लगीन ठरलंया
लग्नाची तारीख ठरल्याची बातमी पाहून अगदी राहवेना.
ढाकुम टुकुम असं नाचत, गुणगुणत आम्ही थेट 'जलसा' वर पोचलो.
गेट उघडून आत बागेत गेलो. तर करोडपती साहेब आरशात बघून दाढीतले काळे केस उपटून बाहेर टाकत होते. (डोक्यावरचे काळे, मात्र दाढीतले सगळे केस पांढरे ठेवण्याचा काय हा खटाटोप!)
ह्या केसांना गोळा करुन जर लिलाव केला तर आपणही करोडपती होऊ या आशेने आम्ही एकदोन केस उचलण्याचा प्रयत्न केला तर बच्चन साहेबांनी डोक्यावर टपली मारोन आम्हास हटकले.
"नमस्ते बच्चनजी", आम्ही.
"तुम अंदर कैसे आये, ऑय? ", बच्चनजी.
"चलके" आम्ही एक विनोदाचा प्रयत्न केला!
"गुरखा, अगली बारसे दरवाजेको लॉक किया जाय! बोला, काय काम होतं?"
"नाही असंच आलो होतो... लग्नाची तारीख कळली. म्हटलं अभिनंदन करावं."
"तारीख नही तिथी कहो. ऑय... आणि झालं ना अभिनंदन... आता फुटा."
"सॉरी सॉरी... तिथी.... एनडीटीव्हीवर कळली." आम्ही योग्य त्या शब्दावर जोर दिला.
"एनडीटीव्ही?"
"नाही म्हणजे आम्ही आता ष्टार प्लस बघत नाही... एनडीटीव्ही बघतो. ताईंचा कार्यक्रम तिथं असतो ना. ष्टार वर आमच्या आवडीचा ष्टार नसल्यामुळं काही मजा नाही आता." आम्ही थोडा गूळ काढला.
"चाय पिओगे?" बच्चनजी थोडे खुलले.
"ठीक आहे. जैसी आपकी मर्जी. काही दुसरा ऑप्शन नाही का?", खरं म्हणजे आम्हाला कुठं नेण्याची लायकी नाही.
"ऑप्शन देनेके लिए हे काय कौन बनेगा करोडपती आहे का, ऑय?"
"चालेल चालेल... चाय पण चालेल."
"कुर्सी पर बैठो."
आम्ही खुर्चीकडे पाहिलं. या खुर्चीवर चढून बसण्यासाठी दुसरा एक स्टूल आवश्यक होता. बरोबर आहे. घरातली दोन माणसं नारळाच्या झाडाइतकी उंच असल्यावर खुर्च्या इतक्या उंच लागणारच. (जयावैनी खुर्चीवर कसं बसतात?)
थोडा प्रयत्न करुन खुर्चीवर बसलो.
इतक्यात आमचे तोंड गोड करण्यासाठी लाडू आले.
"ये लो. मिठाई खाओ." बच्चनजींनी बॉक्स पुढे केला.
"थॅंक्यू. आमच्या पिशवीत ठेवून द्या ना." आम्ही पिशवी पुढे केली.
"अरे सब नही... एक ले लो." बच्चनजी.
मग (स्वत:च्या) पार्श्वभागी हात पुसोन एक लाडू उचलला.
चहा येईपर्यंत काही तरी बोलणे भाग होते. आजूबाजूला कुठे अमरसिंग(जी) दिसत नाहीयेत ना हे पाहून घेतले. मागच्या वेळी असाच चहाटळपणा केला तर बच्चनजींनी अमरसिंगजींना बोलावले होते. त्यांचा चेहरा पाहून दोन दिवस झोप आली नाही! (याबाबतीत कधी नाही तो शाहरुखला आमचा पाठिंबा. )
"लग्न कुठे करणार ते अजून कळलं नाही! म्हणजे जलसावरच की गंगा के तट पे?"
"ते अजून ठरलं नाहीये. सगळ्याच बातम्या आत्ता दिल्या तर नंतर काय सांगणार? परत रिपोर्टर लोक आत्तापासूनच लग्नाच्या ठिकाणी फिल्डींग लावून बसतील."
"बरोबर आहे.. खरं म्हणजे त्यासाठीच आलो होतो."
एवढ्यात चहा आला.
"ताजमहाल चहा वाटतं... फुर्र" आमची धाव कुंपणापर्यंतच!
"ओरिजिनल दार्जिलिंग टी है. हम छोटामोटा चाय नही पिते. अमरसिंगजीने लाया है दार्जिलिंगसे."
नाव ऐकून परत आमचा ठोका चुकला.
"खरं म्हणजे आम्ही वेगळ्या कारणासाठी आलो होतो."
"हमें यकीन था. काही तरी कामधंद्याची गोष्ट करण्यासाठी आला असाल."
"नाही म्हणजे... गुस्ताखी माफ बच्चनजी पण... "
"अरे बोलो बोलो... "
"आता आपल्या मेन इन ब्लू नी तोंड काळं करुन आणल्यामुळं सेट मॅक्स ची वाट लागली आहे नाही का?"
"तो फिर?"
"मंदिरादीदीचा फोन आला होता! आता खरं म्हणजे काही लोक चॅनेल बघतात ते तिच्यामुळेच."
"मग?"
"तर तिचं म्हणणं होतं की लग्नाच्या (आणि लग्नानंतरच्या) कार्यक्रमाच्या प्रसारणाचे हक्क सेट मॅक्सला मिळावेत. म्हणजे त्यांचा इथं झालेला लॉस भरुन निघेल आणि तुमचाही लग्नाचा खर्च...."
"अमरसिंगजी... जरा बाहर आयेंगे.."
हे ऐकून मात्र आम्ही धूम ठोकली. मंदिरादीदीला सॉरी कसं सांगावं हा एक प्रश्न आहे.
Comments
छान जमलंय!
योगेशजी प्रहसन छान जमलंय! तुमच्या कल्पनाशक्तीला प्रणाम!
छान!!
चिमणरावांच्या चर्हाटा सारखं योगेशरावांचं चर्हाट मस्तच जमून आलय!!!
लगे रहो योगेश भाई!!!!
चालू द्या!!
पल्लवी
हा हा हा
छान खिल्ली उडवली आहे... फिल्मी सोहोळ्यांना हा अमर सिंग आजकाल अमिताभ आणि जयाच्या ह्यांच्या मध्ये बसलेला दिसतो म्हणे!
अमरसिंग
हा पूज्य अमिताभ बोवांनी गळ्यात बांधून घेतलेला धोंडा आहे.
या दगडाला घेऊन ते लवकरच पूर्वीप्रमाणे रसातळाला जातील असे वाटते.
-
ढाकुम टुकुम
ढाकुम टुकुम असं नाचत, गुणगुणत आम्ही थेट 'जलसा' वर पोचलो.
खरं म्हणजे आम्हाला कुठं नेण्याची लायकी नाही.
हाहा हा हाहा. खूपच छान!
सन्जोप राव
सुंदर
मस्तच!
उत्तम
छान जमलाय लेख.
सहमत!
मागच्या पानावरून पुढे चालू. ;-) पूर्वीचे भाग वाचलेले आहेत, हा भागही आवडला.
ढाकुम टुकूम नाचतानाचा फोटु आहे का इथे चिकटवायला? :)
धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी!
मस्त!
आणखी रंगले असते पण कदाचित (चिरकूट) अमरसिंहाच्या भीतीने तुमचे आख्यान लवकर संपलेले दिसते :) ढाकुमटूकूम, ऑय भारी आहे.
अवांतर - एनडीटीव्ही का ठळकवले आहे?
एनडीटीव्ही
बातमी
झक्कास्स्स्स्स्स्....
एकदम मस्तच वर्नन केल आहे.
़खरच खुपच चान्गल लिहिल आहे.
परत एकदा झक्कास्स्स्स्स्स्.........!!!!