फ्लोजिस्टॉन सिद्धांत (विज्ञानाच्या विचारसरणीबाबत एक बोधप्रद इतिहास)

काही कल्पना अशा असतात, की त्या विज्ञानात वापराव्या लागतात, पण त्यांचे थेट मोजमाप करता येत नाही. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही. दुसर्‍या कसलेतरी मोजमाप केले जाते, आणि त्या विशिष्ट संकल्पनेबद्दल अनुमान केले जाते. या अनुमानित संकल्पना जरूर वापराव्यात, पण त्यांच्या अस्तित्वाबद्दल जिज्ञासूने काही प्रमाणात शंका जागृत ठेवावी.

हे समजण्यासाठी रसायनशास्त्रातील ज्वलनाच्या "फ्लोजिस्टॉन सिद्धांता"चा इतिहास वाचणे उपयोगी ठरावे. पदार्थांच्या ज्वलनाचे निरीक्षण करता काही रसायनशास्त्रज्ञांनी फ्लोजिस्टॉन नावाच्या पदार्थाचे अनुमान केले. साधारण शंभर-एक वर्षे (साधारण १६७०-१७७० काळ) रसायनशास्त्रात हा पदार्थ अस्तित्वात होता. नायट्रोजनचा शोध लावणारा डॅनियल रदरफोर्ड, ऑक्सिजनचा शोध लावणारा जोसेफ प्रीस्टले - यांच्यासारखे कुशल रसायनशास्त्रज्ञ असा कुठला पदार्थ खरोखर असल्याचे मानत.

पुढे त्यावेगळे अनुमान केले जाऊ शकते असे दिसून आले. फ्लोजिस्टॉन नावाचा पदार्थ आजकाल शाळेतल्या रसायनशास्त्रात शिकवला जात नाही (हे योग्यच आहे). पण वैज्ञानिक विचारसरणी कशी असावी, याबाबत ऐतिहासिक बोधकथा म्हणून ही वाचण्यासारखी आहे. विकिपीडिया मधील "फ्लोजिस्टॉन सिद्धांता"चे भाषांतर (थोडे बदलून) येथे देत आहे.

-------
फ्लोजिस्टॉन सिद्धांत

फ्लोजिस्टॉन हा शब्द "ज्वलन/अग्नि" अर्थाच्या ग्रीक शब्दांपासून येतो. योहान योखीम बेखेर याने १६६७मध्ये हा वैज्ञानिक सिद्धांत प्रथम सांगितला. त्याचे प्रतिपादन होते, की ग्रीकांच्या मूळ चार महाभूतांच्या (मूलद्रव्यांच्या) बरोबर आगीसारखे एक "फ्लोजिस्टॉन" नावाचे महाभूत (मूलद्रव्य) आहे. हे मूलद्रव्य ज्वलनशील पदार्थांत आढळते, आणि ज्वलन होत असताना त्यांच्यातून बाहेर पडते. या सिद्धांताने ज्वलन आणि गंजणे (ज्यांना आज आपण ऑक्सिडेशन म्हणतो) या प्रक्रियांचे स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न झाला.

संक्षिप्त इतिहास :
सन १६६७मध्ये योहान योखीम बेखेर याचे "फिझिकल एज्युकेशन" प्रसिद्ध झाले. त्यात फ्लोजिस्टॉन सिद्धांताचा प्रथम उल्लेख झाला. पूर्वीचे आल्केमी-रसायशास्त्रज्ञ चार महाभूते (मूलद्रव्ये) मानत : पृथ्वी, आप, तेज, आणि वायू. पुस्तकात बेखेर याने तेज आणि वायू यांना रद्द केले, आणि त्यांच्याऐवजी तीन वेगळ्या प्रकारची पृथ्वी-द्रव्ये असल्याचे सांगितले : पाषाणमय-पृथ्वी, द्रवमय-पृथ्वी, आणि घृतमय-पृथ्वी.

बेखेरच्या सिद्धांताप्रमाणे, वस्तूत पाषाणमय-पृथ्वीचा जितका अंश होता, तो उष्णतेमुळे (न जळता) वितळतो-पुन्हा घट्ट होतो. द्रवमय-पृथ्वीच्या अंशामुळे द्रवपणा, तलमपणा, बाष्पीभूत होऊन उडण्याचा गुण, आणि धातूंसारखे गुण प्राप्त होतात. घृतमय-पृथ्वीच्या अंशामुळे तेलकट, सल्फर-सारखे, आणि ज्वलनशीलतेचे गुण प्राप्त होतात. बेखेरचा विश्वास होता की घृतमय-पृथ्वी ही ज्वलनाचे वैशिष्ट्य होते, आणि ज्वलनशील वस्तू जळते तेव्हा हा पदार्थ त्यातून बाहेर पडतो.

ग्योर्ग एर्न्स्ट स्टाल या जर्मन रसायनशास्त्रज्ञाने बेखेरचा सिद्धांतात प्रगती केली. याबाबतीत १७०३-१७३१ काळात अनेक लेख प्रकाशित केले. सन १७१८ मध्ये स्टाल याने घृतमय-पृथ्वीचे "फ्लोजिस्टॉन" असे पुनर्नामकरण केले. हे नाव ग्रीक भाषेतील ज्वलन/ज्वलंत शब्दापासून आले. पदार्थ जळले, किंवा भट्टीत (चुन्यासारखे) भाजले, तर त्यात होणार्‍या बदलांमध्ये फ्लोजिस्टॉनचा काय भाग होता, त्याचे स्टालने विश्लेषण केले.

सिद्धांत :
या सिद्धांताप्रमाणे सर्व ज्वलनशील पदार्थांत फ्लोजिस्टॉनचा अंश असतो. या फ्लोजिस्टॉनला रंग, गंध, चव, किंवा वस्तुमान नसते. जळणार्‍या वस्तूतून तो बाहेर पडतो. जळलेला पदार्थ "फ्लोजिस्टॉन-विरहित" असतो, त्याचा (फ्लोजिस्टॉन-विरहित) मूळ आकार असतो - म्हणजे त्याची राख/चुना/गंज होय.

"फ्लोजिस्टॉन-असलेले" पदार्थ जळून "फ्लोजिस्टॉन-विरहित" होतात. जे पदार्थ हवेत जळू शकतात त्यांच्यात फ्लोजिस्टॉन मोठ्या प्रमाणात असतो. बंद जागेत पदार्थ लवकरच जळायचा थांबतो, यावरून हे स्पष्ट अनुमान काढता येते, की हवेत फ्लोजिस्टॉन मर्यादित प्रमाणातच मावू शकतो. हवा फ्लोजिस्टॉनने (मावू शकेल तितकी) पूर्ण भरली की त्या हवेत वस्तू जळू शकत नाही. अशा हवेत धातू भट्टीतल्यासारखा तापवला, तरी तो गंजत नाही, किंवा त्याचा चुना/राख होत नाही. फ्लोजिस्टॉन-भरलेल्या हवेत जीव तगू शकत नाही, कारण हवेचे काम श्वासोच्छ्वासावाटे फ्लोजिस्टॉनचा निचरा करणे होय. (आपण आज म्हणू की फ्लोजिस्टॉनचे गुणधर्म ऑक्सिजनच्या गुणधर्माच्या ठीक विरुद्ध होते.)

जोसेफ ब्लॅक याचा शिष्य डॅनियल रदरफोर्ड याने सन १७७२मध्ये नायट्रोजनचा शोध लावला. तेव्हा गुरुशिष्यांनी त्यांच्या प्रयोगाचे स्पष्टीकरण हा सिद्धांत वापरून केले. ज्यात संपूर्ण ज्वलन झालेले आहे अशी हवा फ्लोजिस्टॉनने पुरेपूर भरली असते. (आज ज्याला आपण म्हणू - नायट्रोजन आणि कार्बन डायॉक्साइडचे मिश्रण असते.) त्या हवेला "फ्लोजिस्टॉन-पूर्ण हवा" असे म्हटले जाई. त्याच प्रकारे (जोसेफ प्रीस्टले याने) ज्याला आज आपण ऑक्सिजन म्हणतो त्या वायूचा शोध लावला. त्याला "फ्लोजिस्टॉन-विरहित हवा" असे नाव दिले. कारण त्यात साध्या हवेपेक्षा अधिक फ्लोजिस्टॉन मावू शकतो, आणि साध्या हवेपेक्षा त्याच्यामध्ये ज्वलन अधिक काळापर्यंत चालू शकते.

सिद्धांतास आह्वान आणि सिद्धांत संपुष्टात येणे :
कालांतराने, मोजमाप केलेल्या प्रयोगांमध्ये काही प्रश्न उद्भवले. मॅग्निशियम धातू जळतो, तेव्हा फ्लोजिस्टॉन त्यातून मुक्त होतो - तरी त्याचा चुना (राख) वस्तुमानाने अधिक असते. रॉबर्ट बॉइल याने म्हटले, की उष्णतेमुळे वस्तुमान वाढणे हा धातूंचा गुणधर्मच आहे. पण सन १७५३ मध्ये मिखाइल लोमोनोसोव्हने प्रयोग करून स्वतःसाठी असा निष्कर्ष काढला, की फ्लोजिस्टॉन सिद्धांत खोटा होता. त्याने आपल्या दैनंदिनीत लिहिले : "आज हवाबंद बरणीत धातू गरम करण्याचा प्रयोग केला. हे बघायचे होते की बाहेरून हवा मिळाली नाही, तर धातूंचे वस्तुमान शुद्ध उष्णतेच्या प्रक्रियेमुळे वाढते काय? प्रयोगातून दिसले की प्रसिद्ध रॉबर बॉइल यांना भ्रम झाला होता. बाहेरून हवा मिळत नसली तर जळलेल्या धातूचे वस्तुमान आधीइतकेच राहाते."

फ्लोजिस्टॉनवाद्यांपैकी काहींनी असे स्पष्टीकरण सांगितले की फ्लोजिस्टॉनला ऋण-वस्तुमान असते. काहींनी त्यामानाने साधे स्पष्टीकरण दिले - फ्लोजिस्टॉन हा हवेपेक्षा हलका आहे. पण याचे आर्किमिडीसच्या तत्त्वानुसार काळजीपूर्वक गणीत करता येते. मॅग्नीशियमचे विशिष्ट गुरुत्व, आणि त्याच्या राखेचे विशिष्ट गुरुत्व लक्षात घेतले, तर "हवेपेक्षा हलका फ्लोजिस्टॉन" मानून हिशोब लागत नाही.

तरी सुद्धा फ्लोजिस्टॉन सिद्धांत हाच प्रमुख सिद्धांत राहिला. मात्र पुढे आंत्वान-लोराँ लावोआझिए याने दाखवले की ज्वलनासाठी एक वायू लागतो, त्याला वस्तुमान असते. (त्या वायूला आपण ऑक्सिजन म्हणतो, प्रीस्टले "फ्लोजिस्टॉन-विरहित हवा" म्हणे). वायूचे वस्तुमान हवाबंद पात्रांमध्ये मोजता येते. त्याआधीचे प्रयोग उघड्या पात्रांमध्ये करत. ज्वलनातून निर्माण होणारे जे वायू उडून जात, त्यांचा हिशोब लावता येत नसे. या नव्या हवाबंद निरीक्षणांतून जुना "वस्तुमानाच्या हिशोबातला विरोधाभास" नाहिसा झाला.

काही हद्दीत आपण असे म्हणू शकतो की फ्लोजिस्टॉन सिद्धांत हा आधुनिक ऑक्सिजन सिद्धांताच्या नेमका उलट होता. फ्लोजिस्टॉन सिद्धांतात ज्वलनशील पदार्थांत फ्लोजिस्टॉन असतो, जळताना तो हवेत मुक्त होतो, उर्वरित "फ्लोजिस्टॉन-विरहित" शुद्ध पदार्थ खाली राहातो. आधुनिक सिद्धांतात ज्वलनशील पदार्थ (आणि न गंजलेले धातू) "ऑक्सिजन-विरहित" असतात तेव्हा शुद्ध असतात, आणि जळतात तेव्हा ऑक्सिजनशी संयुक्त होतात. फ्लोजिस्टॉन मानायचा तर गडबड होते. एकीकडे फ्लोजिस्टॉनला एक तर धन वस्तुमान आहे असे मानावे लागते. (कारण अनेक वस्तूंची राख मूळ वस्तूपेक्षा कमी वस्तुमानाची असते, फ्लोजिस्टॉन उडाला त्यातला...). दुसरीकडे फ्लोजिस्टॉनचे वस्तुमान शून्य/ऋण मानावे लागते. (कारण गंजलेल्या धातूच्या तुकड्याचे वस्तुमान न गंजलेल्या धातूच्या तुकड्यापेक्षा अधिक असते, ऋण वस्तुमानाचा फ्लोजिस्टॉन उडून गेला त्यातला...) आहे तरी काय या फ्लोजिस्टॉनचे वस्तुमान धन की ऋण? - या अंतर्गत विरोधामुळे फ्लोजिस्टॉन सिद्धांत बाजूला सारणे भाग पडते. ऑक्सिजन सिद्धांतात मात्र हा विरोधाभास नाही.

-----------------------------------
टीप : फ्लोजिस्टॉन सिद्धांताने कितीतरी काळ प्रयोगांचे जमेल तितके उत्तम वर्णन होत होते. त्या काळच्या प्रयोगांत वायूमय पदार्थांच्या वजनाचा हिशोब नीट केला जाऊ शकत नसे. पण घन पदार्थांचा हिशोब नीट केला जाऊ शके. त्यामुळे जरी फ्लोजिस्टॉनचे थेट मोजमाप करता येत नसले, तरी उरलेल्या वस्तूंचे मोजमाप करून फ्लोजिस्टॉनचे अनुमान बर्‍यापैकी स्पष्टपणे करता येत होते. आधुनिक प्रयोगशाळेतले प्रयोग त्या काळातल्या प्रयोगांपेक्षा वायूंचा हिशोब ठेवण्यात सुधारले आहेत. पण भविष्यात असे म्हटले जाऊ शकेल की आजच्या आपल्या प्रयोगशाळांतले प्रयोगही कुठल्यातरी बाबतीत हिशोब ठेवण्यात कमी पडत असावेत. जोवर त्या त्या काळातल्या निरीक्षणांचे बर्‍यापैकी स्पष्टीकरण मिळत आहे, तोवर थेट न मोजल्या जाणार्‍या अनुमानित पदार्थांचा विचार जरूर करावा. फ्लोजिस्टॉन विचारात ठेवून रदरफोर्ड आणि प्रीस्टले यांनी खूपच मोठी मजल मारली, त्यांना दोष देण्याचे माझ्यासारख्या रसायनशास्त्रात "ढ" माणसाचे काम नाही. पण फ्लोजिस्टॉनसारखा अनुमानित पदार्थ विचारात घेताना "तो खरा असेल किंवा नसेल" अशीच कल्पना असणे सुज्ञ. त्याच प्रकारे, आजच्या वैज्ञानिक संकल्पनेत असे काही "पदार्थ/संकल्पना" आहेत, जे थेट मोजता येत नाहीत. केवळ अनुमानित करता येतात. ते पदार्थ, त्या संकल्पना "असतील किंवा नसतील" असे साशंकता मनात ठेवणेच सुज्ञ.

Comments

वा

वा!
लेख आवडला. मुख्य म्हणजे कळलाही!

आपला
गुंडोपंत

छान लेख

फ्लोजिस्टॉनचा इतिहास वाचला आणि तो आवडलाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख

आवडला. फ्लोजिस्टॉन ही बरीचशी इथरसारखी संकल्पना वाटली. बाकी जिथे बुद्धी किंवा तर्कशास्त्र खुंटतं, तिथे सामान्य माणसे परमेश्वर किंवा त्याची लीला त्यामागचे कारण आहे असे समजून चालतात. त्याने प्रश्न सुटत जरी नसले तरी बुद्धीला भेडसावत तरी राहत नाहीत. फ्लोजिस्टॉन काय किंवा इथर काय, हेही या एका अर्थी परमेश्वरासारखेच - खरे काय ते कळेपर्यंत कामचलाऊ/स्टॉप-गॅप ऍरेंजमेंट म्हणता येईल, असा विचार डोक्यात ये़ऊन गेला. खासकरून या वाक्यावरून - "या अनुमानित संकल्पना जरूर वापराव्यात, पण त्यांच्या अस्तित्वाबद्दल जिज्ञासूने काही प्रमाणात शंका जागृत ठेवावी. " [विषयांतर वाटल्यास क्षमस्व.]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ईथर=आकाश : २००० वर्षे टिकाऊ कल्पना

बरोबर आहे. ईथर त्या संकल्पनांपैकीच.

एखादी वस्तू (म्हणजे आपला हात वगैरे) हलताना अडणे, हेच स्पर्शेंद्रियाला जाणवू शकते. हात त्या दिशेने सारण्याआधी हाताच्या आणि त्या वस्तूच्या दरम्यान काही असले पाहिजे हे गृहीतक. त्या संकल्पनेचे आकाश हे नामकरण. मग या आकाशात लहरी उठतात, वगैरे, विचार.

सुरुवातीपासूनच "आकाश" कल्पना अनावश्यक/अनुमानित आहे असा संशय ठेवला तर बरे असते. मग लहरींचा वेग निरपेक्ष असल्याचे निरीक्षण झेलता येते. "आकाश" संकल्पना सहज मनातून दूर करता येते.

लेख आवडला

आजच्या वैज्ञानिक संकल्पनेत असे काही "पदार्थ/संकल्पना" आहेत, जे थेट मोजता येत नाहीत. केवळ अनुमानित करता येतात. ते पदार्थ, त्या संकल्पना "असतील किंवा नसतील" असे साशंकता मनात ठेवणेच सुज्ञ.

हम्म! :-)

अवांतरः
सहज आठवले म्हणून -

जळलेला पदार्थ "फ्लोजिस्टॉन-विरहित" असतो, त्याचा (फ्लोजिस्टॉन-विरहित) मूळ आकार असतो - म्हणजे त्याची राख/चुना/गंज होय.

आणि एक - कोळसा. यावरून असं आठवलं की मोजेसला एक दिवस जळणारं झाड दिसलं. झाड जळत होतं पण जसंच्या तसं उभं होतं. त्याची राख होत नव्हती, आकार बदलत नव्हता. आग त्याला खाऊ शकत नव्हती. मोजेस कुतुहलाने झाडाजवळ गेला आणि त्या झाडातून साक्षात् परमेश्वराचे दर्शन झाले आणि ईश्वर त्याच्याशी बोलू लागला असा उल्लेख एक्झोडसमध्ये आहे.
आजच्या तज्ज्ञांच्या मते याचे कारण ज्या विशिष्ट झुडुपांचा कोळसा होतो ती संपूर्ण जळाली तरी कोळसा होऊन मूळ आकारात उभी राहतात. (शिंपल!) ;-)

कोळसा म्हणजे जवळजवळ शुद्ध फ्लोजिस्टॉन

कोळसा उघड्या शेगडीत पूर्ण जळतो, तेव्हा चिमूटभर अंगारा सोडून बाकी सर्व भाग नाहिसा होतो - तोच उडून गेलेला फ्लोजिस्टॉन.

(मोजेसने आपल्या साथीदारांसाठी अंगारा आणला की नाही हे ठाऊक नाही...)

सुंदर विवेचन

फ्लॉजिस्टॉन विषयी छान माहीती सांगीतलीत. मीर प्रकाशनाच्या "रासायनीक मुलद्रव्यांचा शोध" या पुस्तकात हायड्रोज, ऑक्सीजन आणि नायट्रोजन च्या शोधाचे विवेचन करताना फ्लॉजिस्टॉन विषयी जवळ जवळ समग्र माहीती मिळते.

सुरेख

सुरेख लेख. शेवटचा परिच्छेद पूर्णपणे पटला. विज्ञानाचा इतिहास पाहिल्यास अशाच संकल्पनांमधून प्रगती झाल्याचे जाणवते. नंदनने दिलेले इथरचे उदा. याच प्रकारचे आहे.

यासंदर्भात नुकतेच केऑस हे पुस्तक वाचण्यात आले. सुरूवातीला या शास्त्राच्या शाखेला 'स्यूडोसायन्स आहे' असे म्हणून प्रखर विरोध झाला. नंतर हळूहळू यातील सिद्धांतांना मान्यता मिळाली. हे सर्व कसे झाले हा इतिहास रोचक आणि वाचण्याजोगा आहे.

----

श्राद्ध

मला वाटते की काही लोकांना वैज्ञानिक तर्कशुद्धतेचा या कारणासाठी राग आहे -
बाप नाही दाखवला तर हे वैज्ञानिक लोक मला श्राद्ध करायला लावतील.
पण हे वैमनस्य एका गैरसमजुतीतून आलेले आहे.

त्या मानाने वैज्ञानिक तर्कशुद्धपणा खूपच सौम्य आहे, आणि नेमका उलट आहे :
बाप दिसत नसेल तर श्राद्ध कर/करू नकोस याबद्दल यत्किंचित लक्ष देणार नाहीत.
(उलट दिशेने मात्र भलताच कडक आहे):
बाप दिसला तर श्राद्ध बंद पाडतील!

"आहे त्यावेगळे अधिक पटण्यासारखे स्पष्टीकरण सापडेल का?" हे कुतूहल वैज्ञानिक विचारसरणीला खतपाणी घालते, याबाबत सहमत.

लेख आवडला.

विज्ञानाच्या आजच्या टप्प्यावरचे (वेगवेगळ्या) क्षेत्रातले फ्लॉजिस्टोन कायकाय आहेत हे जाणून घ्यायला आवडेल.

एड्स्, कॅन्सर यासारख्या गोष्टींबद्दल (टीबी सारख्या इतर रोगांइतपत ) संपूर्ण माहिती जैवविज्ञानात उपलब्ध नाही एवढे मला ढोबळमानाने माहिती आहे. या क्षेत्रात काही "फ्लॉजिस्टोन्" आहेत का ?

हा विचार खूप थोडे डॉक्टर करतात

आणि वैद्यकातल्या संकल्पना तर फारच कामचलाऊ असतात.

"रोग म्हणजे काय" हा मूलभूत प्रश्न.
तसेच
"कॅन्सर हा एक रोग आहे का?" हा प्रश्न आहे. पण अनेक लोक (डॉक्टरही) तो एक रोग असल्याचे मानतात.

सर्वच शास्त्रांत अनेक संकल्पना फ्लोजिस्टॉन आहेत. पण वैद्यकशास्त्रात खास की बहुतेक संकल्पना छोट्या मुदतीचे (त्या छोट्या मुदतीत वेगवेगळ्या टप्प्यातले) फ्लोजिस्टॉन आहेत.

लेख अत्यंत आवडला

वा! लेख अत्यंत आवडला.. भाषा, मांडणी आणि विषय एकदम बेष्ट!
असे फ्लोजिस्टॉन सगळीकडे आहेत हेही पटले.

मी ही मीर प्रकाशनाच्या "रासायनीक मुलद्रव्यांचा शोध" चा उल्लेख करणारच होतो पण वर तो आलाच आहे.

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

सुंदर लेख

विषयाची मांडणी, विस्तार आणि निष्कर्ष सगळेच चांगले आहे.
आजच्या वैज्ञानिक संकल्पनेत असे काही "पदार्थ/संकल्पना" आहेत, जे थेट मोजता येत नाहीत. केवळ अनुमानित करता येतात. ते पदार्थ, त्या संकल्पना "असतील किंवा नसतील" असे साशंकता मनात ठेवणेच सुज्ञ.
हे फक्त विज्ञानाच्याच बाबतीत नाही . इतर कांही शास्त्रांच्या बाबतीत जास्तच आवश्यक आहे.
»

प्रकाटाआ

दोन वेळा आल्यामुळे हा प्रतिसाद काढला आहे.

उपयुक्त

जे पदार्थ पाहिले नाहीत त्याबद्दल शंका असणे उपयुक्त.
तत्कालिन वैज्ञानिकांनी ही शंका उपस्थित केली असती तर विज्ञानाची प्रगती जास्त अधिक वेगाने झाली असती, कदाचित.

प्रगतीतील एक मधली स्थिती

फ्लोजिस्टॉनच्या बाबतीत त्या मानाने रसायनशास्त्र सुदैवी होते. केवळ १०० वर्षेच ही कल्पना टिकून राहिली (म्हणजे वैज्ञानिकांच्या २-३ पिढ्याच म्हणू.) त्या काळात कित्येक वर्षे या कल्पनेने विचारांना आणि प्रयोगांना खतपाणी दिले. "गंजणे" आणि "ज्वाळा लागून जळणे" या दोन्ही क्रियांचा एकत्र विचार करायला चालना मिळाली. तसे करता-करता एक-दोन मूलद्रव्यांचे शोध लागले. आणि त्याची गणिते चुकत आहेत असे कळू लागल्यानंतर एका पिढीत ती कल्पना कालातीत झाली. (ती कल्पना बाजूला सारायला विरोध फक्त एका पिढीपुरताच होता.)

त्या मानाने वर नंदन यांनी उल्लेखलेली "आकाश-महाभूत/मूल-अद्रव्य" ही कल्पना घेऊ. तिने सुद्धा सुरुवातीला विचारांत प्रगती करण्यास मदत केली.

(१) ज्यातून ध्वनी पसरतो ते आकाश, आणि (२) जिथे काहीच द्रव्य/पदार्थ नाही, ती पोकळी म्हणजे आकाश. असा सुरुवातीला विचारांना धुमारा फुटला.

पण त्यानंतर हजार-दीड हजार वर्षे ती कल्पना आडथळा होऊन बसली. उदाहरणार्थ : या अनुमानित "आकाश"संकल्पनेमुळे "पूर्ण-घन-वस्तू असू शकते/शकत नाही" ही असली व्याज अनुमाने निघू लागली (अणु-वाद, भाग ३, मध्ये उदाहरण दिले आहे.) अशा बाबतीत आकाश संकल्पनेने निरीक्षणशक्तीला कमजोर केले, असे मानावे लागेल. आधुनिक विज्ञानात आकाश-कल्पनेने केलेला घोटाळा नंदन यांनी दिलेल्या विकी-दुव्यावर वाचता येईल.

मुळात कल्पना अनुमानित करण्यात काही दोष नाही - फक्त त्यांच्याबाबत नि:शंक झालो, तर विज्ञान खुंटते.

सिद्धान्त खरा केव्हा ठरतो?

लेख आवडला, धनंजयांना शोभेलसा आहे.
अवांतरः
एके ठिकाणी असे वाचले -
दोन परस्परविरोधी सिद्धान्तांपैकी एक खरा केव्हा ठरतो? तर दुसर्‍यावर विश्वास ठेवणारे सगळे लोक मरून जातील तेव्हा!
(अतिरेकी व आचरटच शेरा आहे पण कदाचित् त्यात एखादा सत्याचा कण असू शकेल.)
- दिगम्भा

उत्तम लेख

धनंजय.
नेहमी प्रमाणेच सरस लेख. फारच छान.

"फ्लोजिस्टॉन-असलेले" पदार्थ जळून "फ्लोजिस्टॉन-विरहित" होतात. जे पदार्थ हवेत जळू शकतात त्यांच्यात फ्लोजिस्टॉन मोठ्या प्रमाणात असतो. बंद जागेत पदार्थ लवकरच जळायचा थांबतो, यावरून हे स्पष्ट अनुमान काढता येते, की हवेत फ्लोजिस्टॉन मर्यादित प्रमाणातच मावू शकतो. हवा फ्लोजिस्टॉनने (मावू शकेल तितकी) पूर्ण भरली की त्या हवेत वस्तू जळू शकत नाही.
हे अनुमान फारच रोचक आणि छान वाटले. लहानपणापासून सध्या प्रचलित असलेल्या गोष्टी सत्य आहेत असे आपल्या मनावर बिंबवले जाते आणि आपले विचार त्याच साच्यात अडकून पडतात. वेगळे विचार करायची क्षमता कमी होउन मेंदू साचेबद्ध (कंडिशन्ड) होत जातो याचा प्रत्यय आला. चांगले वैद्न्यानिक या तर्‍हेच्या साचेबद्धतेपासून मुक्त राहू शकतात याचे कौतूक वाटते.
--लिखाळ.

 
^ वर