मराठी भाषा : इतिहास आणि विकास
कोणती भाषा केव्हा जन्माला आली हे सांगणे अवघड असते. भाषा एखाद्या कोणत्या क्षणी झाली आणि कोणत्या क्षणी नष्ट झाली असे म्हणता येत नाही. भाषा ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुसर्या भाषेची सुरुवात नसते. म्हणून मराठी भाषा इथून सुरुवात झाली असे म्हणता येत नाही.
भाषेचा कालखंड या प्रमाणे आहेत.
वेदपुर्वकालीन भाषा - इ. स. पू. ५००० च्या पूर्वी
वैदिक, ब्राह्मण, सौत्र उपनिषदे -इ. स.पू. ५००० ते इ. स.पू. १०००
पाणिनीय संस्कृत- -इ.स.पू. १००० ते इ. स. पू.२००
पाली -इ.स.पू. ६०० ते इ. स. पू. २००
महाराष्ट्री, मागधी, शौरसेनी, पैशाची -इ. स. पू. २०० ते इ.स. २००
अपभ्रंश -इ.स.पू. ४०० ते इ.स. ७००
मराठी, गुजराथी, हिंदी, इत्यादी -इ.स. ७०० च्या दरम्यान
मराठी भाषा आर्य भाषाकुळात उत्पन्न झाली असे समजल्या जाते. वेदपुर्वकालीन भाषेची कल्पना वेदसमकालीन वाङ्मयावरुन ठरवावे लागेल. येथील मूळ लोकांची भाषा कोणती होती हेही सांगणे जरा अवघडच आहे. आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्या भाषेचे नाव काय होते या बद्दल मतभेद आहेत, इंडो-युरोपियन, इंडो-जर्मन, इंडो क्लासिक, आर्यन, इत्यादी इत्यादी. तरीही आर्यांची भाषा आर्यन हे जरा बरोबर वाटते. वेदभाषेत देव, शाल,अग्नी, पशू, पितृ, नृ, रै, गौ इत्यादी शब्द वेदपूर्व भाषेत हेच शब्द देवह, शालाह, अग्नय,पशव,पितर, नर-नार, रय-राय,गव-गाव असे आहेत. प्राकृत भाषा ही प्राचीन भाषा आहे. अतिप्राचीन काळात ती आर्याची एक बोली भाषा असावी. सुशिक्षित वर्गाची भाषा वैदिक तर सर्वसामान्याची भाषा प्राकृत असावे. वैदिक भाषेत अनेक प्राकृत शब्दात आढळतात. जसे, वक= वक्र, वहू=वधू, मेह=मेघ, पुराण= पुरातन, चन्दिर=चंद्र , इंदर= इंद्र,मरन्द= मकरंद. त्यानंतर पाणिनीय संस्कृत भाषेची अवस्था येते. महाकवी व्यास, वाल्मिक यासारख्या कवींनी या भाषेला प्रगल्भता आणली. कालिदास, भवभूती, दण्डी, बाण, शंकररामानुज, इत्यादी लेखकांनी ही भाषा समृद्ध केली. वैदिक संस्कृत ही पाणिनीय संस्कृतपेक्षा इराणमधील 'अवेस्ता' भाषेशी अधिक जवळची वाटते. इंडो-इराणियन भाषा गटात वैदिक संस्कृत आणि इराणमधील अवेस्ता या भाषांचा समावेश होतो.
पुढे प्राकृत भाषेपासून मराठी उत्पन्न झाल्याच्या खुणा या प्राकृत भाषेत दिसत असल्या तरी प्राकृत भाषा ही एकच होती असे समजण्याचे काही कारण नाही.ती सामान्य लोकांची बोलीभाषा असावी. ती बोली ज्या ज्या प्रदेशात बोलल्या जात असावी त्या प्रदेशावरुन त्या त्या भाषेला ती नावे मिळाली असावी. महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, पैशाची, अवन्तिका, प्राच्या, इत्यादी प्राकृत भाषा महत्त्वाच्या मानल्या जातात. समाजात वावरणारे वेग-वेगळे घटक वेगवेगळी प्राकृत भाषा बोलत असत असे नाट्यशास्त्रात सांगितले आहे म्हणतात. पद्याची भाषा महाराष्ट्री, शौरसेनीभाषा राजस्रिया व दुती बोलत, दरबारात काम करणार्या स्रिया या मागधी बोलत. कोळसे विकणारे पैशाची, सैनिक,राजपुत्र व्यापारी अर्धमागधी बोलत. विदुषक आणि इतर पात्र प्राच्य भाषा, तर मोळी विकणारे शाबरी अशी वेगवेळी भाषा समाजातील विविध घटक बोलत असत.
प्राकृत भाषेचे प्रमुख प्रकार असे
१) वेदकालीन प्राकृत- प्राथमिक अवस्था.
२) मध्ययुगीन प्राकृत - पाली, महाराष्ट्री शौरसेनी इत्यादी
३)महाराष्ट्री- शौरसेनी सारख्या भाषांची अपभ्रंश भाषा
४)हिंदुस्थानातील सध्याच्या रुढबोली.
वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात मात्र त्यांच्यात एकमत अजूनही दिसून येत नाही.
मराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी-
१) वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारे विशेष सापडतात. पण एवढ्यावरुन अभ्यासक तिला प्राकृत पासून निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स. ५०० - ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही.
२) संस्कृत पासून मराठी भाषा निर्माण झाली असे एक मत आहे. संस्कृतपासून मराठी निर्माण झाली नाही कारण वर्णांने बदल, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारणातील फरक, वाक्प्रचार, इत्यादी बाबतीत दोन्हीही भाषेत खूप वेगळेपणा आहे. जे थोडेफार साम्य आहे ते पुरेसे नाही.
३)प्राकृतापासून मराठी भाषा निर्माण झाली असे मत आहे. पण कोणत्या प्राकृत भाषेपासून याचेही नेमकेपणाने उत्तर मिळत नाही. संस्कृत,प्राकृत, अपभ्रंश या भाषेचे थोडे थोडे गूण दिसतात. पण याच प्राकृत पासून मराठी जन्माला आली असे म्हणता येत नाही. प्राकृत भाषेपासून आधुनिक बोली तयार झाल्या आहेत जश्या शौरसेनीपासून हिंदी, सिंधी. गुजराथी भाषा अपभ्रंशी पासून, तर बंगाली मागधी पासून. मराठी भाषेच्या बाबतीत असे म्हणता येत नाही. जेव्हा एखादी भाषा एखाद्या विशिष्ट भाषेपासून तयार झाली असे आपण म्हणतो तेव्हा तिचे मूळ भाषेच्या व्याकरणाचे सर्व रुपे स्वीकारलेली दाखविता आले पाहिजे. मराठीचे संदर्भात असे दिसते की, नामविभक्तीचा भाग मराठीने अपभ्रंश भाषेपासून तर आख्यात -विभक्ती क्रियापदाचे प्रत्यय वगैरे महाराष्ट्रीपासून घेतलेले दिसतात.
मराठी भाषेत निरनिराळ्या प्राकृत भाषेच्या ज्या लकबी दिसतात त्यावरुन त्या प्राकृत भाषेपासून मराठी निर्माण झाली असे समजते जाते.
१) पाली या या प्राकृत भाषेतील काही गोष्टी मराठी भाषेत दिसतात.बर्याच शब्दांची वर्णप्रक्रियेमुळे झालेली रुपे पाली भाषेत जशी आढळतात. तशी ती मराठी भाषेत दिसतात.
पाली : तृण, प्रावृष,पीडन,गूड
मराठी: तिण, पाऊस, पिळणे, गूळ
पाली भाषेतील ळ हा वर्ण पाली आणि पैशाची भाषेशिवाय दुस-या भाषेत नाही.
'ळ' हा वैदिक भाषेत आहे म्हणतात पण संस्कृत भाषेत नाही. 'ळ'हा वर्ण द्रविडी भाषेतून मराठीत आला आहे.
२) पैशाची भाषा
पैशाची भाषा: ऊन, तहान, कान, रान,
मराठी भाषा: उष्ण, तृष्णा,कर्ण,अरण्य
पैशाच्या भाषेतील वरील शब्द आजही मराठीत दिसतात. पैशाच्या आणि काही प्राकृत भाषेत 'ण' नाही
३) मागधी भाषा
मागधी भाषेच्या काही खुणा मराठी भाषेत आढळतात. मागधी भाषेत 'र' आणि 'स' या बद्दल 'ल' आणि 'श' वर्ण येतात. 'ष्ट' बद्दल 'स्ट' आणि 'स्थ' बद्दल 'र्थ' येतो. जसे, मिसळ =मिशळ /मिश्र, केसर = केशर.
प्राकृत अर्धमागधीचे बरेच विशेष मराठी भाषेत आढळतात. अर्थमागधीची रुपे माहाराष्ट्रीशीही जुळतात. दीर्घ स्वर र्हस्व करण्याची प्रवृत्ती मराठीने अर्थमागधी भाषेतून उचलली आहे. जसे, कुमर= कुमार
महाराष्ट्री भाषेची बरीच वैशिष्ट्ये मराठीत दिसतात, महाराष्ट्रीय आख्यात विभक्तीचे बरेच प्रकार ही महाराष्ट्री भाषेतून स्वीकारली आहे. जसे, हत्तीस= हत्तिस्स, आगीस = अग्गिस, करीन = करिस्सामो, करिशिल = करिस्सासि.
'मी' या सर्वनामाची सर्व रुपे महाराष्ट्रीच्या रुपाशी जुळतात. जसे अहस्मि = मी, आम्मि = मज, मए= मिया, म्या, मझतो = मजहुनि, मज्झ = मज. अनेकवचनी रुपे, अम्हे= आम्ही, अहमसुंतो = आम्हाहुनी, अहम= आम्हा.
अपभ्रंश भाषा :अपभ्रंश ही अभिरांची भाषा होती. आभीर जमात गुजरात, कोकण, विदर्भात स्थायिक झाली.
मराठी काव्यात असणारी अन्त्य 'यमक पद्धती' अपभ्रंश भाषेपासून मराठीने स्वीकारली आहे.
संस्कृत भाषेपासूनही मराठीने काही बाबी स्वीकारल्या आहेत.
१) ऋ, ई, औ, हे वर्ण संस्कृतमधे आणि मराठी भाषेतही आहेत. प्राकृत भाषेत हे वर्ण नाहीत.
२) ड; त्र ही अनुनासिके संस्कृतमधे आहेत. ते मराठीत आली.
३) अनेक संस्कृत शब्द मराठीने स्वीकारलेले आहेत. त्यात तत्सम आणि तद्भव शबांदाचा समावेश आहे.
मराठी ज्या प्राकृत भाषेपासून निर्माण झाली त्यासाठी एक दीर्घ कालखंड गेला असणार. पाली, शौरसेनी, महाराष्ट्री, वगैरे प्राकृत भाषा समाजात मान्यता पावल्या म्हणजेच त्या भाषेतून ग्रंथ निर्मितीही झालेली आहे. आधुनिक भाषा निर्माण झाल्यावर प्राकृत भाषेतून ग्रंथ निर्मिती होत होती इ.स. ११०० पर्यंत अनेक ग्रंथ निर्माण झाले असावेत. निरनिराळ्या प्राकृत भाषेपासूनच पुढे मराठी भाषेची निर्मिती झाली. शैरसेनी भाषा बोलणारा राष्ट्रीक समाज, मागधी व महाराष्ट्री बोलणारा वैराष्ट्रीक समाज आणि आभीर समाज महाराष्ट्रात आले त्यातूनच मराठी भाषा बोलल्या जाऊ लागली.
मराठी भाषेची उत्पत्ती पाहण्यासाठी काही शिलालेख, ताम्रपट आणि अन्य मराठी भाषेचा उल्लेख असणारी काही साधने यांच्या आधारे आपण मराठी भाषेचा निर्मिती काळ शोधण्याचा प्रयत्न करतो.
आणि अभ्यासकांना मराठीचा पहिला शिलालेख सापडला तो म्हणजे १) उनकेश्वराचा शिलालेख इस. १२८९ ला. आणि त्याहीपेक्षा मागे जातांना श्रवणबेळगोळचा शिलालेख इ.स. ९८३ ला. त्याही मागे अनेक मराठीचे उल्लेख, शिलालेख सापडतात अगदी इ.स. ६८० च्या ताम्रपटात 'पन्नास, आणि प्रिथवी' हे शब्द आहेत म्हणून मराठीची सुरुवात माननारे अभ्यासक आहेत पण भाषातज्नाचे त्यावर एकमत होत नाही त्याचबरोबर 'धर्मोपदेशमाला' (इ.स. ८५९) या ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आहे. मराठी भाषा कशी आहे हे त्या दोन ओळीत सांगितले आहे.
''सललयि-पय-संचारा पयडियमाणा सुवण्णरयणेल्ला !
मरहठ्य भासा कामिणी य अडवीय रेहंती !!
मराठी भाषा सुंदर कामिणीप्रमाणे असून ती अटवीप्रमाणे सुंदर गतीची, मदनाने भरलेली आणि चांगल्या वर्णाची असे मराठी भाषेचे कौतुक केलेले आहे. 'कुवलमाला' या ग्रंथाचे लेखक उद्योतनसुरी यांच्या ग्रंथात १८ भाषेंचा उल्लेख येतो ही अठरा भाषा बोलणारी माणसे कशी आहेत त्याचा उल्लेख त्यात येतो. पण केवळ 'मराठा' या उल्लेखाने मराठा म्हणजे मराठी बोलणारे असे म्हणणे जरा घाईचे होईल. प्राकृत भाषा बोली भाषा म्हणून लोप पावल्यानंतर देशीभाषा सुरु झाल्या या देशभाषा गुप्त राजांच्या काळात होत्या.
सारांश, मराठी भाषेबाबत असे म्हणता येते की, मराठी भाषा ही कोणत्याही एका भाषेपासून सुरू झालेली नाही. महाराष्ट्री आणि अपभ्रंश भाषेचे उपकार मराठी भाषेवर अधिक आहेत. नारदस्मृतीत देशभाषांचा जो उल्लेख आहे तो 'मराठी' असा लक्षात घेतला तर मराठीचा उत्त्पत्तीकाळ इ.स. सनाच्या ५ व्या शतकापर्यंत मागे नेता येतो. प्रत्यक्ष मराठी वळणाचे शब्द इ.स. ६८० पासून शिलालेख आणि ताम्रपटात सापडतात.
पण आज तरी मराठी रुपाचे पहिले वाक्य इ.स. ९८३ चे ' श्री चावुण्डराजे करवियले' हेच आहे.
संदर्भ :
१) गोरे, डॉ. दादा : आधुनिक भाषाविज्ञान आणि मराठी भाषा, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद.
२)शेळके, डॉ. मोहन : प्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास, कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद.
३) शेणोलीकर, प्रा. ह. श्री. : प्राचीन मराठी वाड्मयाचे स्वरुप
Comments
संग्रहणीय लेख
मोठाच माहितीपूर्ण लेख. पुन्हापुन्हा वाचण्यासारखा.
असेच म्हणतो
संग्रहणीय लेख.
अतिशय छान, सुटसुटीत माहीती.
अवांतर - मला वाटले पैशाची भाषा - नफा, तोटा, कर्ज, व्याज, दिवाळखोर
असेच
सहमत आहे.
'भाषा आणि जीवन' नियमितपणे वाचा. इतरांनाही वाचायला सांगा.
+१
वा सर! लेख प्रचंड आवडला.
अजून एऊ दे!
-ऋषिकेश
+१
हेच म्हणतो !
+१
असेच.
छान
लेख खरंच खूप चांगला आणि माहितीपूर्ण झाला आहे. तुम्ही स्वतःची मते मांडली आहेत तेही मला आवडले. माझा या विषयाचा अभ्यास नसल्याने ती मते पटली की नाही ते मात्र सांगता येणार नाही.
हे अगदी तंतोतंत पटले. परंतू कोणत्या भाषेचा प्रभाव अधिक कोणत्या भाषेचा कमी यावर आपले मतभेद असू शकतात.
आधी म्हटल्याप्रमणे या विषयाचा माझा अभ्यास नाही. परंतू तरीही असे वाटते, की भारताच्या बाबतीत विचार करताना फक्त एकाच भाषेचा इतिहास बघून चालणार नाही. मराठीची इतर आधुनिक भारतीय भाषांशी (विशेषतः इंडो-आर्यन भाषांशी) तुलना करून पाहिलीत तर लक्षात येईल की त्यांच्यातही बरीच साम्यस्थळे आहेत. अगदी बिहारची मैथिली ही भाषा, जी अर्धमागधीपासून निर्माण झाली असे मानले जाते, तीही व्याकरणदृष्ट्या मराठीला बरीच जवळ आहे. शिवाय त्यांच्याकडे खोपा वगैरे सारखे काही खास मर्हाटी शब्द सुद्धा आहेत. ही एवढी साम्यस्थळे असण्याचे कारण या सर्व भाषांची आजी संस्कृत आणि पणजी वैदिक संस्कृत असल्याने असावे असे मला वाटते.
असो, चांगला लेख.
राधिका
ह्म्म्
कारण हेच आहे असे माझेही म्हणणे नाही. यासाठी अनेक कारणे असू शकतात. एक मी म्हणतेय ते, एक तुम्ही म्हणताय ते, किंवा वेगळ्याच कोणत्यातरी भाषेच्या संपर्कात या दोन्ही भाषा आल्याने, दोन्हींत होणारे सारखे बदल. व्याकरणाच्या दृष्टीने मला संस्कृतशी संबंध हे कारण अधिक शक्यता असलेले वाटते, कारण व्याकरणातील साम्यस्थळे ही बर्याच अंशी संस्कृतशी जुळणारी आहेत. खोपा वगैरे शब्द हा द्रविडी भाषांचा प्रभाव असावा का असे हल्ली वाटू लागले आहे. खोपाची व्युत्पत्ती पहावी लागेल. ओरिया आणि बंगाली भाषांवर द्रविडी भाषांचा प्रभाव असल्याने, या दोन भाषांत आणि मराठीत वेगळी साम्यस्थळे निर्माण झाली आहेत. मैथिली ही भाषा या दोन भाषांच्या आसपासच बोलली जाते. त्यामुळे संशयाला जागा आहे. पुन्हा एकदा- तेच एक कारण असेल असे मला म्हणायचे नाही.
राधिका
वा
मराठी भाषेवरचा हा लेख खूप आवडला.
भाषा ही दीर्घकाळचालणारी प्रक्रिया आहे. एका भाषेचा शेवट दुस-या भाषेची सुरुवात नसते. म्हणून मराठी भाषा इथून सुरुवात झाली असे म्हणता येत नाही.
अगदी खरे आहे, पटले.
आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्या भाषेचे नाव काय होते या बद्दल मतभेद आहेत,
अहो सर, पण इथे तर मुळात आर्य भारतात खरंच आले का यावरच मतभेद आहेत ;)
नारदस्मृतीत देशभाषांचा जो उल्लेख आहे तो 'मराठी' असा लक्षात घेतला तर मराठीचा उत्त्पत्तीकाळ इ.स. सनाच्या ५ व्या शतकापर्यंत मागे नेता येतो.
हे नवीनच कळले.
समाजात वावरणारे वेग-वेगळे घटक वेगवेगळी प्राकृत भाषा बोलत असत असे नाट्यशास्त्रात सांगितले आहे म्हणतात. पद्याची भाषा महाराष्ट्री, शौरसेनीभाषा राजस्रिया व दुती बोलत, दरबारारात कामकरणा-या स्रिया या मागधी बोलत. कोळसे विकणारे पैशाची, सैनिक,राजपुत्र व्यापारी अर्धमागधी बोलत. विदुषक आणि इतर पात्र प्राच्य भाषा, तर मोळी विकणारे शाबरी अशी वेगवेळी भाषा समाजातील विविध घटक बोलत असत.
म्हणजे समाजात वावरणे अवघडच होते की काय त्या काळात?
अर्थात आजही हे आहेच म्हणा! टॅक्सीवाल्या भैय्याची हिंदी वेगळी, भाजी वाल्याची वेगळी, मासे वाल्याची वेगळी वगैरे वगैरे.
बाकी तेंव्हाही स्त्रीया दरबारात काम करत हे वाचून बरे वाटले. (हल्ली दर बारात दिसतात ही गोष्ट वेगळी ;) )
एकुणच उदाहरणांनी सुस्पष्ट केलेलखा लेख सुंदरच आहे यात शंका नाहे.
संदर्भासहीत दिल्याने खुपच आवडला.
आपला
गुंडोपंत
झकास
लेख फार सुटसुटीत आणि सुंदर. धन्यवाद बिरुटेसाहेब. पुन्हा एकदा वाचतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मस्त लेख
खरच एवढ्या बाजुंचा विचार करुन मांडलेली महिती, कमाल् आहे!
पण म्या अल्प मती नुसार, किंचित भर् घालु इच्छितो.
एका भाषेचा शेवट दुस-या भाषेची सुरुवात नसते.
"यापेक्षा, एका भाषेची सुरुवात, पहिल्या भाषेचा शेवट नसतो" असं म्हटलं तर् जास्त स्पष्ट राहील.
अवाम्तरः-
महाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, पैशाची, अवन्तिका, प्राच्या, इत्यादी प्राकृत भाषा महत्त्वाच्या मानल्या जातात.
ह्यातील "पैशा"ची भाषा आता जगभर सगळ्यांना कळते!
:-) ;-)
बा़की, लेख खरच माहितीपुर्ण.
जन सामान्यांचे मन
चांगला लेख
चांगला लेख पण थोडा थोडा डोक्यावरून गेला. २-४ वेळा वाचायला हवा परंतु लेखाबद्दल धन्यवाद. ;-) तेव्हा थोडे अधिक स्पष्टीकरण देता येईल का? जसे,
म्हणजे कसे?
यापैकी इंद्र ही देवता मूळ भारतीय नाही. तिला आणले तथाकथित आर्यांनी. इंद्र, मरुत्, वरूण हे सर्व परकीय देव तेव्हा इंद्र हा शब्द प्राकृत कसा असावा?
संस्कृतही अवेस्ताशी जवळीक साधते हे खरेच आहे परंतु वैदिक संस्कृत ही पाणिनीय संस्कृतशी फारकत कशी घेते हे थोडक्यात सांगता येईल का?
अवघड प्रश्न :)
वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. म्हणजे कसे
वेदपुर्वकालीन भाषेत साधे स्वर, संयुक्त स्वर, आणि अर्धस्वर दिसतात. तिन्हीपैकी उच्चारदृष्ट्या अर्धस्वर हे प्रथमचे असावेत. अर्धस्वरापासून साधे स्वर निर्माण झाले आणि शेवटी संयुक्त स्वर असा क्रम आहे. तो संस्कृत मधे नाही असे म्हणतात. आणि अभिजात संस्कृत हे व्याकरण, छंद,मात्रा, गण, यामुळे ते परिपुर्ण होते. वेदात वेदपुर्वीचे शब्द आहेत पण ते अभिजात संस्कृत मधे नाहीत त्या पुर्वीच्या भाषेचा प्राकृत आणि मराठी भाषेशी संबध दाखवण्याचा प्रयत्न या विषयाचे अभ्यासक करतात.
यापैकी इंद्र ही देवता मूळ भारतीय नाही. तिला आणले तथाकथित आर्यांनी. इंद्र, मरुत्, वरूण हे सर्व परकीय देव तेव्हा इंद्र हा शब्द प्राकृत कसा असावा?
आपण म्हणताय ते पटण्यासारखे आहे, पण असा उल्लेख लेखाच्या निमित्ताने मिळाला 'इंद्रः व पावयां कुर्यात' ( तुम्हाला इंद्र रक्षिण्याचे करो ) आता तो कसा आला हे सांगता येणार नाही. पण उत्तरकालीन संस्कृतमधे वरील प्राकृत शब्द आहेत असे मत आहे, ते चूकही असू शकेल.
संस्कृतही अवेस्ताशी जवळीक साधते हे खरेच आहे परंतु वैदिक संस्कृत ही पाणिनीय संस्कृतशी फारकत कशी घेते हे थोडक्यात सांगता येईल का?
वैदिक भाषा व पाणिनीच्या वेळची संस्कृत भाषा या भाषेच्या दृष्टीने किती फरक आहे याबाबत ५०० वर्षाचे अंतर (अंदाजे- इथे कमी जास्त होऊ शकते ) धरले तर पाणिनीच्या वेळी संस्कृत भाषेचे उत्तम व्याकरण व कोश निर्माण झाल्यामुळे व भाषेचा एक स्थिरपणा अभिजात संस्कृतला आला असेल. वैदिक संस्कृतात संस्कृत पद्यरचनेतील गण, मात्रा, ही बंधने नाहीत. तसेच काही शब्दात, उच्चारणात फरक आहेत, वैदिक वाड्मयाच्या शेवटी पाणिनी झाला त्यामुळे मुख्य ब्राम्हणे व काव्यग्रंथ ही पाणिनीच्या वेळी प्राचिन झाले होते हे त्याच्या सुत्रावरुन निश्चित होते.
पाणिनीच्या सुत्रात वैदिक भाषेस ' छन्दसि' व लौकिक भाषेस 'इतिभाषायाम' असे म्हटलेले आहे. म्हणजे पाणिनीच्या वेळेस संस्कृत भाषा लोकांच्या बोलण्यात होती. पाणिनीनंतर ती फक्त पंडिताच्या बोलण्यात शिल्लक राहिली.;)
असो, संस्कृतच्या अभ्यासकांनी वैदिक भाषेस 'छन्दसि' असे का म्हटले आहे. त्याचा खूलासा केला तर या प्रश्नाच्या उत्तराला अधिक मदत होईल असे वाटते.
अजून सांगायचे होते पण थोडक्यात सांगा च्या सुचनेने आवरले आहे !!!
काय सर?
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पण,
काय सर, मस्करी करताय. लांबलचक प्रतिसाद लिहिण्यास तुम्ही वेळ वगैरे नसला तर हात आवरता घ्याल का काय असे वाटल्याने थोडक्यात लिहा असे सांगितले. चूक झाली... :-) अजून लिहिण्यासारखे जे जे असेल ते लिहा वेळ झाला की.
:-) मागे मनोगतावर संस्कृतसदृश परंतु नैसर्गिक भाषेविषयी जी घासून पुसून लख्ख झाल्यावर संस्कृत बनली अशा रीतीचा टग्यादादांनी एक प्रतिसाद लिहिला होता तो आठवला. दुर्दैवाने दुवा द्यायला आता सापडत नाहीये! :-(
छन्दसि
पाणिनींनी सर्वत्र वैदिक मंत्रांना "छन्दसि" असेच म्हटले आहे. ते का असे शोधायचा प्रयत्न केला तरी काही विशेष सापडले नाही.
पाणिनी व्यवहारातील भाषेला "भाषा" म्हणतात "इति भाषायाम्" असा कुठे प्रयोग असेल तर ते दोन शब्द आहेत. पतञ्जलींनी व्यवहारातल्या याच भाषेचा "लोके" "लौकिक" असा उल्लेख केलेला आहे. या "लोक"भाषेला आजकाल आपण "संस्कृत" असे म्हणतो. पतञ्जलींच्या उल्लेखावरून कळते, की ती भाषा अशिक्षित स्त्रियाही वापरत. (पुढे फक्त सुशिक्षित पुरुषच वापरू लागले.) पतञ्जलींच्या काळात या प्रमाणबोलीसह अनेक प्रांतीय बोली व्याकरणशुद्ध ("साधु") मानल्या जात. पण त्या काळात काही अपभ्रंश-प्राकृतेही बोलली जाऊ लागली होती. ती मात्र पतञ्जलींनी "साधु" मानलेली नाहीत.
वैदिक मंत्र सर्व छन्दोबद्धच आहेत.
बिरुटेसर म्हणतात तसे
"वैदिक संस्कृतात संस्कृत पद्यरचनेतील गण, मात्रा, ही बंधने नाहीत"
पण अक्षर-छन्द आहेत. हे अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात. त्यामुळे "बंधने नाहीत" असा अर्थ होऊ नये.
वैदिक छन्द म्हणजे : गायत्री, उष्णिक्, जगती, वगैरे.
(कुठल्याही सूक्ताच्या सुरुवातीला त्यातील छन्द कुठला ते देण्याची छापील संहितांमध्ये पद्धत आहे, तसेच पठन करताना "अमुक ऋषि, अमुक देवता, अमुक छन्द" असे पाठ करायची पद्धत आहे.)
उदाहरणार्थ ऋग्वेदातला प्रथम मन्त्र :
अग्निम् ईळे पुरोहितम् । यज्ञस्य देवम् ऋत्विजम् । होतारं रत्नधातमम् ॥
८ अक्षरे । ८ अक्षरे । ८ अक्षरे ॥
"वेद" म्हटले की त्याच्यात पद्य असलेला "मन्त्र" हा भाग आला, आणि गद्य असलेली "ब्राह्मणे" आली. ब्राह्मणांची रचना मन्त्ररचनेचा फार पुढच्या काळाची असावी. प्रत्येक ब्राह्मण हे बहुधा एका-एका लेखकानेच लिहिले असावे. ब्राह्मणांतली भाषा जवळजवळ पाणिनींच्या काळच्या बोलीभाषेशी जुळते.
वैदिक मन्त्रांतही अनेक वेगवेगळ्या बोली दिसतात. (या वेगवेगळ्या प्रांतांतल्या होत्या की वेगवेगळ्या काळांतल्या होत्या ते माहीत नाही.) ऋग्वेदातल्या दहा मंडलांपैकी १ले आणि १०वे मंडल यांची बोली एकसारखी आहे, आणि पाणिनींच्या काळातली बोलीभाषा या १/१० मंडलांतल्या बोलीभाषेच्या सर्वात जवळ जाते (असे काशिनाथ वामन अभ्यंकर म्हणतात.)
धन्यवाद, धनंजय !!!
धनंजय,
पाणिनींनी 'छन्दसी' आणि 'इतिभाषायाम' असे का म्हटले आहे, याची शोधाशोध केल्याबद्दल प्रथम आपले आभार !!!
पण अक्षर-छन्द आहेत. हे अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात. त्यामुळे "बंधने नाहीत" असा अर्थ होऊ नये
सहमत आहे, नाहीतच असे म्हणू नये. थोडी शोधाशोध केल्यावर ऋग्वेदात पुढील प्रमाणे छंद आहेत अशी माहिती मिळाली ज्याचा आपणही उल्लेख केला आहे. गायत्री,उष्णिक,अनुष्टुप,बृहती,पंक्ति,त्रिष्टुप, जगती,अतिजगती,शक्करी,अतिशक्करी,अष्टि,अत्यष्टि,धृति,अतिधृति,.......ही छंदाची माहिती. पण त्याचा कोणत्याच अंगाने आम्हाला गंध नाही. (संस्कृतचा तर नाहीच नाही ) फक्त पाणिनीच्या वेळेस असलेले शुद्ध संस्कृत त्या पुर्वीच्या लोकभाषेत नव्हते,नसावे. जी होती ती लौकिक भाषा जी सर्वच बोलत असावेत. (जी भाषा बायका,अडाणी लोक यांच्या बोलण्यात प्रचलीत असते तिला जीवंत भाषा म्हणतात ;) )
"लोक"भाषेला आजकाल आपण "संस्कृत" असे म्हणतो. पतञ्जलींच्या उल्लेखावरून कळते, की ती भाषा अशिक्षित स्त्रियाही वापरत.
हेच मलाही म्हणायचे आहे, पण तीला संस्कृत म्हणन्याबाबत आम्ही जरा सांशक आहोत,आर्यमंडळी पंजाबात पोहचल्यावर सर्व सुक्ते रचली गेली. असे समजले तरी एक प्रवाद असा की ते इथे पोहचण्याअगोदरही काही सुक्ते रचली गेली असावीत आणि या सुक्ताचे कर्ते ब्राम्हण, क्षत्रिय, व वैश्य, तीनही वर्णाचे आहेत. (ही नीव्वळ माहिती) ऋग्वेदात भाषेची वेगवेगळी रुप आहेत म्हणतात आणि सर्व मंडळात सारखेपणाही नाही म्हणे ?
'भाषायाम' चा अर्थ आपण म्हणता तसे 'लोकांच्या बोलण्याच्या भाषेत'असाच सापडला.
धन्यवाद !!!
उत्कृष्ट लेख
निव्वळ सोने.
डॉ.साहेब,
असेच लेख यावेत.
प्राकृत, मागधी, पाली या भाषांबाबतही खोलात शिरायला आवडेल.
आणखी एक
आठवलं ह्या निमित्तानं.
सम्राट हर्ष वर्धनाच्या काळात(इ स् ७ वे शतक) चीनी प्रवासी ह्यु एन् त्संग् यानं महाराष्ट्राचं
(त्याचं त्याकाळात् वास्तव्य विदर्भात असावं.) वर्णन आहे.
ते असं(शब्दशः नाही, पण बरचस् आठवतय् ते असं):-
"येथील लोक इतर भारतियांपेक्षा (हर्षाच्या उत्तरेतील् राजधानीतील् लोकांपेक्षा)किंचित बुटके, वर्णाने सावळे
पण काटक् आणि सशक्त तब्येतीचे आहेत.......
दिल्हे गिल्हे(दिहिल्ले -गिहिल्ले) अशी भाषा ते बोलतात.
"
आता, दिल्हे, गिल्हे हे शब्द आजच्या मराठिला अत्यंत जवळ्चे वाटतात्.
(ग्रामीण् भागात आजही जवळपास तसेच आणी त्याच् अर्थाने उच्चारतात.)
म्हणजे माय-मराठीची एक पुर्वीचे रुप प्राकृत हे त्याही काळात बोलि भाषेत् होते असं म्हणता येइल.
(ई स् ६५० च्या आसपास.)
( आमच्या कडे जुनी माणसे अजुनही " लग्णात बख्खळ हुंडा दिल्हा/दिल्ला." याच लकबीची वाक्य उच्चारतात. )
जन सामान्यांचे मन
गहन.
काळाची गती आणि भाषा हा विषय खराच गहन आहे. आपण नेहमीप्रमाणे अभ्यासु पणे मांडला आहे.
अभ्यासपूर्ण लेख
अभ्यासपूर्ण लेख! या लेखाच्या अनुषंगाने अधिक माहितीपर आणि या लेखातून निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरस्वरूप स्वतंत्र लेख(मालिका) येईल अशी आशा आहे :) पुढील लेखनाकरिता शुभेच्छा.
माहिती
खुप महिती मिळाली, ज्याची कल्पनाच नव्हती.
हा लेख तर विकिवरही यावाच असा आहे.
कृपाकरून हा लेख मराठी विकिपेडियावरही चढवाल का?
-निनाद
आभार !!!
धनंजय,सहज,चित्तरंजन,ऋषीकेश, मुक्तसुनीत,चित्रा,राधिका, गुंडोपंत, आजानुकर्ण,मन, प्रियाली, विसुनाना,द्वारकानाथ, शशांक,निनाद, आपल्याबरोबरच व्य. निरोपातूनही ज्यांनी आमचं कौतुक केले ते आणि वाचकमित्रहो, आपल्या कौतुकाने आमचे लिहिण्याचे बळ वाढत आहे. :)
आपले मन:पूर्वक आभार !!!
श्रवणबेळगोळचा शिलालेख इ.स. ९८३
हा शिलालेख सम्पुर्ण कुठे वाचावयास मिळेल? मी लहान असताना श्रावणबेळगोळ्यास भेट दिली होती. त्यामुळे मराठी भाषेतील आद्य शिलालेख सध्याच्या मराठी प्रांतापासुन एवढ्या दुर असण्याचे आश्चर्य वाटते. क्रुपया खुलासा व्हावा!
शिलालेख
शिलालेख इथे पाहा.
वरिल छायाचित्र
शिलालेखाचे आहे. शिलालेख गोल दगडावर लिहिला असल्याकारणाने खालचा डावा कोपरा नीट दिसत नाही.
अक्षरे अशी :
श्री चा वुं ड रा जें क र वि य लें
श्री गं ग रा जें सु त्ता ले क र वि य ले
याच माहितीचा शिलालेख कन्नड व तमिळ भाषांत लिहिलेला आहे. खाली बघावे :
डावीकडे (अर्धवट लेख दिसतो) जुनी कन्नड लिपी (आधुनिक कन्नड आणि आधुनिक तेलुगू लिप्या दोन्हींचे मूळ एकच), मध्ये जुनी मराठी लिपी, उजवीकडे (थोडाच भाग दिसतो) तमिळ लिपी.
गंगराज हा चालुक्य साम्राज्याचा मांडलिक होता. चालुक्य साम्राज्य हल्लीचा महाराष्ट्र, हल्लीचे कर्नाटक, हल्लीचा आंध्रप्रदेश, आणि हल्लीच्या तमिळनाडूच्या भागांवर (वेगवेगळ्या काळांत) पसरलेले होते.
चालुक्य साम्राज्यातील वेगवेगळ्या भाषांत हा शिलालेख लिहिलेला आहे.
द बिग पिक्चर
धन्यवाद धनंजयराव.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
धन्यवाद
मराठी जेव्हा उदयाला येत होती त्याच वेळेस कन्नड, तमिळ आणि तेलूगूही उदयाला येत होत्या ही शिलालेखासंबंधीची माहिती नवीन आहे.
'वी आर नॉट अलोन' असे काहीशा वेगळ्या संदर्भात इथे म्हणावेसे वाटते. :-)
----
ऐसपैस
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी मध्ये दुर्गाबाई भागवतांनी असेच मत मांडले आहे - खरे तर त्यांनी आणि त्यांच्या गुरूंनी केलेल्या संशोधनाचा दाखला दिला आहे. कृष्णा-गोदावरीच्या खोर्यातल्या ह्या मराठी, तेलगू आणि कानडी भाषक प्रदेशात व्यापक अर्थाने एकच संस्कृती नांदत होती, हा त्यांचा निष्कर्ष. (तमिळ या तीनही भाषांपेक्षा बरीच प्राचीन असावी.)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तमिळ
तमिळ नक्कीच अधिक प्राचीन असावी. दुरूस्तीबद्दल धन्यवाद.
खाली दिलेल्या दुव्यामध्ये आत्ताच वाचले की तेलगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमधील शिलालेख पाच-सहाव्या शतकात येण्यास सुरूवात झाली. त्यामानाने मलयालम फारच उशिरा म्हणजे १५व्या शतकात.
----
धन्यवाद !!!
धनंजय, काल मी गुगलून पाहत होतो पण मोठे चित्र काही सापडले नव्हते.
मोठे चित्र डकवल्याबद्दल स्पेशल आभारी !!!
डाव्या बाजूची
किंबहुना डाव्या बाजूची मधली ओळही तमिळ मध्ये आहे असे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मलयाळम सारखी वाटते
हम्म्. मलयाळम सारखी वाटते.
पहिली ओळ तेलुगु, दुसरी मलयाळम् (लिपी), (दोन्ही ओळींमध्ये चावुंडराजाचा उल्लेख)
तिसरी कन्नडमध्ये (गंगराजाचा उल्लेख)
कोडेच आहे की. ???
मल्याळम
मला का कोण जाणे ती मल्याळम वाटत नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
ग्रंथ लिपी असेल
शिलालेखात दुसर्या ओळीतले दुसरे अक्षर "चा" आहे. तमिळमध्ये वेगळे अक्षर आहे. चौथे अक्षर "ण्ड" हे तमिळच्या दिशेने जाते. (म्हणजे "ण" तमिळ आहे, पण त्याचाच फराटा ओढून खाली "ड" लिहायची लकब मलयाळम् आहे.
चा, रा (पाचवे अक्षर) यांच्यातला काना मलयाळम् च्या धाटणीचा आहे, तमिळसारखा नाही.
शिलालेखातील सर्व लिपी प्राचीन असल्या कारणाने आधुनिक लिपींपैकी अनेकांशी साधर्म्य असावे. (मराठीतला सुद्धा "ण्ड" मधला "ण", "रा" मधला "र" हल्लीपेक्षा वेगळाच आहे.)
पहिल्या आणि तिसर्या ओळींतली "श्री" आणि "ज" वेगळे आहेत, त्यामुळे वरची प्राचीन तेलुगु, खालची प्राचीन कन्नड, या वेगळ्या लिपी आहेत, असे माझे मत आहे.
र
शिलालेखामध्ये दिसणार्या र चे स्वरूप अजूनही म्हणजे जोडाक्षरामध्ये येणार्या स्वरूपात दिसते. उदाहरणार्थ असणार्या मधील र्या मध्ये. सावरकर वर शिलालेखामध्ये असलेला र त्यांच्या लेखनामध्ये वापरत असत असे ऐकून आहे. त्यावेळी इ, ई, उ, ऊ, ए, ऐ लिहिण्यासाठीही पूर्वी वेगळी चिह्ने न वापरता अ ला काना, मात्रा, वेलांटी लावून लिहिले जात असे.
काही फरक
सावरकरांचा "र" वेगळा. प्र, ग्र, वगैरेंमधील फक्त खालची वाकडी दांडी (नैरृत्य-ईशान्य जाणारी) आणि उभी दांडी ठेवली तर सावरकरांचा "र".
ब्राह्मी लिपीपासून आलेल्या सर्व लिपी (त्यात जुनी देवनागरी आली), कुठल्याच लिपीत अ-ला वेलांट्या आणि उकार लावत नाहीत. बहुतेक लिप्यांमध्ये काना-मात्राही लावत नाहीत. आधुनिक देवनागरीमध्ये "आ, ओ, औ", हे कानामात्रा लावलेले सापडतात.
सावरकरांचे असे मत होते, की अ-ला काना-मात्रा-वेलांट्या-उकार लावावेत. हे मत, तसेच "र" बद्दल सावरकरांचे मत टंकलेखन आणि छपाईच्या सोयीसाठी होते. संगणक-युगामुळे ते कारण आता तितकेसे लागू राहिलेले नाही.
धन्यवाद, संस्कृत का नाही?
या बिग पिक्चरबद्दल धन्यवाद. ते पाहून प्रश्न पडला की मराठी, तमिळ आणि कन्नड या लिपींमध्येच हा शिलालेख का? संस्कृतात का नाही?
शिलालेख हे बहुतेक करून राज्यातील जनतेने वाचावे या हेतूने लिहिले जात. त्यामुळे त्यांना परिचित असलेल्या भाषाच शिलालेखात वापरल्या जात. हेच कारण येथेही असावे की आणखी काही?
संस्कृत शिलालेखांवर शोधले असता हे दुवे मिळाले. भारतात संस्कृत शिलालेख कोठे आढळतात? दिल्ली आणि तामिळनाडुचे काही दुवे आहे तेथे परंतु संपूर्ण भारताबद्दल काही विशेष मिळाले नाही. आणि अशोकाचे शिलालेख, श्रवणबेळगोळचा शिलालेख या सारखे खूप प्रसिद्ध संस्कृत शिलालेखही दिसले नाहीत.
असो, प्रतिसाद मराठीशी संबंधीत नसल्याने लेखकाची परवानगी नसल्यास उत्तर माझ्या खरडवहीतही चालेल.
दुवे
या संदर्भात काही दुवे मिळाले.
दुवा १
दुवा २
दुवा ३
----
धन्यवाद
दुव्यांसाठी धन्यवाद.
संस्कृत शिलालेखांबाबत :
मला वाटते, साक्षरता पूर्वीच्या काळी कमीच असावी, आणि तीसुद्धा फक्त इन्यागिन्या ब्राह्मणांतच, आणि फार थोड्या अन्य उच्चजातीयांमध्ये असावी. त्यामुळे स्थानीय भाषांत शिलालेख वाचणारेही बहुधा ब्राह्मण-कायस्थ-उच्चवर्णीय-वगैरे असावेत. संस्कृत (म्हणजे जिला आपण आज संस्कृत म्हणतो ती भाषा) ही काही लोकांमध्ये प्रचलित पतंजलीच्या काळापर्यंतच असावी (साधारणपणे मेनँडरचा काळ). पतंजली म्हणतात की न शिकताही ही भाषा येते, पण ते असाही उल्लेख करतात की काही लोक अपभ्रंश शब्द वापरतात. (त्या शब्दांतूनही अर्थ कळतो, असे ते म्हणतात...)
आता सामान्य लोक कोण? ते आपल्याला माहीत नाही. दस्यू वगैरे लोक आर्यभाषेवेगळीच कुठली भाषा बोलत असत. फार आधीपासून असुर लोक (आजच्या ईरान मधले असावेत), कुठलीतरी आर्य भाषा बोलत पण तिचे उच्चार भारतातील आर्य लोकांना विचित्र वाटत. पतंजली त्यांच्या ऐकण्यातली कथा सांगतात, की असुर लोक यज्ञात शत्रूंच्या विरुद्ध मंत्र म्हणताना "हे अरयः, हे अरयः" असे म्हणण्या ऐवजी "हेलयो हेलयः" असे म्हणत. बहुधा पतंजलींच्या आजूबाजूचे लोक असे वेगळे उच्चार करत नसत, म्हणून त्यांनी मुद्दामून हे उदाहरण घेतले. पतंजलींनी ही कथा स्वतःच्या काळची सांगितली नसावी, कारण त्यांच्या काळात असुरांशी युद्धे होत नव्हती, तर यवनांशी युद्धे होत होती. मेनँडरच्या काळात बौद्ध भिक्खू पालीमध्ये लेखन करीत. (मेनँडरचे प्रश्न - मिलिंदपन्हो).
म्हणजे पतंजलींच्या काळातही अनेक भाषा प्रचलित होत्या. पण त्या काळातले कुठलेच शिलालेख उपलब्ध नाहीत (असे मला वाटते). त्यापुढे ज्याला आपण आजकल संस्कृत म्हणतो, ती भाषा सामान्य बोलण्यात अप्रचलित झाली असावी.
अशोकाचे शिलालेख मागधीत आहेत, ती त्याची राजभाषा होती. पण जिथे ग्रीकांचा प्रभाव होता, तिथे अशोकाने ग्रीकमध्येही शिलालेख लिहिले आहेत. ग्रीक ही बहुधा भारतात कुठेही जनसामान्यात बोलली जाणारी भाषा नव्हती. त्यामुळे शिलालेख हे सामान्य लोकांनी वाचण्यासाठी नसून, प्रतिष्ठित लोकांनी वाचण्यासाठी असत, अशा मतास बळ मिळते.
पुढे गुप्त साम्राज्यात संस्कृत राजभाषा होती. गुप्त सम्राटांचे सर्व शिलालेख, आणि ताम्रपट संस्कृतात होते. (राजेंद्र यांनी दिलेल्या "एपिग्राफी" पुस्तकातील पाने १४०-१५० बघावीत.) चालुक्यांनीसुद्धा संस्कृतात ताम्रपट लिहिले आहेत.
इसवी सन ८००-९०० काळापर्यंत बौद्ध आणि जैन धर्मग्रंथांची नवनिर्मिती संस्कृतात होऊ लागली होती. (पालीमध्ये त्रिपिटकांच्या नंतर नवनिर्मिती कधी झाली का हे मला माहीत नाही.) त्यामुळे या जैन धार्मिक पुतळ्याजवळ मागधी शिलालेख नाहीत, याचे आश्चर्य वाटू नये. चामुंडराज (चावुंडराय) स्वतः कन्नड आणि संस्कृत कवी होता. पुतळ्याच्या जवळ कोरलेली त्याची "स्वाक्षरी" कन्नड लिपीत आहे, असे दिसते. तो संस्कृत कुठल्या लिपीत लिहीत असे ते मला माहीत नाही.
शिलालेख
भारतातील प्रसिद्ध शिलालेखांची माहिती येथे मिळेल. http://en.wikipedia.org/wiki/Indian_inscriptions संस्कृतात शिलालेख झाले असावेतच परंतु शिलालेख हे सर्व साक्षरांनी वाचावे आणि जे साक्षर नाहीत त्यांना वाचून दाखवावेत अशा हेतूने बनवले जात म्हणूनच त्यांचे स्थान सार्वजनिक ठीकाणी असे असे वाटते.
उदा.
Beloved-of-the-Gods, King Piyadasi, has caused this Dhamma edict to be written.[1] Here (in my domain) no living beings are to be slaughtered or offered in sacrifice. Nor should festivals be held, for Beloved-of-the-Gods, King Piyadasi, sees much to object to in such festivals, although there are some festivals that Beloved-of-the-Gods, King Piyadasi, does approve of
हा शिलालेख केवळ साक्षरांनी किंवा राज्यातील विद्वानांनी वाचून काय कामाचा?
ताम्रपट आणि शिलालेखांचा संकर करूया नको. भूर्जपत्राला पर्याय म्हणून ताम्रपट अस्तित्वात आले. मुख्य हेतू राजकीय आणि शासकीय नोंदी ठेवणे. यावर संस्कृत कोरीवकाम आढळले तर ते योग्यच आहे. ते वापरलेही विद्वानांकडून आणि राज्यकर्त्यांकडून जायचे. शिलालेख हे सर्वसामान्य जनतेला नजरेस पडावे, त्यातील मजकूर ते अशिक्षित असले तरी चित्रस्वरुपात त्यांच्या डोक्यात ठसून राहावा आणि त्यावरील भाष्याचा त्यांना विसर पडू नये हा असावा. दाक्षिणात्य राज्यांत जेथे संस्कृताचा प्रसार झाला होता तेथे संस्कृतातील शिलालेखही आढळत असावेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
सांगणे कठिण आहे
तो विशिष्ट मजकुर कोणाला वाचून दाखवायचा हे सांगता येत नाही.
अशोकाचे पूर्वेकडचे शिलालेख मागधीत आहेत. कित्येक शिलालेख त्याच्या साम्राज्याच्या सीमांशी दिसतात. कलिंगातही शिलालेख आहेत. कलिंगातले लोक मागधी नव्हते. बहुतेक आदिवासी (अनार्य) होते. नेपाळात लुंबिनी शाक्य गाव आहे, आजच्या नव्या मुंबईजवळ सोपारा, कृष्णेच्या दक्षिणेला यर्रगुडी - या सर्व दूरदूरच्या ठिकाणी सामान्य लोक मागधी बोलत असतील असे वाटत नाही. मगधात बोलली जाणारी ती मागधी.
गोव्यात कित्येक जुन्या पुतळ्यांच्या/स्मारकांच्या खाली पोर्तुगीज भाषेत शिलालेख किंवा पट सापडतात. त्यात पोर्तुगीज सरदारांचे, सरकारचे वगैरे गुणवर्णन केलेले दिसते. (गोवामुक्तीनंतर यांच्यापैकी अनेक उपटून संग्रहालयात ठेवलेले आहेत, पण काही अजून मूळ ठिकाणी आहेत. शोधले तर प्रियदर्शी अशोकाच्या इच्छांसारख्याच, पण कालानुरूप अशा, पोर्तुगीज सरकारच्या कृपा-इच्छांचा आलेख सापडेल. दुर्दैवाने पणजीच्या बगीचांमध्ये बघितलेल्यांपैकी एकही आलेख मला आता तोंडपाठ येत नाही...) गोव्यात वरच्या स्तरातले लोक पोर्तुगीज बोलत, पण गोव्यातले बहुजन (ख्रिस्ती बहुजनसुद्धा) पोर्तुगीज बोलत नसत. त्यामुळे "जनकल्याणासाठी"चे शिलालेख सरकारे राजभाषेत लिहितात ती नेमके कोण वाचक मनात धरून लिहितात हे सांगणे कठिण आहे.
गोव्यात एक जुना लोखंडी खांब "हात कापरो खांब" आहे. त्याबद्दल माहिती लहानपणी गोमंतक वर्तमानपत्रात वाचलेली आठवते. त्याच्यापाशी कन्नड आलेख सापडल्याची बातमी होती. (पैकी "दयद" लिहिलेला फोटो मला अजून आठवतो, पण बाकी काही आठवत नाही...) गोव्यातले लोक चालुक्य काळात कन्नड बोलत होते की नाही ते ठाऊक नाही. (बहुधा नसावेत.)
परवानगी दिली :)
प्रतिसाद मराठीशी संबंधीत नसल्याने लेखकाची परवानगी नसल्यास उत्तर माझ्या खरडवहीतही चालेल.
लेखकाची परवानगी कशाला लागते, आणि लागत असेल तर दिली आम्ही परवानगी :)
संस्कृतचे कोरलेले शिलालेख पाहायला आवडतील,पण शिलालेख कोरले असतील का याबद्दलही शंकाच आहे.
कोरले असतील तर ते कोणाला समजले असते ना ? असो, विषयाशी संबधीत नसलेले उपप्रश्न निर्माण होत असल्याने थांबतो.
२ शिलालेख
संस्कृत शिलालेख आहेत की. मला आता या क्षणी ऐहोळेप्रशस्ती हा शिलालेख नावासकट आठवतोय. गुजरातेतही गुप्तकाळातला एक शिलालेख आहे, तो अहमदाबादेत असल्याचे अंधुक आठवते परंतू गुगल वर शोधला असता १४०० नंतरचे वेगळेच ३ संस्कृत शिलालेख सापडले.
राधिका
धन्यवाद् आणि ल
ह्या शिलालेखाबद्दल वाचले होते, पण प्रत्यक्ष चित्र कधी पाहिले नव्हते. चित्राबद्दल धन्यवाद.
शिलालेखातील मराठी वाचताना जाणवते की तेव्हाचा ल हा सध्याच्या मराठी ल सारखा नाही तर हिंदीसारखा आहे. एका उभ्या रेषेऐवजी दोन वळणांचा मराठी ल कसा आणि का प्रचारात आला असावा?
धन्यवाद् आणि ल
ह्या शिलालेखाबद्दल वाचले होते, पण प्रत्यक्ष चित्र कधी पाहिले नव्हते. चित्राबद्दल धन्यवाद.
शिलालेखातील मराठी वाचताना जाणवते की तेव्हाचा ल हा सध्याच्या मराठी ल सारखा नाही तर हिंदीसारखा आहे. एका उभ्या रेषेऐवजी दोन वळणांचा मराठी ल कसा आणि का प्रचारात आला असावा?
आणखी काही दुवे
आणखी गुगलल्यावर खालील दुवे सापडले.
दुवा १ : श्रवणबेळगोळच्या शिलालेखाचा नेमका काळ कोणता?
दुवा २ : कुडल(द. सोलापूर) येथे "वाछि तो विजेया होईवा ।।" असे कोरलेला शिलालेख सापडला आहे. याखाली शके ९४० अशी तारीख आहे. (दुव्याच्या पानावर १८ एप्रिल खाली बघावे.) या तारखेच्या सकाळचा दुवा मात्र उपलब्ध नाही. :-( (दुवा क्र. १ मध्ये याबद्दल साशंकता आहे.)
----
लै भारी..
बिरुटेशेठ!
लै भारी लेख लिवलाय तुमी... :)
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!