स्वा. सावरकर आणि हिंदूत्वाची व्याख्या

अनादी मी अनंत मी अवध्य मी भला मारील रिपू जगती असा कवण जन्मला...
...अग्नी मजसी जाळीना खड्ग छेदीतो भिऊन मला भ्याड मृत्यू पळत सूटतो...
.. लोटी हिंस्त्र सिंहांच्या पंजरी मला, नम्र दाससम चाटील तो पदांगुला, कल्लोळी ज्वालांच्या फेकीशी जरी हसून भवती रचिल शीत सूप्रभावली...

- स्वा. सावरकर

वरील ओळींनी सुरवात करण्याचे कारण इतकेच की सावरकरांनी इच्छा मरण स्विकारून आता ४० वर्षे झाली, त्यांनी ना धड कधी सत्तेचे पद मिळवले ना धड कधी ऐश्वर्य भोगले. त्यांचे समर्थक कितीही चांगले असले तरी त्यांना त्यांचे तत्वज्ञान किती कळले, पचनी पडले हा एक गहन प्रश्नच आहे. तरी देखील सावरकरांचे विरोधक आजही त्यांच्या अत्यंत तर्कशुद्ध विचारांना चळाचळा कापतात. त्यातील सर्वात ज्यावरून आजही सावरकरांवर टिका होते तो विषय म्हणजे त्यांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या.

मी त्यांचा हिंदू कोण हा लेख नुकताच वाचला. लहानसा आहे आणि त्यात हिंदुत्वाची व्याख्या आणि त्यावरील उहापोह आहे. लेख संदर्भासहीत जसाच्या तसा मांडत आहे. उपक्रमींना तो वाचल्यावर काय वाटले हे समजायला आवडेल.

विकास

हिंदू कोण?

आसिंसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका |
पित्रूभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृतः ||

हिंदू हा शब्द हिंदूसंघटनाचा केवळ पायाच होय. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ ज्या मानाने व्यापक वा आकुंचित, बळकट अथवा ढिला, चिरंतन वा चंचल त्या प्रमाणातच त्या पायावर उभारलेले हे हिंदुसंघटनाचे प्रचंड बांधकाम व्यापक, भक्क, टिकाऊ ठरणारे आहे.

वेद ह्या धर्म ग्रंथापासून त्याचे अनुयायांचे नांव वैदिक हे जसे पडले, बुद्ध या नांवावररून त्या धार्मिक अनुयायांचे नाव जसे बौद्ध, जिनमताच्या अनुयायांचे नाव जैन, नानकाच्या धर्मशिष्या<चे नांव जसे शिख, विष्णू देवतेचे उपासक वैष्णव, लिंगपूजक ते जसे लिंगायत, तसे हिंदू हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून, धर्मसंस्थापकावरून वा धर्ममतावरून मुख्यतः वा मुलतः निघालेले नसून आसिंधुसिंधु विस्तारलेल्या देशास नि त्यात निवसणार्‍या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आहे. आणि अनुषंगाने त्याच्या धर्मसंस्कृतींनाही.

या साठीच हिंदु शब्दाची व्याख्या कोणत्याही धर्मग्रंथाशी वा धर्ममताशीच तेवढी बांधून टाकण्याचे प्रयत्न दिशाभूल करणारे ठरतात. हिंदू शब्दाच्या व्याख्येचा मूल ऐतिहासिक पाया आसिंधुसिंधु भारतभुमिका हाच असला पाहिजे. तो देश नि त्यात निपजलेल्या धर्माच्या नि संस्कृतीच्या बंधनांनी अनुप्राणित झालेले राष्ट्र हेच हिंदुत्वाचे दोन प्रमुख घटक होत. म्हणूनच हिंदुत्वाची इतिहासाला शक्यतो धरून असलेली व्याख्या अशीच केली पाहीजे की,

आसिंधुसिंधु भारतभुमिका ही ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदू

यातील पितृभू नि पुण्यभू हा शब्दांचा कोणत्याही व्याख्येत योजलेल्या शब्दांना असतो तसा, थोडासा पारिभाषिक अर्थ आहे.

"पितृभू" म्हणजे जिथे आपले आईबाप तेव्हढेच निपजले ती, असा अर्थ नव्हे, तर प्राचीन कालापासून ज्या भूमीत परंपरेने आपले जातीय नि राष्ट्रीय पूर्वज निवसत आले ती, असा अर्थ होतो. काही जण पटकन शंका घेतात की, आम्ही दोन पिढ्या आफ्रिकेत आहोत. मग आम्ही हिंदू नाही की काय? ती शंका यामुळेच अगदी उथळ ठरते. आमच्या हिंदूंनी सार्‍या पृथ्वीवर जरी वसाहती स्थापिल्या तरी त्यांची प्राचीन, परंपरागत, जातीय नि राष्ट्रीय पूर्वजांची पितृभू अशी ही भारतभूमीच असणार.

"पूण्यभू"चा अर्थ इंग्लिश "होलीलँड" ह्या शब्दातील अर्थ होय. ज्या भूमीत एखाद्या धर्माचा संस्थापक ऋषि, अवतार वा प्रेषित (पैंगंबर) प्रकटला, त्या धर्मास उपदेशिता झाला, त्याच्या निवासाने त्या भूमीस धर्मक्षेत्राचे पुण्यत्व आले, ती त्या धर्माची पुण्यभू. जशी ज्यूंची वा ख्रिश्चनांची पॅलेस्टाइन, मुसलमानांची अरेबिया. अशा अर्थे पुण्यभू शब्द वापरलेला आहे. नुसत्या पवित्रभूमी या अर्थी नव्हे.

पितृभू नि पुण्यभू शब्दांच्या ह्या पारिभाषिक अर्थी हि आसिंधुसिंधु भारतभुमिका ज्याची ज्याची पितृभूम्नि आणि पुण्यभूमि आहे तो हिंदू!

हिंदूत्वाची ही व्याख्या जितकी ऐतिहासिक तितकीच, आजच्या वस्तुस्थितीला अगदी धरून आहे. ती जितकी सत्य तितकीच इष्ट आहे, जितकी व्यापक तितकीच व्यावर्तकही आहे.

संदर्भः सावरकर एक अभिनव दर्शन - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विविध विषयावरील निवडक लेख.

मूळ संदर्भस्त्रोतः सह्याद्री : मे १९३६

लेखनविषय: दुवे:

Comments

नवीन

बाकीच्या सदस्यांचा गोंधळ होईल.

ते आपण ठरवायची गरज नाही. गोंधळ झाला तर ते सहभागी होणार नाहीत. शिवाय आपण एकदा नव्याने चर्चा चालू केली की जास्त जोमात चालू करता येईल आणि आपले या संदर्भातील विचार चर्चाप्रस्ताव म्हणून सर्वांना समजतील देखील.

त्यापेक्षा इथेच चालू ठेवुया ना. इथेच चर्चा चालू ठेवायला काय हरकत आहे? ही चर्चा का अशी अर्ध्यातच सोडायची?

ट्रॅकींग करणे अवघड जाते.

तेंव्हा हा या संदर्भातील शेवटचा प्रतिसाद आहे. धन्यवाद.

म्हणजे ही चर्चा इथेच थांबवणार असे समजायचे का?

म्हणजे ही चर्चा इथेच थांबवणार असे समजायचे का?

ट्रॅकींग करणे अवघड जाते.

फारसे कठीण नाही. जुनी चर्चा असल्याने इतर सदस्यांचा सहभाग कमी असेल.

शिवाय आपण एकदा नव्याने चर्चा चालू केली की जास्त जोमात चालू करता येईल

आणि मग पुन्हा तीही अर्ध्यावर सोडायची. मला चर्चा प्रवर्तक म्हणून असे वागणे पटणारे नाही.

 
^ वर