नाणी, पैसे, रुपये

उपक्रमी शरद यांच्या http://mr.upakram.org/node/1305#comment-21430 या लेखात ज्ञानेश्वरांचे एक पद दिले आहे. त्यात 'रुपयां'चा उल्लेख आला आहे.

त्यावरून मनात आलेला प्रश्न असा की नाण्यांची सुरुवात कशी आणि कधी झाली? शाळेत बहुतेकांनी वाचले असेल की पूर्वीच्या काळी विनिमयासाठी चलन म्हणून वस्तूंची देवाणघेवाण व्हायची. गायी, धान्य, इतर वस्तू इत्यादी.

या अनुषंगाने पुढील प्रश्न पडले:

  • वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या संस्कृतीत विनिमयाची पद्धत काय होती?
  • नाण्यांची सुरुवात भारतात झाली की इतर देशांतून नाणी भारतात आली?
  • "मुद्रां"चा उल्लेख बर्‍याच संस्कृत वाङ्मयात दिसतो त्याचा काल कधीचा असेल?
  • "रुपया" ची सुरूवात कधी झाली आणि कुणी केली?

(या संदर्भात आणखी एक प्रश्न मला नेहमी पडतो. पूर्वीच्या काळी धातूंची निर्मिती जसे की खाणकाम, शुद्धिकरण इ. गोष्टी कधी आणि कश्या विकसित झाल्या असाव्यात. पण याचा आवाका फार मोठा आहे असे वाटते.)

Comments

गोची

आताच सकाळी उठल्या उठल्या नाण्यांवर एक लेख तयार करावा असा विचार डोक्यात आला होता. म्हणजे तो पूर्वीच आला होता पण वेळ मिळत नव्हता. आणि इथे येऊन पाहते तर ही चर्चा त्यामुळे माझ्या न प्रसवलेल्या लेखाची गोची झाली. :(( (बहुधा पुढील चर्चा-विषय टेलीपथीवर ठेवू. ह. घ्या)

बाकी, चर्चा विषय चांगला आहे. वेळ होईल तशी माहिती शोधते.

अवश्य लिहा

गोची कसली? लेख जरूर लिहा. लेख लिहायला या चर्चेमुळे आणखीनच प्रेरणा मिळो :)

या चर्चेतून आणखी माहिती मिळाली तर लेख परिपूर्ण होईल :)

रुपया

रुपयाचा इतिहास येथे सापडला. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या काळात नाण्यांना रूपया म्हटले जात होते का नाही याचा शोध घेणे गरजेचे आहे पण ज्ञानेश्वरांच्या काळात चलन म्हणून नाण्यांचा वापर होत असावा असे वाटते.

छापाची नाणी भारतात ग्रीकांमुळे आली. सध्या इतकेच. :(

रुपे म्हणजे चांदी

रुपया हा शब्द रुपे (म्हणजे चांदी) या शब्दावरून तर आला नसेल? तसे असेल तर ज्ञानेश्वरांच्या काळांतही रुपया हा शब्द (चांदीचे चलन किंवा नाणे या अर्थी) प्रचारांत असण्याची शक्यता आहे.

चांदी हा अर्थ नंतरचा, नाणे हा आधीचा

पाणिनींच्या अष्टाध्यायीत "रूप्य" शब्द (कुठल्याही धातूच्या) चित्र-छापलेल्या नाण्याच्या संदर्भात सांगितलेले आहे.
(सूत्र ५.२.१२०)
त्या सूत्राच्या स्पष्टीकरणात (काशिकावृत्तीत) सोन्याच्या नाण्याचे उदाहरण दिलेले आहे.

सोन्याचे नाणे

सोन्याच्या नाण्याला काही खास शब्द आहे का त्यावेळेचा? की त्यालाही रुप्य हेच नाव आहे?

सोन्याच्या नाण्यासाठी विशेष शब्द सांगता येत नाही

पाणिनींची ती चर्चा कुठल्यातरी प्रत्ययाविषयी आहे.

आदल्या सूत्रात "निष्क"चा उल्लेख होतो. पण ते नाणेही कुठल्या विशिष्ट धातूचे असावे, असे वाटत नाही. कारण त्याच्या वृत्तीत उदाहरण म्हणून "सुवर्णनिष्क" असे सांगितले आहे.

पुढचे सूत्र आहे -
रूपादाहतप्रशंसयोर्यप् । ५.२.१२०
"रूप" शब्दाला "टांकणे" (आहत करणे/ठोकणे) आणि प्रशंसा या अर्थी "यप्" प्रत्यय होतो (संदर्भाने "निष्का"संबंधाने).

कोणास ठाऊक का, पण काशिकावृत्ती या सूत्राच्या व्याख्येसाठी थोड्या अवांतर तपशिलात जाते. (पण काशिका इस ७००-८०० काळातली आहे, हे लक्षात असावे, पाणिनीय सूत्रे मात्र इ.पू ३००-४०० किंवा त्या पूर्वीची)
काशिकेतील वृत्तीचे भाषांतर :

रूप्य म्हणजे दीनार. पुरुष वगैरे आकारांच्या चिह्न केलेली विशेष सोन्याची परिमाणे व्यवहारासाठी बनवतात ती आहेत दीनार आणि कार्षापण. "निगातिके"ने ठोकून वगैरे बनवतात. "निगातिका" म्हणजे तीक्ष्ण टोकाची लोखंडी दांडी. तिने सोनार सोने-वगैरे-पदार्थांवर पुरुष-वगैरे आकार उत्पन्न करतात. (...येथे निघातिका शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल काशिकाकार सांगतात, तो भाग सोडला आहे...) कधीकधी निघातिकेने ठोकून, तर कधीकधी मुद्रिकेने (ठशाने) प्रतिमुद्रण करून दीनार-वगैरेंच्यावर पुरुष-वगैरे आकृती उमटवतात. (सूत्रातील) "आहत" शब्दाने (ठोकणे/टांकणे या शब्दाने) या क्रियांचा उल्लेख केलेला आहे. आहननाने (ठोकण्या/टांकण्याने) निष्पन्न या अर्थी. ("प्रशंसा" अर्थाने यप् प्रत्ययाची पुढे उदाहरणे दिली आहेत.)

पण या सर्व तपशीलवार क्रिया (म्हणजे छिन्नी/छाप-ठसा यांचा वापर) पाणिनींच्या काळात होत्या की नाही, हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे "दीनार", "कार्षापण" यांचा उल्लेख पाणिनींचा नाही, तर काशिकाकाराचा. परिमाणाचा धातू सोनेच होता, की दुसरा कुठला, हे मत काशिकाकाराचे, पाणिनींचे नाही. केवळ "रूप्य"चा शब्दार्थ म्हणजे चित्र ठोकून/टांकून बनवलेले नाणे, हा शब्दार्थ पाणिनींच्या काळात होता, हे सांगता येते. ते कुठल्या का धातूचे असेना, त्यावर ठोकून बनवलेले चित्र असले, तर ते "रूप्य".

कार्षपण

पण या सर्व तपशीलवार क्रिया (म्हणजे छिन्नी/छाप-ठसा यांचा वापर) पाणिनींच्या काळात होत्या की नाही, हे सांगता येत नाही.

तपशीलवार प्रतिसादासाठी धन्यवाद.

.
.
.
.
.
.
.
.
.
.

हे कार्षपणाचे चित्र आहे. इ.स.पूर्व ६व्या -५व्या शतकातील. त्याकाळी नाण्यांवर चेहरे छापले जात नव्हते. परंतु कार्षपणांवर चित्र-चिन्हे कोरली जात होती असे वाटते.

माहितीपूर्ण प्रतिसाद | दीनार

धनंजय, अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद!

'दीनार' असाच उल्लेख काशिकावृत्तीत आहे का? 'दीनार' ची व्युत्पत्ति काय असावी?

आणखी एक उपप्रश्न : काशिकावृत्ती हे नेमके काय आहे?

रुप्यकम् - मोहोर, रुपया, दाम वगैरे

रुप्यकम् म्हणजे चांदीचे नाणे, रुपयाही त्यामुळे रुप्या (चांदी)पासूनच जन्मलेला आणि रुपे हे ज्ञानेश्वरांच्या आधी शेकडो वर्षे अस्तित्त्वात होतेच.

सुमारे ११ व्या शतकातील (ज्ञानेश्वरपूर्व) प्रतिहार राजांचे हे नाणे मला मिळाले.

त्यावरून रुप्याची नाणी ही होतीच (खरे तर हे सिद्ध करण्याची गरज नाही कारण त्या आधीही शेकडो वर्षे ती होती) पण यांना रूपया म्हणत असावेत का हे अद्यापही स्पष्टपणे सांगता येत नाही, पण शक्यता नाकारताही येत नाही.

विकी इतिहासाप्रमाणे रुपया हा शब्द शेर शहा सुरीने वापरात आणला. त्याने सोने, चांदी आणि तांब्याची नाणी पाडली. सोन्याची नाणी मोहोर, चांदीची नाणे रूपये आणि तांब्याची नाणी दाम म्हणून ओळखली जाऊ लागली.

पुरातन नाण्यांवर अधिक प्रकाश ही चर्चा टाकू शकेल.

पूर्वापार चलन म्हणून मुबलक उपलब्ध असणारे अन्न वापरले जात असावे असे वाटते. जसे, शेतकरी - धान्य, गायी, शेळ्या मेंढ्या, कोळी - मीठ, मासे, इ. यानंतर कवड्या, शंख, प्राण्यांचे दात, माशांचे (शार्क, व्हेल) दात यांचा चलन म्हणून उपयोग होऊ लागला.

नाणी पाडण्याची प्रथा सर्वप्रथम मेसोपोटेमिया, चीन, भारत येथे सुरू झाली. ग्रीकांच्या आक्रमणानंतर भारतीय नाण्यांवर राजांचे किंवा प्रमुख व्यक्तींचे चेहरे दिसू लागले.

पैसा या चलनासाठी कधीतरी पै-पै जोडून धन गोळा केले असे वाक्प्रचार आढळतात. यांतील ३ पै म्हणजे १ पैसा. पै हे सर्वात लहान परिमाण असावे.

कागदी नोटांची सुरूवात मात्र चीनमध्ये झाली. चंगीझ खानाने आपल्या शासनव्यवस्थेत कागदी नोटा वापरण्यावर अधिक भर दिला तर कुबलई खानाच्या राजवटीत कागदी नोटांना सर्वप्रथम अधिकृत स्थान प्राप्त झाले.

वा!

तुम्ही तर थोडक्यात चलनांचा इतिहासच दिलात! धन्यवाद.

मुहम्मद तुघलक् बद्द्लची आख्यायिका.

नाण्याच्या संदर्भात मुहम्मद बिन तुघलक् या दिल्लीपती सुलतानाची आठवण येते. त्याबाबतीतील कथा अशी सांगितली जाते की, या बादशहाच्या डोक्यात अनेक कल्पना येत. बर्‍याचदा या कल्पना खरोखरच अभिनव आणि मुख्य म्हणजे तत्कालीन प्रश्नांना सोडविण्याच्या दृष्टीने योग्यच असत. पण अंमलबजावणीच्या वेळी , काहीतरी महत्त्वाच्या त्रुटींमुळे बोजवारा उडे.

बादशहाला हे जाणवले की तत्कालीन चलनामधे सोने,रूपे यासारख्या महत्त्वाच्या धातूंचा व्यय होतो. खुद्द चलन बनवायलाच त्यामुळे जास्त खर्च यायचा ! तेव्हा त्याने असा फतवा काढला की, या मौल्यवान धातूंच्या ऐवजी तांब्या-पितळेसारख्या धातूंचा वापर करावा. यात अर्थात काहीच चूक नव्हते. त्याकाळी चीन सारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवस्था येत होत्याच की. केवळ एकच चूक त्याने केली. ती अशी की, आपल्या संकल्पनेला चालना मिळावी म्हणून कुणालाही टांकसाळ काढण्याची परवानगी मिळाली ! झाले . मग काय विचारता. काही महिन्यातच एकूण अर्थव्यवस्था कोलमडून पडायची वेळ आली ! शेवटी बादशहाला आपला हुकूम मागे घ्यावा लागला...

अधिक माहितीकरता विकी वाक्यं प्रमाणं !

नाण्यांसंबंधी

शरद
,नाण्यांसंबंधी -----
१] सनपूर्व ६०० च्या काळची नाणी भारतात सापडली आहेत. बहुधा भारत हा नाणी पाडणारा पहिला देश असावा.रोमहूननाणी आली हा दावा बाद केला गेला आहे.
२] काही प्राचिन नाण्यांची नावे पुढील प्रमाणे : निष्क, शतमान, कृष्णल,कार्षापण,[पण], सुवर्ण, धरण, पुराण, द्रम ,अर्धद्रम,रौप्यमाषक,इत्यादि.
३]नाणी तयार करावयाच्या काही पध्दती :
अ}चिन्हाहत [पंचमार्क] धातूचे चपटे तुकडे घेऊन त्यावर टोकदार चिन्हाकृती ठोकून खुणा अंकित करावयाच्या [सर्वात जुनी]
ब] ठप्पा -- धातूचे तुकडे तापवून त्यावर हव्या त्या चिन्हांचे व अक्षरांचे ठसे दाबावयाचे.
क] धातूचा रस साच्यात ओतून नाणी करावयाची.
४] धातू -- सोने, चांदी,शिसे,तांबे,कासे

समित्पाणी

दीनर,द्रम,इत्यादी

शरद
दीनार-- सोन्याचे ,सुमारे १२४ ग्रेन वजनाचे नाणे चंद्रगुप्त [द्वितीय] याच्या काळात प्रसारात आले.देनेरिअस या रोमन नाण्याच्या नावाचे दीनार हे हिंदीकरण.पुढे हे नाणे प्रचारातून कमी झाले. गुलाम सुलाअनाअंच्या राजवटीत सोन्याचे नाणे दीनार, चांदीचे दिरहम व तांब्याचे जितल अशी होती.
कार्षापण [किंवा पण]-- तांब्याच्या कार्षिकाला कार्षापण म्हणत. कर्ष ही गुंजेसारखी एक बी,त्यावरून कार्षापण.
द्रम--६७ ग्रेन वजनाचे रोमन नाणे.त्यावरून दाम. शकांची व सातवाहनांची बरीच नाणी ३२ ग्रेनची म्हणजे अर्धद्रम होती.
दमरी--दामाचा आठवा भाग[त्यावरून दमडी ?]
समित्पाणी

माहिती आवडली.

शरदराव, दोन्हीही प्रतिसाद माहितीपुर्ण आहेत, आवडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच

दोन्ही प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. अनेक धन्यवाद! आणखी माहिती असेल तर कृपया द्यावी.

दोनदा झाल्यामुळे

प्रकाटाआ

 
^ वर