पुन्हा नव्याने सुरुवातः बराक हुसेन ओबामा

उपक्रमी मित्र मैत्रिणींनो,

गेल्या आठवड्यात मी, अमेरिकेतील अध्यक्षपदासाटीचे उमेदवार, बराक हुसेन ओबामा, ह्यांच्या एका भाषणाविषयी येथे लिहिले होते. आणि ह्या भाषणाचे मराठीत भाषांतर व्हावे अशी इच्छा दर्शविली होती. येथील सदस्यांनी माझी ही इच्छा फलद्रूप केलेली आहे. मला ह्या सदस्यांचे किती आभार मानावेत, तेच कळत नाही. मी आपला सदैव ऋणी राहीन.

हे सदस्य आहेतः

ऋषीकेश, चित्रा, नंदन, धनंजय, कोलबेर, सहज, राजेंद्र, आणि मुक्तसुनीत.

ह्यांतील जुळवाजुळव मी केलेली आहे. (काही शुद्धलेखनांतील / टंकनातील चुकांखेरीज मला काही फारसे वेगळे करावे लागलेले नाही.) धन्यवाद.

धनंजय ह्यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या लोकमित्र मंडळातर्फे हे भाषण मराठी वृत्तपत्रांत पहिल्या पानावर प्रकाशित व्हावे, ही इच्छा.

ह्या भाषणाचा वरील मित्रमैत्रिणींनी केलेला अनुवाद वाचून अनेक वेळा माझा कंठ अवरुद्ध झाला. आपल्याला काय वाटते ते कळवा. धन्यवाद.

(अर्थातच आपलाल्या खटकणार्‍या काही वाक्यरचना ह्या अनुवादात असतील, तर कृपया सूचना कराव्यात, सुधारण्याची जिम्मेदारी माझी.)

आता आपला अधिक वेळ न घेता, सादर करीत आहे:

"अमेरिकेतील वंशवादः पुन्हा नव्याने सुरुवात करू या - बराक हुसेन ओबामा"

दोनशे एकवीस वर्षापूर्वी, पलीकडे अजूनही उभ्या असलेल्या इमारतीत, काही व्यक्ती जमल्या होत्या आणि "वुई द पिपल, इन ऑर्डर टु फॉर्म अ मोअर् पर्फेक्ट् युनियन.." अश्या साध्या शब्दांनी सुरु होणार्‍या वाक्याने, अमेरिकन लोकशाहीच्या, त्यावेळी अशक्य वाटणार्‍या प्रयोगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. एकाधिकारशाही आणि (पंथ, धर्म, रंग, लिंग आदींवर आधारीत )भेद यांपासून सुटका करून अटलांटिक महासागरापार आलेल्या अनेक शेतकर्‍यांनी, विद्वानांनी, नामदारांनी आणि देशभक्तांनी फिलाडेल्फिया सम्मेलनात १७८७ साली केलेली स्वातंत्र्याची घोषणा अजूनही टिकून आहे.


त्यांचा दस्तावेज मंजूर तर झाला पण अपूर्ण राहिला. ज्या प्रश्नाने राष्ट्र दुभागण्याची वेळ आणली आणि घटनाकारांना हे दुभाजन टाळण्यासाठी आणखी वीस वर्षे ज्या गुलामगिरीस मान्यता द्यावी लागली त्या गुलामगिरीच्या पापाने त्या दस्तावेजाला (घटनेला) डाग लावला होता. या प्रश्नाचे भवितव्य घटनाकारांनी भावी पिढ्यांच्या हातात ठेवले.


अर्थात, गुलामगिरीच्या प्रश्नाचे उत्तर आपल्या घटनेत अंतर्भूत केले गेले.


...घटना!... ज्यात प्रत्येकाला मिळणार्‍या समान नागरिकत्वाची मूलभूत तत्त्वे दिलेली आहेत.


...घटना!...जिने आपल्या नागरिकांना अश्या स्वातंत्र्य, न्याय आणि एकतेचे वचन दिले आहे, जे काळापरत्वे बदलता येऊ शकते आणि बदललेच पाहिजे.


पण गुलामांना बंधनातून मुक्त करण्यासाठी, किंवा प्रत्येक रंगाच्या-पंथाच्या प्रत्येक स्त्रीपुरुषाला त्यांचे हक्क आणि कर्तव्ये बजावता यावीत यासाठी केवळ कागदावरची अक्षरे काय कामाची?

ह्या वचनांतील आणि प्रत्यक्ष परिस्थितीतील अंतर कमी करण्यासाठी - रस्त्यांवर आणि न्यायालयांत संघर्ष करून किंवा यादवी करून अथवा सामाजिक असहकार चळवळीतून अथवा कोणत्याही साहसाद्वारे - स्वतःचा वाटा उचलण्यास तयार होईल, अश्या भावी अमेरिकन पिढ्यांची आजही गरज आहे.

आमच्या प्रचारातही सुरुवातीला हेच कार्य आम्ही हाती घेतले. आमच्या समविचारी पूर्वजांनी जो प्रवास अर्धवट सोडला, तोच आम्ही पुढे नेतो आहोत. हा प्रवास चालू आहे, अधिक निरपेक्ष, अधिक समान, अधिक स्वतंत्र, अधिक सहनशील आणि अधिक संपन्न अमेरिका घडवण्याचा. इतिहासातील या क्षणी मी ह्या राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत लढण्याचा निर्णय घेतला, कारण मी असे मानतो की जर आपल्याला सध्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर ते आपल्याला एकजूटीने सोडवायला लागतील.

आपण आपल्यातील एकता दृढ करण्यासाठी हे समजून घेतले पाहिजे की आपल्या कहाण्या वेगवेगळ्या असतील पण आपले एकच स्वप्न आहे. आपण वरवर एकसारखे दिसत नसू किंवा आपला इतिहास एकसारखा नसेल, पण आपल्याला एकाच दिशेला मार्गक्रमण करायचे आहे. आणि हे आपल्याला समजले तरच आपला इतिहास आपल्या मुलांना-नातवांना अधिक चांगले भविष्य दाखवेल.

माझे असे ठाम मत होण्याचे एकमेव कारण म्हणजे अमेरिकतील शुचिता आणि अमेरिकेच्या नागरीकांच्या मूलभूत चांगुलपणावरील माझा विश्वास. आणि हा विश्वास जन्माला येण्यासाठी माझा स्वतःचा अमेरिकतील इतिहासच कारणीभूत आहे.


मी केनियामधील काळ्या वडिलांचा आणि कॅन्सासमधील गोर्‍या आईचा मुलगा आहे. मला वाढवले, ते दुसर्‍या महायुद्धात सैन्यात सेवा केलेल्या, महामंदीतुन वाचलेल्या गोर्‍या आजोबांनी आणि ते परदेशी असताना लिनवर्थ किल्ल्यावर बाँम्ब घडवण्याचे काम करणार्‍या गोर्‍या आजीने. मी अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यालयांत शिकलो आणि जगातील सर्वात गरीब देशांपैकी एका देशातही राहिलो आहे. माझ्या काळ्या अमेरिकन बायकोतही काळे गुलाम आणि गोरे मालक अश्या दोन्ही वंशांचे रक्त भिनले आहे. आणि हाच समृद्ध वारसा आम्ही आमच्या दोन्ही प्रिय मुलींना देत आहोत. जगातील तीन खंडांत पसरलेले माझे भाऊ, बहिणी, भाचे, पुतणे, काका आणि इतर नातेवाईक, प्रत्येक वंशाचे आणि प्रवाहाचे आहेत. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे, मी हे कधीही विसरू शकत नाही की अमेरिकेखेरीज या पृथ्वीतलावर कुठल्याही देशात माझ्यासारखी वंशावली असणे अशक्य आहे.

ही माझी कथा माझ्या वेगळेपणाची पुष्टी करण्यासाठी मी सांगत नाही. हा माझ्या पिंडाच्या जडणघडणीचा भाग आहे. ह्या माझ्या कथेतला विचार सांगतो, की हे राष्ट्र केवळ वेगवेगळ्या ठिगळांची जोडणी नसून अनेक परंपरांनी साकार झालेलं एकात्म राष्ट्र आहे.

अनेक विद्वानांच्या भाकितांना धूळ चारत, माझ्या आजवरच्या प्रचारात आपण पाहिले आहे, की अमेरिकन जनता या एकात्मतेसाठी आसुसलेली आहे. माझ्या उमेदवारीला निव्वळ वांशिक रंगात पाहण्याच्या प्रलोभनांना मागे टाकून आम्ही अमेरिकेतील सर्वात गोर्‍या राज्यातही बाजी मारली. साऊथ कॅरोलिनासारख्या राज्यात, आम्ही, काळे अमेरिकन आणि गोरे अमेरिकन यांची युती घडवून आणली आहे.

मला असे म्हणायचे नाही, की वंशभेद हा फक्त ह्या प्रचारापुरता प्रश्न नाही. प्रचाराच्या वेगवेगळ्या पायर्‍यांमध्ये बऱ्याच टीकाकारांनी मला, एक तर "खूपच काळा" किंवा "फारसा काळा नाही" ह्या दोन प्रकारांत मोडले आहे. साऊथ कॅरोलिनाच्या प्राथमिक मतदानाच्या एक आठवडा आधी वंशवादाच्या तणावांचे बुडबुडे आलेले आपण पाहिले. पत्रकारांनी प्रत्येक मतकेंद्राबाहेर केलेल्या सर्वेक्षणाच्या प्रसंगी वांशिक ध्रुवीकरणाचे ताजे पुरावे खोदून काढले - नुसतेच काळे-गोरे नव्हे तर काळे आणि भुरे असे सुद्धा.

आणि त्याच्याही वरचढ, गेल्या दोन आठवड्यांमध्ये वंशभेदांच्या चर्चेने या प्रचारात एक विशेष दुफळी माजवणारे वळण घेतले आहे.

या चर्चेच्या एका बाजूला आपण असे सूचित केलेले पाहिले की माझी उमेदवारी ही सकारात्मक आरक्षणाच्या कार्यक्रम राबवण्यासाठीचा (ऍफरमेटिव्ह ऍक्शनसाठीचा) एक प्रकारचा तमाशा आहे. माझी उमेदवारी, वांशिक भेदांचे निराकरण कमी पैशात, झटपट, विकत घेता येऊ शकते अशा इच्छेवर केवळ उभी आहे, असे एक मत.

दुसर्‍या बाजूला आपण माझे एकेकाळचे धर्मगुरू रेव्हरंड जेरेमाया राइट यांनी अशी भडक भाषा वापरलेली पाहिली. असे वक्तव्य आपल्यांतली वांशिक दरी तर रूंदावतेच. त्यापेक्षाही जास्त, म्हणजे आपल्या देशाचा मोठेपणा आणि चांगुलपणा यांच्यावर हल्ला करते.

मी आधीच अत्यंत स्पष्ट शब्दांत रे. राइट यांच्या अशा विवादाा्पद विधानांची निंदा केली आहे. पण तरीही काही प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. रे. राइट हे अमेरिकेच्या अंतर्गत आणि परराष्ट्रधोरणांचे क्वचित उग्र टीकाकार आहेत असे मला आधी माहिती होते काय? अर्थातच माहिती होते. त्यांची विवादास्पद विधाने मी चर्चमधे बसलो असताना ऐकली आहे काय? होय, ऐकली आहेत. त्यांच्या राजकिय दृष्टीकोनांशी मी तीव्रपणे असहमत होतो का? नक्कीच ! कधीतरी तुमचे स्वतःचे धर्मगुरू, मग ते कुठल्याही धर्माचे, पंथाचे असू देत, यांचे बोलणे ऐकल्यानंतर तुमच्यापैकी अनेकजण जसे त्यांच्या बोलण्याशी असहमत असतील तसेच.

पण ज्या भाष्यामुळे हा नवा आगडोंब उसळला आहे ते केवळ विवादास्पद नव्हते. ते एका धार्मिक नेत्याचे केवळ त्यांना जाणवलेल्या अन्यायाविरूद्धचे भाष्य नव्हते. त्यांनी त्यांच्या ह्या भाषणात ह्या देशाचे पूर्णपणे वेडेवाकडे दृष्य उभे केले केले आहे. असे दृष्य, ज्यात गोर्‍या लोकांचा वंशभेदीपणा हा जणू काही त्यांच्या वंशाचा दोष आहे; असे दृष्य, की जे अमेरिकेची पापे अमेरिकेच्या पुण्यांपेक्षा अधिक आहेत असे दर्शवते; असे दृष्य, की मध्यपूर्वेतले युद्धाचा पूर्ण दोष इस्रायलसारख्या मित्रदेशावर ढकलते, विकृत आणि तिरस्कार करणार्‍या इस्लामी मूलतत्त्ववादावर नव्हे.

रे. राइट यांची विधाने केवळ चुकीचीच नाहीत तर ह्या देशात दुफळी माजवणारी आहेत. तीही आपल्याला ऐक्याची सर्वाधिक गरज असताना! ती विधाने वांशिक तेढीने पेटलेली आहेत. तीही आपल्या सर्वांसमोर प्रचंड प्रश्न असताना: दोन युद्धे, अतिरेक्यांचा धोका, जमीनदोस्त होऊ पहाणारी अर्थव्यवस्था, आरोग्यक्षेत्रातील आणीबाणी, पृथ्वीला नष्ट करू शकणारे पर्यावरण बदल, असे अनेक प्रश्न! हे प्रश्न काळे नाहीत, गोरे नाहीत, लॅटिनो नाहीत, एशियन नाहीत! हे आपल्या सर्वांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवायला आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

माझी पार्श्वभूमी, माझे राजकारण, आणि माझे आदर्श आणि विश्वास, हे लक्षात घ्या. असे असूनही मला नक्की वाटते, की असेही काही लोक असतील ज्यांना मी रे. राइट यांच्या विधानांची निंदा केलेली पुरेशी वाटणार नाहीत. ते विचारतील, "रे. राइट यांच्याशी मी आधी संबंधच का ठेवले? राइट यांचे चर्च सोडून दुसर्‍याच एखाद्या चर्चचा स्वीकार मी का केला नाही?"

मी एक खरेच कबूल करायला हवे. समजा, रे. राइट यांच्या भाषणांचे सध्या दूरचित्रवाणीवर किंवा यू- ट्युबवर सतत प्रसारित केले जाणारे तुकडेच मी फक्त पाहिले असते, किंवा ट्रिनिटी चर्च ऑफ ख्राइस्ट ह्या माझ्या चर्चची एखाद्या सोंगाची थट्टा करावी, अशी थट्टा काही समालोचक करताहेत, तसेच जर खरोखर असते, तर मीही खरोखरच असेच प्रश्न विचारले असते.

पण सत्य हे आहे की रे. राईट ह्यांची आणि माझी अशी संकुचित ओळख नाही. हा माणूस मला २० वर्षांहून अधिक काळापूर्वी भेटला. ह्या मणसाने मला माझ्या ख्रिश्चन धर्माशी ओळख करून देण्यासाठी मदत केली. ह्या माणसाने मला परस्परांप्रती प्रेमाच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली, आजारी लोकांची काळजी घेतली पाहिजे आणि गरिबांना त्यांच्या दयनीय परिस्थितीतून बाहेर काढले पाहिजे याबद्दल सांगितले.

ह्या माणसाने अमेरिकन सैन्यात नोकरी करून आपल्या देशाची सेवा केली. त्याने देशातील श्रेष्ठतम विद्यापीठांमध्ये आणि धर्मशिक्षणपीठांमध्ये व्याख्याने दिली. ह्या माणसाने, आज जवळजवळ ३० वर्षे एका चर्चचे नेतृत्व केले आहे. हे चर्च जनतेची सेवा करून देवाचे पृथ्वीवरील काम करीत आहे - बेघरांना निवारा देऊन, गरजूंना मदत करून, पाळणाघरे चालवून, शिष्यवृत्ती देऊन, तुरूंगांमध्ये मदत करून, आणि एच आयव्ही ग्रस्तांपर्यंत मदतीचा हात पुढे करून.

माझ्या पहिल्या पुस्तकात, "ड्रीम्स फ्रॉम माय फादर" मध्ये मी ट्रिनिटी चर्चमधला माझा पहिला अनुभव विशद केला आहे.

"लोकांचा आरडाओरडा, जागेवर उभं राहून टाळ्या वाजवणं सुरु झालं. एका वाऱ्याच्या झोताबरोबर जणू रेव्हरंडचा आवाज चर्चच्या छतापर्यंत पोचला...आणि त्या क्षणी, मला कसली तरी जाणीव झाली. त्या क्रूसाच्या पायाशी, शहरातील हजारो चर्चेसमधल्या गरीब कृष्णवर्णीयांच्या कहाण्या; परंपरेने चालत आलेल्या डेव्हिड-गोलायथ, मोझेस-फॅरोह, सिंहाच्या गुहेतले ख्रिश्चन्स, इझिकेलचे शेत इ. कहाण्यांशी तादात्म्य पावू लागल्या. स्वातंत्र्य, आशा आणि माणसाची जिजीविषा सांगणाऱ्या ह्या कहाण्या तुमच्या-माझ्या झाल्या. त्यांत सांडलेले रक्त, ढाळलेले अश्रू आपले होते. हे कृष्णवर्णीयांचे चर्च आजच्या शुभदिनी पुन्हा एकदा एका समूहाची गाथा येणाऱ्या पिढ्यांना आणि बाह्य जगाला सांगणारे माध्यम बनले. आपल्यावर आलेले कसोटीचे प्रसंग आणि आपले विजय एकाच वेळी वैयक्तिक आणि वैश्विक बनले. कृष्णवर्णीयांचे आणि इतरांचेही. आजवरच्या आपल्या प्रवासाची, गीतांची आणि गोष्टींचे जतन करणे म्हणजे स्मृती जपून ठेवण्याचे एक माध्यम आहे. अशा स्मृती, ज्यांच्या स्मरणाने आपली मान खाली जाणार नाही. अशा आठवणी, ज्या सारे उराशी बाळगतील आणि ज्यांच्या सोबतीने आपण पुनर्बांधणीचं काम सुरु करु शकू."

ट्रिनीटी चर्चमधला माझा अनुभव हा असा आहे. देशातील कुठल्याही इतर कृष्णवर्णीय चर्चप्रमाणेच ट्रिनीटी चर्च हे कृष्णवर्णीय समाजाचे प्रतिनिधित्व करते. डॉक्टरपासून सरकारी भत्त्यावर जगणाऱ्या मातांपर्यंत आणि आदर्श विद्यार्थ्यांपासून गुंडटोळ्यांत सहभागी असणाऱ्या पूर्वाश्रमीच्या गुंडापर्यंत. इतर कृष्णवर्णीय चर्चेसप्रमाणेच ट्रिनीटीत होणाऱ्या प्रवचनांत गडगडाटी हसणं असतंच, आणि क्वचित चावट विनोदही. प्रवचन सुरु असताना होणारं नाचणं, टाळ्या वाजवणं आणि आरडा-ओरडा हे एखाद्या नवख्याला कदाचित त्रासदायकही वाटू शकेल. पण अमेरिकेत साधारण कृष्णवर्णीय जसा आहे, त्याला जे अनुभव येतात तसेच हे चर्च आहे.
दयाळूपणा आणि क्रौर्य, प्रभावी बुद्धिमत्ता आणि अज्ञानाचा ठार अंध:कार, झगडा आणि यश, प्रेम आणि हो, कडवटपणा आणि पूर्वग्रहही - अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या वाट्याला येणारं सारं काही.

कदाचित, ह्या परस्परविरोधी गोष्टी माझे आणि रेव्हरंड राईट ह्यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यास उपयोगी ठरतील. त्यांच्यात काही दोष असले तरी ते मला घरच्यासारखे आहेत. त्यांनी माझ्यात धर्मभावना रुजवली, माझं लग्न लावून दिलं आणि माझ्या मुलांना बाप्तिस्माही दिला. मी त्यांच्याशी इतक्या वेळा बोललो असेन, पण एकदाही कुठल्या वंशाबद्दल त्यांनी अनुद्गार काढलेले नाहीत. गौरवर्णीयांशी ते कायम नम्रतेने, आदरपूर्वकच वागत आलेले आहेत. ज्या समुदायाची त्यांनी इतकी वर्षं निरलस सेवा केली, त्या समुदायासारखेच त्यांच्यात काही चांगल्या, काही वाईट गोष्टी - काही अंतर्विरोध आहेत.

मी जेवढा स्वत:ला कृष्णवर्णीय समाजापासून जेवढा अविभाज्य मानतो, तेवढाच रेव्हरंड राईटपासूनही. माझ्या गौरवर्णीय आजीने माझ्या करता अनेक त्याग केले. तिचं सर्वाधिक प्रेम माझ्यावर होतं. पण रस्त्याने जाताना तिलाही कृष्णवर्णीयांची भीती वाटे. अनेकदा तिने अशी वर्णवादी विधानं केलीत की ज्यांचा मला तिटकारा येई. पण जितकी ती मला जवळची, तितकेच रेव्हरंड राईटही.

माझ्या जीवनाचा हे दोघंही एक भाग आहेत. आणि केवळ माझ्याच नव्हे, ज्या देशावर मी नितांत प्रेम करतो त्या अमेरिकेचाही.

माझं हे बोलणं म्हणजे काहींना त्या निषेधार्ह विधानांवर पांघरुण घालण्याचा किंवा समर्थन करण्याचा प्रकार वाटेल. ते तसं नाही, याची ग्वाही मी देतो. हा प्रसंग विसरुन जाणं आणि लोकही विसरतील अशी आशा करणं हा कदाचित सर्वात सुरक्षित, सोयीचा मार्ग ठरला असता. जेरल्डाईन फेरारोच्या विधानानंतर तिला ज्याप्रकारे काही जणांनी वंशवादी ठरवलं, तसंच रेव्हरंड राईटनाही विक्षिप्त किंवा हटवादी प्रचारक म्हणून ठरवून मोकळं होता आलं असतं.

पण मला वाटतं, वंशवादाच्या मुद्द्याकडे आपल्याला आता फार वेळ दुर्लक्ष करता येणार नाही. तसं केलं तर रेव्हरंड राईटनी त्यांच्या अमेरिकेबद्दलच्या प्रवचनात जी सरसकट सामान्यीकरण करण्याची आणि जे दोष आहेत, त्यांचा पराचा कावळा करण्याची जी चूक केली, तीच आपण करु.

गेल्या काही दिवसांत जे मुद्दे चर्चेला आलेत, ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात - त्या हे दर्शवतात की या देशात असणाऱ्या वर्णविषयक गुंतागुंतीबद्दल आपण कधीच ठोस पाऊल उचललेलं नाही. आपल्या संघराज्यातला हा एक अद्याप अपरिपूर्ण असा भाग आहे. आता जर आपण टाळाटाळ केली तर पुन्हा ते 'पालथ्या घड्यावर पाणी' होईल. एकत्र येऊन आयुर्विमा, शिक्षण किंवा प्रत्येक नागरिकासाठी नोकरीच्या सुयोग्य संधी शोधणे या सारख्या समस्यांवर कधीच तोडगा काढू शकणार नाही.

हे वास्तव समजून घेण्यासाठी आपण येथवर कसे येऊन पोचलो, हे पाहणे मोठे उद्बोधक ठरेल. विल्यम फॉकनरने म्हटल्याप्रमाणे, "भूतकाळ अजून पूर्णपणे गाडला गेलेला नाही. खरं तर, तो अजून सरलेलाच नाही." आत्ता इथे या देशातील वर्णद्वेषाच्या इतिहासाचा पाढा वाचण्याची काहीच गरज नाही. पण आपण हेही ध्यानात घेतलं पाहिजे की, आजच्या कृष्णवर्णीय समुदायात आढळणाऱ्या असमानतेचे मूळ कारण पूर्वीच्या गुलामगिरी आणि 'जिम क्रो' नामक तत्कालीन अन्याय्य कायद्यांत आहे.

वंशविभागणीवर आधारित असणार्‍या (कृष्णवर्णीयांच्या ) शिक्षणसंस्थांचा दर्जा नेहमीपासून कमीच होता; आजही त्या निकृष्ट दर्जाच्याच आहेत. अशा संस्थांना अवैध ठरविणार्‍या, ऐतिहासिक अशा "ब्राउन् वि. एज्युकेशन बोर्डा"च्या खटल्याच्या निर्णयाला पन्नास वर्षे उलटून गेली तरी त्यांच्यात कसलीही सुधारणा झालेली नाही. आजच्या काळातील गोर्‍या आणि काळ्या मुलांमधे सर्वत्र आढळणार्‍या शैक्षणिक प्रगतीमधल्या मोठ्या तफावतीची मुळे शोधा. ती सापडतील या निकृष्ट दर्जाच्या संस्थांमधे आणि त्या देत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या शिक्षणामधे.

वर्षानुवर्षे अस्त्तित्वात असणार्‍या वंशभेदी कायद्यांनुसार पिढ्यानुपिढ्या काळ्या लोकांना जमीन आणि खासगी मालमत्तांचा अधिकार नाकारला गेला - प्रसंगी पाशवी बळाचा वापर करून. कृष्णवर्णीय व्यावसायिकांना उद्योगासाठी कर्जे नाकारली गेली. केंद्रसरकारच्या गृहनिर्माण योजनेची कर्जे काळ्या लोकांना मिळण्यास मज्जाव होता. त्याना कामगारसंघटनांमधे स्थानही नव्हते ; पोलीस दलात किंवा अग्निशामक दलात येण्यास बंदी होती. या सगळ्याचा अर्थ इतकाच की पुढील पिढ्यांना देण्याइतपत संपत्ती कुठल्याही काळ्या मनुष्याकडे कधी जमणे शक्यच नव्हते. काळ्या आणि गोर्‍यांमधील संपत्ती आणि उत्पन्नातल्या फरकाची , असंख्य शहरी आणि ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात आढळणार्‍या गरीब कुटुंबांच्या समुदायांची कारणमीमांसा करायची असेल, हा सगळा इतिहास नीट ध्यानी घ्यायला हवा.

काळ्या माणसांपुढच्या आर्थिक संधींच्या अनुपलब्धतेमुळे, पर्यायाने आपल्या स्वतःच्या कुटुंबांचे साधे पालनपोषणसुद्धा करू न शकण्याच्या कर्त्या पुरुषांच्या होणार्‍या चरफडीमुळे , त्यातून वाटत असणार्‍या शरमेमुळे , असंख्य काळी कुटुंबे देशोधडीला लागली. वर्षानुवर्षांपासून अगदी आजतागायत चुकीच्या धोरणांनी चालविलेल्या सरकारी कल्याणकारी योजनांमुळे ही समस्या अजूनही गंभीर बनलेली आहे. बर्‍याच शहरी भागांमधे काळ्यालोकांच्या वसाहतींमधे मूलभूत सुविधासुद्धा नाहीत - मुलांना खेळायला उद्याने नाहीत, इतर भागात उपलब्ध असणारे गस्तकरी पोलीस नाहीत , नियमित येणार्‍या कचरा उचलणाऱ्या गाड्या नाहीत, बांधकामाचा दर्जा पारखणार्‍या आणि राखणार्‍या संस्था नाहीत. या अभावामुळे हिंसा, आणि नाश आणि हेळसांड यांचे असे दुष्टचक्र निर्माण झाले, ज्याच्या भेसूर जाळ्यातून आपल्याला आजही सुटका मिळणे अशक्यप्राय वाटते आहे.

रेव्हरंड राईट् आणि अन्य कृष्णवर्णीय अशा भयंकर परिस्थितीमधे वाढले. पन्नासच्या दशकाच्या शेवटी आणि साठीच्या सुरवातीला ही पिढी ऐन तारुण्यात पदार्पण करत होती. वंशाधारित विभागणी अजूनही कायदेशीर असण्याचा, संधीं पद्धतशीरपणे नाकारण्याचा हा काळ होता. या सगळ्या परिस्थितीमधे, इतके कृष्णवर्णीय लोक अपयशी ठरले या गोष्टीचे वाटायला आश्चर्य नको. मला आश्चर्य वाटते ते अनेक काळ्या लोकांनी वंशभेदाच्या भयाण अंधारामधे नवी वाट शोधली, ह्याचे! ह्याच वाटेवर माझ्यासारखे नंतरच्या पिढ्यांतले लोक चालून यशस्वी ठरू शकले !

परंतु अन्यायाच्या कर्दमातून आपले सर्व बळ वापरून जेव्हा काही लोक "अमेरिकन स्वप्नाचा" एक तुकडा मिळविण्याकरता घसपटत, खरचटत बाहेर निघत होते, तेव्हाच, त्यांच्याहून कितीतरीपट अधिक लोक मागेच राहिले. वंशवादाच्या वरवंट्याखाली ते भरडले गेले, पराभूत ठरले. नामुष्कीच्या याच परंपरेमधे भावी पिढ्याही वाढत राहिल्या - त्यातूनच मग ज्यांचे भविष्य अंध:करमय आहे अशा तरुण मुलांची आणि कोवळ्या मुलींची टोळकी रस्त्याच्या कडेला उभी राहताना दिसतात. तुरुंगात सडणारे त्यांचे जथे सापडतात.

जे काळे लोक यशस्वी झालेत, त्यांच्याही जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर आपल्या वंशाची, वंशभेदाची काळी छाया कायमची पडलेली असते. सतत करून दिलेल्या वंशाच्या जाणीवेचीच छाया त्यांव्यावर पडलेली जाणवते. रेव्हरंड राईट् यांच्या पिढीत वाढलेल्या स्त्री-पुरुषांच्या मनातल्या अपमानाच्या, संदेहाच्या, भीतीच्या स्मृती अजूनही पुरत्या गेलेल्या नाहीत. आणि तेव्हाचा संताप आणि कटुता आजही मिटलेली नाही. या संतापाला कदाचित् सार्वजनिक ठिकाणी, गोरे मित्र-मैत्रिणी आणि सहकार्‍यांच्या समोर ते वाट करून देत नसतील, पण केशकर्तनालयात आणि स्वयंपाकघरामधे त्याला नक्की वाचा फुटते. आणि कधीकधी राजकारणी लोक या असंतोषाचा वापर वंशाधारित मतांच्या गठ्ठ्याकरता किंवा प्रसंगी आपले वैयक्तिक अपयश झाकण्याकरता करताना दिसतात.

आणि कधीकधी हा असंतोष बाहेर पडतो रविवार सकाळच्या चर्चमधे - व्यासपीठावरच्या भाषणामधे आणि भाविक श्रोत्यांमधेसुद्धा. "रविवार सकाळची घटका ही अमेरिकेत अजूनही जाग्या असलेल्या वंशाधारित विभागणीची घटका आहे" असे वर्षानुवर्षे उपरोधाने म्हण्टले जाते. रेव्हरंड् राईट् यांच्या चर्चमधल्या उपदेशपर भाषणातून बाहेर पडलेल्या या संतापाच्या उद्रेकामुळे असंख्य लोकाना बसलेला आश्चर्याचा धक्का वरील उपरोधात्मक विधानाच्या सत्यतेचेच द्योतक आहे. हा संताप नेहमीच उपयुक्त असतो असे मुळीच नाही. कित्येकदा हा संताप खरेखुरे प्रश्न सोडवण्यापासून आपल्याला परावृत्त करतो ; प्राप्त परिस्थितीबद्दलची अापली स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याच्या प्रक्रियेच्या मधे तो येतो, आणि खर्‍या अर्थाने बदल घडवून आणण्याकरता कृष्णवर्णीय समाजाला एकत्रित आणण्याच्या प्रक्रियेलासुद्धा हा संताप अडथळा आणतो. पण, कुठेतरी हे मान्य करायलाच पाहिजे की, हा संताप खरा आहे, ज्वलंत आहे, आणि त्याच्या वैधतेला नाकारणे, तो का अस्तित्वात आहे याची समूळ कारणीमीमांसा न करणे म्हणजे आपापसातली जी गैरसमजांची दरी आहे ती वाढवण्याला मदत करणेच होय.

खरे सांगायचे तर गोर्‍या लोकांच्या काही समूहांमधेसुद्धा अशा प्रकारचा संताप आपल्याला आढळतो. गोर्‍या समाजातल्या बहुसंख्य नोकरदार मध्यमवर्गीय लोकाना, आपल्या वंशामुळे आपला काही विशेष फायदा झाला आहे असे बिलकुल वाटत नाही. त्यांचा अनुभव हा स्थलांतरितांच्या अनुभवाप्रमाणे आहे - कुणीही त्यांना काही आयते दिलेले नाही, त्यानी जे काही मिळविले ते त्यांनी शून्यापासून पैदा केलेले आहे. त्यांनी आयुष्यभर अपार कष्ट केलेत, आणि मग त्यांपैकी काहींना दिसलेले आहे की एके दिवशी अचानक त्यांच्या नोकर्‍या परदेशी गेलेल्या आहेत; किंवा आयुष्यभराच्या कष्टांनंतर त्यांचे हक्काचे निवृतीवेतन गडप झालेले आहे. भविष्याबद्दल ते अत्यंत अस्वस्थ, चिंताक्रांत आहेत आणि आपल्या स्वप्नांनी कायमची हुलकावणी दिल्यासारखे त्यापैकी कित्येकाना वाटते.

न वाढणार्‍या पगाराच्या आणि जागतिक स्पर्धेच्या या आजच्या जमान्यात, संधींची उपलब्धता म्हणजे जणू रस्सीखेच बनली आहे - मला स्वप्ने पहायची असतील तर तू ती बघता कामा नयेस, मला वर जायचे असेल तर तू खड्ड्यात पडल्याशिवाय ते शक्य नाही ! अशा परिस्थितीमधे, जेव्हा त्यांच्या मुलांना त्यांना शहराच्या दुसर्‍या टोकाला असणार्‍या शाळेत जाण्याकरता बसवावे लागते, तेव्हा नेमके त्यांना दिसते की, कृष्णवर्णीय लोकांना चांगल्या नोकर्‍या किंवा शिक्षणात चांगल्या संधी मिळण्याकरता आरक्षणाचा लाभ होतो आहे. आणि हे आरक्षण अशा अन्यायामुळे आहे, जो त्यांच्या पिढीने केलेला नाही. जेव्हा त्यांना "तुमची शहराच्या मध्यवस्तीमधे घडणार्‍या गुन्ह्यांबद्दलची भीती ही काही झाले तरी वंशभेदावर आधारलेली आहे" असे सांगितले जाते, तेव्हा हळूहळू संतापाचा अंगार त्यांच्यातही धुमसू लागतोच.

काळ्या समाजातील संतापासारखेच, सभ्य संवाद करताना गोऱ्या समाजातही हे धुमसणे प्रकट केले जात नाही. पण त्या धुमसण्यामुळे गेल्या एका पिढीने तरी राजकारणाला घडवण्यात भाग घेतला आहे. समाजकल्याण योजना आणि सकारात्मक कार्यक्रम (आरक्षण) या घण-ऐरणींनी रेगन यांच्या राजकारणाला घडवले. गुन्हेगारीविषयी जी भीती आहे, तिचा गैरफायदा राजकारणी लोक निवडणुकीच्या निमित्ताने घेतात, हे आता नित्याचेच झाले आहे. रेडियो-टीव्हीवरील टॉक-शो मुलाखतकार आणि उजव्या विचारसरणीचे (कॉन्झर्वेटिव्ह) टीकाकार वंशभेदाच्या फोल आरोपांवर बोल बोल बोलून आपले व्यावसायिक आयुष्य उभे करतात, आणि वंाशिक अन्याय आणि असमानतेबद्दलच्या सुयोग्य चर्चांची, निव्वळ राजकारणी शब्दशुचिता किंवा उलट वंशद्वेष म्हणूनच अवहेलना करतात.


कृष्णवर्णीयांचा संताप अनेकदा उद्दिष्टाच्या विरुद्ध फळे देतो असे दिसते. आणि तसेच गोऱ्यांमध्ये धुमसणाऱ्या भावना मध्यमवर्गाला पिळणाऱ्या खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करतात. हे दोष म्हणजे : अंतर्गत बेकायदा व्यवहारांनी बुजबुजलेल्या कंपन्यांच्या चालीरीती; राजकारण्यांना ‘पटवणाऱ्यां’चा आणि आपमतलबांचा वरचष्मा असलेली राजधानी वॉशिंगटन; आणि बहुतेकांच्या तोट्याचे असून काही थोड्यांच्या फायद्याचे अर्थकारण. तरीसुद्धा गोऱ्या अमेरिकनांच्या धुमसणाऱ्या भावना निघून जावोत अशी नुसतीच आशा केली, किंवा त्या भावनांना भरकटलेल्या किंवा वंशद्वेषी म्हटले, आणि त्या भावना न्याय्य चिंता-आकांक्षांवर आधारलेल्या आहेत हे जर ओळखले नाही, तर हेदेखील वंशांमधली द्विभाजक मोठे करते, आणि समजूत येण्याच्या वाटेत अडथळा आणते.


आपण आता या वळणावर आहोत. वंशाच्या बाबतीत बुद्धिबळाचा आजवरचा हा डाव अडकलेा आहे. माझे काही टीकाकार, काळे आणि गोरेही, जसा दावा करतात तसा मी इतका भोळा नाही; एका निवडणुकीच्या मुदतीत, एकाच उमेदवारीत, तेही माझ्यासारख्या अपरिपूर्ण उमेदवारीत, आपण आपल्या वांशिक भेदांच्या पलीकडे जाऊ असे मानणारा मी नाही, आणि कधीच नव्हतो.


पण मी माझ्या ठाम विश्वासाचे आधीच प्रतिपादन केले आहे - आणि तो ठाम विश्वास माझ्या देवावरील श्रद्धेतून, अमेरिकन लोकांवरील श्रद्धेतून येतो - की एकत्र काम केल्यास आपण आपल्या काही जुनाट वंशविषयक जखमांच्या पलीकडे जाऊ शकू. वास्तविक अधिक एकात्म राष्ट्र बनण्याच्या वाटेवर राहायचे असेल, तर एकत्र काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.


कृष्णवर्गीय समाजासाठी हा मार्ग म्हणजे आपल्या भूतकाळाची ओझी जाणून स्वीकारायची, पण तरीही आपण आपल्या भूतकाळाची शिकार होता कामा नये. त्याचा अर्थ हा की अमेरिकेतील जीवनाच्या प्रत्येक पैलूत पूर्ण न्याय हिरिरीने मागत राहाणे. पण त्याचा हादेखील अर्थ आहे, की आपली विशेष वैषम्ये - अधिक चांगली स्वास्थ्यसेवा, अधिक चांगल्या शाळा, अधिक चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात या मागण्या - अमेरिकनांच्या समावेशक आकांक्षांशी बांधल्या पाहिजेत.

म्हणजे अश्या अदृश्य अडथळ्यांमुळे बढती रोखली गेलेली गोरी स्त्री, नोकरीतून कमी झालेला गोरा पुरुष, आपल्या कुटुंबाला अन्न पुरवण्यासाठी झटणारा स्थलांतरित परदेशी, या सर्वांच्या आकांक्षाशी आपण एकरूप व्हायला हवे. त्यासाठी आपल्या आयुष्याची आपण स्वत:च संपूर्ण जबाबदारी घेणे - जे बाप आहेत त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करणे, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ घालवणे, आणि त्यांना हे शिकवणे, की त्यांच्या आयुष्यात त्यांना आह्वाने आणि भेदभाव अनुभवास आलेत तरीही त्यांनी नैराश्याला किंवा कडवटपणाला बळी पडू नये; त्यांचा नेहमीच हा विश्वास असावा की त्यांची विधिलिखिते तेच लिहू शकतात.


हे मोठे व्यंग्य आहे, की हे स्वावलंबनाचे सारभूत अमेरिकन तत्त्व - होय, उजव्या कॉन्झर्व्हेटिव्ह विचारसरणीचे तत्त्व - रेव्हरंड राईट यांच्या प्रवचनांत अनेकदा उच्चारले गेले आहे. पण माझे पूर्वीचे धर्मगुरू अनेकदा हे समजण्यात कमी पडले, की स्वावलंबनाचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी, आपण आपला समाज बदलू शकतो हा विश्वास प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.


रेव्हरंड राईट यांच्या प्रवचनांतली मूलगामी चूक ही नाही, की ते आपल्या समाजातील वंशद्वेषाबद्दल बोलले. चूक ही, की त्यांच्या मते जणू आपला समाज अचेतन आहे. जणू आजवर काहीच प्रगती झालेली नाही. जणू काही हा देश - जेथे काळे-गोरे, लॅटीनो-आशियाई, राव-रंक, आबालवद्ध, सर्वांची आघाडी बांधणाऱ्या एकाला देशातील सर्वोच्च पदाची उमेद असण्यास शक्य झाले - जणू काही हा देश त्याच्या शोकदग्ध भूतकाळाशी सदासर्वदा बांधला गेला आहे.

पण हे आपल्याला माहीत आहे - हे आपण पाहिलेले आहे - की अमेरिका बदलू शकते. हेच या देशाचे खरे अभिजात कौशल्य आहे. जे यश आपण आजवर मिळवलेले आहे त्यातून आपल्याला आशा मिळते -ही आशा करण्याचे धार्ष्ट्यच जणू- की उद्या आपण काय मिळवणार आहोत, काय मिळवले पाहिजे.


गोऱ्या समाजासाठी अधिक एकात्म बनण्याचा मार्ग म्हणजे हे स्वीकारणे की कृष्णवर्णीय समाजाला ज्या अडचणी आहेत, त्या फक्त काळ्या लोकांच्या मनातील कल्पना नव्हेत. भेदभावाचा वारसा -आणि आजचे भेदभावाचे नमुनेही, जरी पूर्वीइतके उघड नसले, तरीही- वास्तविक आहेत, आणि त्यांच्याकडे लक्ष दिलेच पाहिजे. फक्त शब्दांनी नव्हे, तर कृतीने -आपल्या शाळांत आणि समाजात गुंतवणूक करून; नागरी हक्क कायद्यांची अंमलबजावणी करून आणि आपल्या फौजदारी न्यायव्यवस्थेत रास्तपणा असल्याची खात्री घेऊन- पूर्वीच्या पिढीपाशी जी उद्धाराची संधी उपलब्ध नव्हती, त्या संधीच्या शिड्या या पिढीला पुरवून.
सर्व अमेरिकन लोकांना उमजावे की ‘तुमची स्वप्नपूर्ती ही माझ्या स्वप्नपूर्तीच्या विरोधातच असेल’ असे काही जरुरीचे नाही. आरोग्य, समाजकल्याण, आणि काळ्या-गोऱ्या-निमगोऱ्या सर्व मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक केली, तर शेवटी अवघीच अमेरिका समृद्ध होण्यास साहाय्य होईल.

शेवटी एवढेच सांगू इच्छितो की, आपल्याला दुसर्‍यांनी जसे वागवणे अपेक्षीत आहे तशीच वागणूक आपण दुसर्‍यांना दिली पाहिजे. जगातले सगळे मोठे धर्म देखिल हीच शिकवण देतात. तेव्हा चला तर मग आपणच बनूया आपल्या भावा बहिणींचे पाठीराखे. चला सगळे मिळून शोधूया सर्वांच्या हिताच्या गोष्टी आणि आपल्या राजकारणातून देखिल तेच दाखवून देऊ या.

ह्या देशामध्ये आपल्याला निवड स्वातंत्र्य आहे. जे आपण वापरतो, आणि तरी देखील आपण दुफळीचे, वादाचे, छद्मी राजकारण करू शकतो. ओजे (सिंपसन) खटल्यात घडल्या सारखे - किंवा (हरीकेन) कट्रीना सारख्या संकट समयी बघितले तसे - किंवा वृत्तवाहिन्यांना चारा पुरवल्या सारखे, 'वंश, वंश, वंश' हा एकच खेळ खेळला जातो. तो आम्ही सहज हाताळू शकतो. धर्मगुरु राइट ह्यांची वचने प्रत्येक वाहिनीवर दररोज दाखवून त्यावर निवडणुक होई पर्यंत बोलत राहू शकतो. पण अमेरिकन लोकांना काय वाटते? त्यांच्या मते मी त्या कडव्या वचनांवर विश्वास ठेवतो का नाही? अथवा मला त्या विषयी सहानुभुती आहे की नाही? ह्याची पर्वा न करता ह्या निवडणुक प्रचारातला हा एकमेव मुद्दा बनवू शकतो. आम्ही हिलरी समर्थकांच्या चुकांवर झडप घालून हिलरीवर 'वंशाचे राजकारण करत आहे' अश्या आरोपांना पुरावा देऊ शकतो किंवा निवडणुकीत गोर्‍या वंशाचे लोक शेवटी सगळे मुद्दे बाजूला ठेवून मकेनच्याच मागे झुंडीने जातील असे अंदाज देखिल मांडू शकतो.

होय, आम्ही हे सर्व करू शकतो.

पण आम्ही जर असे वागलो, तर मी खात्रीने सांगतो की पुढच्या निवडणुकीत आम्ही दुसरेच काहीतरी चघळत असू. आणि नंतर दुसरे काही तरी, त्यानंतर तिसरेच काहीतरी, आणि बदलणार काहीच नाही.
हा एक पर्याय झाला. पण त्याच वेळेस ह्या क्षणी ह्या निवडणुकीत आपण सगळे एकत्र येऊन असेही सांगू शकतो की, "आजपासून हे सर्व संपले!". यंदा आम्हाला बोलायचे आहे इथल्या काळ्या, गोर्‍या, एशियन, हिस्पॅनीक सर्वच मुलांचे भविष्य हिरावून घेणार्‍या या कोलमडणार्‍या शिक्षण व्यवस्थेविषयी. 'ही मुले शिकूच शकत नाहीत'; 'जी मुले आपल्या सारखी दिसत नाहीत त्यांच्या समस्या आपल्या नाहीत' असले नैराश्य आणणारे विचार आत झटकून टाकूयात. अमेरिकेतली मुले ही आपली मुले आहेत आणि आम्ही त्यांना २१व्या शतकात मागे पडू देणार नाही. आता तर नाहीच!

आता बोलूया आरोग्य विमा नसलेल्या काळ्या, गोर्‍या हिस्पॅनिक लोकांच्या रांगांविषयी; ज्यांच्यापाशी धनाढ्य कंपन्यां विरुद्ध लढण्याची शक्ती नाही पण समजा आपण सगळे एकत्र आलो तरच त्यांच्यात बळ येईल लढण्याचे! आता बोलूया, एकेकाळी सर्व वंशाच्या स्त्री पुरुषांना रोजगार पुरवणार्‍या पण आता टाळं ठोकलेल्या गिरण्यांविषयी, बोलूया बैंकांना सुपूर्द केलेल्या घरांविषयी ज्यात राहत होते सर्व धर्म वंश जातीचे अमेरिकन नागरिक. आता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची नोकरी कुणा 'तुमच्याहून वेगळे दिसणार्‍या'मुळे धोक्यात नसून ती धोक्यात आहे ती इथली कामे केवळ नफ्यासाठी बाहेरदेशी पाठवणार्‍या, तुम्ही ज्यांना आपले आयुष्य अर्पण केले, त्या कंपनी मुळे.

आम्हाला बोलायचे आहे आपल्या ध्वजाखाली येऊन एकत्र लढणार्‍या प्रसंगी रक्त सांडणार्‍या सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरुषां विषयी. एका अनावश्यक युद्धात अडकलेल्यांना त्यांच्या घरी परत कसे आणता येईल ह्या विषयी. आमची देशभक्ती आम्ही दाखवायची आहे ती त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी वाहून.

बहुसंख्य अमेरिकन लोकांनाही आज आपल्या देशाचे हेच भवितव्य हवे आहे आणि त्या विषयी जर माझ्या मनात तीळ मात्रही शंका असती तर मी राष्ट्राध्यक्ष पदासाठी कधीच उभा राहिलो नसतो. आपले संघटन भले कधीही आदर्श होणार नाही पण पिढ्या अन् पिढ्यांच्या वारशाने दाखवून दिले आहे की ते नक्कीच आदर्श होऊ शकते. आणि आज कधीही त्याविषयी माझ्या मनात शंका अथवा नैराश्य आले तर मला सगळ्यात जास्त आशावाद मिळतो तो पुढच्या पिढीकडून- तरुण लोकांकडून- ज्यांचा बाणा आणि बदल स्वीकारणारे मुक्त विचार, ज्यामुळे ह्या निवडणुकीत इतिहास घडायला सुरूवात झाली आहे.

आज मला एक इथे एक कथा तुम्हा सर्वांना आवर्जून सांगायची आहे. ही कथा मला डॉ.किंग ह्यांच्या जयंतीला अटलांटा मधील त्यांच्याच चर्च मध्ये कुणीतरी सांगितली होती.

ऍशली बाइया नावाची एक २३ वर्षाची गौर वर्णीय महिला साऊथ कॅरोलायना राज्यातील फ्लोरेन्स गावात आमच्या प्रचाराचे काम पाहते. ह्या प्रचाराच्या अगदी सुरुवाती पासून ती बहुतांशी कृष्णवर्णीय समुदायात काम करते.

ऍशली म्हणाली की ती नऊ वर्षांची असताना तिच्या आईला कॅन्सर झाला. आणि यामुळे तिचे नोकरीत खाडे झाले म्हणून तिला नोकरी आणि त्यातून मिळालेली आरोग्यसेवा, हे दोन्ही गमवावे लागले. दिवाळखोरी जाहीर करावी लागली आणि तेव्हा ऍशलीने ठरवले की तिला तिच्या आईला मदत करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे.

त्यांच्या रोजच्या खर्चामध्ये इतर गोष्टींबरोबर अन्न बरेच खर्चिक होते. म्हणून ऍशलीने तिच्या आईला पटवून दिले की मस्टर्ड आणि रेलिश सॅडविच तिला सर्वात जास्त आवडतात. कारण ते सर्वात स्वस्त होते.
तिची आई बरी होईपर्यंत वर्षभर तिने हे केले. आमच्या संभाषणात तिने सर्वांना सांगितले की आमच्या मोहिमेत सहभागी होण्याचे कारण तिला देशातील लाखो मुलांना मदत करायची आहे. अशी मुले की ज्यांना आपल्या पालकांना मदत करायची गरज आणि इच्छा आहे.

कदाचित ऍशलीला वेगळा निर्णय घेता आला असता. कदाचित आधी तिला कुणीतरी सांगितले असेल की तिच्या आईच्या अडचणींमागे वेलफेअरमध्ये असणारे काही आळशी कृष्णवर्णीय लोक आहेत, किंवा देशात बेकायदेशीरपणे आलेले काही हिस्पॅनिक स्थलांतरित आहेत. पण तिने आपला निर्णय बदलला नाही. अन्यायाविरूद्ध लढताना तिने आम्हाला आपले सहकारी मानले.

ऍशलीने तिची गोष्ट संपवतली आणि खोलीत असलेल्या प्रत्येकाकडे जाऊन विचारतले की त्याने/तिने आमच्या मोहीमेत भाग घेण्याचा निर्णय का घेतला? प्रत्येकाची वेगळी गोष्ट, प्रत्येकाची वेगळी कारणे. बर्‍याच जणांनी एखादा विशिष्ट मुद्दा मांडला. आणि शेवटी ते एका वयोवृद्ध कृष्णवर्णीय माणसाकडे आले. हा सारा वेळ हा माणूस शांत बसलेला होता. ऍशलीने त्याला विचारतले की तो आम्हाला का सामील झाला आहे? त्याने गरीबांसाठी आरोग्यसेवा किंवा अर्थव्यवस्था हे कारण दिले नाही. त्याने मुलांचे शिक्षण किंवा युद्धविराम, हेही कारण दिले नाही. तो इथे बराक ओबामासाठी आला आहे असेही म्हणाला नाही. तो खोलीतल्या सर्वांना फक्त इतकेच म्हणाला "मी इथे ऍशलीसाठी आलो आहे."

"मी इथे ऍशलीसाठी आलो आहे." एक श्वेतवर्णिय मुलगी आणि एक कृष्णवर्णीय माणूस यांच्यातील परस्परांना ओळखण्याचा तो क्षण. हा क्षण पुरेसा नाही. आजारी लोकांना हेल्थ केअर देणे, बेकारांना नोकरी देणे, आपल्या मुलांना शिक्षण देणे हे पुरेसे नाही.

पण तिथे आपण सुरूवात करतो. तिथे आपल्या सहकार्याचे बंध बळकट होतात. आणि फिलाडेल्फियामध्ये काही देशभक्त मंडळींनी त्या करारावर सही केल्यानंतर गेल्या २२१ वर्षांमध्ये अनेक पिढ्यांच्या हे लक्षात आले आहे की आपल्या देशाची संस्कृती घडवण्यास इथे फक्त सुरूवात झालेली आहे.

लोकमित्र चा पहिला लेख

हा लोकमित्रचा पहिला लेख असे शिक्का मोर्तब करायला हवा. हा लेख मराठीत असल्याने मी तो गांभिर्याने वाचु शकलो. अक्षरशः अवाक झालो. मला हाच लेख इथल्या सामाजिक स्पंदनावर देखिल तंतोतंत लागु आहे असे वाटले.
ऋषीकेश, चित्रा, नंदन, धनंजय, कोलबेर, सहज, राजेंद्र, मुक्तसुनीत आणि सर्किट यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत.
(नतमस्तक)
प्रकाश घाटपांडे

+१

मात्र पचायला, पचवायला जरा कठीणच आहे. नुसते वाचून भागायचे नाही.
- दिगम्भा

धन्य !!

ऋषीकेश, चित्रा, नंदन, धनंजय, कोलबेर, सहज, राजेंद्र, मुक्तसुनीत आणि सर्किट यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत.
(नतमस्तक)

खरोखरंच ! संयुक्त विद्यमाने इतक्या त्वरेने केलेला उपक्रम पाहून फार धन्य वाटले.

सर्किट रावांच्या उत्साहाला सलाम. त्यांनी मागे एकदा इराकमध्ये बंदी बनलेल्या अमेरिकी पत्रकाराची मुलाखत अशीच उत्साहाने अनुवादित केली होती. (त्यामध्ये अतिरेक्यांच्या मुखी गावरान ढंगाची भाषा वापरायचा प्रयोग सुद्धा असाच कौतूकास्पद. हे आपलं संधी मिळाली म्हणून लिहिले.)

आता अनुवादित भाषण वाचतो आणि पुन्हा प्रतिसाद देतो.
-- लिखाळ.

वा! काम तडीस गेले.

ऋषीकेश, चित्रा, नंदन, धनंजय, कोलबेर, सहज, राजेंद्र, मुक्तसुनीत आणि सर्किट यांचे आभार मानावे तितके थोडे आहेत.
सरस अनुवाद.
मराठी वृत्तपत्रांमध्ये समग्र प्रसिद्ध झाल्यास उत्तम! विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण मराठी वृत्तपत्रांच्या रविवारच्या पुरवण्यांमधून प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न लोकमित्र मंडळाने करावा. ती (वृत्तपत्रे) मनःपुर्वक वाचली जात असावीत असा {माझा आपला एक (गोड गैर?)}समज आहे.

(शहरी वृत्तपत्रे (वाचा- लोकलत्ता, माता टाईम्स) वाचली जात नसावीत असा (माझा)समज आहे..)
(सदर अनुवाद कॉपीराईट कायद्याने बाधित आहे काय? :))))

सिनर्जी

अप्रतिम अनुवाद, मला वाटतं इंटरनेट या माध्यमाची हिच खरी ताकद आहे. एकमेकांपासून शेकडो मैल अंतरावर दूर असणार्‍या व्यक्तिंनी ज्या तातडीने व प्रभावीपणे, स्वतंत्रपणे तरीही सहक्रीयतेने (सिनर्जी) हा 'उपक्रम' साकार केला आहे, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद्!
लोकमित्र प्रतिष्ठानची स्थापना व हा अनुवादाचा प्रकल्प याने आता उपक्रम खर्‍या अर्थाने एक 'उपक्रम' होत आहे. निव्वळ चर्चा झाडण्यापेक्षा, आता आपण प्रत्यक्ष काहीतरी करतोय याचा आनंद अधिक आहे.

कल्पना लावून धरून, प्रत्यक्षात साकार केल्याबद्दल सर्किट यांचे अभिनंदन. ऋषीकेश, चित्रा, नंदन, धनंजय, कोलबेर, सहज, राजेंद्र, मुक्तसुनीत आपण सर्वांनी खुपच सुंदर कामगिरी केली आहे.

सदर भाषण केवळ उपक्रमावर न राहता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. मी माझ्यावतीने शक्य ते सर्व प्रयत्न नक्की करेन.

जयेश

कैच्या कैच बर्का!

राम राम मंडळी!
मी म्हंटलं इतक्या लोकांनी काम केलंय यावर तर काही तरी लै भारी वाचायला मिळणार.
म्हणून मी चक्क आमच्या
नव्वद हजार रुपये लिटर शाई असणार्‍या एचपी च्या प्रिंटरवर छपाई केली हो!
पण हे काय हे तर एक तद्दन निवडणूकीचे एक हजार एक वेळा घासले गेलेले भाषण!
असली भाषणे तर आमचे दशरथ पाटील गेलाबाजार विनायक पांडे नाही तर बबन घोलप पण करेल.
यात काय विशेष आहे?

घटनेचा उल्लेख - कोणत्या राजकिय भाषणात नसतो आं?
आम्ही बदल करू - कोण असं म्हणत नाही? आणि कशात बदल करू? तर तेच ते घीसे पिटे मुद्दे जे आम्ही दर वेळी पालिका निवडणुकापासून तर लोकसभे पर्यंत ऐकतो.
या शिवाय काय तर कोणत्या तरी रे राईटशी संबंध का ठेवले याचे विवेचन.
अमेरिकेतले काळे आन गोरे त्यांची भांडनं. आमाला काय करायच भौ त्याच्याशी?
कसली कटुता आन् कसलं काय. इकडम् येवुन पाहा म्हनावं.

आणि हे मुद्दे नसलेले भाषण काय निवडणूकीचे असते का?

भौ इथे आम्हाला आम्च्या लै चिंता हायेत. तवा आस्ली भाषणबाजी लै पायली बाबा.
आता काय तरी चांगला विषय काडा.
उगाच आपलं पब्लीकला पीडायचं काम नको. उगाच आपलं चार लोकांना लिहायला लावुन दिलं. वर आमची म्हागमोलाची शाई बी वाया.

येक बाकी झकास झालं. आमचा इजुभौ लै मागं लागला व्हा येकदा आमिरिकीला जाऊन येऊ आन बघु तरी तिकडच्या व्यायामशाळा कशा र्‍हातात ते. त्याला दाकिवतु हा लेख. आन सांगतो का तिकडं काय खरं नाई बाबा!. काळ्या लोकाले गोरे चांगले म्हनत नाई गोर्‍याले काळे भामटे म्हनु र्‍हायले. शहराच्या मद्य भागात लै मारामार्‍य व्हात्यात.
लोकास्नी शिकायला शाळा न्हाईत का खायाला पैसे न्हाईत (त्या गोर्‍या पोरीचं हुदारन हाये की!.)
कुटं जातु त्या अमेरिकेस्नी?

आन् आत त्या धंनंजयाला आजून येड्यात काडु नका.
भौ तू आप्ली सौंस्था येगळे ठीव रं बाबा.
ह्ये आस्लं निवडनूकीची भाष्नं बीष्नं कायी छापनार असला तर कायी बी खरं नाई गड्या!

आन् सर्कीटराव ते गळा वगैरे काय भरून यायला नको. घट् झालं आसल तं टाय जरा ढील्ला करून घ्या!
आन् घाटपांडे साहेब एकदम मान वर कडक!

आपला
गुंडोपंत

जोड्या जुळवा

आणखी एक प्रिंट या ची काढा नी जोड्या जुळवा. :)

हा हा हा!

क्या बात है!!
त्याने अगदी भारीच विकि दुवा दिला आहे!
आणि हो खालचा अय्यर बाबा पण सही!

'त्या' च्या दुव्यांना नेहमी प्रमाणेच सलाम!

आपला
गुंडोपंत

जोड्या लावताना आलेला प्रश्न

मला असे जाणवले की आयुष्यभर मी पदोपदी असे "पावर वर्ड्स" (उसन्या बळाचे शब्द) वापरत आलो आहे.

उदाहरणार्थ
१. "आई".
आजही चुकून काही खरचटले तर "आई गं" असे शब्द तोंडातून निघतात. इथे आईचा काय संबंध? आई थोडीच येणार आहे काही करायला. हा तर केवळ उसन्या बळाचा शब्द आहे. यामुळे क्षुल्लक दुखण्याला "आईच्या मायेची गरज आहे" असे उसने बळ प्राप्त होते.

२. "कमालीचे"
उदा : "त्याच्या अपघाताबद्दल ऐकून मला कमालीचे वाईट वाटले." तरी त्या रात्री मी मस्त जेवलो असतो, कदाचित विनोदी नाटक बघून हसलेलो असतो. म्हणजे "कमालीचे" हा उसन्या बळाचा शब्द आहे. ("कमाल" = मॅक्सिमम; आयुष्यात सर्वात अधिक वाईट वाटले.)

इ. इ.

मग असा विचार केला की हे शब्द माझ्या वापरातून पूर्णपणे काढून टाकले पाहिजेत. हे मला "कमालीचे" कठिण जात आहे. काही दिवसापूर्वी एक पत्र मी लिहिले त्याच्या सुरुवातीला माझे शब्द होते "तीर्थरूप आईस साष्टांग नमस्कार". उसन्या बळाचा "आई" शब्द बदलून काय लिहावे हा मोठाच प्रश्न मला पडला आहे. आता "जननी" वगैरे शब्द मला ठाऊक आहेत, जे नेमकेही आहेत, आणि उसन्या बळासाठी मी वापरतही नाही. पण शैलीच्या दृष्टीने ते योग्य वाटत नाहीत. इतकेच काय, पत्र वाचणार्‍या बाईला तो शब्द खुपेल असे मला वाटते. (या उदाहरणात "कमालीचा" शब्द चपखल बसतो - शब्द सापडण्यात इतकी मुश्किल मला आल्याचे पटकन स्मरत नाही.)

या उदाहरणावरून लक्षात यावे, की एखादा शब्द उसन्या बळाचा आहे की नाही, हे संदर्भावर अवलंबून असते. संदर्भ नीट पडताळून बघावा की "आई" शब्द तथ्यात्मक आहे, की उसन्या बळाचा.
गुंडोपंतांचे पहिले उदाहरण आहे "घटनेच्या उल्लेखा"चे. तो. यांच्या पुरवणीला गुंडोपंतांनी दिलेल्या उत्तरावरून असा कयास आहे, की "घटना" हा उसन्या बळाचा शब्द आहे.

या शब्दाचे विश्लेषण करूया.

ओबामा म्हणतात :
"घटनाकारांना हे दुभाजन टाळण्यासाठी आणखी वीस वर्षे ज्या गुलामगिरीस मान्यता द्यावी लागली..."
येथे उसने बळ आहे की तथ्याचा उल्लेख? तो शब्द न वापरता त्या तथ्याचा उल्लेख करणे शक्य झाले असते का? ते तथ्य या संदर्भात अवांतर आहे का? असा विचार करावा.

गुंडोपंतांनी प्रश्न उपस्थित केला की :
"आम्ही बदल करू - कोण असं म्हणत नाही?"
येथे "बदल" हा उसन्या बळाचा शब्द आहे, असे त्यांचे म्हणणे असावे.

पण इथे ओबामा यांनी वेगळे मुद्दे मांडले आहेत.
१.थोडा बदल याआधीच झालेला आहे. (रेव्हरंड राईट यांच्या प्रवचनांतली मूलगामी चूक ... ही, की त्यांच्या मते जणू आपला समाज अचेतन आहे. जणू आजवर काहीच प्रगती झालेली नाही.)
२. मी पूर्ण बदल करू शकणार नाही. (एका निवडणुकीच्या मुदतीत, एकाच उमेदवारीत, तेही माझ्यासारख्या अपरिपूर्ण उमेदवारीत, आपण आपल्या वांशिक भेदांच्या पलीकडे जाऊ असे मानणारा मी नाही, आणि [इतका भोळा] कधीच नव्हतो.)

"बदल" या शब्दाच्या उसन्या बळाचा काय वापर येथे दिसतो? किंवा "मी करतो तो उत्तम बदल" या प्रकारचा घिसापिटा राजकारणी अर्थ येथे कुठे दिसतो?

उसन्या बळाचे शब्द राजकारणात वापरले जातात हे निरीक्षण अर्थात खरे आहे. तो. यांनी दिलेल्या विकी दुव्यावरती त्याची चांगली उदाहरणे आहेत. पण त्यामुळे राजकारणातला व्यक्ती बोलणारा प्रत्येक शब्द उसन्या बळाचाच आहे, असे मानणे अतिरेकी आहे.

शब्दांमध्ये संक्षेपही असतो. "घटना" शब्दाऐवजी
"अमुक तारखेला अमुक ठिकाणी १, २, ३, ...५० लोकांनी सही केलेल्या दस्तऐवजात गुलामगिरीच्या प्रश्नासाठी २० वर्षांची मुदत दिली होती." याऐवजी
"घटनेत ... २० वर्षांची मुदत दिली होती"
असे म्हणण्यात संक्षेप आहे. तो शब्द कधीकधी उसन्या बळाने वापरला जातो, म्हणून या फायद्यास दृष्टीआड करता कामा नये.

*राजकारणी लोकांच्या बोलण्यावरून मतदारांना जे काही कळते त्यावरून मतदार मते देतात. सर्वाधिक मते प्राप्त करणारा उमेदवार मतदारांच्या आयुष्यावर परिणाम करणारी कार्ये करतो. उमेदवाराच्या भाषणात काही शब्द उसन्या बळाचे असतात, तर काही नसतात. सर्वच उमेदवारांचे सर्वच शब्द उसन्या बळाचे मानलेत, आणि निरर्थक मानलेत, तर मतदानाचे पूर्वनियोजन करण्यासाठी काहीच विदा मिळणार नाही. त्यामुळे मतदाराने उमेदवाराच्या भाषणांतील उसन्या बळाच्या शब्दांना वेगळे करून, त्याच्या म्हणण्याचे परीक्षण करावे. असे केल्यानंतर त्याला मतदानाचे पूर्वनियोजन करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळू शकते.*

हेच असेही म्हणू शकतो :
"लोकशाहीत मतदाराने उमेदवाराच्या बोलण्यात नीरक्षीरविवेक करून माहिती गोळा करावी. डोळस मतदानाने लोकशाही कार्यक्षम होते."

यात सर्व अधोरेखित शब्द पुष्कळदा उसन्या बळाने वापरले जातात. पण त्यामुळे या वरील दोन वाक्यांत ते उसन्या बळाचे आहेत का? वरील *मोठ्या* परिच्छेदापेक्षा ते वापरल्यामुळे संक्षेपाचा फायदा मिळतो, तो नगण्य मानावा का?

हा विचार करावा.

(टीप : ओबामा यांच्या भाषणातही अनेक उसन्या बळाचे शब्द आहेत, हे निश्चित. पण सरसकट सगळेच शब्द उसन्या बळाचे आहेत, असे वरील प्रतिसादांवरून वाटत होते. कदाचित हे सदस्य नीरक्षीरविवेक करून, कुठले शब्द उसन्या बळाचे आहेत/नाहीत सांगून विवेचन करणार असतील. तसे असल्यास आधीच क्षमायाचना करतो. त्यांच्या नीरक्षीरविवेकास दुजोराही देईन.)

बाबा रे!

बाबा रे, धनंजया,
मी काही तुझ्या इतका हुषार नाही.
मी एक सामान्य वकुबाचा नि सुमार बुद्धीचा माणूस आहे. तुझे इतके शब्दबंबाळ विवेचन आणि त्यातून तू जन्माला घालत असलेले शब्दांचे खेळ मला खरोखरच खेळता येत नाही. त्याबाबतीत तू झकासच आहेस.
तुला सलाम!

पण तरीही मी माझ्या तोकड्या उजेडाच्या बळावर काजव्याने सूर्याचा मुकाबला करावा तसा तुझ्या अभेद्य प्रतिवादाला उत्तर देण्याचा लंगडा प्रयत्न करतो आहे.

येथे "बदल" हा उसन्या बळाचा शब्द आहे, असे त्यांचे म्हणणे असावे.
छे! उसने बळ वगैरे काही माझ्या डोक्यात नव्ह्ते बरं. माझा फक्त इतक्या महागा-मोलाची शाई वाया गेल्या आणि नवीन काहीच वाचायला मिळाल्याबद्दल बद्दल संताप झाला होता. त्यामुळे तुझ्या त्यापुढील विवेचनाला उत्तर देण्यात काहीच हशील नाही.

शिवाय माझा मुद्दा ओबामाने कुठून तरी भाषण ढापले आहे असा मुळीच नाही. हे भाषण कदाचित त्यांनेच लिहिले असेल (मला माहीत नाही!)
माझा मुद्दा इतकाच आहे की, यात कोणतेही डोळे दिपवून टाकणारे आणि गळा भरून येवून नतमस्तक व्हावे असे मुद्दे वगैरे काही दिसले नाहीत. हे भाषण कोणत्याही निवडणूकीच्या उमेदवाराने करावे तसेच आहे. सर्कीट ने जेव्हढी हवा यात भरली होती तसे काही ते नाहीये इतकेच मी सांगु इच्छीतो.

आता काही भाषणातले मुद्दे -
हे तर मी आधीही म्हणालो आहे की जो उमेदवार फक्त चर्चचाच उदोउदो करतो आहे तो जगाचे काय डोंबलाचे कल्याण करणार? तो धर्माचे अवडंबर कमी करण्याच्या गोष्टी करन नाहीये तर वाढवायच्या गोष्टी करतोय.
मात्र हेच मुद्दे जगाच्या इतर भागात, अगदी भरतातही अगदी अस्पृष्य होतात हे कसे?
अरे, हे तर स्पष्टच आहे की तो चर्च चे आणि ख्रिस्ती लोकांचेच कल्याण करणार. फार तर त्यातल्या त्यात काळ्यांचे व त्यांच्या चर्चचे करेल.

आता माझे विवादास्पद विधान-
त्यातही तो पुरुषांचेच भले पाहतो आहे. स्त्रीयांचा काही उल्लेख फारसा येत नाही. म्हणजे या शिवाय त्याने पोपच्या जागेवर (किंवा ख्रिस्ती धर्मातल्या प्रमुख ठिकाणांवर) स्त्रीयांनाही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करेन असेही काही ओबामा म्हणत नाही! म्हणजे त्याला अगदी पारंपारिकतेकडेच जग न्यायचे आहे असा अर्थ मी लावला तर?

आपला
गुंडोपंत

चर्च आणि धर्म

हे तर मी आधीही म्हणालो आहे की जो उमेदवार फक्त चर्चचाच उदोउदो करतो आहे तो जगाचे काय डोंबलाचे कल्याण करणार? तो धर्माचे अवडंबर कमी करण्याच्या गोष्टी करन नाहीये तर वाढवायच्या गोष्टी करतोय.

अमेरिकेतील काळ्या लोकांच्या चर्च मध्ये एक हजेरी लावलीत, तर चर्च आणि धर्म ह्यांचा काय संबंध आहे, असा प्रश्न आपल्याला पडेल.

येथे चर्च, म्हणजे प्रार्थना स्थळ असे कमी, आणि सामाजिक शिक्षणाचे केंद्र अधिक.

चर्च हा एक मेळावा.

आम्ही एका लहान गावात राहत होतो, तेव्हा तेथे महाराष्ट्र मंडळाने आपला गणपती बसवला होता एका चर्च मध्ये.

हिंदु स्वयंसेवक संघाच्या सभा आणि मेळावे भरत होते, ते एका चर्च मध्ये.

त्यात पाद्रींनाही काही गैर वाटत नव्हते, आणि हिंदूंना तर नाहीच.

- सर्किट
--
शब्दभांडारात आज आपण नवीन प्रतिशब्द टाकला का ? नाही ? मग स्वतःला मराठी कसे म्हणवते तुम्हाला ?

असहमत.

ओबामाची तुलना एकदम स्थानिक राजकारण्याशी करणे अयोग्य वाटते.

मग

आपलाही मुद्दा ठीकच आहे द्वारकानाथराव.
मग सोनीया गांधींचे भाषण काढा. तेही न जमल्यास इंदिरा गांधीचे नाहीतर वाजपेयींचे काढा.
गेला बाजार आयाराम गयाराम जगजीवनराम चे भाषण काढा.
ते ही सोडा तुम्ही गॉर्डन ब्राऊन, पुतीन किंवा अगदी टोकाला जाऊन माओचे भाषण काढा.
कोणते मुद्दे त्यात वेगळे असतील?
प्रत्येक राजकारणी हेच म्हणतो की मी बदल घडवणार! ही असमानता वाईट आहे ती गेलीच पाहिजे! जुन्या पीढीच्या चुका आम्ही करणार नाही वगैरे वगैरे.
शिवाय काही तत्कालीन मुद्द्यांची भर घालून लोकांच्या भावनांना भडकवून आपण सत्तेवर येणे हा एकच हेतु असतो.
यात सगळे काही तसेच असते फक्त चर्च चा मुद्दा वगळता.

कारण आपल्याकडे मला माझ्या गुरुजींनी हिंदु धर्माची ओळख करून दिली असे म्हणता येत नाही कारण नाहीतर चर्च आणी मुल्ला मौलवी दुखावले जातात... आम्ही सेक्युलर पडतो ना!

पण तेच अमेरिकेत काही नाही बरंका. इथे खरे स्वातंत्र्य आहे!
इथे कुणीच दुखावले वगैरे जात नाही बरं!

भावी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष चर्चचे गोडवे गायला लागल्यावर आमचा कंठ अवरूद्ध होवून आम्ही नतमस्तक होतो!

आपला
गुंडोपंत

सहमत!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
गुंडोपंतांशी सहमत आहे.
मलाही ह्या भाषणात तसा खास दम वाटत नाही. निव्वळ बोलबच्चनगिरी वाटते. अर्थात राजकारणात जो ह्या बोबगिरी मध्ये जास्त यशस्वी होतो तो निवडून येतो असा आजवरचा इतिहास आहे.
असेच भाषण भारतात एखाद्याने हिंदुत्वाच्या मुद्यावर केले तर त्याला हीच चर्चची गोडवे गाणारी मंडळी जातीयव