याला जबाबदार कोण?

जां-पॉल सार्त्र यांचे तत्वज्ञान : एक्झिंस्टेंशिअलिझ्म किंवा अस्तित्ववाद.

पुढे जाण्याआधी : सार्त्र हे कम्युनिस्ट होते. परंतू इथे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत भाष्य केलेले नाही. त्यांच्या तत्वज्ञानाचा एक छॊटासा भाग, जो मला समजला आणि पटला,
तो इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याचा आधार प्रोफेसर रॉबर्ट सोलोमन ह्यांची व्याख्याने आहेत.

एक्झिस्टेंशिअलिझ्म या पाटीखाली मोडतील असे सार्त्र यांच्याखेरीज आणखी तत्वज्ञ/लेखक होऊन गेले, जसे की अल्बेर कमू(फ्रान्स-अल्जीरीया), सोरेन क्युर्कगार्ड(डेन्मार्क), फेडेरिक निश्चा(जर्मनी), मार्टिन हायडेगर(जर्मनी), फ्रॅंझ काफ्का(चेकोस्लोव्हाकिया), हर्मन हेस(स्विट्झरलॅंड), डोस्टोयस्की(रशिया). या सर्वांमध्ये सार्त्र आणि निश्चा यांचे विचार तुलनेने लोकप्रिय/विवादास्पद आहेत. एक्झिस्टेंशिअलिझ्म हे नाव सार्त्र यांची देणगी आहे. यातील हर्मन हेस यांचे विशेष म्हणजे ते गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचे अभ्यासक होते. त्यांनी बुद्धावर सिद्धार्थ नावाची कादंबरी लिहीली आहे.

जां-पॉल सार्त्र हे फ्रेंच लेखक आणि तत्‍वज्ञ होते (१९०५-१९८०). त्यांनी विपुल लेखन केले. असे म्हणतात की ते रोज २० एक पाने लिहीत असत. त्यांच्या मते लेखन हे पारितोषिके, सत्कार, प्रसिद्धी यासाठी करण्याची गोष्ट नव्हती. ह्याचाच एक भाग म्हणून १९६४ मध्ये त्यांनी साहित्याचे नोबेल पारितोषिक नाकारले. त्यांचे तत्वज्ञान हे त्यांच्या विस्तृत लेखनकार्याचा एक भाग आहे. त्यांच्या मते तत्वज्ञान म्हणजे नुसती "आर्मचेअर फिलॉसॉफी" रहायला नको, त्याचा रोजच्या जीवनात उपयोग व्हायला हवा. पहिल्यांदा
त्यांच्या तत्वज्ञानाशी ओळख झाली तेव्हा गाढ झोपेत असताना अंगावर थंड पाण्याची बादली ओतली तर जसे वाटेल तसे वाटले.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सार्त्र जर्मन युद्धकैदेत होते. याचा अर्थ कॉन्सट्रेशन कॅम्प नव्हे, त्यांना पुस्तके, लेखनसामग्री उपलब्ध होती. कैदेतून सुटल्यावर त्यांनी इतर लेखकांबरोबर भूमिगत चळवळीत भाग घेतला. त्यांनी पाहिले की बरेचसे त्यांचे देशबांधव या चळवळीमध्ये भाग घेत नव्हते आणि याचे कारण देताना ते नेहेमी काही ना काही सबब देत असत. सबबी आणि पर्यायाने जबाबदारी या गोष्टींचा सार्त्र यांच्या मनावर बराच प्रभाव पडला आणि पुढे जाऊन हाच त्यांच्या तत्वज्ञानावरील ग्रंथ 'बिइंग ऍंड नथिंगनेस' याचा एक भाग बनला. सार्त्र यांच्यानुसार फ्रेंच लोक चळवळीत सामील न होण्यासाठी खालील प्रकारच्या सबबी पुढे करीत असत. एवढ्या शक्तिशाली जर्मन सैन्यापुढे मी काय करणार? सगळेजण हेच करीत आहेत. मी का वेगळा मार्ग पत्करू? माझ्या स्वभावातच धैर्य नाही, मग मी काय करणार? मला दुसरा काही पर्यायच नाही, मग मी काय करू? मी सामिल झालो तर माझ्या कुटुंबाचे काय होईल?

या सर्व सबबींना सार्त्र यांचे उत्तर होते : नाही. त्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा एका प्रकारे सांगायचा झाला तर असा सांगता येईल : तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र आहात. याचा अर्थ तुम्ही कुठलीही सबब पुढे करू शकत नाही. तुम्ही जे काही करता त्या सर्व गोष्टींसाठी, त्यांच्या परिणामांसाठी, तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात. सार्त्र यांच्या स्वतंत्रतेचा अर्थ
बर्‍याच वेळा चुकीच्या पद्धतीने लावला जातो. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही कुणाचीही तमा न बाळगता काहीही करू शकता. याचा अर्थ आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये
तुमच्याजवळ पर्याय उपलब्ध आहेत. तुमचा जन्म, आईवडील, पहिली भाषा, संगोपनाची पद्धत या सर्वांवर तुमचे नियंत्रण नसते, त्यामुळे तुमच्याजवळ मर्यादित पर्याय असतात. पण... तुमच्याजवळ पर्याय असतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही. आणि याच पर्यायांमध्ये काही असे असू शकतात की ज्यांच्यामुळे ती कठीण परिस्थिती
बदलता येते. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर जन्मानंतर संस्कृती, देश यासारख्या अनेक घटकांमुळे तुम्ही एका विशिष्ट परिस्थितीमध्ये फेकले जाता, मग प्रश्न येतो की ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःचे काय करणार?

एक टोकाचे उदाहरण. समजा मी एका तुरूंगात, आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे. माझे हात-पाय साखळदंडांनी जखडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी स्वतंत्र आहे असे म्हणणे योग्य आहे का? सार्त्र यांचे उत्तर आहे : हो. माझ्याजवळ पर्याय आहेत. मी माझी शिक्षा योग्य आहे असे समजून उरलेले आयुष्य पश्चातापात घालवू शकतो. मी माझी शिक्षा अयोग्य आहे असे समजून उरलेले आयुष्य द्वेषात घालवू शकतो. मी उरलेले आयुष्य नशिबाला दोष देत घालवू शकतो. मी आरडाओरडा करून तुरूगाधिकार्‍यांचे लक्ष वेधण्याचा
प्रयत्न करू शकतो. मी माझे हातपाय हलवून साखळदंडातून सुटण्याची धडपड करू शकतो, जिचा बहुधा काहीही उपयोग होणार नाही. पण यावरून सार्त्र यांना काय म्हणायचे आहे ते स्पष्ट होते. निखळ स्वातंत्र्य याचा अर्थ तुम्हाला जे हवे ते साध्य करण्याचे, मिळवण्याचे स्वातंत्र्य नव्हे, याचा अर्थ आहे प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य, तुमचा दृष्टीकोन बनवण्याचे स्वातंत्र्य, त्या दृष्टीकोनातून जगाशी वागण्याचे स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य.

किंवा समजा एका गावाजवळ एक पर्वत आहे. एका दृष्टीने पाहीले तर ही फक्त एक नैसर्गिक घटना आहे. पण त्या गावातील लोकांजवळ पर्वताकडे कुठल्या दृष्टीकोनातून बघायचे याचे बरेच पर्याय आहेत. ते पर्वताला देव मानून त्याची पूजा करु शकतात, पलिकडे जाण्यात अडथळा म्हणून त्याचा राग करू शकतात, पर्वतावरील सृष्टीसौंदर्याने मोहित होऊ शकतात, कोणी गिर्यारोहक पर्वताच्या शिखरावर जाऊ शकतात इत्यादी. मुद्दा हा की आपल्याजवळ असे पर्याय नेहेमी उपलब्ध असतात, परिस्थिती कठीण असली तर हे पर्याय मर्यादित होतात, पण पर्याय असतात. यावरच सार्त्र अतिशय निर्ममपणे म्हणतात, "We all get the war we deserve". इथे त्यांना फक्त खरे युद्ध अपेक्षित नाही, तर रोजच्या जीवनातील प्रसंगांशी सामना करणेही अपेक्षित आहे. जसा तुमचा दृष्टीकोन असेल त्यानुसार तो प्रसंग तुम्ही हाताळू शकाल. सार्त्र यांच्या तत्वज्ञानातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रसंगामध्ये ते जबाबदारी तुमच्या माथी मारतात. कुठलीही सबब देऊन पळ काढता येत नाही. जबाबदारी हा सार्त्र यांच्या तत्वज्ञानाचा मुख्य मुद्दा आहे. आपण जेव्हा पर्याय निवडतो तेव्हा त्या पर्यायाबरोबर त्यामुळे होणारे परिणामही निवडतो. जर आपण परिणाम लक्षात न घेता पर्याय निवडला, तरीही त्याची सर्व जबाबदारी आपली आहे.
मी त्याचा विचारच केला नव्हता, मी भावनेच्या भरात असे केले अशा सबबी चालणार नाहीत. यालाच सार्त्र म्हणतात, "नो एक्सक्यूझेस."

पण यानंतर एक वेगळा मुद्दा येतो. (नेमके सांगायचे झाले तर थंड पाणी इथे पडले.) सार्त्र यांच्या म्हणण्यानुसार जर मी एखादा पर्याय निवडला, तर त्याची जबाबदारी माझी असतेच. पण त्याचबरोबर जे पर्याय मी जाणतेपणी किंवा अजाणतेपणी निवडले नाहीत, त्या सर्वांची जबाबदारीही माझीच असते. उदा. मी आत्ता हा लेख लिहितो आहे. त्याऐवजी मी बर्‍याच गोष्टी करू शकतो. त्यातील काही विरंगुळा म्हणून असू शकतील जसे की पुस्तक वाचणे, चित्रपट बघणे, फिरायला जाणे इत्यादी. त्याचबरोबर काही अशाही असू शकतील की ज्यांच्यामुळे समाजाचे खरेच भले होऊ शकेल जसे की समाजसेवी संस्थांमध्ये मदत करणे किंवा निसर्ग-संवर्धनाच्या दृष्टीने काहीतरी करणे. याचा अर्थ असा नाही की मी ते केलेच पाहीजे. पण मी ते करू शकतो आणि म्हणूनच मी ते न करण्यासाठीही जबाबदार आहे.
सारांश : आपण स्वतःसाठी आणि पर्यायाने जगाच्या परिस्थितीसाठी जबाबदार आहोत.

शेवटी दुसरी बाजू. सार्त्र यांचे व्यक्तिमत्व, जीवन आणि तत्वज्ञान नेहेमी विवादांच्या घेर्‍यात राहिलेले आहे. त्यांचे विचार प्रसंगी अगम्य, किंवा टोकाचेही वाटू शकतात. कदाचित यामुळेच त्यांना विरोध करणारी मंडळी भरपूर आहेत. सार्त्र यांनी त्यांच्या तत्वज्ञानातून सिगमंड फ्रॉईडसारख्या दिग्गजांना आव्हान दिले. प्रोफेसर सोलोमन यांच्या मते गेल्या दोन हजार वर्षांमध्ये काही गोष्टींबद्दल आपला विचार करण्याचा दृष्टीकोन एकांगी झाला आहे. सार्त्र यांचे प्रसंगी टोकाचे विचार आपल्याला संपूर्ण पटले नाहीत तरी एक
नवा दृष्टीकोन देतात आणि ज्या गोष्टी आपण गृहीत धरतो त्याविषयी आपल्याला पुनर्विचार करायला प्रवृत्त करतात.

सार्त्र यांच्या तत्वज्ञानातील हा फक्त एक छोटासा भाग, हिमनगाचे टोक. ह्या लेखातील विचार सर्वांना पटतील अशी अपेक्षा नाही. फक्त एवढेच सांगावेसे वाटते की मला स्वतःला अवघड परिस्थितीमध्ये काही निर्णय घेताना याचा उपयोग झाला. मला हे तत्वज्ञान प्रेरणा आणि स्वातंत्र्य देणारे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

लेख आवडला.

बर्‍याच दिवसांनी काही वेगळे वाचायला मिळाले. सहसा मी अशा विषयांपासून लांब असते, पण कॅम्पबेल वाचल्यापासून फ्रॉईड वाचावा की काय अशी इच्छा झाली होती परंतु अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. (तसाही सॉक्रेटिस आधी खोलवर वाचावा अशी इच्छा होती, पहा किती पर्याय आहेत. :) )

माणसे बरेचदा परिस्थितीबाबत उदासीन असतात असे मला वाटते. आयुष्यात फार काही मोठे करण्याची गरज असते असे नाही परंतु प्राप्त पर्यायांतून एखादा पर्याय निवडणे, तो फुलवणे, त्यात सुधारणा करणे किंवा बदल करणे माणसाला शक्य असते असे वाटते. आपल्याजवळ पर्याय उपलब्ध असतात हे ही पटते, बरेचदा आपण पूर्वग्रहाने त्यापैकी एखाद्या पर्यायावरच अधिक अवलंबून असतो आणि इतर पर्याय आपल्या क्षमतेत नाहीत असा ग्रह करून घेतो किंवा त्यांच्या वाटेला जायला कचरतो.

एखाद्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारणे ही फार मोठी आणि कठिण गोष्ट आहे. माणसे सहसा कळत किंवा नकळत कृती करतात परंतु जबाबदारी स्वीकारण्यापासून मागे हटतात असेच दिसते. एक मात्र आहे, प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वीकारली आणि त्यामुळे माणूस प्रयत्न वाढवायचे सोडून पश्चात्ताप किंवा द्वेष/ सूड यावर अवलंबून राहू लागला तर आयुष्य अधिक गुंतागुंतीचे होईल त्यापेक्षा जे आपल्या हातून होत नाही त्याची जबाबदारी कोणत्याही रुखरुख, खेद किंवा पश्चात्तापाशिवाय स्वीकारावी.

लेख आवडला, असे वेगळ्याप्रकारचे लेख वाचायला आवडतील.

मस्त लेख.

लेख मनापासुन आवडला.
राजेंद्र यार .काय बोलु. सुंदर लेख लिहीलास.

वा!

राजेंद्र, लेख आवडला. हा लेख वाचून आता या विषयावर अधिक वाचावेसे वाटू लागले आहे. निहिलिझमबद्दल देखील लिहू शकशील का? निश्चा निहिलिस्ट होता, असे वाचल्याचे आठवते.

आवडला

लेख आवडला. सार्त्रने वर्णलेल्या निर्ममपणे लिहिला आहे असे वाटते आहे. म्हणजे 'मी/सार्त्र हे म्हणते/तो, ते तुम्हाला पटायला पाहिजे असा काही आग्रह नाही' अश्या दृष्टिकोनातून. त्यामुळे अधिक आवडला.

हा विचार म्हणजे मॉडर्निझम आणि पोस्ट मॉडर्निझम म्हणजे कोणीच कश्यालाही जबाबदार नाही. (सगळी एक रासायनिक प्रक्रिया मात्र आहे!) असे काहीतरी इथे एका चर्चेत ऐकले होते. ते खरेच का?

वी ऑल गेट द् वॉर वी डीझर्व्ह!

परफेक्ट!
राजेंद्र आपण हा वेगळा विषय छान मांडला आहे.

इच्छा व क्षमता

लेख आवडला. तत्व पटण्यासारखे आहे.

कुठलेही कृत्य करण्यासाठी फक्त इच्छा व क्षमता या गोष्टींची आवश्यकता असते. या पैकी एकही नसेल तर ते साध्य होणार नाही व दोन्ही असल्यास कृत्य न केल्याचे/करण्याचे कोणतेही कारण पटण्यासारखे नाही.

उदा. वर्गात पहिला येणे. मी येऊ शकतो/ते पण येऊ इच्छित नाही किंवा इच्छितो/ते पण सक्षम नाही. (पहिला येणारा गैरमार्गाने पहिला येत असेल तर 'असे' पहिला येणे मला जमत नाही/मी इच्छित नाही... असेच पुढे...)

(यात पुढे पुरेसा सशक्त/सक्षम नि पुरेसा लोभी असणे गरजेचे आहे. क्षमतेतली तूट देखील पुढे इच्छेच्या तीव्रतेनुसार भरून काढता येते :) )

थोडक्यातः जी गोष्ट तुम्ही केली नाहीत ती एकतर तुम्ही करू इच्छित नव्हता किंवा तुम्हा शक्यच नव्हते (किंवा दोन्ही). तुमची तुमच्या कृत्यांची जबाबदारी तुम्ही या पलिकडे टाळू शकत नाही :)

(हे तत्वज्ञान मुळात कुणाचे आहे? कुठल्या नावाने ओळखले जाते?)

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

धन्यवाद

मंडळी,
प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ही व्याख्यानमाला मी बर्‍याच वेळा ऐकली तेव्हा थोडे थोडे कळते आहे असे वाटले. बराचसा भाग अजूनही अगम्य आहे, आणि काही भाग खरोखरच मनोरंजक आहे. कमू आणि काफ्का यांचे मुख्य तत्व म्हणजे जीवन 'ऍब्जर्ड' आहे, त्याचा अर्थ लावायला गेल्यास ते अजून ऍब्जर्ड होते. या तत्वावर काफ्का यांची मेटॅमोरफोसिस नावाची लघुकथा आहे. (काफ्का यांचे बहुतेक सर्व साहित्य याच तत्वावर आधारलेले आहे.)

प्रियाली
या व्याख्यानमालेत सॉक्रेटीसचा आणि ऍरिस्टॉटलचा उल्लेख काही वेळा येतो. पण बहुतेकवेळा त्यांच्या मतांच्या विरुद्ध मते मांडलेली दिसतात. पर्याय निवडण्याच्या बाबतीत सार्त्र आणि निश्चा यांचे विचार बरेचसे जुळतात. निश्चाचे एक वाक्य आहे, "Give style to your character." अर्थ तोच, समजा एखाद्या माणसात संगीताचे प्राविण्य असले तर त्या दृष्टीने मेहेनत केली नाही तर ते तसेच निद्रिस्त राहील. उपलब्ध परिस्थितीमध्ये आपण स्वत:चे काय करु शकतो, यावर सगळे आधारलेले आहे.
सार्त्र यांना फ्रॉइडचे बरेचसे सिद्धांत मान्य नाहीत, त्यातील मुख्य म्हणजे अनकॉन्शस. सार्त्र यांच्या मते आपण सर्व निर्णय प्रिकॉन्शस किंवा कॉन्शसपणे घेतो. या दोन महारथींमध्ये आपण काय बोलावे? :)

नंदन
निश्चा निहीलिस्ट आणि इम्मॉरलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचे अजून एक प्रसिद्ध वाक्य म्हणजे "God is dead". डोस्टोयेव्स्कीच्या क्राईम अँड पनिशमेंटचा आधार हाच आहे. देव मेला आहे, नैतिकतेचा काही आधार सापडत नाही अशा परिस्थितीत माणसाने काय करावे? निहिलिझ्मबद्दल लिहायला नक्कीच आवडेल. या विषयाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा आवड निर्माण झाली की आपण आपोआप त्यात गुंतून जातो :)

मृदुला
तत्वज्ञान ज्यांना पटते त्यांना ते पटवून देण्याची गरज पडत नाही, अशा निष्कर्षाप्रत मी पोचलो आहे. कदाचित त्यामुळे लेख अशा पद्धतीने लिहीला गेला असावा. एक्झिस्टेंशिलिज्म दुसर्‍या महायुद्धानंतर लोकप्रिय झाले. सध्या त्याची जागा पोस्ट मॉडर्निझ्मने घेतली आहे. कोणी कशालाही जबाबदार नाही हा विचार निहीलिझ्मच्या जवळ जाणारा वाटतो. पण मी पोस्ट मॉडर्निझ्मबद्दल जास्त वाचले /ऐकलेले नाही, त्यामुळे त्याची नक्की तत्वे माहीत नाहीत. अभ्यास चालू आहे :)

तो
उदाहरणांमुळे तत्व अधिक स्पष्ट झाले आहे. कुठल्याही प्रसंगात घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी पूर्णपणे आपली असते हे तत्वज्ञान सार्त्र यांचे आहे. सार्त्र यांनी या चळवळीला एक्झिस्टेंशिअलिझ्म हे नाव दिले, पण तत्वांच्या साम्यामुळे याआधी आलेल्या काहींचाही ह्या चळवळीत समावेश केला जातो. पण वर उल्लेख केलेल्या काहींचा यात सामील व्हायला विरोध होता. (उदा. कमू) बाकी लोकांचा वेगवेगळ्या गोष्टींवर जास्त भर होता. पण सध्या एक्झिस्टेंशिअलिझ्म म्हणून जे ओळखले जाते त्यात मुख्यत: सार्त्र यांचे तत्वज्ञान येते.

सुंदर लेख

राजेंद्र,

सार्त्र यांच्याबद्दल केवळ ऐकले होते. आज आपल्या लेखामुळे त्यांचे विचार आणि सिद्धांत यांची चांगली माहिती मिळाली. मानसशास्त्र या विषयावर अजून वाचायला आवडेल.

शैलेश

परिपक्वता

सारांश : आपण स्वतःसाठी आणि पर्यायाने जगाच्या परिस्थितीसाठी जबाबदार आहोत.
यावरून कुठेतरी वाचलेली परिपक्वतेची एक व्याख्या आठवली. ती अशी
मॅच्युरिटी इज् an ability टु ट्रान्सेंड् एन्व्हायर्नमेंटल् सपोर्ट.
(रोमन अक्षरांच्या वापरावरील निर्बंध व या वाक्याच्या इंग्रजी शब्दांतील पहिली अक्षरे देवनागरींत टंकलिखित करण्यांतील अडचण यांमुळे वरील वाक्य दोन्ही लिप्या वापरून लिहिले आहे)

वा, आवडले

छानच लेख. असे वेगळे लेख येत राहोत.

"पण यानंतर एक वेगळा मुद्दा येतो. (नेमके सांगायचे झाले तर थंड पाणी इथे पडले.) सार्त्र यांच्या म्हणण्यानुसार जर मी एखादा पर्याय निवडला, तर त्याची जबाबदारी माझी असतेच. पण त्याचबरोबर जे पर्याय मी जाणतेपणी किंवा अजाणतेपणी निवडले नाहीत, त्या सर्वांची जबाबदारीही माझीच असते."
मात्र सगळ्यालाच 'मी' जबाबदार असतो, हा विचार मला काही प्रमाणात नैराश्यच आणतो. :)

निनाद

धन्यवाद

प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद.

शैलेश
माझ्या आवडीच्या विषयांवर मला लिहायला आवडतेच. आपल्यासारखे वाचक असतील तर दुधात साखर. कसे जमते ते बघू या.

शरदराव
व्याख्या जरा विषद करून सांगता येईल काय? एन्व्हायर्नमेंटल सपोर्ट म्हणजे नक्की काय ते स्पष्ट झाले नाही.

निनाद
यावर नैराश्य वाटून घ्यायचे की नाही हा ही एक पर्याय आहे :) पण तुमचे मत बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. हे तत्वज्ञान थोडेफार नैराश्य आणणारे म्हणून प्रसिद्ध आहे (अर्थात माझे मत वेगळे आहे)

राजेंद्र

परिपक्वतेची व्याख्या

राजेंद्र यांस,
Environment म्हणजे परिस्थिति. Environmental Support म्हणजे परिस्थितीची अनुकूलता. व्याख्येचा शब्दशः अर्थ परिस्थितीच्या अनुकूल-प्रतिकूलते पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता म्हणजे परिपक्वता. भावार्थाने परिपक्व माणूस आपल्या वाट्याला येणार्‍या गोष्टींबद्दल विचार करतांना परिस्थितीला दोष देत बसत नाही. तो त्याची जबाबदरी स्वतःवर घेतो.
आणखी एक गोष्ट. आपल्याला होणार्‍या त्रासाला आपणच जबाबदार असतो असे म्हंटलेले बर्‍याचजणांना रुचत नाही. कारण जबाबदारी म्हंटल्यावर माणसांना डोक्यावर ओझे ठेवल्यासारखे वाटते. पण आपणच आपली (आनंदाची किंवा दु:खाची) स्थिति बदलू शकतो हा त्यांतला सकारात्मक अर्थ बहुतेकांच्या लक्षांत येत नाही. म्हणूनच आजकाल HRD मध्ये Responsibility ऐवजी Response-ability हा शब्द वापरतात.

शरद् कोर्डे

धन्यवाद

शरदराव,
आता व्याख्या स्पष्ट झाली. अनेक धन्यवाद.
राजेंद्र

शीतावरून भात..

ओळखण्याचा हा प्रकार आहे. माणुस इथून तिथून सारखाच. त्यामुळे आपल्या सभोवताली जे दिसतेय तेच थोड्याफार फरकाने इतरत्र घडते . म्हणूनच एखादा निष्कर्ष काढणे कदाचित सोपे असावे आणि त्यापुढे जाऊन त्याचे तत्वज्ञानात रुपांतर झाले असावे असे वाटते.

धन्यवाद

प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद.

सर्किटराव
तुमचा प्रश्न अवघड आहे. विदा नक्कीच निरिक्षणातून मिळत असला पाहिजे. (सार्त्र यांना युद्धात माणसे कशी वागतात यावरून विदा मिळाला)
इथे मानवी स्वभावाचा प्रश्न आहे त्यामुळे सापेक्षता येते. शेवटी कुणी कसे वागावे हे ज्याचे त्याने ठरवावे. तत्व पटले तर आपण ते आचरणात आणू शकतो, नाही पटले तर काय करणार?
मी डार्विनच्या सिद्धांताला तत्वज्ञान म्हणायला असहमत आहे. तो एक शास्त्रीय सिद्धांत होता ज्याचे अपरिमित पुरावे मिळालेले आहेत. आणि याच्या विरोधात एकही पुरावा मिळालेला नाही. तत्वज्ञान आणि शास्त्रीय सिद्धांत यातील महत्वाचा फरक म्हणजे तत्वज्ञान सिद्ध करता येत नाही.
तत्वज्ञान जरी व्यक्तिगत निरिक्षणावर आधारलेले असले तरी ते इतके जनरल असू शकते की इतरांनाही त्याचा उपयोग व्हावा.
राजेंद्र

दुरुस्ती*

तत्वज्ञान आणि शास्त्रीय सिद्धांत यातील महत्वाचा फरक म्हणजे तत्वज्ञान सिद्ध करता येत नाही.

हे वाक्य अर्धसत्य आहे. या लेखात जीवनाविषयक तत्वे मांडली होती ती सिद्ध करता येत नाहीत. पण तत्वज्ञानाची व्याप्ती याहून मोठी आहे. बर्‍याचदा यात असे मुद्दे येतात की जिथे तार्किक सिद्धतेची गरज असते. उदा. तत्वज्ञांचा आवडता प्रश्न, मला जग अनुभवता येते पण जग खरेच अस्तित्वात आहे याला पुरावा काय? बाकीचे जग आभास किंवा सिम्युलेशन कशावरून नाही? (मॅट्रीक्स) अशा प्रकारच्या सिद्धतांना तार्किक उत्तरे द्यावी लागतात. दुसरा असाच प्रश्न म्हणजे मला लाल रंग दिसतो आहे आणि तुम्हालाही. पण तुम्ही अनुभवलेला लाल आणि मी अनुभवलेला लाल हे सारखे नसू शकतात. मग जेव्हा तुम्ही लाल रंगाचा उल्लेख करता तेव्हा मला मी अनुभवलेला लाल रंग आठवतो. इ. याशिवाय तत्वज्ञानात शरीर आणि मन यांचे विभाजन (माईंड-बॉडी ड्युऍलिटी) हाही एक मोठा प्रश्न आहे. यात देकार्तचा मोठा वाटा आहे.

वर डार्विनचा उल्लेख आला त्यावरून आठवले. निश्चाने डार्विनचा सिद्धांत वाचला होता आणि त्याच्या तत्वज्ञानामध्ये याचा प्रभाव आढळतो. निश्चाचा एक मनोरंजक विचार आहे. त्याच्या मते जेव्हा माणसाला सूत्रबद्ध विचार करता येत नव्हते, तेव्हा त्याच्या मनात जसे विचार येत, तसेच आत्ता आपल्याला स्वप्नात दिसतात.

लेखात उल्लेख केलेले सर्व लोक एक्झिस्टेंशिअलिझ्म या तत्वज्ञानाखाली असले तरी प्रत्येकाचे मोटिव्हेशन (शब्द?) वेगवेगळे होते. उदा. सार्त आणि हायडेगर यांच्या तत्वज्ञानाचा पाया जर्मन तत्वज्ञ हुसरल यांच्या तत्वज्ञानावर आधारित होता. पण हुसरल यांचा मुख्य हेतू होता, शास्त्र आणि गणित यांच्या सत्यतेचा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार. उदा. २+२ = ४ ह्याला गणिताशिवाय दुसरे काही स्पष्टीकरण देता येईल का? हे सत्य आहे पण ते तसे का आहे? यासारखे प्रश्न.

*आणि अजून खर्डेघाशीला निमित्त!

२+२ बद्दल

२+२ बद्दल,
२+२ चार होत नाहीत. २+२ या संकल्पनेलाच ४ म्हटले जाते. प्रत्येक चार चा अर्थ २+२ असाच असतो. याला पाच म्हटले तरी फारसा (काय, काहीच) फरक पडणार नाही सार्‍यांचे संकेत एक असले म्हणजे झालं. :)

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

प्वाइंट

टेकन :)
मी यावर जास्त वाचलेले नाही, पण मला वाटते इथे मुद्दा असा असावा की गणितातील सत्याचे नेमके स्वरूप काय?

विवेकनिष्ट विचार सरणी ते एक्झिस्टेंशिअलिझम

विवेकनिष्ट विचार सरणी.

डॉ. अल्बर्ट एलिस यांनी सर्वसामान्य ना 'स्व' कडून 'स्वतः' कडे वळवणारी उपचार पद्धती ही निश्चितपणे एक्झिस्टेंशिअलिझम या पाटीखाली येणारी आहे असे दिसते.

यामध्ये पण बाहेरील कोणत्याही घटकापेक्षा 'स्वतः' काय करू शकतो आणि जबाबदारी घेऊ शकतो आणि घेतो. या गोष्टीला महत्त्व आहे. (यावर किशोर फडके यांनी मराठी मध्ये लेखन केले आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांचे 'स्वभाव-विभाव' हे पुस्तकही या संदर्भात वाचनीय आहे. आवांतर: येवढेच काय तुकारामाच्या अनेक अभंगांमध्ये पण याचे दाखले आहेत. पण हा एक वेगळाच विषय आहे. असो.)

जालावर या विषयी इंग्रजी मध्ये खूप माहिती आहे. शिवाय Rational Emotive Behavior Therapy (REBT) असा शोध द्या आणी पहा...

(खरं तर 'विवेकनिष्ट विचार सरणी' हा स्वतंत्र लेखाचाच विषय आहे. आणी या 'दोघांचा एकमेकांशी' हा अजून एका लेखाचा ;) )

विवेकनिष्ट विचार सरणी ते एक्झिस्टेंशिअलिझम असा कोणी संबंध जोडणारे लेखन केले असल्यास कल्पना नाही, अजून वाचनात आले नाही.

आपला
निनाद.

अवघड

निनाद
या दोन्हींचा संबंध नक्की काय आहे हा अवघड प्रश्न आहे. REBT किंवा कॉग्निटिव्ह थेरपी यामध्ये मूळ मुद्दा हा आहे की आपल्या भावना आपल्या विचारांनी बनतात. विचार सकारात्मक असतील तर भावनाही सकारात्मक होतील. तुम्ही उत्तम संदर्भ दिले आहेत. याशिवाय कॉग्निटिव्ह थेरपीवर हा दुवा चांगला आहे.
राजेंद्र

छान लेख.

राजेंद्र,
लेख आवडला. आपण् अगदी सोप्या भाषेत तत्वज्ञानाच्या या प्रवाहाची ओळख करुन दिली आहेत.
आपण ज्याचा उल्लेख निश्चा असा ´केला आहे तो तत्वज्ञ आणि नित्से हे एकच का?
या तत्वज्ञानांबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल तसेच त्यांच्या विचारांच्या परिणामांबद्दल मराठीतून अजून माहिती करुन घ्यायला नक्कीच आवडेल.

तत्वज्ञान ज्यांना पटते त्यांना ते पटवून देण्याची गरज पडत नाही,
या आपल्या मताशी सहमत आहे.

-- लिखाळ.

धन्यवाद

लिखाळ
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हो, निश्चा किंवा नित्से एकच. जर्मनमध्ये त्याचा उच्चार बहुधा वेगळा असावा. यावर जसे जमेल तसे लिहीनच.
राजेंद्र

लेख

विचार करायला लावणारा आहे, आणि आवडला. पण जबाबदारी संदर्भात (विशेषतः) एक विचारावेसे वाटते. की जर एका गोष्टीची जबाबदारी घेतली आणि दुसरी इतर कोणी करतील म्हणून केली नाही किंवा अजाणता करायची राहिली तर जी गोष्ट केली नाही त्याची जबाबदारी आलीच. म्हणजे प्रत्येकावर अमर्याद जबाबदारी घेणे आले. काही गोष्टींची १०० टक्के तर काहींची नगण्य, पण तरी जबाबदारी आलीच. ती न घेण्यामुळे (स्थळ काळाच्या मर्यादा असल्याने) नैराश्य म्हणणार नाही, पण अपराधीपणा वाटू शकतो. म्हणजे सार्त्र यांना कश्या प्रकारची समाजरचना अपेक्षित होती हे त्यांनी कुठे सांगितले आहे का?

नित्शेबद्दल आपण काय लिहिता ते वाचायला आवडेल.

चित्रा

धन्यवाद

चित्रा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चांगला प्रश्न आहे. सार्त्र यांच्या तत्वज्ञानातील मुख्य मुद्दे आहेत स्वातंत्र्य आणि जबाबदारी. स्वातंत्र्य याचाच अर्थ आपल्याजवळ पर्याय आहेत.
जबाबदारी घेतल्यावर आपल्याला अपराधी वाटते की नाही हे आपण जबाबदारीकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघतो यावर अवलंबून आहे. जबाबदारी घेणे म्हणजे ओझे घेणे अशी भावना असेल तर अपराधी वाटण्याची शक्यता आहे. पण जबाबदारी म्हणजे परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची पहिली पायरी असा दृष्टीकोन असेल तर अपराधी वाटायला नको. दुसरे म्हणजे जरी जबाबदारी घेतली तरी आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही ह्याची जाणिव असायला हवी. उदा. प्रदूषण वाढते आहे, त्याला मी ही जबाबदार आहे. समजा मी प्रदूषण थांबवण्यासाठी काही उपाय केले, तर त्याचा अर्थ मला माझी जबाबदारी समजली. पण मी उपाय केले म्हणून प्रदूषण लगेच थांबेल का? नाही. पण त्यासाठी मला अपराधी वाटण्याचे कारण नाही. तिसरे म्हणजे शेवटी माणूस म्हटले की चुका होणारच. समजा, एखादे काम आपण करणे अपेक्षित होते पण केले नाही, तर त्याबद्दल लगेच स्वत:ला अपराधी ठरवण्याची गरज नाही. फक्त असे परत व्हायला नको याची जाणीव ठेवायला हवी.
सार्त्र यांच्या मते जर आपल्याला तत्वाधिष्टीत समाज हवा असेल तर त्यासाठी काही मूल्यांची आवश्यकता आहे, यात जबाबदारी एक महत्वाचा भाग आहे.
समजा आपण जबाबदारी न घेता ती टाळत गेलो तर काय होईल याची कल्पना केली तर हे तत्व अधिक स्पष्ट होते.

नित्शे(हा उच्चार चांगला वाटतो) फारच मनोरंजक आहे, त्याच्या विषयी काही जमते का बघू या.

राजेंद्र

वैचारिक

असा वैचारिक लेख बरेच दिवसांत् वाचनात आला नव्हता. त्यांना स्वातंत्र म्हणजे उपलब्ध पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य म्हणजे निर्णयस्वातंत्र्य अपेक्षित असावे. एकूण् हे तत्त्वद्न्यान् कर्मसिद्धांताशी मिळतेजुळते वाटते का? आपल्या निर्णयाची पर्यायने कर्माची जबाबदारी आपलीच असते आणि त्याचे बरेवाइट् परिणाम आपल्यालाच् भोगावे लागतात.

- अमृतांशु

बरोबर

अमृतांशु,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपली स्वातंत्र्याची व्याख्या अचूक आहे. सार्त्र यांना हेच म्हणायचे होते.
कर्मसिद्धांताबद्दल मला माहिती नाही त्यामुळे त्याच्याशी याचा कसा संबंध आहे याची कल्पना नाही. आपल्या व्याख्येवरून तरी साम्य आहे असे वाटते.
राजेंद्र

स्वातंत्र्य

निखळ स्वातंत्र्य याचा अर्थ तुम्हाला जे हवे ते साध्य करण्याचे, मिळवण्याचे स्वातंत्र्य नव्हे, याचा अर्थ आहे प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य, तुमचा दृष्टीकोन बनवण्याचे स्वातंत्र्य, त्या दृष्टीकोनातून जगाशी वागण्याचे स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य

स्वातंत्र्याची ही व्याख्या खूप् आवडली.
अनिरुद्ध दातार

मलाही

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मलाही ही व्याख्या आवडते. असे वागणे अवघड आहे, अशक्य नक्कीच नाही. अडचण ही आहे की बरेचदा आपली अशी समजूत असते की आपण स्वतंत्र निर्णय घेतो पण तसे नसते. त्याला कारणीभूत असणारे घटक आपल्या लक्षात येत नाहीत. आपले पूर्वग्रह, दूषित मते हे सर्व आपल्या वागण्यात बेमालूमपणे मिसळून गेलेले असतात. आत्मपरिक्षण अवघड आहे ते याचसाठी.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

अस्तित्ववाद

परवाच म्हणजे गुरुवारी याच विषयावर प्रा. रेखा साने यांचे पुण्यात गीताली निवास ( गीताली वि.म) यांचे घर येथे या विषयावर संवाद झाला. खूप सोप्या भाषेत हा विषय त्यांनी मांडला होता.
प्रकाश घाटपांडे

अर्थ

खूप सोप्या भाषेत हा विषय त्यांनी मांडला होता.

"सोप्या भाषेत" हे जाड टायपात का दिले कळले नाही. हा लेख वाचायला अवघड आहे असा याचा अर्थ असेल तर तसे सरळ लिहीले असते तरी हरकत नव्हती. तत्वज्ञान हा माझा विषय नाही. या विषयातील तज्ञांचे व्याख्यान सोपे आणि सुलभ असले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. किंबहुना मला जे काही थोडेफार कळले आहे ते याच विषयातील तज्ञ प्राध्यापक रॉबर्ट सोलोमोन यांच्या व्याख्यानांमुळे शक्य झाले आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

प्रतिसाद

प्रतिसाद द्यायचा राहून गेला. खुप उशीरा लक्षात आले ते.जाड टाईप हा केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी. हा तिरकस प्रतिसाद नव्हे. पुलंच्या भाषेत "खवचट" नव्हे. कृपया गैरसमज नसावा. आपण संकलित स्वरुपात माहितीपुर्ण लेख देत आहात हेच मोठे योगदान आहे. तो विषय गीतालीं कडे घरगुती गप्पा या स्वरुपात होतो. प्र्श्नोत्तरे होतात, एवढच मला खर सांगायच होतं.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर