अमेरिकनांचा वंशवाद!

अमेरिकेत कालच 'हेरॉल्ड ऍण्ड कुमार-एस्केप फ्रॉम गॉन्तोनामो बे' रिलीज झालाय. सिनेमा खूप वाईट आहे, असं म्हणत अमेरिकन वर्तमानपत्रांनी चांगलंच झोडपून काढलंय. हा राग नेमका कशामुळे याची कारणं कल्पेनच्या यशात सापडतील.

.........................

एका भारतीय कलाकाराला हॉलिवूडमध्ये यश मिळवणं किती तरी कठीण असतं. तंत्रज्ञ, फायनान्सर, दिग्दर्शक अशा भूमिका भारतीयांनी हॉलिवूडमध्ये यशस्वी केल्या आहेत. पण अभिनेता म्हणून यश मिळवणं अवघडच. हीच अशक्य गोष्ट साध्य केलीय ती कल्पेन सुरेश मोदीने. कदाचित तुम्ही ऐकलं नाही. कारण लोक त्याला काल पेन नावाने ओळखतात. 'नेमसेक'मधलं नाट्य ज्या 'गोगोल' नावामुळे घडतं. त्या गोगोलचं काम केलं, ते याच काल पेनने. छोट्यामोठ्या भूमिकेत रमणारा काल पेन आता हॉलिवूडमधल्या सिनेमात प्रमुख भूमिकांमध्ये झळकतोय आणि यशस्वी ठरतोय, हीच भारतीयांसाठी फार मोठी गोष्ट आहे

हा आहे छोकरा ह्या लेखातील उतारा. एका भारतीय वंशाच्या माणसाला अमेरिकेत सहन कराव्या लागणार्‍या वंशवादाबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेत. अमेरिकास्थित उपक्रमी ह्यावर काही प्रकाश टाकतील ह्या अपेक्षेने हा चर्चा प्रस्ताव टाकत आहे.

Comments

चित्रपटाची परीक्षणे

म.टा. म्हणतो :
अमेरिकेत कालच 'हेरॉल्ड अॅण्ड कुमार-एस्केप फ्रॉम गॉन्तोनामो बे' रिलीज झालाय. सिनेमा खूप वाईट आहे, असं म्हणत अमेरिकन वर्तमानपत्रांनी चांगलंच झोडपून काढलंय.
हे बरोबर नाही. रॉटन टमाटो संकेतस्थळावर प्रमुख वर्तमानपत्रांच्या समीक्षणांचे संकलन केलेले आहे. मोठ्या वर्तमानपत्रांपैकी साधारण ६०% टीकाकारांनी सिनेमाला 'चांगला' म्हटले, तर ४०% टीकाकारांनी सिनेमाला 'वाईट' म्हटले आहे. (उदाहरणार्थ : न्यू यॉर्क टाइम्स या मोठ्या वर्तमानपत्रातले परीक्षण "चित्रपट आवडला" असे होते.)

वाईट म्हणणार्‍यांपैकी बहुतेकांनी "वंशवादाचे उथळ चित्रण" असल्यामुळे सिनेमा नावडल्याचे म्हटले. म्हणजे नावडण्याचे कारण वंशवादाचा पुरस्कार नव्हता.

"हॅरल्ड अँड कुमार" ही सिनेमांची एक मालिका आहे. त्यात हॅरल्ड आणि कुमार हे दोघे पक्के चरसी तरुण वेगवेगळ्या भन्नाट गोष्टी करतात. चरसी तरुणांचे विनोद मला बहुधा आवडणार नाहीत या पूर्वग्रहामुळे त्यांच्यापैकी एकही चित्रपट मी बघितलेला नाही. पण ते चित्रपट आवडल्याची ग्वाही माझे अनेक अमेरिकन मित्र मला देतात. (माझा पूर्वग्रह चुकला असेल. कोणी फुकट व्हिडियोटेप दिली, तर जरूर चित्रपट बघीन.)

बाकी सर्वात मोठ्या बजेटच्या चित्रपटांत गोर्‍या नसलेल्या लोकांना प्रमुख भूमिका मिळत नाही, ही बाब जवळजवळ १००% खरी आहे. कृष्णवर्णीय (आफ्रिकन अमेरिकन) प्रमुख भूमिका वठवतात, असे चित्रपट असतात, पण ते "खास बाजारपेठेसाठी" म्हणून बनवले जातात.

इतकेच काय हल्लीहल्लीपर्यंत स्टेजवरच्या नाटकांतही शेक्स्पियरच्या ऑथेल्लोची भूमिका काळ्या नटाला देण्याऐवजी तोंडाला काळा मेकप केलेल्या गोर्‍या नटाला आवर्जून देत! आजकाल इतका तरी वेडगळपणा करत नाहीत. कथावस्तूत बिगर-गोरे पात्र असले तर बिगर-गोर्‍या नटाला देतात.

पण अमेरिकन लोकांना बिगर-गोर्‍या-काळ्या लोकांमधल्या चेहर्‍यांत फारसा फरक करता येत नाही. त्यामुळे "मेमोआर्स ओफ ए गेइशा" चित्रपटात कथा जपानात घडते, पण नट-नट्या सर्व चिनी होत्या! (आता भारतातल्या बहुतेक लोकांनाही चिनी-जपानी चेहर्‍यांतला फरक फारसा कळत नाही, म्हणा. त्यामुळे माझ्याकडून हॉलिवूडचा हा हास्यास्पद प्रकार माफ!)

तरी म.टा. मधल्या लेखिकेची काही वाक्ये तथ्यापासून दूर वाटली. उदाहरणार्थ :
अनेक हॉलिवूडपटांमध्ये एका विशिष्ट रंगात रंगवलेली भारतीय माणसं त्याने पाहिली. ती प्रतिमा पुसण्यासाठी तो प्रयत्न करतोय. अमेरिकन्सला ते आवडत नसलं ना तरी...
बहुतेक अमेरिकन्स या बाबतीत पूर्णपणे उदासीन आहेत. त्यांना याबद्दल आवड-नावड काहीएक मत नाही. अमेरिकेतील सर्वच आगंतुक "आपण आता अमेरिकेत मिसळून गेलो आहोत" असे काही दाखवायचा प्रयत्न करत असतात. त्यात "हॅरल्ड"चे काम करणारे नट श्री. चो (कोरियन पूर्वज असलेले) हेदेखील आहेत.

हॉलीवूड वि. बॉलिवूड

आयएमडीबीच्या गुणांकानुसार* चित्रपट वाईट आहे असे वाटत नाही परंतु या संदर्भात इतर परिक्षणे वाचलेली नाहीत.

अपर्णा पाटील यांचा लेख मात्र थोडा बटबटीत वाटला. फेटे बांधणार्‍या सरदारजींना अफगाणी समजण्याचा प्रकार अमेरिकेत झाला असणे निश्चित आहे परंतु इतर आशियाईंना सर्रास अतिरेकी मानले जाते हे थोडे अतिरंजीत वाटले. मला आणि कुटुंबाला कधीतरी द. अमेरिकी समजले जाते असा अनुभव येतो पण कोणी अफगाणी समजल्याचे आठवत नाही.

आता याच संदर्भात बॉलीवूडकडे पहा:

येथे अधिराज्य करणारे नायक कोण? पंजाबी, उत्तरप्रदेशी, दिल्लीस्थित इ. कर्मभूमी महाराष्ट्र असतानाही मराठी नायक (नाना पाटेकर यात मोडत नाही कारण उत्तम भूमिका केली तरी एका चाकोरीबाहेरील भूमिकेसाठी त्याचा विचार होऊ शकत नाही.), दाक्षिणात्य नायक इ. चे बॉलीवूडमधील स्थान पहा.

अनेकजण, चिरंजीवीचा चित्रपट येतो आहे, विष्णूवर्धनचा चित्रपट येतो आहे म्हणून त्यावर उड्या टाकताना पाहिलेले नाहीत. इतकेच काय तर रजनीकांतही स्वतःच्या खांद्यावर एकटा चित्रपट पेलून नेण्यास असमर्थ आहे. एकंदरीतच बिन-उत्तरी नायकांचा बॉलीवूडमधील प्रवास नगण्य आहे.

तेव्हा चित्रपटसॄष्टीवर जे अधिराज्य गाजवून असतात ते तोडणे सर्वत्रच थोडे कठीण आहे असे वाटते. याला वंशवाद म्हणा किंवा बाजारपेठेची मागणी.

मजेशीर गोष्ट अशी की बॉलीवूडात नायिकांच्या बाबत असे होत नाही.

---
* ६ च्या वर गुणांक मिळवणारे चित्रपट सहसा बघण्यालायक असतात असा अनुभव आहे.

दिसतं तसं नसतं

थोडे अवांतर होईल, सत्य आणि स्वानुभवाधारीत आहे पण करमणूक म्हणून लिहीत आहे :-)

>>>....परंतु इतर आशियाईंना सर्रास अतिरेकी मानले जाते हे थोडे अतिरंजीत वाटले.

आपले वरील विधान निदान माझ्या स्वतःच्या अनुभवाचा विचार केल्यास अर्धसत्य ठरते. मला कोणी अतिरेकी समजले नाही (नशिब!). बॉस्टन मधील विद्यापिठात शिकत असतानाची ही जास्त कथा/व्यथा होती. मला अरब, इराणी अगदीच दोन्हीस नाही म्हणले तर निदान तू मग नक्की पाकीस्तानी आहेस असे समजले गेलेले आहे. बरं हे कोणा काळ्या-गोर्‍या अमेरिकनास कधीच वाटले नाही, पण अरबांनाच वाटलेले मी अनुभवले आहे. कधी कधी ते सरळ अरबी भाषेत बोलायचे मग मला त्यांना सांगावे लागायचे की अरे बाबांनो, मी अरब नाही. मग प्रश्न इराणी/पाकीस्तानी का? ते ही नाही भारतीय तर मग पुढचा प्रश्न तुझा धर्म कुठला? कोहम् ह्या प्रश्नाचा मग अर्थ समजायचा (उत्तर मिळाले नाही तरी) - स्वतःला मी भारतीय आणि गरज असल्यास हिंदू समजणार, सुडोसेक्यूलर्सना मी फंडू - अर्थात फंडामेंटलीस्ट हिंदू वाटणार, अरबांना त्यांचा "ब्रदर" वाटणार... ये क्या हो रहा है? असे होयचे. मग अशाच वेळेस एक गोरा अमेरीकन एका लाईनीत भेटला - त्याने विचारले की तू कुठला? मी म्हणले "बॉस्टनचा" . त्यावर तो म्हणाला की अरे तसे नाही, तू भारतातील मूळचा कुठला? मला त्याला कडकडून मिठी मारावीशी वाटली की त्याने निदान माझी खरी ओळख न सांगताच करून घेतली होती. नंतर त्याच्याशी काही काळ चांगली ओळख झाली होती - भारताबद्दल जाऊन आल्यामुळे माहीती होती, पण अजून करून घेण्याची इच्छा होती आणि मोकळ्या नजरेने तो करून घेत होता... त्यात् कुठे रस्त्यावर हत्ती असतात का? गायीला देव मानतात का वगैरे सवंग प्रश्न नव्हते.

पुढे ९/११ नंतर माझ्या ऑफिसमधील काही सुहृदांनी काळजी घेण्यास सांगीतले होते - तेंव्हा ते फक्त मला म्हणाले की तू कधी कधी अरब वाटू शकतोस म्हणून. मग गेल्या महीन्यात माझ्या एका ऑफिसातील गोर्‍या कलीगने जी आणि मी आता वेगवेगळ्या बिल्डींगमधे असतो , तीने मला अचानक फोन करून विचारले की तू अरब आहेस की नाही? म्हणलं नाही भारतीय! (आता या बयेला मी कायम भारतात जातो ते माहीत असून ही अवस्था!)! ती आश्चर्याने म्हणाली, काय म्हणतोस! मला आज पर्यंत वाटायचे की तू अरब म्हणून मी तुला ____ (एक अरबी नटाच्या नावाने) कायम हाक मारायचे :-)

तात्पर्यः असे अनुभव आपण म्हणता तसे सरसकट सर्वांना येत नसले तरी येऊ शकतात हे नक्की!

हम्म!

बरं हे कोणा काळ्या-गोर्‍या अमेरिकनास कधीच वाटले नाही, पण अरबांनाच वाटलेले मी अनुभवले आहे.

मला वाटते उपरोल्लेखित चर्चा ही अमेरिकन गोर्‍यांच्या द्वेषपूर्ण वागणुकीवर आहे. :-) मला स्वतःला काही भारतीय माणसे कधीतरी अरबी किंवा पाकिस्तानी वाटून जातात. आमच्या लायब्ररीत काम करणार्‍या एका हिंदू (सिंधी) स्त्रीला मी गुळमुळीत ती नेमकी कुठली आहे असे विचारलेही होते. पण इथे प्रश्न तो नाही. कल्पेन मोदी नाव बदलून ते अम्रूंना जवळचे वाटावे म्हणून काल पेन होऊ शकतो परंतु त्याला हवी तशी संधी मिळत नाही म्हणून मग वंशवादावर उतरत असेल तर संशयाला जागा वाटते.

आयटीमुळे अनेक अमेरिकींना भारतीय कोण, ते कसे वागतात, काय करतात याची बर्‍यापैकी जाणीव झाली आहे. मागे एकदा मी एका सेल्सगर्लला काहीतरी सांगायला गेले असता तिने तुम्हा हिंदू लोकांना हे आवडते, तुमची आवड अशी असते असे सांगून मला नेमक्या गोष्टी दाखवल्या होत्या. वर कोणा "मा..."चे व्याख्यान शहरात आहे तुम्ही जाणार नाही का असे म्हणून आश्चर्यही वाटून घेतले होते.

तरीही माझा अनुभव असा की सर्वसाधारण अमेरिकन माणसाला समोरचा भारतीय किंवा पाकिस्तानी असल्यास फारसा फरक पडत नाही, किंबहुना हे दोन्ही देश एकमेकांना पाण्यात पाहतात/ पाहत होते याचा गंधही त्याला नसतो. त्यांच्या आपल्या चालीरिती, राहणीमान यांत फरक आहे यात फारशी रुची नसते आणि फरकही पडत नसतो.

मग गेल्या महीन्यात माझ्या एका ऑफिसातील गोर्‍या कलीगने जी आणि मी आता वेगवेगळ्या बिल्डींगमधे असतो , तीने मला अचानक फोन करून विचारले की तू अरब आहेस की नाही? म्हणलं नाही भारतीय! (आता या बयेला मी कायम भारतात जातो ते माहीत असून ही अवस्था!)! ती आश्चर्याने म्हणाली, काय म्हणतोस! मला आज पर्यंत वाटायचे की तू अरब म्हणून मी तुला ____ (एक अरबी नटाच्या नावाने) कायम हाक मारायचे :-)

ओमर शरीफ का? ;-) ते तर मीही माझ्या एका कलीगला म्हणते. :)) परंतु या प्रकारावरून मला वर्णद्वेष किंवा वंशवाद न दिसता सदर व्यक्तीची उदासीनता आणि बावळटपणा दिसला. :-) असेच प्रकरण माझ्याबाबत घडते तर मी ते वंशवाद किंवा वर्णद्वेष* या लेबलाखाली न ठेवता, "बहुतेक अमेरिकींना आपल्या काऊंटीबाहेर जग आहे याचे ज्ञान नसते" असा शिक्का मारून रद्द करेन. ;-)

आता राहिली गोष्ट अशी की, अमेरिकेत वंशवाद नाही का? तर तो नक्कीच आहे, पण त्याची उदाहरणे काल पेनने सांगितलेली अतिरंजीतच वाटली आणि वंशवाद नाही कोठे? भारतातही आहेच की.

* असे तुम्ही म्हणत नाही आहात हे माहित आहे. :-) तेव्हा असे लेबल तुम्ही लावले असे कोठेही दर्शवत नाही. फक्त असे वाटते की अशाप्रकारचे बाष्कळ लेख लिहिल्याने बर्‍याच भारतीयांना (विशेषतः काही भोचक काका-काकू, मामा-मामी यांना) अमेरिकेत भारतीयांना अगदी वर्णद्वेषी, वंशवादी वागणूक मिळते आणि तरीही हे पहा पैशांसाठी अमेरिकेत चिकटून राहतात असे बिनदिक्कत बोलण्याची संधी मिळत असते.

पहीले वाक्य

माझ्या प्रतिसादातील पहीले वाक्य असे होते:

थोडे अवांतर होईल, सत्य आणि स्वानुभवाधारीत आहे पण करमणूक म्हणून लिहीत आहे :-)

तेंव्हा आशा आहे की तो प्रतिसाद हा अवंतर आणि करमणूक म्हणूनच वाचला जावा. पुढे मी लगेच असेही म्हणालो की, "आपले वरील विधान निदान माझ्या स्वतःच्या अनुभवाचा विचार केल्यास अर्धसत्य ठरते. मला कोणी अतिरेकी समजले नाही (नशिब!). " थोडक्यात हा प्रतिसाद मी अमेरिकन्स वंशवादी आहेत असे म्हणायला लिहीला नव्हता हे नक्की.

आपल्या वरील प्रतिसादासंदर्भात माझे इतके म्हणणे नक्कीच आहे की जरी मला अनेकजण अरब समजले तरी त्यांनी त्यावरून माझ्याशी वाईट वागणूक केली नाही, तरी एखादा क्रॅकपॉट एखाद्या इनोसंटला तसे करू शकतो. पण म्हणून मी त्यावरून सर्वांना तसे म्हणणार नाही.

बाकी इतक्या वर्षाच्या अनुभवावरून कोण कुठल्या नजरेने वागत आहे हे समजू शकते त्यात बर्‍याचदा भारतीय आहे म्हणून वर्णद्वेष नसला तरी भारतीय आहे त्यामुळे "शहाणपणा" करून आपले जॉब घेऊ शकणार्‍यातला आहे ही भिती कधी कधी नक्की असते... पण त्यावर नंतर लिहीन..

थोडक्यात जसे सर्व अमेरिकन्स हे वंशवादी नसतात तसेच माझे सर्वच प्रतिसाद वाद घालण्यासाठी नसतात इतके समजून घ्यावे :-)

अवांतर

माझा अनुभव अवांतर आहे पण आठवल्यावर दिल्यावाचून राहावला नाही.

माझ्या ऑफिसातील माझ्या ओळखीच्या स्त्रियांपैकी ७०-८०% अमेरिकन स्त्रियांना बॉलिवूड हिरोज आवडायचे. (माहित तर बर्‍याच जणींना होते). आता त्यांचा सुनील शेट्टी हा सगळ्यात आवडता हिरो होता हा दुर्दैवी भाग अलाहिदा ;)
(त्यांना सुनील शेट्टीचे बरेच चित्रपट भारतात चालत नाहीत आणि हॉलिवूड ऍक्शन मुव्हीज चालतात याचे नवल वाटायचे)

-ऋषिकेश

फसलेले "प्रेमिस्"

अमेरिकेत कालच 'हेरॉल्ड ऍण्ड कुमार-एस्केप फ्रॉम गॉन्तोनामो बे' रिलीज झालाय. सिनेमा खूप वाईट आहे, असं म्हणत अमेरिकन वर्तमानपत्रांनी चांगलंच झोडपून काढलंय. हा राग नेमका कशामुळे याची कारणं कल्पेनच्या यशात सापडतील.

लेखाच्या सुरवातीलाच जो भाग उधृत करण्यात आला आहे त्यामधे काहीतरी बादरायण संबंध आहे. या दृष्टीने , मी लेख वाचायला घेतल्या घेतल्याच माशी शिंकली असे म्हणावे लागते. कल्पेन यशस्वी झाला/होतो आहे म्हणून वर्तमानपत्रांनी त्याला झोडपले आहे या मुद्द्यामधेच अनेक त्रुटी आहेत. "काल् पेन्" या नटाने आधी एकतर बक्कळ यश कमावले आहे अशातली परिस्थिती नाही. "नेमसेक्" मधले त्याचे काम चांगले होते ; पण इरर्रफान् आणि तब्बो यांच्यापुढे तो फिका वाटला होता. शिवाय दिग्दर्शिकेने , त्यातील "गोगोल्"च्या हृदयपरिवर्तनाच्या बाबतीत मूळ कादंबरीमधे नसलेली अतिरंजितता आणल्यामुळे , कल्पेन् ला ती भूमिका अदा करताना साहजिकच अतिनाट्य दाखवावे लागलेले होते. हे झाले कल्पेनच्या आतापर्यंतच्या गुणात्मक यशाबद्दल. "हॅरॉल्ड् ऍंड् कुमार "(उच्चारी कूमार !) चा पहिला भाग मी पाहिला आहे आणि तो पहाताना मी मनसोक्त हसलो होतो यात प्रश्नच नाही. मात्र या चित्रपटाची प्रकृतीच मुळी एक टीपीकल् "समर् मूव्ही" ची होती असे म्हणावे लागते. तरूण वयातील मुलांच्यातील लैंगिकता , त्यांच्यातील ड्रग्जची आवड , त्यांच्या खायच्या प्यायच्या सवयी, त्यांचा एकूण "वल्ड् व्ह्यु" या सगळ्याला , या जोडगोळीच्या पौर्वात्य पार्श्वभूमीची झालर असे त्याचे स्वरूप होते. असे चित्रपट बर्‍यापैकी "पोलिटिकली इन्-करेक्ट" असतात. त्यामुळे पात्रांच्या वंशाची , त्यांच्या आचार-विचार-उच्चारांची यथेच्छ खिल्ली त्यात उडवलेली असते. या सार्‍या पार्श्वभूमीवर , लेखामधे मांडलेली मते अनभ्यस्त , वरवरची ठरतात. कल्पेनला त्याच्या पूर्वायुष्यात वंशवादाची जाणीव झाली असेलही ; मात्र त्याबद्दल हॉलीवूड आणि वृत्तपत्रांच्या नावाने खडे फोडणे म्हणजे लेखिकेच्या कसल्याही पार्श्वभूमीच्या अभावाचे लक्षण आहे.

 
^ वर