संत साहित्यातील कविता

संतांनी फ़क्त अभंग व ओव्याच लिहल्या असे नाही. त्यांनी काही सुरेख कविताही लिहल्या आहेत. आज आपण लावत असलेले कोणतेही चांगल्या कवितेचे निकष लावले तरीही उत्तीर्ण होतील अशी काव्ये संत साहित्यांत मिळतात.तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा एक खेळकर कविता म्हणून आपण आस्वाद घेऊ.
त्याचे असे झाले,कोंकणांत मीठ विकावयाला नेले ,व्यापारांत लाखाचे बारा हजार केले, म्हणून लोक टिंगल करावयाला लागले. म्हणून तुकारामांनी ठरवले की यावेळी नक्की खपेल असाच माल विकावयाचा.निवडक,’ युनिक",लोकप्रिय वगैरे.
त्यांना एकदम आठवण झाली कृष्णाची,गोकूळांत सर्वांच्या,विशेषत: बायकांच्या,जरा जास्तच मर्जीत होता. व आताही पंढरपूरांत बरे चालले होते. मग देहूतही खपेलच.मोठ्या आशेने,संतांकडे थोडीफ़ार उसनवार करून,देव घेतला,हातगाडीवर टाकला व निघाले गल्ली-बोळातून ओरडत :

देव घ्या कोणी देव घ्या कोणी आइता आला घर पुसोनी!
देव न लगे देव न लगे सांठवणाचे रुधले जागे!
देव मंदला देव मंदला भाव बुडाला काय करूं!
देव घ्या फ़ुका देव घ्या फ़ुका न लगे रुका मोल काही!
दुबळा तुका भावेविण उधार देव घेतला ऋण!

पण नशीबच फ़ुटके त्याला काय करणार! लोक म्हणाले,"देव नको, साठवायला जागाच नाही".खपतच नाही म्हटल्यावर, वैतागून, परत कोठे न्यावयाचा म्हणून, सांगावयाला लागले "पैसे देवू नका, फ़ुकट घ्या". तरी लोकांचा धोशा एकच."जागा नाही,फ़ुकट देखील नको". बाहेर कितीही आव आणला तरी कोणालाही हृदयांत देव नकोच असतो, लोभ-द्वेषादि षड्रिपूनी भरलेल्या हृदयांत देवाला जागा कुठे मिळणार? समाजाच्या दांभिकपणावर नेमके बोट ठेवावयास महाराजांना हलकी
फ़ुलकी "कविता" पुरते.

समित्पाणी

Comments

अतिशयोक्ती-

संत साहित्यात उच्च दर्जाचे काव्य तर आहेच.
विशेषतः भगवंताचे वर्णन करताना तर भक्तीरसपरिपोष ओतप्रोत दिसतो. शिवाय इतर रसही पदोपदी आढळतात.
मराठी संतवाङ्मयात आणखी एक वैशिष्ट्य आढळले - ते म्हणजे अतिशयोक्ती अलंकाराची सर्वोत्कृष्ट उदाहरणे.
चटकन आठवणारे ज्ञानेश्वरांचे उदाहरण -
मुंगी उडाली आकाशी| तिने गिळीले सूर्यासी||

अशी अनेक उदाहरणे देता येतील. सध्या वाचत असलेल्या एकनाथी भागवतात एक मोठाच परिच्छेद या अलंकाराने नटलेला आहे. येथे या कवीची प्रतिभा दिसून येते.

आणखी एक उदाहरण

मराठी संतवाङ्मयात आणखी एक वैशिष्ट्य आढळले - ते म्हणजे अतिशयोक्ती अलंकाराची सर्वोत्कृष्ट उदाहरणे.

एकनाथांचा एक अभंग अतिशयोक्तीचे उत्तम उदाहरण आहे.

चिंचेच्या पानावर देऊळ रचियले
आधी कळस मग पाया रे

दो मुखी हरिणी पाण्यावर आली
मुखाविण पाणी प्याली रे

पाषाणासी पाझर मृगजळ डोही
वांझेचा पुत्र पोहला रे

एका जनार्दनी एकपण विनवी
हरिच्या नामे तरलो रे

ऐकला तसा, आठवेल तसा दिला आहे. चूभूद्याघ्या.

मुक्ताबाई

चटकन आठवणारे ज्ञानेश्वरांचे उदाहरण -
मुंगी उडाली आकाशी| तिने गिळीले सूर्यासी||

"मुंगी उडाली आकाशी, तिणे गिळीले सूर्यासी" हे मुक्ताबाईचे काव्य आहे. यात (आणि अशा इतर संतकाव्यात) अतिशयोक्ती हा अलंकार म्हणून आला असला तरी उद्देश हा त्यातून काहीतरी सुचवायचा असतो (दॄष्टांत) . त्यात पुढे असे पण म्हणले आहे:

थोर नवलाव झाला, वांझे पूत्र प्रसवला
विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय
माशी व्याली घार झाली
देखोनी मुक्ताई हासली...

मराठी साहित्य ही खाणच

मराठी साहित्य ही विचारान्ची खाण आहे. वरील ओळी वाचून हेच जाणवले.

उत्तम काव्यगुण

हे टिकाऊ संतसाहित्याचे वैशिष्ट्य आहे.

आमच्या देवळातील बुवाच्या रटाळ (पण मनाने चांगल्या) कीर्तनापेक्षा तुकोबांचे अभंग अधिक स्मरणात राहातात. याचे कारण तुकोबांचा उच्च काव्यगुण असावा.

या सुरेख उदाहरणाबद्दल शरद यांना धन्यवाद.

काव्यगुण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"मनात उचंबळणार्‍या भावभावनांची समर्पक शब्दांत केलेली अभिव्यक्ती म्हणजे काव्य" अशी व्याख्या आहे. तदनुसार तुकोबांचे अभंग म्हणजे काव्यच होय."अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी| धरीताही परी | आवरेना", "तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें| लपवितां खरे | येत नाही||"असे आपल्या अभंगाविषयी तुकोबांनी स्वतःच म्हटले आहे.तसेचः

जोडीलीं अक्षरे|नव्हती बुद्धीची उत्तरे|
नाही केली आटी |काही मानदंभासाठी|
कोणी भाग्यवंत| तया कळेल उचित|
तुका म्हणे झरा| मुळीचाच आहे खरा|

या अभंगात आपल्या कवितेचा मूळ श्रोत खरा आहे. कुणा भाग्यवंताला हे समजेल. असेही म्हटले आहे.इथे उपक्रमावर श्री.शरद यांच्यासारखे सदस्य अभंगाचा अर्थ विशद करतात तेव्हा आपल्या वाट्याला ते भाग्य थोडे आले आहे असे वाटते. धन्यवाद!

देव घ्या कुणी....

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अभंग पुढील प्रमाणे मांडला तर अर्थ कळणे सोपे होते:
.....

तुकारामः-- " देव घ्या कुणी देव घ्या कुणी आइता आला घर पुसोनी!''
लोक :-----"देव न लगे देव न लगे सांठवणाचे रुधले जागे!"
तुकाराम (स्वगत):--"देव मंदला देव मंदला भाव बुडाला काय करूं!? "
तुकाराम (प्रकट):--- "देव घ्या फ़ुका देव घ्या फ़ुका न लगे रुका मोल काही!"
लोक :-----"देव न लगे देव न लगे सांठवणाचे रुधले जागे!"
तुकाराम (स्वगत):--"दुबळा तुका भावेविण उधार देव घेतला ऋण!"

(शेवटी तुकाराम(स्वगत) लिहिले आहे ते योग्य की अयोग्य याविषयी साशंक आहे.)

वा उत्तम!

यनावाला यांची मांडणी आवडली.

प्रक्षिप्त भाग

तुकारामांच्या काव्य / अभंगाची सुसंगती लावताना भाषेची तर्कसंगती विचारात घ्यावी लागते. प्रक्षिप्त भाग हा तुकारामांच्या आत्ताच्या उपलब्ध साहित्यात कधी कधी दिसुन येतो असे इतिहास संतसाहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे सांगतात. सदानंद मोरे हे तुकारामांचे वंशज आहेत. तुकारामाच्या अभंगांचा आपल्या वैचारिक प्रवाहाला आधार आहे असे ठसविण्यासाठी प्रक्षिप्त भाग घुसडला जातो.
तुका म्हणे जगजेठी ........ असे म्हणुन वाट्टेल ती रेटारेटी केली जाते हे बहुसंख्यांना विदितच आहे.
प्रकाश घाटपांडे

प्रक्षिप्त नव्हे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"(शेवटी तुकाराम(स्वगत) लिहिले आहे ते योग्य की अयोग्य याविषयी साशंक आहे.)"


याचा अर्थ एवढाच की मी जे लिहिले आहे :तुकाराम (स्वगत) असे ते योग्य आहे का? की स्वगत ऐवजी दुसरे काही हवे? एवढीच शंका.

दुबळा तुका भावेविण उधार देव घेतला ऋण

|
हे तुकोबांचे आहे याविषयी मुळीच शंका नाही.श्री.प्रकाश घाटपांडे यांचा कदाचित् चुकीचा समज झाला असावा.

सर्वसाधारण


हे तुकोबांचे आहे याविषयी मुळीच शंका नाही.श्री.प्रकाश घाटपांडे यांचा कदाचित् चुकीचा समज झाला असावा.


संत साहित्यातील् प्रक्षिप्त भाग अशा सर्वसाधारण पातळिवर तुकारामांच्या साहित्याबाबत मी विधान केले आहे. विवक्षित काव्याच्या नव्हे.संत तुकारामाच्या उधृत साहित्यात काही भाग सदानंद मोर्‍यांना प्रक्षिप्त भाग आढळला. माझ्याकडे तुकारामांचे काही जुने अभंग पडले होते ते मी त्यांना दाखवले होते. तेव्हा त्यांनी काही भाग प्रक्षिप्त असल्याचे सांगितले होते.

प्रकाश घाटपांडे

करितो कवित्त्व म्हणाल

करितो कवित्त्व म्हणाल हे कोणी ! नव्हे माझी वाणी पदरीची !!
माझिया युक्तीची नव्हे हा प्रकार ! मज विश्वंभर बोलवितो !!
काय मी पामर जाणे अर्थभेद ! वदवी गोविंद ते चि वदे !!
निमित्त मापासी बैसविलो आहे ! मी तो काही नव्हे स्वामिसत्ता !!
तुका म्हणे आहे पाईक चि खर ! वागवितो मुद्रा नामाची हे !!

(पुन्हा तुकाराम: दि.पु. चित्रें मधून घेतलेला अभंग )


कवित्त्वाचे सर्व श्रेय जसे तुकोबा विठ्ठलाला देतात तसे सर्व दोषांची जवाबदारीही ते विठोबावरच टाकतात. तुकोबा, कवी हा दुकानाच्या मालकाने गिर्‍हाईकांच्या पदरी माप टाकायला बसलेला सेवक समजतात. मूळ माल आणि माप मालकाचेच ही भूमिका घेतात. गोविंदाची नाममुद्रा वागवणारे आपण फक्त पाईकाची भुमिका करत आहोत असे ते सांगतात.

तुकारामाच्या अभंगाचा बराच भाग रोखठोक असाच आहे, चार दोन यमकांची जूळवा जूळव करुन कविता करणा-यांना त्यांनी चांगलेच धूतले आहे.

'' घरोघरी झाले कवी ! नेणे प्रसादाची चवी !!

असे उद्वेगजनक उद्गार ते काढतात. आपल्या अभंगाला त्यांनी स्वतःच दिशा देऊन, एक उद्दिष्ट आखलेले असावे, त्यामुळेच आपले अभंगलेखन म्हणजे वर यनासरांनी उदाहरण दिलेच आहे -


नाही केली आटी ! काही मानंदभासाठी
तुका म्हणे, झरा ! आहे, मुळचाचि खरा !!


असे सांगण्याचा त्यांनी अधिकार प्राप्त केला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक विचारणा!

वरील चर्चेतून माहिती आणि विचारांची कोणती देवाणघेवाण होते हे कुणी सांगेल काय?

इथे तर तुकोबांच्या कवितावर लेखन दिसते. माझ्या माहितीप्रमाणे हे लेखन ललितसाहित्यात मोडते. असे असताना माझे येथील काही ललितलेखन प्रकाशित केल्यापासून दुसर्‍याच मिनिटाला उडवून का लावले गेले हे कळेल काय?

उपक्रमराव अथवा संपादक मंडळ याबाबत काय तो स्पष्ट खुलासा करतील अशी आशा मी बाळगू का?

(संतप्त) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर