माझंही एक स्वप्न होतं....

"फार वर्षांपूर्वी मी आणंदला आलो, ती माझी इच्छा नव्हती, तर सक्ती होती. अमेरिकेतल्या माझ्या शिक्षणाकरता भारत सरकारनं पैसे दिल्यामुळे एका करारान्वये मी सरकारशी बांधील होतो. मी पदवीनं इंजिनियर होतो. मला मुख्यत्वेकरून फिजिक्स आणि मेटलर्जी या विषयात रस होता. परंतु दुग्धव्यवसाय अभियांत्रिकीमध्ये पुढचं शिक्षण घ्यावं लागलं. तो एकापरीनं जुलमाचा रामराम होता. त्यानंतर आणंद इथल्या सरकारी 'लोणी संशोधन प्रक्रिया संस्थे' मध्ये कराराचा भाग म्हणून मला जबरदस्तीनं नोकरी करावी लागली आणि त्यानंतर जेव्हा मी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थेत दाखल झालो, तेव्हा या क्षेत्राबाबत माझं काही फारसं प्रशिक्षण झालेलं नव्हतं.
ग्रामीण भारताशी काहीही सोयरसुतक नसलेला मी एक शहरी तरुण होतो. माझी शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी होती, परंतु शेतकरी आणि शेतीविषयक ज्ञान यथातथाच होतं. त्यानंतर अनेक घटना घडत गेल्या. या एका मागोमाग एक घडणाऱ्या अपघाती प्रसंगांमुळे भारतातला दुग्धव्यवसाय पूर्वी होता तसा राहिला नाही, असं आज मागं वळून पाहताना मी म्हणू शकतो. आज ज्या प्रमाणात दुग्धव्यवसायाचा विकास झाला आहे, त्याला कारणीभूत या 'अपघाती घटना' आहेत आणि मीही आज जो आहे तो तसा नसतो, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही."

हे मनोगत आहे भारतातील 'धवलक्रांतीचे जनक' वर्गीस कुरियन ह्यांचे.
त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती,अविरत मेहनत,जीवघेणा संघर्ष आणि आपल्या कामावरील निष्ठेच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. जे 'अमूल' हे नाव आता जगभरच्या दुग्धव्यवसायात प्रसिद्ध आहे त्या अमूलच्या निर्मितीमागची कहाणी म्हणजेच 'माझंही एक स्वप्न होतं' हे वर्गीस कुरियन ह्यांचे आत्मचरित्र आहे.

हे स्वप्न साकार करताना जशी त्यांना बऱ्याच भल्या माणसांची मदत झाली तसाच टोकाचा विरोधही झाला. हा विरोध करणारे लोक कुणी सामान्य नव्हते. तर ह्या धंद्यातले प्रस्थापित लोक,'नेस्ले'सारख्या परदेशी कंपन्या, बडे सरकारी अधिकारी आणि मातब्बर राजकारणी. पण ह्या सगळ्यांना कुरियन पुरून उरले. वेळच्या वेळी नेमकी उपाययोजना करून त्यांनी ह्या बड्या विरोधकांचा विरोध मोडून काढला.

कुरियन ह्यांची काम करण्याची पद्धत अतिशय आदर्श अशी आहे. आधी ते आपली योजना अतिशय काळजीपूर्वक बनवतात. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन ते ती नीट समजावून देतात. त्यावर साधक-बाधक चर्चा घडवून आणतात आणि एकदा ती सगळ्यांकडून संमत झाली की मग धडकपणे अमलात आणण्यासाठी अक्षरशः आपल्या जीवाचे रान करतात. आपल्या बरोबर काम करणारे सहकारी देखिल त्यांनी अगदी पद्धतशीरपणे निवडलेले आहेत. योग्य माणसांची पारख करण्यात ते पटाईत आहेत. त्यांच्या बेधडक काम करण्याच्या वृत्तीमुळे जसे त्यांनी असंख्य शत्रू निर्माण केलेत तसेच काही हमखास उपयोगी पडतील असे मित्रही जोडलेले आहेत.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्यापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांचा विश्वास आणि नि:संदिग्ध पाठिंबा मिळवण्यातही ते यशस्वी ठरलेले आहेत.
हे आत्मचरित्र वाचताना आपल्याला जागोजागी धक्के बसतात. कारण अतिशय परखडपणे आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता केलेले हे कथन आपल्यालाही आत्मसंशोधन करण्यास प्रवृत्त करते. कुरियनसाहेबांच्या परखडपणाचा एकच नमुना इथे पेश करतो त्यावरून आपल्याला त्याची कल्पना येईल.

"आणंदला भेट द्यायला न्यूझीलंडच्या उच्चायुक्त आल्या होत्या. त्यांनी कुरियनना सांगितले, "तुम्ही दूध उत्पादन करता, दुधाची भुकटी बनवता हे कौतुकास्पद आहे. पण जिथे आम्ही माल पुरवतो त्या परदेशातही आपण आपला माल निर्यात करता असे आम्हाला कळलंय. तेव्हा तुम्ही ते करता कामा नये."
खरे तर असा उद्धटपणा आणि तोही एका परदेशी व्यक्तीकडून सहन करणे हे कुरियन ह्यांच्या स्वभावात नव्हते पण एक स्त्री दाक्षिण्य म्हणून ते सौम्यपणे म्हणाले, "बाईसाहेब,अगदी खरं सांगायचं तर जागतिक बाजारपेठ ही तुमची खाजगी मालमत्ता आहे हे मला माहीत नव्हतं."
त्यावर त्या बाई उखडल्या आणि कुरियनना अद्वातद्वा बोलू लागल्या. त्यावर साहजिकच कुरियन ह्यांचा संयम सुटला आणि ते म्हणाले, "बाईसाहेब, तुम्ही न्यूझीलंड नावाच्या एका टीचभर देशाच्या प्रतिनिधी आहात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही सगळ्या भारतीयांनी एक होऊन तुमच्या देशावर थुंकायचं ठरवलं, तर तुमचा देश आमच्या थुंकीत बुडून जाईल."
हे ऐकताच त्या बाई ताबडतोब तिथून निघून गेल्या."

तेव्हा मंडळी हे पुस्तक जरूर वाचलेच पाहिजे असे आहे.

इंग्लिश आवृत्ती आय टू हॅड अ ड्रीम... निवेदनः वर्गीस कुरियन; शब्दांकनः गौरी साळवी.
मराठी आवृत्तीः माझंही एक स्वप्न होतं..... अनुवादः सुजाता देशमुख
राजहंस प्रकाशन.
किंमतः २०० रुपये.

Comments

पुस्तक परिचय मस्त !!!

देव साहेब,
'माझंही एक स्वप्न होतं' या वर्गीस कुरियन ह्यांच्या आत्मचरित्राचा पुस्तक परिचय आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच

'माझंही एक स्वप्न होतं' या वर्गीस कुरियन ह्यांच्या आत्मचरित्राचा पुस्तक परिचय आवडला.

असेच म्हणतो.
-ऋषिकेश

वाह!

धवलक्रांती , अमूल व वर्गीस कुरियन ह्यांचा संघर्ष नक्कीच वाचनीय असेल. विशेषता अतिशय परखडपणे आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता केलेले हे कथन असल्याने. :-)

छान परिचय

डॉ. कुरियन ह्यांच्या आत्मचरित्राचा मोजक्याच शब्दात परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यात उल्लेखिलेली घटना (न्यूझिलंडच्या उच्चायुक्तांची) तसेच इतर काही संदर्भांबाबत कुतुहूल आहे. तेव्हा हे पुस्तक मिळवून वाचलेच पाहिजे.

जाता जाता, एक अडाणी प्रश्नः ८०' च्या दशकात महाराष्ट्रातही धवल क्रांती झाली. त्यावेळी कुठेतरी अंधुक असे वाचल्याचे आठवते की डॉ. कुरियनांनी आपल्यापुढे बरेच अडथळे निर्माण केले होते. प्रश्न अडाणी आहे, कारण त्याबद्दल मला नक्की काहीच माहिती नाही, जे काही अंधूक वाचले होते त्यावरच मी हे विचारत आहे. कुणाला ह्याबद्दल काही ठोस माहिती असली तर ती कृपया इथे द्यावी. चू. भू. द्या. घ्या.

भारताचा गवळी

कुरियन यांना भारताचे गवळी (इंडियाज् मिल्कमॅन) असेही म्हटले जाते. त्यांचा परिचय आवडला. (पुस्तक वाचणे सध्या शक्य नसल्याने थोड्या विस्ताराने आला असता तरी आवडले असते.) अमूलद्वारे त्यांनी भारतात आणलेली धवलक्रांती कौतुकास्पद आहे.

अवांतरः न्यूझिलंडच्या उच्चायुक्तांचा प्रसंग थोडा भडक वाटला, म्हणजे उच्चपदस्थांनी (किंवा इतरांनीही) एकमेकांशी इतक्या खालच्या थरावर येऊन बोलावे याचे आश्चर्य वाटले.

आभार

नव्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. पुस्तक कसे असेल याबद्दल उत्सुकता आहे.

 
^ वर