सृजनशीलता - भाग ५ - सरावासाठी आणखी एक विषय

(मागील भागावरून पुढे)

आता मेंदूच्या व्यायामासाठी आणखी एक विषय घेऊ.

समजा, आपण पाचव्या मजल्यावर राहात आहोत. बाहेर जाण्यासाठी आपल्याला खाली रस्त्यावर उतरायचे आहे.

तसे आपण नेहमी उतरत असतो. त्यांत कधीही कुठलीही अडचण आलेली नाही. तरीही आपण मेंदूला वरील सूचनांप्रमाणे व्यायाम घडवणार आहोत.

पाचव्या मजल्यावरून खाली कसे यायचे यासंबंधी पर्याय :
१) लिफ्टने
२) जिन्याने
३) काही मजले लिफ्टने, उरलेले जिन्याने
४) पाईपच्या आधाराने
५) खिडकीच्या गजाला पुरेशा लांबीचा दोरखंड बांधून त्याच्या साह्याने
६) खिडकींतून थेट खाली उडी मारून (डाव्या मेंदूला गप्प करा)

वरीलपैकी पर्याय (१) व (२) बद्दल काही वाटणार नाही. पर्याय (३) हा निरर्थक उद्योग वाटण्याची शक्यता आहे. पर्याय (४) व (५) बद्दल लोक आपल्याकडे चमत्कारिक नजरेने पाहतील हे डोक्यांत येईल तर पर्याय (६) आपल्या मानसिक संतुलनाविषयी लोकांच्या मनांत शंका उत्पन्न करणारा वाटेल.

आपण पर्याय (६)वर डाव्या मेंदूच्या साह्याने व्यावहारिक विश्लेषणाचे तंत्र वापरू व काय होते ते पाहू. त्यासाठी प्रथम त्याबाबत ताबडतोब डोक्यांत येणारा स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार तात्पुरता बाजूला ठेवून फक्त अनुकूल मुद्दे पाहू. ते असे असतील -
१) इतर मार्गांच्या मानाने अगदी थोड्या वेळांत खाली पोहोचू.
२) आपली काहीच शक्ति खर्च होणार नाही.
३) अनुभव थरारक असेल. (मुलांना सोफ्याच्या डनलॉप कुशनवर नाचताना क्षणभर हवेंत राहण्याचा आनंद कसा मिळतो ते आठवा).

प्रतिकूल मुद्दा : स्वतःच्या शरीराच्या सुरक्षिततेला धोका.
त्यावर व्यावहारिक उपाय : पॅराशूटच्या साह्याने उडी मारणे.
त्यांतील अडचण : इतक्या कमी उंचीवरून उडी मारतांना खाली पडेपर्यंत पॅराशूट उघडणार नाही.
या अडचणीवर उपाय : लगेच उघडणारे किंवा उडी मारण्यापूर्वी छत्रीसारखे उघडता येणारे पॅराशूट तयार करणे. एरोडायनॅमिक्स् विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने असे पॅराशूट तयार (डिझाइन्) करणे अशक्य नाही असे वाटते. आजपर्यंत कुणी केले नसले तरी आता ते करता येणार नाही असे थोडेच आहे?

आता असे पॅराशूट फक्त खाली उतरण्यासाठीच वापरता येईल पण वर जाण्यासाठी त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून फारसे उपयोगाचे नाही असे वाटत असल्यास वरील सूचना क्रमांक ५ (ड) मध्ये म्हंटल्याप्रमाणे हे नवे पॅराशूट दुसरीकडे कोठे व आणखी कशासाठी उपयोगी पडते का ते पाहू. त्याच्या काही शक्यता :
१) वर अनुकूल मुद्द्यांतर्गत म्हंटल्याप्रमाणे हवेंतून निव्वळ गुरुत्वाकर्षणाने वरून खाली येण्याचा अनुभव थरारक असेल. सर्वसामान्यांना ही गंमत अनुभवता यावी म्हणून अशी पॅराशूट मोठ्या प्रमाणावर तयार करून ती मुलांना (व मोठ्या माणसांनाही) खेळण्यासाठी पुरवता येतील. त्यासाठी, पोहोण्याच्या तलावावर जशी निरनिराळ्या उंचीवरून सूर मारण्याची व्यवस्था असते तशी, सार्वजनिक बागांतून निरनिराळ्या उंचीवरून उड्या मारण्यासाठी योग्य असे कठडे बांधता येतील.
२) बहुमजली इमारतींत खालच्या मजल्यांवर आग लागल्यामुळे लिफ्ट किंवा जिन्याने येणे शक्य नसेल तर वरच्या मजल्यावरील रहिवाशांना या पॅराशूटच्या साह्याने खाली उड्या मारता येतील. बहुमजली हॉटेल्समध्ये तळमजला सोडून इतर मजल्यांवर प्रत्येक खोलींत (विमानांतील रक्षा जॅकेटप्रमाणे) असे पॅराशूट ठेवणे सक्तीचे करता येईल.

या लेखमालेच्या भाग (३) व (४) मध्ये दिलेल्या मेंदूला व्यायाम द्यायच्या सूचनांवरून असे दिसून येईल की खालील चांगल्या समजल्या जाणार्‍या संवयी सृजनशीलतेसाठीही पोषक आहेत.
१) कुठलीही समस्या नाही, सर्व काही सुरळीत चालू आहे असे वाटत असेल तर सुस्ती येऊ न देणे.
२) सतत अधिकाधिक चांगल्या पर्यायांच्या शोधांत राहणे.
३) एखादी कल्पना कितीही मूर्खपणाची वाटली तरी ताबडतोब बाजूला न सारणे.
४) कुठल्याही गोष्टीबद्दल सकारात्मक विचार करणे. तिच्यांतील अनुकूल मुद्दे आवर्जून पाहणे.
५) प्रतिकूल बाबींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे.

सृजनशीलतेंत नवीन कल्पनांना महत्त्व असल्यामुळे त्या निर्माण करण्याचे काही मार्ग आपण पुढल्या भागांत पाहू.

(क्रमश:)

Comments

उत्तम

लेखमाला उत्तम चालू आहे. यासाठी संदर्भ म्हणून डि बोनोखेरीज आणखी पुस्तके वापरली आहेत का? कदाचित समारोप करताना सर्व संदर्भसूची दिल्यास बरे होईल.
----
"सर, इसमें शक्कर डालने का टाइम हो गया?"

उत्तम... पुढील भागांच्या प्रतिक्षेत

लेखमाला उत्तम चालू आहे. आधीचे उपहारगृहाचे उदाहरण फारच आवडले. आताचे उदा. मात्र किंचीत अतिशयोक्ती म्हणा अथवा टोकाचा विचार वाटला.
असो.

२) सतत अधिकाधिक चांगल्या पर्यायांच्या शोधांत राहणे.
३) एखादी कल्पना कितीही मूर्खपणाची वाटली तरी ताबडतोब बाजूला न सारणे.
४) कुठल्याही गोष्टीबद्दल सकारात्मक विचार करणे. तिच्यांतील अनुकूल मुद्दे आवर्जून पाहणे.
५) प्रतिकूल बाबींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे.

हे मुद्दे फारच मोलाचे तसेच अनूकरणीय वाटले. पुढील भागांच्या प्रतिक्षेत

-ऋषिकेश

मस्त!

वा! मस्त आहे. पण याची सवय लागली नाही म्हणजे मिळवली. नाहीतर 'नेहमी वेगळा विचार करण्याच्या' चाकोरीत अडकायचो!

 
^ वर