संत साहित्यातील कविता -२

शरद यांनी या लेखावर दिलेल्या प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.

आज आपण ज्ञानेश्वर महाराजांची एक कविता बघणार आहोत.विसाव्या शतकांत मनोविज्ञान संशोधिकांनी केलेल्या प्रयोगाचा वापर सातशे वर्षांपूर्वीच्या कवितेत आढळतो.प्रथम कविता बघू.

निळिये मंडळी निळवर्ण सावळी
तेथे वेधलिसे बाळी ध्यानरुपा !
वेधू वेधला निळा पाहे घननिळा
विरहिणी केवळा रंगरसने !
निळवर्ण अंभ, निळवर्ण स्वयंभ
वेधे वेधू न लभे वैकुंठीचा !
ज्ञानदेव निळी हृदयी सावळी
प्रेमरसे कल्लोळी बुडी देत !

बाळी- गोपी, अंभ- आकाश, स्वयंभ- विष्णु/कृष्ण
संशोधकांनी केलेला प्रयोग असा : एका कुत्र्याला खाणे द्यावयाच्या आधीं शिट्टी वाजवावयाची आणि लगेच खाणे द्यायचे. काही दिवसातच कुत्र्याच्या मनांत शिट्टी आणि खाणे यांची इतकी एकरुपता झाली कीं शिट्टी ऐकली कीं तो लगेचच शेपटी हलवू लागे, लाळ घोटावयास सुरवात करी; खाणे समोर नसेना कां !
गोकुळातल्या गोपीचे बघाना काय झाले आहे.बाहेर, उघड्यावर, कृष्णाचे ध्यान धरून बसली होती बिचारी,बहूदा "कौन गली गयो शाम" म्हणत आणि अचानक तिचे लक्ष वर, आकाशाकडे गेले.आणि अहो आश्चर्यं, तिला तेथे घननिळ दिसला कीं. निळा रंग आणि कृष्ण यांचे इतके एकीकरण मनांत ठसले आहे कीं आतां कोठेही,केंव्हाही निळा रंग दिसला कीं तिच्या समोर कृष्णच उभा रहातो.
माऊलींनी शब्द वापरला आहे "वेधला".अर्जुनाला जसा फ़क्त पक्षाचा डॊळाच दिसत होता, दुसरे काही नाही,अगदी तसेच! रंग ही रसना झाली.नव्हे, आता सर्व संवेदनाच केवळ "निळवर्ण’ झाल्या आहेत.
पण हे तुम्हा-आम्हाकरिता नाही बर का. आपण निळ्या आकाशात बुडलेला निळ्या रंगाचा "वैकुंठीचा स्वयंभ" वेगळा नाही करू शकणार.
माऊली म्हणतात त्यासाठी हृदयात सावळी साठवून प्रेमरसाच्या लाटांमध्ये बुडी घेता आली पाहिजे !
संतांचे निळ्य़ा रंगाचा असा उपयोग केलेले २०-२५ अभंग सहज सापडतात.
समित्पाणी

Comments

पाव्लोवियन बिहेवियर

तुम्ही उल्लेख केलेल्या प्रयोगाला पाव्लोवियन बिहेवियर किंवा क्लासिकल कंडिशनिंग अशी संज्ञा आहे. अधिक माहिती विकीवर येथे.

वर दिलेली विरहिणी पुलं-सुनीताबाईंनी केलेल्या मर्ढेकरांच्या, माफ करा, बोरकरांच्या काव्यवाचनात ऐकलेली आठवते. त्यात --
निळीये रजनी| मोतिया सारणी|
निळेपणी खाणी| सापडती||
असा चरण 'वेधु वेधला निळा'च्या आधी आहे. हा पाठभेदाचा प्रकार आहे का?

बाकी संतसाहित्यातील काव्यगुणांवरुन ज्ञानेश्वरांचीच 'कां भूमीचे मार्दव, सांगे कोंभाची लवलव, नाना आचारगौरव, सुकुलीनांचे' ही ओवी आठवली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

निळिये रजनी

शरद
निळिये रजनी मोतिया सारणी

हे ज्ञानेश्वर महाराजांचे निरांळे पद असून ८ कडव्यांचे, मोठे असल्याने, संपूर्ण देत नाही. निळिये मंडळीमध्ये या दोन ओळी येण्याचे कारण दिसत नाही. निळिये या शब्दामुळे गोंधळ झाला असावा.तरीही मर्ढेकरांच्या कविता वाचनांत माऊलींच्या दोन पदांचा समावेष होण्याचे कारण कळत नाही.
समित्पाणी

निळीये रजनी/मंडळी

वरील प्रतिसादातील टंकलेखनाच्या चुकीबद्दल क्षमस्व. मर्ढेकरांच्या ऐवजी बोरकरांचे काव्यवाचन म्हणायचे होते. त्यांच्या एका कवितेतल्या या ओळींत वरील विराणीतल्या भावनांचे प्रतिबिंब पडलेले दिसते --

असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे

जिथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवर निळा

आपणही होऊ निळ्या, करु त्याशी अंगसंग
निळ्या झाल्या, त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग

पुलंनी म्हटलेल्या विराणीतले शब्द असे -

निळीये रजनी, मोतिया सारणी, निळेपणी खाणी, सापडली
मन तो निळीये, गोविंदाचे सोये, विरहिणी पाहे, वाटुली ऐसी
ज्ञानदेवी निळिये, वाटुली गोविंदीं, कृष्ण निळियेपदी, ठाव झाला
वेधु वेधला निळा, पाहे घननीळा, विरहिणी केवळा, रंगरसने
ज्ञानदेव निळी, हृदयीं सावळी, प्रेमरसे कल्लोळी, बुडी देणे

'निळीये मंडळी'तले दोन चरण आणि निळीये रजनीतले तीन चरण यात एकत्र गुंफलेले दिसत आहेत.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

माहिती आणि विचार?

वरील चर्चेतून माहिती आणि विचारांची कोणती देवाणघेवाण होते हे कुणी सांगेल काय?

इथे तर ज्ञानेश्वर महाराज, मर्ढेकर आदींच्या कवितांवर चर्चा दिसते. माझ्या माहितीप्रमाणे ही चर्चा ललितसाहित्यात मोडते. असे असताना माझे येथील काही ललितलेखन प्रकाशित केल्यापासून दुसर्‍याच मिनिटाला उडवून का लावले गेले हे कळेल काय?

उपक्रमराव अथवा संपादक मंडळ याबाबत काय तो स्पष्ट खुलासा करतील अशी आशा मी बाळगू का?

(संतप्त) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर