२२१ बी, बेकर स्ट्रीट

रविवार सकाळ, साधारण दहाचा सुमार. स्टारट्रेकच्या प्रतिक्षेत दूरदर्शनसमोर तळ ठोकून बसलेली बच्चेकंपनी. आणि अचानक दिसते जुन्या काळातील लंडन, घोडेगाडीमध्ये होणारी वाहतूक, कोट घातलेले ब्रिटीश जंटलमन आणि नक्षीदार हॅट घातलेल्या झग्यातल्या स्त्रिया. जोडीला व्हायोलिनचे सूर. या पार्श्वभूमीवर अवतरतो एक उंच, सडपातळ तरूण. धारदार नाक, बोलके डोळे, रुंद कपाळ, एनर्जीने भरलेल्या हालचाली आणि या सर्वांमागे जाणवणारी प्रखर बुद्धीमत्ता. त्या काळात इंग्रजी व्याकरणाशी लढाई नुकतीच सुरु झाली होती, त्यामुळे संवाद फारसे कळायचा प्रश्न नव्हता. पण त्या तरूणाच्या व्यक्तिमत्वामध्ये अशी काही जादू होती की प्रथमदर्शनीच बच्चेकंपनी त्याच्या प्रेमात पडली. शेरलॉक होम्सशी ही आमची पहिली भेट होती.

नंतर एसीडीच्या पुस्तकांमधून हाच तरूण परत भेटला. पण आता त्याचे व्यक्तिमत्व आधीच मनाच्या पडद्यावर उमटलेले होते. पुस्तके वाचल्यानंतर प्रेम द्विगुणीत झाले. मग परत मालिका बघताना त्या कलाकाराच्या अभिनयाचे आविष्कार दिसू लागले. जेरेमी ब्रेट ही भूमिका जगला आहे. होम्सच्या वागणुकीतील बारकावे त्याने एकदम अचूक पकडले आहेत. अनपेक्षित प्रसंगी फुटणारे हसू, प्रसंगी वॉटसनच्या वागणूकीमुळे विलंब झाल्यास येणारा उतावीळपणा, कोडे सुटत नसले तर येणारी अस्वस्थता, यादी लांबत जाते. या सर्वांमध्ये लक्षात राहतात ते त्याचे डोळे. काही न बोलता डोळ्यांमधून किती भावना व्यक्त करता येतात याचे उत्तम उदाहरण. गुन्हेगार सापडल्यावर येणारी कठोरता, कोड्याचे सूत्र मिळाल्यावर येणारी डोळ्यातील चमक, वॉटसनने एखादा प्रश्न विचारल्यावर याला एवढे कसे कळत नाही असा भाव. मालिकेत इतर कलाकारांची साथ देखील उत्तम आहे. मिसेस हडसन आणि इन्स्पेक्टर लेस्ट्रेड चपखल. अपवाद एकच. पहिल्या दोन सीझनमधला वॉटसन बरोबर वाटत नाही. कदाचित यामुळेच मोरियार्टीशी लढाई झाल्यानंतर होम्स परत येतो तेव्हा वॉटसनची भूमिका वेगळ्या कलाकाराने केली आहे. आधीचा वॉटसन होम्सचा मित्र वाटत नाही, नंतरचा मात्र एकदम फिट्ट बसतो.

प्रसिद्ध व्यक्तिरेखा पडद्यावर रंगवणे ही दुधारी तलवार असते. जर प्रयत्न फसला तर माफी नाही. बर्टोलूचीच्या लिटल बुद्धामध्ये कियानु रीव्हजला बुद्ध म्हणून बघताना माझी मलाच दया आली. बिचारा कुठल्याही अँगलने बुद्ध वाटत नव्हता. याउलट एखादी भूमिका जिवंत कशी करायची हे ब्रिटीश कलाकारांकडून शिकावे. मग तो गांधींच्या भूमिकेत बेन किंग्जले असो किंवा जेरेमी ब्रेटचा शेरलॊक होम्स. आणि ब्रिटिश आपल्या मितभाषी परंपरेला जागून याबद्दल जास्त काही बोलत नाहीत, त्यामुळे हे नेमके कसे केले हे गूढच रहाते. पुस्तक आधी वाचावे की चित्रपट आधी बघावा याबद्दल दुमत आहे. पण मला वाटते या बाबतीत कुठल्याही क्रमाने गेलो असतो तरी होम्स म्हटले की जेरेमी ब्रेटच समोर आला असता.

Comments

सहमत

ही मालीका मी खूप एन्जॉय केली आहे.

सहमत

याशिवाय अँथनी हॉपकिन्स, रॉवान ऍटकिन्सन, आणि माईक माईर्स (!) हे ब्रिटीश अभिनेतेही आवडतात.

मि. बीन च्या रुपात रोवान ऍटकिन्सन पुन्हा दिसणार नाही याची खंत वाटते.


आम्हाला येथे भेट द्या.

अरेरे

मि. बीन च्या रुपात रोवान ऍटकिन्सन पुन्हा दिसणार नाही याची खंत वाटते.

हेच वाक्य मला

दिलीप प्रभावळकर चिमणरावच्याच भुमीकेत.....

असो. मि. बीन खूप लोकप्रिय तसेच त्याच रोल मूळे त्यांना प्रसिध्दी मिळाली आहे म्हणा. जसे तेजाब मधे मला (कहे दो के तुम हो मेरी गाण आवडत पण त्याहून जास्त नाव झाल एक दो तिन गाण्याच तसलाच प्रकार )

पण मला मात्र रोवान ऍटकिन्सन "ब्लॅक ऍडर" च्या भूमीकेत सर्वात जास्त पसंद आहेत्.

अवांतर बद्दल माफी पण रोवान ऍटकिन्सन यांची मि. बीन पेक्षा मोठी ओळख हवी म्हणून्....

सहमत

ऍन्थोनी हॉपकिन्स माझाही आवडता आहे. याशिवाय बेन किंग्जलीने गांधी (अर्थातच) आणि शिंडलर्स लिस्टमध्ये अशक्य काम केले आहे. त्याचा अजून एक चित्रपट लक्षात राहिला,ऑलिव्हर ट्विस्ट. यात तो शेवटपर्यंत ओळखायलाच येत नाही.
वर उल्लेख केला नाही. जेरेमी ब्रेटचे १९९५मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सुंदर

मालिकेचे काही भाग हिस्टरी वाहिनीवर पाहण्याचा योग आला होता.
जेरेमी ब्रेट चांगली भूमिका करत असे. आणि पुस्तकातल्या होम्सच्या वर्णनाशी त्याचे वर्णन पण बर्‍यापैकी जुळत असे.
मी बहुतेक आधीचा वॅटसन पाहिला असावा. मी क्रुकेड मॅन आणि डान्सिंग मेन आणि कॉपर बीचेस हेच भाग पाहिले आहेत फक्त.
जुने वातावरण, घोडागाड्या, ते जुने कोट आणि टोप्या, तारा, पत्रं, हे सर्व असूनही आजही मालिका पाहताना तितकीच सुंदर आणि जिवंत वाटते.
अवांतरः असे वाचल्याचे आठवते की खुद्द डॉयलला आपल्या ऐतिहासिक कादंबर्‍या जास्त आवडायच्या आणि होम्स लिहीणे तद्दन फालतूपणा वाटायचा. खरं का?

हो.

सर कॉनन डॉयल यांच्या एका कादंबरीच्या प्रस्तावनेत मी हे वाक्य वाचले आहे.

"S H is killing my imagination and creativity".

त्यांचा एकंदरीतच सूर् असा होता की एखाद्या लेखकाने आपल्या आवडीशी किती बरे तडजोड करावी?
डॉयल साहेब मात्र होम्स मुळेच अजरामर झालेले आहेत आणि राहतील.

सहमत

खुद्द डॉयलला आपल्या ऐतिहासिक कादंबर्‍या जास्त आवडायच्या आणि होम्स लिहीणे तद्दन फालतूपणा वाटायचा.

बहुधा लॉस्ट वर्ल्ड त्याची अधिक आवडती असेल. डॉयलला होम्सचा कंटाळा आला होता म्हणूनच त्याने मोरियाटीच्या लढाईत त्याला मारून टाकले. नंतर लोकाग्रहास्तव त्याला परत आणावे लागले. खर्‍या जीवनात डॉयलची निरिक्षणशक्ती उत्तम होती. त्यांनी पोलिसखात्याला काही गुन्ह्यांचा तपास लावण्यात मदत केली होती.

लेखामधल्या चित्रफितीमध्ये जो दिसतो तो आधीचा वॉटसन आहे. नंतर त्याला बदलले.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

जेरेमी ब्रेट

मलाही खूप आवडायचा. सतत शोधणारे डोळे, तरतरीत नाक, ताठपणा शेरलॉक होम्ससाठी अगदी शोभून दिसायचा. या मालिकेची आठवण लेखाने झाली. वा! व्वा!

अवांतरः माझा पत्ता जाहिर करण्याची परवानगी मी कोणाला दिली होती असे वाटत नाही. लेखाच्या शीर्षकात ती कशी जाहिर झाली बॉ!

अरेच्च्या

मिसेस हडसन तुम्ही ????

त्यांचे भाडोत्री

मि. हडसन नाही त्यांचे भाडोत्री आम्ही!

ह्म्म्म्

होम्स खरा माणूस असता तर जेरेमी ब्रेट सारखाच दिसला असता असं मलाही वाटतं. ते डोळे, ते नाक, उंच शिडशिडीत बांधा सगळं थेट होम्ससारखंच. पण तो जसा वागतो, वावरतो, तसा होम्स वागणार, वावरणार नाही असे राहून राहून वाटते. कदाचित होम्सबद्दल मनात वेगवेगळ्या कल्पना तयार झाल्याने माझं मन ब्रेट ला होम्स म्हणून स्वीकारायला तयार नसेल.
मला मिसेस. हडसन मात्र फारच आवडल्या. :)

राधिका

हम्म

गंमत अशी की माझे मत अगदी उलटे आहे. :) खरा होम्स अगदी असाच वागला असता असे मला प्रत्येक वेळी बघताना वाटते. मलाही बाकीची पात्रे आवडली, फक्त (वर म्हटल्याप्रमाणे) आधीचा वॉटसन सोडून.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

असेच

कदाचित होम्सबद्दल मनात वेगवेगळ्या कल्पना तयार झाल्याने माझं मन ब्रेट ला होम्स म्हणून स्वीकारायला तयार नसेल.
-- सहमत.

कदाचित पुस्तक/कथा वाचल्यावर किती काळाने ही मालिका पाहिली यावरही अशा मनातल्या प्रतिमांचे पक्के होणे अवलंबून असावे. म्हणजे अशोक सराफला नारायण म्हणून पाहणे रुचले नाही, पण हॅरी पॉटर वाचताना, प्रा. स्नेप किंवा डम्बलडोर यांचा उल्लेख आला की चित्रपटातील ते ते कलाकारच डोळ्यासमोर येतात.

खरे आहे

तसेच गेल्या काही वर्षात कित्येक सिनेमांच्यामूळे (लॉर्ड ऑफ द रिंग्ज्, पॉटर) मूळ पुस्तकांची ओळख झाली त्यामूळे एखादी व्यक्तिरेखा म्हणजे तो कलाकार डोळ्यासमोर येतो.

शेर(लोग) का शेर

नाचणारी माणसं
नाचणारी माणसं

लहानपणी आपणही शेरलॉक होम्स आहोत असे समजून वागणार्‍यांपैकी मी एक होतो.
पात्रे, वातावरण निर्मिती, रहस्य आणि अभिनय या सर्वच दृष्टीने ही मालिका अत्युत्कृष्ट होती.फार, फार आवडलेली मालिका.

"When you have eliminated the impossible, whatever remains, however improbable, must be the truth!"
- वा! क्या बात है! ये हुआ ना शेर(लोग) का शेर!
साधी गोष्ट आहे, मित्रा वॉटसन...

अवांतर : शेरलॉक होम्स आपल्या पाईपमधून कोकेन ओढत असे चित्रण कॉनन डॉयलने का केले असावे बरे?.

मस्त

नाचणार्‍या माणसांचे चित्र मस्त आहे.

लहानपणी आपणही शेरलॉक होम्स आहोत असे समजून वागणार्‍यांपैकी मी एक होतो.

अगदी. माझेही तसेच व्हायचे. मग उगीचच येणार्‍या जाणार्‍या माणसांच्या चपलांचे, कपड्यांचे निरीक्षण होत असे. :)

शेरलॉक होम्स आपल्या पाईपमधून कोकेन ओढत असे चित्रण कॉनन डॉयलने का केले असावे बरे?.

होम्सचे पात्र बरेचसे एकलकोंडे आणि माणसांमध्ये जास्त न मिसळणारे आहे. त्याच्याच म्हणण्याप्रमाणे जर त्याच्या मेंदूला खुराक पुरवणारी काही समस्या नसेल तर येणारी निष्क्रीयता त्याला सहन होत नाही. आणि यावरचा एक उपाय म्हणून तो कोकेन वापरतो.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

कोकेन आणि स्त्री द्वेष्टा.

आमचे नागपूरला "होम्स चातुर्यकथा अभ्यास मंडळ" नावाचे एक अभ्यास मंडळ होते. त्यात आमचे मार्गदर्शक डॉ. मोहत्ता यांनी सांगीतले होते की, होम्सचे आपण सर्वच बाबतीत अनुकरण करावयास हवे फक्त त्याचा स्त्रीद्वेष आणि कोकेन या नशार्काचे सेवन या दोन गोष्टीचा मात्र निषेध केला पाहिजे .

कॉनन डॉयल साहेब तसे गुढवादी होते आणि हेच होम्समध्ये असणारे गुणानूवगुण असू शकावे. अर्थात हा माझा कयास आहे.

स्त्री द्वेष्टा

खरे आहे. फक्त एकच स्त्री याला अपवाद होती. स्कँडल इन बोहेमियामधली आयरिन ऍडलर. आयरिनने दिलेले नाणे आणि तिचे छायाचित्र शेरलॉकने त्याच्या खणात जपून ठेवले होते. या कथेच्या शेवटी वॉटसन म्हणतो, शेरलॉकसाठी आयरिन सर्वोत्तम स्त्री होती. साधारणपणे शेरलॉक स्त्री वर्गाचा उल्लेख उपहासात्मक रीतीने करत असे, पण आयरिनला भेटल्यानंतर त्याचे हे वागणे कमी झाले. (आठवले तसे, चूभूद्याघ्या). डॉयलसाहेब गूढवादी होते याची कल्पना नव्हती.

आपल्या अभ्यासमंडळाबद्दल वाचून भारतात होम्सच्या लोकप्रियतेचा आणखी एक पुरावा मिळाला. :)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

स्कँडल इन बोहेमिया

चा एपिसोड चांगला झाला आहे (मालिकेत). त्यातला वेशांतर केलेला होम्स अजिबात ओळखू येत नाही. शिवाय ती आयरीन ऍडलरही मला आवडली.
सर्वांत निराशाजनक एपिसोड माझ्या मते फायनल प्रॉब्लेमचा होता. स्कँडल इन बोहेमियाच्या वेळचं वेशांतरकौशल्य त्या इटालियन पाद्र्याच्या दृश्यात दिसलं नाही. शिवाय होम्स बघता बघता सगळा मेक अप उतरवून परत होम्स बनतो तेव्हा त्याच्या चेहर्‍यात आणि पोश्चर मधे झालेले बारीकबारीक फरक डॉयलने इतक्या छान प्रकारे वर्णन केले आहेत! ते दृश्यात दाखवले नाही, कदाचित शक्य नसावे.
परंतू रायशेनबाखवरून खाली उतरताना वॉटसन एकदा मागे वळून पाहतो आणि त्याला होम्सची आकृती दिसते, जी तो कधीच विसरत नाही. तेही त्या दृश्यात दाखवले नाही. हे दाखवणे तर सहज शक्य होते.
असो. होम्सवर जितकं बोलावं तितकं कमी आहे.
राधिका

अगदी

त्यातला वेशांतर केलेला होम्स अजिबात ओळखू येत नाही.

कालच विचार करत होतो की हा मुद्दा लेखात द्यायचा राहिला.

शिवाय होम्स बघता बघता सगळा मेक अप उतरवून परत होम्स बनतो तेव्हा त्याच्या चेहर्‍यात आणि पोश्चर मधे झालेले बारीकबारीक फरक डॉयलने इतक्या छान प्रकारे वर्णन केले आहेत!

आता ही कथा परत वाचायला हवी.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

स्त्रीद्वेष्टा?

होम्स स्त्रीद्वेष्टा होता असे आपण का म्हणता? मला तर त्याचे स्त्रियांशी वागणे नेहमीच सौजन्यपूर्ण वाटले आहे. त्याच्या महिला क्लायंट्स् शी तो नेहमी आदराने वागत असे व त्या काळात शिष्टसंमत असलेले स्त्रीदाक्षिण्यही तो दाखवत असे. आता त्याला स्त्रियांविषयी आकर्षण वाटत नव्हते ही गोष्ट वेगळी पण त्याला स्त्रीद्वेष म्हणता येणार नाही.

श्रीद्वेष्टा नसावा

होम्सची सर्व कथांत स्त्रीयांशी वागणूक पाहता तो स्त्रीद्वेष्टा नसून 'नकोबा, आपल्याला नाही या संसारजालात किंवा नात्यांत वगैरे गुरफटायचं.' अशा वृत्तीचा होता. स्त्रीजातीबद्दल आदर, पण हेतूतः दुर्लक्ष. कारण त्याची माणसे ओळखण्याची कला, होम्सियन डिडक्शन्स, यावर नाते, भावना, कमिटमेंट यामुळे काहीशी धुसर किंवा पूर्वग्रहदूषित होईल असे त्याला वाटत असावे. (असे मला वाटते, कृपया या वाक्यावर तुटून पडू नका, हा केवळ माझा अंदाज आहे आणि तो 'काहीच्या काही ' वाटू शकतो या शक्यतेशी मी सहमत आहे.)

श्रीद्वेष्टा?

श्रीद्वेष्टा नसावा

आपल्याला 'स्त्री'द्वेष्टा असे म्हणावयाचे आहे किंवा कसे? :)

सहमत

द्वेष्टा कदाचित चुकीचा शब्द आहे. वॉटसनच्या शब्दात स्त्रियांच्या वागण्याबाबत 'ही युज्ड टू मेक मेरी', पण स्त्रियांशी वागताना तो परफेक्ट ब्रिटीश जंटलमन असे हे मात्र खरे. याशिवाय स्त्रियांचे वागणे त्याला बरेच वेळा गोंधळात टाकत असे. 'देअर स्मॉलेस्ट ऍक्शन मे मीन व्हॉल्युम्स... इट इज स्लिपरी सँड'. (असे काहीसे)

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हो

लहानपणी आपणही शेरलॉक होम्स आहोत असे समजून वागणार्‍यांपैकी मी एक होतो.

मीही. मी आधुनिक गुप्तहेर होता यावं म्हणून लिपरीडिंग शिकायचाही प्रयत्न केला होता. :ड् शिवाय हाऊंड ऑफ बॅस्करव्हिलाज मधे होम्स जसा वृत्तपत्राच्या शब्दांच्या कात्रणांवरून कोणता वृत्तपत्र आहे, हे ओळखत असे, तसे आपल्यालाही ओळखता यावे यासाठी सराव केला होता. मला आता सामना, नवाकाळ, लोकसत्ता, मटा ही चार वृत्तपत्रे ओळखता येतात :प्

साधी गोष्ट आहे, मित्रा वॉटसन...]

"एलिमेंट्री, माय डिअर वॉटसन" याबद्दल म्हणताय का? पण हा संवाद कॅनन मधे कधीच आलेला नसून ती चित्रपटांनी टाकलेली भर आहे, असे म्हटले जाते.

राधिका

एलिमेंट्री

मला आता सामना, नवाकाळ, लोकसत्ता, मटा ही चार वृत्तपत्रे ओळखता येतात :प्

हे विशेष आहे. मला इतके दिवस होम्स वाचून संकेतस्थळांवरचे आयडीसुद्धा ओळखू येत नाहीत. :ड्

"एलिमेंट्री, माय डिअर वॉटसन" याबद्दल म्हणताय का? पण हा संवाद कॅनन मधे कधीच आलेला नसून ती चित्रपटांनी टाकलेली भर आहे, असे म्हटले जाते.

हे मी ही ऐकले होते, पण नंतर एकदा होम्स वाचताना मला हे वाक्य सापडले. आठवले तर सांगतो कुठल्या कथेत आहे ते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

हा हा हा

मला इतके दिवस होम्स वाचून संकेतस्थळांवरचे आयडीसुद्धा ओळखू येत नाहीत.
ही ही ही ही.
तसे ते विशेष कठीण नाही. आपल्याला निरीक्षण करायला शर्टाच्या बाह्या, खांद्यांचा बाक, डोळ्यातली चमक, विजारीचे गुडघे यातले काही नसले, तरी शुद्धलेखनाच्या विशिष्ट चूका (अर्थात हे माझ्या लक्षात येत नाही कारण मीच एवढ्या चूका करत असते), विशिष्ट प्रकारचं वाक्पटुत्व, विशिष्ट प्रकारचे विचार आणि असं बरंच काही असतं ना! बरंच काही म्हणजे काय काय ते आता सांगत नाही. होम्ससुद्धा त्याच्या क्लृप्त्या फक्त वॉटसनला किंवा त्याच्या अशीलांनाच सांगायचा ना! :ड्
राधिका

एलिमेंटरी, पण "माय् डीअर् वॉट्सन्" नव्हे

एका (?) कथेत तो फक्त वॉट्सन् च्या "इन्जेनिअस्/फँटस्टिक/तत्सम काहीतरी" याला उत्तर म्हणून "एलिमेंटरी!" असे म्हणतो पण पुढचा भाग लोकरूढीने आलेला आहे.

असेच

मलाही एका कथेत एलिमेंट्री वाचल्याचे स्मरते, ती कथा कुठली हेच शोधत होतो.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

क्रुकेड मॅन

मी वर दिलेल्या दुव्यावर जाऊन शोधा वर टिचकी मारल्यावर सापडले.
राधिका

सापडले

बरोबर. क्रुकेड मॅनमध्येच सापडले. धन्यवाद.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

होम्स!

लहानपणी आपणही शेरलॉक होम्स आहोत असे समजून वागणार्‍यांपैकी मी एक होतो.

मी अजूनही लहान आहे.

- प्रियाली होम्स!

अवांतर : तसे प्रत्यक्षात मी होम्स नसून आमचे एक सहकारी जे सध्या येथून गायब असतात ते होम्स आहेत आणि मी डॉयल पण ते आमचं ट्रेड शिक्रेट आहे. ;-)

चातुर्यकथा अभ्यास मंडळ.

चातुर्यकथा अभ्यास मंडळ ही अतिशय साधी आणि सोपी गोष्ट आहे. यासाठी किमान दोन होम्स प्रेमी असावेत आणि सूरवातीला लहान गोष्टीची क्रमवार निवड करावी. प्रत्येकाने ठरवलेली गोष्टी वाचावी आणि त्यात मला काय काय आवडले हे सांगावे.

या प्रकल्पाची वर्तमानपत्रात आजच्या कार्यक्रमात प्रसिध्दी देत जावी. ही प्रसिध्दी विनामुल्य असते.

आम्ही जवळपास ७/८ जण होतो आणि जवळजवळ ४७/४८ गोष्टींवर चर्चा केलेली आहे.

एका गोष्टीचे सुत्रसंचालन एकदा एका ७वीच्या मुलाने केले होते. सिल्व्हर ब्लेझचे सुत्रसंचालन माझ्या मुलाने केले होते त्यावेळी तो ४थीत होता.

कोणाला काही आणखी माहिती हवी असल्यास स्वागत आहे.

जगामध्ये जवळपास ४००० होम्सप्रेमी मंडळे आहेत. इटली, जपान, कोरीया, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये असे मंडळे काम करत असतात.

आमचे मंडळाचे एक मित्र होम्सचे संग्रहालय २२१ ब, बेकर स्ट्रीट बघून आले होते त्याचा वृतांत परत कधीतरी.

इथे

यासाठी किमान दोन होम्स प्रेमी असावेत आणि सूरवातीला लहान गोष्टीची क्रमवार निवड करावी.

इथले प्रतिसाद बघता दोनपेक्षा नक्कीच जास्त आहेत असे वाटते. आपण एक करू शकतो. एखादी कथा ठरवून चर्चाविषयात मांडू शकतो, मग सर्वांना त्याबद्दल आपापली मते व्यक्त करता येतील. कशी वाटते आहे कल्पना?

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

जालावर ...

होम्सच्या कथा जालवर (म्हणजेच चकटफू) कुठे मिळतील काय? फारशा वाचल्या नाहित, मात्र हिस्ट्री वाहिनीवर काही भाग पाहिले. लिखित जास्त प्रभावी असेल असे वाटते

प्रकाटाआ

खालील प्रतिसादानंतर प्रकाटाआ. :)

हो

हा घ्या दुवा-
http://221bakerstreet.org/#stories
राधिका

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

रेड हेडेड लीग

या एपिसोड मधे दिग्दर्शकाने मॉरिआर्टीचा संबंध जोडला आहे. हे तुम्हाला कितपत बरोबर वाटलं/ आवडलं? मला ते फारसं आवडलं नाही.

राधिका

बदल

सहमत आहे. मालिका आणि पुस्तक यात बरेच बदल केले आहेत. हे सर्वच आवडतात असे नाही.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

पुस्तकच संग्रही हवे.

शेरलॉक होम्सचे पुस्तकच संग्रही हवे. शक्यतो इंग्रजी प्रत घ्यावी.

काही दिवसापूर्वीच खालील जाहीरात वाचण्यात आली.

मराठीमधे होम्सचे पूर्ण भाषांतर.

प्रकाशक > मिताली साहित्य मुंबई, ९२२३२३१०८०, अनुवादक > गजानन क्षीरसागर,

मूळ किंमत ७०० रुपये, सवलतीत ४२५ रुपये, ( ३० सप्टेंबर पर्यंत),

पुण्यामध्ये > अभिषेक टाईपसेटर्स, १२४३, सदाशिव पेठ, साठे सोसायटी, पुणे ३०,
( २०-२४४७१०६१, ९४२२०८०९६७).

आभार

प्रतिसाद देण्यार्‍या होम्सप्रेमींचे मनःपूर्वक आभार. चर्चा बरीच रंगतदार झाली. शेवटी आपल्या मनातल्या प्रतिमा जरी वेगळ्या असल्या तरी आपले दैवत एकच आहे. (हे एखाद्या आध्यात्मिक चर्चेचा समारोप करताना श्री श्री १०८ महाराजांनी म्हणावे असे वाक्य आहे :) )

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

 
^ वर