संत साहित्यातील कविता -३

शरद यांनी या लेखावर दिलेल्या प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.

संतांच्या कविता :
प्रथम थोडे अवांतर. भोज राजाच्या दरबारात कालिदासासारखी रत्ने होती तसेच बरेच विद्वानही होते. काही एकपाठी, काही द्विपाठी,काही त्रिपाठी . म्हणजे पहिल्याने एकदा वाचले-ऐकले की पाठ व्हावयाचे, दुसर्‍याला दोन वेळात तर तिसर्‍याला तीनदा ऐकून. भोज राजाने एकदा गंमत करावयाचे ठरवले.त्याने दवंडी पिटवली की "कोणी कवी नवीन कविता करेल तर त्याला एक लाख रुपये
बक्षिस मिळेल".कवींना वाटले झालोच आपण लक्षाधीश. दरबारात ही रांग. मजा अशी की कोणत्याही कवीने नवीन कविता म्हटली की एकपाठी ती लगेच म्हणून दाखवावयाचा. दोनदा ऐकून झाली की द्विपाठी उठावयाचा.तो म्हणावयाचा.झाले. राजा म्हणावयाचा " ही कसली नवी कविता? एव्हड्या सगळ्यांना माहित असलेल्री?" कवी हिरमुसला होवून निघून जायचा. सगळ्यांची हीच गत.
एकदा एक म्हातारा कालिदासाकडे आला. काकुळतीने म्हणाला ," थोडी अडचण आहे, मदत करा". कालिदास म्हणाला "मी पैसे देत नाही पण एक कविता देतो.उद्या दरबारांत म्हणून दाखव.राजा पैसे देईल" सकाळी दरबारात येऊन त्याने कविता सुरु केली
" राजा, तुझ्या वडीलांनी माझ्याकडून दहा लाख रुपये उसने घेतले होते व याला तुझ्या दरबारातील लोक साक्षी आहेत." कविता संपली. एकपाठी, द्विपाठी सगळे गप्प. साक्ष कोण देणार? राजाने हसत हसत पैसे दिले.
आता तुम्ही म्हणाल " या गोष्टीचा आणि संतांच्या कविता यांचा काय संबंध?" संबंध आहे. माझे ठाम मत आहे की तुम्ही लोक भोजाच्या दरबारात एकपाठी, द्विपाठी वगैरे होता. कशावरून? ज्ञानेश्वर महाराजांची पुढील रचना एकदा किंवा दोनदा वाचा आणि बघा तुम्हाला ती पाठ झाली आहे की नाही? हां, व्यनि पाठवावयाची गरज नाही, माझी तुमच्याबद्दल खात्री आहे.

काट्याच्या अणीवर वसली तीन गावें दोन ओसाड एक वसेचिना !
वसेचिना तिथे आले तीन कुंभार दोन थोटे एक घडेचिना !
घडेचिना त्याने घडली तीन मडकी दोन कच्ची एक भाजेचिना !
भाजेचिना त्यांत रांधले तीन मुगे दोन हिरवे एक शिजेचिना !
शिजेचिना तेथे आले तीन पाहुणे दोन रुसले एक जेवेचिना !
जेवेचिना त्याला दिल्या तीन म्हशी दोन वांझ्या एक फ़ळेचिना !
फ़ळेचिना तीला झाले तीन टोणगे दोन मेले एक जगेचिना !
जगेचिना त्याचे आले तीन रुपये दोन खोटे एक चालेचिना !
चालेचिन तिथे आले तीन पारखी दोन आंधळे एका दिसेचिना !
दिसेचिना त्याला मारल्या तीन बुक्क्या दोन हुकल्या एक लागेचिना !
ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव सद गुरुवाचून कळेचिना!

स‌द्गुरु मिळेपर्यंत ज्ञानबाची "मेख" हाती लागणे अवघडच म्हणा पण तरीही पद [कीं वात्रटिका?] वाचतांना मजा वाटते ना?
समित्पाणी
डिस्क्लेमर; आपण पंडित आहा हा माझा एक अंदाज,चु,भु.दे.घे.
भोजाच्या दरबारांत आपण पंडित होता असे म्हटले असले तरी येथे पुनर्जन्माबद्दल वाद घालू नये.यनावाला सरांबरोबर आमचे चांगले संबंध आहेत. प्रत्यक्ष भेटींमध्यें त्यांच्याशी बोलत असतोच..
समित्पाणी

Comments

वा वा

मस्त आहे कविता. मजा आली वाचून.
आपला हा उपक्रम छान आहे. लेख आणि प्रतिसाद् दोनही चांगले आहेत (मागच्या दोन लेखांना आलेले).
अजून कविता वाचायला आवदतील.
-- लिखाळ.

मस्त!

कविता मस्त आहे. या कवितांची ओळख करून देणारा तुमचा उपक्रम चांगला आहे.

ही कविता मार्मिक आहे. विशेषतः 'बुक्क्यां"ची ओवी वाचून गंमत वाटली. या कवितेत रूपयाचाही उल्लेख आला आहे. त्यावेळी रूपये हे चलन होते का असा एक प्रश्न चाटून गेला. दुसर्‍या चर्चेत याचा उहापोह झाल्यास मजा येईल.

स्नेहल भाटकर!

स्नेहल उर्फ वासुदेवबुवा भाटकर ह्यांच्या आवाजात हे गाणे कैक वेळा ऐकलेले आहे. मस्त आहे काव्य,चाल आणि गायन!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

 
^ वर