गोरी गोरी पान?

आजकाल म्हणजे नेहमीप्रमाणेच काही अत्यंत वात आणणार्‍या जाहिराती दूरचित्रवाणीवर येत आहेत. स्वतःच्या काळ्यासावळ्या रंगामुळे निराश झालेली एक तरूणी मलूल होऊन आरशात पाहत आहे. अचानक फेअर अँड लव्हली ची ट्यूब अशी आडवी जाते आणि पाच दिवसात ती तरूणी गोरीपान होऊन यशस्वी युवतीचे तेज मिरवू लागते. तिच्या गोरेपणामुळे तिचे आईवडीलही अत्यंत हसतमुख होतात व चहा पिण्यासारख्या नियमित गोष्टी करतानाही वेड्यासारखे हसू लागतात. अधिक वात आणणारी दुसरी जाहिरात म्हणजे फेअर अँड हँडसमची. स्वतःच्या बहिणीची (बहुधा) फेअर अँड लव्हली क्रीम चोरून लावल्यामुळे यशस्वी युवकाचे तेज चेहर्‍यावर झळकण्याऐवजी आपली 'चोरी' पकडली गेल्याने शेणात पाय घातल्याप्रमाणे चेहरा झालेला तरूण आणि त्याला "ए ए ए ए ए ए मर्द होकर लडकियों वाली क्रीम" अशी उपदेशवजा सूचना देणारा शाहरुख खान दिसतो. नंतर गोरापान झालेला तरूण दोन युवतींच्या मध्ये आत्मविश्वासाने उभा राहूनशाहरूखसारखाच काहीतरी आचरट मुद्राभिनय करून दाखवतो.

हे गोरेपणाचे आकर्षण इतके का? गोरेपणालाच यशस्वी मानण्याची प्रवृत्ती का?

सौंदर्याचे इतर सर्वमान्य निकष पाहिले तर त्यांना निदान शास्त्रीय आधार असल्याचे मानले जाते. कमनीय बांधा असलेल्या स्त्रिया या अधिक प्रजोत्पादनक्षम असल्याचे निष्कर्ष काही अभ्यासांमध्ये काढले गेले आहेत. स्त्री-पुरुष मिलनाचे मूलतः कारण प्रजोत्पादन करणे हे असल्याने पुष्ट वक्षस्थळे व नाजूक कंबर असलेल्या अशा स्त्रियांकडे (विवाहोत्सुक) पुरुषांनी आकर्षित होणे हे निसर्गनियमाला धरून होईल. तीच गोष्ट पुरुषांसाठीही लागू पडते. दणकट शरीरयष्टी, बांधेसूद शरीर असलेले पुरुष हे अधिक आरोग्यसंपन्न आणि प्रजोत्पादनक्षम असतात. पुरुष स्थूल शरीरयष्टीकडे झुकल्यास त्यांची प्रजोत्पादनक्षमता कमी होते. त्यामुळे अशा बांधेसूद पुरुषांकडे (विवाहोत्सुक) स्त्रियांनी आकर्षित होणे हे निसर्गनियमानुसार आहे.

मात्र हे गोर्‍या रंगाचे काय लफडे आहे?

गोरा रंग हे अधिक आरोग्यसंपन्न, प्रजोत्पादनक्षम किंवा इतर काही गुण असलेल्या शरीराचे निदर्शक आहे का? भारतातील बहुसंख्य मंडळी ही गव्हाळ, सावळ्या रंगाची आहेत. अगदी आपल्या देवांची वर्णने करतानाही 'सावळे सुंदर रूप मनोहर' असे म्हटले जाते. विठ्ठल, राम, कृष्ण असे देव काळेसावळे असल्यावर रुपवान आणि सुंदर आणि त्यांचे भक्तगण असलेल्या मानवांनी मात्र गोरे होण्यासाठी निरनिराळी रसायने चेहर्‍यावर थापायची हा कुठला न्याय?

गोर्‍या रंगाचा समावेश सौंदर्याच्या लक्षणांमध्ये कसा झाला? ब्रिटिशपूर्व काळातही गोर्‍या रंगाचे आकर्षण होते का? की ही पद्धत ब्रिटिशांच्या काळात सुरु झाली. अजूनही गोरेपणा म्हणजे कोणत्यातरी बाबतीतले श्रेष्ठत्व हे आपल्या मानसिक गुलामगिरीचे लक्षण आहे का? अद्यापही 'वधू पाहिजे'च्या जाहिरातीत गोरी मुलगी हवी असे का दिसते? 'गोरी गोरी पान फुलासारखी छान' अशा गाण्यांमधून आपली सौंदर्यदृष्टी एककल्ली होते का?

या विषयावर विस्तृत आणि अकॅडेमिक उद्देशाने चर्चा होणे आवश्यक आहे असे वाटते.

(कृपया या विषयाचे वर्गीकरण पाहून प्रतिसाद द्यावेत ही नम्र विनंती)

आपला,
(बहुचर्चित) आजानुकर्ण

Comments

सहमत

विचारंशी सहमत.. आणि छान चर्चाविषय... याबद्दल वाचायला आवडेल
मी यावर अधिक लिहू शकत नाहि कारण अगदी ह्हेच प्रश्न मला पडले आहेत :)

जाता जाता: याच प्रश्नांनी ग्रस्त(!) असताना हे ललितलेखन माझ्या हातून घडले :)

-ऋषिकेश

वा

ऋषिकेश, तुमचा लेख छान आहे. याआधी वाचणे झाले नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

टॉल, डार्क अँड ह्यांडसम

स्वतःच्या बहिणीची (बहुधा) फेअर अँड लव्हली क्रीम चोरून लावल्यामुळे यशस्वी युवकाचे तेज चेहर्‍यावर झळकण्याऐवजी आपली 'चोरी' पकडली गेल्याने शेणात पाय घातल्याप्रमाणे चेहरा झालेला तरूण आणि त्याला "ए ए ए ए ए ए मर्द होकर लडकियों वाली क्रीम" अशी उपदेशवजा सूचना देणारा शाहरुख खान दिसतो. नंतर गोरापान झालेला तरूण दोन युवतींच्या मध्ये आत्मविश्वासाने उभा राहूनशाहरूखसारखाच काहीतरी आचरट मुद्राभिनय करून दाखवतो.

यूट्युबवर बघता येईल का हा प्रकार? मजेशीरच आहे.

मला वाटायचं की पुरूष टॉल अँड डार्क असले की ह्यांडसम दिसतात पण ते बहुधा रापलेल्या गोर्‍या इसमाचे वर्णन असावे. ;-) पण राम आणि कृष्ण हे दोन्ही सावळे पुरूष ह्यांडसम असावेत. ;-)

(कृपया या विषयाचे वर्गीकरण पाहून प्रतिसाद द्यावेत ही नम्र विनंती)

महाभारतात व्यास म्हणतात, सावळ्या रंगाच्या, दाट कुरळ्या आणि लांब केसांच्या, कमलाक्षी द्रौपदीच्या अंगाला येणारा नीलकमलांचा सुवास दोन मैलांवरून येत असे.

'गोरी गोरी पान फुलासारखी छान' अशा गाण्यांमधून आपली सौंदर्यदृष्टी एककल्ली होते का?

नाही बॉ! आपण दूषित नजरेने तर बघत नाही ना. माणिक वर्मांचे "सावळाच रंग तुझा" हे ही तितकेच सुरेख आहे मग त्याचा परिणाम लोकांवर का नाही?

फेअर अँड हँडसम

फेअर अँड हँडसम असे त्या वस्तूचे नाव आहे. यूट्यूब वर मिळण्यास हरकत नसावी.

"सावळाच रंग तुझा" चे उदाहरण योग्य आहे. मात्र एक निरीक्षण असे आहे की मुलांच्या संस्कारक्षम वयामध्ये त्यांना 'गोरी गोरी पान' अशी गाणी ऐकवली जातात. मात्र नंतर 'सावळाच रंग तुझा' हे गाणे केवळ गाणे ऐकण्याच्या आनंदासाठी किंवा गदिमा किंवा राग मधुवंती वगैरे गोष्टींचे विश्लेषण करण्यासाठी ऐकले जाते.

'गोरी गोरी पान' चा प्रभाव हा फार लहान वयात झाल्याने तो पुसला जाणे अवघड जाते.

द्रौपदीचे उदाहरण आवडले. पण मग नक्की गौरवर्ण हा श्रेष्ठ असे मानण्यास केव्हा सुरुवात झाली याबाबत काही माहिती आहे का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

डार्क म्हणजे काळ्या केसांचा

एक स्पष्टीकरण - मी ऐकल्याप्रमाणे इंग्लिशमधील "टॉल डार्क ऍण्ड हॅण्डसम" ह्यातील डार्क हे विषेशण पुरुषाच्या केसाच्या रंगाबद्दलचे असते. (जसे बायकांच्याबाबतीत ब्लाँड असते तसे)

वर्णद्वेषी जाहिराती

कातडीच्या रंगानुसार भेदभाव करणार्‍या, काळ्या रंगाच्या व्यक्तींना मागास/अक्षम/अयशस्वी दाखवून गोरेपण म्हणजे यश असे दाखवणार्‍या जाहीराती आणि त्यात दाखवलेल्या उत्पादनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येणे शक्य असावे.

पूर्वीच्या काळी असणारे महापुरुष ('हिरोज' या अर्थाने) बहुसंख्य भारतीय लोकांप्रमाणे काळे-सावळे होते हे योग्य निरीक्षण तुम्ही नोंदवले आहे. पण त्यावेळीही काही व्यक्ती उजळ वर्णाच्या होत्या अशी वर्णने आहेत असे वाटते. उदा. पार्वती (गौरवर्णी म्हणून गौरी इ.) चूभूद्याघ्या. माझ्यामते इंग्रजांच्या काळापासून गोरेपण म्हणजे काहीतरी ग्रेट अशी भारतीय जनसामान्यांची भावना झाली असावी असे वाटते.

>> अजूनही गोरेपणा म्हणजे कोणत्यातरी बाबतीतले श्रेष्ठत्व हे आपल्या मानसिक गुलामगिरीचे लक्षण आहे का?

असावे असे वाटते खरे.

सहमत आहे

नवीनराव तुमचे म्हणणे खरे आहे. अशा जाहिरातींमुळे काळ्यासावळ्या रंगाच्या व्यक्तींमध्ये विनाकारण न्यूनगंड निर्माण होतो. शिवाय आपल्या सौंदर्याच्या कल्पनांचे असे कंडिशनिंग होत असल्याने काळ्यासावळ्या रंगाच्या व्यक्तींचे विवाह होणेही अवघड होते.

कुमारावस्थेतील अनेक मुलेमुली अशा जाहिरातींमुळे अभ्यासाकडे, खेळाकडे लक्ष देण्याऐवजी "टॅन" होईल म्हणून उन्हात जाणे टाळतात, गोरेपणासाठी नाहक रसायने चेहर्‍यावर चोपडतात आणि तजेलदार, तरतरीत चेहर्‍याला रोगट अवकळा आणतात हे आश्चर्यकारक आहे.

आपला,
(चिंतित) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गोरे लोक पुष्कळदा उन्हातान्हात काम करणारे नसतात

सूर्याने त्यांची कातडी रापली नसते. त्यामुळे अशा व्यक्तीकडून विवाहानंतर एकमेकांची चांगली आर्थिक सोय होऊ शकते.

आजकाल अनेक कमी-कमवणारे मजूर छपराखाली काम करतात. म्हणून गौरवर्णीय देशांत "टॅनिंग"ला काही महत्त्व प्राप्त झाले आहे. अंग अगदी एकसारखे रापण्यासाठी दिवसभर उन्हात निवांत पडून राहावे लागते. अशा "सुंदर" रापलेल्या व्यक्तीकडे बर्‍यापैकी धनसंपन्नता असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यक्तीकडून विवाहानंतर एकमेकांची चांगली आर्थिक सोय होऊ शकते.

(पूर्वी युरोपातही गोरी-गोरी असण्यालाच सौंदर्य मानले जाई.)

जसे भारतात फेअर अँड लव्हली मिळते, तसेच अंगाला फासायचा "टॅन" रंग अमेरिकेत मिळतो.

शक्य आहे

धनंजयराव,

तुमचा प्रतिसाद नेहमीप्रमाणेच महत्त्वाची माहिती देणारा आहे. रंग आणि आर्थिक स्थिती यांचा जवळचा संबंध असू शकतो. मात्र एक प्रश्न असा की अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय समाजामध्ये एखादा पदार्थ खपवण्यासाठी कृष्णवर्णीय मॉडेल वापरले जाते. त्यांच्या रंगाचा त्यांना अभिमानही आहे. मात्र भारतात काळ्यासावळ्या रंगाच्या मॉडेली अगदीच कमी. नगण्यच. असे का? दक्षिण भारतात तर अगदी सगळेच लोक हे सावळ्या रंगाचे आहेत मात्र तिकडे अशा गौरकारक रसायनांचा वापर सर्वात जास्त आहे. शिवाय असा पदार्थ खपवण्यासाठी अर्थातच गोरी व्यक्ती मॉडेल म्हणून वापरली जाणार.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

काळेसावळे

पूर्वी तसे असेलही पण माझ्या मततीखादी व्यक्ती का आवडावी याचे वेगळेच निकष लोक लावतात. मधु सप्रे काळीसावळी असूनही मॉडेल म्हणून बरीच पुढे आहे (असे समजते). नूतन समर्थ, स्मिता पाटील, शिरोडकर भगिनी, सोनाली कुलकर्णी, नाना पाटेकर असे अनेक काळेसावळे लोक जाहिरात/ चित्रपट क्षेत्रात अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहेत.

खालचाच फोटो पाहिलात तर काळ्यासावळ्या मॉडेलही पुढे दिसतील. मला वाटते गेल्या १५ वर्षांमधे काळ्या गोर्‍याच्या व्याख्या आणि समीकरणे बदलली आहेत त्यामुळे हा विषय तसा कालानुरूप वाटत नाही (हे माझे प्रामाणिक मत!). विश्व सुंदरी स्पर्धांमध्येही काळ्यासावळ्या सुंदर्‍याच निवडल्या जातात (असे समजते). http://im.rediff.com/movies/2007/apr/11miss.jpg
http://mangalorean.com/images/features1/20070528sara4.jpg
http://timesofindia.indiatimes.com/photo.cms?msid=654478

शीतल मल्हार

शीतल मल्हारचे नाव यासंबंधात प्रकर्षाने आठवते. (कॅरोल ही आहेच.) शीतलने ही चाकोरी मोडली अशा आशयाचा भला मोठा लेखही वाचल्याचा स्मरतो.

नूतन सावळी असल्याची कल्पना नव्हती. गौतम राजाध्यक्षांनी (शोभाचे भाऊ) सर्वाधिक सुंदर नैसर्गिक चेहेरा असे नूतनचे वर्णन केल्याचे स्मरते.

नूतन समर्थ सावळ्याच

नूतन समर्थ सावळ्याच बरं का! त्यांच्या मातोश्रीच त्यांना "अग्ली डकलिंग" म्हणायच्या.

अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि गोरेपणा हवा असणे

अमेरिकेत गुलामगिरीच्या काळात गुलामांमध्ये "घरचे गुलाम" आणि "शेतातले गुलाम" असे वर्गीकरण असे. "घरचे गुलाम" म्हणजे खानसामे, बटलर, स्वयंपाकिणी, दाई, वगैरे. हे लोक त्यातल्या त्यात कमी रापलेले असत. (शिवाय गोर्‍या मालकाची अपत्ये असण्याची अधिक शक्यता असे.) निमगोरे "घरचे गुलाम" आणि काळे "शेतातले गुलाम" यांच्यात उच्च-नीच असा भाव असे.

अजूनही "हाय येलो" म्हणजे जवळजवळ गोर्‍या लोकांना काही कृष्णवर्णीय लोक सुंदर मानतात. पण हे पूर्वी अधिक होते. (इति विकिपेडिया दुवा१, दुवा२). याविषयी ओनिक्स या कृष्णवर्णीयांच्या मासिकाच्या स्थळावर चर्चा झालेली दिसते. (दुवा) काळ्यांतही-गोरे-हेच-चांगले असे मानण्याचे लोकांचे अनुभव लिहिलेले आहेत.

आजकाल कृष्णवर्णीय लोकही आनंदाने टॅनिंग करतात. पण टॅन-लाइनी कुठे दिसतात यावर त्याचे सौंदर्य अवलंबून असते. दंडावर टॅन लाईन दिसणे हे सौंदर्याचे लक्षण नाही. दिसलीच तर बिकिनीपाशी टॅन लाईन दिसावी. ही गोष्ट माझ्या काळ्या मित्रमैत्रिणींकडून समजली.

गोर्‍या लोकांतही साधारण असेच काही मत असते. "गावंढळ" साठी प्रतिशब्द "रेडनेक". म्हणजे शेतकाम किंवा मजुरी करताना मानेला उन्ह लागलेला. त्यामुळे मानेपाशी टॅन लाईन दिसणे हे सौंदर्याचे लक्षण नाही. ही गोष्ट माझ्या गोर्‍या मित्रमैत्रिणींकडून समजली.

टॅन लाईन म्हणजे काय. कातडीचा जो भाग उघडा असतो तो रापतो, कपड्याखाली झाकलेला असतो तो रापत नाही. ती सीमारेषा स्पष्ट दिसते. ती टॅन-लाईन.

मॅकॉलेची सावली

सध्या माझ्या प्रतिसादाला भारतीय संदर्भापुरता मर्यादित ठेवत आहे.
गोर्‍या कातडीचे आकर्षण, तिला अध्याहृतपणे मिळणारी सामाजिक मान्यता याची मुळे तपासू जाता , एक फार मोठा घटक म्हणजे वसाहतवादातून आलेली मूल्ये हा होय. वसाहतीच्या राज्यकर्त्यांची वैशिष्ट्ये ही अनधिकृत रीत्या आदर्श, प्रमाणभूत ठरत गेली. दीड शतकाच्या कालावधीमधे "गोरेपणा"चा ठसा खोलवर उमटला.
अर्थात याचे सर्व श्रेय साहेबाला देणे अयोग्य होईल. वांशिक उच्चभ्रूत्वाच्या कितीतरी शतके - सहस्त्रकच म्हणायला हवे - जातीपातीची उच्चनीचता अस्तित्वात होती. उच्चवर्णीयांची , उच्चजातीयांची शरीरवैशिष्ट्ये हा सामाजिक मान्यतेचा मापदंड बनला होता.
प्राचीन आणि मध्ययुगीनकाल व तदनंतर आलेला वसाहतीचा कालखंड संपून मग आलेल्या स्वातंत्र्योत्तर कालखंडात अर्थातच या सर्व ऐतिहासिक गोष्टींचे ओझे आपण अजूनही वहातो आहोत.

गोरापान/गोरागोमटा आणि काळाढुस्स

मुक्तसुनीतराव,

तुमचे म्हणणे योग्य वाटते. तुमच्या दुसर्‍या परिच्छेदामुळे आम्हाला गोरापान/गोरीगोमटी आणि काळाढुस्स या दोन विशेषणांची आठवण झाली. ही विशेषणे साहेब येण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात असावीत. या विशेषणांना असलेली अनुक्रमे श्रेष्ठत्व आणि हीनत्व यांची छटा ही वांशिक उच्चभ्रूत्वातून आली असावी असे मानता येईल.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चित्र बदलत आहे

बिपाशा, काजोल, नम्रता शिरोडकर आणि अशा काही सुंदरी आणि त्यांचे पंखे पाहिले की हे चित्र हळूहळू का होईना बदलत आहे असे जाणवते. पण लग्नाच्या बाबतीत मात्र अजूनही चित्र जवळजवळ तसेच आहे. गोरेपणाच्या क्रिमांमध्ये असणार्‍या ब्लिच आदी रसायनांमुळे त्वचेच्या रंगात फरक दिसला तरी तो क्रिम बंद केल्यावर परत येतो असे ऐकले आहे. म्हणजे तीव्र रसायने असलेले क्रिम एकदा लावले की आयुष्यभर लावत रहावे लागते असे ऐकले आहे.
रंगभेद किंवा एखाद्याचा त्वचेचा रंग अजिबात लक्षात येऊ नये हे खरे, पण मुद्दाम प्रखर उन्हात जाणे टाळावे, परदेशी मंडळींना टॅंनिंग चे आकर्षण आहे. पण त्यांच्या इथे जशी सूर्यकिरणे कलती आणि सौम्य पडतात तशी आपल्याकडे पडत नाही, त्यामुळे अगदी पहाटेचे कोवळे ऊन सोडल्यास बाकी उन्हांमध्ये वावरावे लागल्यास पुण्यातल्या मुलींसारखा स्कार्फ मोजेधारी लादेन अवतार धारण करणे आणी सनस्क्रिन वापरणेच योग्य.
मुळात आपली त्वचा जशी लहानपणी मऊ होती तशीच ठेवणे, त्याचा मुलायम पोत आणि आरोग्य योग्य ती काळजी घेऊन राखून असणे हा मुख्य उद्देश असावा. (अवांतर,उधळे आणि बायकी: काया स्किन क्लिनिक मध्ये एक फेशियल हजार रुपयांचे असते म्हणे. कोणी केले आहे का? अनुभव कसा आहे?)
'गोरा' किंवा पांढरा फटफटीत रंग आणि समृद्धी यांचे नाते भारतीय मनाने नकळत जोडले आहे. आपल्यावर राज्य करणारे त्या रंगाचे होते, श्रीमंत होते, त्यांच्या मर्जीत राहिल्यावर आर्थिक फायदे होत असत, त्यांची चलने रुपयाच्या ४०-५० पट असल्याने ते आकर्षण यांची सांगड भारतीयांच्या संज्ञातीत मनाने 'गोरे म्हणजे चांगले' अशी घातली असावी असा अंदाज. आपल्यावर राज्य करणारे आफ्रिकन असते किंवा जपानी असते तर अनुक्रमे कृष्णवर्ण/पिवळा वर्ण म्हणजे समृद्धी असे समीकरण मनात तयार झाले असते असे वाटते.

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

गोरे - काळे

चर्चा वाचताना पडलेला एक प्रश्न:
या हल्लीच्या जाहिराती काही काळ बाजूला ठेवू. पण आपल्या महाराष्ट्रात गोरे आणि काळे हि आडनावे आढळतात. ती कशावरून पडली असतील? मी काळे आडनावाची जी माणसे आजवर पाहिली आहेत ती सर्व वर्णाने गोरीच होती. असे का? (अरे हो, एका जाहिरातीत या नावांचा सुद्धा वापर प्रभावीपणे केला आहे.)

आता तुम्हाला काही प्रश्नः
काळोखी रात्र आणि प्रसन्न सकाळ असे का? जर सगळे मिळून २४ तासांचा एक दिवस होतो, तर अनेकदा काळ्या रात्रीला महत्व कमी का?
दात जर त्यांचे काम आयुष्यभर व्यवस्थीत करत असतील तर मग ते दिसायला शुभ्रच असावेत असा हट्ट का असतो?

कार्यालयात कामाचा पगार हा काम चांगले करण्यासाठी मिळतो. अनेकदा आपण ते करतो सुद्धा. कंपनीला फायदा होतो. पण जेंव्हा कामाचा आढावा घेतला जातो, त्यावेळी तु अजुन चांगले काम करू शकतोस असे का?
सचिन तेंडूलकरचे शतक हुकले आणि सामना जिंकला तरी अनेक जण हळहळतात. असे का?
एखादे उत्पादन तयार होउन बाजारत आले तरी त्यात व्हॅल्यु ऍडिशन (योग्य शब्द?) केले जाते. असे का?

तर सांगायचा मुद्दा असा, की तुम्ही स्त्री पुरूषांच्या ज्या एक मेकांच्या शरीर/कांती बद्दलच्या पुर्वीच्या कल्पना होत्या त्या आहेतच. पण आता आणखीन चांगले/समाधानकारक हवे हा विचार प्रत्येकाला आहे. स्त्रीच्या पुरुषां बद्दलच्या अपेक्षा आणि उलटे हे बदलत नाहीये, तर मागणीमध्ये वाढ होते आहे. त्यानुसार, मागणी तसा पुरवठा हे आलेच. आणि समाधान हे मानण्यावर आहे वेगळे सांगायचा गरज नाहीच. :)

अवांतरः भारताच्या भौगोलिक रचनेवर आधारीत लोकांच्याअ त्वचेचा रंग, याचा विचारकरून भारताचा ध्वज तयार केला तर त्वचेचे सगळे रंग एकत्र दिसतील. :)

जे नाही ते हवे

अधिक विचार केल्यावर असे वाटले की आपल्याकडे जे (जास्त प्रमाणात किंवा आजिबातच) नाही त्याचे आकर्षण असणे स्वाभाविक आहे. बहुसंख्य काळ्या-सावळ्या लोकांमध्ये अल्पसंख्य गोर्‍या लोकांना यामुळे महत्त्व (दुर्मिळ गोष्टीची किंमत जास्त या न्यायाने) आले असावे. 'गोर्‍या' युरोपियन लोकांना काळ्या/तपकिरी त्वचेचे आकर्षण असते असे वाचले होते.

हे मात्र खरे

गोरा रंग,चांगले कपडे या कडे लोक लगेच आकर्षित होतात. असे का ते कळत नाही? मग तो माणुस कसाही का असेना. .
आणि स्रियांच्या कमनिय बांध्याबद्दल बोलत असाल तर मी आजन्म ब्रम्हचारी असल्याकारणाने या विषयावर बोलू शकत नाही .
आपला
कॉ.विकि

जाहीरातींचा प्रभाव

ह्या चर्चेमुळे काही प्रश्न निर्माण होतात:

  1. जाहीराती ह्या माणसांना हव्या त्या गोष्टी दाखवतात का त्यांच्याकडे आहे ते प्रभावीपणे विकायला नवीन विचार तयार करतात? (म्हणजेच मार्केटींग करतात) - मला वाटते हे जास्त करून निदान सध्याच्या काळात मार्केटींग आहे.
  2. आपल्यापैकी (माझ्यासकट) किती जणांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कृष्णवर्णाशी (अफ्रिकेतील वांशिक अर्थाने नाही) संबंध येतो आणि तो आला की कमी पणा वाटतो? प्रत्यक्ष म्हणजे स्वतः गोरे नसणे अथवा जवळच्या व्यक्ती गोर्‍या नसणे तर अप्रत्यक्ष म्हणजे इतरत्र कुठेही. - परत याचे उत्तर वाटते की तसे कुणालाच वाटत नसावे, न्यूनगंड नसावा...
  3. अमेरीकेत धनंजयने सांगीतल्याप्रमाणे क्रिम्स तर आहेतच पण अनेक मिश्रवंशिय लग्ने आहेत. ओबामाचे वडील काळे तर आई गोरी होती...
  4. आपल्याकडे पण पहाल तर समाजातील विविध क्षेत्रातील (वर इतरत्र काही उल्लेख झाले आहेतच) अशा किती लोकप्रिय व्यक्ती आहेत की ज्या गोर्‍या आहेत म्हणून प्रिय आहेत अथवा नाहीत म्हणून अप्रिय आहेत? - नुसतेच नट/नट्या कशाला, इतर कलाकार पहा, खेळाडू पहा, गांधी - नेहरू घराणे सोडून राजकारणी पहा - अगदी म. गांधी पहा किंवा टिळक, सावरकर आदी पहा...

थोडक्यात मला हा प्रसिद्धीमाध्यमांचा आणि त्यातील जाहीरातींचा प्रभाव वाटतो. बाकी जेंव्हा व्यक्तिगत आयुष्यात हा प्रश्न येतो तेंव्हा त्यात न्यूनगंड असतो अथवा तयार केलेला असतो. ज्यांच्यात तो नसतो त्यांचा रंग कुठलाही असला पण "बावळाच ढंग तुझा" असला तर समाजमान्य /प्रिय होण्याची शक्यता नसते.

बाकी ऋषिकेशच्या मिपावरील चर्चेत खालील पिंक टाकली होती:

  • पांढरा रंग हा काळ्यापुढे फिकाच असतो
  • माणसाचे तरूण पण हे डोक्यावरचे केसकाळे असताना धरले जाते पांढरे झाल्यावर नाही. अर्थात काहीजणांचे डोक्यावरील केस "तोंड काळे करतात"हा भाग वेगळा :-)
  • जो पर्यंत आपण लिहीत नाही तो पर्यंत कागद कितीही पांढराशुभ्र असला तरी "कोरा"च राहतो.
  • संगणकावर टंकताना पण प्रामुख्याने आपण काळा रंगच वापरतो.
  • जसा काळजीने चेहरा काळवंडतो तसाच भीतीने अथवा पित़ळ उघडे पडलेला चेहरापण गोरामोरा होतो.
  • आणि हो, ज्या एका व्यक्तिस तमाम (हिंदू) भारतीय हे "संपूर्ण पुरूष" म्हणतात त्याचे नावच "श्रीकृष्ण" काळाच आहे.

सावळा

आपली आवडती व्यक्ती काळी असेल तर तिला सावळी म्हणतात. कृष्णाला सावळे म्हणतात. "सावळाच रंग तुझा" विवाह विषयक जाहिराती मध्ये सावळा/गौर/निमगोरा/गव्हाळ असेच लिहिले जाते. काळा असे कोणी लिहित नाहीत. दत्तक देताना संस्था काळ्या कुटुंबात गोरा मुलगा दत्तक देत नाहीत किंवा उलट. त्याचे कारण मुलाला समाजात वावरताना शक्यतो अडचण येउ नये. काळ्या मुलांना समाजात टोमणे मारले जातात. त्यांची अवहेलना होते. मुलींना तर फारच त्रास होतो. "काळुंद्रि तर हाय् मेली" "रंग गेला तर पैशे परत" "थोबडा बघ म्हनाव आरश्यात जाउन" " एऽऽ खारा शेंगदाणा"(काळ्या व्यक्तीने पावडर लावल्यावर)
पहिल्या बाजीरावाची प्रेयसी मस्तानी म्हणे एवढी गोरी होती कि पान खाल्यावर पानाची पिंक घशातून उतरताना दिसे. यावर काही द्वाड लोक म्हणत कि दुसर्‍या बाजीरावाची प्रेयसी इतकी काळी होती कि ती दुध पिताना दुधाची पांढरि शुभ्र धार घशातून उतरताना दिसे.

प्रकाश घाटपांडे

अत्रे

या चर्चेवरून आठवले: याच पद्धतीच्या विषयावर एकदा आचार्य अत्र्यांनी लिहीले होते - विषय होता "डाव्या हाताचे दु:ख" -(शिर्षक आठवत नाही).

आपल्याकडे डावखुरे असणे पण चांगले समजत नाहीत त्यावरून त्यांनी लिहीला होता.

डावे आणि उजवे

अवांतरः अशोक नायगांवकर यांची "डावे आणि उजवे" ही कविता देखील मस्त आहे

-ऋषिकेश

डावे - उजवे

ती कविता कुठे पोस्ट करू शकाल का? वाचायची उत्सुकता आहे..

आहे खरे

आ कर्ण म्हणतो तसे आहे खरे.
काहीसा युनगंड तयार केला जातो. आणि या कंपन्या त्याला खतपाणी घालतात.
कारण तो त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. पणा या जाहिरातींचा पौगंडावस्थेत भीषण परिणाम असतात.
आपल्या सावळ्या देवांचे उदाहरण हल्ली फारसे परिणामकारक वाटत नाही.

कारण पुर्वी विट्ठल हा सामान्य घरात प्रमुख देव होता, हल्ली त्याची जागा गणपतीने घेतली आहे की काय असे वाटते.
बाकी वरची चर्चा वाचायला आवडली.

शेवटी अंगाचा रंग पाहण्यापेक्षा अंगातले गुण पाहणे हेच रास्त असे वाटते. पण तरी लोकांना हे पटतेच असे नाही. मागे एक कोणता तरी सर्व्हे वाचला होता. त्यात असा दावा होता की ज्या कंपन्यांचे प्रमुख दिसायला आकर्षक आहेत त्या कंपन्या जास्त नफा कमवत आहेत.
म्हणजे कर्तूत्व गेले आणि दिसने महत्वाचे. कितीही काही केले तरी शेवटी दिसणे हा एक महत्वाचा भाग आहेच??

आपला
गुंडोपंत

फेअर ऍन्ड लव्हली

या कंपनीत एक प्रकल्प केलेल्या एका विद्यार्थिनीने 'जगातले कोणतेही क्रीम तुम्हाला उजळ करु शकत नाही' असा निष्कर्ष काढला होता. त्वचेतले मॅलामाईन हे द्रव्य कोणत्याही मलमाने कमी होत असेल असे वाटत नाही.
सन्जोप राव

हेच

'जगातले कोणतेही क्रीम तुम्हाला उजळ करु शकत नाही'
हेच टुथपेस्ट बाबतही तितकेच खरे आहे!

आपला
गुंडोपंत

मॅलामाईन?

मॅलॅनीन, मला वाटते.
(मेलॅमाईनची भांडी असतात आणि ती बहुधा लग्नात डिनरसेटमध्ये भेट म्हणून आलेली असतात. :))

मी गमभन शब्दसंपदा कधीकधी वापरते.

मेलॅनिन आणि मलमे

आजच दुकानात जाऊन फेअर अँड लव्हलीच्या डब्यावरचे घटक वाचले.

त्या घटकांपैकी कार्यशील एकच मला दिसला - तो म्हणजे सूर्याची अति-जांभळी (अल्ट्राव्हायोलेट) किरणे थांबवणारा पदार्थ. हा पदार्थ कातडीवर असला तर ती किरणे त्वचेच्या आतल्या पेशींपर्यंत पोचत नाहीत. या किरणांना प्रतिक्रिया म्हणून पेशी काळे द्रव "मेलानिन" निर्माण करतात. मलमाच्या आदथळ्यामुळे मुळे ते द्रव तितके निर्माण होत नाही. अशा प्रकारे मलमाचा थर जोपर्यंत त्वचेवर आहे, तोवर त्वचा उन्हाने रापण्याचे प्रमाण थोडे कमी होते.

मात्र मलमाचा थर चेहर्‍यावर दिवसभर ठेवणे जवळजवळ अशक्य असते. त्वचेतून कळे-न-कळे सारखा घामाचा पाझर होत असतो, आणि तो आपल्याकडून पुसला जात असतो. त्यामुळे फासलेले मलम लवकरच पुसले जाते. मग त्वचा रापायची ती रापतेच.

संशोधन/उकल

नुकत्याच वाचनात आलेल्या बातमी नुसार स्त्रीयांच्या गौरवर्णाच्या आकर्षणामागचे कारण त्याचा 'पावित्र्या'शी जोडला गेलेला संबंध व पुरुषांसाठीच्या सावळेपणाचा (डार्क, त्वचाच) 'राकटपणाशी/मर्दानगीशी' जोडला गेलेला (भावनिक (शास्त्रीय पेक्षा वेगळा)) संबंध कारणीभूत आहे असे समजले.

हे गूढ, नुकतेच संशोधनात उलगडले अशा आशयाची बातमी होती.

बातमीच्या दुव्याच्या अर्थातच शोधात.. (शोधून पाहिला, सहजतेने सापडला नाही.)

तो.

 
^ वर