हिंदुस्थानी ख्याल गायकी, काही ढोबळ विचार!

राम राम मंडळी,

आज बर्‍याच दिवसांनी उपक्रमावर लिहायचा योग आला आहे. येथे अलिकडेच झालेल्या 'संस्कृतचे मारेकरी' या चर्चेदरम्यान 'असंस्कृत' या प्रतिसादात उपक्रमाच्या सन्माननीय सदस्या अदितीताईंनी,

देवालयांमधे देवस्तुतीपर ध्रुपदस्वरूपात असलेलं रागसंगीत सुलतानांच्या दरबारात आणून परमेश्वराऐवजी आक्रमक सुलतानांचं गुणवर्णन करणारी ख्यालगायकी ही साधारण पंधराव्या शतकापासून निर्माण झाली आहे.

हे वाक्य लिहिले आहे.

मी हिंदुस्थानी रागसंगीताचा आणि हिंदुस्थानी ख्यालगायकीचा एक विद्यार्थी आहे. अदितीताईंचे वरील वाक्य वाचून हिदुस्थानी ख्यालगायकीबाबत मला काही विचार मांडावेसे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. वास्तविक, मी संस्कृतचे मारेकरी याच लेखात उपप्रतिसाद देऊन हे विचार मांडू शकलो असतो परंतु माझ्या लेखनाचा भर संस्कृतसंदर्भात नसून हिंदुस्थानी ख्यालगायकीवर असल्यामुळे संस्कृतचे मारेकरी या चर्चेत विषयांतर टाळण्यासाठी हा स्वतंत्र लेख लिहीत आहे.

देवालयांमधे देवस्तुतीपर ध्रुपदस्वरूपात असलेलं रागसंगीत सुलतानांच्या दरबारात आणून परमेश्वराऐवजी आक्रमक सुलतानांचं गुणवर्णन करणारी ख्यालगायकी ही साधारण पंधराव्या शतकापासून निर्माण झाली आहे.

माझ्या मते सुलतानाचं गुणवर्णन करण्याचं निमित्त साधून निर्माण झालेली ख्यालगायकी हा एक अत्यंत शुभयोगच म्हटला पाहिजे! जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात ते खरंच वाटतं! कारण त्यामुळे ख्यालगायकीची आभाळाइतकी उंची, समुद्रासारखी अथांगता आपल्याला पाहायला मिळाली, अनुभवायला मिळाली! संगीताचा अत्त्युच्च आनंद देणारा ख्यालगायकीचा जणू खजिनाच रसिकांकरता खुला झाला!

ख्यालगायकीच्या निमित्ताने आपलं रागसंगीत अधिक समृद्ध झालं, अधिक संपन्न झालं असं माझं मत आहे. आजतागायत या ख्यालगायकीने आपल्याला किती द्यावं याची काही गणनाच नाही! त्याची यादी करायची म्हटली तर खालील काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत! तूर्तास इथे हे मुद्दे फक्त ढोबळमानाने मांडत आहे, सवडीनुसार यातील प्रत्येक मुद्द्यावर येथे किंवा अन्य संस्थळांवर विस्तृतपणे लिहिण्याचा माझा मानस आहे!

१) ख्यालगायकीची घराणी.

धृपदाला सर्वात जवळ असलेली नोमतोमवाली आग्रा गायकी, स्वराला केन्द्रबिंदू मानणारी किराणा गायकी, अष्टांगप्रधान असलेली ग्वाल्हेर गायकी, पेचदार आणि अत्यंत अवघड तानक्रिया असलेली जयपूर गायकी, ही आपल्या ख्यालसंगीतातील प्रमूख घराणी म्हणता येतील. त्या व्यतिरिक्त पतियाळा, रामपूर सेहेस्वान, मेवाती, भेंडीबाजार ही घराणी आणि या घराण्यांचं गाणं आपल्याला ख्यालगायकीनेच दिलं. किती वेगवेगळं परंतु तेवढंच सुंदर गाणं आहे या सगळ्या घराण्यांचं! एकेका घराण्याचा जन्मभर अभ्यास करावा इतकी ही घराणेदार गायकी समृद्ध आणि संपन्न आहे, अथांग आहे. माझ्या मते 'घराणेदार गायकी' ही आपल्याला ख्यालगायकीची सर्वात मोठी देन आहे.

२) बंदिशी.

अदितीताईंनी म्हटल्याप्रमाणे ख्यालगायकीच्या सुरवातीला सुलतानाचं वर्णन करणार्‍या काही बंदिशी असतीलही! त्या काळातील बंदिशींचा माझा अभ्यास नसल्यामुळे मी त्याबाबत काही भाष्य करणं हे योग्य होणर नाही. परंतु काळाच्या ओघात सुलतानाचं वर्णन करणार्‍या बंदिशी मागे पडल्या आणि इतर अनेक विषयांवरच्या उत्तममोत्तम बंदिशी अगदी आजतागायत आपल्याला ऐकायला मिळत आहेत ही आपल्याला ख्यालगायकीचीच देन आहे असं मी मानतो!

"देवालयांमधे देवस्तुतीपर ध्रुपदस्वरूपात असलेलं रागसंगीत" असा उल्लेख अदितीताई करतात. मान्य आहे! परंतु त्याचसोबत हेही तितकंच खरं की तेच रागसंगीत जेव्हा ख्यालगायकी स्वरुपात आपल्यासमोर आलं ते फक्त देवस्तुतीपरच नव्हे तर अनेक विषयांवरच्या उत्तमोत्तम बंदिशींचा साज लेवून आपल्यासमोर आलं!

अहो आपल्या ख्यालगायकीतील बंदिशींचं विश्व किती समृद्ध आहे! किती वैविध्यपूर्ण बंदिशी आहेत आपल्या ख्यालगायकीत! यात रामाचं वर्णन करणार्‍या, कृष्णाचं वर्णन करणार्‍या, देवीचं वर्णन करणार्‍या देवस्तुतीपर बंदिशी तर आहेतच, शिवाय आध्यात्मिक विचारांच्या, प्रियकर-प्रेयसीचं वर्णन करणार्‍या, गुरुची, गुरुशिष्य परंपरेची महती सांगणार्‍या, निसर्गाचं, ऋतुंचं वर्णन करणार्‍या, अश्या किती म्हणून बंदिशी सांगाव्यात? ख्यालगायकीतील या बंदिशींच्या निमित्ताने किती अनमोल काव्यनिर्मिती झाली आहे हा विचारही मला अत्यंत महत्वाचा वाटतो! ख्यालगायकीमुळे अधिक लोभसवाणं वाटणारं बंदिशीतील काव्य आणि उत्तमोत्तम बंदिशींमुळे अधिकाधिक समृद्ध होत गेलेली आपली ख्यालगायकी, असं हे सुंदर अद्वैत!

अण्णासाहेब भातखंडे, विलायतहुसेनखासाहेब, अण्णासाहेब रातंजनकर, गुणीदास जगन्नाथबुवा पुरोहीत यांसारखे अनेक अत्यंत गुणी व विद्वान बंदिशकार आपल्याला लाभले हेदेखील ख्याकगायकीचेच उपकार म्हणावे लागतील!

३) तालविचार -

एकताल, तीनताल, तिलवाडा, झुमरा, रूपक, झपताल, इत्यादी तालांची रंगत, खुमारी माझ्यासारख्या सामन्य रसिकाला ख्यालगायाकीमुळेच अनुभवता आली! ढोबळमानाने सांगायचं तर किराणा गायकीतला एकतालातील शांतपणा, अवघड जयपूर गायकीचा तेवढाच अवघड वाटाड्या असलेल्या धीमा त्रिताल, आग्रा-ग्वाल्हेरची रंगत वाढवणारे व रसिकांना टाळी धरायला लावणारे, बर्‍याचदा अशक्य वाटणार्‍या तिहाया जमवून अवचितपणे समेवर येणारा झुमरा किंवा तिलवाडा हे ताल! क्या बात है! ख्यालगायकीचं हे तालालयीचं अंग किती समृद्ध आहे! अहो मध्यलयीतला एखादा रूपक किंवा वरवर सोपा वाटणारा एखादा झपताल रंगवायला जन्मभराची तपस्या लागते!

४) ख्यालगायकीने दिलेले कलाकार -

मंडळी, हा तर फारच मोठा विषय आहे! नथ्थनखासाहेब, फैजमहम्मदखासाहेब, भास्कररबुवा, बडे गुलाम अली, अब्दुलकरीमखासाहेब, सवाईगंधर्व, सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, केसरबाई, मोगूबाई, भातखंडेबुवा, अण्णासाहेब रातंजनकर, थोरले व धाकटे पलुस्कर, वझेबुवा, विनायकराव पटवर्धन, अंतुबुवा, गजाननबुवा, मिराशीबुवा, जगन्नाथबुवा, अल्लादियाखासहेब, भुर्जीखासाहेब, मंजिखासाहेब, नारायणराव बालगंधर्व, मास्तर, रामभाऊ मराठे, भीमण्णा, किशोरीताई, मन्सूअण्णा! किती, नावं तरी किती घेऊ? किती आभळाइतके मोठे कलाकार दिले आपल्याला ख्यालगायकीने?! ही सगळी नावं इथे फक्त ढोबळमानाने लिहीत आहे. यांची ख्यालगायकी आणि ख्यालगायकीतील यांचे विचार हा स्वतंत्र लेखमालेचा विषय होईल. सवड मिळाल्यास या विषयावर लिहायचा मी नक्कीच प्रयत्न करेन!

असो..

तर मंडळी, हिंदुस्थानी ख्यालगायकी संदर्भात हे झाले फक्त काही ढोबळ विचार! पुढेमागे यावर विस्तृत लिहायचा विचार आहे.

सांगायचा मुद्दा इतकाच, की सुलतानाचं वर्णन करण्याकरता का होईना, परंतु ख्यालगायकीचा जन्म झाला तो तुम्हाआम्हा रसिकांची सांगितिक आयुष्य समृद्ध करण्याकरताच झाला असंच या निमित्ताने म्हणावंसं वाटतं!

आपला,
(हिंदुस्थानी ख्यालगायकीचा एक अल्पज्ञानी विद्यार्थी!) तात्या अभ्यंकर.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

Comments

वा!

वा तात्या! ख्यालगायनाचा घेतलेला हा धांदोळा फार आवडला!
संगीत, ख्यालगायन यातील माझं शास्त्रीय ज्ञान शुन्य असलं तरी इतकं मात्र जाणवलं की हा लेख ख्यलगायनाचं ऐश्वर्य ताकदिने उअतरवण्यात पूर्ण यशस्वी ठरला आहे

बाकी

पुढेमागे यावर विस्तृत लिहायचा विचार आहे.

हा विचार प्रत्यक्षात आला तर अतिशय आनंद होईल.

-ऋषिकेश

+१

पुढेमागे यावर विस्तृत लिहायचा विचार आहे.

++१

धन्यवाद

लेख आवडला म्हणेपर्यंत संपूनही गेला. अधिक विस्ताराने वाचायला आवडेल.

पुढेमागे यावर विस्तृत लिहायचा विचार आहे.

+++१

! यात रामाचं वर्णन करणार्‍या, कृष्णाचं वर्णन करणार्‍या, देवीचं वर्णन करणार्‍या देवस्तुतीपर बंदिशी तर आहेतच, शिवाय आध्यात्मिक विचारांच्या, प्रियकर-प्रेयसीचं वर्णन करणार्‍या, गुरुची, गुरुशिष्य परंपरेची महती सांगणार्‍या, निसर्गाचं, ऋतुंचं वर्णन करणार्‍या, अश्या किती म्हणून बंदिशी सांगाव्यात? ख्यालगायकीतील या बंदिशींच्या निमित्ताने किती अनमोल काव्यनिर्मिती झाली आहे हा विचारही मला अत्यंत महत्वाचा वाटतो!

अशा वेगवेगळ्या काव्यांची काही उदाहरणेही अशा लेखामध्ये दिली तर फारच चांगले.


काही उदाहरणे

तात्या, लेख आवडला!
काही उदाहरणे -
रामाचं वर्णन - आये रघुवीर धीर (मुलतानी)
कृष्णाचं वर्णन - शाम बजाये आज मुरलिया (यमन), कुंज बिहारी थारी रे (शुद्ध बराडी) ...(अनेक आहेत)
देवीचं वर्णन - निरंजनी नारायणी (भैरवी) / माता कालिका (अडाणा),
देवस्तुतीपर - आदि महादेव (शंकरा), पवन सुत हनुमान (हंसध्वनी), निरंकार (नट नारायणी)
आध्यात्मिक विचार - आज तो आनंद आनंद (अहीर भैरव), कोई नहीं है अपना (भटियार)
प्रियकर-प्रेयसीचं वर्णन - प्रीत मोरी लाग रही तुम संग मोहन (गोरख कल्याण), जाओ जी जाओ शाम छलिया (शुद्ध सारंग)
गुरुची / गुरुशिष्य परंपरेची महती- गुरु आग्या में निसदिन रहिये (सिंध भैरवी), गुरु चरणन में ध्यान लगाओ (बिलासखानी तोडी)
निसर्गाचं, ऋतुंचं वर्णन करणार्‍या - बरखा ऋतू आयी (मल्हार), आयी चांदनी रात शरदकी (मधुकंस),
और राग सब बन बाराती (बसंत)

अशी अनेक उदाहरणे सापडतील. यातल्या काही रचना तर खुद्द संस्कृत मध्ये आहेत!

आक्रमक सुलतानांचे वर्णन करणारी "इस नगरी में आज राज करो" ही मियाँ की तोडी मधील रचना मला तरी सुश्राव्य वाटते.

धन्यवाद...

धन्यवाद अमित!

निरनिराळ्या बंदिशींची तू खरंच खूप छान उदाहरणं दिली आहेस. अजूनही अशी अनेक उदाहरणे देता येतील. हरप्रकारच्या वैविध्यपूर्ण अश्या बंदिशींनी प्रामुख्याने आपली आग्रा व ग्वाल्हेर गायकी समृद्ध आहे..

या निमित्ताने मी बांधलेल्या 'कृष्ण व होळी' या विषयाशी निगडीत यमनकल्याणमधील एका बंदिशीचा इथे दुवा देऊ इच्छितो! ही बंदिश जरी ख्यालसंगीतातील असली तरी ती कुठल्याही सुलतानाला खुश करण्याकरता किंवा त्याचं वर्णन करण्याकरता बांधली गेलेली नाही हे इथे विनम्रपणे नमूद करू इच्छितो!

बंदिशीचे शब्द आहेत -

सजधज रंगत झुमे ब्रिजवा
नंदसुत खेलत होरी संगवा..

ठुमकत नाचत आवत गिरिधर..
लुपतछुपत सब गोपी राधा.
बिनती करत अब,
छेडो ना मनवा, छोडोरी संगवा, डारो ना रंगवा,
पीत, हरीत, नील, धुमल, पाटल.

रचनाकार - धनश्री लेले.
स्वर - वरदा गोडबोले.
राग - यमनकल्याण.
ताल - अध्धा त्रिताल.
स्वररचना - तात्या अभ्यंकर.

ख्यालगायकीतील ही बंदिश ऐकून सुलतान प्रसन्न होईल किंवा नाही हे माहीत नाही, परंतु देव़ळातला देव मात्र निश्चितपणे प्रसन्न होईल असा माझा अंदाज आहे! :)

असो...

आपला,
(ख्यालगायकीचा विद्यार्थी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

माझा अंदाज!

देवालयांमधे देवस्तुतीपर ध्रुपदस्वरूपात असलेलं रागसंगीत सुलतानांच्या दरबारात आणून परमेश्वराऐवजी आक्रमक सुलतानांचं गुणवर्णन करणारी ख्यालगायकी ही साधारण पंधराव्या शतकापासून निर्माण झाली आहे.

परमेश्वराच्या आवडीनिवडी बाबत मला पूर्ण कल्पना नाही तरीही ध्रुपदस्वरूपात असलेल्या रागसंगीताइतकंच सुलतानशाहीत जन्माला आलेलं आमचं ख्यालसंगीतही परमेश्वराला तितकंच आवडत असावं, प्रिय असावं असा माझा अंदाज आहे! शिवाय सच्च्या दिलाने केलेली संगीतसेवा ही परमेश्वराचरणी रुजू होते असं मला वाटतं, त्यामुळे देवालयाव्यतिरिक्त इतरत्र गायले गेलेले ख्यालसंगीतही परमेश्वरापर्यंत पोचत असावं असं मला वाटतं!

बाकी, चूभूदेघे! तज्ञ मंडळी या बाबतीत अधिक काय तो खुलासा करतीलच!

आपला,
(धृपदगायकी अथवा ख्यालगायकी तर खूप दूर राहिली, सुरेल जुळलेल्या तंबोर्‍याच्या जोडीवर नुसता षड्ज लावला तरी तो थेट परमेश्वरापर्यंत पोहोचतो असं मानणारा!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

+++ १

परमेश्वराच्या आवडीनिवडी बाबत मला पूर्ण कल्पना नाही तरीही ध्रुपदस्वरूपात असलेल्या रागसंगीताइतकंच सुलतानशाहीत जन्माला आलेलं आमचं ख्यालसंगीतही परमेश्वराला तितकंच आवडत असावं, प्रिय असावं असा माझा अंदाज आहे! शिवाय सच्च्या दिलाने केलेली संगीतसेवा ही परमेश्वराचरणी रुजू होते असं मला वाटतं, त्यामुळे देवालयाव्यतिरिक्त इतरत्र गायले गेलेले ख्यालसंगीतही परमेश्वरापर्यंत पोचत असावं असं मला वाटतं!

+१

इतकंच काय कव्वाली, भावगीते, लोकगीते, इ.इ. सुद्धा नक्की परमेश्वरापर्यंत पोचून त्याला आवडत असावीत असे मला वाटते.
संगीत ही देवाचीच गोष्ट आहे - "मद्भक्ता: यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि" असे त्यानेच म्हटलेले आहे ना?

- दिगम्भा

+१

माझे सासरे म्हणतात तशी हिंदी चित्रपटांतीलही कितीतरी गीते देवाला उद्देशून किंवा देवाने म्हटल्याप्रमाणे लागू होतात, त्याची आठवण झाली!

पाकिझामधील यूंही कोई मिल गया था.. गाइडमधले " तेरे मेरे सपने " ही गाणी त्यांची मनात असलेली चौकट मोडून वर सांगितल्याप्रमाणे गाऊन पहा..

"जाणत्याचे लिहीणें"

...लेख नेहमीप्रमाणे सुरेख झाला आहे.

शतकानुशतकांच्या मुसलमानी राजवटीमधे भारतातल्या कला आणि संस्कृतीमधे कशी भर घातली , विचारांचे , कलेचे आदानप्रदान कसे आणि कुठेकुठे झाले असा एक महत्त्वाचा मुद्दा तात्यांच्या या लेखनातून समोर येतो. त्याबद्दल इतरांना बोलता येईलच.

चांगले स्फुट

आवडले तात्या!

शतकानुशतकांच्या मुसलमानी राजवटीमधे भारतातल्या कला आणि संस्कृतीमधे कशी भर घातली , विचारांचे , कलेचे आदानप्रदान कसे आणि कुठेकुठे झाले असा एक महत्त्वाचा मुद्दा तात्यांच्या या लेखनातून समोर येतो.

चीअर्स!!

छान सुरूवात

ढोबळ लेख आता पुढील लेखाबद्दल अपेक्षा निर्माण करणारा आहे, त्याच्या अपेक्षेत आहे.

काही विस्कळीत पण लेखाशी संबंधित विचार, आणि निरीक्षणे:

"धृपदाला सर्वात जवळ असलेली नोमतोमवाली आग्रा गायकी" : ज्या विधानावरून हा लेखप्रपंच घडला, त्याच्या संदर्भात हे थोडे वैशिष्ठ्यपूर्ण वाटते. धृपद-धमारांची मूळ कल्पना जर हिंदू देवळात देवस्तुति करण्यासाठी झालेली होती, तर आग्रासारख्या ठिकाणी त्यांचा परिपूर्ण वापर करण्याची संकल्पना कुणाची असेल बरे?

काही वर्षांपूर्वी सुदानी वाद्यसंगीताची एक सी. डी. घेतली होती, ती एका तेथील (मुसलमान) कलाकाराने वाजवलेल्या सुंदरीसारख्या छोट्या शहनाईची होती. आपल्याला (निदान मलातरी) शहनाई (सनई) हे देवळात वाजवले जाणारे वाद्य असे माहित होते. गोव्यातील देवळात रोज संध्याकाळी नगारखान्यात सनई- चौघडा अजूनही वाजवला जातो. पण ही सनई सुदानमध्ये कशी होती? इकडून ती तिथे गेली की तिथून आमच्या इथे आली आणि आमची झाली? आणि ह्यावरून आठवले, माझ्या माहितीप्रमाणे, उस्ताद बिस्मील्ला खान अगदी शेवटपर्यंत बनारसच्या मंदिरात दररोज 'देवाची सेवा' म्हणून शहनाई वाजवत असत.

आणि 'आमचा असा' तो भूप चिनी संगीतात कसा मुबलक आहे?

"शतकानुशतकांच्या मुसलमानी राजवटीमधे भारतातल्या कला आणि संस्कृतीमधे कशी भर घातली , विचारांचे , कलेचे आदानप्रदान कसे आणि कुठेकुठे झाले असा एक महत्त्वाचा मुद्दा तात्यांच्या या लेखनातून समोर येतो. त्याबद्दल इतरांना बोलता येईलच. "

ह्याबाबतीत माझे थोडे, जे सहज जाणवले ते येथे लिहीत आहे, मूळ विषयाच्या गांभिर्याला ह्यामुळे बाधा येऊ नये अशी आशा करतो. हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात हिंदू, मुसलमान तसेच ख्रिश्चनांनी महत्वपूर्ण हातभार लावला आहे. लताबाई, आशाबाई, गीता दत्त, मुकेश, मन्न डे, किशोर कुमार, रफीसाहेब, सी. रामचंद्र, रोशन, मदन मोहन, शंकर-जयकिशन, जयदेव, बर्मन पितापुत्र, नय्यर, चित्रगुप्त, दत्ताराम, पुण्यवान, लालाभाऊ गंगावने, नौशाद, सज्जाद हुसैन, अनिल बिस्वास, अब्दुल करीम, गुलाम महम्मद, महम्मद शफी, सलील चौधरी, राजेंद्र कृष्ण, शकील, साहिर, खैय्याम, सॅबूस्टियन, ऍंथनी घोन्साल्वीस, चिक चॉकलेट, केर्सी लॉर्ड, मनोहारी सिंग, बासू... किती नावे घ्यायची!! हे सगळे अठरापगड धर्मांचे, जातीचे, विवीध प्रांताचे लोक एकत्र आले आणि भारतीय समाजजीवनावर कायमचा ठसा उमटवून गेले ते त्यांच्या टीमवर्कने!

वा तात्या वा !!!

हिंदुस्थानी ख्याल गायकीचा घेतलेला आढावा आवडला.
सहज असे समजावून सांगितले तर कोणत्याही विषयाची रुची वाढते,
आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले लेखन.

पुढेमागे यावर विस्तृत लिहायचा विचार आहे.

वाट पाहतोय !!!

-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(तात्याचा लेखनाचा फॅन )

वा! तात्या!

लेख आवडला.
जरा सूक्ष्मात जाऊनही लिहिलेत तर बरे होईल.
पुढच्या लेखांची वाट पहात आहे.

सहमत आहे

एक चांगली लेख मालिका तयार होऊ शकेल. लेख आवडला.

पुढील लेख वाचण्यास उत्सुक

तात्या,

ख्यालगायकीवर लिहिण्याची एकही संधी तुम्ही सोडत नाही हे खरेच कौतुकास्पद आहे! :)
तनमनधनाने एखाद्या विषयाला वाहून घेतलेले असल्याखेरीज हे शक्य नाही.
उपरोल्लेखित ४ मुद्द्यांवर अधिक विस्ताराने लिहिले जावे - शक्यतो एक लेखमाला ह्या स्वरुपात - अशी अपेक्षा वावगी ठरु नये.

चतुरंग

वा तात्या वा

खूप दिवसानी उपक्रमावर् तुमचे लिखाण वाचून् छान् वाटले.

नवीन बंदिशी

शरद
नवीन विषयाला सुरेख सुरवात. आगे बढो.
१] आपण दिलेल्या यादीमध्द्ये पं. कुमार गंधर्व यांचेही नाव यावयालाच पाहिजे. जुन्या व स्वरचित नवीन रागांमध्द्ये पंडितजींनी सुरेख रचना केल्या आहेत.
२] आपल्याकडच्या संतांच्या अभंगांना,भक्तिगीतांना रागांत-तालांत बसविण्याचे काम अनामिक संगीतकारांनी पुर्वीच करून ठेवले आहे.तुलसीदास,सूरदास, मीराबाई, ब्रह्मानंदस्वामी, तुकाराम आदींच्या रचनांना सुयोग्य रागांत आणि तालांत बसविणे किती अवघड आहे? हे जाणकारांनीच आम्हाला [पक्षी.:अडाण्यांना] अवष्य सांगावे.

समित्पाणी शरद

छान!

तात्या,
'ढोबळ विचार' आवडले! :)

धृपदाला सर्वात जवळ असलेली नोमतोमवाली आग्रा गायकी, स्वराला केन्द्रबिंदू मानणारी किराणा गायकी, अष्टांगप्रधान असलेली ग्वाल्हेर गायकी, पेचदार आणि अत्यंत अवघड तानक्रिया असलेली जयपूर गायकी,

याविषयी अधिक माहिती आणि शक्य झाल्यास दुवे अवश्य द्या.

उपरोल्लेखित ४ मुद्द्यांवर अधिक विस्ताराने लिहिले जावे - शक्यतो एक लेखमाला ह्या स्वरुपात - अशी अपेक्षा वावगी ठरु नये.

चंतुरंगांशी सहमत आहे.

तूर्तास इथे हे मुद्दे फक्त ढोबळमानाने मांडत आहे, सवडीनुसार यातील प्रत्येक मुद्द्यावर येथे किंवा अन्य संस्थळांवर विस्तृतपणे लिहिण्याचा माझा मानस आहे!

वाट पाहत आहोत.

मस्त लेख

तात्या,

आपला हा लेख देखील मस्त आहे. संगीताबद्दल शास्त्र म्हणून जरी अनभिज्ञ असलो तरी गाणे म्हणून जास्तच जवळीक आहे. संगीत अथवा कुठलीही कला, कोणी ही तयार केली असली तरी ती कुठल्याही सामजीक बंधनात (आमची-त्यांची) बांधली जाऊ नये असे वाटते.

वर अनेक गाण्यांचा उल्लेख झाला आहे. मला आवडणारे एक रामावरील गाणे (जयदेव यांनी स्वरबद्ध केलेले):

जैसे सुरज की गरमी से जलते हुए तनको मिल जाए तरूवर की छाया

आभार/काही उत्तरे..

सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार..

कर्ण,

अशा वेगवेगळ्या काव्यांची काही उदाहरणेही अशा लेखामध्ये दिली तर फारच चांगले.

अमितनी दिली आहेतच मीही सवडीने केव्हातरी नक्की देईन. उदाहरणे तर खूपच आहेत...

दिगम्भा, (च्यामारीऐतके दिवस होतात कुठे? :)

इतकंच काय कव्वाली, भावगीते, लोकगीते, इ.इ. सुद्धा नक्की परमेश्वरापर्यंत पोचून त्याला आवडत असावीत असे मला वाटते.

नक्कीच! धृपदाव्यतिरिक्तही इतर अनेक गानप्रकार परमेश्वराला आवडतात असा माझा कयास आहे!

चित्रा,

पाकिझामधील यूंही कोई मिल गया था.. गाइडमधले " तेरे मेरे सपने " ही गाणी त्यांची मनात असलेली चौकट मोडून वर सांगितल्याप्रमाणे गाऊन पहा..

क्या बात है! ही गाणी फारच सुरेख आहेत..

प्रदीपराव,

धृपद-धमारांची मूळ कल्पना जर हिंदू देवळात देवस्तुति करण्यासाठी झालेली होती, तर आग्रासारख्या ठिकाणी त्यांचा परिपूर्ण वापर करण्याची संकल्पना कुणाची असेल बरे?

माझा एकंदरीतच घराण्यांच्या इतिहासापेक्षा त्या त्या घराण्यांच्या गायकीचा थोडा अधिक अभ्यास आहे. त्यामुळे आग्रा गायकीचं निमित्त काय, याबद्दल मी फारसं काही सांगू शकणार नाही. परंतु नोमतोमवाली आग्रा गायकी ही धृपदापसूनच आलेली आहे अशी माझी माहिती आहे. नथ्थनखासाहेब, विलायतहुसेनखासाहेब, या मंडळींची या गायकीवर हुकुमत होती. खास करून फैय्याजखासाहेबांचं तर आग्रा गायकीत खूपच योगदान आहे. चतुरपंडित भातखंडेबुवा, भास्करबुवा बखले, अण्णासाहेब रातंजनकर, जगन्नाथबुवा पुरोहित, दिनकरराव कायकिणी आदी मंडळींची या गायकीवर हुकुमत होती/आहे. नोमतोम व्यतिरिक्त बोलबनाव हे आग्रा गायकीचं ठळक वैशिष्ठ्य म्हणता येईल. आणि बोलबनाव करण्यास अत्यंत सोयीच्या अश्या एकापेक्षा एक सुरेख बंदिशी हेही आग्रा गायकीचं अगदी खास वैशिष्ठ्य!

आलाप अंगापेक्षा, बंदिशीच्या बोलअंगाने राग पुढे न्यायचा, ही आग्रा गायकीची खासियत! रागाला धरून, लयीच्या अंदाजाने बंदिशीतील शब्द उलगडत संवाद साधल्यागत बोलबनाव करणे हे आग्रा गायकीचं मर्मस्थान!

आणि म्हणूनच, 'हम राग नही, बंदिश गाते है' असं आग्रावाले मोठ्या कौतुकाने सांगतात आणि तसे गातातही! बंदिशीच्या अंगाने बोलबनाव करत करत, संवाद साधत साधत पुढे जाणारी आग्र्याची ख्यालगायकी श्रोत्यांना खरंच आनंद देऊन जाते! अगदी अलिकडच्या काळात पं यशवंतबुवा जोशी अगदी ऑथेंटिक आग्रा गायकी गातात. खूप गंमत आहे बरं का आमव्या यशवंतबुवांच्या गाण्यात!

आणि ह्यावरून आठवले, माझ्या माहितीप्रमाणे, उस्ताद बिस्मील्ला खान अगदी शेवटपर्यंत बनारसच्या मंदिरात दररोज 'देवाची सेवा' म्हणून शहनाई वाजवत असत.

सहमत आहे!

अवांतर - बनारसच्या गंगाकिनारी उघड्या मैदानात कधी काळी बिस्मिल्लाखासाहेबांनी आणि भीमण्णांनी एकत्र जोर-दंड- बैठका काढल्या आहेत, भरपूर तालीम केली आहे अशी एक गंमतीशीर आठवण मला भीमण्णांनी सांगितली होती! :)

आणि 'आमचा असा' तो भूप चिनी संगीतात कसा मुबलक आहे?

कल्पना नाही! चिनी संगीताच्या भूपातलं एखादं उदाहरण/दुवा द्या म्हणजे जमल्यास त्याबाबत मी काही भाष्य करण्याचा यत्न करेन!

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात हिंदू, मुसलमान तसेच ख्रिश्चनांनी महत्वपूर्ण हातभार लावला आहे. लताबाई, आशाबाई, गीता दत्त, मुकेश, मन्न डे, किशोर कुमार, रफीसाहेब, सी. रामचंद्र, रोशन, मदन मोहन, शंकर-जयकिशन, जयदेव, बर्मन पितापुत्र, नय्यर, चित्रगुप्त, दत्ताराम, पुण्यवान, लालाभाऊ गंगावने, नौशाद, सज्जाद हुसैन, अनिल बिस्वास, अब्दुल करीम, गुलाम महम्मद, महम्मद शफी, सलील चौधरी, राजेंद्र कृष्ण, शकील, साहिर, खैय्याम, सॅबूस्टियन, ऍंथनी घोन्साल्वीस, चिक चॉकलेट, केर्सी लॉर्ड, मनोहारी सिंग, बासू... किती नावे घ्यायची!! हे सगळे अठरापगड धर्मांचे, जातीचे, विवीध प्रांताचे लोक एकत्र आले आणि भारतीय समाजजीवनावर कायमचा ठसा उमटवून गेले ते त्यांच्या टीमवर्कने!

लाख मोलाची बात! वरील अनेकांनी आपापाल्या परिने उत्कृष्ट दर्जाची संगीत मेजवानी रसिकांना दिली आहे व ती देतांना यापैकी अनेकांनी हिंदुस्थानी रागसंगीताचा व ख्यालसंगीताचा अतिशय सुरेख उपयोग करून घेतला आहे! यातील काही मंडळी ही विधिवत, रीतसर ख्यालगायकी शिकलेले आहेत असेही इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते!

ह्याबाबतीत माझे थोडे, जे सहज जाणवले ते येथे लिहीत आहे, मूळ विषयाच्या गांभिर्याला ह्यामुळे बाधा येऊ नये अशी आशा करतो.

मुळीच नाही, आपला मुद्दा मला विषयानुरुपच वाटतो!

शरद,

नवीन विषयाला सुरेख सुरवात. आगे बढो.

जरूर बढेंगे! बस, आपके शुभकामनाओंकी जरूरत है! :)

१] आपण दिलेल्या यादीमध्द्ये पं. कुमार गंधर्व यांचेही नाव यावयालाच पाहिजे. जुन्या व स्वरचित नवीन रागांमध्द्ये पंडितजींनी सुरेख रचना केल्या आहेत.

अगदी सहमत आहे. अनवधानाने त्यांचं नांव राहून गेलं. क्षमस्व..!

रंगराव,

ख्यालगायकीवर लिहिण्याची एकही संधी तुम्ही सोडत नाही हे खरेच कौतुकास्पद आहे! :)

काय करणार! कधी कधी या विषयावर लिहायची हुक्की येते व ती आम्ही आमच्या अल्पमती, अल्पज्ञानानुसार लिहून जमेल तशी भागवतो! :)

विकासराव,

संगीत अथवा कुठलीही कला, कोणी ही तयार केली असली तरी ती कुठल्याही सामजीक बंधनात (आमची-त्यांची) बांधली जाऊ नये असे वाटते.

अगदी खरं!

असो, सर्व वाचकवरांचे पुनश्च एकदा मन:पूर्वक आभार...

आपला,
(हिंदुस्थानी ख्यालगायकीचा एक विद्यार्थी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर