तणाव म्हणजे काय, त्याची विविध कारणे, दुष्परिणाम, त्यावरील कायमस्वरूपी उपाय
नमस्कार!
तणाव म्हणजे काय, त्याची विविध कारणे, दुष्परिणाम, त्यावरील कायमस्वरूपी उपाय
तणाव एक सार्वत्रिक समस्या - आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तणाव ही समाजाला
भेडसवणारी एक प्रमुख समस्या बनली आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात तणावाचा अनुभव कधी ना कधी घेतला असेल. लहान-थोर, पुरुष-स्त्रिया सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात तणाव हा असतोच. आपल्यावरील तणाव आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम तर करतोच; पण त्याचबरोबर समाजातील बऱ्याच समस्या व विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असतोे. संथगतीने मृत्यूकडे नेणारी अशी ही व्याधी आहे.
तणाव म्हणजे काय ? - कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला आपण दिलेला
नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे तणाव. तणाव निर्माण करणारा प्रसंग मोठाच असला पाहिजे असे नाही, तर आपल्याला क्षुल्लक वाटणारा प्रसंगदेखील एखाद्या व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करू शकतो. उदा. दूध उतू जाणे, नेहमीची बस चुकणे, कार्यालयात जायला उशीर होणे, दूरध्वनी लगेच न लागणे, गृहपाठ न होणे इ.
तणावाची कारणे - तणाव निर्माण होण्याची मुख्यत: दोन कारणे असतात.
१. बाह्य - एकूण तणावनिर्मितीमध्ये बाह्य घटकांचा केवळ ५-१० टक्के एवढाच वाटा
असतो. उदा. कामाच्या ठिकाणचे व घरातील वातावरण, आर्थिक स्थिती, सामाजिक समस्या, प्रकृती अस्वास्थ इ.
२. आंतरिक - एकूण तणाव निर्मितीमध्ये आंतरिक घटकांचा ९०-९५ टक्के वाटा असतो.
आधुनिक जीवन प्रणालीमुळे तणाव निर्माण होतो असे म्हटले जाते; परंतु कोणतीही परिस्थिती ही स्वत: तणावपूर्ण नसते. एखाद्याच्या स्वभावानुरूप त्या परिस्थितीकडे पहाण्याच्या त्याच्या दृष्टीीकोनावर सर्व अवलंबून असते. स्वभावातील काही दोषांमुळे नेहमीची परिस्थितीदेखील कशी तणाव निर्माण करू शकते, याची काही उदाहरणे पाहूया.
अ. आत्मविश्वासाचा अभाव - आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली, की व्यक्ती
तणावग्रस्त होते.
आ. हळवेपणा - रस्त्यात भेटलेला मित्र बघून हसला नाही म्हणून तणाव.
इ. लाजणे - अपरिचित व्यक्तीशीी बोलताना तणाव.
ई. न्यूनगंड असणे - आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींच्या सानिध्यात तणाव.
तणावाचे दुष्परिणाम - तणावाच्या दुष्परिणामांची दोन गटात विभागणी करता येते.
अ. शारीरिक - पित्ताचा विकार, भूक न लागणे, वजन कमी होणे, हृदयरोग, दमा, रक्तदाब, मधुमेह, यकृत / मूत्रपिंड आदींचे विकार, इ.
आ. मानसिक - लगेच दमणे, अतिरिक्त राग येणे, विकृत व्यक्तीमत्त्व, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण, भावनाविवशता, इ.
उपाययोजना - तणावावर सर्वसाधारणपणे दोन स्तरावर उपाययोजना केल्या जातात -
अ. शारीरिक स्तरावर उपाय - उदा. झोपी जाणे, कामावरून सुट्टी घेणे, सहलीला जाणे, मसाज घेणे, व्यायाम करणे इत्यादी. यात केवळ कृतीच्या स्तरावर उपाय असल्यामुळे सुधारणा अगदी तात्पुरतीच असते. बऱ्याच वेळा तणावपूर्ण परिस्थितीपासून पूर्णत: बाजूला जाणे शक्य नसते, तसेच एका ठिकाणावरून दुसरीकडे गेल्यास तिथेही ताण निर्माण होऊ
शकतो.
आ. मानसिक स्तरावर उपाय - मानसोपचार, संमोहन उपचार इत्यादी. यात केवळ कृतींच्या स्तरावरच नव्हे तर ज्यापासून कृतींचा उगम होतो त्या विचारांच्या स्तरावर उपचार केले जातात. त्यामुळे काही काळ सुधारणा टिकू शकते म्हणून हे दोन्ही उपाय हे कायम स्वरूपी
उपाय नाहीत -
आपल्यापैकी प्रत्येकाची मग तो कारकून असो की देशाचा पंतप्रधान असो, एक सामाईक व अगदी माफक इच्छा असते कि दररोज रात्री आपल्याला शांत झोप लागावी व सकाळी उठल्यावर आपण आनंदी व उत्साही असावे. आपण सर्वजण आनंदाच्या शोधात
धडपडत असतो आणि दु:ख टाळण्याचा सतत प्रयत्न करत असतो; परंतु लक्षात असे येते की सर्वसाधारणपणे जीवनात २५ टक्के सुख व ७५ टक्के दु:ख असते. याचे कारण म्हणजे आपली आजची शिक्षण व्यवस्था आनंदी कसे रहावे ते शिकवत नाही.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला दररोज वेगवेगळया समस्यांना तोंड द्यावे लागते. (तात्कालिक उदा. द्यावीत) सकाळी वेळेवर गाडी पकडण्यापासून ते मुलांच्या शाळा प्रवेशापर्यंत अनेक समस्या आपल्या मनावर कळत नकळत ताण निर्माण करत
असतात. सतत तणावाखाली राहिल्याने आपल्याला त्याचे अनिष्ट परिणामही भोगावे लागतात.
तणाव निर्माण होण्याची कारणे, त्याचे परिणाम व तणाव दूर करण्याचा कायमस्वरूपी उपाय -
तणाव म्हणजे काय तर कोणत्याही प्रसंगाला किंवा बदलाला आपण दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव' असे म्हणतात.
आज आबालवृध्द सर्वांनाच ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळेच मानसोपचार तज्ञांकडील रुग्णाची गर्दी वाढत आहे. मनावर ताण येण्यासाठी प्रसंग / समस्या फार मोठी असावी लागते असे नाही. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना मेजवानीला जातांना कोणते कपडे घालावेत, महिलांना पाहुणे वाढले कि स्वयंपाक कसा पुरवायचा, कर्मचाऱ्यांना वरिष्ठांशी बोलताना ताण येतो. एवढेच नाही तर क्रिकेटचा सामना बघतांना सचिन शून्यावर बाद झाला तरी अनेकांना ताण येतो. भूतकाळातील अप्रिय घटना, संवाद साधता न येणे इ.
कारणांमुळेही ताण येऊ शकतो.
ताण निर्माण करणाऱ्या घटकांमध्ये आणखी एका महत्त्वाच्या व मूलभूत घटकाचा विचार केला पाहिजे, तो म्हणजे `आध्यात्मिक घटक'. रज-तम कणांची निर्मिती हा व्यक्तीगत तसेच सामाजिक स्तरावर तणाव निर्मितीचे मूळ कारण असलेला घटक आहे.
स्वार्थ, आळस, निष्क्रियता, हिंसाचार ही रज-तमांची दृष्य लक्षणे आहेत. तर सत्त्वकणांमुळे आनंद, समाधान, शांती याचा अनुभव येतो. आपणही ते कसे अनुभवू शकतो ते पाहूया.
तणावाचे परिणाम -
आपल्यापैकी अनेकांनी ते कधी ना कधी अनुभवलेले असतील.
तणावामुळे पित्त वाढणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, दमा, रक्तदाब, मधुमेह इ. विकार होऊ शकतात. तसेच अति राग येणे, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण, कशातच रस न वाटणे, सतत दु:खी रहाणे असे मानसिक त्रास होऊ शकतात. तणावग्रस्त व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते. ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही, स्वत: आनंदी राहू शकत नाही व इतरांनाही आनंद देऊ शकत नाही.
तणाव कोणालाही नको असतो, म्हणून तो दूर करण्याचे विविध प्रयत्न आपण करतो. झोप घेणे, सहलीला जाणे, मसाज घेणे, मानसोपचारतज्ञांकडे जाणे इ. उपाय आपण करतो पण त्यांचा उपाय थोडा काळ टिकतो व नंतर पुन्हा आपण तणावग्रस्त होतो. काही
जण तणाव दूर करण्यासाठी सिगारेट, दारु यांसारख्या व्यसनांचा आधार घेतात परंतु त्याचा अंमल असे पर्यंतच ताण दूर झाल्यासारखे वाटते. नंतर ताण पुन्हा येतो. त्यामुळे हे उपाय बाह्य असून वरवरचे आहेत असे लक्षात येते.
तणाव दूर करण्याचा कायमस्वरूपी उपाय जाणून घेण्यापूर्वी आपण ज्या मनावर ताण येतो त्या मनाचे कार्य कसे चालते -
मनाचे कार्य
आपल्या बाह्यमनामध्ये आपल्याला ज्या गोष्टींची जाणीव असते, त्याविषयी विचार सुरू असतात. उदा. आता आपण ऐकत असलेला विषय बाह्यमनाला समजतो आहे, तर अंतर्मनात आपण आत्ता ज्याचा विचार करत नाही, असे अनेक संस्कार असतात. उदा.
आपले घर, पत्ता, रस्ता, कुटुंबीय, करायची कामे इ.
खरेतर मन असे दाखवता येत नाही; पण मनाचे कार्य समजून घेण्यासाठी आपण मनाची आकृती काढूया -
आपल्या मनाचा एक छोटा भाग १० टक्के म्हणजे वाह्यमन व मोठा भाग ९० टक्के म्हणजे अंतर्मन. बाह्यमन व अंतर्मन यामध्ये एक पातळ पडदा असतो ज्यामधून विचारांची ये-जा सुरू असते. बाह्यमनातील विचारांची आपल्याला जाणीव असते; परंतु अंतर्मनातील
विचार बाह्यमनात येईपर्यंत आपल्याला त्यांची जाणीव नसते. बाह्यमनातील विचार अंतर्मनात जाऊन त्याचा ठसा उमटतो. एखादा विचार बरेच वेळा अंतर्मनात गेला की त्याचा संस्कार बनतो. संस्कार प्रबळ बनून त्याचे केंद्र बनते. अंतर्मनातील संस्कार केंद्राकडून बाह्यमनात विचारांच्या स्वरूपात संदेश पाठवले जातात व त्यानुसार आपण कृती करत असतो.
आपल्या मनामध्ये असलेली काही महत्त्वाची संस्कार केंद्रे व त्यांचे कार्य आपण समजून घेऊया -
वासना केंद्र -इच्छा निर्माण करते.
आवड-नावड केंद्र - आवड-नावड व्यक्त करते.
स्वभाव केंद्र - व्यक्तीचा स्वभाव निश्चित करते.ी
देवाणघेवाण -हिशोब केंद्र - त्र+णानुबंधानुसार देवाण - घेवाण हिशोब फेडून घेते.
वैशिष्टय केंद्र - व्यक्तीचे वैशिष्ट्य निश्चित करते.
(नोकरीचे उदाहरण देऊ शकतो.)
शिक्षण घेत असतानांच आपल्याला आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी हवी अशी इच्छा वासना केंद्रात निर्माण होते, मॅनेजरचेच पद हवे असे आवड- नावड केंद्र सांगते. मग आपल्या स्वभावानुसार(उदा. कंजुष /उधळया, कष्टाळू््/ कामचुकार) आपण प्रवास कसा करणार,
चारचाकी, दुचाकी कि लोकलने याचा विचार करतो. नोकरी मिळाल्यावर तिथे काम करत असतांना आपली वैशिष्टये दिसून येतात. कामाच्या ठिकाणी ज्यांच्याशी आपले देवाण-घेवाण हिशोब आहेत असेच सहकारी आपल्याला भेटतात व गेल्या जन्मांचे हिशोब फिटतात.
आता याच प्रसंगात असणाऱ्या व्यक्तीला ताण कसा येतो ते पाहूया, नोकरी हवी असे म्हटल्यावर नोकरी मिळाली नाही, तसेच आवडते काम करायला मिळाले नाही तर ताण येतो. आपल्या स्वभावाच्या विरुध्द वागावे लागले म्हणजे उदा. सडेतोड बोलण्याचा स्वभाव
असूनही वरिष्ठंाचे ऐकून घ्यावे लागत असेल तर ताण येतो. आपले वरिष्ठ तसेच आपले सहकारी यांच्याशी आपली असलेली देवाण-घेवाण; यामुळे जर ते वाईट वागत असतील तरीही ताण येतो. कामासाठी आवश्यक वैशिष्टय आपल्याकडे नसेल किंवा आपले वैशिष्टय
तेथे वापरता येत नसेल तर त्याचाही ताण येऊ शकतो.
ताण आला की मन दु:खी होते आणि आपल्यापैकी कोणालाच दु:ख नको असते. आपण दु:ख दूर करण्याचा आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. चांगले शिक्षण घेतो, नोकरी मिळवतो, लग्न करतो. आपली नोकरी किंवा आपले कौटुंबिक जीवन
आपल्याला आनंदाची खात्री देते का? आपण आजूबाजूला पाहिले तर असे दिसते की सुशिक्षित आणि अशिक्षित हे सारख्याच प्रमाणात दु:खी असतात. त्यांच्या दु:खाची कारणे फक्त निरनिराळी असतात.
आपण सर्वजण खूप दु:खी नसतीलही; पण आपण कायमच आनंदी असू याची खात्री देऊ शकतो का ? आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असा प्रचंड शारीरिक, मानसिक व आत्मबळाचा साठा आपल्याकडे आहे का ?
आपल्यापैकी प्रत्येकालाच तणावमुक्त व आनंदी व्हावे असे का वाटत असते ? तर आपला आत्मा हा ईश्वराचाच अंश आहे. आणि ईश्वराचा गुणधर्म आहे आनंद. त्यामुळे आपल्या अंतर्मनात ही जाणीव असते कि सर्वोच्च असा आनंद आहे. आपण तो मिळवण्यासाठी धडपडत असतो; परंतु आपण खूप मोठी चूक करतो. आपण आनंद आत शोधण्याऐवजी बाहेर शोधतो. देवाने मोठी गंमत केली आहे आपले डोळे बाहेरच्या बाजूला ठेवले आहेत आणि आनंद आत. मग हे बाहेरचे जग आपल्याला कायमस्वरूपी आनंद का नाही देऊ शकत ? तर ते जग कायम बदलत असते.
तणावातून कायमचे मुक्त होऊन आनंदा व्हायचे असेल तर आपल्याला तणावरहित व आनंदी असलेली गोष्ट मिळवली पाहिजे. या जगामध्ये आनंदी असे फक्त ईश्वरी तत्त्वच आहे. ईश्वर संपूर्ण तणावरहित आहे. जशी साखरेपासून गोडी वेगळी करता येत नाही तसा
ईश्वरापासून आनंद वेगळा करता येत नाही. ईश्वर तर अदृश्य असतो; मग त्याला कसा शोधायचा, तर नामानेच ईश्वर भेटू शकतो, असे संतांनी सांगून ठेवले आहे.
नामजपाचा आपल्या मनावर काय परिणाम होतो, ते आपण समजून घेऊया. आपण जेव्हा ईश्वराचे नाम घेतो तेव्हा हळूहळू त्याचा संस्कार तयार होतो. हा संस्कार मोठा झाला की इतर संस्कारांप्रमाणेच मनामध्ये ईश्वरविषयक विचार प्रक्षेपित करतो. तसेच इतर
संस्कारकेंद्रांकडून प्रक्षेपित होणाऱ्या तणावाच्या विचारांचा प्रभाव कमी करतो. मनात निर्माण होणाऱ्या अनावश्यक व नकारात्मक विचारांना मागे टाकतो. जशी कागदावर आखलेली रेघ तिला पुन्हा स्पर्श न करता लहान करायची असेल तर रेघेच्या शेजारी दुसरी मोठी रेघ काढली कि झाले. पहिली रेघ आपोआपच लहान होते. त्याचप्रमाणे तणावाच्या विचारांना मागे सारणारे नामजपाचे विचार वाढले की तणाव कमी होऊ शकतो. मग हळूहळू त्या संस्कारकेंद्राचे कार्य मंदावू लागते.
नामजप ईश्वराचा असल्याने अंतर्मनातील केंद्रात त्याचे पावित्र्य व चैतन्य पसरून मन तणावमुक्त होण्यास मदत होते. मानसोपचारतज्ञ आपल्या मनातील तणाव, निराशा इ. घालवण्यासाठी आपल्याला र्ऊीीहिर्ल्ग्त्ग्ैी (शांत करणारी औषधे) देतात. त्यामुळे अंतर्मनात जरी तणावाचे विचार असले तरी त्यांची मनाला जाणवणारी संवेदना बोथट होते व काही काळ तरी रुग्ण त्या विचारांपासून दूर रहातो. याच उद्येशाने काही जण तणावापासून दूर जायला सिगरेट किंवा दारूचा आधार घेतात व व्यसनाधीन होतात.
नामजपाने तणाव निर्माण करणाऱ्या विचारकेंद्रातील विचार कायमचे बदलले जातात, त्यामुळेे त्रास मुळापासून दूर केला जातो. एवढेच नव्हे तर नामजपाने मन सक्षम बनते. मनाला ईश्वरी चैतन्य मिळाल्याने अनावश्यक व नकारात्मक विचार कमी होऊन एकाग्रता वाढते. संशोधनाअंती असे दिसून आले आहे कि ५ मिनिटांचेे मानसिक अस्वास्थ्य किंवा तणावाने २ तास शारीरिक श्रम केल्याइतकी शक्ती वापरली जाते व वाया जाते. ही वाया जाणारी ऊर्जा नामजपाने वाचवली जाऊन इतर महत्त्वाच्या कामांसाठी उपयोगी पडू शकते.
नामजप कोणत्या देवतेचा करावा असा प्रश्न आपल्यापैकी काही जणांच्या मनात निर्माण झाला असेल.
हिंदुनी त्यांच्या कुलदेवतेचा नामजप करावा. उदा. कुलदैवत जर गणेश असेल तर,।।श्री गणेशाय नम:।। , कुलदेवता जर भवानी असेल तर ।। श्री भवानीदेव्यै नम:।। आणि कुलदेवता जर माहिती नसेल तर ।।श्री कुलदेवतायै नम:।। असा नामजप करावा. इतर
पंथीयांनी आपापल्या पंथांनुसार नामजप करावा.
मुस्लिम- या अल्लाह,
ख्रिस्ती -कॅथलिक-हेल मेरी,
प्रोटेस्टंट -हेल जीझस्
शीख- वाहे गुरु
जैन -ॐ नमो अरिहंताणं
बौध्द -नमो बुद्धाय
या प्रकारे नामजप करू शकतात. आपल्या मनाची क्षमता वाढवणाऱ्या आणखी काही गोष्टी म्हणजे सत्संग, सत्सेवा. सत्संगातील वातावरण अतिशय सात्त्विक असते; त्यामुळे त्या वातावरणात नामजप चांगला होतो. आनंद, समाधान, शांतता, त्यागी वृत्ती इ.सत्त्वगुणाची लक्षणे आहेत. केवळ साधना केल्यानेच सत्त्वगुण वाढतो व सत्त्वगुणामुळे मनाची क्षमता वाढते. मन व बुध्दी यांचे सामर्थ्य सत्त्वगुणामध्ये सात्त्विकतेमध्ये सामावलेले आहे. सात्त्विकतेमध्ये आनंद आहे व क्षमता वाढते याचे एक छोटेसे उदाहरण पाहू. ज्या ठिकाणी आपण काम करतो तेथील वातावरण जर गोंगाटाचे, अव्यवस्थित, अस्वच्छ असेल तर आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊन आपल्या कार्यक्षमतेवर, निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. याउलट जर कार्यालयातील वातावरण शांत, नीटनेटके, स्वच्छ असेल म्हणजेच अधिक सात्त्विक असेल तर काम करण्यात उत्साह वाटून आपली क्षमता वाढण्यास मदत होते व आनंदही मिळतो.
दैनंदिन जीवनात सत्त्वगुण वाढावा तसेच सर्व समाजाने तणावमुक्त व आनंदी रहावे यासाठी आपल्या संस्कृतीने अनेक उपाय सांगितले आहेत. आपले त्र+षी-मुनी द्रष्टे होते. त्यांनी वर्षभर काही ना काही सण, उत्सव किंवा काते करायला सांगितली आहेत. आपण
ईश्वरासाठी व ईश्वराची आठवण काढत कृती केल्याने सत्त्वगुण वाढण्यास मदत होते.आपल्या दिनचर्येमध्येही सकाळी प्रार्थना, सायंकाळी देवासमोर दिवा लावून परवचा म्हणणे इ. गोष्टींचा समावेश केला.
आजच्या लेखात आपल्याला कळलेच असेल कि आपण आनंदी रहायचे कि तणावात ते आपल्याच हातात असते. असे जर आहे तर मग आपण आनंदीच का नाही रहायचे ! आनंद दिल्याने वाढतो, त्यामुळे आपल्याला गवसलेली आनंदी रहाण्याची गुरुकिल्ली आपण इतरांनाही दिली पाहिजे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल कि ही गुरुकिल्ली द्यायची कशी ? आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी यांना आपण कायमचे आनंदी कसे रहायचे हे सांगू शकतो. व कायमचे तणावमुक्त होऊया.
वरील सर्व माहिती खालील ग्रंथामधून घेतली आहे -
१ . स्वभावदोष-निर्मूलन व गुण-संवर्धन
२. अहं-निर्मुलनासाठी साधना
(संकलक - डॉ. जयंत बाळाजी आठवले )
Comments
जे देव/धर्मच मानत नाहीत त्यांनी..?
नामजप कोणत्या देवतेचा करावा असा प्रश्न आपल्यापैकी काही जणांच्या मनात निर्माण झाला असेल.
जे देव/धर्मच मानत नाहीत त्यांनी..?
ज्यांची कशावरच श्रद्धा नाही त्यांनी..?
;)
हलकेच घ्या
त्यांनी सायलेन्सर नसलेल्या एम८० गाडीचा ऍक्स्लेटर पिळल्यावर येतो ना तसा आवाज काढावा ;-) घुईईइई टारर्र्
अभिजित...
त्यांचे 'देव' पण अनेक आहेत...
खालील कोणतेही नाम वापरावे..
१. जय अंनिस
२. लागू नमः
३. विद्न्यान नमः
आणि नामजपावरच विश्वास नसेल तर बाजारात अनेक औषध आहेत्. पैसे टाकून् विकत घ्या.
ह. घ्या.
मनाची आकृति
र्ऊीीहिर्ल्ग्त्ग्ैी हे असे वाचावे Tranquilizer
मनाची आकृति
चित्रगुप्ता ही कोणती भाषा ?
मन दिसत नाही म्हणुन मनाची नुसती चौकट काढून ठेवली की काय ?
अन भाषाही देवांची लिहिली वाटतं, आम्हा इहलोकात वास्तव करणा-यांच्या भाषेत लिव्हा की राव काही तरी :)
चांगला
३/४ लेख आवडला आणि सर्वांना उपयुक्त माहिती आहे. उपायाच्या भागाबद्दल मतभेद होऊ शकतील पण या पद्धतीचा फायदा बर्याच जणांना होत असावा असेही वाटते.
उत्तम लेख
बर्याचदा गुंडोपंतांच्या नैराश्याचं मूळ या लेखाच्या विषयात असतं
अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.
चांगले
संकलन चांगले वाटले. पुढच्या लिखाणाला शुभेच्छा.
आज दोन- दोन लेख असे मानसशास्त्राशी संबंधित कसे काय आले?
मुद्दे पटण्यासारखे
लेख चांगला आहे.
सर्व मुद्दे पटण्यासारखे आहेत. फक्त नाम-महीम्यावर खालील भाष्य करायचा मोह आवरला नाही:
बाकी तणाव होण्याची वरवरची कारणे अनेक असतात काही प्रासंगीक आणि साहजीकपण असतात. तणाव रामाला आणि कृष्णाला चुकला नाही, तर तो आपल्याला कसा चुकेल. फक्त चुकू शकलेच तर त्यात गुंतून जाण्याचा भाग.
हिंदू तत्वज्ञानातील अजून काही आवडीचे शब्द म्हणजे: सत्त्व, रज आणि तम. वास्तवीक हे तीन ही गूण प्रत्येकाच्या अंगात असतात. सात्विक म्हणजे चांगले हे इतके डोक्यात बिंबवले असते की त्याचा अर्थ न समजावून घेता केवळ सात्विक होण्याच्या मागे माणसे लागतात. पण विवेकानंदांनी म्हणल्याप्रमाणे, बर्याचदा वरून सात्विकतेचा भाव असलेली माणसे ही आतून (काही काम न केल्याने) तामसी झालेली असतात. त्यांना वाटायचे की भारत(भारतीय) आत्ता (त्यांच्या वेळेस) तामसीकतेतून जात आहे. परीणामी ते म्हणायचे की भारताला रजोगुणांची अवशक्यता आहे. तरूणांनो तुम्ही धर्माचे ज्ञान फूटबॉलच्या मैदानावर घ्या असे ते म्हणाले होते. (बंगाल्यांनी त्याचा शब्दशः अर्थ घेतला असावा!). सत्व -रज- तमांची माहीती सोप्या भाषेत विनोबांमुळे गीताईतून वाचणे सोपे आहे (आणि धार्मिक म्हणून नाही तर अगदी जगण्याचे तत्वज्ञान म्हणून वाचण्यासारखे आहे) आणि येथे चिकटवणे "विकी" मूळे शक्य झाले आहे:
प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व-रजस्-तम । ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती ॥१४- ५ ॥
त्यांत निर्मळ ते सत्त्व ज्ञान आरोग्य वाढवी । मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चि लेववी ॥ १४-६ ॥
रज ते वासना-रूप तृष्णा आसक्ति वाढवी । आत्म्यास कर्म-संगाने टाकिते जखडूनि ते ॥१४- ७ ॥
गुंगवी तम सर्वांस अज्ञान चि विरूढले । झोप आळस दुर्लक्ष ह्यांनी घेरूनि बांधिते ॥ १४-८ ॥
सुखात घालिते सत्त्व रज कर्मात घालिते । ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम ॥ १४-९ ॥
अन्य दोघांस जिंकूनि तिसरे करिते बळ । असे चढे कधी सत्त्व कधी रज कधी तम ॥ १४-१० ॥
प्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे । देहांत पसरे तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १४-११ ॥
प्रवृत्ति लालसा लोभ कर्मारंभ अशांतता । ही देही उठती तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १४-१२ ॥
अंधार मोह दुर्लक्ष अपप्रवृत्ति चहूकडे । देहांत माजली तेंव्हा जाणावे तम वाढले ॥ १४-१३ ॥
वा!
सुखात घालिते सत्त्व रज कर्मात घालिते । ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम
प्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे । देहांत पसरे तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १४-११ ॥
प्रवृत्ति लालसा लोभ कर्मारंभ अशांतता । ही देही उठती तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १४-१२ ॥
अंधार मोह दुर्लक्ष अपप्रवृत्ति चहूकडे । देहांत माजली तेंव्हा जाणावे तम वाढले ॥ १४-१३ ॥
सुंदर ओळी :) .. धन्यवाद!
-ऋषिकेश
दुरूस्ती...
धन्यवाद.
मी आत्ता परत वाचताना लक्षात आले की ॥ १४-११ ॥ मधे मुद्रण दोष आहे आणि मी चिकटवताना तो माझ्या ध्यानात आला नाही. प्रत्येक गुणाचा प्रभाव वाढल्यावर कसे वाटते हे सांगणार्या या ओव्या आहेत. त्यामुळे पहीली ओवी ही सत्व गुणासाठी होती.
प्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे । देहांत पसरे तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १४-११ ॥
च्या ऐवजी
प्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे । देहांत पसरे तेंव्हा जाणावे सत्व वाढले ॥ १४-११ ॥
असे वाचावेत.
क्षमस्व.
चांगला
लेख चांगला आहे. वरीलप्रमाणेच ३/४ आवडला. फक्त मानसोपचार तज्ञांबद्दलचे मत पटले नाही. ते फक्त औषधे देत नाहीत. मानसोपचार तज्ञ मानसोपचारातील कुठल्या आयडिऑलॉजीचा आहे आणि कोणता रोग आहे यावर उपचारपद्धती अवलंबून असते. औषधे रुग्णाला स्वतःला बदलण्यासाठी सामर्थ्य हवे असते त्याला मदत करतात.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
नामस्मरण - गुची, प्राडा, अर्मानी
लेख चांगला आहे, आवडला.
अर्थातच, शेवटचा नामजपाचा भाग जसाच्या तसा पचवणे कठिण गेले. माणसाला ईश्वराच्या स्मरणानेच तणावमुक्त होता येते हे सत्य नाही असे वाटते. माणसाला चांगल्या गोष्टींचे स्मरण केल्याने तणावमुक्त होता येते. ईश्वराची गणना अर्थातच चांगल्या गोष्टींत (ऍज इन पॉझिटीव थिंकिंग)होते.
नामस्मरणाचा मुख्य उद्देश असा की चांगल्या गोष्टींचे स्मरण केल्याने त्यात मन रमते, इतर ताणांचा विसर पडतो. मन एकाग्र बनते आणि मनाला शांती लाभते.
हल्लीच एका पाहिलेल्या पोरासोरांच्या चित्रपटात एक कॉलेज कन्यका तणावमुक्त होण्यासाठी "गुची, प्राडा, अर्मानी" असे शब्द उच्चारते आणि तिला त्याचा फायदा होतो. यातील विनोदाचा भाग सोडला तर मेडिटेशन करताना तुमच्या आवडत्या एखाद्या निसर्गरम्य स्थळावर तुम्ही आहात असा विचार मनात आणणे आणि त्याचे स्मरण करणेही मनाला शांती देते.
आम्ही
हल्लीच एका पाहिलेल्या पोरासोरांच्या चित्रपटात एक कॉलेज कन्यका तणावमुक्त होण्यासाठी "गुची, प्राडा, अर्मानी" असे शब्द उच्चारते आणि तिला त्याचा फायदा होतो.
आम्ही शकिरा, शकिरा असे म्हणतो. लगेच गुण येतो. ;)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.
:-)
:-ड्
( राजेंद्र, शाब्दीक प्रतिक्रीया देणेच शक्य नाहीये, व्हिज्युअलच शक्य आहे)
-निनाद
या पुर्वीची चर्चा
या ठीकाणी या पुर्वी चर्चा झाली होती .ऋषिकेशचा प्रस्ताव होता.
प्रकाश घाटपांडे
हा ॠषिकेश
हा ॠषिकेश मी नव्हे बर तो ॠषिकेश आणि मी ऋषिकेश ;)
-(खुलासेवार) ऋषिकेश