डिजिटल लायब्ररी
डिजिटल वाचनालये
हा प्रकार तसा आता जुना झालाय. पण आपल्या कडील विद्यापीठांनी पदवीच्या वर्षाला असणारे प्रोजेक्टस् गंभीरतेने घ्यायला लागल्यापासून भारतातही याची गरजही वाढीला लागली आहे असे वाटते.
भारतात संदर्भग्रंथांची तशी प्राचीन परंपरा आहे. अगदी किर्तनातही ओवी अथवा अभंग कुठून घेतला हे आवर्जून सांगितले जाते. मात्र ही इतकी समर्थ परंपरा विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात लुप्तच झाली की काय असा संशय येतो.
अनेक विद्यार्थी जेंव्हा मागच्या वर्षीचाच कुणीतरी केले प्रोजेक्ट सरळ पहिले पान लावून सुपूर्त केलेले वाचतो, पाहतो तेंव्हा अजूनच वाईट वाटते. पण अशी लिखित कामाची चोरी करायची नाही ,हा भाव वाढतो आहे असेही जाणवतेच.
तर या संशोधनात्मक लेखनासाठी कुणी, कधी, काय काम एखाद्या विषयावर केले आहे हे समजण्यासाठी डिजिटल लायब्ररी ला काही पर्यायच नाही. याला अनेकदा विदागार (डेटाबेस) असेही म्हंटले जाते. इंग्रजी मध्ये संशोधनाचे लेखन प्रचंड प्रमाणात झालेले आहे. हे सगळे लेखन नुसते शोधणे, हा सुद्धा एक अवघड प्रकार बनला आहे. या साठी संशोधनाच्या लेखनाचा साठा उपलब्ध करून देणार्याच काही कंपन्या आहेत. या कंपन्या सर्व साधारण पणे विद्यापीठांशी करार करतात व त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरून त्यांच्या लेखन् साठ्यामध्ये प्रवेशाची मुभा देतात. यामुळे त्या कंपन्यांना पैसे मिळतात व ते अजून अजून लेखन एका छत्राखाली आणू शकतात. मात्र आज त्या साठ्यातही एखाद्या विषयावरचा लेख शोधायचा असेल,
तर त्या त्या विषयाचे काम करणारे स्वतंत्र समुह किंवा कंपन्या आहेत.
उदाहरणच घ्यायचे झाले तर ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया विद्यापीठाच्या वाचनालयाच्या संकेत स्थळावरून अशा विदागारात शिरण्याची मुभा त्या विद्यार्थ्यांना आहे.
मात्र आत शिरल्यावर अशी विदागारेही खुप असतात. मला आत्ता दिसत असलेली फक्त ए अक्षरातली विदागारे १० आहेत. या विदागारांमधे असलेली अजून माहिती वेगळीच.
यात इन्फॉर्मिट A+ Education (Informit) आणि प्रोक्वेस्ट सारखी नावे दिसतात
ABI/Inform Dateline (ProQuest)
ABI/Inform Global (ProQuest)
ABI/Inform Trade & Industry (ProQuest)
वर पाहिलेत तर कळतेच की शोधणे सोईचे व्हावे म्हणून प्रो क्वेस्टने ही आपल्या विदागाराचे भाग करून ठेवले आहेत.
अशा रीतीने इंग्रजीतील डिजिटल वाचनालये वाढत आहेत. कोणत्याही प्रकारे एकच संशोधन परत परत होण्याची शक्यता टाळण्याचा प्रयत्न आहे. त्या वाचनालयांची एकमेकांशी जोडणी करून घेण्याचा वेगही वाढत आहे. त्यात असलेला धनाचा संग्रही वाढता आहे.
आज ऑस्ट्रेलियातील कोणत्याही वाचनालयाचे पुस्तक एकत्रीत जोडणीमुळे सहजतेने शोधता येणे शक्य होते आहे.
इतकेच काय ते मिळवण्याचीही सोय केली जाते आहे. यासाठी विद्यार्थ्याच्या फी मधून वर्षाच्या सुरुवातीलाच एक रक्कम घेतलेली असते.
संशोधनाच्या अनेक लेखांमध्ये भारतीय नावे संशोधक म्हणून दिसत असली, तरीही या सगळ्या व्यवसायात भारतीय वाचनालये कुठेही नाहीत ही मात्र खेदाने नोंदवावेसेच वाटते.
आशा आहे की एक दिवस असा नक्की येईल की किमान भारतातली सगळी विद्यापीठे तरी जोडलेली असतील.
आणि काही भारतीय कंपन्या तरी यात आपला व्यवसाय करायला लागलेल्या असतील.
(हा लेख काहीसा ऍब्रप्ट वाटण्याची शक्यता आहे. उपक्रमाचे एक सदस्य -प्रकाश घाटपांडे, यांच्या एका खरडीत डिजिटल वाचनालयां विषयी त्यांची आस्था जाणवल्याने, जे मनात येत गेले ते येथे उतरवले आहे. अजून माहिती हवी असल्यास मला जमेल तशी देईन.)
-निनाद
Comments
भारतात
भारतातच एक स्वतंत्र कंपनी स्थापून
या कंपनी द्वारे प्रो क्वेस्ट सारख्या विवीध संदर्भ विदागारांना शोधवाटा (गेटवे) देता येतील अशी मला खात्री आहे.
यातल्या काही डेटाबेस कम्पन्यांना भारतात यायला सहकार्य मिळेल आणि भारतातल्या कंपनीला त्यांच्या
विदागारांचा एक्सेस!
असा दुवा म्हणून काम करणारी कंपनी उभी करणे हा डिजिटल लाय्ब्ररी उभी करण्यात महत्वाचा भाग ठरू शकतो.
ही कंपनी ताज्या संशोधनात्मक माहितीच्या पुरवठ्यासाठी अनेक उद्योगांशी आणि विद्यापीठांशी सहकार्य करार करून चांगले(च) पैसे मिळवू शकेल असे वाटते.
-निनाद
भारतात काम चालू
आजच कार्य शाळेत ही माहिती मिळाली.सायन्स डायरेक्ट सारख्या जर्नल्स व इतरही अनेक माहिती पुरवणारी ही कंपनी भारतात काम करत आहे. अशी माहिती श्रीमती पद्मा मुरलीधरन् यांनी दिली. आय पी बेस्ड लॅन मधील संगणकांना हा स्त्रोत पुरवला जातो
http://www.elsevier.com/wps/find/librariansinfo.librarians/lc_home
अर्थात पदवी पुर्व महाविद्यालयांना साडेतीन लाख व पदव्युत्तर महाविद्यालयांना आठ ते दहा लाख अशी वार्षीक फी आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांना याचा अधिक फायदा होतो.
प्रकाश घाटपांडे
अजूनही!
यात अजूनही खुप वाव आहे असे माझे मत आहे. शक्य असल्यास खुद्द शोधवाटा (गेटवे) स्थापन करण्यात आजही आपण पुढाकार घेवू शकत असे वाटते.
या कार्यामुळे हे माहितीचे क्षेत्र नक्की कसे चालते याचे उत्तम आकलन तर होईलच शिवाय आर्थिक फायदा करून घेता येईल.
अजून फारशी स्पर्धा नसल्याने, वेळीच पाय रोवता येतील!
या साठी
१. कार्य नक्की काय करायचे आहे याचा पक्का विचार व्हावा.
२. एक व्यवसायाचा आराखडा (बिझिनेस प्लॅन?) बनवावा
३. आपल्याला कुठे पोहोचायचे आहे आणि किती काळात याचा विचार.
४. एक आस्थापन असणे गरजेचे.
५. मग विपणन/जाहिराती/आणि व्यवसायाचे जाळे विणणे (मार्केटींग)
६. एक अकाऊंटंट - आपण किती पाण्यात आहोत याचा कायंअ आढावा देऊ शकणारा
७. काही काळ तरी यात पुर्ण वेळ काम यात करावे लागेल, नंतर माणसे काम करू शकतील व आपल्याला वेळ मिळू शकेल (असे वाटते!)
असे सुचले.
-निनाद
छान लेख आणि कल्पना.
आपला लेख मोजक्याच शब्दात समग्र अशी कल्पना देत आहे. अभिनंदन.
लेख ऍबरप्ट ( घिसाड्घाईचा) नसून चांगलाच जमला आहे. डिजिटल ला संगणकिय वाचनालय म्हटले तर चालेल काय?
संगणकीय
संगणकीय वाचनालय हा शब्दप्रयोग चांगला आहे.
पण लेख लिहितांना सुचला नाही.
आता बदलताही येणे शक्य नाही.
तेव्हा सदस्यांना विनंती की त्यांनी 'तो' शब्द संगणकीय वाचनालय असा वाचावा :-)
मुळात आपल्याकडे वाचनालयांना
एक प्रकारची जी दुय्यम अवस्था/मानसिकता प्राप्त झाली आहे,
ती बदलणे महत्वाचे आहे.
त्यात काम करणारे एक तर अतिशय मग्रुर, पुस्तके म्हनजे वैयक्तिक संपत्ती असल्यासारखे असतात किंवा अगदीच दीन दुबळे गरिब आणि तंत्रज्ञानाशी चुकूनही संबंध न आलेले असतात.
पुण्याच्या भांडारकर प्राच्य चे पुस्तकाचे दालन खरं तर घरा घरात पोहोचले पाहिजे असे आहे.
पण कसे? हाच तर मिलियन डॉलर प्रश्न आहे!
-निनाद
खरेच
पण कसे? हाच तर मिलियन डॉलर प्रश्न आहे!
ही लायब्ररी तयार करणे वेळखाऊ काम आहे, त्यासाठी मनुष्यबळ, अनुदान/देणगी इत्यादी पाहिजेच. तांत्रिकी बाबी तशा कठीण नाहीत, पण बाकीच्या गोष्टींसाठी पाठबळ हवे.
असा प्रयत्न होत आहे
निनाद,
कॉपीराईटच्या कालमर्यादेच्या बाहेर गेलेल्या अनेक पुस्तकांना स्कॅन करून आंतरजालावर चढवण्याचे काम भारततही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्याला "डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया" असेच नाव आहे.
माहितीसाठी अनेक दुवे मिळू शकतील.
मस्त
आत्ता व्यवस्थित पाहता आले नाही,
वेळ घेऊन नंतर शांतपणे पाहतो.
पण चांगले दिसते आहे.
-निनाद
पाहिले पण
येथे भला मोठा संग्रह आहे हे खरे.
मात्र पुस्तके पाहण्यासाठी फारच त्रास आहे असे वाटले.
एका वेळी एकच पान उघडत होते आणि ते पण उघडायला वेळ लागत होता.
(माझ्याकडे केबल आहे त्यामुळे स्पीडचा प्रश्न नाही)
सगळे पुस्तक देण्यात इतका अडथळा का ते कळले नाही.
वापरणार्याला सोपी वाटेल अशी पद्धती हवी की काय असे वाटले. (कदाचित ही पध्दत योग्यही असेल आणि वापराने ती सोपीही वाटत असेल.)
आणि इतके करून नेमके काही शोधणे अवघडच आहे असे वाटले.
म्हणजे मला राणी लक्ष्मीबाई असा शोध घ्यायचा आहे तर त्यात सगळी पुस्तके शोधली जातीलच असे नाही. (असे वाटले!)
या शोध संदर्भात तरी युनिकोड ला काही पर्यायच दिसत नाही.
असो, दुवा उत्तम आहे.
आता याचे आर्थिक गणित कसे चालते हे पण माहित असल्यास सांगा.
-निनाद
"डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया"
इंटरनेटची गति कमी असतांना इथून एकेक पान वाचणे खूपच कंटाळवाणे होते. म्हणून मला आवडलेली काही पुस्तके मी इथे ठेवली आहेत. ही पुस्तके वाचायला , उतरवून घ्यायला काहीच अडचण नाही. पण एखादे पुस्तक जोडायचे असल्यास scribd.com चे [ तसेच marathi-mandala चे ही ] सदस्यत्व घ्यावे लागेल. scribd वर जागेची मर्यादा नसल्यामुळे अक्षरश: हजारो पुस्तके साठवता येतात. Guttenberg ने ४६०० तर worldlibrary ने ११,५०० पुस्तके चढवलेली आहेत.
marathi-mandala माझाच ग्रूप आहे. तशी scribd वर मी काही इंग्रजी पुस्तकेही उद्धृत केली आहेत पण ह्या ग्रूपवर फक्त मराठी पुस्तकेच जोडली आहेत. पण एका डॉक्टर साहेबांनी काही इंग्रजी पुस्तके जोडली आहेत. ते ग्रूपचे पहिलेच सदस्य असल्यामुळे आणि ती पुस्तके उपयुक्त असल्यामुळे ती तशीच राहू दिली आहेत. आपणही जमल्यास काही पुस्तके जोडावीत ही विनंती.
एकोहम् -
आभार
मस्त लेख् आणि लेखविषय निनाद!
बाकी,एकोहम्, दुव्याबद्दल अनेक आभार
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
हा ही
प्रकल्प चांगलाच आहे.
परंतु यात सहजतेने व नेमक्या शब्दाने संदर्भ शोधणे शक्य दिसत नाही.
तरी ही कल्पना चांगली आहे यतूनच पुढे काही उभे राहील असे वाटते.
-निनाद
संदर्भ शोधणे -
देवनागरी वा इतर भारतीय भाषांमध्ये जेव्हां यशस्वीरीत्याPDF to Text करणे शक्य होईल तेव्हांच संदर्भ शोधणे शक्य होणार. एरव्ही हे सर्व टंकलेखन करणे मराठीतच काय इंग्रजी मध्येही होणे कठीणच नाही का ? C-DAC चे ''हित्रांकन'' ह्या कामासाठी पुरेसे उपयोगी वाटत नाही.
एकोहम्
अनेक आभार
विरभी,
आपला उपक्रम अतिशय सुरेख आहे. त्याचा दुवा दिल्याबद्दल अनेक आभार. ही गोष्ट या आधीच कळायला हवी होते असे वाटले.
शाब्दीक फरक
बहुतांशी वेळेस "डिजीटल लायब्ररी" हा शब्द जालावरील माहीती एकत्रीत केलेली असते त्या संदर्भात वापरला जातो. आपल्या डोक्यात जी आहे तीला "डिजिटाईज्ड लायब्ररी" म्हणावे लागेल.
काही दुवे
१
२ याचा उपयोग करून सॉफ्टकॉपी असलेल्या कशाचीही पिडीएफ अथवा एचटीएमल तयार होऊन तुमच्यासर्वर वर राहू शकते.
३ हा एमाआयटीचा प्रकल्प
वगैरे वगैरे...
सुंदर विषय
निनाद यांनी सुंदर विषय चालु केला आहे. मला त्यात आस्था आहे. ग्रंथालय शास्त्रातील मला फार समजत नाही . पण पुण्यात नुकत्याच संपन्न झालेल्या दोन आठवड्याची कार्य शाळा सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे जाण्याचा योग आला. ती मुख्यतः ग्रंथपालांसाठी होती. पण मला त्यात रस असल्याने तेथील समन्वयक सेंट्रल लायब्ररी च्या ग्रंथपाल श्रीमती अमिता प्रधान यांनी मला सहभागी करुन घेतले.
एकोहम यांनी चांगला दुवा दिला आहे. तसेच विकास यांनी शाब्दिक फरक अचुक टिपला आहे.
पुण्यात भांडारकर प्राच्य विद्या मंदिर (BORI) तसेच भारत इतिहास संशोधक मंडळ येथे अनेक जीर्ण झालेले कागद नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत हे मी पाहिले आहे. हात लावला तर तुकडे पडतात.त्यांच डिजिटायझेशन झाल पाहिजे. फक्त फोटो स्कॅनिंग करुन संचित केले तरी खुप झाले. इच्छा शक्तीचा अभाव जाणवतो. भांडारकर प्राच्य विद्या मंदिर मध्ये ग्रंथपालाला साधा संगणक नाही. डिजिटायझेश फार लांबची गोष्ट. आपणच या क्षेत्रात पडुन काही काम कराव अस मला वाटु लागल आहे. बघु या कितपत जमते ते.
प्रकाश घाटपांडे
प्रत्येक गावात एक बोरी
येथे अनेक जीर्ण झालेले कागद नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत हे मी पाहिले आहे.
अरेरे! हे फार दुर्दैवी आहे!
आपल्या सामाजिक जाणिवा कशा आणि कधी बदलतील हा मोठाच प्रश्न आहे.
असो, आशा आहे की इतिहासाचे, जुन्या कागदाचे, लेखनांचे, त्यात असणार्या महत्वाच्या दुव्यांचे आणि विचारच बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणार्या या घटकाचे महत्व आपल्याला कधी तरी तरी कळेल.
मला तर वाटते की प्रत्येक गावात एक बोरी (म्हणजे BORI हो!!) असावी.
त्यात त्या त्या गावाचा इतिहास सांगणारा एक वेगळा विभाग असावा...
तेथेच एक संग्रहालय असावे... त्यात वेगळेपण दिसावे.
या सार्याला तिकिट असावे, यातून येणारे पैसे हे उपक्रम सुरु ठेऊन, विस्तार करण्यासाठी पुरेसे आहेत की नाही हे नियमितपणे पाहिले जावे.
लोकांना ते पाहण्यासाठी उद्युक्त केले जावे.
(पण जोवर प्रविण दवणेंसारखी माणसे हावरेंसाठी बाभळी पुस्तके लिहित आहेत, तोवर बोरी कशा येणार? खरा खुरा इतिहास सांगणारे किती प्रकल्प उभे राहतील ही शंकाच आहे.)
आपला
गुंडोपंत
(एक चीनी म्हण: ज्याला जे माहिती झालेले असते ते दुसर्याला सांगत नाहीत, आणि जे त्याबद्दल बडबडत असतात त्यांना ते माहितच नसते!)
आदर्श.
घाटपांडेसाहेब,
आपण आपली जिज्ञासू वृत्ती खर्या अर्थाने जतन आणि संगोपन केली आहे आणि करत आहात.
समाजामध्ये आपल्यासारखे लोक संख्येने कमी असतात तरी ते समाजाचे वेगळेच गरज भागवित असतात.
आपल्या बद्दल आम्हाला गौरव वाटतो.
आपला,
द्वारकानाथ कलंत्री
स्तुत्य
घाटपांडे, तुम्हाला याबाबत मदत कराविशी वाटणे खरंच स्तुत्य आहे.
खरे आहे आणि तुम्ही ते करावेच. म्हणजे मला काही हवे झाले तर हात पसरून मागता येईल. :-)
भांडारकर प्राच्य
भांडारकर प्राच्य च्या दुव्यावर काहीच मिळाले नाही.
अजून बांधणीच चालली आहे.
वर्षभरापासून असेच आहे हे स्थळ.
-निनाद
शोध - इंग्रजी, मराठी आणि...
माझ्यामते आज मराठी मधे संदर्भांचा शोध घेणे फार अवघड काम आहे.
कारण बहुतेक लेखन पिडिएफ फॉर्मॅटमध्ये चित्र स्वरूपात आहे. हा फार मोठा अडथळा आहे. कारण जालावर शब्द दिला तरी चित्र स्वरुपातले लिखाण शोधकिड्यांद्वारे वाचलेच जात नाही.
फक्त युनिकोडीत लिखाणाचाच शोध मिळतो.
अर्थातच त्यामुळेही जालावरिल पुस्तके सापडू शकत नाहीत.
स्कॅन केलेले देवनागरी शब्द ओळखणारी प्रणाली विकसित होणे या साठी महत्वाचे आहे. मग मराठीतील पुस्तक स्कॅन करून युनिकोडित करता आले तर त्या सारखी बहार नाही.
आशा आहे की यावर काही काम होईल.
पण माझ्या मुळ लिखाणात, इंग्रजीतील ज्ञानसंपदा भारतात विकण्यासाठी विदेशी संस्थांना पैसा मिळण्यापेक्षा एखाद्या भारतीय संस्थेला मिळावा, हा पण आहे.
-निनाद
उपाय
देव नागरी ओसीआर "चित्रांकन" हे सी डॅक ने विकसित केले आहे पण त्याच्या मर्यादा फारच आहेत. मी स्वतः ते वापरले नाही . कार्यशाळेत त्याबाबत अधिक माहिती मिळाली नाही.
यावर उपाय म्हणजे संबंधीत संदर्भाचामेटाडेटा हा भाग युनिकोड मध्ये वा आंग्ल भाषेत टाकून सदर भाग शोध यंत्राच्या जाळ्यात सापडण्याची इष्टापत्ती ओढवुन् घेता येईल.
प्रकाश घाटपांडे
चांगला विचार
हा चांगला विचार आहे.
-निनाद
मुलांसाठी मराठी पुस्तके
http://arvindguptatoys.com/ इथे मुलांसाठी मराठीत भाषान्तरित केलेली जवळजवळ ८०-८५ पुस्तके आहेत.--वाचक्नवी
आभार.
प्रिय वाचक्नवी,
आपण सुचवलेले संकेतस्थळ पाहताना तास कसा गेला हे समजले देखील नाही. अजूनही बरेच पाहायचे बाकी आहे.
खरे तर तुम्ही यावर वेगळा लेख लिहायला हवा होता, ( अर्थातच माझी प्रेमाची तक्रार).
द्वारकानाथ
सहमत्!
मोठेच काम केले आहे त्यां अरविंद गुप्तांनी!
उत्तम स्थळ आहे ते मराठी साठी.
भरपूर माहिती!
आपला
गुंडोपंत
वा!
हे स्थळ् बघून फार फार आनंद झाला. अरविंद गुप्ता यांचे अभिनंदन आणि दुव्याबद्दल आभार!
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
छापील पुस्तके.
अरविन्द गुप्तांच्या संकेतस्थळावरील (निदान) सौ. सुजाता गोडबोल्यांनी भाषान्तर केलेली १८ पुस्तके मुद्रित स्वरूपात नुकतीच प्रसिद्ध झाली आहेत. प्रत्येक पुस्तक सुमारे ५० पानी, किंमत प्रत्येकी ३५ रुपये. सहा पुस्तकांचा एक संच किंमत २१० ऐवजी १७० रुपये. तीन संचांची एकूण किंमत रु. ५१० ऐवजी ४७० रुपये. प्रकाशक-मनोविकास प्रकाशन(पुणे). या सर्व पुस्तकांचा मूळ लेखक -अग्रगण्य विज्ञानकथालेखक डॉ. आयझॅक आसिमॉव्ह((१९२०-१९९२). ह्याने लिहिलेल्या ४०० पुस्तकांपैकी ही १८ पुस्तके शोधांच्या कथा सांगणारी आहेत. ही पुस्तके मुलांकरिताच नाही तर मोठ्यांसाठीदेखील वाचनीय आहेत. उत्तम छपाई, भरपूर चित्रे आणि निर्दोष भाषांतर. ज्याला शक्य असेल त्याने डोळ्याखालून घालावीत. --वाचक्नवी
पोथ्यांचे डिजिटायझेश
आजच दैनिक सकाळ मध्ये खालील बातमी वाचली
दुर्मिळ पोथ्यांचे डिजिटलायझेशन
पुणे, ता. २९ - दहा तपांपासून दुर्मिळ पोथ्या आणि हस्तलिखितांचे संकलन करणाऱ्या आनंदाश्रम संस्थेमार्फत या संस्थेतील आणि भारत इतिहास संशोधक मंडळातील दुर्मिळ पोथ्या आणि हस्तलिखितांचे सर्वेक्षण करण्यात आले.
दोन वर्षांपासून "हस्तलिखित सर्वेक्षण आणि दस्तऐवजीकरण केंद्रा'मार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत असून, यापैकी दुर्मिळ पोथ्या आणि हस्तलिखितांचे लवकरच "डिजिटलायझेशन' करण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या ऍड. महादेव चिमणाजी आपटे यांनी आनंदाश्रम संस्थेची स्थापना केली. त्यांनी गावोगावी फिरून जुन्या पोथ्या आणि हस्तलिखिते जमा केली. १८८८ मध्ये त्यांनी आपली संपत्ती संस्थेला देणगी दिली. गेली एकशे वीस वर्षे पोथ्यांचे संकलन करणाऱ्या आनंदाश्रम संस्थेमध्ये "राष्ट्रीय पांडुलिपी अभियान'ने (नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशन) दोन वर्षांपूर्वी हस्तलिखित सर्वेक्षण आणि दस्तऐवजीकरण केंद्राची मंजुरी दिली. संस्थेच्या संग्रहातील दुर्मिळ पोथ्या आणि हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. संस्थेच्या विश्वस्त डॉ. सरोजा भाटे या प्रकल्पाच्या समन्वयक आहेत.
आनंदाश्रम संस्थेकडे शके १६०० ते १७००च्या दरम्यानची दहा हजार हस्तलिखिते आहेत. संस्कृत, मराठी, हिंदी आणि गुजराती भाषांतील पोथ्यांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये तमीळ आणि तेलगू भाषांतील ताडपत्रांवरील हस्तलिखितांचा समावेश आहे. एका दप्तरामध्ये दहा पोथ्या याप्रमाणे वेखंडाची पावडर आणि वाळवी लागू नये म्हणून कीटकनाशके लावून या पोथ्यांचे जतन केले जाते. अलंकार साहित्य, वेद, उपनिषद, काव्य, महाकाव्य, काव्य-कथा, काव्य-नाटक, कोश, ज्योतिष, धर्मशास्त्र, स्मृति, नीती, न्याय, रामायण, महाभारत, गीता, भागवत, पुराण, मीमांसा, याज्ञिक, योगशास्त्र, वेदांत, वेदांग, व्याकरण, वैद्यक आणि स्तोत्र अशी पोथ्या आणि हस्तलिखितांची वर्गवारी करण्यात आली आहे.
या प्रकल्पाविषयी माहिती देताना डॉ. भाटे म्हणाल्या, ""आनंदाश्रम संस्थेत पूर्वीपासून पोथ्या आणि हस्तलिखितांच्या जतनाचे काम सुरू आहे. येथील तसेच भारत इतिहास संशोधक मंडळ आणि व्यक्तिगत संग्रहातील पोथ्या आणि हस्तलिखितांचे सर्वेक्षण करण्यात आले. पोथ्यांचे विषयवार वर्गीकरण करून संगणकावर संकलित केलेली माहिती राष्ट्रीय पांडुलिपी अभियानाकडे पाठविण्यात आली आहे. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहातील ३५ हजार पोथ्यांपैकी २७ हजार पोथ्यांच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही संस्थांतील प्रत्येकी पाचशे याप्रमाणे एक हजार पोथ्यांचे डिजिटलायझेशन करण्याचे आश्वासन अभियानने दिले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
ही बातमी दिलासा देणारी आहे. आनंद आश्रमात मी मागच्या वर्षी याच कामाच्या चौकशी साठी गेलो होतो. याला केंद्रशासनाचे दुर्मिळ हस्तलिखिताच्या डिजिटायझेशन साठी दोन कोटीचे अनुदान असुन त्यात भांडारकर इन्स्टीट्युट, भारत इतिहास संशोधक मंडळ , आनंदाश्रम अशा साठी विभागुन आहे. इच्छाशक्ती ,नियोजन व अधिकार यांनी अँड लॉजिक गेट नुसार काम केले तर काहीतरी विधायक होईल अशी आशा आहे.
प्रकाश घाटपांडे