पितृत्व

इंग्रजी मधे एक व्यावहारिक कटू सत्य सांगणारा एक वाक्प्रचार आहे, "Sucess has many fathers, but failure is an orphan." त्याचे मराठीमध्ये सरळ अर्थांतर असे होते की, "यशाचे पितृत्व घेण्यासाठी अनेकजण पुढे सरसावतात, पण अपयश हे नेहेमी पोरके असते." यात "पोरके" अपयश म्हणजे काय? तर जे काही झाले त्याचे "पितृत्व" न घेण्याची वृत्ती.

भारताच्या ज्ञान-अज्ञात इतिहासात कदाचीत याची शब्दशः सुरवात विश्वामित्रांनी केली असावी. निदान तसे तूर्त आपण गृहीत धरूया. मेनकेला मूल होतंय समजताच आपले तपाचे फळ जाण्याचे अर्थातच "स्वतःच्या चुकांनी येत असलेले अपयश" समजून देखील त्यावेळेस कदाचित "महर्षी" या पदवीपर्यंत पोचलेल्या आणि ब्रम्हर्षी होण्याची महत्वाकांक्षा असलेल्या या ज्ञानी माणसाने, पितृत्व नाकारले... सुदैवाने शकुंतलेला कण्व मुनींसारखा मानसपिता मिळाला आणि पुढे घडलेल्या दुष्यंत-शकुंतलेच्या इतिहासामुळे भरत जन्मास आला, असे म्हणतात की त्याच्याच नावाने पुढे हे भारतवर्ष तयार झाले. थोडक्यात आज आपण या भारतवर्षातील वंशज ज्या देशाच्या जन्माच्या मुळाशी एकीकडे ब्रम्हर्षी होण्याची महत्वाकांक्षा तर दुसरीकडे स्वतःच्या अपयशाचे पितृत्व नाकारण्याची वृत्ती आहे.

तसेच मला कायम आठवते ती लहानपणापासून ऐकलेली आणि मनावर कोरली गेलेली एक गोष्ट, "की एका मुलास लहानपणापासून चोरी करायची सवय असते. आई दुर्लक्ष करते. भुरट्या चोर्‍या करता करता तो मोठेपणी दरोडेखोर होतो. हे सर्व होत असताना तो अधूनमधून तुरूंगातपण जात असतो. पण सरते शेवटी जेंव्हा फासावर जायची वेळ येते तेंव्हा मात्र तो त्याच्या आईच्या कानाला चावतो (काही तरी सांगायचे आहे असे सांगून जवळ जाऊन). का, तर तिने लहानपणी त्याला कधी चोरी करणे चांगले नाही हे सांगितले म्हणून... " या गोष्टीचे तात्पर्य असे होते की चांगल्या सवयी लहानपणापासून लागाव्या लागतात आणि त्यात आईवडीलांचा मोठा भाग असतो वगैरे...पण आता मला प्रश्न पडतो की त्याच्या आईचा कितीही दोष मान्य केला तरी, मोठेपणी फासावर जाण्या इतकी कृत्ये करताना स्वतःचे त्याबाबतीतले "पितृत्व" नाकारण्याची वृत्तीच तर त्याला एका अपयशा कडून दुसर्‍या अपयशाकडे नेत शेवटी चुकीच्या मार्गाला लावत फासावर लटकवते?

पुराणातील वांगी पुराणात ठेवूया, पण हा विषय अचानक डोक्यात घोळायचे तत्कालिन कारण हे संतांबद्दल ज्या एकेरी पद्धतीने लिहील्याचे उदात्तीकरण आणि मध्ययुगात भारत मागे पडण्याचे सर्व खापर संतांवर अथवा संतसाहीत्यावर फोडून स्वतःच्या सामाजिक चुकांचे - अपयशाचे पितृत्व नाकारायची वृत्ती. आधीच्या वाक्यात म्हणल्याप्रमाणे हे तत्कालिन कारण आहे. पण हे विषय सातत्याने निघत असतात - कधी जालावर, कधी मित्रांशी बोलताना - तर कधी विचारवंतांच्या परिसंवादात.

प्राचीन भारतात जी उपनिषदे तयार झाली की ज्याला पहिला संवाद म्हणता येईल त्यात प्रश्नोत्तरे आली. शंकाकुशंका आल्या, शंकानिरसने आली, पण त्यावर आधारित तत्वज्ञान तयार करताना जे काही लिहीले गेले ते सकारात्मक होते, समोरच्या व्यक्तीबद्दल नकारात्मक नव्हते. अर्थात वैयक्तिक बाबतीत मानवी स्वभाव धर्माप्रमाणे ते घडले असेल पण सामाजिक पातळीवर नकारात्मक विचार करण्याची सवय नव्हती.

पुढे अनेक दर्शनकार आले, टिकाकार झाले, गौतमबुद्ध होऊन गेला, ज्यांनी प्रस्थापित विचारांना धक्का दिला, नवीन विचार आणले, वगैरे. यात कुठले चांगले-कुठले वाईट हा भाग सोडून द्या, पण त्या त्या विचारांचे पितृत्व घेतलेल्या व्यक्तींनी स्वतःचे विचार हे जास्त (जीवनासाठी) योग्य आहेत यावर भर दिला - इतरांना चूक ठरवण्यात वेळ दवडला नाही. अर्थात नंतर प्रत्येकाच्या अनुयायांनी काय केले हा वेगळा मुद्दा ठरू शकेल! पुढे संतांच्या बाबतीतपण तेच आहे की त्यांना जे वाटले ते, ते सांगत गेले. त्यांनी पण प्रस्थापितांना धक्का दिला.

पण हे सर्व घडले ते कवी बीं नी ज्ञानेश्वरांच्या बाबतीत म्हणल्याप्रमाणे पण ते तितकेच इतरांना लागू होईल अशी "शांतीमय उत्क्रांती" होती. त्यांनी तर ज्ञानेश्वरांना बंडखोरच म्हटले आहे. एका कवीची नजर म्हणून कोणी दुर्लक्ष करू शकेल, पण जे न देखे रवी ते देखे कवी या उक्तीप्रमाणे जेंव्हा तेजाचे तारे तुटलेले होते आणि सगळा भोंदूगिरीचा आणि सामाजीक अंधार पसरलेला होता तेंव्हा हे बंडखोर कसे वागले यावर लिहीताना त्यांनी म्हटले आहे"

ह्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहीला, मोठ्यांच्या सिद्धांताचा घेतला पुरा पडताळा
डांगोरा फोलकटांचा पिटविला अलम दुनियेला
झुंझोनी देवादैत्या, अमृतामधे न्हाली जनता, उजळीला मराठी माथा सत्येचे प्रत्यय आले, तेजाचे तारे तुटले

हिमतीने अपुल्या प्रांती, उत्क्रांती शांतीमय केली, प्रेमाच्या पायावरती, समतेची इमारत रचली
अंगची करामत ज्यांनी, खल्विदा समर्पण केली,
आम्ही त्या दिल्जानांचे साथी ना मेलेल्यांचे, हे डंके झडती, त्यांचे ऐकोत कान असलेले...

अर्थात गेल्या दीड एक शतकापासून जसे जसे आपण जगाच्या जवळ आलो, तसतसे आपल्यातल्या त्रुटी, कधी फोलपणा समजू लागला. विज्ञानाने जीवनातील तत्वज्ञानाचा अर्थच बदलून टाकला. पण हे करत असताना सामान्य माणसावरील रूढींचा पगडा काढून टाकणे सोपे नसते, भारतातच काय पण अगदी अत्यंत पुढारलेल्या अमेरिकेतपण आणि ख्रिश्चनधर्मीयात पण ते शक्य नसते, हे जवळून पाहीले आहे. पण फरक कुठे पडतो, तर असा पगडा राहिला, असला म्हणून टिकेची देवाण-घेवाण होत राहीली तरी त्यामुळे देशाची प्रगती थांबली नाही. ती विशेष करून गेल्या शतकात प्रचंड वाढली आणि फॉर बेटर ऍन्ड वर्स "कृण्वंतू विश्वम् अमेरिकम्" करत गेले. हे असे कसे झाले याची अनेक कारणे असली तरी एक महत्वाचे कारण म्हणजे नेतृत्वापासून सामान्यापर्यंत सरासरी जबाबदारी घेण्याची वृत्ती. सरासरी अशा साठी की जॉर्ज बुश, निक्सन सारखे महाभाग सगळ्या चांगल्या गोष्टी बासनात गुंडाळू शकले म्हणून...लिंकनसारख्या महामानवाने गुलामगिरीसारख्या सामाजीक अपयशाचे पितृत्व घेतले आणि तत्कालीन समाजात जे बदल शक्य होते, तितकेच प्रसंगी लढून आणि लढाई जिंकल्यावर त्याच्या विरोधकांना सोडून आणि मुख्य म्हणजे राष्ट्राची फाळणी टाळून करून दाखवले. १९३३ साली टेडी रुझवेल्ट अमेरिकेचा पहील्यांदाच राष्ट्राध्यक्ष झाला. तो काळ आर्थिक मंदी मुळे अतिशय हलाखीचा होता. त्याने अध्यक्षीय भाषणातच (वाचण्यासारखे आहे) त्या सर्व अपयशाची ज्याला तो कारण नव्हता त्याची "ओनरशीप" घेतली / पितृत्व घेतले, का झाले, कोणि केले यावर चर्चा करत न बसता पुढे जायचे मार्ग आखले की ज्याची फळे अमेरिका आजतागायत चाखत आहे.

दुसर्‍यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टिका करत असताना नवीन मार्ग दाखवणारे दुरदर्शी नेतृत्व असू शकते, अथवा केवळ आमच्या बापजाद्यांनी अमुक केले म्हणून आज तमुक झाले असे म्हणणारा नाकर्ता समाज पण होवू शकतो. ज्ञानेश्वरादी संतांनी इतरांबद्दल जास्त बोलत बसण्यापेक्षा तत्कालीनदृष्ट्या योग्य मार्ग - ज्याने समाज हा आहे त्या (राजकीय) परिस्थितीत स्थिर राहील आणि त्यातूनच पुढे काहीतरी चांगले निपजू शकेल हा विचार आचारात आणण्यासाठी "पितृत्व" घेतले. तेच फाळणी टाळणार्‍या लिंकनने आणि आर्थिक मंदीत टेडी रुझवेल्टने त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे केले.

देशाला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली. गेल्या दिड दशकात आर्थिक प्रगती, अणुशक्ती आणि माहिती-तंत्रज्ञानामुळे भारत हा जागतिक नकाशावर झळकू लागला आहे. एकीकडे श्रीमंती वाढत आहे पण वैभव वाढतेय असे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. रस्ते-पाणी खराब, बांधकामे पडणार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या (१७००० च्या घरात गेल्या वर्षात?) , दरोज होणारे अपघात आणि त्यात होत असलेले अगणित बळी...प्रिन्सचार्ल्स येतो आणि नॅस्कॉमच्या कर्णिकांसमोर हॉटेल ताज मधे म्हणतो, " माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लंडनचे हवेतील प्रदूषण कमी करण्यास मदत केलीत धन्यवाद, आता असेच मुंबईत केलेत तर बरे होईल!" आणि आपले लोक टाळ्या वाजवून हसण्यावरी नेतात...असे कितीतरी लिहीता येईल, जेथे आपण आजच्या घडीस लागणारे पितृत्व घेत नाही. माझे घर स्वच्छ ठेवण्याचे आणि घरात सांपत्तिक स्थिती उच्च दर्जाची करण्याचे पितृत्व नव्हे कर्तुत्वच (कारण चुकले तर बाहेरची कारणे जबाबदार) माझे, पण बाहेरच्या स्थितीला जबाबदार मी नाही, मी फक्त या स्टॅटिस्टिक्स मधील एक "डेटा पॉइंट"...

थोडक्यात मला इतकेच म्हणावेसे वाटते की धर्म चघळायचे काम जितके धार्मिक वृती (चांगल्या-वाईट अर्थी) करत असतात तितक्याच जोमाने निधर्मी वृत्तीपण करत असतात - आणि या वादात सद्यस्थितीत समाज म्हणून वैभवी नसण्याचे पितृत्व ना आपण घेतो, ना तसे वैभवी होण्यासाठी लागणारे कर्तुत्व गाजवायचा प्रयत्न करतोय...

लेखनविषय: दुवे:

Comments

हं

लेख आवडला. पटला. विचार ढवळून निघाले. एकदम प्रतिसाद देणं कठीण आहे जस जसे विचार डोक्यात येतील तसतशी प्रतिक्रिया देत जाईन. तुर्तास अपयश पोरकं असतं हेच खर! थोडक्यात आज आपण या भारतवर्षातील वंशज ज्या देशाच्या जन्माच्या मुळाशी एकीकडे ब्रम्हर्षी होण्याची महत्वाकांक्षा तर दुसरीकडे स्वतःच्या अपयशाचे पितृत्व नाकारण्याची वृत्ती आहे. हे ही सोळा आणे पटलं.
हेच पहा ना या लेखात विशद केलेल्या विविध अपयशांचं खापर त्या त्या अपयशाचं पितृत्व न घेणार्‍यावरच फोडताय की ;) ह. घ्यालच :)

जाता जाता: लेखात काय होत नाहि आहे आणि काय झालं पाहिजे ते आलय पण ते कसं करावं याबद्दल हा लेख काहि बोलत नाहि.
-ऋषिकेश

विचारप्रवर्तक

अन्तर्मुख करायला लावणारा लेख!

पितृत्व स्वीकारायला लागणारा धीटपणा आम्हाला बालपणापासून कधी शिकवलाच जात नाही. तसा कोणताच आदर्श वा उदाहरण आमच्यासमोर नसतं!

वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे "कसं करावं" ह्याचा उहापोह लेखात असता तर तो अधिक परिपूर्ण झाला असता.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वर्तमान आणि इतिहास

विकासरावांचे सर्वप्रथम आभार. नेहमीप्रमाणेच विचारप्रवृत्त करणारा लेख. लिखाणाचे स्वरूप चिंतनपर वाटले. त्यातील "आपली वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी (ओनरशिप्) " चा प्रमुख मुद्दा पटण्यासारखा आहेच. तो लेखकाने अनेक उदाहरणांसकट चांगला सांगोपांग मांडला आहे.

मात्र त्यातील काही (म्हण्टले तर दुय्यम वाटतील अशा ) मुद्द्यांबद्दल चर्चा शक्य आहे.

मध्ययुगीन काळात संतांनी बजावलेली भूमिका या गोष्टीचा उहापोह अजूनही विचारवंतांमधे घडताना आपण पाहतो. परस्परविरोधी मते लोक मांडताना आपल्याला दिसतात. आपल्या समाजाच्या उन्नयनाचे श्रेय त्याना देणारा जसा प्रवाह आहे , तसाच आपल्या "अधोगती"ची जबाबदारी त्यांच्यावर (भागवत पंथ, वारकरी संप्रदाय इ. इ. वर ) टाकणारे लोकही आहेत. मला वाटते, अशी चर्चा आवश्यक आहे, आरोग्यकारक आहे. शेवटी आपला इतिहास हा आपल्या सर्वांच्या सामूहिक असण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आज जसजसे समाजातील निरनिराळ्या थरांतून नवनवे लोक आपली मते मांडताना आढळतात तसे इतिहासाबद्द्लच्या त्यांची "इंटरप्रिटेशन्स्" (मराठी शब्द ?) समोर येत आहेत. समाजाच्या सार्वकालिक स्थितीचे सगळे खापर जसे त्यांच्यावर फोडणे योग्य नाही , तसेच त्यांच्या विचारांची मर्यादित क्षमता सुद्धा आपल्याला नीट आकलन करून घ्यायला हवीच. आपल्या प्रवासात आपण आव्हान स्वीकारतो वर्तमानाचे ; आपले डोळे लागलेले असतात भविष्यावर. भूतकाळाला "ओझे" (बॅगेज्) म्हणून वागवायच्या ऐवजी आपण आपले होकायंत्र समजून वागवायला हवे.

इंटरप्रिटेशन्स

याला (प्रत्येकाने लावलेला) अन्वय हा शब्दप्रयोग चालू शकेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

विचार

विचार करायला लावणारा लेख.
पितृत्वाचा विचारांचा काहीसा संबंध मागे सार्त्रच्या लेखाशी काहीसा जोडला जातो आहे की काय असेही वाटून गेले.
प्रिंस चार्ल्स च्या विचारांना महत्व देवून त्याची भाषणे आयोजित करणार्‍यांची कीव येते. असे काय कर्तूत्व आहे की त्याने जाहीर भाषणे द्यावीत? (त्याचा मुद्दा या भाषणात योग्य असला तरी!).
-निनाद

खुलासा

वरील प्रतिसादांबद्दल ऋषिकेश, सुनील आणि मुक्तसुनीत यांना धन्यवाद.

आपण म्हणल्याप्रमाणे "कसं करावे" यावर भर दिला नाही. कारण एक तर मी स्फूट म्हणून लिहीत असताना जसे सुचत गेले तसे लिहीत गेलो. त्यात जरा जास्तच भरकटायला लागलो असे वाटले म्हणून एका ठिकाणी थांबलो. शिवाय जबाबदारी घेणे हे महत्वाचे आहे. ती कशी घ्यावी ह्याचे मार्ग त्या त्या वेळेस प्रयत्न करण्याराला सुचतात असे वाटते. आता हेच बघा की मी "विद्रोही ब्रम्हण(१)" या चर्चेत प्रतिसाद देत असताना पुलंचे नाव घेतले की त्यांनी राजकारणात पडले नाही म्हणून कोणी नावे ठेवली तर वगैरे... पण वस्तुस्थिती अशी आहे की त्यांना त्यांचे गुण आणि त्यांचा स्वभाव माहीत होता. अर्थातच तो राजकारणी नव्हता (म्हणूनच नंतर ठाकर्‍यांशी वाजले). पण तेच पुल आणिबाणीच्या काळात स्वतःचे नागरी कर्तव्य म्हणून आणि स्वचःच्या लोकप्रियतेचा चांगल्या अर्थी प्रभाव पाडायला म्हणून "बाईच्या विरुद्ध" बोलायला लागले आणि ते ही कुणाच्या साथीबरोबर तर दुर्गा भागवत! या दोघांनीही त्यांची साहीत्यिकाची वस्त्रे एका अर्थी बाजूस ठेवली आणि महाराष्ट्रभर जागृती करत हिंडायला लागले. इतके झाले की तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण त्यांना वैतागून विदूषक म्हणाले! तसेच पितृत्व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेस दाखवले गेले: गांधीवादी, हिंदूत्ववादी, कम्यूनिस्ट सर्व एकत्र उभे ठाकले. अत्र्यांच्या तोफेपुढे नेहेरूंना माघार घ्यावी लागली आणि नंतरच्या निवडणूकीत अत्र्यांना! पण वेळी करायचे पितृत्व चुकले नाहीत...

मुक्तसुनीत म्हणतात की, "..मला वाटते, अशी चर्चा आवश्यक आहे, आरोग्यकारक आहे. शेवटी आपला इतिहास हा आपल्या सर्वांच्या सामूहिक असण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे..."

यावर एकच खुलासा मी करू इच्छितो की मी काही संतांना अथवा संतसाहीत्याला "डिफेन्ड" करायला लिहीले नाही . त्याचा अथवा इतर कुठल्याही गोष्टींचा तौलनीक विचार करायला आणि त्यावरून परस्परविरोधी पण "अनबायस्ड" (एकेरी नसलेली) मते /वादविवाद असणे याला महत्व आहे. किर्लोस्कर मासीकातील आधिच्या चर्चेत म्हणल्याप्रमाणे जणू काही संतामुळेच , "कर्ता करविता परमेश्वर आहे अशी नपुंसक मनोवृत्ती स्वीकारून ते परमार्थाच्या कैफात धुंद होते." हे वाक्य आणि त्यासंदर्भात जेव्हा आणि जेथे चर्चा होते तेंव्हा मला वाटते की आपण आपली जबाबदारी दुसर्‍यावर टाकतो आहोत. आणि हा या स्फूट लिहीण्याच्या मागचा उद्देश होता.

याचेच अजून एक उदाहरण म्हणून आठवले की निवडणूक नियमात सुधारणा करण्यावरून पूर्वी येथे एक चर्चा झाली होती. चर्चा अर्थातच चांगली होती आणि उद्देशपण. पण मुद्दे परत परत येतात ते सरकारने काय करावे, उमेदवार कसे असावेत वगैरे म्हणजे जे आपल्या प्रत्यक्ष हातात नाही ते कसे बदलावेत या संदर्भातील. पण आपले नागरी कर्तव्य - साधे मतदान करायचे आपण बजावतो का आणि ते कसे वाढवायचे यावर विचार करायची तयारी नाही. मतदान करायची वेळ आल्यावर सगळे चोर म्हणत घरी बसणार. पण त्या ऐवजी दर वेळेस मतदान करा, (जेथे चांगलाच उमेदवार असेल असा) अपवाद सोडल्यास दर वेळेस नवीन पक्षाला मते द्या. त्यांना भिती बसू देत की अरे मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय पण मते देयला झुंडीने येत आहेत एका वर्षात नाही तरी दोन निवडणूकींच्या कालावधीत बराच फरक पडू शकेल. प्रत्येकाने अगदी चळवळेपणा / ऍक्टीव्हीझम करायची गरज नाही, पण तरी देखील प्रत्येकाला किमान नागरी कर्तव्य बजावता नक्कीच येऊ शकते...

थोडक्यात माझी गाडी जी सारखी वळते ती नागरी कर्तव्याकडे. या देशात (अमेरिकेत) माझ्या कामामुळे येथील जनतेचे नागरी कर्तव्य आणि हक्क बजावण्याची मी सवय पाहीली आणि त्याचे चांगले दृश्य परीणाम देखील. आणि तसे जेंव्हा कर्तव्य पाळले गेले नाही तेंव्हा काय् होते हे ही पाहीले (मतदानाच्या उदासीनतेमुळे जॉर्ज बूश एकदा नाही तर दोनदा राष्ट्राध्यक्ष झाला!) . त्यामुळे हे विचार सतत डोक्यात येत राहतात की आज ते असे का आहेत आणि आपण तसे (अमेरिका) होण्याची गरज नसली तरी खर्‍या अर्थाने समृद्ध/वैभवशाली का नाही... आणि परत परत उत्तर येते की आपण ब्रिटीशांपासून स्वतंत्र झालो, राजेशाही घालवून लोकशाही आणण्यात यशस्वी झालो. पण लोकांचे राज्य ह्या शब्दाचा अर्थ न समजता पूर्वीची सवय म्हणजे माझ्या घराबाहेरच्या देशासाठी माझे काही कर्तव्य नाही, त्या साठी सरकार आहे ते करेल, करत असेल, करायला हवे, वगैरे...या वृत्तीशी.

अवांतरः एक ऐकलेला-घडलेला किस्सा (नावे न सांगता) - एक थोर देशभक्त एका गावात जाऊन राष्ट्राच्या दशेच्या कारणांवरून (स्वातंत्र्यपूर्व/सुमारासच्या काळात) भाषण देत असतो. तो गावकर्‍यांना सांगतो की," असे होण्याचे कारण इतकेच की प्रत्येकाला आपल्या घरात शिवाजी जन्मायला नको असतो तर शेजार्‍याच्या घरात हवा असतो. " अर्थात त्याला म्हणायचे असते की माणसांची स्वतः अथवा आपल्या पोराबाळांनी राष्ट्रीय कर्तव्याची जबाबदारी घेण्याची तयारी नसते. ते भाषण ऐकून एक भारावलेला युवक या वक्त्यास समारंभानंतर जाऊन भेटला. आणि म्हणाला की "आपले विचार एकदम १००% पटले. मी आता मनावर घेतले आहे." वक्ता खूश होत होता तितक्यात तो युवक पुढे म्हणाला, " मी लवकरच लग्न करीन आणि पहीला मुलगा झाला रे झाला की त्याचे नाव शिवाजी ठेवीन आणि तसे त्याला करण्याचा प्रयत्न करीन. मी हे घरी सांगीनच पण तुम्हाला देखील योग्य स्थळे माहीत असल्यास कळवा".... तर याला अर्थाचा अनर्थ करणे म्हणतात!

--------------

उत्तम

लेख आवडला. वर निनाद यांनी म्हटल्याप्रमाणे मागे राजेंद्रने लिहिलेल्या सार्त्रच्या तत्त्वज्ञानावरील या लेखातील विचारांची आठवण झाली.

'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे वाक्य केवळ वैयक्तिक प्रगतीच्या संदर्भात न घेता, सामूहिक/सामाजिक दृष्टीने ध्यानी घेतले तर बराच फरक पडू शकेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

विचार आवडले

योग्य मुद्दे, विचार मांडले आहेत.

जितक्या लवकर अश्या विचारांचे वटवृ़क्ष समाजात रुजतील, तितक्या लवकर "जाणता देश / जाणता समाज" तयार होइल.

प्रत्येकाने आपापल्या परिने हातभार लावला पाहीजे. मनापासुन प्रयत्न केले तर प्रत्येकाला योग्य मार्ग सापडेलच.

उत्तरदायित्व

जेथे आपण आजच्या घडीस लागणारे पितृत्व घेत नाही. माझे घर स्वच्छ ठेवण्याचे आणि घरात सांपत्तिक स्थिती उच्च दर्जाची करण्याचे पितृत्व नव्हे कर्तुत्वच (कारण चुकले तर बाहेरची कारणे जबाबदार) माझे, पण बाहेरच्या स्थितीला जबाबदार मी नाही, मी फक्त या स्टॅटिस्टिक्स मधील एक "डेटा पॉइंट"...

नकळत आपण त्या एका साखळीचा दुवा बनतो, वाहक बनतो. (डेटा पॉइंट). पितृत्व नामधारी असू शकतं पण कर्तुत्व मात्र नाही.
प्रकाश घाटपांडे

उत्तम

उत्तम लेख आहे. याचेही वैशिष्ट्य असे की जसे जास्त विचार करू तसे वेगवेगळे मार्ग दिसू लागतात. यात वैयक्तिकपासून समाजापर्यंत बर्‍याच गोष्टी येतात. वर म्हटल्याप्रमाणे मलाही वाचल्यानंतर सार्त्र आठवले. आणि दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी भूमिगत चळवळीत सामील न होण्यासाठी बहुसंख्य लोक हाच मार्ग पत्करत होते. जबाबदारी झटकण्याचे अनेक मार्ग असतात आणि आपण कळत-नकळत त्यांचा वापर करत असतो. भारत मागे पडण्याचे कारण संतसाहित्य या निष्कर्षाला आधार दिसत नाही. उलट बहुसंख्य संत विचारवंत होते आणि त्यांनी वेळोवेळी समाजाला जागे करण्याचे काम केले आहे असे दिसते. संतसाहित्य काळजीपूर्वक वाचल्यास (एक तरी ओवी अनुभवावी ) कुठल्याही पदव्या न घेता या साध्या माणसांमध्ये इतकी प्रगल्भता कुठून आली याचे आश्चर्य वाटते. आणि याचा इतिहास थेट गीतेपर्यंत जातो.
लेखात म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला याचा विचार करण्याची गरज आहे. तापमानवाढ, प्रदूषण यासारख्या प्रश्नांवर प्रत्येकाने आपापली जाबाबदारी ओळखायला हवी, तरच यातून मार्ग निघू शकेल.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

लेख आवडला.

जरा सावकाश वाचला पण लेख आवडला. मलाही सार्त्र आठवला.

जगात सर्वात करण्यास सोपी गोष्ट म्हणजे चूक दुसर्‍याची होती हे दाखवून मोकळे होणे. माझ्यामते प्रत्येक माणूस त्याला जमेल तसे कर्तृत्व करत असतो. अत्यंत कर्तृत्वमान माणसाने दूरदृष्टी ठेवायची झाली तरी किती दूरपर्यंत असा प्रश्न पडतो. तत्कालीन माणसांनी काय करायला हवे होते याचा उहापोह ५००-६०० वर्षांनी करणे आणि इतक्या वर्षांनी त्यांच्यावर खापर फोडणे योग्य वाटत नाही.

शिवाजीने संभाजीला जरबात ठेवला असता, पिता म्हणून त्याच्याकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष दिले असते तर मराठ्यांचा इतिहास बदलता असे आफ्टरमॅथ काढणे सहज शक्य असते पण तत्कालीन परिस्थिती, राजकारण, समाजकारण, समजूती, पगडा अशा अनेक बाबींचा विचार केला तर विविध पैलू समोर उभे राहतात.

सहमत

प्रतिक्रियेशी संपुर्णपणे सहमत.
प्रकाश घाटपांडे

पितृत्व

मध्ययुगात भारत मागे पडण्याचे सर्व खापर संतांवर अथवा संतसाहीत्यावर फोडून स्वतःच्या सामाजिक चुकांचे - अपयशाचे पितृत्व नाकारायची वृत्ती.

संतांनी त्यांच्या (आणि संतपरंपरेतील पूर्वसूरींच्या) शिकवणुकीच्या दूरगामी परीणामांचे पितृत्व का स्वीकारले नाही?

लए

आवडला

 
^ वर