दुसरे जाळे - वेब २.०: प्रस्तावना
लेखाचे शीर्षक वाचून हे वेब २.० काय आहे, 'पहिले जाळे' किंवा वेब १.० कोणते, माझा या दुसर्या जाळ्याशी आणि त्याचा माझ्याशी काय संबंध, इत्यादी प्रश्न पडले का? पडले नसतील तर जरूर पाडून घ्या कारण लवकरच वेब २.० आपल्या सगळ्यांच्या जीवनातला एक सर्वपरिचित शब्दप्रयोग बनायच्या मार्गावर आहे. आज पहिले जाळे किंवा वेब १.० हा इतिहास आहे. आज इंटरनेट किंवा आंतरजाल किंवा वैश्विक जाळे ज्या स्वरूपात आहे, त्या स्वरूपापर्यंत उत्क्रान्त होण्यासाठी - म्हणजे दोन संगणक एकमेका़शी 'इलेक्ट्रॉनिकली' संवाद साधायला लागल्यापासून ते इंटरनेटच्या आजच्या रूपापर्यंत उक्रान्त होण्यासाठी - जवळजवळ पंचवीसेक वर्षांचा कालावधी जावा लागला आहे. उपक्रमावर तुम्ही हा लेख वाचत असताना एकीकडे लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, टाईम्स ऑफ इन्डिया सारखी वृत्तपत्रे ऑनलाइन वाचत असाल; माझ्यासारखेच उपक्रमावर किंव अन्यत्र लेखन करत असाल; आपले विरोप तपासून उत्तरे देत असाल; कोणत्याशा संकेतस्थळावर नवीन चित्रपटाची गाणी ऐकत असाल; हवामानाविषयी कुठेतरी काहीतरी वाचत असाल किंवा कदाचित काहीतरी वेगळे. पण येनकेनप्रकारेण किंवा या ना त्या कारणाने तुम्ही आंतरजालामध्ये गुरफटलेले आहातच. पण ते करत असताना पंचवीस वर्षांच्या या तांत्रिक सफरीचा इतिहास माहीत करून घ्यायचे, त्या सफरीतले वाटसरू व्हायचे, किंवा त्या सफरीत आपल्याकडची शिदोरी इतर वाटसरूंशी वाटून खायचे भाग्य आपल्यापैकी किती जणांच्या वाट्याला आले? हे जाळे विणले गेल्यापासून आपल्यापैकी किती जणांनी नवनवे धागे यात गुंतवायला, ठिगळे जोडायला हातभार लावला? आजवर तुम्हाला यांपैकी काहीच करायला जमले नसेल, तर वेब २.० च्या माध्यमातून तुम्हाला ती संधी मिळते आहे, मिळत राहणार आहे. वेब २.० म्हणजे कोणते नवे तंत्रज्ञान नाही. ती एक संकल्पना आहे. तंत्रज्ञान आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान, विचारसरणी, मूल्ये, संस्कृती एकमेकांत विणून तयार होणार्या आगामी युगातील आंतरजालाची संकल्पना म्हणजे वेब २.०. आणि आगामी आगामी म्हणजे एखाद्या नव्या चित्रपटाची जशी हवा तयार केली जाते तसेही काही वाटून घ्यायची गरज नाही; कारण या संकल्पनेची सुरुवात झालेलीच आहे; आणि कळतनकळत आपण सगळेच या नवीन आंतरजालाच्या जडणाघडणीतले मौल्यवान योगदान देणारे मोहरे, या नव्या आंतरजालाचे उपभोक्ते आणि या सुंदर तांत्रिक उत्क्रांतीचे साक्षीदार झालेलो आहोत, होत आहोत. हेच सगळे अतिशय सोप्या भाषेत, शक्य तेथे चित्रमय स्वरूपात आणि काही रोचक स्वाध्याय, सोपे प्रयोग आणि संबंधित ऊहापोह यांच्या माध्यमातून तुमच्यासमोर उलगडून दाखवायचा माझा भाबडा प्रयत्न म्हणजे ही लेखमाला.
या लेखमालेतील ठळक प्रकरणे खाली नमूद केली आहेत -
१. आंतरजालाचा संक्षिप्त इतिहास
२. अशील-सेवक (क्लायन्ट-सर्वर) कार्यप्रणाली आणि वेब १.०
३. वेब २.० ची गरज
४. समाजजाल आणि सहकार्य - लोकांचे, लोकांसाठी, लोकांकडून
५. नव्या विकासपद्धती, धोरणे आणि नवीन उपयोजनवर्ग
६. उपसंहार
तसेच प्रत्येक प्रकरणानंतर संबंधित प्रकरणावर स्वाध्यायासारखा एखादा रोचक गृहपाठ द्यायचा किंवा शक्य असल्यास सोपे प्रयोग करण्यासाठी उद्युक्त करायचा, प्रयोगांशी संबंधित मार्गदर्शन करण्याचा आणि खुली चर्चा करण्यासाठी मुक्त मंच उपलब्ध करून द्यायचा माझा विचार आहे.
प्रस्तावनेवरून वेब २.० बद्दल उत्सुकता चाळवली गेली असल्यास, लेखमाला वाचण्यात आणि मुख्य म्हणजे संबंधित गृहपाठ आणि प्रयोग आवडीने करण्यात रस निर्माण झाल्यास पुढील लेखन करण्यास उत्साह वाटेल.
कळावे.
- परीवश
Comments
अभिनंदन
लेखमाला सुरु करण्याबद्दल आपले अभिनंदन. क्लायन्ट-सर्वर साठी अशील-सेवक हा शब्दप्रयोग आवडला.
'वेब २.० ची गरज' या मुद्द्या नंतर् 'वेब २.० ची स्वरुप' असेही येउद्या की.
गृहपाठ करण्यास उत्सुक,
प्रसाद
ता.क. : मित्रांनो 'शोधयंत्राचा शोध' .... आठवले का काही ?
वेब २.० चे स्वरूप
वेब २.० चे स्वरूप प्रकरणे ३,४,५ एकत्रितपणे सामावून घेणार असल्याने तूर्तास वेगळे प्रकरण केलेले नाही. खरे तर स्वरूप आणि प्रकरणे ४ व ५ यांची घनिष्ट परस्परपूरकता आणि चौथ्या व पाचव्या प्रकरणाचे सध्या मनात असलेले सविस्तर रूप लक्षात घेतले, तर वेब २.० चे स्वरूप सांगण्यासाठी वेगळ्या प्रकरणाची गरज पडायची नाही, असे वाटते आहे. गरज पडल्यास नवे प्रकरणही जोडता येईल; पण त्यामुळे पुढच्या प्रकरणांमध्ये पुनरावृत्ती आणि तोचतोचपणा आल्यास लेखन कंटाळवणे होण्याची शक्यताही आहेच. असो. पाहूया.
प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
छान उपक्रम
लेखांची वाट बघतो आहे.
असेच
म्हणतो. येऊ द्यात.
सुंदर उपक्रम
आमच्यासारख्या अर्धवट संगणक ज्ञान असणार्या लोकांना त्याचा उपयोग होईल.
अवांतर- संगणकाचे अर्धवट ज्ञान असणार्या आमच्यासारख्या लोकांना त्याचा उपयोग होईल. (असेही वाचावे)
प्रकाश घाटपांडे
छान.
लवकर लिहा. (वेब ३.० ही येऊ घातले आहे म्हणे.)
(लेखात परिच्छेद पाडता आले तर उत्तम.)
उत्सुकता
लेखमालेचा विषय चांगला आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे.
असेच
म्हणतो. पुढील भाग येउ देत.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
आकांड तांडव
वेब २.०, आणि रिलेशनल डाटाबेस ह्यावर नुकतेच आलेले लेख आणि तुमचे आकांड तांडव ह्यांचे कसलेही कोरिलिशेन आहे असे आम्हाला तरी वाटत नाही. दोन्ही लेखाच्या लेखकांनी तसे मान्य केल्यास आम्हाला आनंदच होईल पण वरकरणी तरी तसे कसलेही असोसिएशन दिसत नाही.
(ऍनालिष्ट) कोलबेर :)