स्त्रियांची शा(उ)लिनता

(डॉ. दिलीप बिरुटेंनी सुरु केलेल्या 'मराठी साहित्यातील स्त्रीवाद' या चर्चेला लिहिलेला हा मूळ प्रतिसाद. यात थोडे बदल करून आणि भर घालून स्वतंत्र लेख होईल असे वाटले, म्हणून हा खटाटोप.)

स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता असते, हे सुभाषितरत्न ज्या महामानवाच्या सुपीक मेंदूतून उपजले, त्याला माझा सलाम. आणि हा पुरूषच असणार याबद्दल मला खात्री आहे. इथे नेमके काय म्हणायचे आहे याबद्दल दुमत असू शकेल पण स्त्रियांनी चूल-मूल यातच आपले आयुष्य घालवावे असा याचा एक सरळ अर्थ निघतो. पतींबद्दल अशी सुभाषिते नाहीत हे अजून एक विशेष. क्षणाचा पती आणि अनंतकाळचा बाप वगैरे. त्यामुळे पती हा आयुष्यभर काहीही करायला मोकळा आहे. दुसरी मजेदार गोष्ट म्हणजे शील नावाचा एक अतिमौल्यवान पदार्थ जो फक्त स्त्रीकडेच असतो. म्हणूनच अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाची बातमी धक्कादायक ठरते. ऐश्वर्याच्या पूर्व-प्रियकरांची यादी देऊन बच्चन कुटुंबाने तिचा स्वीकार कसा केला असा प्रश्न विचारला जातो. पण अभिषेकच्या मैत्रिणींची यादी सोईस्करपणे विसरली जाते. हा दुजाभाव का? पुरूषालाही शील/इज्जत वगैरे गोष्टी का असू नयेत? किंवा हिंदीमध्ये लाज हा स्त्रीचा दागिना आहे अशा अर्थाचे एक सुभाषित आहे, म्हणजे पुरूष निर्लज्ज असला तरी चालेल का?

शालीन, कुलीन वगैरे आदर्श भारतीय स्त्रीविषयीच्या अपेक्षा थोड्या एकांगी वाटतात. अशी स्त्री असेल तर आवडेल असे म्हटले तर ठीक आहे, पण सर्व स्त्रिया अशाच असतील/असल्या पाहिजेत असे म्हणणे स्त्रियांवर अन्यायकारक वाटते. गुलजारच्या एका चित्रपटात तब्बू म्हणते (नाव आठवत नाही), "शिव्या फक्त पुरूष का देतात? स्त्रियांनी का नाही द्यायच्या?" यात गुलजारला परंपरागत स्त्रीची प्रतिमा बदलावीशी वाटली हे विशेष. शिवाय ही समजा आदर्श भारतीय स्त्रीची लक्षणे धरली, तर आदर्श भारतीय पुरूषाची लक्षणे काय असावीत हे भारतीय स्त्रियांना विचारायलाही हरकत नसावी. याच्या उत्तरादाखल घरातील कुठल्याही कामात मदत न करणारा, फक्त तीन वेळा गिळायला स्वैपाकघरात येणारा आणि सदासर्वदा टीव्हीपुढे ठाण मांडून बसणारा पुरूष भारतातीलच काय, पण जगातील कुठल्याही स्त्रीला आदर्श वाटणे शक्य नाही.

स्त्री आणि पुरूष यांच्यातील नैसर्गिक फरकामुळे त्यांच्या मानसिकतेमध्येही फरक असतो, हे काही अंशी खरे आहे. हजारो वर्षांपूर्वी पुरूष शिकार करायला बाहेर पडत असत आणि स्त्रिया त्यांनी आणलेले अन्न शिजवणे, मुलांचे संगोपन करणे अशी कामे करत असत. म्हणूनच पुरूषांचा स्वभाव आक्रमक तर स्त्रियांचा स्वभाव त्या मानाने कोमल बनला. देहबोली ओळखण्यामध्ये स्त्रिया अधिक चतुर झाल्या कारण बोलता न येणार्‍या मुलाचे संगोपन करण्यासठी हे अत्यावश्यक होते. त्या काळानुसार ही स्वभावाची वैशिष्ट्ये अनुरूप होती. पण आत्ताच्या आधुनिक जगात स्त्रिया आणि पुरूष सर्व क्षेत्रांमध्ये बरोबरीने वावरत आहेत. अशा परिस्थितीमध्ये स्त्रिया त्यांच्या स्टिरीओटाइप स्वभावाच्या चाकोरीतच राहतील हे शक्य नाही. एखाद्या मोठ्या कंपनीची सीइओ स्त्री असेल तर तिचा स्वभाव आदर्श स्त्रीच्या चौकटीत बसणारा असेल का? आणि असला तर ती सीइओ म्हणून काम करू शकेल का? त्यांच्या व्यक्तिमत्वालाही पुरूषांइतकेच स्वातंत्र्य मिळायला हवे. म्हणूनच जेव्हा स्त्रीच्या आदर्शतेची व्याख्या केली जाते, तेव्हा नकळत आपण तिला एक माणूस या दृष्टीकोनातून बघायचे थांबवत असतो. मला वाटते दिवसभर पुरूषांइतकेच काम करून (मुले असतील तर बहुतेकवेळा जास्त) संध्याकाळी घरी आल्यावर ह्या ऐतखाऊ म्हसोबासाठी स्वैपाक करायचा आहे या विचाराने बहुतेक स्त्रियांना शालीनऐवजी शाउलिन व्हावेसे वाटत असेल. :)

स्त्रियांच्या कोमल स्वभावाचा फायदा आक्रमक पुरूष न घेतील तरच नवल. मग रूढी, परंपरा, संस्कृती यांच्या नावाखाली स्त्रियांचे शोषण सुरू झाले. मंगळसूत्र, कुंकू हे सगळे सोपस्कार स्त्रियांनीच करायचे, एक अंगठी सोडल्यास पुरूषाकडे बघून ओळखता येणार नाही विवाहित आहे की नाही ते. संस्कृती, परंपरेच्या नावाखाली स्त्रियांवर किती बंधने घातली गेली हे लक्षात घेतले तर आश्चर्य वाटते. संस्कृती हा फारच "लोडेड" शब्द आहे. याच्या नावाखाली वाट्टेल ते खपवता येते. जुन्या संस्कॄत साहित्यामध्ये शृंगाररस होता, पण मधल्या काही शतकांमध्ये तो अचानक लुप्त का झाला याचे उत्तर शोधणे मनोरंजक ठरावे. प्रणयभावनेच्या खुल्या अभिव्यक्तीपासून शृंगार म्हणजे काहीतरी घाणेरडे, लज्जास्पद किंवा ज्याच्यावर बोलायचे झाले तर फक्त पांचट विनोद हाच एक मार्ग उरतो ही आपल्या समाजाची अधोगती का आणि कशी झाली असावी? कामसूत्र ज्या देशात लिहीले गेले, खजुराहोची शिल्पे ज्या देशात घडवली गेली त्याच देशातील चित्रपटांमध्ये नायक-नायिका जवळ आले की झाडावरच्या कबूतरांवर क्यामेरा फिरवण्याची गरज आपल्याला का भासली असावी? याच्याशीच निगडीत आपल्या तथाकथित** संस्कृतीरक्षकांचाही प्रश्न आहे. शिल्पा शेट्टीचे रिचर्ड गेरने चुंबन घेतले तर आपली संस्कृती का धोक्यात येते? आपली संस्कृती म्हणजे नेमकी कुठल्या गोष्टींमध्ये आहे हे स्पष्ट होण्याची गरज आहे असे वाटते.

स्त्री-पुरूष समानता वगैरे सगळ्या गोष्टी चर्चेसाठी मान डोलवायला ठीक असतात. पण संध्याकाळी दोघेजण दमून घरी आल्यावर त्याला जर तिला चहा करून द्यावासा वाटला तर चित्र बदलते आहे असे म्हणायला हरकत नसावी.

लेखामध्ये सुचवणीबद्दल प्रियालीचे आभार.

**इथे तथाकथित दोन्ही शब्दांना लागू आहे, तथाकथित संस्कृतीचे तथाकथित रक्षक.

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

लेखात मांडलेले मुद्दे पटले. मला वाटते, शृंगाररसाचे लुप्त होणे आणि स्त्रियांवरील बंधने वाढणे या दोन्ही गोष्टी परस्परसंबंधित आहेत. खरं तर, दोन्हींचा प्रारंभ एकाच वेळी झाला असावा. शरीरसंबंधाबद्दल बोलणे हे निषिद्ध ठरवले जाणे आणि स्त्रीच्या माथी याबाबतीला सारा दोष मारण्याचा प्रयत्न करणे या गोष्टीही अशाच संबंधित असाव्यात.

हे बदल कसे घडत गेले असावेत, यावर बर्ट्रांड रसेल यांचे मॅरेज अँड मॉरल्स हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. काळाच्या ओघात टिकून राहिलेल्या काही आदिवासी जमातींच्या चालीरीतींचा अभ्यास करून फार पूर्वी वडील नामक संस्था अस्तित्वात नव्हती असा दावा केला आहे. म्हणजे मुलाला जन्म देणारा आणि त्याचे पालनपोषण करणारा पुरुष एकच होता असे नाही. पितृसत्ताक पद्धती आल्यानंतरच मग स्त्रियांच्या शीलाचे आणि शालीनतेचे स्तोम माजवण्यात आले. या पुस्तकाचा काही भाग येथे वाचता येईल.

बाकी "देहबोली ओळखण्यामध्ये स्त्रिया अधिक चतुर झाल्या कारण बोलता न येणार्‍या मुलाचे संगोपन करण्यासठी हे अत्यावश्यक होते." हे निरीक्षण आवडले, पटले.

दुवा

बर्ट्रांड रसेल यांच्या पुस्तकाचा दुवा फारच रोचक आहे. सगळे पुस्तक वाचायला हवे. पितृसत्ताक पद्धतीबाबतचा मुद्दा पटतो. पूर्वीच्या काळी बर्‍याच आदिवासी जातींमध्ये मोनोगॅमस प्रथा अस्तित्वात नव्हती. कालौघात या प्रथा/रूढी प्रचलित झाल्या. अजूनही चिंपांझी, गोरील्ला यांच्यामध्ये याबाबत अत्यंत कठोर कायदे आहेत. याउलट बोनोबो माकडांमध्ये कुठलाही कायदा अस्तित्वात नाही. याचे उत्तम विवेचन रिचर्ड डोकिन्स यांच्या ऍन्सेस्टर्स टेल या पुस्तकात आढळते. संपूर्ण पुस्तक वाचनीय आहे आणि यातील चित्रेही अप्रतिम आहेत. असो. आता थांबतो. :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

प्रतिसाद आवडलाच होता

आता लेखही आवडला.

मला वाटतं, आपली स्त्री आपल्याच काबूत राहावी, जितक्या जास्त स्त्रिया काबूत राहतील तितके ते घर अधिक फुलेल या समजूतीतून बहुपत्नीकत्वाची पद्धत रूढ झाली. (जितक्या गायी अधिक तितका माणूस सधन याच धर्तीवर जितक्या बायका अधिक तितकी संतती अधिक म्हणजे दरारा, मान, काम करायला तोंडं अधिक इ.) त्यातून शालिनतेचे स्तोम मोघल आणि ब्रिटिशकाळात फारच झाले असावे. ब्रिटिशांचे एटिकेट्स पाळणे महत्त्वाचे होतेच. नाहीतर,

नवर्‍याबरोबर मलाही वनवास हवा असे कणखरपणे ठरवणारी, 'लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस' म्हणून लक्ष्मणाचा धिक्कार करणारी (थोडीशी आततायी) सीता*. कौरवांच्या रक्ताने केस माखून घेणारी द्रौपदी आणि नवर्‍याशिवाय मुलाला मोठं करून वेळ आल्यावर स्वतः लढाईवर निघणार्‍या जिजाबाई या सगळ्या लाजून डोक्यावर पदर ओढून बसल्या असत्या तर?

* येथे रामायण(?) चित्रपटातील माना वेळावणारी शोभना समर्थांची लाजाळू सीता नेहमी डोळ्यासमोर उभी राहते. पडद्यावर सीतेचे इतके अवमूल्यन कोणी केले नसावे. (दोष शोभना समर्थांचा नाही, चित्रपटकर्त्यांचा. शोभनाबाई सीन देऊन झाल्या की मस्त सिगरेट** शिलगावत असे वाचले होते.)

** येथे सिगारेट शिलगावण्याचे अजिबात "समर्थ"न नाही.

देहबोली ओळखण्यामध्ये स्त्रिया अधिक चतुर झाल्या कारण बोलता न येणार्‍या मुलाचे संगोपन करण्यासठी हे अत्यावश्यक होते.

हे निरीक्षण खरंच आवडले.

निरीक्षण

बहुपत्निकत्वाचा मुद्दा पटण्यासारखा आहे. पूर्वीचे सुलतान, बादशहा यांचे जनानखाने याची साक्ष देतात. आजही कॅमेरूनसारख्या देशांमध्ये बहुपत्निकत्व कायदेशीर आहे.

देहबोली ओळखण्यामध्ये स्त्रिया अधिक चतुर झाल्या कारण बोलता न येणार्‍या मुलाचे संगोपन करण्यासठी हे अत्यावश्यक होते.

हे निरीक्षण माझे आहे असे सांगायला नक्कीच आवडले असते :) पण दुर्दैवाने तसे नाही. कुठेतरी वाचले होते, कुठले पुस्तक होते आठवत नाही. बहुधा डॉकिन्सचे सेलफिश जीन असावे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

'जाऊ' कुठे!!!

..'लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस' म्हणून लक्ष्मणाचा धिक्कार करणारी...

लक्ष्मण ???? रावण हवा होता ना?????

मज सांग लक्मणा, जाऊ कुठे!!!

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

कांचनमृगप्रसंग

कांचनमृगाची शिकार करायला राम एकटा गेला. मायावी राक्षसाने रामाच्या आवाजात तो जखमी झाला असल्याचे आवाज काढले. तरी लक्ष्मण रामाच्या मदतीला जाईना. म्हणून सीता त्याच्यावर उखडली. असा कथाप्रसंग प्रियाली सांगत आहेत.

हम्म्..

हम्म्म असेच काहीतरी असेल असे वाटले होते, पण प्रसंग आठवला नव्हता. धन्यवाद.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

हा हा हा

>>लक्ष्मण ???? रावण हवा होता ना?????

हा हा हा.

आता अशीच एक कथा

सीता मनात:- आमचे हे (श्री.राम) काही शिकार करत नाहीत. नेहमी खरेदीला मी लक्ष्मण भावजींनाच पाठवते. नेमेक मेल ते मृग, भावजी आंघोळीला गेले असताना आलं अन हे म्हणाले त्यात काय मी आणतो. जाताना बाथरूम समोर उभा राहून भाऊजींना म्हणाले** की मी येईपर्यंत जाऊ नको.
चपलेचा अंगठा तुटला होता. म्हणल पडाल, लागेल. भावजी जातील नंतर. पण ऐकतील तर ना. आता पडल्यावर बोंबलायला लागले जिथे तिथे भाऊ लागतो. किती वेळचे ओरडणे ऐकले मी. तरी भावजींच इतके हळूहळू चालले असते ना.

**(राम खरे तर हे म्हणाला :- लक्ष्मणा तुझ्या वहीनीच्या खरेदी पासून माझे रक्षण कर. तुझी वहीनी कूठेतरी सेल लागलाय तिकडे जाईल. तिला एकटी सोडू नको. क्रेडिट कार्ड मॅक्स ऑउट झालाय. कळल तर ती तणतणेल. रेपो वाले माझ्या मागे लागतील. मला माळ्यावरून अजून चपला काढायच्या आहेत. दोघे ए़कदम बाजारात जाऊ. )

(लक्ष्मण मनात म्हणतो, एक काम् संपल की लगेच हे दोघ दुसर सांगतात. सगळी काम संपवली आज जरा डोक्यावरून न्हाहून केस सेट करीन म्हणलो तर तिकडे धडपडले. परवा मी सगळे सामान आणताना पडलो, दोघांच लक्ष पण नव्हते. लेप लावणे सोडाच, मला उद्या साठी आधी हळद मग चंदनाची उटी करून ठेव मगच झोप म्हणाले. )

लक्ष्मण : - अहो वहीनी, दादा येतील हो. ते मला म्हणाले काही झाले तरी तिचे रक्षण कर. मला थांबले पाहीजे. (अर्धेच सेट झाले आहेत केस. असाच गेलो तर एकाबाजूचे बसलेले दुसर्‍याबाजूचे उभे रहातील. माझी इतकी का काढत असतात दोघे? काय दया माया आहे की नाही?)

राम :- च्यायला हे मृग मायावी हाये की पण सोन्याच आहे. हे विकून जरा तरी बिल भरता येईल. माझ्या आवाजात् मिमिक्री मस्त केली. असा आवाज आहे होय माझा. मी ठीक आहे हे नको सांगायला. बघू पत्नीचे किति प्रेम आहे, येती का धावत? काय माहीत लक्ष्मणाला घाडेल बहूतेक. जाऊ दे तो आला तर बरच आहे म्हणा हे मृग ऊचलून नेईल. मी टेकतो जरा इथे झाडाखाली.

(सीता मनात:- च्यायला जातच नाहीये. आज शेवटचा दिवस आहे सेलचा लवकर जाऊन येईन म्हणते. कस बर घालवाव ह्याला. )
सीता:- 'लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस' तूझा धिक्कार असो.

(लक्ष्मण मनात :- बोंबला, खरच की दादाला जर का खरच काही झाल तर ही आपल्या गळ्यात. मेलो मेलो. एकतर माझा टाईम खराब आहे अस परवाच माझ हस्ताक्षर पाहून तो फटकळ ऋषी म्हणाला होता. हे राम मै आ रहा हू. तुझ काही बरवाईट नको व्हायला.)

तिकडे रावण भावाचे प्रेम दाखावायला निघाला होता. रथातून पत्ता शोधत शोधत हैराण. नशीब नवीन स्पोर्ट-रथ चांगला होता. पण सारख प्रत्येक झोपडी पूढे जाऊन ओम भवती भिक्षांन देही काय??? त्या खाणाखूणा, झोपडी, ती बाई काही सापडत नाही. अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर. इथे एक दिसतीय झोपडी बघू, खरच की तीच ती बाई.

सीता मनात :- बघा देवाला देखील वाटत, मी सेल मिस करू नये. ह्या याचकाकडे गाडी आहे लिफ्ट मागता येईल.

सीता:- अहो महाराज या या थांबा ह जरा शिधा आणते. पण कृपया मला जरा इथेच पूढे सोडाल का तुमच्या रथातून.

रावण मनात - धीस् इज सो इझी.

------------------------------------------------------------
पूर्णता काल्पनीक. काही सार्धम्य वाटले तर् निव्वळ योगायोग समजावा.

कांचनमृग

लक्ष्मण ???? रावण हवा होता ना?????

धनंजयांनी निराकरण केलेच आहे पण काल ही खरड लिहिली होती ती इथे चिकटवते. रावणाला सीता असे काही म्हणाली असती तर प्रश्नच नव्हता पण आपल्या दीराला असे म्हणून हिणवणारी सीता या प्रसंगात शालीन वाटत नाही.

कांचनमृग मृगयेच्या वेळी लक्ष्मणाला रामाने सीतेचे रक्षण करायला थांबवले होते. त्या दरम्यान मारिचाला बाण लागल्यावर तो कपटाने "लक्ष्मणा धाव" असं ओरडला. कोणताही राक्षस रामाचे वाकडे करू शकत नाही याची खात्री असल्याने लक्ष्मणाने तेथे दुर्लक्ष केले पण सीता घाबरली आणि त्याला रामाच्या रक्षणासाठी जा असे विनवू लागली. लक्ष्मणाने तिची समजूत काढायचा प्रयत्न केला पण सीतेला ते पटले नाही. म्हणून तिने हे शस्त्र वापरले. लक्ष्मण अजिबात स्त्रीलंपट नव्हता परंतु भावाची आज्ञा मोडण्यासाठी सबळ कारण कोणते तर त्याचा झालेला अपमान (मातृतुल्य वहिनीवर डोळा ठेवल्याचा.) म्हणून सीतेने तसे म्हटले आणि त्याचा परिणाम दिसून आला.

स्त्री पुरुष

स्त्री पुरुष समानता, स्त्रीयांचे हक्क, बरोबरी वगैरे विषय हे सगळे एकदम नेहमीचे चघळायचे विषय झाले आहेत. खास करुन भारतातल्या स्त्रियांबद्दल. प्रतिसाद पुढे लिहिण्याच्या आधिच स्पष्ट करतो कि मला कोणालाही तुच्छ लेखायचे नाही. स्त्री पुरुष हे एकमेकांशिवाय अपुर्ण आहेत आणि कोणीही स्त्री अथवा पुरुषाने एखाद्या गोष्टीचा माज अथवा लज्जा बाळगण्याचे कारण नाही असे माझे वैयक्तिक मत आहे. असो,

अशा विषयांवर चर्चा करताना एक नेहमी आढळुन येते कि चर्चेचा रोख हा अनेकदा इतिहासातल्या (भुतकाळातल्या) स्त्रिया आणि आजच्या शहरातल्या स्त्रिया एवढाच असतो. खोलवर विचार केल्यास दिसुन येइल कि ग्रामिण भागातल्या अनेक स्त्रिया अनेकदा पुरुषांपेक्षा सर्वच बाबतीत आघाडीवर असतात. मग ते शारिरिक श्रम असो अथवा निर्णय क्षमता असो. पुरुषांच्या बरोबरीने व्यसनाधिन होणार्‍या स्त्रिया सुद्धा अनेक असतात. तंबाखु खाणार्‍या, बिडी ओढणार्‍या अनेक स्त्रिया दिसतात. शहरात मात्र एखादि तरुणी सिगारेट ओढताना दिसली की चर्चेचा विषय होतो. आपल्या लोकांचे प्रतिसाद त्याच त्याच मुद्यांवर फिरत असतात. जिजाबाईंना आदर्शा माता आपण मानतो. पण त्यांच्या पुत्राच्या आठ बायका होत्या हे कितपत मान्य करावे? त्याच इतिहासात ध चा मा करणारी स्त्रीसुद्धा आपल्याला माहित आहे. थोडक्यात काय ? तेच तेच मुद्दे किती गिरवणार? ग्रामिण भारताकडे पहा अथवा भारता बाहेर, अनेक नवीन नवीन गोष्टी समजतील.

माझ्या पुर्वीच्या कार्यालयात कार्यकक्षेमुळे अनेक अभारतीय लोकांशी रोजचा संपर्क होता आणि सर्वांशी चांगली मैत्री जमली होती. त्यावेळी घडलेले काही किस्से सांगतो,

  1. पहिला आहे तो जर्मनी मधला: स्त्री दिनाला मी गॅबी नावाच्या स्त्री सहकारीणीला शुभेच्छा दिल्या. तिने स्विकारल्या आणि म्हणाली काय उपयोग सांग अशा दिवसांचा? आम्हाला येथे पुरुषांच्या बरोबरीने काम करुन पगार मात्र त्यांच्या ७५% असतो. जग आम्हाला प्रगत समजतं आमच्या बोलण्या आणि कपड्यांवरुन, पण जेंव्हा वेळ येते त्यावेळी मात्र आम्हाला दुय्यम दर्जा मिळतो.
  2. दुसरा किस्सा फ्रान्स मधला : ऍनी मेरी नामक स्री सहकारी बुधवारी कार्यालयात नसायची. विचारणा करता कळले कि फ्रान्स मध्ये नवमातांना पुरुष सहकार्‍यांच्या ८०% काम करायची मुभा आहे.
  3. तिसरा अमेरिकेतला: अशाच एका सहकार्‍याच्या तोंडचे वाक्य - भारतात सत्तेची सर्वोच्च पदे स्त्रिया भुषवतात. आमच्याकडे मात्र अजुन् सुद्धा नाही.

आता यावरुन काय तात्पर्य काढावे? सगळीकडे हिच अवस्था आहे? कि भारतात स्त्रियांची पिळवणुक होते? कि आणखी काही?

मला वाटत कि समाज अपल्यापासुन बनतो. समाजात ज्या विचारांची माणसे जास्त असतील तशी बहुजनांची धारणा होते. आजच्या जगात लैंगिक भेदभावावर काही तात्पर्य काढणे मला तरी पटत नाही. तसेच भारतातल्या स्त्रियांबद्दलच्या मतांना मागासले पणाचा रंग देणे सुद्धा. येथे तसेच जगात सर्व प्रकारची उदाहरणे आहेत. प्रतिसाद लिहिताना काहि प्रश्न आले. इतरांची मते जाणुन घ्यायला आवडेल.

भारतात अभियांत्रिकीला मुलींना ३०% राखीव जागा आहेत. बर्‍याचदा त्या भरतात सुद्धा. अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केलेल्या सगळ्याच स्त्रिया नोकरी अथवा अर्थार्जन करतात का? जर करत नसतील तर त्यांच्यामुळे ज्या मुलांचा अभियांत्रीकिचा प्रवेश हुकला त्यांचे काय?
भारतात बहुदा सर्वच मुली आपल्यापेक्षा वरचढ असणारा वर निवडतात. असे का? दुय्यम का नाही?

मराठीत लिहा. वापरा.

कसं काय?

चाणक्यराव,

अहो त्या ग्रामिण बायका दादल्याशी वाजलं की कुत्र्यासारखा मारही खातात की भर चौकात आणि वस्तीत्. शालिनतेशी संबंध कधी येतो त्यांचा?
तुमच्या प्रतिसादातला तो सगळाच भाग अनुपयोगी वाटला. चर्चा भारतातील बायकांच्या शालिनतेविषयी आहे असं मला तरी वाटलं. आता शालिनता काय कोणीही सोडतो म्हणा...

>>भारतात बहुदा सर्वच मुली आपल्यापेक्षा वरचढ असणारा वर निवडतात. असे का? दुय्यम का नाही?

हे पटलं. मुलगेही कमीच शिकलेली बायको निवडतात तो ही प्रश्न यायलाच हवा.

राजेंद्रराव,

तुमचा लेख आवडला. या शालिनतेचे पाठ बाईकडूनच बाईला देतात हो.

गुद्दे

अहो त्या ग्रामिण बायका दादल्याशी वाजलं की कुत्र्यासारखा मारही खातात की भर चौकात आणि वस्तीत्. शालिनतेशी संबंध कधी येतो त्यांचा?
शहरातल्या बायकांना पुरुष मारहाण करत नाहीत अस समजावं का? कि शालीतना फक्त शरातल्या लोकांनाच असते?

तुमच्या प्रतिसादातला तो सगळाच भाग अनुपयोगी वाटला. चर्चा भारतातील बायकांच्या शालिनतेविषयी आहे असं मला तरी वाटलं. आता शालिनता काय कोणीही सोडतो म्हणा...
असेल बुवा अनुपयोगी. काय करावं आता? काढुन टाकु म्हणता का प्रतिसाद? तुम्ही उपप्रतिसाद दिल्यामुळे आता बदल सुद्धा करता येणार नाहीत. जाता जाता - राजेंद्ररावांनी लेख (लेखन प्रकार) लिहिला आहे. चर्चा (लेखन प्रकार) नाही असे तांत्रिक दृष्ट्या तरी म्हणायल हवे असे वाटते.

मराठीत लिहा. वापरा.

रोख

चाणक्यराव,
आपल्या प्रतिसादाचा रोख कळाला नाही. मूळ प्रतिसाद, ज्याचे लेखात रूपांतर केले आहे, तो भारतीय स्त्रियांवर होता आणि बदल करताना मी जागतिक पातळीवर गेलो नाही. म्हणून भारताबाहेरच्या स्त्रियांचा उल्लेख यात नाही. पण याचा अर्थ भारताबाहेर असे प्रकार होत नाहीत असा अजिबात नाही. जपानमध्ये (कदाचित आपल्यापेक्षाही कठोर) अशी पुरूषप्रधान संस्कृती आहे. स्त्रियांचे शोषण फक्त भारतातच नाही, सगळीकडे झाले आहे. लेखाचा रोख मध्यमवर्गीय स्त्रियांची होणारी कुचंबणा असा काहीसा आहे. साहजिकच यात स्त्रियांचे आरक्षण किंवा त्यांना नोकरीत होणारे फायदे/तोटे यांचा उल्लेख नाही. पती आणि पत्नी यांच्यात पुरूषांचा सहसा जबाबदारी टाळण्याकडे कल असतो. जरी आपल्या राष्ट्रपती एक महिला असल्या, तरीही कित्येक मध्यमवर्गीय घरात पतीपत्नी दोघेही काम करत असताना पत्नीला पतीपेक्षा कामाचा जास्त बोजा उचलावा लागतो हे सत्य आहे. सध्याच्या काळात स्त्रीची कुचंबणा अशा सूक्ष्म पातळीवर होते आहे. यात ग्रामीण भागातील स्त्रियांचा उल्लेख नाही कारण जे बघितले, अनुभवले त्यावरच लिहीले आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी असल्यास त्याबद्दल वाचायला नक्कीच आवडेल. परदेशातील परिस्थिती फारशी वेगळी नाही. माझ्या कार्यालयाच्या बाजूला एक छोट्यांची शाळा आहे. आत्तापर्यंत शाळेत सोडायला मी एकदाही बाबा आलेले बघितले नाहीत. याचा अर्थ बाबा लोक येतच नाहीत असे नाही, पण स्त्रियांचे प्रमाण बरेच जास्त आहे.
त्याच चर्चा परत परत करण्याबद्दल सहमत आहे. माझ्या मते लेखात थोडे वेगळे विचार आहेत, म्हणून लेख लिहावासा वाटला. अर्थात याबद्दल दुमत असू शकते. शेवटचा मुद्दाही पटला. साधारणपणे पुरूषांना जास्त शिकलेली किंवा स्त्रियांना कमी शिकलेला अशी पसंती कमी असते. याउलट परदेशात बर्‍याचदा स्त्री पुरूषापेक्षा अधिक उंच अशाही जोड्या आढळतात. अशी एक फेमस एक्स-जोडी म्हणजे टॉम क्रूझ आणि निकोल किडमन.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

छान

छान प्रतिसाद.
मूळ लेखही चांगला आहे.
राधिका

शालिनता

शालिनता या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ चारित्र्यवान असा घेता यावा. बहुधा "शील" या शब्दाशी संबंधीत. नेमका अर्थ मोल्जवर्थवर शोधून सापडला नाही. हा शब्द कुलवंत, सुशिक्षित आणि घरेलू स्त्रियांसाठी समाजाने वापरलेला आहे यामुळेच काही मोठ्या स्त्रियांची नावे अपरिहार्य ठरतात कारण त्यांच्या तथाकथित शालिनतेचे गोडवे अद्याप गायले जातात. वाचक्नवींच्या मूळ प्रतिसादातही शालिनता हा शब्द याच अर्थाने येत असावा. (चू. भू दे. घे. व्यक्तिशः हा शब्द कोणी कोणासाठी वापरावा याबद्दल माझे काही म्हणणे नाही.) शालिन स्त्रीप्रमाणे शालिन पुरुषही असतात परंतु शालिन स्त्रीला लावण्यात आलेले सर्व निकष पुरुषांना लावलेले आढळत नाहीत.

आनंदीबाई ही सर्वार्थाने शालिन स्त्री आहे कारण ती नवर्‍याच्या मतांना आणि त्याच्या कार्यवाहीला चिकटून राहते. आठ बायका करणे आणि आदर्श माता असणे यांतला संबंध कळला नाही. समाजाला स्वीकृत नसलेले एखादे पाऊल उचलणे (जसे जिजाबाईंनी युद्धावर जायचे ठरवले) आणि संपूर्ण समाजाला बदलायला निघणे (पुत्राच्या आठ बायकांवर आक्षेप घेणे) या दोन्ही गोष्टी भिन्न वाटतात.

त्यामुळे प्रतिसादाचा रोख कळला नाही. मूळ विषयाला सोडून वाटला.

सही !

राजेंद्र साहेब आपला लेख आणि चाणक्य साहेब आपला प्रतिसाद दोन्हीही आवडले !

अवांतर :) या विषयावर काहीच्या काही सुचतच जाते, म्हणून स्वतःला जरा आवरले आहे .

शालीनता

स्त्री शारीरिक ताकदीत कमी म्हणून पुरूषाने तिला बलाच्या मदतीने कायम दाबून् ठेवले. त्याला वेगवेगळी नावे (परंपरा, संस्कृती, शालीनता इ)दिली. मग ही अशी एकप्रकारची सत्ता मिळाली. आता सत्ता आली व ती हाताळण्याची तेवढी मानसीक क्षमता नसली की ती हूकूमशाही बनते. (बर्‍याचदा पाहिले असेल की लहान मुलांना कारण हे दिले जायचे /जाते की मी (तुझा बाप / आई) म्हणतो / म्हणते म्हणून असे वाग. )

असा संघर्ष टाळावा म्हणून काही क्षेत्रांची, कामाची विभागणी झाली. जरा नीट् घडी बसली तरी सर्वजणात उपजत सामंजस्य, शहाणपण नव्हते, सत्तेची नशा व सत्तापरिवर्तनाची धडपड, अन्यायाचा प्रतिकार म्हणून कूठे ना कूठे ठीणगी पडत गेली. दोन फटके मारून गप्प बसत नाही म्हणून ४ फटके मारले गेले. ताकद बर्‍याचदा पुरूषालाच विजयी करून गेली. न्यूनगंडातील हूकूमशाही अजूनच भेसूर बनली. (झाले तिथे बहूतेक तो शृंगाररस आटला असावा) काही पुरूषांना वाटले असावे हे योग्य नाही व त्यांनी त्यांच्या घरातील स्त्रीयांना बरेचसे स्वातंत्र्य दिले असेल म्हणून तर आज आपल्याला जुन्या काळातील, काही कर्तृत्ववान स्त्रीयांचे दाखले देता येतात. काही पुरुषांनी जे स्वातंत्र्य दिले पण त्याला तेवढी प्रसीध्दी (तेवढी माध्यमच कूठे होती.)मिळाली नाही. तसेच जगाची रीत म्हणून देखील "प्रत्यक्ष अन्याय" असा न घडता देखील काही घरात् स्त्री आपल्या घरात एका मर्यादीत आयुष्य (मजेत??) जगत होती. तसेच काही घरात स्त्रीच स्त्रीची दुश्मन बनली व तिथे स्त्रियांच्या चळवळीची बरीच हानी झाली.

मग परमेश्वराने गांजलेल्यांसाठी व सर्वांना अक्कल यावी म्हणून शिक्षणाचा जन्म केला. शिक्षणाने बरीच समानता आणली. (शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी समजू नका, मानसशास्त्रीय शिक्षण) त्यामूळे पूर्वीची "मारामारी " कमी झाली पण आता "पॉवर गेमस्" (माइंड गेम्स्) असे चालतात हे हळूहळू सगळ्यांना (बायकांना पूरूषांचे, पुरूषांना बायकांचे) कळू लागले. आता हे पॉवर गेमस् समजण्यात, खेळण्यात, नवनवीन शोधण्यात सध्या सगळे मशगूल आहेत. मी सांगतो आता पुरूषांना कळू लागले आहे की हे पॉवर गेम्स खेळणे काही बडवण्यासारखे सोपे नाही आहे व बायकांना पणा कळले की हा एक उत्कृष्ट खेळ आहे ( ऑल्सो परहॅप्स् दे आर नॅचरल ऍट इट) व हा खेळ जिंकल्याचे फायदे, दुरगामी आहेत. महीलांनी थोडेफार अधीकार मिळवले. [आता वेध पूर्ण सत्तेचे. :-)]

जसे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा एक कायदाच / प्रथा बनते. तसे हे खेळ खेळून बायका संसारात कायदे बनवून आपापले बस्तान पक्के करू लागल्या आहेत.

आता खेड्यात काय होते, मला माहीत नाही. तसेच शिकलेल्या बायकांवर अन्याय होत नाही असे पण मला म्हणायचे नाही पण पांढरपेश्या समाजात तरी कुठली बाई (बहूसंख्य महीला) मुकाट्याने अन्याय सहन करत असेल असे वाटत नाही.

असो आजकाल बर्‍याच (निदान पुर्वीच्या मानाने) घरी मुलगा मुलगी समान असते. मुलीपण बर्‍याच महत्वाकांशी, (पुरूषांच्या दुनीयेत त्याच न्यायाने) यशस्वी पण असतात.

असो काय् जाणो आपली किंवा पुढची पिढी हे असे (स्त्रीवाद, बिचार्‍या) लिहील पण नंतर ह्या पॉवर गेम्सच्या जमान्यात् पुरुषच समानता पाहीजे असा आग्रह धरतील. ;-)

प्रतिसाद विस्कळित वाटण्याची दाट शंका पण आजची थोडीफार परिस्थीती व यापूढची ह्याची एक अटकळ...

गेम्स

सहजराव,
आपल्याशी सहमत आहे. आजकालच्या जगात स्त्री-पुरूष समानता बरेच ठिकाणी दिसते. लेखाचा उद्देश हा आहे की आता स्त्रियांची कुचंबणा सूक्ष्म पातळीवर होते आहे. लहानग्याला शाळेत सोडण्यासारखी कामे मुख्यत: स्त्रियाच करतात. स्वैपाक करण्यात बरेचसे पुरूष अजिबात भाग घेत नाहीत. इत्यादी.

मी सांगतो आता पुरूषांना कळू लागले आहे की हे पॉवर गेम्स खेळणे काही बडवण्यासारखे सोपे नाही आहे व बायकांना पणा कळले की हा एक उत्कृष्ट खेळ आहे ( ऑल्सो परहॅप्स् दे आर नॅचरल ऍट इट) व हा खेळ जिंकल्याचे फायदे, दुरगामी आहेत.

इथे आपण मानसशास्त्राच्या क्षेत्रात प्रवेश करत आहोत. स्त्री-पुरूषच नव्हे, तर आपल्या प्रत्येक नात्यामध्ये आपण सर्व वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळत असतो. याची सुरूवात अगदी लहानपणापासून होते, उदा. जेव्हा लहानग्याला कळते की पोटात दुखते असे सांगितल्यावर शाळा चुकते. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपले गेम्स अधिकाधिक रिफाइन होत जातात. मग जे लोक आपल्या गेम्सशी अनुकूल असे गेम्स खेळतात त्यांच्याशी आपली मैत्री, नातेसंबंध जुळतात. असो, इथे थांबतो. या विषयाची व्याप्ती मोठी आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

वा पुढे...?

मग जे लोक आपल्या गेम्सशी अनुकूल असे गेम्स खेळतात त्यांच्याशी आपली मैत्री, नातेसंबंध जुळतात.
क्या बात कही!
यावरही एक चर्चा प्रस्ताव आपण ठेवावा ही विनंती. (आपले वाक्य आहे अर्थात आपला मान व आपली इच्छा! :) )

या विषयाला ला खुप कंगोरे नि बारकावे आहेत. किंवा आधुनिक मानसशास्त्र यावरच उभे आहे असे म्हंटले तर धाडसाचे ठरू नये.

या विषयावर वाचायला (जर काही कळलेच तर प्रतिसाद द्यायलाही) आवडेल.

आपला
गेम्स मधे कायम हरणारा
गुंडोपंत

गेम!


जे लोक आपल्या गेम्सशी अनुकूल असे गेम्स खेळतात त्यांच्याशी आपली मैत्री, नातेसंबंध जुळतात.

आणि हे करताना कधीतरी आपलाच गेम होतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखे आहे. :)

विषयाची व्याप्ती खरंच मोठी आहे. यावर चर्चा करायला मजा येईल.

गेम्स पीपल प्ले

'गेम्स पीपल प्ले' वाचायची इच्छा असूनही योग जुळत नाहीये. विषयांतर होत इथवर आलोच आहोत, तर होऊन जाऊ द्या एक फर्मास लेख!

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

गेम्स

गेम्समध्ये इतका इंटरेस्ट पाहून छान वाटले आणि खर्डेघाशीच्या सुचवणीबद्दल अनेक धन्यवाद. विषय खरेच रोचक आहे, फक्त याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे काळ, काम, वेग यांच्या गणितामध्ये कसे बसते ते बघायला हवे. पण यावर चर्चा करायला निश्चितच आवडेल. गेम्स थिअरीचे प्रणेता एरिक बर्न यांची पुस्तके वाचली म्हणजे पुणे-मुंबई पाशिंजर ट्रेनमध्ये असल्यासारखे वाटते, धक्क्यामागून धक्के बसतात हो ;)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आणखी विषयांतर ;)

>गेम्स थिअरीचे प्रणेता एरिक बर्न ..

'गेम्स थिअरी' च्या प्रणेते एरिक बर्न नव्हेत हो. (न्यूमन की कोण आहेत.) यात मास्टर मात्र आमचे नॅश.
एरिक बर्न ट्रान्सॅक्शनल ऍनालिसिस वाले. :)

दोन्ही थिअरीज रोचक आहेत हे दोहोंतले साम्य.

अतिअवांतर : बर्नच्या थिअरीज चा गेम थिअरीवर परिणाम असणे शक्य आहे. (अभ्यास केल्यास प्रबंधाचा विषय ठरू शकेल. कुठल्या डिपार्टमेंटला द्यायचा हा आणखी एक आयाम ;) )

एरिक बर्न वाचल्यावर जागोजागी गेम दिसतील हे मात्र पटण्यासारखे. (त्याला प्रतिसादांतही असे भास होतील असे वाटते.)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

गेम्स थिअरी/लई अवांतर

>'गेम्स थिअरी' च्या प्रणेते एरिक बर्न नव्हेत हो.

मला वाटते जॉन नॅशची (ब्यूटीफुल माइंडवाला)ची गेम थिअरी वेगळी आहे. दोन्हींचा संबंध आहे की नाही हा खरोखरच रोचक विषय आहे. पण तुमचे बरोबर आहे कारण बर्नच्या थिअरीला गेम्स थिअरी म्हणणे योग्य नाही. टीए/स्ट्रक्चरल ऍनालिसिस/स्क्रिप्ट थिअरी अशी नावे कदाचित जास्त योग्य ठरतील-

विषयांतराबद्दल अवांतर : इथे विषयांतर झाले हे खरे आहे, पण असे रोचक विषयांतर असेल तर मला तरी चालते बुवा:)

लई अवांतर : एखाद्या चर्चेमध्ये दोन विषय आल्यास समांतर चर्चा होऊ शकते, एक मूळ विषय आणि दुसरा अवांतरमध्ये. ;) कशी वाटते कल्पना?
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

अजून पुढे लई अवांतर

लई अवांतर : एखाद्या चर्चेमध्ये तीन विषय आल्यास समांतर चर्चा होऊ शकते, एक मूळ विषय, दुसरा अवांतरमध्ये आणी अजून पुढे लई अवांतर
;) कशी वाटते कल्पना?

छान

लेख आणि प्रतिसाद चांगले आहेत.
हा गेम्स प्रकार काय आहे याची उत्सुकता वाटत आहे. त्यावर लेख लिहा ही विनंती.
--लिखाळ.

आभार

लिखाळ,
प्रतिसादाबद्दल आभार. कधी जमते ते बघू या. :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

लेख आवडला!

राजेन्द्र,

तुमचा लेख , प्रियाली आणि चाणक्य यांचे प्रतिसादही आवडले. आमच्या कामवाल्या बाईंचे दोन् किस्से सांगते. पुरेसे बोलके आहेत. बाईंचा नवरा दारु पितो. त्याबद्दल त्या नेहमी काही ना काही तक्रारी सांगत असत. तो मारहाणही करायचा. पण बाईंना कुठेतरी आशा होती की तो सुधारेल. पण तो काही सुधारला नाही. त्याने नोकरीही सोडून दिली. बाई त्यांच्या कमाईवरच् तीन् मुलांचा संसार ओढत होत्या. एक दिवस तणतणतच आल्या,म्हणाल्या, "झाडूनं बुकललं त्येला! " मी चमकून - "कुणाला?" "पोरांयच्या बापाला!" बाईंच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला होता. लग्नाची मुलगी, वाईट संगतीने वाया जाऊ पहात असलेला मोठा मुलगा, धाकट्याला शिक्षणाची आवड, पण त्याच्या फी साठी पैसे जमविणे महामुष्कील, दारुडा, नाकर्ता नवरा आणि परत त्याची अरेरावी, या सगळ्या ताणांनी खचून न जाता बाईंनी दुर्गावतार धारण केला. नवर्‍याला चौदावं रत्न तर दाखवलंच, पण घरातलं त्याचं खाणंपिणंही बंद करुन टाकलं. त्यानंतर त्यांनी नवर्‍याची कोणतीही अरेरावी सहन केली नाही. दरम्यान त्यांच्या मुलीचे लग्नही झाले, अर्थात बाईंच्या एकटीच्या हिंमतीवरच! बापाने आपल्या मुलीच्या लग्नाला ना आर्थिक मदत केली, ना इतर् काही.
नवरा त्यांच्याच घरात राहत होता. वेगळे करुन खात होता. काही दिवसांनी तो आजारी पडला. मधुमेहामुळे त्याच्या पायाची दोन् जखमी बोटे काढून टाकावी लागणार होती. बराच खर्च् होता. बाईंनी आपल्या कामाच्या ठिकाणांहून पैसे गोळा केले. नवर्‍याला खाजगी इस्पितळात दाखल करुन त्याच्यावर शस्त्रक्रिया करवली. त्याचा डबा, औषधे, फळे यात कुठेही काही कमी त्यांनी केले नाही. एरवी नवर्‍याला शिव्यांची लाखोली वाहणार्‍या बाई, हे सगळं का करत होत्या? मी त्यांना विचारलं, तेंव्हा त्या म्हणाल्या, "ह्ये सगळं मी त्या मुडद्यासाठी न्हाई करत बाई! पन माजी शांती सासरी नांदती आता, तिच्यासाटी करते.! तिला तिच्या म्हायेराबद्दल वाईट वंगाळ कुनी बोलू न्हायी , म्हनून!" बहिणाबाईंच्या ओळी आठवल्या मला, 'लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते' ( या अर्थाच्या) आणि पाणीच आलं डोळ्यात!

स्वाती

धडाडी

स्वाती,
तुमच्या कामवाल्या बाईंची धडाडी आणि विवेक उल्लेखनीय आहेत. शिक्षण आणि माणसात असलेले अंगभूत गुण यांचा काहीही संबंध नसतो याची प्रचिती यावरून येते. चाणक्य यांनी ग्रामीण भागातील उदाहरणांचा उल्लेख केला होता, त्यासाठी हे उदाहरण योग्य ठरावे. या अनुभवावरून दुसरा मुद्दा जाणवला तो म्हणजे कोणत्याही माणसकडून शिकण्यासारखे काहीतरी मिळू शकते. अशा वेळी शिक्षण, प्रतिष्ठा अशा गोष्टी निरर्थक ठरतात. कदाचित संतसाहित्य किंवा बहिणाबाईंच्या कविता समृद्ध असण्याचे हे एक कारण असू शकेल, कारण सर्व थरातील माणसांना भिडण्याचे त्यात सामर्थ्य असते.

स्त्रियांना कधीकधी शाउलिन व्हावेसे वाटते असे मी गमतीने लिहीले होते, पण तुमच्या बाईंनी ते खरे केले.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

अगदी पटले हो!

शिक्षण आणि माणसात असलेले अंगभूत गुण यांचा काहीही संबंध नसतो याची प्रचिती यावरून येते.
अगदी मनापासून् पटले हो!

च्यामारी हे काय होते आहे? मला या राजूचे सगळेच पटत चालले आहे...
कुठेच कसे काही अपोझिशन नाहीये?
माझे विचार कुठे गेले आहेत?

आपला
लॉस्ट
गुंडोपंत

आणखी थोडे विषयांतर

एकूणच नवरा आणि सासरच्या मंडळींना प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व व त्यांच्याकडून आदर्श स्त्रीच्या केल्या जाणार्‍या अपेक्षा वगैरे वाचताना मला एक थोडे वेगळे उदाहरण आठवले.
मैथिली या बिहारमध्ये बोलल्या जाणार्‍या भाषेत एकेरी आणि आदरार्थी संबोधने आहेत व त्याप्रमाणे क्रियापदाला वेगवेगळे प्रत्यय लागतात. जसे आपल्याकडे 'तू करतेस', 'तुम्ही करता', आपण करता'. तसेच मैथिलीत 'तू छी' (तू आहेस) आणि 'आहा छिये' (तुम्ही आहात) अशी वाक्ये होतात. 'आहा छिये' सर्व वडिलधार्‍या माणसांना, बाबा वगैरेंना म्हटले जाते. यासर्वांशिवाय तिसराही एक प्रकार आहे- "आहा छथीन" (ढोबळमानाने- आपण आहात) हा 'थीन' प्रत्यय नवर्‍याशी/ जावयाशी/ सासू-सासर्‍यांशी बोलताना वापरला जातो.
मैथिली ही मातृभाषा असलेल्या एका मुलीला 'असे का?' असे विचारले असता तिने तिथे सासरच्यांना / जावयाला खूप जास्त मान द्यायची पद्धत असल्याचे सांगते. जावई घरी आला तर घरी किमान १२ भाज्या बनवल्या जातात. वधुमाय दिवसभर ओट्याशेजारून हलत नाही. एकूणच तिथे 'सासरच्या' लोकांची बरीच दहशत असलेली दिसून येते. जे त्यांच्या भाषेतही प्रतिबिंबित झाले आहे.
इथल्या लोकांना महाराष्ट्राचे कौतुक यासाठीच वाटते, की इथे सासरच्यांना इतक्या टोकाचे महत्त्व दिले जात नाही. व त्यामुळेच की काय भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात हुंडाबळीचे प्रमाण खूप कमी आहे असे ऐकले आहे.
राधिका

नवीन

इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र या बाबतीत पुढे आहे ही माहिती नवीन आहे. आपल्याकडेही जावईबापूंचे लाड होतात, नाही असे नाही. एकेरी संबोधनांचा प्रकार रोचक आहे. या बाबतीत (बर्‍याच वेळा चर्चिला गेलेला) मुद्दा म्हणजे आईला आपण तू म्हणतो आणि (निदान जुन्या काळातल्या) बाबांना तुम्ही. तीच गोष्ट मावशी आणि काकांच्या बाबतीत थोडीफार लागू होते, मावशी आली आणि काका आले वगैरे. कदाचित मुलांशी स्त्रियांचे नाते जास्त जवळीकीचे असते म्हणूनही असेल.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

एकेरी नव्हे

छथीन हे एकेरी अजिबात नव्हे. आदरार्थी वडिलांसाठी वगैरे वापरले जाते. त्याहूनही जास्त आदर व्यक्त करण्यासाठी छथीन वापरले जाते.
राधिका

मूळ लेखाबद्दल...

>स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता असते,..
मी प्रथम माता, मग सीईओ, मग पत्नी आहे असे इंदीरा नूईंनी म्हटल्याचे वाचनात आले:)

>"शिव्या फक्त पुरूष का देतात? स्त्रियांनी का नाही द्यायच्या?"
ज्याला शिव्या देणे वाईट आहे असे वाटते, त्याला पुरुषांच्या शिव्याही तितक्याच खटकाव्यात. जे स्वतः शिव्या देतात त्यांना स्त्रियांनी शिव्या देऊ नये असे वाटणे दुटप्पीपणाचे आहे.

(अवांतर: मागील काही पिढीतील स्त्रिया अधिक मोकळेपणाने शिव्या देत होत्या असे वाटते.)

>आदर्श भारतीय पुरूषाची लक्षणे काय असावीत ..
पुरुषालाही चरित्र असतेच.पुरुषाच्या चारित्र्याची सीमा पुढे धैर्य, सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा ही अशी वाढते. आता एखाद्याला/एखादीला कशाचे आकर्षण वाटावे व काय सोयिस्कर (साहचर्य-योग्य) वाटावे (जे दोन्ही वेगळे असणे अशक्य नाही.) हा ज्याचा त्याचा/तिचा प्रश्न :)

>एखाद्या मोठ्या कंपनीची सीइओ स्त्री असेल तर.........त्यांच्या व्यक्तिमत्वालाही पुरूषांइतकेच स्वातंत्र्य मिळायला हवे.

सहमत. सीइओ सीइओ असतो. स्त्री/पुरुष नव्हे :) पण पती किंवा पत्नी एकमेकांच्या अपेक्षांना केवळ तो/ती सीइओ आहे म्हणून मुरड घालतील? पुरुषाच्या बाबतीत, त्याच्या कडून स्थैर्य/सामर्थ्य या अपेक्षा असल्याने स्त्रिया (अभिमानाने/इच्छेने/ अनिच्छेने) मुरड घालतही असतील, पण स्त्री कडून ममता/आत्मीयता अशा मुलभूत अपेक्षांमुळे पुरुषांना पती म्हणून अशी मुरड घालणे जड जात असावे.

जोवर त्याच्या कडे ही ममता आत्मीयता येत नाही, तोवर स्त्रीकडे सामर्थ्य येऊ देण्यास पुरुषाची अडकाठी असायचीच :)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

सहमत

>पुरुषालाही चरित्र असतेच.
सहमत, फक्त स्त्री आणि पुरूष यांच्या बाबतीत चारित्र्याचे मापदंड वेगळे आहेत, उदा. लेखातील अभिषेक ऐश्वर्याचे उदाहरण.

>पण स्त्री कडून ममता/आत्मीयता अशा मुलभूत अपेक्षांमुळे पुरुषांना पती म्हणून अशी मुरड घालणे जड जात असावे.
बरोबर आहे. स्त्री आणि पुरूष टाइपकास्ट झाले आहेत ते याच समजुतींमुळे. पुरूषांना भावना दर्शवण्यात अडच्णी येतात ते याचसाठी.

>जोवर त्याच्या कडे ही ममता आत्मीयता येत नाही, तोवर स्त्रीकडे सामर्थ्य येऊ देण्यास पुरुषाची अडकाठी असायचीच
परत सहमत. वर मह्टल्याप्रमाणे आपापले परंपरागत रोल बदलण्याची गरज आहे.
इंदिरा नूईंचा क्रम इंटरेस्टींग आहे. त्यांनी माता, पत्नी, सीइओ असा क्रम लावला असता तर सरळ होते की त्या कुटुंबाला अधिक महत्व देतात. पत्नीची भूमिका त्यांनी शेवटी ठेवली हे विशेष वाटते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

आभार

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

चहा

संध्याकाळी दोघेजण दमून घरी आल्यावर त्याला जर तिला चहा करून द्यावासा वाटला तर चित्र बदलते आहे असे म्हणायला हरकत नसावी.

वा! म्हणजे आमच्याकडे आधीच चित्र बदललेले म्हणायला हरकत नाही! (मी सकाळचाही चहा करीत नाही !) असो. माझे वडिलही/ आणि सासरेही गेली अनेक वर्षे सकाळचा चहा बनवतात.
पण तुम्ही म्हणता ते मला अनेक घरांत दिसत नाही.

एखाद्या मोठ्या कंपनीची सीइओ स्त्री असेल तर तिचा स्वभाव आदर्श स्त्रीच्या चौकटीत बसणारा असेल का? आणि असला तर ती सीइओ म्हणून काम करू शकेल का? त्यांच्या व्यक्तिमत्वालाही पुरूषांइतकेच स्वातंत्र्य मिळायला हवे.
हे पटले. पण सीइओ कशाला अगदी घरात असलेल्या स्त्रीला देखील ती घरात आहे म्हणून स्वातंत्र्य मिळत नसले तर ते योग्य नाही. तिच्या उर्मींचा विचार तिला सततच बाजूला ठेवायला लागला तर खुरटून जावे लागणार.

आपली संस्कृती म्हणजे नेमकी कुठल्या गोष्टींमध्ये आहे हे स्पष्ट होण्याची गरज आहे असे वाटते.

हेही बरोबर, पण तो एक मोठा विषय होऊ शकतो. त्यामुळे तूर्तास एवढे आवडले यावरच थांबते.

सहमत

चित्रा,
प्रतिसादाबद्दल आभार. माझ्या मित्रमंडळामध्ये जितके विवाहीत आहेत ते सर्वही बदलत आहेत असे म्हणता येईल. इथला एक मित्र तर आठवडातून ३-४ दिवस स्वैपाक करतो, उरलेले दिवस बायको करते. आमच्या घरातही माझा मेव्हणा उत्तम स्वैपाकी आहे. बर्‍याच ठिकाणी परिस्थिती बदलत आहे असे वाटते, पण त्याच वेळेला स्वाती यांच्या बाईंच्या अनुभवासारखी उदाहरणेही सापडतात.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

 
^ वर