गांधीजी आणि चर्चिल

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अलिकडच्या एका अंकात श्री. आर्थर हर्मन ह्यांनी लिहीलेल्या "गांधी आणि चर्चिल" (प्रकाशकः बॅंटम) ह्या नवीन पुस्तकाचे श्री. ऍंड्र्यू रॉबर्ट्स ह्यांनी केलेले परिक्षण प्रसिद्ध झाले आहे. व्यक्तिशः मला इतिहासातील बारकावे ठाऊक नाहीत, तरीही हे परिक्षण खूपच एकांगी वाटले. त्यातील काही विधाने इथे मांडत आहे, ज्यायोगे इतिहासाचे जाणकार त्यावर भाष्य करू शकतील. ही माझी विधाने नाहीत, मी केवळ लेखातून उर्धृत करतो आहे. माहितीपूर्ण प्रतिवाद अपेक्षित आहेत.

फेब्रुवारी १९३१ मध्ये गांधीजींच्या कायदेशीर प्रतिकाराच्या आंदोलनामुळे त्यांना अटक करण्यात आली. पण (आंदोलन इतके प्रखर होते की) त्यांनी ते सोडून द्यावे ह्याकरता त्यांनी इंग्लंडच्या राजाशी बोलणी करण्यासाठी जावे असे ठरले. म्हणून तत्कालिन व्हॉईसरॉय लॉर्ड हॅलिफॅक्स ह्यांनी त्यांची कैदेतून सुटका केली. असे असतांनाही चर्चिलने गांधीजींच्या आंदोलनाचे गांभीर्य ओळखले नाही. "हा मिडल टेंपलचा फुटिरवादी (seditious) वकिल आता, पूर्वेत अगदी बरेच दिसून येतात तसला, फकिर बनलाय आणि उघडा- नागडा असा तो, राजाशी समान पातळीवरून बोलणी करण्यास राजप्रसादाच्या पायर्‍या चढतोय, हे बघणे अत्यंत किळसवाणे आहे" अशी जाहीर मल्लिनाथी चर्चिलने त्यावेळी केली होती.

पण पुढे मात्र चर्चिल राजकिय दृष्ट्या सजग झाला, तर गांधी मात्र खुळचट (politically maladroit) सल्ले देऊ लागले. त्याची काही उदाहरणे जी पुस्तकात नमूद केली आहेत व म्हणून ह्या परिक्षणात दिलेली आहेत ती अशी:

दुसया महायुद्धाच्या दरम्यान इथियोपियन जनतेस उद्देशून गांधींनी असे म्हटले की त्यांनी मुसोलिनीचा प्रतिकार करू नये, तर त्याच्याकडून हत्या करून घेण्यास सज्जा व्हावे (allow themselves to be slaughtered) कारण 'मुसोलिनी काही उजाड वाळवंट ताब्यात घेण्यास चालून येत नाही आहे'!

१९४० च्या लंडन -ब्लित्झच्या वेळी गांधींनी ब्रिटिशांना असा सल्ला दिला की त्यांनी हिटलर व मुसोलिनी ह्यांना, त्यांची सर्व संपत्ति, त्यांची सर्व मालमत्ता घेऊन जाण्यास येण्यासाठी निमंत्रित करावे. 'त्यांना तुमच्या सुंदर देशाचे जे काही घ्यायचे आहे, ते घेऊन जाऊ दे, पण (काही झाले तरी) ते काही तुमची मने, तुमचे आत्मे तर घेऊन जाऊ शकणार नाहीत?'

गांधीनी जर्मनीतील ज्यूंनाही असा सल्ला दिला होता म्हणे, की त्यांच्या निशस्त्र स्त्री- पुरूषांनी शांत पण निर्धारित असा लढा जेहोवाच्या शिकवणीतून मिळालेल्या आत्मिक बळाच्या जोरावर द्यावा, म्हणजे त्यांच्या पीडनक्षमतेमुळे (अचंबित होऊन) नाझींना मानवी अंतर्शक्तिची (human dignity) जाण येइल.

हे असे असल्याने लेखक म्हणतो की भारताला (समजूतदार) ब्रिटिश राज्यकर्ते लाभले, अन्य कुणी नाहीत, हे गांधींचे नशीबच म्हटले पाहिजे. कारण हिटलरने लॉर्ड हॅलिफॅक्सला १९३८ मध्ये सल्ला दिलेला की गांधींना गोळी घालून ठार करावे. त्याने पुढे असेही सूचित केले की एव्हढ्याने जर हिंदूस्थानातील जनता सरळ येत नसेल तर ब्रिटिशांनी कॉंग्रेसच्या डझनभर नेत्यांची हत्या करावी. तरीही भागत नसेल तर मग दोनशे, व तरीही होत नसेल तर असेच पुढे लोक मारत जावेत!

हे सांगून लेखक पुढे म्हणतो की जपान्यांना जर कोहिमा- इंफाळच्या लढाईत रोखले गेले नसते, तर त्यांनी त्यांच्या मित्रराष्ट्राचा हा सल्ला नक्कीच मानला असता, असे त्यांच्या तेव्हापर्यंतच्या जेतेपणाच्या इतिहासावरून दिसून येते.

गांधींना युद्धाच्या दरम्यान आगाखान पॅलेसच्या 'ऐषारामी' बंदिवासात त्यांच्या पत्निसकट ठेवले होते, (when Gandhi was interned during the war- in great comfort in one of the Agha Khan's palaces, co-habitating with his wife) तेव्हा त्यांच्याकडून येणार्‍या बहुतांशी राजकिय मागण्या त्यांच्या व त्यांच्या सहकार्‍यांच्या सुटकेची मागणी करणार्‍या असत. ह्या सर्वांनाच चर्चिलने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. गांधींजीनी तेव्हा केलेले प्राणांतिक उपोषण त्याला एक ब्लॅकमेल वाटत होते, आणि पुस्तकाचे लेखक असे सूचित करतात की गांधीजींना पाण्यातून हळूच ग्लूकोज दिले जात असावे, हा चर्चिलला असणारा संशय बहुधा खरा असावा.

Comments

...

नि: शब्द.

हसावे की रडावे कळत नाहिये.

जन सामान्यांचे मन

यापेक्षा कळस

याहून अधिक कळस तोडगे फक्त 'सनातन प्रभात' च्या अंकांत वाचले आहेत.
नतमस्तक.
सन्जोप राव

ऑरवेल

गांधींबाबत हा लेख वाचण्यासारखा आहे. त्यात या चर्चेतील काही मुद्द्यांबाबत माहिती मिळेल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद

ओर्वेलचे लेख विचारांना चालना देणारे असतात.

हा लेख सुद्धा

गांधींबाबत हा लेख सुद्धा वाचण्यासारखा आहे. विचार करायला लावणारा आहे.

विनोदी

मस्त लेख. हहमु वळली.

चित्रेदेखील झकास. गांधीजीपण मस्त हसत असतील वर बसून. ;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

न संपणारा विषय

चालु द्या.

माहिती

केवळ काहीतरी भडक एकतर्फी रंगवून धमाल उडवून देण्याकरिता मी हे लिहीलेले नाही. पण हे सगळे वाचून प्रश्न उभे राहिले:

*गांधीजींनी इथे उर्धृत केलेले त्या त्या समूदायांना खरोखरीच सांगितले असेल का?
* वरील प्रश्नाचे उत्तर होय/ नाही मधे अवघड असले तर असे हे सर्व तद्दन खोटे आहे? का ह्यात थोडे तथ्य आहे आणी बराच विपर्यास. असे उत्तर असल्यास आपल्या माहितीप्रमाणे खरे काय आहे, व विपर्यास कोणता?

ह्या प्रश्नांची उत्तरे माझ्यापाशी नाहीत. आणि मला ती मिळवावीशी वाटतात. तेव्हा आपल्या सल्ल्याची वाट न पहाता, चालू देत आहे.

...प्रदीप

खात्री.

तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल मला खात्री आहे.

गांधी आज नकळतच एक तत्वज्ञान / विचारधारा म्हणून मान्य आहे. त्यांचे प्रयोग आणि तत्वज्ञान अश्या टप्प्याटप्प्याने कितपत समजून घेता येईल याबद्दल मी साशंक आहे.

दुर्दैवाने अश्या लेखात / प्रतिसादात गांधी कसे मूर्ख होते, कसे मुस्लिम धार्जिणे होते हे पटवण्याचा काही लोकांचा प्रयत्न चालु असतो त्याला उद्द्येशुन मी लिहिले की "न संपणारा विषय".

तुम्हाला या विचारधारेबद्दल मनापासून समजावून घ्यायचे असेल तर प्यारेलाल, विनोबा आणि गांधीचे सर्व वाड्मय वाचण्याचा प्रयत्न करा. गांधींचे स्वत:चे भरपूर लिखाण आहे ( अंदाजे ५०००० पाने).

माझ्या तुम्हास मनापासून शुभेच्छा.

तत्त्वज्ञान | दगडापेक्षा वीट मऊ

गांधीजींचे तत्त्वज्ञान सर्व ठिकाणी लागू पडेल असे नाही. जिथे काही प्रमाणात तरी कायद्याचे राज्य आहे तिथे गांधीगिरी चा उपयोग होऊ शकतो असे वाटते. असे प्रयोग जगात इतरत्रही झाले आहेत.

लेखक म्हणतो की भारताला (समजूतदार) ब्रिटिश राज्यकर्ते लाभले, अन्य कुणी नाहीत, हे गांधींचे नशीबच म्हटले पाहिजे.

आणि देशाचेही. दगडापेक्षा वीट मऊ.

या पुस्तकाविषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

गांधीजी आणि अहिंसा

गांधीजींनी ज्यूंना दिलेल्या सल्ल्याबद्दल ही चर्चा विकीवर...

'मोडा पण वाकू नका' अशा स्वरूपाचा हा (मराठी बाण्याचा) सल्ला दिसतो.

'इतिहास संशोधक' आणि 'इतिहास समिक्षक' यांच्यातली सीमा पुसट आहे.
म्हणून इतिहासावर मल्लीनाथी कोणत्याही पद्धतीने करता येते.
गांधींना चूक ठरवायचे की बरोबर? ते ठरवून इतिहासाचे लेखन फिरवता येते.

अहिंसेच्या सर्वश्रेष्ठ उपासकाने (गांधी) हिंसेच्या सर्वश्रेष्ठ उपासकाला (हिटलर) लिहिलेल्या पत्रांचा मागोवा येथे पहावा.

आभार.. आणि गांधीचा छान सल्ला

दुव्याबद्द्ल आभार.
शरदरावांनी शिकवल्याप्रमाणे सध्या मी कोणताही विचार लगेच झटकत नाही :) त्याच तत्वाने आपण गांधीजींनी सुचवलेल्या पर्यायाचे फायदे व तोटे पाहु
फायदे:
१) ज्युंना आपली मातृभुवी सोडावी लागली नसती
२) त्यांचा स्वाभिमान शाबुत राहिला असता.
३) हिटलरचा क्रुरपणा आधीच समोर येऊन जागतिक दबाव वाढला असता. (म्हणजे तो छळ जगाला माहित होता पण उघडपणे घडल्यावर 'सभ्य' म्हणवणार्‍या जगाला त्याविरुद्ध गप्प राहणं परवडले नसते)
४) दुसरे महायुद्ध फोफावल्यावर जर ज्यूचा असा अंतर्गत विरोध वाढला असता तर हिटरच्या विस्तारवादाला (काहि प्रमाणात) आळा बसु शकला असता. त्यामुळे कदाचित हिटलरने ज्यूचा विरोध सौम्य करण्यासाठी त्यांना काहि काळ अभय देण्याचा विचार केला असता. (असे वाटते)

आणखी एक बघा या वाक्यांमधे गांधीनी प्रतिकार करू नका असे सांगितले नाहि आहे. उलट प्राण गेला तरी बेहत्तर पळपुट्यासारखे पळू नका हिटलरला धैर्याने व शांततेने सामोरे जा .. असे सांगितले आहे

तोटे:
१) हिटलर अतिशय क्रूर होता. त्यामुळे एक गांधीजींचा (म्हणजे तत्सम नेत्याचा) वध करणे काहिच अशक्य नव्हते. म्हणजे नेता गेल्यावर काय मार्गच खुंटला चळवळ ठप्प!

तोटे टाळता येतील का?

माझ्यामते हो! आपल्या मागे आपल्या विचाराने चालणारे अनुयायि तयार केले तर हिटलर कीती गांधींना मारणार होता. एक मेला असता तर शेकडो जन्माला आले असते. छळचावण्यांमधे अपमानकारकरित्या जगण्यासाठी सहन केलेला छळ व नंतर निश्चित मृत्यूपेक्षा मीही विरोध केरून आलेला मृत्यूच स्वीकारला असता.
माझ्या ऐकीव व काहि प्रमाणात वाचीव (अ?)ज्ञानानूसार ज्यू घाबरले कारण त्यांच्या कडे म्हणे शस्त्र नव्हती. गांधीनी दिलेल्या सल्ल्यानूसार काहि ज्यूंनी "प्रतिकार" केल्याचे वाचनात नाहि आले आहे. तर मग हा सल्ला हास्यास्पद का?

इतिहासावर मल्लीनाथी कोणत्याही पद्धतीने करता येते.

शेवटी हे बाकी लाख मोलाचे बोललात :)

-ऋषिकेश

समाजवाद आणी गांधी

http://sadhanatrust.com/pdf/SW20080510.pdf या ठिकाणी पान नं २९ वर राहुल रेवले यांचा 'समाजवाद्यांनी केलेली सर्वात मोठी चुक ' हा लेख . यावर साधनाच्या संपादकांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
प्रकाश घाटपांडे

रोचक

रोचक माहिती. इथे खालील संवाद आठवला.
पत्रकार : व्हॉट डू यू थिंक ऑफ वेस्टर्न सिव्हिलायझेशन?
गांधीजी : आय थिंक इट्स अ गुड आयडीया!

----

सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांचे यासाठी अभिनंदन करायला हवे.

ऑर्कूट या संकेतस्थळावर मोहनदास करमचंद गांधी व सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाला, म्हणून हा मजकूरकर्ता २२ वर्षांचा तरुण राहुल कृष्णकुमार वैद्‍याला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांचे यासाठी अभिनंदन करायला हवे. त्यांनी राहुल याला अटक करण्यासाठी हरियाणातील गुडगाव हे त्याचे गाव गाठले आणि त्याला अटक करून पुणे शहरात आणले. राहुल याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला २१ मेपर्यंत कोठडी दिली. राहुल हा सुशिक्षित तरुण गुडगाव येथील एका माहिती व तंत्रज्ञान कंपनीमध्ये हार्डवेअर अभियंता म्हणून नोकरी करत आहे. अटक केल्यावर त्याने गुन्हा कबूल केला,असे पोलिसांनी म्हटले आहे. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला मजकूर आक्षेपार्ह आणि अश्लील आहे, असा त्याच्यावर आरोप आहे. हा मुलगा सुशिक्षित असूनही त्याला असा आक्षेप घेण्यासारखा मजकूर का, तयार करावासा वाटला, हे शोधून काढणे म्हणजे एक संशोधन पूर्ण करण्यासारखे होईल; तथापी प्रगत माहिती व तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला जाण्याची उदाहरणे मात्र कमी नाहीत. किंबहुना धर्मद्रोही, दुसर्‍यांबद्दल वैरभावना असणारे, दहशतवादी यांनी मात्र या सुविधेचा गैरफायदा घेणे सुरू ठेवले आहे !

पोलिसांची इच्छाशक्‍ती !
मोहनदास करमचंद गांधी व सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर जगभर पोहोचला जाणे, ही बाब त्यांच्या निष्ठावंतांना सहन होणे शक्य नाही. पुण्यातील काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने ऑर्कूटवरील या मजकुराविषयी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीची दखल पोलिसांनी ताबडतोब घेतली. राहुल याने एक वर्षापूर्वी `मी सोनिया गांधी यांचा द्वेष करतो' या मथळयाखाली चर्चा करणारा गट निर्माण केला. या गटातील इतरांनी जो मजकूर तयार केला त्यावर आधारित अश्लील मजकूर तयार करण्यापर्यत त्यांची मजल गेली. ऑर्कुट हे संकेतस्थळ अश्लील मजकूर प्रसिद्ध करण्याविषयी कुप्रसिद्ध आहे, हे पोलिसांना माहीत आहे कि नाही, हे सांगता येत नाही, तथापी हिंदूंना मात्र त्याची जाणीव आहे. या संकेतस्थळावर देवतांची अश्लील चित्रे प्रसिद्ध झाली, तेव्हा पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हिंदूंच्या संघटनांनी त्याविरुद्ध आंदोलन
उभारले व पोलिसांत तक्रारही दाखल केली. त्या वेळी या संकेतस्थळावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि हिंदूंना मोठा अपमान सहन करावा लागला. गुन्हेगाराला शोधून काढण्याविषयी सगळे पाणी येथेच मुरत आहे. राजकीय नेत्यांविषयीचा आक्षेपार्ह मजकूर कोणी प्रसिद्ध केला, हे शोधून काढण्यासाठी पुणे येथील पोलिसांनी जे कष्ट घेतले, ते हिंदंूच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार पोलिसांकडे पोहोचूनही घेतले गेले नाहीत. येथे मोहनदास करमचंद गांधी व सोनिया गांधी यांच्या बदनामीचा मुद्दा धसास लावण्यात आला आणि सारे जग धारण करण्याचे सामर्थ्य असलेल्या हिंदु धर्माच्या अपमानाचा मुद्दा बाजूला पडला, हे दुर्दैव आहे. `गुगल' या प्रसिद्ध संकेतस्थळाच्या साहाय्याने पोलिसांनी राहुलच्या मजकुराविषयी सविस्तर माहिती मिळवली व त्या माहितीच्या आधारावर पोलीस हरियाणा राज्यात पोहोचले. येथे पोलिसांची इच्छाशक्‍ती महत्त्वाची ठरली व त्यामध्ये ते यशस्वी झाले.

असे असे

शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर ऑर्कुटवर आला होता तो याच पोलिसांनी कार्यक्षम रीतीने हाताळला होता याचा सोयीस्कर विसर तुम्हाला पडलेला दिसतो आहे. तुमची गाडी नेहमीप्रमाणे गांधीद्वेष आणि हिंदूंच्या भावना वगैरे रडगाण्यावर घसरली. असो. पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आम्हाला कौतुकच आहे!

>> हा मुलगा सुशिक्षित असूनही त्याला असा आक्षेप घेण्यासारखा मजकूर का, तयार करावासा वाटला, हे शोधून काढणे म्हणजे एक संशोधन पूर्ण करण्यासारखे होईल

यात काही आश्चर्य नाही. असे सुशिक्षित वाटणारे लोक आक्षेपार्ह मजकूर लिहिताना सर्रास दिसतात. नाही का?

या तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या कुरापतींनी सर्वसामान्य हिंदूना लाजिरवाणे प्रसंग पाहावे लागत आहेत. अश्याने हे अधिकाधिक तिरस्काराला पात्र होतील यात शंका नाही.

--------------------------------------------------------------------------------
तटस्थ मराठी संकेतस्थळांचा वापर प्रचारवादी आणि द्वेषमूलक लिखाणासाठी होऊ नये याचे मी समर्थन करतो.

 
^ वर