबाईल मधून दुसर्या मोबाईलवर वातावरणातील चुंबकीय लहरींद्वारे संदेश पोहचविला जाऊ शकतो यात काही नावीन्य वाटते का? नाही! कारण आज आपल्याला त्यामागील तंत्रज्ञान माहित झाले आहे. अन्यथा ही पण जादूच वाटली असती ना!
अजून तरी मी कोणत्याही कामासाठी ज्योतिष्याचा सल्ला घेतलेला नाही. पण त्याच वेळी मी अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत जिथे काही ज्योतिष्यांनी संबंधित व्यक्तिंना न पाहताही त्यांच्या शरीरप्रकृतीचे जवळपास ८०% अचूक वर्णन केले आहे. तसेच त्यांच्या आवडीनिवडींबद्दल ढोबळ ठोकताळे मांडले आहेत.
माझा स्वतःचा अनुभव सांगतो. काही वर्षांपूर्वी माझ्या मित्राच्या परिचयात कर्जत परिसरात राहणारा एक माणूस आला. वय साधारण चाळीशीच्या आसपास. व्यवसायाने बहुतेक अभियंता होता. माझ्या मित्राने सांगितले की हा माणूस भुतकाळातील व भविष्यातील गोष्टींबाबत अचूक माहिती देतो. कुतूहल म्हणून एके रविवारी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी ना मला पत्रिका विचारली ना माझी जन्मतारीख. जमिनीवर आम्ही दोघे समोरा समोर मांडी घालून बसलो. त्यांनी माझा हात हातात घेतला व थोड्या वेळाने डोळे मिटून माझ्या गत आयुष्याबद्दल बोलू लागले. भविष्यातील काही गोष्टी सांगितल्या. खुपच अचूक माहिती दिली. निघताना मी त्यांना पैसे देऊ केले, पण त्यांनी ते नम्रपणे नाकारले. त्यांनी ज्योतिषाचा कोणताही अभ्यासक्रम केला नव्हता व ते त्यांच्या या अदभूत शक्तीचा व्यावसायिक उपयोगही करीत नव्हते.
सर्व साधारणपणे भौतिक स्वरुपात ज्या गोष्टी अनुभवास येतात, त्यावर लगेच विश्वास बसतो. तुम्ही अध्यात्म म्हणा किंवा अंतर्ज्ञान. परंतु सामान्य माणसाच्या अनुभवाच्या पातळी पलिकडेही काही गोष्टी असतात असे माझे वैयक्तिक मत आहे. म्हणूनच मी एक गोष्ट ठरवली आहे. "नथिंग इज अनटचेबल". काही गोष्टी पटोत वा ना पटो, पण थेट अविश्वास दाखवायचा नाही.
परंतु काही गुढ गोष्टींच्या वस्तुनिष्ठ अभ्यासाऐवजी बुवाबाजी वाढल्यामुळे अशा प्रकारच्या तथाकथित विज्ञानाच्या गर्दीत खरेखुरे सायन्स कुठेतरी हरवून जाईल की काय ही आपली शंका मात्र रास्त आहे.
जयेश
आवडला..
समतोल आणि पटणारा प्रतिसाद...
थेट अविश्वास
कंसातील शब्द आपल्या वाक्यात घातले तर विज्ञानाचा पाया देखिल हाच आहे हे दिसुन येईल.
तुम्ही प्रतिसादाची सुरूवात 'मी आस्तिक आहे' अशी केली आहे, आणि त्या नंतरचे विवेचन हे त्यामागचे मुख्य कारण 'साधारण थेट अविश्वास दाखवायचा नाही' हे स्पष्ट करणारे आहे.
देव आहे की नाही ह्याचे ठोस उत्तर/सबळ पुरावा अजुन कुणालाच माहित नाही. ज्याला देव नसण्यापेक्षा देव असण्याची शक्यता अधिक वाटते तो आस्तिक/सश्रद्ध/भाविक बनतो. ज्याला दोन्हीपैकी कोणतीही बाजू सत्य असण्याची ५०-५० शक्यता वाटते ती व्यक्ती ऍग्नॉस्टिक असते (ह्यात देखिल देव नसण्याची/ असण्याची शक्यता किंचीत अधिक वाटते असे ऍग्नॉस्टिक देखिल आले.) नास्तिक माणूस म्हणजे जो देव ही संकल्पना अस्तित्वात असण्याची शक्यता इतकी कमी मानतो की आपले आयुष्य 'देव अस्तित्वात नाही' ह्या ऍझम्प्शन वरतीच घालवू इच्छीतो. (ह्याचा अर्थ नास्तिक माणुस देखिल थेट अविश्वास दाखवत नाही)
देव ही शक्यता नसून देव आहे मला माहित झाले आहे/किंवा देव अजिबात नाही मला माहित आहे ही दोन्ही अतिरेकी टोके देखिल दिसुन येतात पण बहुसंख्येने सुजाण लोक हे ह्या दोन्ही टोकांच्या मध्ये असतात.
सहमत
कोलबेर यांच्याशी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे
शहानिशा
ज्योतिषा बाबत अदभुत वाटणार्या काही गोष्टींची आम्ही शहानिशा केली तेव्हा निराशाच पदरी पडली. मित्रांनी व ऐकीव / वाचीव गोष्टींबाबत चे काही वानगीदाखल प्रयत्न केले होते.
१) नाडी ज्योतिषाबाबत चा अनुभव
२) मुद्रा ज्योतिषाबाबतचा अनुभव
३) अतिंद्रिय सामर्थ्या बाबतचा अनुभव
प्रकाश घाटपांडे
सहमत
जयेश यांच्याशी सहमत आहे. विषय बराच वादग्रस्त आहे आणि यावर आधी (व्हर्चुअल) रक्त सांडेपर्यंत चर्चा झाल्या आहेत. यामध्ये बहुतेक वेळा दोन क्यांपातील लोक असतात. एक कट्टर विज्ञानवादी आणि दुसरे तथाकथित श्रद्धावादी. आणि तुम्ही आयदर-ऑर प्रमाणे कुठल्यातरी एकाच क्यांपात जाऊ शकता. खरेतर यासाठी तिसरा पर्याय हवा असे वाटते. जयेश यांनी म्हटल्याप्रमाणे थेट अविश्वास दाखवण्याऐवजी जे घडते आहे ते समजून घेणे अधिक योग्य आहे असे वाटते. बरेचदा एखादी गोष्ट उपलब्ध विज्ञानाच्या कक्षेत बसत नाही म्हणून ती सरळसरळ अंधश्रद्धेच्या वर्गात टाकली जाते. होमिओपथी प्लासिबो इफेक्ट मानली तर लहान मुलांवर ती कशी परीणामकारक ठरू शकते याचे उत्तर मिळत नाही.
बरेचदा असे वैयक्तिक अनुभव येतात जे विज्ञानाच्या सहाय्याने सोडवता येत नाहीत. पण अनुभव तर आलेला असतो, त्याचे काय? याचे लेटेष्ट उदाहरण म्हणजे आमचे एक परिचित एका नाडीज्योतिष्याकडे गेले होते. त्यांनी फक्त त्यांच्या नावातील पहिले अक्षर विचारले. त्यानंतर त्यांचे नाव, पत्नीचे नाव, मुला-मुलींची संख्या, त्यांचे व्यवसाय ही सर्व माहिती दिली. शिवाय याची एमपी ३सुद्धा करून दिली जी मी ऐकली. ऐकल्यानंतर उत्सुकता इतकी वाढली की मी ही जायचे ठरवले आहे. जाऊन आल्यावर काय अनुभव आला ते लिहीनच. ज्योतिष्याबद्दल संख्याशास्त्रीय पुरावा मिळत नाही याचे कारण प्रत्येक ज्योतिष्याची केपेबिलिटी वेगवेगळी आहे हे असू शकेल का? ज्योतिष्य हे मानसोपचाराप्रमाणे शास्त्र आणि कला यांचा मिलाफ असू शकेल का? असे अनुभव आल्यावर असे विचार करायला हवेत असे वाटते.
वैधानिक इशारा : सर्व मते वैयक्तिक आहेत. अधिक पुरावा मिळाल्यास बदलू शकतात!
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson
सुंदर लेख
खूप छान् लेख आहे. माझे विचार या लेखातील सर्व् मतांशी १०० टक्के जुळतात.
या संदर्भात विकिपिडियावरील 'Quantum Mysticism' हा लेख नमूद करावासा वाटतो.
एक छोटी शंका: ७व्या परिच्छेदातील 'परामनोलिज्ञान' हा शब्द म्हणजे 'मेटाफिजिक्स्' असा अभिप्रेत आहे का?
विज्ञान, अज्ञान व अंतरज्ञान
माझी द्त्तगुरुंवर् श्रद्धा असल्याकारणाने मी गाणगापुर ला जात असतो. सर्वप्रथम मी गाणगापुर ला गेलो तेंव्हा तेथील सभामंडप जो २० फुट उंच असावा व जो अनेक लोखंडी पाईप च्या आधारे उभारलेला आहे त्यावर आरतीच्या वेळी अनेक बायका विभीन्न वयांच्या व आकाराच्या त्या पाईप च्या आधारे छतापर्यंत बेभानपणे चढत व उतरत असलेल्या मी पाहील्या आहेत. मानसिक रुंग्ण तिथे बरे होतात अशी श्रद्धा असल्याने कुटुंबीय आपल्या मानसिक रुंग्ण व्यक्तींना तिथे आणतात. आणि आरतिच्या वेळी ह्या व्यक्ती बेभान होतात आणि वर चढतात. सामान्य माणसाला ही कसरत नक्कीच अवघड असणारी पण स्त्रिया सहजपणे करतांना आढळतात. तेथील वातावरणाचा परिणाम व भक्तांची श्रद्धा हे याचे कारण असेल काय?
मी विपश्यनेचे १० दिवसीय ४ शिबीरे इगतपुरी येथे केले आहे. मला त्याचा निश्चीत च फायदा झाला. माझ्या पहिल्या शिबीराच्या वेळी पहिल्या दिवशी मी अशा एका व्यक्तीला पाहिले ज्याला आपली मान वळविण्यासाठी शरिराला त्या दिशेने वळवावे लागत असे मात्र ११ व्या दिवशी म्हणजे शिबीर संपल्यावर ती व्यक्ती सहजपणे मान वळवु शकत होती. विपश्यने मध्ये आपले मन एकाग्र करुन आपले संपुर्ण शरिर स्कॅन करण्यावर व आपल्या अंतर्मनाने वेळोवेळी आपल्या नकळत ज्या.घटना नोद करुन ठेवल्या असतात त्या वेदनेच्या स्वरुपात प्रगट होतात त्या साक्षी भावाने अनुभवित त्या नाहिश्या करण्याचा अभ्यास करवला जातो. आपल्या ५० टक्के शारिरीक व्याधी या मानसीक कारणाने असतात आणि त्या या ध्यान प्रकाराने नाहिश्या होतात असा विशवास असतो आणि स्वानुभवाने आपणास त्याची ११ व्या दिवशी जाणिव होते. माझ्या स्वानुभवाने मी निश्चीत पणे हे सांगु शकतो की या ध्यान प्रकाराने लिपिड प्रोफाईल चे बरेच असंतुलन संतुलीत होण्यास मदत होते. रागावर बर्यापैकी नियंत्रण होते आणी पर्यायाने रक्त दाब देखील नियंत्रीत होतो.
सारांश- मनाचे विकार हे सभोवतालची परिस्थीती मुळे होतात आणी मनावर ताबा टेवण्याये तंत्र हे विपश्यना ध्यानाने साध्य होते.
विश्वास कल्याणकर
विज्ञान, अज्ञान व अंतरज्ञान
माझी द्त्तगुरुंवर् श्रद्धा असल्याकारणाने मी गाणगापुर ला जात असतो. सर्वप्रथम मी गाणगापुर ला गेलो तेंव्हा तेथील सभामंडप जो २० फुट उंच असावा व जो अनेक लोखंडी पाईप च्या आधारे उभारलेला आहे त्यावर आरतीच्या वेळी अनेक बायका विभीन्न वयांच्या व आकाराच्या त्या पाईप च्या आधारे छतापर्यंत बेभानपणे चढत व उतरत असलेल्या मी पाहील्या आहेत. मानसिक रुंग्ण तिथे बरे होतात अशी श्रद्धा असल्याने कुटुंबीय आपल्या मानसिक रुंग्ण व्यक्तींना तिथे आणतात. आणि आरतिच्या वेळी ह्या व्यक्ती बेभान होतात आणि वर चढतात. सामान्य माणसाला ही कसरत नक्कीच अवघड असणारी पण स्त्रिया सहजपणे करतांना आढळतात. तेथील वातावरणाचा परिणाम व भक्तांची श्रद्धा हे याचे कारण असेल काय?
मी विपश्यनेचे १० दिवसीय ४ शिबीरे इगतपुरी येथे केले आहे. मला त्याचा निश्चीत च फायदा झाला. माझ्या पहिल्या शिबीराच्या वेळी पहिल्या दिवशी मी अशा एका व्यक्तीला पाहिले ज्याला आपली मान वळविण्यासाठी शरिराला त्या दिशेने वळवावे लागत असे मात्र ११ व्या दिवशी म्हणजे शिबीर संपल्यावर ती व्यक्ती सहजपणे मान वळवु शकत होती. विपश्यने मध्ये आपले मन एकाग्र करुन आपले संपुर्ण शरिर स्कॅन करण्यावर व आपल्या अंतर्मनाने वेळोवेळी आपल्या नकळत ज्या.घटना नोद करुन ठेवल्या असतात त्या वेदनेच्या स्वरुपात प्रगट होतात त्या साक्षी भावाने अनुभवित त्या नाहिश्या करण्याचा अभ्यास करवला जातो. आपल्या ५० टक्के शारिरीक व्याधी या मानसीक कारणाने असतात आणि त्या या ध्यान प्रकाराने नाहिश्या होतात असा विशवास असतो आणि स्वानुभवाने आपणास त्याची ११ व्या दिवशी जाणिव होते. माझ्या स्वानुभवाने मी निश्चीत पणे हे सांगु शकतो की या ध्यान प्रकाराने लिपिड प्रोफाईल चे बरेच असंतुलन संतुलीत होण्यास मदत होते. रागावर बर्यापैकी नियंत्रण होते आणी पर्यायाने रक्त दाब देखील नियंत्रीत होतो.
सारांश- मनाचे विकार हे सभोवतालची परिस्थीती मुळे होतात आणी मनावर ताबा टेवण्याये तंत्र हे विपश्यना ध्यानाने साध्य होते.
विश्वास कल्याणकर
मन आणि शरीर
मन आणि शरीर या दोघांचे काय नाते आहे, मन नक्की कुठे असते, कसे असते आणि ते कशा प्रकारे काम करते वगैरेबद्दल फारच थोडी माहिती शरीरशास्त्राद्वारे समजलेली आहे. मानसशास्त्र हे एक वेगळे शास्त्र निर्माण झाले आहे आणि ते सुद्धा विज्ञानाचाच एक भाग आहे. मनातील तीव्र भावना शारीरिक बळ वाढवतात किंवा कमी करतात हा अनुभव आपल्यातल्या प्रत्येकालाच येत असतो. विपश्यना, सुदर्शनक्रिया, सहजयोग वगैरे अनेक प्रकारच्या योगसाधनेने शरीराच्या क्रियेवर चांगला परिणाम होतो असा अनुभव अनेक लोकांना आलेला आहे. त्यांचे अस्तित्व कोणी नाकारू शकत नाही. ते नेमके ससे घडते हे कदाचित सध्या माहीत असलेल्या शरीरविज्ञानातून स्पष्ट करता येणार नाही. त्या क्षेत्रातल्या शब्दसंचयातून ते व्यक्त केले गेले तर त्याला कोणाचाच विरोध असायचे कारण नाही.
पण विज्ञानातील 'व्हायब्रेशन्स' , 'एनर्जी ' यासारख्या विशिष्ट व्याख्या असलेल्या शब्दांचा सैलसर उपयोग करून त्यातून विज्ञानाबाहेरच्या संकल्पना मांडल्या गेल्यामुळे त्या वैज्ञानिक आधारावर उभ्या आहेत असे लोकांना वाटले तर ते धोकादायक आहे. ही गोष्ट मला या लेखातून मांडायची आहे.
साशंक
मानसशास्त्र हे एक वेगळे शास्त्र निर्माण झाले आहे आणि ते सुद्धा विज्ञानाचाच एक भाग आहे.
याबद्दल साशंक आहे. उदा, क्लिनिकल सायकोथेरपीमधील फ्रॉइडचे सिद्धांत कुठल्याही प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाहीत. (उदा. ओडिपस कॉम्प्लेक्स किंवा ट्रान्सफरन्स) तसेच, त्यांच्या सहाय्याने केलेली भाकितेही तंतोतंत खरी ठरतीलच असा विश्वास देता येत नाही. बरेचदा रूग्ण बरा होईल किंवा नाही याचीही शाश्वती देता येत नाही.
अधिक माहिती इथे. (या दुव्यातील माहिती मानसोपचारांच्या सरळसरळ विरोधातच आहे असे वाटते. लेखातील टोनशी मी सहमत नाही. मानसोपचारांचा निश्चितच उपयोग होतो. फक्त शास्त्राच्या कसोट्यांवर मानसोपचारशास्त्र कितपत खरे ठरू शकते हाच मुद्दा आहे.)
----
"And you shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32