मार्टिन ल्यूथर किंग यांस बिर्मिंगहॅम येथील सद्गृहस्थांनी लिहिलेले उघड पत्र (कान-उघडणी)

उपक्रमावरील दुसर्‍या एका लेखावरच्या प्रतिसादांवरून असे वाचण्यात आले की अनेकांना आजकालच्या राजकारण्यांविषयी फार अविश्वास वाटतो. नेते निव्वळ "राजकारण" करतात असे मत ऐकू येते. (म्हणजे समाजाला घातक, पण स्वतःच्या आर्थिक लाभासाठी किंवा व्यक्तिपूजेसाठी कार्य करतात, असा अर्थ मी लावतो.) यावरून असे वाटते की पूर्वीच्या काळी असे काही महामानव होते ज्यांच्या बाबत त्यांच्या काळात "हे राजकारणी नाहीत" असा स्पष्ट विचार केला जायचा. माझ्या मते हे असे नाही.

अमेरिकेत वंशभेदाविरुद्ध उठाव करणार्‍यांपैकी मार्टिन ल्यूथर किंग (जूनियर) हे अमेरिकेत पूजले जातात. यांचा पुढे खून झाला. खूप वर्षांनंतर आता अमेरिकेत त्यांच्या स्मृतीसाठी सुटीचा दिवस दिला जातो. त्यांच्याविषयी वाईट शब्द चुकूनही कुठे ऐकू येत नाही. पण त्यांच्या जीवितकालात त्यांच्याविषयी हे असे देवतुल्य मत होते का? असा विचार मनात येणे साहाजिक आहे, पण कोणी मोठ्याने विचारताना दिसत नाही. त्यांच्या काळात त्यांनी केलेली चळवळ "राजकारणासाठी" आहे असे म्हणणारे लोक होते का? हे लोक सभ्य होते की केवळ खुनी राक्षस होते? त्यांचा खूनच झाला, यावरून लोकांशी बोलताना अशी भावना दिसते, की मार्टिन ल्यूथर किंग (जूनियर) यांचा विरोध करणारे केवळ नराधम होते.

पुढील दस्तऐवजाचे भाषांतर करताना माझ्यापुढे दोन उद्दिष्ट्ये आहेत, आणि एक उप-उद्दिष्ट्य आहे :
१. हे दाखवणे की कुठल्याही काळात आपल्या काळातल्या राजकारण्यांना नीच हेतू असावेत अशी शंका करणारे सभ्य लोकही असतात. आपण आज स्वतःला सभ्य मानतो, तेव्हा आपणही असे करतो याची जाणीव व्हावी.
२. हे मत सांगणे, की आपण असे न व्हावे. आजच्या प्रत्येक राजकारण्याचा प्रत्येक शब्द मानण्याचा खुळेपणा करू नये! पण प्रत्येक राजकारण्याचा प्रत्येक शब्द खोटा असल्याचे मानून "सिनिकल"ही होऊ नये.
उप-उद्दिष्ट्य. अशा प्रकारचे उदाहरण कुणा भारतीय नेत्याचे, दस्तऐवजांसकट कोणी द्यावे, जेणेकरून राजकारणाबद्दल ही निराशा, जी लोकशाहीस मुळात घातक आहे, ती भारताबद्दलही दूर व्हावी.

या संदर्भातील ऐतिहासिक परिस्थितीचा संक्षिप्त इतिहास :
१९६१-१९६२ मध्ये आलाबामा राज्यात, बर्मिंगहॅम शहरात अधूनमधून अनेक काळ्या लोकांचे बाँबस्फोटाद्वारे खून झाले. हे वंशद्वेषामुळे झाले असल्याचे संकेत होते. तरी बर्मिंगहॅम शहरातल्या पोलिसांनी खुनांचा तपास करण्यात कुचराई केली, कोणाला शिक्षा केली नाही, असे वाटून काळ्या लोकांत असंतोष माजला होता. १९६३ सालच्या सुरुवातीला बर्मिंगहॅम शहराच्या निवडलेल्या अधिकार्‍यांमध्ये बदल होणार होता. नवीन महापौर निवडून यायचा होता. (ही घटना निवडणुकीशी, राजकारणाशी, संबंधित आहे, हे वाचकांनी नीट ध्यानात घ्यावे.) या निमित्ताने बर्मिंगहॅम येथील रेव्हरंड शटलवर्थ यांनी आंदोलन करून जनजागृती करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी ज्या नेत्यांची मदत मागितली, पैकी ऍटलांटा येथील मार्टिन ल्यूथर किंग (जूनियर) हेदेखील होते. किंग अजून यायचे होते, तेव्हा एप्रिल ६, १९६३, रोजी ४५ मोर्चेकर्‍यांना अटक झाली. पुढे काही होऊ नये, म्हणून मार्टिन ल्यूथर किंग यांच्यासकट १३२ अन्य काळ्या नेत्यांविरुद्ध मॅजिस्ट्रेटने हा आदेश काढला गेला, की यांनी कुठलेही आंदोलन आयोजित करू नये. तशा परिस्थितीत एप्रिल १२ रोजी किंग मुद्दामून बर्मिंगहॅम येथे गेले. त्यांना अटक झाली. एप्रिल १२ तारखेला बर्मिंगहॅम येथील वेगवेगळ्या धर्मा/पंथांच्या ६ धर्मगुरूंनी किंग यांच्या नावे सौम्यपणे निषेध करणारे जाहीर पत्र लिहिले. त्याची प्रत किंग यांना कारावासत मिळाली. ते पत्र पुढील प्रमाणे :

____________________
मार्टिन ल्यूथर किंग यांस पत्र
काही धर्मगुरूंकडून
एप्रिल १२, १९६३

जानेवारी मध्ये ज्या धर्मगुरूंनी आलाबामा येथील वांशिक प्रश्नाबद्दल "कायदा-सुव्यवस्था आणि सुज्ञतेकरिता प्रार्थना" हे पत्रक प्रकाशित केले. त्यांच्याचपैकी आम्ही पत्रलेखक आहोत. आम्ही ही समज बोलून दाखवली की वांशिक बाबींबद्दल मनापासून वाटणार्‍या दृढनिश्चयांचा पाठपुरावा कोर्टात जाऊन करणे योग्य आहे, पण आम्ही कळकळीची विनंती केली की तोवर कोर्टाचे जे निर्णाय लागू आहेत, त्यांचे शांततेने आज्ञापालन केले पाहिजे.

तेव्हापासून सहनशीलता आणि तथ्यास सामोरे जाण्याची तयारी वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. जबाबदार नागरिकांनी वांशिक तणाव आणि अशांती माजवणार्‍या अनेक प्रश्नांवर कार्य सुरू केले आहे. बर्मिंगहॅममधील हल्लीच्या काही सामाजिक घटनांनी असा संकेत मिळतो की आपणांस वांशिक प्रश्नांविषयी एक नवा, सकारात्मक, आणि वास्तववादी मार्ग मिळण्याची संधी उपलब्ध आहे.

परंतु, आमच्या काही निग्रो नागरिकांनी, काही प्रमाणात बाहेरच्यांच्या निदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली मोर्चांचे सत्र सुरू केले आहे, त्यास आम्हाला सामोरे जावे लागत आहे. आम्ही ओळखतो की आपल्या आकांक्षा पूर्ण होण्यास दिरंगाई होत असली की लोकांना धीर धरता येत नाही, ते साहजिक आहे. पण ही निदर्शने शहाणपणाची नव्हेत, आणि त्यांच्यासाठी ही वेळ योग्य नव्हे, अशी आमची समजूत पटलेली आहे.

किंबहुना आमच्या काही स्थानिक निग्रो नेत्यांनी आमच्या प्रदेशातल्या वांशिक प्रश्नांविषयी सच्ची आणि उघड वाटाघाटी व्हावी असे आवाहन केले आहे, त्यांच्याशी आम्ही सहमत आहोत. आम्हाला वाटते की आमच्याच शहरातील नागरिकांनी, गोर्‍यांनी आणि निग्रोंनी, स्थानिक परिस्थितीचे ज्ञान आणि अनुभव वापरून मिलाप साधला तरच या प्रकारे वांशिक प्रश्नांना सामोरे जाण्यात यश मिळेल. आपणा सर्वांनी ही जबाबदारी पेलली पाहिजे, आणि ती तडीस नेण्यासाठी योग्य मार्ग शोधला पाहिजे.

आम्ही पूर्वीही निर्देश केला आहे की "आपल्या धार्मिक आणि राजकीय परंपरेत द्वेष आणि हिंसेस मुळीच अनुमती नाही". त्याच प्रमाणे आम्ही निर्देश करतो की अशी कुठलीही कृती ज्याने द्वेष आणि हिंसा चिथवली जाते, ती कृती तांत्रिकदृष्ट्या शांत का असेना, अशा कुठल्याही कृतीने आमच्या स्थानिक प्रश्नांना सोडवण्यात हातभार लागलेला नाही. आम्हाला वाटते की ह्या काळात बर्मिंगहॅम मध्ये नवी आशा संचारते आहे, या काळात अतिरेकी कृती करण्यास कुठलेही समर्थन देता येत नाही.

आम्ही पूर्ण समाजाची प्रशंसा करतोच, आणि खासकरून स्थानिक बातम्यांचे स्त्रोत आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांची प्रशंसा करतो, कारण या निदर्शनांना शांत प्रकारे हाताळले गेले आहे. आम्ही समाजास कळकळीची विनंती करतो की ही निदर्शने चालू राहिल्यास याच प्रकारे स्वतःला काबूत ठेवावे, तसेच कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांना विनंती करतो की त्यांनी शांत चित्ताने आमच्या शहराचा हिंसेपासून बचाव करत राहावे.

याच प्रकारे आमच्या आपल्या निग्रो समाजाला सर्वतोपरी विनंती करतो की या निदर्शनांना दिलेले समर्थन त्यांनी मागे घ्यावे, आणि इथल्या इथे बर्मिंगहॅमच्या भल्यासाठी शांतिपूर्ण कार्य करण्यासाठी एकत्र यावे. हक्क जर सारखेच नकारले जात असतील, तर ते गार्‍हाणे कोर्टापुढे हिरिरीने मांडावे, आणि स्थानिक पुढार्‍यांशी बोलणी करून मांडावे, रस्त्यांवर येऊन नव्हे. आम्ही आमच्या गोर्‍या आणि निग्रो नागरिकांना, दोघांनाही प्रार्थना करतो की कायदा, सुव्यवस्था आणि सुज्ञतेच्या तत्त्वांचा अंगीकार करावा.

सही करणारे :

C.C.J. कार्पेंटर, D.D., LL.D., बिशप, आलाबामा.

जोसेफ ए डुरिक, D.D., सहायक बिशप, मोबील-आलाबामा चर्च-जिल्हा

रब्बी मिल्टन एल ग्राफमॅन, एमानु-एल मंदीर, बर्मिंगहॅम आलाबामा

बिशप पॉल हार्डिन, बिशप, मेथडिस्ट चर्चची आलाबामा-पश्चिम फ्लोरिडा परिषद

बिशप नोलन बी हार्मन, बिशप, मेथडिस्ट चर्चची उत्तर आलाबामा परिषद

जॉर्ज एम मर्रे, D.D., LL.D., बिशप-कोऍडजुटर, आलाबामा एपिस्कोपल चर्च-जिल्हा

एडवर्ड व्ही रॅमेज, मॉडरेटर, आलाबामा प्रेस्बिटेरियन चर्च युनायटेड स्टेट्स चे धर्मपीठ

अर्ल स्टॉलिंग्स, पॅस्टर, फर्स्ट बॅप्टिस्ट चर्च, बर्मिंगहॅम आलाबामा
____________________

इंग्रजी मधील पत्राचा दुवा.

या पत्रापेक्षा मार्टिन ल्यूथर किंग यांनी पत्राला दिलेले उत्तर अधिक प्रसिद्ध आहे (दुवा). पण मूळ पत्र विसरण्याने आपले नुकसान होत आहे. यात असे दिसते की किंग यांचा निषेध करणारे लोक सभ्य आणि शांतताप्रिय होते (आपल्यासारखे). त्यांना खरोखर वाटत होते की बाहेरून येणारे किंग होऊ घातलेल्या शांतीला प्रदूषित करत होते. ही निदर्शने तांत्रिकदृष्ट्या शांततापूर्ण असली तरी हिंसेला खतपाणी देत होती, आणि याचे समर्थन कोणीच करू शकणार नाही (म्हणजे किंग यांचा हेतू दूषित असला पाहिजे हेच ध्वनित होते.) अशा प्रकारच्या वागण्याला आपण कदाचित "निव्वळ राजकारणी" म्हणू. (बर्मिंगहॅमला जावे की नाही, फायदे तोटे काय आहेत, त्याबद्दल "व्यूहात्मक" चर्चा किंग यांनी आपल्या आप्तांशी केली, हे आपल्याला आज माहीत आहे. किंग यांचे हे समाजकारणातले/राजकारणातले डावपेच होते याबाबत फार शंका नसावी.) म्हणजे या पत्रलेखकांना किंग यांच्या वागण्यात जर उत्स्फूर्तपणापेक्षा राजकारणाचा वास आला, तर तो त्यांचा चाणाक्षपणा मानावा. पण तरीही किंग यांची बर्मिंगहॅमच्या स्थानिक राजकारणात बाहेरून येऊन केलेली लुडबुड मी योग्य मानतो. राजकारणाचा वास येणारी प्रत्येक कृती हीन नसते.

पुलंचे एक पात्र अंतू बरवा आपल्याला ओळखीचे असेल. अंतू बरव्याने गांधींच्या उघडेनागडेपणात, पंचात, चरख्यात, उपोषणात जो राजकारणाचा वास होता तो चटकन जाणला, ही त्याची तैलबुद्धी होती. पण त्याने तेवढ्या वासाने त्यांना झिडकारून टाकले. तेल डोक्याच्या एका बाजूला थापले होते, एक बाजू कोरडीच राहिली!

हेच आजच्या राजकारण्यांविषयी जाणावे. त्यांच्या अनेक वक्तव्यांत राजकारणाचा वास जरूर जाणावा. हेतूंचे विश्लेषण जरूर करावे. पण विश्लेषण न करता नाक मुरडून "राजकारणी" शब्दालाच ओंगळ मानले, तर आपण या बर्मिंगहॅममधल्या धर्मगुरूंचा, अंतू बरव्याचा कित्ता पुन्हापुन्हा गिरवू. आहेत त्या राजकारण्यांचा उपयोग करून (किंवा स्वतः राजकारणात उतरून) मतदार म्हणून आपण समाजकारणाला हातभार लावत असतो. प्रत्येक राजकारण्यात हे असले "राजकारण" आणि संधिसाधूपणा सापडेल, हे तर आलेच. म्हणूनच त्या राजकारणामागील आणि संधिसाधूपणाखालील नेत्याच्या हेतूंची परीक्षा करावी, आणि त्या हेतूचा आपल्या समाजविषयक कल्पनांशी समन्वय साधावा (किंवा विरोध जाणावा.) असे डोळस परिशीलन करणे समाजाचे घटक म्हणून आपल्या हिताचे आहे. "राजकारण" शब्दाची अवहेलना करून पर्यायाने आपण आपल्या निवडणूक अधिष्ठित लोकशाही हक्कांचीच अवहेलना करत असतो.

लेखनविषय: दुवे:

Comments

कान-उघडणी

शीर्षकातला टंकनदोष : "कान-उघडणी" असे वाचावे.

लेखात आणखीही टंकनदोष असल्यास दिलगीर.

कान-उघडणी

कान-उघडणी माझी तर नाही आहे ना? :-)

माझे म्हणणे फक्त मला ओबामाचे भाषण किंगच्या "आय हॅव अ ड्रीम" सारखे प्रभावी वाटले नाही इतकेच होते. त्यात खरेखोटे पणाचा संबंध नाही. संबंध असलाच तर तो केवळ भाषणाच्या काळ-वेळेचा आहे, म्हणून ते आतून आलेले भाषण मला वाटले नाही. बाकी काळाच्या कसोटीला जे स्वतःच्या पश्चातपण जे उतरतात त्यांना फार तर देवमाणसे समजीन देव वगैरे कुणालाच समजत नाही आणि याचा अर्थ त्यांचा अनादर करतो असा पण नाही. राजकारणी हे राजकारणी असतात कमी अधिक फरकाने लबाड असतात - त्यात त्यांचा स्वार्थ असतो तसेच विजिगिषू वृत्ती पण असते. आज ती हिलरी आणि ओबामा या दोघांमधे आहे. या दोन्ही वृत्ती जर संतुलीत असल्या तर "चांगल्या" राजकारणात यशस्वी होण्याची शक्यता जास्त नाहीतर काही पण... बाकी लिंकनचे वाक्य लक्षात ठेवायचे:

Nearly all men can stand adversity, but if you want to test a man's character, give him power.

त्यामुळे ओबामाच्या (अथवा त्याच्या जागी हिलरी अथवा मॅकेन आले तर त्यांच्या) बाबतीत आरत्या ओवाळण्यासाठी दिल्ली बहौत दूर है!

चांगले

हे पत्र मात्र चांगले आहे. ;)

अति राजकारण करणे जितके वाईट तितकेच राजकारणापासून फटकून राहणेही वाईट. नेते हे समाजाचा एक हिस्सा आहे. आपणच त्यांना निवडून देतो. ते आपलेच प्रतिनिधी आहेत. त्यांनी घेतलेल्या भल्याबुर्‍या निर्णयांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतोच. त्याकडे दुर्लक्ष करून फायदा नाही. शहामृगाप्रमाणे वाळूत डोके खुपसून बसल्याने आपण या परिणामांपासून अलिप्त राहणार नाही. मात्र राजकारण्यांची कोणतीही कृती अधिक साशंकपणे व चिकित्सक वृत्तीने पाहणे आवश्यक आहे असे माझे मत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

+१

मात्र राजकारण्यांची कोणतीही कृती अधिक साशंकपणे व चिकित्सक वृत्तीने पाहणे आवश्यक आहे असे माझे मत आहे.

+१ सहमत!!
असेच माझेही म्हणणे आहे!

आपला
गुंडोपंत

राजकारण्यांची कृती

पत्राचे भाषांतर चांगले आहे. या पत्राची पार्श्वभूमी लक्षात घेता "आय हॅव अ ड्रिम"सारखी भाषणे जन्माला कशी आली असावीत याचा अंदाज येतो. ऐतिहासिक नेते सर्वगुणांचे पुतळे होते असे कोठेही दर्शवायचे नाही परंतु तत्कालीन परिस्थितीमुळे निर्माण झालेली भाषणांतील दाहकता आणि कळकळ ओबामांच्या भाषणात कमी दिसली. (हे माझे वैयक्तिक मत झाले.)

असो, यापुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की सर्किट म्हणतात की अमेरिकेतील रविवारची सकाळ हे वंशद्वेशाचे उत्तम उदाहरण आहे, यावर माझे मत असे की उद्या ओबामा निवडून आले तरी यात यत्किंचित फरक पडणार नाही* किंवा फारसे काही होणार नाही. येथे रामजन्मभूमी आणि भाजपा , मुंबई-शिवसेना-दाक्षिणात्य यांचा वाद, यांची आठवण प्रकर्षाने झाली.

राजकिय नेत्यांना आपली पोळी भाजून घेण्यासाठी दाहकतेची गरज असते आणि असे विषय बंद केले तर पोळी भाजणे अवघड आहे.

* तसा फरक पडला तर मलाही सर्किटांएवढाच आनंद होईल परंतु आजपर्यंत जे राजकारणी पाहिले त्या सर्वांनी निराशा केली आहे. ओबामा यापेक्षा वेगळे असावेत अशी आताच खात्री देणे योग्य वाटत नाही.

राजकारण्यांची कोणतीही कृती अधिक साशंकपणे व चिकित्सक वृत्तीने पाहणे आवश्यक आहे असे माझे मत आहे.

माझेही!

मान्य - ओबामा यांचे भाषण तितके प्रभावी नाही

त्याबद्दल माझी साहित्यिक मते या दुव्यावर : [ जरा लांबलेले आहे (भाषण म्हणून) ]

भाषण ऐतहाहिक असण्याबद्दल मला असलेली साशंकता (दुवा) पैकी एक परिच्छेद असा

केनडी यांच्या "कॅथोलिक" भाषणाइतके हे भाषण नक्कीच ऐतिहासिक आहे. जर ओबामा राष्ट्रपतिपद जिंकले, तर हे भाषण कदाचित किंग यांच्या "माझे स्वप्न आहे..."भाषणाच्या ऐतिहासिक पंक्तीत जाऊन लगेच बसेल. जर ते जिंकले नाही, पण राष्ट्रकार्यात अग्रणी राहिले, भ्रष्टाचारात सापडले नाहीत, तरीही अनेक वर्षांनी हे भाषण बर्‍यापैकी महत्त्वाचे मानले जाईल. जर ओबामा काही गडबड करून लवकरच "राजकीय मरण" पावले, तर मात्र हे भाषण इतिहासात किरकोळ मानले जाईल (पण मानभावी मानले जाणार नाही).

मलाही त्या भाषणात त्रुटी दिसतात. पण त्या "राजकारणासाठी केले" आणि "संधिसाधू आहे" यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत.

लिंकन, किंग चर्चेचे कारण

आपल्याला आधी उत्तर देत असताना एक राहीलेला मुद्दा येथेलिहीतो:

लिंकन आणि मार्टीन ल्यूथर किंग यांच्या भाषणाची तुलना करण्याचे अजून एक कारण हे सर्कीट रावांचा मूळ लेख/वक्तव्य होता /होते:

काही असे शब्द असतात, की त्यांवर जीव ओवाळून टाकावासा वाटतो.

केनेडीचे, नेहरूंचे पहिले महत्वाचे भाषण. ("थिंक नॉट व्हॉट युवर कंट्री कॅन डू फॉर यू, थिंक व्हॉट यू कॅन डू फॉर युवर कंट्री", किंवा "व्हाईल द रेस्ट ऑफ द वर्ल्ड स्लीप्स्..")

मार्टीन ल्युथर किंग चे "आय हॅव अ ड्रीम" हे भाषण..

काल-परवाच असेच एक भाषण अमेरिकेत झाले.. मला प्रत्यक्ष ते भाषण ऐकण्याची संधी मिळाली नाही, पण आज न्यू यॉर्क टाईम्स वर हे भाषण वाचण्याची संधी मिळाली:

बराक हुसेन ओबामाचे भाषण...

यातील मी मुद्दामून (चर्चिलचे अजून एक नाव घालून) अभारतीय संदर्भ दिले होते असेही म्हणले होते.

भारतीय नेत्याचे उदाहरण

उप-उद्दिष्ट्य. अशा प्रकारचे उदाहरण कुणा भारतीय नेत्याचे, दस्तऐवजांसकट कोणी द्यावे, जेणेकरून राजकारणाबद्दल ही निराशा, जी लोकशाहीस मुळात घातक आहे, ती भारताबद्दलही दूर व्हावी.

या संदर्भात एक पटकन आठवलेले पण पत्र वगैरे हातात नसलेले उदाहरण हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आहे (अर्थात त्यांचे आजही अनेकांना पटत नाही/समजत नाही हा भाग तुर्त बाजूस ठेवून देऊ):

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस ते तरूणांना (ब्रिटीश) सैन्यात भरती होण्यासाठी उत्तेजीत करत होते. आचार्य अत्र्यांनी सावरकरांना "स्वातंत्र्यवीर" ही पदवी बहाल केली होती. पण असे "ब्रिटीश धार्जीणे" धोरण पाहून अत्र्यांनी, "हे कसले स्वातंत्र्यवीर हे तर रीक्रूटवीर" असे म्हणत खास अत्रे शैलीत टिका केली होती. अर्थात नंतर त्याचा अर्थ आणि तसे करण्यातील दूरदृष्टी जशी समजली तसे त्यांनी (अत्र्यांनी) स्वतःची चूक पण जाहीरपणे मान्य केली होती..

जनरल एस्. एस्. पी. थोरात व स्वातंत्र्यवीर सावरकर

जनरल एस्. एस्. पी. थोरात यांच्या आत्म चरित्रात एक उल्लेख आहे तो आठवला. जनरल एस्. एस्. पी. थोरात यांची निवड सैन्यात झाली होती व ते त्यांच्या काही नविन निवडलेल्या सैन्याधिका-यांबरोबर इंग्लंडला चालले होते. जायच्या आधी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची भेट घेतली. त्यांच्या मनात एक भीती होती की सावरकरांना हे आवडणार नाही. जेव्हा स्वा. सावरकरांना समजले की हे वीर सैन्यात दाखल होण्यासाठी निघाले आहेत, त्यांनी सर्वांना आशिर्वाद दिले व सांगितले की भारत स्वतंत्र झाल्यावर तुमच्या सारखे सैन्याधिकारी आपल्याला हवेच आहेत तेव्हा कसलाही विचार मनात न आणता मिळेल ते उत्तम शिकून या.
नितीन

महाराष्ट्रातले राजकारणी

महाराष्ट्रातले राजकारणी हे नुसतेच राजकारणी नव्हते तर ते उत्तम नागरिक, वक्ते, साहित्यिक आणि समाजसेवक होते. आता तसला एकही राजकारणी औषधालादेखील मिळणार नाही. (उगाळला तर विष मिळेल, औषध नाही!) राजकारण हा जेव्हा धंदा होतो तेव्हा त्याची समाजदृष्ट्या किंमत शून्य समजावी. --वाचक्‍नवी

त्यावेळी त्यांच्याबद्दल काय मत होते?

महाराष्ट्रातले राजकारणी हे नुसतेच राजकारणी नव्हते तर ते उत्तम नागरिक, वक्ते, साहित्यिक आणि समाजसेवक होते. आता तसला एकही राजकारणी औषधालादेखील मिळणार नाही.

पूर्वीचे हे उत्तम राजकारणी जेव्हा कार्यशील होते, त्यावेळच्या वर्तमानपत्रांत, सभ्य समाजात त्यांच्याविषयी काय मत होते, हा अभ्यास करण्याजोगा आहे.

उदाहरणार्थ लोकमान्य टिळक. त्यांच्या काळातले पुण्यातले मध्यमवर्गीय लोक त्यांच्या आंदोलनांना त्रासदायक राजकारण मानायचे का? ताई महाराज प्रकरण चालू होते तेव्हा अनेक सभ्य लोकांचे टिळकांबद्दल मन विटले होते का? हादेखील माणूस आप्पलपोटा/धनलोलुप आणि स्वतःची व्यक्तिपूजा करवून घेणारा आहे अशी निराशा त्या काळच्या मराठी मध्यमवर्गात निर्माण झाली होती का? मी असे कुठेतरी वाचले आहे की "तेल्यातांबोळ्यांचा पुढारी" हे शब्द, जे आपण आज टिळकांबद्दल गौरवपर मानतो, ते त्या काळात हेटाळणीचे शब्द होते. याबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन वाचायला आवडेल.

जर हे असे असेल तर... टिळकांबद्दल आपल्यासारखे लोक असे काही म्हणत होते, तर आजच्या कुठल्या टिळकसदृश व्यक्तीबद्दल आपणही असेच बोलत आहोत, नाही का? ती लोकोत्तर व्यक्ती नेमकी कोण हे इतिहासच सांगेल, पण म्हणूनच आपण निराश किंवा सिनिकल (मराठी शब्द? कडवट? तोंड कडू) न होण्यास जागा मिळते.

महाराष्ट्रातील पूर्वीच्या आणखी काही राजकारण्यांची समकालीन (सभ्य मध्यमवर्गातली*) प्रतिमा काय होती त्याबद्दल तुम्ही संशोधन करून सांगावे, ही विनंती.
(*"सभ्य मध्यमवर्गातली" म्हटले, कारण गरीब बहुजनसमाजात पूजा केली गेलेली पुढारीमंडळी आजही भरपूर आहेत.)

वाचनात आलेले

उदाहरणार्थ लोकमान्य टिळक. त्यांच्या काळातले पुण्यातले मध्यमवर्गीय लोक त्यांच्या आंदोलनांना त्रासदायक राजकारण मानायचे का? ताई महाराज प्रकरण चालू होते तेव्हा अनेक सभ्य लोकांचे टिळकांबद्दल मन विटले होते का? हादेखील माणूस आप्पलपोटा/धनलोलुप आणि स्वतःची व्यक्तिपूजा करवून घेणारा आहे अशी निराशा त्या काळच्या मराठी मध्यमवर्गात निर्माण झाली होती का? मी असे कुठेतरी वाचले आहे की "तेल्यातांबोळ्यांचा पुढारी" हे शब्द, जे आपण आज टिळकांबद्दल गौरवपर मानतो, ते त्या काळात हेटाळणीचे शब्द होते. याबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन वाचायला आवडेल.

आत्ता माझ्याकडे दस्ताऐवज नाही आहे पण ताईमहाराज प्रकरणात आधी (विशेष करून टिळकांच्या विरोधाततील)लोकांना टिळकांची अरेरावी वाटली की दत्तक विधानात स्वतःचे म्हणणे खरे करत आहेत वगैरे. पण ज्या पद्धतीने नंतर ताई महाराजांनी आरोप केले आणि ज्या पद्धतीने टिळक खंबीर राहून स्वतःचे म्हणणे पुराव्यानिशी सांगू लागले त्याचा परीणाम म्हणून नंतर जेंव्हा पहीला खटला ज्या पद्धतीने त्यांच्या विरोधात गेला, त्या वरून त्यांच्या देशी शत्रूंचे देखील मत झाले की हे मुद्दामून त्यांच्या विरुद्ध चालले आहे. म्हणूनच १९०१ साली चालू झालेला हा खटला त्यांच्या मृत्यूच्या आधी म्हणजे १९२० सालापर्यंत चालला आणि ते जिंकले देखील... आणि याच काळात त्यांचा राष्ट्रीय पुढारी म्हणून खर्‍या अर्थाने उदय झाला. थोडक्यात सभ्य लोकांचे मन टिळकांबद्दल विटले असे मानायला जागा नाही....जेंव्हा ते स्थानीक पातळीवर खटला हरले तेंव्हा त्यांना समजुतीच्या सुरात कोणीतरी म्हणाले की काळजी नसावी, शेवटी सत्याचा जय होतो... तेंव्हा ते वैतागून म्हणाले की मला आत्ता सत्याचा जय हवा आहे, शेवटी नाही. पण दुर्दैवाने तो "शेवटीच" झाला पण त्यामुळे त्यांचे काही बिघडले असे म्हणायला जागा नाही.

तेलातांबोळ्यांचे पुढारी हा शब्द कधी प्रचलात आला याची कल्पना नाही. पण "भारतीय असंतोषाचे जनक" हा वाक्प्रचार त्यांच्याबद्दल चिरोल या इंग्रजी व्यक्तीने वापरला होता. त्या विरुद्ध टिळक अब्रुनुकसान भरपाई मागायला लंडनच्या कोर्टातपण गेले होते आणि हरले होते. पण नंतर तीच मानाची उपाधी झाली!

 
^ वर