दगड

दगड

दगडावरील कोरीव काम ही भारतीय खंडातली खास कला आहे.
याची तोड जगात कुठेही नाही.
दक्षिण अमेरिकेतही कोरीवकामे आहेत परंतु कोरीव कामे करणारी कारागीर मंडळी मात्र नाहीत. ही मंडळी स्पॅनीश लोकांनी कत्तली करून नामशेष केली आहेत.

भारतीय शैलीशी साधर्म्य सांगणार्‍या (की तीच असणार्‍या?) पुर्वे कडील इतर देशांमधे काय परिस्थिती या कलेची आहे याची काही कल्पना नाही.

भारतात मात्र आजही जिवंत असलेली ही कला आहे.
दगडावर कोरीवकाम करणारी अनेक घराणी आजही राजस्थान तसेच जगन्नाथ पुरी येथे आहेत. प्रत्येक घराण्याची एक स्वतंत्र शैलीही असावी असा माझा कयास आहे.

असे असले तरी, ही कला वेगवान जीवन पद्धाती मध्ये लुप्त होत चालली आहे का?
ही लुप्त होवू नये या साठी मला काही विचार सुचले आहेत.
कोणतीही कला वाढविण्यासाठी त्या कलेचे जोरदार विपणन करणे महत्वाचे असते. कोरीव कामा सारखेच आपल्या कलेसाठी विकत घेणारे कोरून काढणे
हे एक कौशल्यच आहे.

यासाठी भारतातील सर्व प्रकारांचे सर्वेक्षण केलेले कुणी व्यक्तिमत्व आहे का?
किंवा ही माहिती संकलित स्वरूपात कुठे मिळेल का?

कोरीव काम करणार्‍या कारागीरांची परिस्थिती काय आहे?
मागे मी मध्यप्रदेशातील कोरीवकामे असलेल्या जगप्रसिद्ध नग्न शिल्पांची मंदिरे पाहण्यासाठी गेलो होतो. मंदिरे आहुन झाल्यावर, तेथे एका मारवाडी माणसाचे भले मोठे एंपोरियम होते त्यालाही भेट दिली. कोरीव काम केलेल्या मुर्तींच्या किमती साधारण पणे दहा लाखापासून पुढे सुरु होत होत्या! त्या मालकाला माझ्यात काही रस नव्हता... कारण तेथे अनेक विदेशी ग्राहक तयार होते! पण त्यांच्या एका नोकराशी जराशी मैत्री केली तेंव्हा कळले की यात हा मालक कारागीरांना अंधारात ठेवून चांगलाच पैसा करतो आहे.
हे ऐकुन मात्र मी अस्वस्थ झालो होतो.
या सर्व विवेचना नंतर मला काही विचार/प्रश्न सुचले आहेत, ते खाली देतो आहे.

१. या कलेचे व कारागीरांचे जर चांगले व्यवस्थापन केले तर जगात कोरीव कामाची निर्यात भारत करू शकेल का?

२. तसे करून सहकाराद्वारे कारागीरांना व पर्यायाने ही कला जिवंत राखणार्‍यांना रॉयल्टीच्या पुपाने परतावा दिल्यासारखेही होईल.

३. लोखंडावर काम होवू शकते तसे दगडावर कोरीव काम करणारी यंत्रेही बनवता येतीलच. (फक्त पॅटर्न महत्वाचा आहे. शिवाय याचे पेटंट घेणेही!)

४. आपण काय देवू शकतो याची दणकट जाहिरात करून भारताची मक्तेदारी असलेली जागतिक बाजारपेठ बनवता येईल असे वाटते.

५. आधीच भारतातील कोरीवकामाचा दर्जा व कला जगात ज्ञात असल्याने वेगळे खास प्रयत्न करावे लागणार नाहीत. फक्त आता उपलब्धी आहे यावरही ही बाजारापेठ ताब्यातच घेता येईल.

आपल्याला काय वाटते या विषयी?

हे बिझिनेस मॉडेल व्यवहार्य आहे का?
आणि शक्य आहे का?

तसे नसेल तर, काय बदल केले तर शक्य आहे?

आपला
गुंडोपंत

Comments

वेगळा विषय - चांगले मुद्दे

गुंडोपंतांनी नेहेमी प्रमाणे वेगळाच विषय हाताळला आहे आणि चांगले मुद्दे मांडलेत!

या बाबतीत उत्तर देण्याऐवजी (मला वाटते) आचार्य अत्र्यांच्या गोष्टीतल्या सारखा प्रश्न विचारावासा वाटतो, "काय सांगू दगड?" :-)

दगडी कोरीव काम हे फक्त भारतातच जागृतावस्थेत आहे हे मला माहीत नव्हते.

बाकी कारागिरांच्या काळजीसंदर्भातील मुद्दे चांगले असले तरी त्यात आपण धंद्यात असलो आणि काही करू इच्छित असलो तरच शक्य आहे, नाहीतर तो नुसताच ऍक्टीव्हिझम होऊ शकेल. विना सहकार नाही उद्धार हे जरी बरोबर असले तरी आजही सर्व शेतकर्‍यांना उसाला भाव आणि सहकारी साखर कारखान्यांसंदर्भात हिंडावे लागतेच... तेंव्हा बरेच बदल लागतील - पण ते मुलभूत कायदाव्यवस्थेपासून लागतील असे वाटते.

सोबत

जर ही कल्पना व्यवहार्य असेल तर (या विषयीपण चर्चा होणे आवश्यक आहे) एक स्वतंत्र कंपनी स्थापणेच योग्य होईल अशी माझी धारणा आहे.

(सरकार कडून अथवा सरकार ने हे काम करावे अशी मात्र माझी आजिबात इच्छा नाही. ते लोक सगळ्याचा कार्यक्षमपणे बट्ट्यबोळ करून एखाद्या विदेशी कंपनीला कुरण मोकळे करतील!)

मात्र यातून एक उत्तम नफा कमावू शकेल असा उद्योग उभा राहु शकेल या विषयी माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही.
या नफ्यातून संलग्न असलेल्या पॅटॅर्न बनवणार्‍या कारागीरांना कायम रॉयल्टीच्या रुपाने काही तरी स्थैर्य देता येईल अशी अपेक्षा आहे.
या कारागीरांना कोरीवकाम माहिती आहे पण ते विकायचे कसे याची मात्र कल्पना नाही (काही कारागीर वगळून!) असा माझा समज आहे.

मात्र उसाशी याची तुलना होणार नाही कारण उस मोठ्या प्रमाणात लागवडी खाली आहे. हे कारागीर मात्र फक्त काही प्रमाणातच व विरळपणे उपलब्ध आहेत.

तसेच दगडासारखेच दिसणारे ओतीच काँक्रीट आणि दगडासारखे येणारे एनॅमल्स/रंग हे या धंद्याचे प्रमुख स्पर्धक आहेत!
आपला
गुंडोपंत

चांगला मुद्दा

गुंडोपंतांनी नेहेमी प्रमाणे वेगळाच विषय हाताळला आहे आणि चांगले मुद्दे मांडलेत!

असेच म्हणतो.

सरकार कडे सुरवातीला हे काम, देशव्यापी संघटन इ. करायची क्षमता आहे पण अजुन एक नवे महमंडळ उर्फ भ्रष्टाचाराचे कुरण बनायची शक्यता जास्त. त्यामुळे असे काम करणारे कारागीर आहेत त्यांनी आता एकत्र येउन काही केले तर शक्य आहे.

विकासराव, जयेश मागे म्हणाले तसे सामाजीक उद्यमशीलताद्वारे अश्या कारागीरांच्या संघटनेला व्यावसायीक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळाले तर गुंडोपंत म्हणतात तसे भारतीय कोरीवकाम उद्योग जगभर पसरला जाईल.

जेव्हा दोन देशात राजनैतीक, व्यावसायीक शिष्टमंडळे यांच्या गाठीभेटी, करार इ. होतात. त्या वेळेस भेटवस्तु आदानप्रदान होतात तेव्हा अश्या युनिकली भारतीय कलाकुसरीच्या वस्तु देउन, प्रदर्शने भरवुन ह्याचा प्रचार, प्रसार करता येईल.

पुर्वी राजाश्रय असलेली ही कला व अशी कलाकुसर असलेली नवी देवळे पण आता तितकी बनत असतील असे वाटत नाही. त्यामुळे
खरे तर चीन कसे मास प्रॉडक्शन करुन कित्येक लहानसहान [कमी टिकाउ ] पण आकर्षक दिसणार्‍या व आकर्षक किंमत असलेल्या गोष्टि बाजारात आणुन त्या जोरावर आधी बाजारपेठ तयार करतो, भरुन टाकतो. तसे काहीसे १००% हाताने नाही पण बरेचसे मशीन व वरची थोडी कलाकुसर् हाताने करुन अश्या सामान्यांना परवडतील अश्या किमतीत वेगवेगळ्या वस्तु बनवुन अश्या उद्योगाने मोठी बाजारपेठ तयार केली पाहीजे. चीन मधे देखील अश्या वस्तु करणारे कारागीर काही श्रीमंत नाहीत पण चीनी वस्तु जगाच्या कानाकोपर्‍यात जात आहेत. बाजारपेठ तयार होते.

एक उदाहरण देतो चीन मधे माझ्या एका मित्राचा कारखाना आहे तो वेगवेगळ्या आकाराचे [एकदम हातात मावेल इतका ते बहुमजली इमारती इतका ] चीनी कंदील बनवतो. आता त्या छोट्या कंदीलाची किंमत किरकोळ असते. पण जगभर ते कंदील गेल्याने त्यांचा सर्व खर्च निघतो. पण ह्या धंद्याला नव्या जमान्यात पाश्चीमात्य बाजारपेठेत कसे स्थान मिळवुन दिले आहे बघा. डिस्नेवर्ल्ड किंवा तश्या जगभरच्या थीम पार्कला कॉन्टक्ट् करुन शाळेच्या सुटिच्या दिवसात जेव्हा लहानमुले थिमपार्क मधे येतात त्या काळात. महिनाभर वेगवेगळे थीम वापरुन जसे डिस्ने कॅरेक्टरस्, किंवा समुद्रीजीव, अफ्रिकन सफारी इ. थीम मधे प्राण्यांच्या आकाराचे अतिभव्य सेट [आतुन लाईट म्हणुन कंदील म्हणायचे. रात्री खुप छान दिसतात. ], मग तिथे स्टॉल लावुन छोटे कंदील बनवायचे प्रात्याक्षीक, इतर लहान मुलांना उपयोगी उत्पादन करणार्‍या कंपन्यांना, खाण्याचे पदार्थ विकणार्‍यांना भाड्यावर स्टॉल. असे करत महीनाभर एक नेहमीच्या थीम पार्क मधे नवे सेक्शन चालवायचे. बरेच देश पर्यटन वाढावे म्हणुन काही सण, फेस्टिव्हल साजारे करते त्यात समजा परेड असली तर असा एक रथ [फ्लोट] बनवुन देणे. म्हणजे साध्या १०० रु च्या कंदीला पासुन परदेशात मिलीयन डॉलर्सचे प्रदर्शन करते ती कंपनी.

अवांतर - आणी हो पंत तिथला कारागीर पण गरीबच आहे पण बेरोजगार तर नाही.

महत्वाचे

प्रतिसाद अतिशय आवडला.
तसे काहीसे १००% हाताने नाही पण बरेचसे मशीन व वरची थोडी कलाकुसर् हाताने करुन अश्या सामान्यांना परवडतील अश्या किमतीत वेगवेगळ्या वस्तु बनवुन अश्या उद्योगाने मोठी बाजारपेठ तयार केली पाहीजे.

नेमक्या शब्दात माझा मुद्दा पकडलात!

तुमच्या मित्राची व्यवसाय कल्पना सुरेख आहे.
तसेच काहीशी सारखी पण आहे. सारखी यासाठी की, चीन ही कंदिल बनविणारी पहिली संस्कृते. अगदी तसेच कोरीवकामाच्या बाबतीत भारत!
म्हणजे बर्‍यापैकी जवळ जाणारे उदाहरण दिलेत!

आणी हो पंत तिथला कारागीर पण गरीबच आहे पण बेरोजगार तर नाही.

माझे पण हेच म्हणणे आहे हो...
श्रीमंतीच पहिजे असे नाही, फक्त स्थैर्य हवे!
जागतिक बाजारपेठेतून आणि पैसा भारतात आला पहिजे.

आपला
गुंडोपंत

द्वारकेतील शिल्पकार

द्वारकेच्या मंदिराच्या परिसरात अनेक शिल्पकार त्याच मंदिराच्या खांबां-भिंतींवरील बदलण्यायोग्य शिल्पे नव्याने खोदत बसलेली मी एकदा पाहिली होती. त्या मंदिराचे नूतनीकरण सतत चालू असते असे समजले. तसाच प्रकार वेरावळच्या सोमनाथ परिसरात होता. दक्षिणी भारतात मंदिरे असलेल्या प्रत्येक गावात, जगन्नाथपुरी आणि महाराष्ट्रातील पंढरपूर येथे जागोजाग दगडी शिल्पे विकणारे अनेक दुकानदार आणि पथारीवाले पाथरवट असतात. जबलपूरच्या भेडाघाटच्या नदीकिनारी बरेचजण संगमरवरी मूर्ती विकत असतात. या छॊट्या मूर्तिकारांपैकी काहीजण चांगली शिल्पे बनवू शकतील. त्यांची संघटना बांधून, त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचे काम एखाद्या माफक नफा तत्त्वावर काम करणार्‍या एन्‌जीओला करता येईल. प्रत्येक गावातील दगड वेगळा. द्वारकेला पोरबंदर स्टोन, जबलपूरला संगमरवर आणि संगजिरा तर दक्षिणेला चुनखडीयुक्त दगड. पंढरपूरचा मात्र काळा पाषाण. राजस्थानचा आणखी वेगळा. एन्‌जीओचा खर्च शिल्पांच्या विक्रीतून भागू शकेल....वाचक्‍नवी

उत्तम माहिती

अतिशय उत्तम माहिती दिलीत.
वेगवेगळा दगड वेगवेगळ्या ठिकाणी असणार याचा विचार मी केलाच नव्हता...
त्यातही या शिवाय सँडस्टोन महत्वाचा वाटतो आहे मला!

आपला
गुंडोपंत

उत्तम विचार

आजकाल हिंदू देवतांच्या प्लास्टिकच्या मूर्ती अनघड दगडांना चिकटवून आणि स्प्रेपेंट करून स्वस्तात विकण्याचा उद्योग (चीनी ?)लोकांनी सुरू केलेला दिसतो.
त्यापेक्षा सीएनसी मशीन्सच्या साहाय्याने खरोखर दगडाच्या मूर्ती तयार करून अल्पदरात विकता येतील.
असा प्रयत्न झाला तर त्याचे जगातून स्वागतच होईल.

गुंडोपंत, तुम्ही अशी एखादी योजना काढलीत तर शेअर्स घ्यायला माझी तयारी आहे. ;)

सीएनसी मशीन्सच्या

सीएनसी मशीन्सच्या विषयी अजून माहिती द्या ना.
ही फारच त्रोटक ओलख सांगितलीत.

माझ्या सारख्या ढ माणसाला कसे काय कळणार ?

आपला
गुंडोपंत

गुंडोपंत - सीएन्सी

सिएन्सी मशिन्स (काँप्युटराईज्ड न्युमरिकल कंट्रोल) मशीन्स आता आपल्या भारतातही गावोगावी पहायला मिळतात. ही मशिन्स प्रमुख्याने धातूपासून वेगवेगळे यांत्रिक भाग बनवण्यासाठी वापरली जातात. (तुमच्या गावी असलेल्या मशिन शॉपना भेट दिल्यास पाहू शकाल.)
अर्थात भारतात अजून दगड घडवणारी (शिल्पी) मशिन्स बहुदा फरशी नसावीत. पण परदेशात आहेत. उदाहरणादाखल हा शिल्पकार दुवा पहा. इथे दगडापासून कोरीव शिल्पे बनवणारी अनेक मशिने दिसतील. एकामूळ शिल्पाबरहुकूम अनेक शिल्पे विना-मानवीसायास बनवता येतील.

वा!

ही चर्चा वाचून हाच दुवा शोधत होतो.

अशा यंत्राने दगडी कोरीवकामाचे यांत्रिकीकरण होऊ शकेल, असे वाटते.

इन्नोवेटिव्ह बिझिनेस मॉडेल

फॅबइंडियाबद्दल आपण ऐकून असाल. सुमारे ३०० कोटी उलाढाल असलेली कंपनी देशभरातील ८४ दुकानांद्वारे व मुख्यत्वे संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभर भारतीय बनावटीची वस्त्र प्रावरणे विकते. या कंपनीने एक नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना अंमलात आणली आहे. तुम्ही याला सामाजिक उद्यमशीलतेचा एक नवीन पैलू म्हणू शकता.
या कंपनीने देशातील विविध राज्यांमध्ये ३५ उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. हातमागावर काम करणार्‍या सुमारे २०,००० गरीब विणकरांना या उपकंपन्यांचे भागधारक बनविले असून त्यामध्ये त्यांना ५१% वाटा दिला आहे. राजस्थान मधील अशाच एका विणकरांच्या कंपनीने नुकताच ५०% लाभांश जाहिर केला आहे. फॅबइंडिया किंवा या उपकंपन्या रोखेबाजारात नोंदणीकृत नसल्या तरी फॅबइंडियाने समभागधारकांना सहा महिन्यातून एकदा त्यांच्याकडील समभागांची खरेदी विक्री करण्यासाठी अंतर्गत व्यवस्था निर्माण केली आहे. तसेच कंपनी या विणकरांना रोखे प्रमाणपत्रावर नाममात्र दरात कर्जसुद्धा उपलब्ध करून देणार आहे, जेणे करून त्यांना सावकाराकडे जायची वेळ येऊ नये.
हावर्ड बिझनेस स्कूलने या अनोख्या प्रयोगाची दखल घेऊन यावर एक केस स्टडी सुद्धा बनविली आहे.

जयेश

चान्गला विषय

चान्गला विषय

 
^ वर