होम्सप्रतिमा

(हे लेखन उपक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत न वाटल्यास काढून टाकण्यास माझी हरकत नाही.)

होम्सकथांमधली प्रत्येक गोष्ट मला आवडते. डॉयलची भाषा, कथनशैली, व्यक्तिरेखा, कथेतली गुंतागुंत, ती सोडवण्याची होम्सची पद्धत, ती उलगडून सांगताना तिच्याकडे एक थिअरी म्हणून बघत होम्सने केलेली विधाने, कधी कधी एखाद्या गोष्टीच्या शेवटी होम्सने एकूण केसबद्दल किंवा त्यातल्या व्यक्तींबद्दल मारलेले शेरे... सगळं सगळं आवडतं. या सगळ्यांतून २२१ बी बेकर स्ट्रीट तसेच इतर जागा आणि त्यातली सर्व पात्रे, घटना डोळ्यांसमोर चित्रपटासारख्या उभ्या राहतात. या अशा लक्षात राहिलेल्या होम्सप्रतिमा नेहमीच डॉयलच्या वर्णनाबरहुकूम असतातच असे नाही. कधी कधी त्यात आपल्या कल्पनेचेही रंग मिसळले जातात. पण या प्रतिमांचा आपल्या मनावर उमटलेला ठसा कधीही पुसला न जाणारा असतो.

'हाउंड ऑफ बॅस्करव्हिलाज' म्हटलं की डोळ्यांसमोर माळरानाच्या क्षितिजावरचं पूर्ण चंद्रबिंब येतं. त्या चंद्रबिंबाला चिरत जाणारा खडकांचा सुळका, त्यावर उभारलेल्या प्राचीन आदिमानवांच्या दगडी झोपड्या आणि त्यांच्या बाजूला, चंद्रबिंबावर उमटलेली एक काळी मनुष्याकृती. उंच, शिडशिडीत, हातांची घडी घातलेली, मान थोडी कलती, अंगावरच्या लांब कोटाची टोकं वार्‍यावर लहरतायत! नंतर क्षणात नाहीशी झालेली ती मनुष्याकृती होम्सची आहे हे वॉटसनला नंतर कळतं. या आकृतीच्या भोवती गूढतेचं वलय निर्माण झाल्याने ही गूढरम्य प्रतिमा नेहमीच लक्षात राहते.

बर्‍याचशा कथांतून डॉयलने केस ऐकतानाची होम्सची प्रतिमा उभी केली आहे. फायरप्लेसकडे तोंड करून ठेवलेली तिरकी आरामखुर्ची. तिच्या पाठीवर आपली पाठ व डोकं टेकून बसलेला होम्स. डोळे शांतपणे मिटलेले. हात दुमडून घेऊन बोटं एकमेकांना जुळवलेली. त्याच्या या ट्रेडमार्क प्रतिमेचा खुद्द होम्सनेच नंतर 'एम्प्टी हाऊस' मधे उपयोग करून घेतला आहे. अशीच केसबद्दल विचार करतानाची, छातीवर हनुवटी टेकवून, हात पाठीमागे बांधून खोलीत येरझारा घालणारी मूर्ती मनात तयार झाली आहे. डॉयलचा होम्स खरंच येरझारा घालतो का हे मात्र मला आता आठवत नाही.

सगळीकडे होम्स नेहमी उत्साहाने सळसळताना दिसतो. तपास चालू असताना तर वॉटसन त्याला शिकारी कुत्र्याची उपमा देतो. अगदी एकही केस नसतानाही त्याच्या खुमखुमीला, शक्तीला वाट न मिळाल्याने पिंजर्‍यात अडकलेल्या सिंहाप्रमाणे वैतागून गुरगुरणारा होम्स आपल्याला दिसतो. ह्या अशा होम्सला आपण पहिल्यांदा (आणि शेवट्यांदाही!) आजारी पडून बिछान्यावर आडवा झालेला पाहतो तो 'डाईंग डिटेक्टिव्ह' मधे. खोल गेलेले डोळे , काळपट झालेले ओठ, खप्पड झालेले गाल, शक्ती गेल्यासारखे पडून राहिलेले हात आणि नंतरचं त्याचं बरळणं हे सगळं पाहून काळजात चर्र होतं. पुढे ते सगळं नाटक होतं आणि प्रत्यक्षात होम्सची प्रकृती अगदी ठणठणीत आहे हे कळल्यावर जीव अक्षरशः भांड्यात पडतो.

अशीच अवस्था 'फायनल प्रॉब्लेम'मधेही होते. होम्स आणि वॉटसन रायशेनबाखवर गेलेले असताना एक पोर्‍या येऊन वॉटसनला एक चिठ्ठी देतो आणि ती वाचून वॉटसन परत हॉटेलवर जायला निघतो तेव्हा आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकते. थोडं उतरून गेल्यावर तो मागे वळून होम्सकडे पाहतो तेव्हा तर होम्सचं दर्शन आता पुढे होणे नाही याची खात्रीच पटते. आणि मग- एका शिळेला टेकून उभी राहिलेली, हाताची घडी घालून त्या प्रचंड जलप्रपाताची खोली मोजण्यासाठी नजर खाली वळवलेली होम्सची आकृती नजरेत साठवून घेतली जाते. त्यानंतर 'एम्प्टी हाऊस' मधे तो अचानक प्रकट झाल्यावर वॉटसन आनंदातिरेकाने बेशुद्ध पडतो तेव्हा काळजीने झाकोळलेला त्याचा चेहरा असाच कायमचा लक्षात राहतो. अशी ही होम्सची अनेक रूपं! ही रुपं एकदा काळजावर कोरली गेल्यावर मग ब्रेट येवो किंवा आणखी कोणीही येवो, त्याचा होम्स बनण्याचा प्रयत्न कसा काय सफल झाल्यासारखा वाटणार?

Comments

तसेच

१. डेव्हिल्स फूट मध्ये वॅटसनने जीव वाचवल्यावर चेहर्‍यावर कृतज्ञतेचे भाव आण्णारा होम्स.
२. ट्विस्टेड लिप मध्ये स्पंज तुरुंगातल्या भिकार्‍याच्या वेशातल्या माणसाच्या चेहर्‍यावर फिरवून 'लेट मी इंट्रोड्यूस टू यू, मिस्टर अमुक तमुक(नाव आता विसरले.)' म्हणून त्याचे रुप उघड करणारा होम्स.
३. स्पेकल्ड बॅंड मध्ये त्याला धमकावणार्‍या आणि काठी दाखवणार्‍या रॉयलॉटला शांतपणे 'जाताना बाहेरचा दरवाजा लावून घ्या हां, बाहेर बरीच थंडी आहे हो.' सांगणारा होम्स.
४. नॉरवूड बिल्डर मधे पोलीसांना 'आग, आग' असं ओरडायला लावून लपलेल्या गुन्हेगाराला बाहेर काढवणारा होम्स.

स्पेकल्ड बँड

मधला धिप्पाड रॉयलटने वाकवून ठेवलेली लोखंडी सळई एका झटक्यात सरळ करून जागच्या जागी ठेवणारा किडमिडित होम्स.
राधिका

आणि

स्पेकल्ड बॅंड मध्ये त्याला धमकावणार्‍या आणि काठी दाखवणार्‍या रॉयलॉटला शांतपणे 'जाताना बाहेरचा दरवाजा लावून घ्या हां, बाहेर बरीच थंडी आहे हो.' सांगणारा होम्स.

आणि त्याआधी यावर्षी जरा थंडी जास्तच आहे, पण पिके चांगली होतील असे म्हणणारा होम्स.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

होम्स- एक अभ्यासविषय

होम्सवरील अभ्यासपूर्ण लेखन आणि प्रतिसाद आवडले. माझ्या मते लेखन आणि दृक-श्राव्य माध्यम यातला फरक असा की लेखन वाचले की वाचक आपापल्या कल्पनेनुसार, मगदुरानुसार, पूर्वगृहानुसार ती दृष्ये आपल्या डोळ्यासमोर उभी करु लागतो. मला होम्स जसा दिसला तसाच तो दुसर्‍याला दिसेल असे नाही. चित्रपट किंवा मालिकेत तुमच्या डोळ्यासमोर एक चित्रच ठेवलेले असते, ते कदाचित तुम्ही आधी वाचलेल्या आणि त्यानुसार कल्पना केलेल्या चित्राशी विसंगत असले तर अपेक्षाभंग होतो. (उत्तम उदाहरण म्हणजे देवदास) जेरमी ब्रेटने साकार केलेला होम्स खरा होम्स असाच असावा असे बर्‍याच लोकांना वाटण्याइतपत अस्सल आहे. अर्थात हेही व्यक्तीसापेक्षच आहे. पण होम्सचे धारदार नाक, उंच उभे कपाळ, भेदक नजर, सडपातळ - काहीशी कृश आणि अशक्त वाटावी अशी शरीरयष्टी (सुरुवातीच्या होम्सकथांमधे - नंतर मी बीसीएल मधून मुद्दाम आणून पाहिलेल्या एका कथेत जेरमी ब्रेटचे चक्क थुलथुलीत पोट सुटलेले होते!) - या तर शारीर गोष्टी झाल्या, पण होम्सचा विक्षिप्तपणा, 'मिडिऑक्रिटी' बाबत त्याला वाटणारी घृणा, एकाच वेळी अनेक गोष्टींवर विचार करता येण्याची त्याची असामान्य क्षमता ( उदा. एखाद्या केसवर विचार करताकरता व्हॉयोलिनचा आनंद घेता येणे - 'रेड हेडेड लीग'), त्याचे स्त्रीदाक्षिण्य - होम्स स्त्रीद्वेष्टा वगैरे अजिबात नाही- त्याची अद्वितीय बुद्धीमत्ता - हे सगळे जेरमी ब्रेटने उत्तम दाखवले आहे. दृक श्राव्य माध्यमाच्या मर्यादा लक्षात घेता यापेक्षा अधिक काही करता येणार नाही, असे वाटावे इतपत.
सन्जोप राव

पटते

मला आपले बरेचसे म्हणणे पटते. साहित्यिक एखादे पात्र आपल्या लिखाणातून उभे करतो, तेव्हा त्याच्या वर्णनातल्या मोकळ्या जागा प्रत्येक वाचक आपापल्या कल्पनेने भरत असतो. त्यामुळे एकाच पात्राच्या अनेक प्रतिमा अनेक वाचकांच्या मनात निर्माण होतात. या कारणामुळे छापील पात्र, मनातले पात्र व पडद्यावरचे पात्र यांची तुलना एका दृष्टीने चुकीचेच. पण म्हणून ती तुलना होत राहणे काही थांबत नाही.

पण होम्सचा विक्षिप्तपणा

हा गुण ब्रेटने जरा हात सैल सोडून रंगवला आहे असे मला वाटते. म्हणजे जरूरीपेक्षा जास्त विक्षिप्त वागतो असे माझे मत आहे. कथांमधल्या होम्सला ओळखणार्‍या व्यक्तीरेखा आणि आपण वाचक हे पहिल्या १-२ कथांतच होम्सला एवढे चांगले ओळखू लागलेले असतो, की हळूहळू त्याचं वागणं आपल्याला विक्षिप्त वाटेनासं होतं. जे काही धक्के बसायचे ते 'स्टडी इन स्कार्लेट' मधे घाऊक प्रमाणात बसून झालेले असतात. प्रत्येक कथेतून होम्सबद्दल नवं काहीतरी कळतं तो भाग सोडा. पण स्टडी इन स्कार्लेट वाचल्यानंतर आपल्याला होम्सच्या वागण्याची सवय होते. तसं ब्रेटला बघताना वाटत नाही. तो जरा जास्तच विक्षिप्त वाटतो. अर्थात हे माझ्या पूर्वग्रहदूषित नजरेमुळेही मला वाटत असेल. पण असो.
राधिका

प्रतिमा

इथे प्रतिमा हा शब्द अचूक आहे. पुस्तकातून किंवा पडद्यावरून प्रत्येकाच्या मनात एक प्रतिमा तयार होते आणि ही सर्वांच्या मनात सारखी असेल तर आश्चर्य वाटेल. माझा प्रवास मालिका -पुस्तक असा झाला, कदाचित त्यामुळेच माझ्या मनातील चित्र मालिकेच्या प्रतिमेच्या जवळ जाणारे आहे. असो.
वर नमूद केल्याप्रमाणे होम्सची बरीच वैशिष्ट्ये लक्षात राहतात. सतत एनर्जी ने भरलेला होम्स, यापायी कित्येक वेळा वॉटसनला झोपेतून उठावे लागले आहे. तथ्य या एकच गोष्टीची गोडी असणार्‍या होम्सला व्हायोलिनसारखे रोमँटिक वाद्य आवडावे ही अजून एक विशेष गोष्ट. त्याला कोणत्या विषयात गती आहे याचा वॉटसनने तक्ताच केला होता. यावरून दिसते की ज्या गोष्टी त्याला गुन्हा/कोडे सोडवण्यात मदत करत नाहीत (उदा. खगोलशास्त्र) त्यात त्याला काडीचाही रस नाही. होम्स कधीकधी कायद्याला गुंडाळून ठेवतो. ऍबी ग्रँजच्या केसमध्ये क्रोकरनिर्दोष आहे हे कळाल्यावर तो त्याला सोडून देतो. दुसरे उदाहरण म्हणजे ब्लू कारबंकलचा चोर.
लेखातील शेवटचे वाक्य ब्रेटवर थोडेसे अन्यायकारक वाटते. मला वाटते आत्तापर्यंत जितके होम्स पडद्यावर रंगवले गेले त्या सर्वांमध्ये ब्रेटचा होम्स मूळ होम्सच्या जवळ जाणारा वाटतो.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

जेरेमी बॅरेटचा होम्स

ब्रिटिश लोक त्यांचे शिष्टाचार, त्यांची ती गजगद्विख्यात शिस्त , वेळेच्या आणि इतरही सर्व बाबतीतला काटेकोरपणा या सगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत माझ्या भारतीय मनाला त्यांच्या वागणुकीतील कोरडेपणाबद्दल सूक्ष्म तिरस्कार वाटतो पण इतर गुणांबद्दल हेवा वाटतो. तरीही एका अपरिचित समाजातल्या आता जुन्या झालेल्या काळाचा एक पतिनिधी डोळ्यासमोर उभा करणे खरे म्हणजे बरेच अवघड आहे.
जेरेमी बॅरेट चा होम्स व्यक्तिश: मला पटत नाही कारण मुळात त्याच्याबद्दल विश्वासच वाटत नाही. अडचणीत सापडलेल्या लोकांना आपले प्रश्न ज्याच्या कानावर घालताना आणि घालून झाल्यावर आश्वस्त आणि निर्धास्त वाटावं असा काही हा होम्स मला वाटत नाही. केवळ केस सोडवताना मिळणार्‍या आनंदासाठीच मी केस घेतो असं ठासून सांगणारा तो पुस्तकातला होम्स या माणसाच्या देहबोलीतून मला तरी जाणवत नाही. विशेषत: केसबद्दल ऐकून् घेताना त्याने केलेला चेहरा पाहून् "मेलो तरी बेहत्तर पण याच्याकडे मदत मागणं नको" असं मला तरी होऊन जाईल असं कुठेतरी वाटून जातं. कदाचित बॅरेटचं वागणं ब्रिटिश सभ्यतेला धरूनच असेल पण ते मला पटत नाही हेच खरं.

होम्स एरवी विक्षिप्त वागत असला तरी त्याने मनात आणलं तर स्त्रियांशी इतक्या मृदूपणे वागतो की त्यांचा विश्वास जिंकणं त्याला सहज शक्य होतं (ही कॅन बी अ रियल चार्मर टु द फेअरर सेक्स !) असं ज्याचं वर्णन आहे त्या होम्सचं हिस्टरीवरच्या मालिकेतलं वागणं अनेकदा धक्कादायक वाटतं. शिवाय होम्सला वॉटसनबद्दल वाटणारा जिव्हाळा वेळोवेळी प्रकट झाला आहे. एका कथेत तर(बहुधा द थ्री गॅरिडेब्ज् ... चूभूदेघे) वॉटसनच्या केसालाही धक्का लागला असता तर समोरच्या माणसाचा आपण खून केला असता असं होम्स ठासून सांगतो. पण पडद्यावर मात्र तो वॉटसाला कायम दुय्यम दर्जाचा मदतनीस (खरं म्हणजे नोकर) असल्यासारखा वागवतो, प्रसंगी "काय मूर्ख आहेस रे " असंही म्हणतो. यात कदाचित बॅरेटची काही चूक नसेलही. पण मला मात्र ते लगेच खटकतं. विशेषत: ज्या होम्सकथांचं भाषांतर करायचा मी प्रयत केला त्या तर मला तपशीलवारपणे आठवत असल्यामुळे हा प्रकार आणखी वाईट वाटतो.

होम्सची मालिका मी केवळ एकाच कारणाने पाहिली. ते कारण म्हणजे लंडन आणि इतर काउन्टीजचं जे वर्णन होम्सकथांमधे विपुल प्रमाणात सापडतं, ते पूर्णपणे दृष्टीआडच्या सृष्टीतलं असल्यामुळे डोळ्यासमोर उभं राहणं अशक्यच असतं. पण या मालिकेतून त्याचा निदान अंदाज तरी येतो. त्यातल्या स्पेकल्ड बँड किंवा स्कँडल इन् बोहेमिया किंवा रेड हेडेड लीग या अत्यंत आवडत्या गोष्टींनी पडद्यावर फारच निराशा केली होती

पण शेरलॉक होम्स ही तशी विलक्षण प्रभावशाली व्यक्तिरेखा आहे. होसकथांचा प्रभाव माझ्या बाबतीत तरी इतका खोलवर पडतो की स्पायडरमॅनचं म्युटेशन जसं त्याच्या जेनेटिक सिकवेन्समधे शिरलं तशाच काही सवयी जीन्सपर्यंत पोचल्यासारख्या वाटतात. विशेषत: दुसर्‍यांनी केलेल्या कोडिंगमधले बग्ज फिक्स करताना तर माझ्या अंगात जणू काही होम्स संचारतो . आपोआप होम्शियन पद्धतीने विचार होतो आणि गबग लगेच हातात येतो असा अनुभव आहे :) अर्थात होम्सची निरीक्षणशक्ती अफाटच आहे. त्याच्या दहा टक्के जरी काम मला जमलं तरी अतिशय अभिमान वाटायला लागतो.

--अदिती

होम्स

कधीकधी वॅटसनला जास्तच तुच्छतेने वागवतो असे मलाही वाटते. पण डॉयलच्या मनात होम्स ही व्यक्तीरेखा अशीच रंगवायचे असे असेल. आणि होम्सला वॅटसनबद्दल वाटणारी काळजीही बर्‍याचदा दिसत असतेच. वेगळी आणि अलिप्त ब्रिटिश संस्कृती यामुळेही आपल्याला अशा गोष्टी प्रकर्षाने जाणवत असाव्यात. मी होम्स वाचला आणि लगेच ब्रेटचा होम्स पाहिला. त्यामुळे आता होम्स वाचला आणि 'होम्सने अमुक अमुक केले' असे वाचले की डोळ्यासमोर ब्रेटच ती क्रिया कराताना येतो. (जसे आता कृष्णाच्या कथा वाचल्यावर नितीश भारद्वाजशिवाय दुसरं कृष्णाचं चित्रच डोळ्यासमोर येत नाही.)

मायक्रॉफ्ट

होम्सची सिरीयल मी सलग बघितलेली नाही. पण एखाद दोन भाग बघितले आहेत. त्यातला जेरेमीने रंगविलेला होम्स हा खूपच हायपर वाटला होता. तसेच होम्सचा मोठा भाऊ मायक्रॉफ्ट हा केवळ तीनच कथांमधून दर्शन देतो. त्याचे पात्र सिरीयलमधे कोणी रंगविले होते? होम्सपेक्षाही तो जास्त विक्षिप्त आणि हुषार असा दाखविलेला आहे. होम्सचा गाजलेला डायलॉग 'एलिमेन्टरी, माय डियर वॉटसन' हा देखील पुस्तकात कुठेच आढळलेला नाही. मग तो केवळ सिरीयलमधेच होता का?

एलिमेंट्री

एलिमेंट्रीचे उत्तर इथे सापडेल.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

रौशन पॉयरॉ

गेले वाटते डोक्यावरचे केस अरेरे, तुम्ही मेंदूला कितिही चढवा, व्यक्तिमत्व महत्वाचे असते हो!!!!! समोर रौशन पॉयरॉ किंवा हृतीक रोशन आले कोणाची निवड ललना करेल. ही केस तुम्हालाच सोडवायला देतो.

बाकी मला मॉन्क सिरीयल बघायला आवडते..टोनी शालूबचा अभिनय छानच. सध्या आमचे मत त्याला.

ह्म्म्म्

हा होम्सकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन असू शकतो.
मी पॉयरॉ वाचलेला नाही. एकच कथा वाचलेली आहे- 'ऍन अफेयर ऍट स्टाईल्स' असे काहीसे नाव होते. स्पष्ट सांगायचे झाले, तर फार खास वाटली नाही. संशयाचा काटा एका माणसाकडून दुसर्‍या माणसाकडे हलवणे, एवढेच कथाभर चालले होते.
दुसर्‍या एका कथेचे (नाव माहित नाही) थिएटर अडॅप्शन करून मध्यंतरी एक मराठी नाटक आले होते (त्याचेही नाव आठवत नाही). त्यात विक्रम गोखले आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या मध्यवर्ती भूमिका होत्या. कथा तशी चांगली होती. त्यात बरेच चांगले ट्विस्ट्स् होते. पण होम्सच्या तालमीत वाढलेल्या आम्हाला आता पुढे काय होणार आहे हे ते घडण्याआधीच कळत होते व त्यामुळे सर्व ट्विस्ट्सची मजा जात होती. असा रसभंग दिग्दर्शनातल्या चूकांमुळे होत असण्याचीही शक्यता आहे. मूळ कथा वाचताना प्रत्येक गोष्ट आधी कळली असती का, हे सांगता येणार नाही.
एकूणच पॉयरॉ आणि त्याच्या राखाडी पेशींबद्दल मला काही माहित नाही.त्यामुळे या वर मांडलेल्या मतांना कृपा करून टीका समजू नये. टीका करण्यासाठी आधी ज्यावर टीका करायची ते वाचावे लागते, म्हणजे आम्ही तरी वाचतो. ते वाचलेले नसल्याने, ही टीका नाही.

होम्स हे गुन्ह्याच्या घटनास्थळी ३९ पावले मोजणे, अथवा विड्यांच्या थोटकांचा शोध घेणे असली अस्स्ल माठाडी कामे करत असतात.

ह्म्म्म् होम्सने ३९ पावले वगैरे फिल्मी प्रकार केल्याचे आठवत नाही (हा माझ्या स्मृतीचा दोष असू शकतो) अगदीच केला असल्यास त्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नसेल याची मला खात्री आहे. राहिली गोष्ट विडीची थोटके शोधण्याची, साध्या विडीच्या राखेवरून विडी कोणती, कुठून घेतली, कितीला घेतली, अशी विडी साधारण कोणत्या प्रदेशात वापरली जाते हे सारे ओळखण्यातली subtlety विडी ओळखण्यासाठी तसेच तो कोणत्या दुकानात विडी घेतो, त्याच दुकानात आणखी कोणी विडी घेते की नाही वगैरे जाणण्यासाठी सरळ संशयितावर पाळत ठेवणार्‍यांना कळणार नाही कदाचित. :)

एकंदरीत ह्या आणि आधीच्या संकेतस्थळावरील लोकांची आवड आणि वये बघता, लहान मुलांना होम्स आणी मोठ्या मुलांना पॉयरॉ आवडतो, असे म्हणणे योग्य ठरेल.

अरे वाह, म्हणजे तुम्ही आमचे 'दादा' ? :प्
पॉयरॉच्या आपल्या मते उत्कृष्ट कथा कोणत्या ते सांगाल का? म्हणजे आम्ही त्या शोधून वाचू व मोठे व्हायचा प्रयत्न करू. :)

आता, येवू द्या व्यक्तिगत निंदा....

तसे व्हायला हे 'नंतरचे' संकेतस्थळ नाही. :)

राधिका

पॉयरॉ नाही

४.टेन लिटल इंडियन्स (अँड देन देर वर नन्)
हे पुस्तक मलाही खूप आवडलेले आहे. पण त्यात कोणीच डिटेक्टिव नाही, पॉयरॉ तर नाहीच, याची आठवण करून द्यावीशी वाटते.
(मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव टेन लिटल निगर्स् असे आहे. अमेरिकेत 'निगर्स्' शब्दाच्या वापरावर कायद्यातील अडथळे होते म्हणून अमेरिकेत प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे नाव अँड देन देर वर नन् असे केले असे ऐकून आहे. )
टेन लिटल निगर्स् ... ह्या बालगीताचा उपयोग पुस्तकात फारच प्रभावीपणे केलेला आहे.

गुन्ह्याचे फिजिकल पुरावे शोधण्यात तिचाही खूपच वेळ जातो.

पटत नाही. मिस मार्पल् बर्‍यापैकी म्हातारी आहे. तिला आधुनिक तंत्र माहिती नसते पण तिला पूर्वी भेटलेली माणसे आणि आताची माणसे यांच्यातील साम्य तिच्या चाणाक्ष नजरेला आणि मेंदूला चटकन समजते. तसेच ती उत्तम तर्क करू शकते. विसंगती तिच्या लगेच लक्षात येते. तिचे तिच्या खेड्यातील अनुभव व तर्क करण्याची क्षमता यांचा(च) उपयोग करून ती निष्कर्ष काढते. माहिती गोळा करण्यासाठी ती खास बायकी पद्धती वापरते. उदा. स्वेटरची वीण विचारणे, पाककृती विचारणे इ. मिरर क्रॅक्ड् फ्रॉम् साईड् टू साईड् ह्या कादंबरीत मिळालेल्या माहितीतून खात्रीशीर काहीच सांगता येत नसते. तेव्हा 'जर्मन मीझल्स्' एवढ्याच संदर्भावरून ती खून कसा झाला ते ओळखते.
(थर्टीन् प्रॉब्लेम्स हा कथासंग्रह जरूर वाचा. मिस् मार्पल् बसल्या जागेवरूनच गुन्ह्याचे उलगडे कसे करते ते समजेल. हे पुस्तक Tuesday Club की अशाच काही तरी नावानेही प्रकाशित झालेले आहे.)

होम्स आणि पायरॉ

या दोघांच्या आठवणी ताज्या झाल्याने चांगले वाटले. (भारतात परत आल्यापासून दोन्ही कमी वाचते..स्वतः विकत घेऊन वाचायला पुस्तके महाग आहेत.) मला दोन्ही कथा आवडतात. ख्रिस्तीच्या कथेत 'खुनी कोण' हे शेवटपर्यंत कळत नाही त्यामुळे वाचत रहायला मजा येते. एकदा पुस्तक वाचून खुनी कोण ते कळले की परत वाचून 'अरे हो, इथे क्ल्यु दिला होता लेखिकेने..आपल्या लक्षात यायला हवं होतं' वगैरे बारकाईने वाचण्यात आनंद मिळतो.
पायरॉचे दर्शनी रुप जरा बावळे आहे असे वाटते. (लांब मिशा, कमी उंची, त्याचे काहीतरी दुवा आठवल्यावर धावणे इ.इ.) होम्स आपली उंची, टोकदार नाक, भेदक डोळे यामुळे आधीपासूनच छाप मारुन जात असावा.
एक फरक दिसला तो असापणः ख्रिस्तीच्या कथांतले गुन्हेगार बरेचदा काही भावनिक असुरक्षितता किंवा उलथापालथीमुळे बहुतेक गुन्हे करतात. त्यामानाने होम्सकथातले गुन्हेगार पैसे, जुने रहस्य लपवणे,प्रेम यामुळे गुन्हे करतात. ख्रिस्तीच्या कथांत बहुतांश वेळा खून झालेली व्यक्ती वृद्ध/एकदम टिनएजर असते. आणि वृद्ध असेल तर तिच्या आसपास तिचे मावस/मामे भाऊ बहिण, भाचे, पुतणे , एखादी आश्रित विधवा/अनाथ तरुणी, एक अविवाहीत स्त्री कम्पॅनियन यांची भाऊगर्दी असते. शिवाय पायरॉ होम्स इतकी वेशांतरेही करत नसावा.
(या सगळ्याला 'मला असे वाटते' हे शेपूट लावून घ्यावे, होम्स आणि ख्रिस्ती वाचून बरेच दिवस झाले, त्यात पण जास्त ख्रिस्ती वाचायला मिळाले नाहीत. एकदा रद्दीच्या दुकानात चक्कर टाकून बघायला हवी. नवी इंग्रजी पुस्तके विकत परवडत नाहीत. मी वाचलेले इतकेचः अ मर्डर इज अनाउन्सड,डंब विटनेस, क्रुकेड हाऊस, सॅड सायप्रेस, मिस्टीरियस अफेयर ऍट स्टाइल्स.
अवांतरः 'मिस्टीरियस अफेअर' मध्ये पायरॉसह ८-९बेल्जियन लोक इंग्लंडात आश्रित म्हणून राहिले होते असा काहीसा संदर्भ येतो. ते आश्रित/निर्वासित वगैरे होते का? काय झाले होते?तिथे पण भारत-पाकिस्तान-बांग्लादेश फाळणीसारखा काही प्रकार होता की काय?
(अडाणी)अनु.)

सहमत

सर्व मुद्यांवर सहमत. मीही पायरॉ वाचलेला नाही आणि वाचल्याशिवाय मत प्रदर्शित करणे योग्य नाही. पायरॉची मालिका पाहिली होती पण ती तितकी प्रभावी वाटली नाही. एकदा(च) अगाथा ख्रिस्तीचे एक पुस्तक वाचले होते. तेव्हा खून झाल्यावर ज्याच्यावर अजिबात संशय येणे शक्य नाही असा माणूस मी मनात ठेवला आणि शेवटी तोच खुनी निघाला. असो.

एकंदरीत ह्या आणि आधीच्या संकेतस्थळावरील लोकांची आवड आणि वये बघता, लहान मुलांना होम्स आणी मोठ्या मुलांना पॉयरॉ आवडतो, असे म्हणणे योग्य ठरेल.

हा निष्कर्ष मनोरंजक आहे. :) ह्याला कन्फर्मेशन म्हणून पुरावा हवा असल्यास मला हॅरी पॉटर/बग्ज बनी/टॉम अँड जेरी हे ही आवडतात हे इथे नमूद करू इच्छीतो.

तसे व्हायला हे 'नंतरचे' संकेतस्थळ नाही. :)

संपूर्ण सहमत. :)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

पॉयरॉ / मिस् मार्पल

"अफेअर ऍट् स्टाईल्स्" यात पॉयरॉ शेवटी रहस्यभेद कसा करतो (कॅप्टन हेस्टिंग्ज त्याला म्हणतो की "त्या दिवशीही तू असाच उत्तेजित झाला होतास आणि तुझे हात तेव्हाही असेच कापत होते" - ह्या वाक्यातून त्याला काय समजते -) हे निव्वळ भन्नाट आहे.

ऍगाथा ख्रिस्तीच्या गोष्टींमध्ये संशयाची सुई "फक्त एकाकडून दुसर्‍याकडे फिरत राहते" हे वाक्य तितकेसे खरे (आणि वाचताना (मला) वाटले तितके उथळ) नाही. प्रत्येक प्रसंग / प्रत्येक संवाद हा तोलून मापून लिहिलेला असतो. प्रत्येक घटनेमागे सबळ / तर्कशुद्ध संगती / मानसशास्त्रीय पुरावे असतात.

शिवाय "ज्याच्यावर आपला संशय नसतो त्याला (जबरदस्तीने) खुनी ठरविलेले असते" हेही फारसे खरे नाही. खुन्याकडे असलेला "मोटिव्ह" आणि संधी ही वाचकांना वेळोवेळी सांगितलेली असते. ऍगाथा ख्रिस्तीच्या कुठल्याही गोष्टीत कच्चे दुवे कधीच नसतात. गोष्ट वाचून संपल्यावर आपल्याला पडणार्‍या सगळ्या प्रश्नांची उत्तरे गोष्टीतच सापडतात.

वरील प्रतिसादात आपण उल्लेख केलेले नाटक (विक्रम गोखले / सुप्रिया) बहुधा त्या आधी (नंतरही असेल) विजय गोखले आणि अनुराधा राजाध्यक्ष यांना घेऊनही सादर केले होते. त्या मूळ कथेत (विटनेस फॉर द प्रॉसिक्यूशन) त्या नायिकेचे शेवटचे फक्त एकच वाक्य पूर्ण कथेचा उलगडा करते.

"पंतप्रधानांचे अपहरण" या कथेत कोणीतरी पॉयरॉला सल्ला देतो "तू पंतप्रधानांना शोधण्यासाठी काहीतरी कर ना - एका जागी बसून काय राहिला आहेस? हातांचे ठसे , रक्ताचे डाग तपास", त्यावर पॉयरॉ म्हणतो "मला ते सगळे करण्याची गरज नाही," आणि तो लंडनमध्येच बसून अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने प्रकरण उलगडतो!

David Suchet या अभिनेत्याने पॉयरॉचे "सोंग" अतिशय मजेदार पद्धतीने सादर केले आहे.

पॉयरॉला वेळ पडली तर स्कॉटलंड यार्ड मधल्या इन्स्पेक्टर जॅप कडून काही "पोलिशी" मदत तरी मिळते - पण मिस मार्पल तर फक्त तिच्या संभाषण कौशल्यातून (आणि मीरा फाटक म्हणतात तसे तिच्या मनुष्यस्वभावाच्या अभ्यासातून) सारी कोडी सोडवते - एकदाही वेषांतराचा आधार न घेता - खरे तर आपले घरही न सोडता!

तस्मात्, पॉयरॉ / मिस् मार्पल विरुद्ध् होम्स अशी तुलना होऊ नये, कारण पॉयरॉ / मार्पल यांच्या पद्धती होम्सपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत.

चू. भू. द्या घ्या.
अमित कुलकर्णी

अवांतर - पॉयरॉ बद्दल कुणीतरी असा छान लेख लिहावा अशी इच्छा आहे.
------------------------------------------
तुम्ही सध्या हे वाचत आहात.

विटनेस फॉर द प्रॉसिक्यूशन

ही कथा जबरदस्त आहे. अगाथा ख्रिस्तीच्या 'बेस्ट्' पैकी एक. त्यात नाट्यमयता खूप असल्याने नाटक/ चित्रपट बनवायला अगदी योग्य. तिचे नाट्यीकरण प्रभावी झाले नसेल तर दोष कथेचा नक्कीच नाही.

ह्म्म्

आपला हा प्रतिसाद तसेच मीराताई व अनुताई या सर्वांचे प्रतिसाद आवडले. पॉयरॉ आणि मिस. मार्पल यांच्या कथा वाचाव्याशा वाटल्या.

राधिका

नाटकाचे नाव

एका कथेचे (नाव माहित नाही) थिएटर अडॅप्शन करून मध्यंतरी एक मराठी नाटक आले होते (त्याचेही नाव आठवत नाही). त्यात विक्रम गोखले आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या मध्यवर्ती भूमिका होत्या. कथा तशी चांगली होती. त्यात बरेच चांगले ट्विस्ट्स् होते.

ह्या नाटकाचे नाव 'खरं सांगायचं तर' असे आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हो

बरोबर
राधिका

आदरणीय?

- (आपला आ.) सर्किट

हे आ. म्हणजे आदरणीय की आमदार? :प् हलकेच घ्या हो.
राधिका

अजूनही ऑप्शन्स्

आ. - आगाऊ (का आगावू)
आ. - आतातायी
आ. - आक्रस्ताळी
आ. - आदळाआपट्या
आ. - आकांडतांडव्या
आ. - आभूषित
आ. - आमांश
आ. - आम्लधर्मी
आ. - आयता
आ.- आयुक्त्
आ. - आरक्त
आ. - आयोजक
आ. - आरक्षित
आ. - आपत्ती
आ. - आंबूस
आ. - आबालवृध्द
आ. - आपत्काळ
आ. - आढ्यताखोर
आ. - आडवातिडवा
आ. - आप्पलपोट्या
आ. - आपमतलबी
आ. - आफत
आ. - आधीन
आ. - आधुनिक
आ. - आण्विक
आ. - आग्रही
आ. - आरोपी

ते महा का मेगा डिटेक्टीव्ह आहेत त्यामूळे प्रसंगानुरूप ते ऑल ऑफ दी अबॉव्ह् एन्ड् मोअर पण असतील.
सगळ्यात डेंजरस म्हणजे आ. - आप्तस्वकीय.......

आपला आभारी
सहज

----------------------------------------------------------
मै तो नन्हासा मुन्नासा प्यारासा बच्चा हू!!! इसलिये हलका ल्यो भाइ हलका ल्यो!

ह ह लो पो

फुल टू धमाल केलीत बा...!

 
^ वर