आता हवेवर

आता हवेवर
" उगाच इकडे तिकडे फिरायला गाडी काय हवेवर चालते काय रे?"
असा प्रश्न पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे हमखास ऐकु येतो. या प्रश्नाचे उत्तर आता,
"हो! गाडी हवेवरच चालते" असे मिळू शकेल.
या गाड्यांची इंजिने मात्र ही दाब असलेली हवा, म्हणजेच काँप्रेस्ड हवेवर चालणारी इंजिने आहेत.

हवेच्या दाबावर इंजिने चालवणे तसे नवे नाही.
याची सुरुवात अगदी दोन शतके आधीच झाली आहे. युरोपात ट्रॅम्स आणि रेल्वेसुद्धा यावर चालवली गेली आहे.

मात्र तरी सहज मिळणार्‍या पेट्रोल पुढे ही इंजिने तशी दुर्लक्षीतच राहिली. कारण उच्च दाबाची हवा ही पेट्रोलपेक्षाही महागडी ठरत होती. मात्र ही स्थिती आता बदलते आहे.

आता मात्र पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे अनेक मोटार कंपन्यांचा यातला रस वाढला आहे. सध्या फ्रांस मधल्या एम डी आय या कंपनीच्या एयर कारच्या शोधामध्ये टाटांनी रस घेतला आहे आणि त्यांच्याशी करारही केला आहे. हे इंजिंन अतिउच्च दाबाची हवा वापरते. इंजिन चालविण्यासाठी पेट्रोलचा स्फोट घडवून पिस्टनचा दट्ट्या फिरवण्या ऐवजी, दाब असलेली हवा सोडून पिस्टनचा दट्ट्या फिरवायचा अशी साधी सोपी रचना आहे.
या रचनेमुळे सध्याच्या इंजिनात असलेले अनेक घटक जसे कार्ब्युरेटर वगरे निरुपयोगी ठरतील. स्पार्क प्लग्जच्या जागी सोलोनॉइड वॉल्व बसवता येतील आणि टायमींग मात्र असलेल्या प्रणालीचेच वापरून हवेचे नियंत्रण होईल. अर्थातच थोडे फार फेरफार करून आजच्या काळातल्या अनेक गाड्या यावर चालू शकतील. आणि म्हणूनच टाटांना या इंजिनात रस आहे. मात्र त्यासाठी हवेचा दाब उच्च असणे फार आवश्यक आहे. आणि इतक्या उच्च दाबाची हवा असलेली टाकी एखाद्या अपघातात फुटली तर आपल्या चिंध्याही सापडणे अवघड. मात्र आता कार्बन फायबर आणि धातू या अतिशय चिवट मिश्रण असलेल्या टा़क्या बनवून या फ्रांस च्या संशोधक कंपनीने हा प्रश्न सोडवला आहे. शिवाय या दुहेरी आवरणाच्याही असणार आहेत.

याच वेळी ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न मध्ये असलेल्या एका एंजेलो दि पिएत्रो नावाच्या संशोधकानेही हवेवर चालणारी वाहने बनवली आहेत. मात्र या संशोधकाचे इंजिन हे वेगळेच, रोटरी प्रकारचे आहे. म्हणजे वँकेल या जर्मन संशोधकाने १०५०-५७ साली बनवलेल्या इंजिनावर आधारीत हे हवेवर चालणारे इंजिन आहे. या मध्ये घर्षण अगदी नगण्य आहे. आणि त्यामुळे हवेचा परिपुर्ण वापर करून घेतला गेला आहे असा दावा केला गेला आहे. शिवाय याचे वजन फक्त १२ किलो आहे.
या इंजिनाचे ऍनिमेशन येथे कंपनीच्या संकेत स्थळावर बघायला मिळू शकेल.

तसेच यु ट्यूबवर असलेल्या या खाली दिलेल्या व्हिडियो मध्ये वरच्या दोन्ही इंजिनांचा वापरही पाहता येईल.

भारतातल्या शहरी वाहतुकीसाठी हे फार उपयोगी ठरावे. कारण एंजेलो दि पिएत्रो चे इंजिन चालण्यासाठी अति उच्च दाबाची गरज नाहीये. त्याच्या साईटवर तर असा दावा आहे की फक्त १ पिएसआय इतक्या दाबावरही हजिंजिन फिरू लागते. आणि एकदा टाकी भरल्यावर सलग २ तास इंजिन चालू शकते.

म्हणजे दुचाकी तर कदाचित अजूनच चालतील. आणि भारतातला इंधनाचा प्रश्नही सुटायला मदत होईल. जवळपास फुकट प्रवास होत असल्याने वेग व अंतर दोन्ही कमी असले तरी लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.
शिवाय काँप्रेस्स्ड हवा भारतात प्रत्येक पंक्चरच्या दुकानात उपलब्ध आहे. म्हणजे त्या साठी वेगळी यंत्रणा असण्याचीही गरज नाही.

अशा या प्रदुषण विरहीत प्रकाराकडे फिरोदिया, बजाज किंवा हिरो सारख्या कंपन्यांचे इकडे अजूनही कसे लक्ष गेले नाही याचे मात्र नवल वाटते.

आवांतरः
या लेखाच्या दरम्यान वँकेल इंजिनाचा उल्लेख आला आहे. वँकेल इंजिनाचा विकिवरचा दुवा येथे आहे. ऍनिमेशन मुळे या इंजिनाचे कार्य चटकन कळेल.

तसेच भारतात बंगलोर येथे भारतीय बनावटीच्या विमानाचा प्रकल्प गेली अनेक दशके सुरू आहे. संपुर्ण भारतीय बनावटीचे म्हणून जे विमान येथे बनवले गेले आहे, त्यात चक्क ही वॅंकेलचीच इंजिने वापरली आहेत.

मात्र याच वँकेलच्या इंजिनावर चालणारी विमाने अमेरिकेच्या लॉकहीड कंपनीने १९६८ ते १९६९ च्या दरम्यान बनऊन विकली होती. ते डिझाईन नंतर मागेही पडले. वँकेलची इंजिने अतिशय उत्तम असली तरी पण आपले भारतीय विमान मात्र अजून व्यावसायिक तत्वावर उडायला तयार नाही. शिवाय ही विमाने व आपली विमाने यात खुपच साम्य आहे की काय अशीही शंका मला आली.

भारतीय विमानांविषयी विकिवर येथे अधिक माहिती आहे.
भार तीय विमानांची ही आवांतर माहिती योग्य आहे का, याचा कुणी संदर्भ देईल काय?

-निनाद

Comments

अजून

एक दुवा
इथे अजून बरीच माहिती टाटांच्या कार विषयी दिली आहे.
जर या वर्षी म्हणजे २००८ मध्येच ही कार आली तर या गाड्या चालवणारा भारत हा बहुदा पहिलाच देश असेल.

-निनाद

माहीतीपूर्ण

माहीतीपूर्ण लेख आहे. हवेवरील गाड्यांबद्दल ऐकले होते पण इतके साध्या/सोप्या शब्दात प्रथमच वाचले. टाटा प्रयत्नशील आहे असे ऐकून आहे.

असे विषय अजून येथे वाचायला आवडतील :)

माहितीपूर्ण लेख

टाकी भरायला २-३ मिनिटे लागतात. मस्तच.

(यात दावा आहे की केवळ १ पीएसआय वर हे इंजिन चालू शकते. म्हणजे टाकीतल्या हवेचा दाब केवळ १ पीएसआय आहे असे म्हणायचे आहे का? हे तर मोटारीच्या टायरपेक्षा खूप कमी - टायरमध्ये २०-३० पीएसआय दाब असतो. की इंजिनच्या आतमध्ये केवळ १ पीएसआयचा दाबाचा फरक आहे, असे म्हणायचे आहे? हे अधिक शक्य वाटते.)

जर हे तंत्रज्ञान वापरात येऊ शकले तर प्रदूषणाला आळा बसेल. ज्वलनातून निघणारे वायू गावभर उडण्यापेक्षा केवळ पंपाजवळ तयार होतील (पंप इंधनावर चालत असला तर) नाहीतर केवळ वीजनिर्मिती केंद्राजवळ निर्माण होतील.

जर हे तंत्रज्ञान टाटांनी व्यवहार्य, बाजारायोग्य केले तर त्यांच्या १ लाखाच्या मोटारीपेक्षा हे खरेच क्रांतिकारक ठरेल. (१ लाखाची मोटारही कौतुकास्पदच आहे, पण शहराच्या रस्त्यांवर जी गजबज होईल, पेट्रोलची मागणी जी वाढेल, त्याची कल्पना करवत नाही.)

एक पिएसआय

जर इंजिनाचा आतला फिरणारा घटक अतिशय हलक्या वजनाचा असेल आणि फिरण्याची क्रिया फारशी घर्षण निर्माण करत नसेल तर निव्वळ इंजिनही १ पिएसआय या दाबावर फिरू शकावे. याचा अर्थ हे इंजिन अतिशय उत्तम दर्जाचे आहे असा घेता येऊ शकेल, कारण ते स्वतःसाठी खुपच कमी उर्जा वापरते आहे. म्हणजेच इफिशियंसी चांगली आहे.
या पिएत्रोच्या इंजिनाचा आकारही खुपच लहान आहे. हे पण एक कारण असावे.
माझ्या मते हे दुचाकीच्या वापरासाठी खुपच उत्तम ठरावे.

ज्वलनातून निघणारे वायू गावभर उडण्यापेक्षा केवळ पंपाजवळ तयार होतील (पंप इंधनावर चालत असला तर) नाहीतर केवळ वीजनिर्मिती केंद्राजवळ निर्माण होतील.

याहीपेक्षा हवा पवनचक्कीद्वारेही मोठ्ठ्या टाक्यांमध्ये भरून ठेवता येईल. किंवा सौर शक्तीवरच्या स्टर्लींग इंजिनानेही भरता येईल, म्हणजे कोणतेच प्रदुषण नाही. अर्थात या उपायांच्या मर्यादांचीही कल्पना आहे पण इथे वीज साठवायची नसून फक्त हवा टाकीत भरून ठेवायची आहे, हा फार मोठा फरक आहे!
बॅटरीज मेंटेन करण्यापेक्षा नुसती टाकीत हवा भरून ठेवायला तसा मेंटेनंस काहीच नाही!
फक्त चांगल्या दणकट टाक्या हव्यात!

सरकार तर अश्या हवा भरणार्‍या पवनचक्क्या जागोजागी उभारून ठेवू शकेल. ग्रामीण अनुदान म्हणून उच्चदाबाची हवा ग्रामीण भागाला फुकट देऊ शकेल. या हवेचा शेती विषयक आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम होऊ शकेल.

-निनाद

चांगला लेख

लेख चांगला आहे. गरज शोधाची जननी आहे म्हणतात. पेट्रोल अव्वाच्या सव्वा महाग झाल्यावर थोडी जोखीम घेउन लोकं हवेवर चालणारी वाहने नक्कीच मान्य करतील. टाटांची दुरदॄष्टी दाद देण्यासारखी आहे. येत्या काही वर्षात टाटा मोटर्स जगातल्या पहिल्या ५ वाहन उत्पादकांपैकी असेल असे कुठेतरी वाचल्याचे स्मरते.
बाकी जर राजकिय इच्छाशक्तिचे पाठबळ मिळाले तर अपारंपारिक उर्जा स्त्रोताचे अनेक शोध पुर्णत्वास जाउ शकतील आणि भारताचे उर्जेवरचे परावलंबित्व नक्कीच कमी होईल.





इच्छा

राजकिय इच्छाशक्तिचे पाठबळ मिळाले तर अपारंपारिक उर्जा स्त्रोताचे अनेक शोध पुर्णत्वास जाउ शकतील

आपले म्हणणे रास्त आहे.
मात्र त्याच वेळी अनेक अशी ठिकाणे आहेत की जेथे वाहन चालवतात पण ते खाजगी भागात, म्हणजे कारखान्याच्याच परिसरात वगैरे. ही खाजगी वाहने बाहेर रस्त्यावर जात नाहीत अनेकदा त्यांना रजिस्ट्रेशनही नसते. तसेच त्यांची चालही अगदी मर्यादीत असते, अशा ठिकाणी तर या तंत्राचा वापर खुपच महत्वाचा ठरावा.

राजकिय इच्छाशक्ती हा मात्र वेगळाच विभाग आहे. कारण आजच्या घडीला तुम्हाला प्रयोग करण्या पुरते वाहनाचे रजिस्ट्रेशनही आरटिओ देत नाही.
मात्र आंतरराष्ट्रीय ओरड झाल्यावर महिंद्राने बनवलेली/दिलेली बॅट्रीवर चालणारी वाहने १९९८ साली ताजमहालाजवळ वाहतुक करतांना पाहिली होती.

या शिवाय अनेक हित संबंधही गुंतलेले असतात ज्यामुळे राजकारणी लोकांना 'असे' नवे प्र्योग येऊ देणे नको असते. शेवटी निवड्णूकीत दिलेला/पुरवलेला पैसा या हितसंबंधी मंडळींनीच दिला असतो.
ते आपले मार्केट असे फुकाफुकी कसे जाऊ देतील?

-निनाद

खरे आहे

खरे आहे. पण नवे प्रयोग म्हणजे सुद्धा नवी कुरणे आहेतच पैसे खाण्याची. माझा मुद्दा एवढाच आहे की जर ठरवले तर आपण अपरंपारिक उर्जा स्त्रोतांचा चांगला वापर करू शकतो आणि आपल्याकडे ते मुबलक प्रमाणात आहेत.





छान लेख

या शिवाय अनेक हित संबंधही गुंतलेले असतात ज्यामुळे राजकारणी लोकांना 'असे' नवे प्र्योग येऊ देणे नको असते.

लेख माहितीपूर्ण, आणि वरची काळजी देखील समजण्यासारखीच.

संपादकांना विनंती

काही सदस्यांना या लेखाला प्रतिसाद देता येत नाहियेत असे कळले.
हा युट्युबचा कोड देण्याचा परिणाम आहे का?
तसे असल्यास तो कोड काढून त्याचा फक्त दुवा करू शकाल का?
आपल्या मदतीबद्दल आपल्याला मी दुवा देईन. :-)

-निनाद

दुवा बदलला आहे

सध्या दुवा बदलून चित्रफीत दाखवलेली आहे. सदस्यांना यानंतरही लेख उघडण्यास अडचण येत असल्यास कृपया कळवावे. चित्रफीतीऐवजी तिचा दुवा देता येईल.

कळावे,
संपादन मंडळ.

दुवा!

असा बदल केल्या बद्दल आपणास दुवा देतो.
-निनाद

साध्या साईकल.

साध्या साईकलीचा वापर करुन अशी उच्च दाबाची हवा निर्माण होईल का ? व्यायाम आणि उर्जा दोघांची निर्मीती होऊ शकेल.

नक्की

सायकलचा वापर करून अशी हवी तितकी हवा निर्मान करता येईल.
सायकलची चेन एका पंपाला जोडली काम झाले.
म्हणजे चाक फिरवण्या ऐवजी पंप चालेल. याला गियर्स जोडून अजून चांगल्या पद्धतीनेही वापर करून घेता येईल.
पण सायकल किती काळ सायकल चालवता येईल याला मर्यादा आहेच.

म्हणून सौर स्टर्लींग इंजिन(हिट एक्सचेंज) अथवा पवनचक्क्यांसारखी आपोआप चालणारी उपकरणे भारतासारख्या देशात जास्त योग्य वाटतात. शिवाय या उपकरणांनी, दिवसा-रात्री कधी काम केले तरी अनेक छोट्या छोट्या टाक्या असणारी (हवेचा दाब कायम राखण्यासाठी!) एक मोठी टाकी भरून ठेवता येईलच. आणि मग ज्याला लागेल तो आपले वाहन भरून घेऊ शकेल.

-निनाद

 
^ वर