मानसिक तणाव - आपले मत मांडा

सध्यच्या अत्यंत स्पर्धात्मक जीवनात तणाव टाळण्यासाठी काय करता येईल, ते कोणी सांगू शकेल काय? अनेक तणावांमुळे माझ्यासारख्या नवतरुणांनाही रक्तदाब
आदी विकार जड्ण्याची तीव्र शक्यता निर्माण होते, आपले प्रतिसाद उपकारक ठरतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

माझं मत..

राम राम,

रोजची धावपळ, ताणतणाव, ह्या गोष्टी प्रत्येकाच्या वाट्याला थोड्याफार प्रमाणात येताचंच. तश्या त्या माझ्याही वाट्याला येतात. पण त्यातल्या त्यात वेळ काढून उत्तम संगीत ऐकणे हा व्यक्तीशः माझ्याकरता सर्व ताणतणावांवर एक अत्यंत प्रभावशाली उपाय आज पर्यंत तरी ठरला आहे.

सध्यच्या अत्यंत स्पर्धात्मक जीवनात तणाव टाळण्यासाठी काय करता येईल, ते कोणी सांगू शकेल काय?

मी काय करतो हे माझ्यापुरतं सांगतो. चालेल का आपल्याला? ;)

माझ्या मते माणसाने आपल्या आवडीनिवडी वेळात वेळ काढून जोपासल्या पाहिजेत. त्यामुळेच आजच्या स्पर्धात्मक दुनियेतही माणसाला उमेदीने जगता येतं असा माझा अनुभव आहे.

संगीत आणि खाणं या माझ्या अगदी जिव्हाळ्याच्या आवडीनिवडी. रोजचे पोटापाण्याचे उद्योग सांभाळून त्या मी मनोमन जोपासतो. वेळात वेळ काढून भरपूर गाणं ऐकतो. कधी आयुष्याकडे गंभीरतेने बघायला लावणार्‍या लतादीदी ऐकतो, तर सघर्ष करत पण हसतखेळत आयुष्य कसं घालवावं हे ज्यांच्या गाण्यातून शिकता येतं त्या आशाताईंना ऐकतो. आयुष्यातला दर्द समजून घ्यायचा असेल तर किशोरदा ऐकतो. गाणं हे आमच्या देवगडी हापूसच्या आंब्यासारखं किती गोड असतं ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर "तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे" या सारखी बाबुजींची गाणी अगदी मनसोक्त ऐकतो. गाण्यातला ब्रह्मस्वर समजून घ्यायचा असेल तर एखाद दिवशी अगदी भरपूर अण्णांचं गाणं ऐकतो!

शिवाय कुणाकुणाच्या प्रत्यक्ष मैफलींना शनिवार-रविवार अगदी अवश्य हजेरी लावतो. मग तो कुणी बुजुर्ग गवई असू दे वा 'या तात्या' असं म्हणून भर मैफलीत पुढे बसवणारा राम देशपांडेसारखा अथवा रघु पणशीकरसारखा, अथवा राहूल देशपांडेसारखा कुणी तरूण कलाकार असू दे!

काहीच नाही जमलं तर मित्रमंडळी गोळा करून स्वतःच मनसोक्त गात बसतो.

एखाद्या संध्याकाळी आईशी भरपूर गप्पा मारतो. तिचे पाय चेपून देतो. पाय चेपून दिल्यावर "खूप बरं वाटलं रे" असं जेव्हा आई म्हणते तेव्हा तिच्या चेहेर्‍यावर कमरेवर हात ठेवलेला प्रसन्न मुद्रेचा विठोबा मला घरबसल्या दर्शन देतो. त्याकरता मला पंढरपुरालाही जावं लागत नाही!

बर्‍याचदा उपक्रम सारख्या संकेतस्थळावर येऊन माफक हुशार्‍या करतो, कंपूबाजी करतो, तर कधी प्रतिसादांचं राजकारण खेळत बसतो. उपक्रमाच्या सभासदांशी भांडतो, तर कधी त्यांच्या गळ्यात गळे घालतो! ;)

आता खाणं-पिणं!

मनात येईल ते खातो. कुठलाही पदार्थ खाण्याची इच्छा झाली की ती माझी मीच पुरी करतो. मग ती भैय्याकडची पाणीपुरी असो, वा मामलेदारची मिसळ असो, साबुदाण्याची खिचडी असो, वा मालवणी मटण वडे असोत. एखाद्या दिवशी आधी ठरवून मित्रमंडळींना घरी बोलवून यथासांग गाण्याचा आणि खाण्याचा कार्यक्रम करतो! खूप धमाल येते. समाजाचं काही देणं लागतो या भावनेने हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचं माझ्या कुवतीप्रमाणे काम करतो.

एखाद्या संध्याकाळी कधी मूड आला तर एकटाच टीचर्सच्या दोन पेगस् च्या संगतीत "आत्तापर्यंतचं आयुष्य कसं गेलं? कशी धमाल-मजा केली, दु:खाचे प्रसंग कसे भोगले, कुठल्या प्रसंगी कोण कसं वागलं, आपण कसे वागलो, आपलं काय चुकलं, काय बरोबर होतं?" याचे स्वतःशीच हिशोब लावत बसतो. मजा येते!! ;)

आता आपणच मला सांगा ऋषिकेषराव, या सगळ्यात ताणतणावाला जागा उरली कुठे? ;)

आणि मुख्य म्हणजे "गेला दिवस आपला, उद्याचं माहीत नाही!" हे तत्व जोपासून आयुष्याला ज्या वाटेने जायचं असेल त्या वाटेने जाऊ देतो!

अहो झाला एखादा जोरदार भुकंप, किंवा देवगडच्या अथवा मुंबईच्या किनार्‍यावर कुणा सुंदरीवर लाईन मारता मारता आली एखादी मोठ्ठी सुनामी तर घ्या काय?

कसचा तात्या अन् कसचं काय? !! ;)

खरं की नाही?

आपला,
(जिंदादील!) तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

सुरेख!

तात्या,

अतिशय सुरेख प्रतिसाद. तुम्ही किती छान रितीने simplify करून सांगितले आहे!

एखाद्या संध्याकाळी आईशी भरपूर गप्पा मारतो. तिचे पाय चेपून देतो. पाय चेपून दिल्यावर "खूप बरं वाटलं रे" असं जेव्हा आई म्हणते तेव्हा तिच्या चेहेर्‍यावर कमरेवर हात ठेवलेला प्रसन्न मुद्रेचा विठोबा मला घरबसल्या दर्शन देतो. त्याकरता मला पंढरपुरालाही जावं लागत नाही!

वा तात्या, शब्द नाहीत!

ईश्वरी.

ताणतणाव

ताण तणाव घालवण्यासाठी मी तात्यांचे, गुंडोपंतांचे, सर्किटरावांचे आणि आदी उपक्रमींचे प्रतिसाद मनोभावे वाचते. मनोभावे या साठी की एखाद्या मिश्किल प्रतिसादाला जर हसू आलं तर आजूबाजूला कोण आहे नाही याची चिंता न करता मनसोक्त हसते. ताण तणाव, कपाळावरच्या आठ्या सगळं नाहिसं होतं.....

पल्लवी

सुंदर प्रतिसाद.

मनावरचा ताणतणाव घालवण्याकरता आपल्या आवडीचे संगीत ऐकणे हा निश्चितच एक प्रभावशाली उपाय आहे. मैदानी खेळ आणि वाचनाची आवड हेही चांगले उपाय आहेत असे वाटते.

तात्या,

अतिशय सुरेख आणि नेहमीप्रमाणे उत्स्फुर्त लेखन. प्रतिसाद खूपच आवडला.

अवांतरः

तुम्ही वादाच्या भोवर्‍यात सापडता आणि तुमचा असा एखादा उत्तम लेख किंवा प्रतिसादच तुमची या सगळ्यातून पुन्हा एकदा सोडवणूक करतो हेच खरे! विरोधकांची काळजी न करता असेच उत्तम आणि मनमुराद लिहीत रहावे ही विनंती!

माधवी.

तात्या छान लिहिलेय!

सलाम तात्या!

तुंम्ही तर वर्मच सांगितले!
सुरेश भट लिहुन गेले आहेत!
"निमित्तास माझे गाणे निमित्तास टाळी"

आपला
गुंडोपंत

आपणच कारणीभूत असतो!

ताण तणाव हे हल्लीच्या जीवनाचे एक अविभाज्य अंग होऊन बसले आहे;पण त्यासाठी रडत न बसता त्यावर मात करता यायला हवेय. बरेचसे उपाय तात्यासाहेबांनी आपल्या नेहमीच्या जिंदादिल प्रतिसादात सुचवलेच आहेत.त्याचा जरूर विचार करावा.

'हाती नाही येणे हाती नाही जाणे
हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे....... असे तत्व आत्मसात केलेत तर जीवनातल्या बर्‍याचश्या ताणतणावातून आपण वाचू शकता. एव्हढेच नाही तर आपल्या बरोबरच्या अन्य लोकांच्या जीवनातही आनंद फूलवू शकता.हसणे आणि हसवणे ही एक कला आहे. वरवर सोपी वाटली तरी तशी कठीणच आहे. ती कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा म्हणजे मग सगळे जीवनातील ताणेबाणे रंगीबेरंगी दिसायला लागतील. आपल्याच फजितीवर अथवा पराभवावर हसता आले पाहिजे. अपयशाने खचून न जाता पुन्हा तितक्याच सहजतेने प्रयत्न करायचा. म्हटले तर सगळेच सोपे!म्हटलेच तर सगळे कठीण आहे! सोपे आणि कठीण हे आपल्या मनाचेच खेळ असतात. आपल्या मनाला आपण कसे घडवतो,त्यावर कसे नियंत्रण मिळवतो त्यावर सगळे यशापयश अवलंबून आहे. असो.
थोडक्यात टेंन्शनचे टेंन्शन घेऊ नका आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर!

ऍरोमाथेरपी

ऍरोमाथेरपी/सुगंधचिकीत्सा याच्यातील लव्हेंडर/जिरेनियम तेल कोमट अंघोळीच्या पाण्यात चार थेंब घातले की त्या पाण्याने अंघोळ करून चांगले वाटते.(तेल अगदी पाणी अंगावर घेण्याच्या वेळीच टाकावे, अन्यथा ते उडून जाते.ही तेले विदेशात मेडिकल दुकानात व पुण्यात पार्लरचे साहित्य मिळेल अशा जागी मिळतात.तुळशीबागेत जी नकली अलंकार आदीची गल्ली आहे त्यात मोठ्या दुकानांत मिळतात.) तसेच रात्री झोपताना पायाला खोबरेल तेल काशाच्या वाटीने चोळून झोपल्यास मिळणारी झोप चांगल्या दर्जाची मिळते.
तणाव कमी करण्याचा सुंदर उपाय म्हणजे एक छानसे विनोदी पुस्तक(माझी शिफारस : पुल असामीअसामी, मंगला गोडबोले झुळूक,पोटाचा प्रश्न, दिलीप प्रभावळकर गुगली,हसगत,अनुदिनी, शिरीष् कणेकर फिल्लमबाजी,चहाटळकी,एकला बोलो रे, वेचक शिरीष कणेकर,आर्ची(मी रद्दीतून विकत घेते)) अर्धा तास वाचावे. तसेच रात्री जेवण झाल्यावर पत्ते (मेंढीकोट,बदाम सत्ती इ. हे शक्यतो दुसर्‍या दिवशी सुट्टी असेल अशा दिवशी खेळल्यास उत्तम.) तसेच आठवड्यातून/महिन्यातून एकदा मित्र मैत्रिणींना भेटावे.
ताण तर पाचवीला पुजलेला आहेच हो. पण तो घेऊन ताबडतोब उतरवता आला तर उत्तम.

मी वापरते.

ताण-तणाव मी ही त्रासून जातो.

एखाद्या संध्याकाळी आईशी भरपूर गप्पा मारतो. तिचे पाय चेपून देतो. पाय चेपून दिल्यावर "खूप बरं वाटलं रे" असं जेव्हा आई म्हणते तेव्हा तिच्या चेहेर्‍यावर कमरेवर हात ठेवलेला प्रसन्न मुद्रेचा विठोबा मला घरबसल्या दर्शन देतो. त्याकरता मला पंढरपुरालाही जावं लागत नाही!

तात्या फारच मस्त.
एखाद्या संध्याकाळी कधी मूड आला तर एकटाच टीचर्सच्या दोन पेगस् च्या संगतीत "आत्तापर्यंतचं आयुष्य कसं गेलं? कशी धमाल-मजा केली, दु:खाचे प्रसंग कसे भोगले, कुठल्या प्रसंगी कोण कसं वागलं, आपण कसे वागलो, आपलं काय चुकलं, काय बरोबर होतं?" याचे स्वतःशीच हिशोब लावत बसतो. मजा येते!! ;)

इथून तर हललोच नाही.

आता मानसिक ताणतणाव.अनेक कामे शिल्लक असली की त्याचा निपटारा करताना,माझी मात्र चिडचिड होते.तेव्हा मीही मित्रांबरोबर गप्पा मारतो,गाणी ऐकतो.नाहीच जमलं तर घर डोक्यावर घेणा-या पोरांना कारण नसतांना ठोकून काढतो.आणि पश्चात्तापाने शांत होतो.

मानसिक तणाव

हा माणसाला वेगवेगळ्या कारणाने पडत असावा. यांत केवळ तरुण मंडळीच असावीत असे वाटत नाही. लहान मुलांनाही दप्तराची ओझी, न झेपणारा गृहपाठ, स्पर्धा, वेगवेगळे ट्युशन क्लासेस आणि बाकीच्या शिकवण्या यांनी खूपच ताण येतो असे सांगितले जाते.

वृद्धांना हाच ताण वार्धक्य, एकटेपणा, दुखणे-खुपणे, आजार, शरीराच्या मंद होणार्‍या हालचाली, आजूबाजूची झपाट्याने बदलणारी परिस्थिती यामुळे येतो. तरुणांच्या ताणाबद्दल अधिक सांगायची गरज वाटत नाही. :)

मला यावर सर्वात चांगला उपाय वाटतो तो म्हणजे डोक्याला आराम देणे. बरेचदा टिव्ही बघणे, पुस्तके वाचणे हा त्यावर उपाय ठरत नाही. (विरंगुळयाची पुस्तके आणि कार्यक्रम बाद,तो उत्तम उपाय आहे.) डोक्याला आराम देण्यासाठी मैदानी खेळ, व्यायामशाळा, योगसाधना, पोहणे, सायकल चालवणे याचा उपयोग करा.

आभार

आपल्या सर्वांच्या मनापासून आलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
तात्या, अनुताई, प्रियाली यांचा मी विशेष आभारी आहे.

ताणतणाव आणि कोकण भमण

ताण तणाव घालवण्यासाठी, मी मनसोक्त भटकतो. ते ही कोकणासारख्या रम्य प्रदेशात. आणि सर्वात कडी म्हणजे माझ्या बाईक वरुन आणि बरेचदा रात्री. आपण नुसती कल्पना करा की, रात्री १ वाजता आपण महाबळेश्वराच्या घाटातुन पोलादपुर कडे कोकणात उतरत आहोत. कोणाला माहिती आहे, महाबळेश्वरचा घाट पौर्णिमेच्या रात्री कसा दिसतो ते. जा असेच कधी तरी शनिवार- रविवारी. आणि सोमवारी सांगा तुमच्या ताणतणावाबद्द्ल. मी तर आख्खं कोकण पालथं घातलय माझ्या बाईक वरुन, रायगडातल्या मांडव्या पासुन ते थेट, सिंधुदूर्ग - गोव्या जवळच्या रेडीच्या गणपती पर्यंत. धमाल आहे या फिरण्यात. कोकण तसं आहेही खासच. कोकणात फिरल्यावर शिणलेलं डोकं ताजंतवानं नी टवटवीत झालं नाही असं होणं केवळ अशक्य. माझ्या बरोबर फिरुन फिरुन माझ्या सारखेच कोकण वेडे तयार झालेत. त्याच्याशी कोकणाबद्दल नुसत्या गप्पा मारल्याना तरी मन प्रसन्न होतं.
महेंद्र

अरेच्या!

अरेच्या! अजून एक ॠषिकेश इथे दिसतोय. पण हा मी नव्हे ;)

ताण तणाव

मला खालिल प्रश्न पडले आहेत
१) ताण आणि तणाव यात फरक काय?
२) ताण आहे म्हणून आयुष्य आहे ना?
३) ताण ही उर्जा आहे ना?
४) ताण तणावामुळेच सौख्याचे/स्वास्थ्याचे परिमाण समजते ना?
५) संगीत हे ताणातूनच निर्माण होते ना? ( तंतुवाद्य, तबल्याची वादी, ई...)
६) बिग बँग तणावातून झाले ना?
७) धनुष्याच्या प्रत्यंचेवर ताण आला तरच बाण सुटणार ना?
असे अनेक प्रश्न
ताण आहे म्हणून तान आहे. विधायक व विघातक असे प्रमुख विभागणी ताणाची करता येते. सुसह्य आहे तोपर्यंत त्याला कुणी ताण म्हणत नाही, असह्य व्हायला लागला कि तो ताण.
अवांतर- आता जास्त ताण वाचकांना दिला तर ते वाचणार नाहीत
प्रकाश घाटपांडे

 
^ वर