उपक्रम...मराठीतून व्यक्त होण्याचा!

आज महाराष्ट्र टाइम्सने कात टाकून नवीन आकर्षक रचना असलेले संकेतस्थळ चालू केले आहे. त्यावर उपक्रम बाबत खालील लेख छापण्यात आलेला पाहीला. त्याबद्दल उपक्रम त्याचे कर्ते आणि संपदकांचे अभिनंदन!

उपक्रम...मराठीतून व्यक्त होण्याचा!
13 Nov 2007, 1902 hrs IST
- नील वेबर

' कम्युनिटी सव्हिर्सेस ' साठी आता इंग्रजी वेबसाइट्सवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण आता काही मराठी साइट्सवरच ही सोय उपब्लध झाली आहे. त्यात उपक्रम डॉट ओरजी या साइटचं नाव घ्यायलाच हवं. ज्ञानेश्वरांची ही मराठी आता खऱ्या अर्थाने ग्लोबल व्हायला सज्ज झाली आहे.

समजा , मला एखाद्या विषयावर गप्पा मारायच्या आहेत. पण माझ्या आजूबाजूला असणाऱ्या कुणालाच त्यात रस नाहीए , तर मी काय करायचं ? या प्रश्ानचं उत्तर कालच्या पिढीने दिलं तर ते म्हणतील , त्या विषयाचे छंद मंडळ किंवा ग्रुप जमवता येईल. पण आजची पिढी म्हणेल , सोप्पंय... नेटवर जायचं , त्याविषयाची कम्युनिटी सुरू करायची आणि आपलं म्हणणं ठणकावून सांगायचं. ज्यांना पटेल ते देतील रिप्लाय... नाही तर गेले उडत!

इंग्रजी भाषेत अशा ' कम्युनिटी सव्हिर्सेस ' देणाऱ्या अनेक साइट्स इंटरनेटवर आहेत. पण आता यासाठी इंग्रजीवर अवलंबून राहण्याचीही गरज नाही. आपल्या मराठीतही अशा कम्युनिटी साइट्स विकसित होत आहे. आपलं शिक्षण , वाचन , अनुभव आणि माहितीच्या आधारे आपल्या विचारांची देवाणघेवाण करणं शक्य व्हावं हे साइटच्या निमिर्तीचं उद्देश आहे. हे विचारमंथन करण्यासाठी मराठी , तसंच हवं असेल तर इंग्रजी भाषेचाही पर्याय इथे उपलब्ध आहे.

साइटवर इंग्रजीतून लिहिण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी बरेचसे म्हणजे जवळपास सगळेच लेखन मराठीतून आहे , ही बाब सुखावून जाते. व्यवहारी जगात इंग्रजीचा वापर करणारी ही माणसं इंटरनेटवर आपले विचार व्यक्त करायला मात्र मातृभाषेचाच आधार घेतात , ही बाब मराठीच्या

नावाने गळे काढणाऱ्यांना दाखवायला हवी. मायबोलीतून व्यक्त होणं जसं सहज घडतं तसंच वाचणाऱ्यालाही आपल्या भाषेतून , आपल्या जवळच्या विषयावर बोलणारा माणूस जास्त भावतो. म्हणूनच इथल्या अनेक चर्चांना मिळालेले प्रतिसाद अचंबित केल्याशिवाय

राहत नाहीत.

साइटच्या मुखपृष्ठावर अनुक्रमाणिकेसारखी विषयांची यादी आहे. त्यात लेखनाचा प्रकार , विषयाचं शीर्षक , लेखक , प्रकाशनाचा कालावधी , प्रतिसादांची संख्या आणि शेवटचे लेखन कधी झालं याची माहिती पाहता येते. या साइटवर लेखन करण्यासाठी साइटचं सभासदत्त्व स्वीकारावं लागत असलं तरी इथले विविध विषय वाचण्यासाठी मात्र सर्वांनाच मोकळीक आहे. त्यामुळे या चचेर्त सहभागी होणाऱ्यांसोबत नुसतीच भेट देणाऱ्या पाहुण्यांची संख्याही लक्षात घ्यायला हवी.

तसं या साइटला कोणत्याच विषयाची अॅलजीर् नाही. त्यामुळे प्रवासवर्णनापासून गणितापर्यंत आणि साहित्यापासून अर्थव्यवहारापर्यंत कोणताही विषय वाचायला मिळतो. याहून अन्य कोणता तरी विषय तुम्हाला सुचवायचा असेल तर संपादकीय मंडळाची त्यासाठी ना नाही. पण उगीचच उथळ विषय साइटवर येऊन मर्यादा ओलांडल्या जाऊ नयेत म्हणून नव्या विषय सुरू करण्यापूवीर् संपादकीय मंडळाची परवानगी घेणं आवश्यक ठरतं. त्यामुळे तुम्ही एखादी नवा ' समुदाय ' ( म्हणजेच कम्युनिटी हो!) सुरू केलात की तो लगेच ऑनलाइन अस्तित्वात येणार नाही. पण तो मान्य झाला की लगेच नेटवर दिसू लागेल.

हे समुदाय कसे बनवायचे , त्यात लेख कसे लिहायचे , मराठीतून टायपिंग कसं करायचं , लिहिलेल्या लेखाचं संपादन कसं करायचं हे आणि इतर अनेक सुविधांची माहिती इथल्या सहाय्य या लिंकवर वाचता येते. अन्य सभासदांना वैयक्तिक निरोप पाठवायचे असतील तर तेही इथे नोंदवता येतात. तसंच बऱ्याच लोकप्रिय साइट्सप्रमाणे नोंदी करण्यासाठी स्क्रॅपबुकचीही व्यवस्था ' खरड-वही ' या मजेशीर पण सुंदर नावाखाली सभासदांना उपलब्ध आहे.

आता या साइटवरच्या काही विषयांबद्दल बोलू या. यात ' मराठी भाषेतले फारसी शब्द ' यावर चांगली चर्चा घडून आलेली आढळते. पण अशा विषयांमध्ये लोकांचे प्रश्ान्च अधिक आणि उत्तरं कमी असं झालं आहे. तेव्हा या माहितीपूर्ण विषयांवरच्या चचेर्साठी , किमान चर्चा रंगात आल्यानंतर तरी संपादकीय मंडळाने एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला शंकानिरसनासाठी आमंत्रित करावं जेणेकरून ही माहिती केवळ शाब्दिक चर्चा न राहता एक दस्ताऐवज म्हणून संग्राह्य ठरेल.

एवढं असलं तरी केवळ प्रवास , आठवणी , गाणी असले लोकप्रिय विषय या साइटवर नसून ' अयुक्लिडीय भूमिती ', ' शेअर बाजारातली एकाक्षरी समभागचिन्हं ' असे विषयही इथे चचेर्साठी आहेत. यासाठी त्या मूळ लेखकांचं मनापासून अभिनंदन करायला हवं. असेही विषय असू शकतात आणि त्यावरही गप्पा मारता येतात हे पाहिल्यावर थक्क व्हायला होतं.

नेटकरहो , मराठीतली ही फक्त सुरुवात आहे. मराठी इंटरनेट अजूनही ' विकसीनशील ' या अवस्थेत आहे. आत्ताच जर अशा पद्धतीने चर्चा होत असतील , तर भविष्यकाळाच्या नावाने उगाच बोटं मोडत बसण्यात काहीच अर्थ नाही. पण ही अवस्था लवकरच पुढल्या टप्प्यात जायला हवी. नेटवर मराठीत लिहिणं , आपले विचार मांडणं अधिकाधिक सोपं व्हायला हवं. तेव्हाच ज्ञानोबाची ही मराठी खऱ्या अर्थाने तिच्या विश्वरूपी घरात अभिमानाने नांदू शकेल.

Comments

अरे वा! खल्लास

उपक्रमराव व मंडळींचे हार्दीक अभिनंदन!!!

गुंडोपंताचे डोळे भरून येणार. :-)

अरे वा!

संचालक, लेखक आणि वाचक सगळ्यांचं अभिनंदन! तरिच आज ६८ पाहुणे जमले आहेत ;) (रोज इतके असतात का? )

(खुष) ऋषिकेश

पुन्हा अभिनंदन

उपक्रमाचे पुनश्च अभिनंदन! पुन्हा म्हणायचे कारण असे की प्रमोद देवांनी आधीही हाच लेख दाखवून दिला होता ना. की तो वेगळा लेख होता? माझा थोडा गोंधळ उडालाय. तेव्हा नोवेंबरची तारीख नव्हती, उपक्रम सुरु झाल्या झाल्या तो लेख आला होता.

ते काहीही असो. मटाच्या बदललेल्या रुपात या लेखाला पुन्हा स्थान मिळावं हीच कौतुकाची गोष्ट आहे.
---------

लेख मिळाला. दुवा येथे आहे.

माहीत नव्हते!

प्रमोदरावांनी हाच लेख दिल्याचे माहीत नव्हते. मी त्याची तारीख पाहीली आणि नविन लेख वाटला! (लेखकाचे नाव पण वेगळे वाटले).

विकास

अभिनंदन

सर्व संबंधितांचे अभिनंदन ! आमच्या हार्दिक शुभेच्छा !

वा वा!

वा वा!
अशी अधुन मधून प्रसिद्धी मिळाली तरच लोकं येतील नि येथे नवीन विषय येतील ना?
नाहीतर आहेच परत परत तेच तेच!!!

अच्छा म्हणून काल नवीन नावं दिसत होती इथे... वा!

आपला
गुंडोपंत

खरे यश

उपक्रम आज स्वतःचे स्थान राखून आहे त्याचे कारण "प्रतिसाद संपादित" हेच आहे असे मला वाटते. तेच उपक्रमपंतांचे "बलस्थान" आहे आणि "मर्यादा" देखील . माझे देखील काही प्रतिसाद संपादित झाले आहेच ना! माझी पहिली पोस्ट http://mr.upakram.org/node/276 ही चर्चेचा प्रस्ताव म्हणुन टाकली त्यावेळी मी उपक्रमपंतांच्या जवळचा परिचित मित्र नातेवाईक असावा असा संशय तात्पुरता का होईना व्यक्त झाला होता. त्यावेळी मला टंकन अजिबात येत नव्हते त्यामुळे तत्परतेने उत्तरे देता येत नव्हती.
( आजही हे उपक्रमपंत कोण आहेत? हे माहीत नसलेला)
प्रकाश घाटपांडे

जरब

उपक्रम आज स्वतःचे स्थान राखून आहे त्याचे कारण "प्रतिसाद संपादित" हेच आहे असे मला वाटते.

मलाही. जरब असली की सर्व मुले सरळ चालतात. काही वात्रट असतात हो. त्यांना वर्गबंधूंनीच वठणीवर आणायचे असते.

आजही हे उपक्रमपंत कोण आहेत?

ते पंत आहेत का तेही माहित नाही हो! पण काय फरक पडतो?

माझ्याकडूनही उपक्रमाचे अभिनंदन.

-राजीव.

 
^ वर