संप्टेंबर ११ - अमेरिकेत काय बदलले

महाराष्ट्र टाईम्सने ९/११ च्या निमित्ताने अमेरिकेत गेल्या सहा वर्षात काय फरक पडला यावर विविध प्रशन विचारून वाचकांना लिहीण्याचे आवाहन केले होते. माझा खालील लेख आजच त्यांनी जालावर प्रसिद्ध केला आहे. तो येथे उपक्रमीसाठी टाकतो. या विषयावर विविध अंगाने आपणास काय वाटते हे वाचायला आवडेल. (लेख जसा छापला गेला आहे तसाच देत आहे, त्यात काही टंकलेखनाच्या तृटी जाणवल्या ज्या माझ्या मूळ लेखात नव्हत्या).

धन्यवाद

विकास

दृष्टी बदलली-विकास देशपांडे, बॉस्टन

[ Monday, September 10, 2007 03:17:47 pm]
११ सप्टेंबर या तारखेला अमेरिकेची दृष्टी दोनदा बदलली. एकदा जेव्हा १८९३ साली विवेकानंदांचे पहिले सुप्रसिद्द भाषण झाले तेव्हा आणि दुस-यांदा अर्थातच आपण सतत ऐकतो ते ९ / ११ चा हल्ला. पहिल्या गोष्टीनंतर एका अतिशयपरक्या वाटणा-या धर्मातील बदल समजत गेले आणि कालांतराने त्या विचारांचे रिलिजन म्हणून नाही तर तत्वजज्ञान म्हणून आकर्षण वाढले. तर दुस-या घटनेनंतर एकाच परिवारातील असल्यामुळे साहजिकच आधी जवळ वाटणा-या धर्माबद्दल आणि त्यातल्या धर्मियांबद्दल एक प्रकारची अढी निर्माण झाली.

कामामुळे या विषयातील आपत्कालिन व्यवस्थापनाची तयारी पाहण्याची संधी मला आधी आणि नंतरही मिळाली. ९ / ११ चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला हा जितका अचानक होता तितकाच तो तसा होऊ शकेल याची कल्पनादेखील या देशातील अधिका-यांना होती असे वाचले होते. बॉस्टन - जेथे या हल्ल्याचे मूळ होते तेथे स्वत:साठी आणि इतरांसाठी समान ठेवलेल्या स्वतंत्र वृत्तीवर हा हल्ला झाल्याची भावना आणि भ्रमनिरास लोकांच्या बोलण्यातून जाणवला. आमच्या घरच्यांपासून ते येथे एकमेकांची खुशाली करण्यापर्यंत फोन खणखणले देखील. पण एकंदरित सामान्य अमेरिकन माणसाशी बोलताना त्यावेळेस कधी मुसलमानांवर आणि त्यांच्या धर्मावर निंदानालस्ती झाल्याचे पाहीले नाही.

अर्थात इथे रिपब्लिकन फक्षाला पाठिंबा देणारी रेडिओ स्टेशन्स आहेत. त्यांच्यावर तसे बरेच कायद्याच्या कक्षेत बसतील आणि रेडिओ व्यवस्थापन चौकटीच्या कक्षेत बसतील असे शाब्दीक हल्ले ऐकायला मिळाले. अजूनही मिळतात. एक विशष गोष्ट जाणवली ती म्हणजे ज्याचे जळतं त्याला कळतं या म्हणीप्रमाणे स्वतःचे तोड पोळल्यावर भारताला कशा अवस्थेतून जावे लागते हे समजले आणि इंडिया आणि कधी कधी हिंदू या शब्दांच्या दहशतवादाच्या व्यथा त्यांच्या चर्चेतून दिसू लागल्या.
बाकी अमेरिका बदलली का - या प्रश्नाचे उत्तर आहे ब-यापैंकी बदलली. इथे एकाच बाबतीत लिहीतो...फक्त आपत्कालिन व्यवस्थापन हा एक भाग न ठेवता होमलॅंण्ड सिक्युरिटी या नावाने नवीन राष्ट्रीय खाते काढून त्याचे महत्त्व वाढवले. आपण कुठे चुकलो याचे प्रचंड चर्विचरण राजकीय पातळीवर, माध्यमांच्या पातळीवर आणि सामाजिक पातळीवर झाले. गुगलच्या पुस्तकांच्या शोदात जर यातील ठराविक शब्द घेऊन शोध केला तर कमीतकमी ६०० ते ७५० पुस्तके आढळतात. त्यातील काही सहाकारी अहवाल ठरवले तरी यात अनेकांनी अनेक अंगांनी पुस्तके लिहून विश्लेषण केले आहे.

असा हल्ला चुकवता येऊ शकेल का याचे उत्तर कधी येऊ शकेल तर कधी नाही हे जितके प्रामाणिकपणे आले तितकेच अशा प्रसंगी हवा असलेला विविध खात्यांचा स्थानिक, राज्य, राष्ट्रपातळीवर सुरक्षा खाती, गुप्तचर विभाग, अग्नीशमन दले इत्यादी ठिकाणच्या सुसंवादाचा अभाव आणि वेगवेगळ्या खाते- अंतर्गत राजकारणचा प्रभाव प्रकर्षाने जाणवला आणि त्यात मुलभूत सुधारणा करण्यात आल्या. आज आपत्कालिन व्यवस्थापनाचे वेगवेगळ्या स्तरावरील अभ्यासक्रम तयार करून त्यातील योग्य अभ्यासक्रम तयार करून प्रमाणपत्रे घेणे जरूरीचे केले आहे.

सतत वेगवेगळ्या स्तरावर कसे हल्ले होऊ शकतात आणि आपली तयारी किती आहे याची वॉर गेम्सप्रमाणे चाचपणी केली जाते. त्यात मल्टिपल कोऑर्डिनेशनचा विचार केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात जसे सुरक्षा अधिकारी असातात. तसेच इतर सहकारी आणि त्या भागातील हॉस्पिटले, औद्योगिक प्रतिनिधी, माध्यमे पण असतात. आणि काय चूक आहे यावर चर्चा होते. ...अर्थात अशा चाचण्या आणि चाचपण्या विशेश करून मोठ्या शहरी भागात जास्त होतात. थोडक्यात ज्याला करेक्टिव्ह अॅक्शन घेणे म्हणतात ती अमेरिकन वागण्यात चांगल्या अर्थांनी भिनलेली आहे. त्यामुळे चूक झाली, आपण चुकलो यावर नुसता भर न देता ते परत कसे होणार नाही यावर जास्त कृती दिसते.

बाकी भय किंवा ज्याला पॅरोनिया म्हणता येईल असे वागणे एकदा अनुभवास आले होते आणि काहीजणांना न्यू यॉर्क दाखवायला गेलो असता हडसन नदीच्या तिरावरून जॉर्ज वॉशिग्टंन पनाचे आणि आजूबाजूच्या विहंगम दृश्याचे फोटो काढत असताना एक माणूस अचानक तिथे आला आणि म्हणाला तुम्ही इथले फोटो काढू शकत नाही.

पण एकदंरीत इथला माणूस बॉस्टन ते न्यू यॉर्क आणि इतर ब-याच ठिकाणी मोकळा आणि इतरांना आहे तसा मान्य करणारा असतो. अरेथात अतिरेकी सोडून. असो.

या प्रकरणाचा राजकीय फायदा विशेष करून बुश सरकारने कसा घेतला, त्यात कौन कितने पानीमे वगैरे चर्चा होत असतातच. ण्हणून इथे लिहीत नाही. पण एक ोगष्ट विचारावीशा वाटते की, आज भारतात म.टा. पुरते बोलायचे झाले तर महाराष्ट्रातील किंवा मुंबईतील विशेषकरून तरूण पिढीचे सर्वेक्षण केले तर त्यात दोन प्रश्न विचारले,
१. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला कधी झाला
२. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला

तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर अचूक देणा-यांची संख्या आणि दुस-या प्रश्नाचे उत्तर अचूक देणा-यांची संख्या यात किती तफावत असेल हा संशोधनाचा विषय होऊ शकेल असे वाटते. या प्रश्नांमध्येच अमेरिकेने सरकार, माध्यमे, उद्योग धंदे आणि सामान्य जनता सर्वांनी स्वतःच्या हल्ल्याचे जागतिकीकरण करून स्वतःचा फायदा कसा करून घेतला याचे उत्तर मिळेल.

Comments

सुंदर लेख

विकास,

आपण अमेरिकेबद्दलचे भारतातले गैरसमज दूर करण्याचा छान प्रयत्न केला आहे.

इस्लाम विरुद्ध ख्रिश्चनिटी, इस्लाम विरुद्ध हिंदुइझम असे तट पाडण्यात आले आहेत.
लढून लढून ह्या धर्मांची वाताहत होणार.
आणि शेवटी सर्व जग बौद्ध धर्म स्वीकारणार आहे.

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

धन्यवाद

अपल्या प्रतिक्रीयेबब्द्दल तथागतसाहेब धन्यवाद.

शेवटी सर्व जग बौद्ध धर्म स्वीकारणार आहे.
चांगलचे होईल.. फक्त शेवटी म्हणजे कधी? हे कळले तर बरे होईल.

शुभस्य शीघ्रम्

ही प्रक्रिया सुरू झालेली आहे.
धम्मचक्र परिवर्तन दिनाला आपल्याला अधिक माहिती मिळेल.

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

वेगळा विषय

इस्लाम विरुद्ध ख्रिश्चनिटी, इस्लाम विरुद्ध हिंदुइझम असे तट पाडण्यात आले आहेत.
लढून लढून ह्या धर्मांची वाताहत होणार.
आणि शेवटी सर्व जग बौद्ध धर्म स्वीकारणार आहे.

हा एक स्वतंत्र विषय होउ शकतो. पण असे वा तत्सम समज प्रत्येक धर्मात फोफावले असतात.
प्रकाश घाटपांडे

लेख भारीच.

आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यु बिकॉज तुमी म.टा. मधी लयी मस्त इचार मांडेल हाये.

अकरा सप्टेंबर ला काय होयेल हाये, हे सारे जगाला महीत हाये.पर भारतीय संसदेचा हल्ला ध्येनात नाय.
लयी भारी पॉइन्ट हाये. असाच लिव्हत राव्हा. बाबूरावच्या सुभेच्छा हायेत तुम्हासनी.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं :)

बाबूराव :)

मुद्दे

उत्तम लेख लिहिलात. योग्य त्या मुद्यांचा उहापोह आवडला.
पण तरीही, मला वाटते की मुस्लीम धर्मीयांविषयी अढी अविश्वास व भीती निर्माण करण्यास कारणीभूत ठरला.
आज मला भारतातही एक गोल टोपी घातलेला व दाढी राखलेला माणूस (उगाचच)जितका धोकादायक वाटतो तितका तो पुर्वी वाटत नसे.
जर भारतात ही परिस्थिती तर मी एखाद्या विमानात चढत असतांना असा माणूस पाहिला तर नक्कीच अस्वस्थता येईल असे वाटते.

हा एक प्रकारचा लार्ज स्केल सामाजिक अविश्वास मुस्लीम नेत्यांनी जाणीव
पुर्वक समाजात आणला.

बाकी या हल्ल्याचा उत्तम उपयोग अमेरिकेने आपली आक्रमता वाढवायला करून घेतला यात शंका नाही. मुळात हल्ला का झाला याचे उत्तर अमेरिकेची इतर राष्ट्रांमधली लुडबूड आहे. पण इस्लामी दहशतवादी हे त्यावर उत्तर नक्कीच नव्हते. माझ्यामते लादेन व बुश हे काही फारसे वेगळे नाहीत.

असो, अमेरिकेने आणलेली, आपत्कालीन व्यवस्थापनाची लाट भारताने त्याच व्यावसयीकतेने स्विकारली तर भारताचा खुप मोठा फायदा आहे यात संका नाही.
शिवाय जागतिक राजकारणात,अमेरिकेशी स्ट्रॅटेजिक इकॉनॉमीक पार्टनरशीप फायद्याचीच आहे. वरचष्मा निर्माण करायला ही खेळी चीन ने खेळलीच आहे. आपणही का नको? (किंवा याला काही पर्यायच नाहिये!)
(पण त्याच वेळी लष्करी साहित्यासाठी रशियाच उपयोगी पडेल. तेच तंत्र चालणारे आहे, अमेरिकन तंत्र दिखावू 'वाटते'.)

असो, संसदेवरचा हल्ला भारतीय माध्यमांनी हा विषय कसा 'जळता ठेवायचा' याचे काहीच प्लनींग सरकार कडे नाही. मग काय होणार? सरकारचे यात लाँग टर्म धोरण अत्यावश्यक झाले आहे.

आजच्या जगात नुसतीच माहिती देणे योग्य नाहीये...
योग्य ती माहीती, योग्य त्यावेळी, योग्य लोकांना देणे महत्वाचे आहे.
हे आपण कसे करणार आहोत?

याला अमेरिकन 'ऍप्रोप्रिएटली एज्युकेटींग पिपल' असे म्हणतात म्हणे.

आपला
गुंडोपंत

हल्ला का झाला ?

मुळात हल्ला का झाला याचे उत्तर अमेरिकेची इतर राष्ट्रांमधली लुडबूड आहे.

गुंडोपंत,

एखाद्या स्मार्ट मुलीवर कुणा गुंडांनी रेप केला, कारण ती चंटपणे बोलते, किंवा पाश्चिमात्य कपडे घालते, असे म्हणण्यासारखे आहे तुमचे हे विधान.

दुसरे, एखाद्या माणसाचे घर गुंडांनी का जाळले ? कारण म्हणे, शेजार्‍याने त्याच्या बायकोला केलेली मारहाण थांबवण्यात त्याने पुढाकार घेतला. शेजारी गुंडांना सामील होता, हे लक्षात न घेता.

आता थांबवा ही पुचाट मानसिकता. एकीकडे म्हणता भारत बलवान, शूर झाला असता, बुद्धाने शौर्याचा (व्यायामाचा?) स्वीकार झाला असता तर. पण शरीर बलवान असून विचारसरणी अशीच दुर्बळ राहिली असती तर काय उपयोग ?

- तथागत
-
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

म्हणजे?

एखाद्या स्मार्ट मुलीवर कुणा गुंडांनी रेप केला, कारण ती चंटपणे बोलते, किंवा पाश्चिमात्य कपडे घालते, असे म्हणण्यासारखे आहे तुमचे हे विधान.

मला नाही वाटत तसे बॉ!
मला वाटते की सौदी ला ताब्यात ठेवण्यात/ इस्राएल जोपासण्यात व एकुण तेल क्षेत्रावर प्रभुत्व राखण्यासाठी अमेरिका मुस्लीम जगात जो काय खेळ करते त्याचे ते पडसाद आहेत.
तुम्ही जरा विस्तृतपणे तुमचे उदाहरण द्या!

दुसरे, एखाद्या माणसाचे घर गुंडांनी का जाळले ? कारण म्हणे, शेजार्‍याने त्याच्या बायकोला केलेली मारहाण थांबवण्यात त्याने पुढाकार घेतला. शेजारी गुंडांना सामील होता, हे लक्षात न घेता.
ही ही जरा नीट समजावा...
(मी जरा मट्ठ आहे समजायला वेळ लागतो मला!)

कोणती पुचाट विचारसरणी मी प्रमोट केली आहे?
दाखवा ना!
आपला
मट्ठोपंत

पुचाट विचारसरणी

नव्हे, पुचाट मानसिकता. दोघांत फरक आहे.
मानसिकता ही बाह्यरूपी विचारांच्या पलिकडची असते. विचारसरणी ही बदलते, बदलू शकते, मानसिकता तीच राहते.
असो.
फिजीचे अर्धे नागरीक मूळचे भारतीय आहेत, तरीही त्यांच्या देशांत बंड झाले तरीही गप्प बसणारा भारत हा एका बाजूला, आणि लोकशाही मार्गाने आलेले सरकार उध्वस्त झाल्या बद्दल तीव्र निषेध करून आर्थिक मदत थांबवणारे देश दुसर्‍या बाजूला.
पाकिस्तान मधल्या हुकूमशहाला *स्वतःचा कुठलाही फायदा नसताना* आग्र्याला बोलवून गुलुगुलू गप्प्पा मारणारा भारत एका बाजूला. तालिबानला साह्य करणे थांबवा, नाहीतर बाँब टाकू असे म्हणून त्याला सरळ आणणारे देश दुसर्‍या बाजूला.
सौदीमध्ये फायदा आहे, इस्रायल मध्ये नैतिकता आहे. प्रत्येक देशाला स्वतःचा (म्हणजेच स्वतःच्या नागरीकांचा) फायदा साधण्यासाठी आणि नैतिकतेला पाठिंबा देण्यासाठी जी कसरत करावी लाअगते, त्याला हिंमत लागते.

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

कसा!

मानसिकता ही बाह्यरूपी विचारांच्या पलिकडची असते. विचारसरणी ही बदलते, बदलू शकते, मानसिकता तीच राहते.
कसे शक्य आहे?
विचारांनीच मासिकता घडेल ना? विचारच नसतील तर मानसिकता कुठून येणार?
जर मानसिकता विचारांची बनलेली आहे तर मानसिकताही बदलू शकणार.
म्हणजे तुमचा पहिला मुद्दा निकाली!

उरली खालची तीन उदाहरणे. त्यात माझ्या प्रश्नाला काही उत्तर दिले नाहिये बॉ तुम्ही? मी वैयक्तिक रित्या हे सगळे करावे की काय?
माझी काय तेव्हढी पावर नाय बा.... खरंच नाही! हवं तर आमच्या बाबूरावाला विचारा!

आता चौथा मुद्दा,
सौदीमध्ये फायदा आहे, इस्रायल मध्ये नैतिकता आहे. प्रत्येक देशाला स्वतःचा (म्हणजेच स्वतःच्या नागरीकांचा) फायदा साधण्यासाठी आणि नैतिकतेला पाठिंबा देण्यासाठी जी कसरत करावी लाअगते, त्याला हिंमत लागते.

नक्की काय म्हणायचे आहे? सौदी मध्ये फायदा आहे तो साधण्यासाठी म्हणून नैतिकता बाजूला ठेवली तर चालेल? इस्राएल मधे नैतिकता कशी आहे? हा देशच मुळात पॅलेस्टाईन ला घशात घालून तयार झालेला आहे... आता ज्यांचा देश गेला, माणसं, बायका, मुलं कचर्‍यागत मेली /मारली, ती लोकं बोंब नाही रणार? अशा देशाला पाठींबा द्यायला हिम्मत?
वा! भारीच लिहिताय की राव

आपला
गुंडोपंत

उलटे आहे

विचारांनी मानसिकता घडत नाही, मानसिकतेने विचार घडतात. तेही फक्त प्रामाणिक व्यक्तींचे. जो स्वतःशी प्रामाणिक असतो/ते त्यांचे विचार आणि मानसिकता ह्यांत काहीतरी साम्य असते. (समाधी/ध्यान हे विचार आणि मानसिकता एक करण्याचे साधन आहे.)

सौदीचा फायदा साधण्यासाठी इस्रायल ला पाठिंबा नाकारला, तर ते स्वतःच्या नैतिकतेच्या विरुद्ध ठरेल. इस्रायल ने स्वतः पॅलेस्टाईनवर कब्जा केलेला नाही, हे येथे लक्षात घ्यायला हवे. (त्यासाठी बरेच वाचन करायला हवे, ते व्यायामशाळेत शक्य नाही.)

ह्याबाबतीत लिब्याचे मुअम्मर कदाफी ह्यांचे वागणे ध्यानात घ्यायला हवे. किंवा दलाई लामा ऍरियल शेरोन ह्यांना स्वतःहून का भेटले, ह्याबद्दल मनन करायला हवे.

त्याबद्दल पुढे कधीतरी.

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

छट्

छट्
तुम्ही कायच्या काहीच मुद्दे काढता,
आधीच्या मुद्यांवर काही धड उत्तरे देत नाही... शिवाय काहीही व्यक्तिगत कॉमेंट्स करता.
(मी माझ्या व्यायामशाळेत किती पुस्तके ठेवतो नि काय वाचतो हे तुम्हाला काय माहीत? नि त्याच्याशी तुम्हाला काय घेणं?)

परत आता हा लिबिया चा नवीनच मुद्दा!?

हे असं काय?
मी नाही चर्चा करणार तुमच्याशी
तुम्हीच करत बसा तुमचे ते मनन नि तुमच्या भरकटणार्‍या चर्चा!

वैतागलेला
गुंडो.

मनन

मनन कळफलकावर होत नाही.
ते होते ट्रेडमिल वर.
व्यायाम आणि समाधी ह्यांचा एकाच वेळी प्रयोग केल्यास तन आणि मन दोन्हींना थोड्या वेळात मजबूत करता येते. उरलेल्या वेळात धनाकडे लक्ष देता येते.
ऍरिस्टॉटल चे पेरिपॅटेटिक थॉट्स त्याच्या पोस्टप्रँडिअल पेरिग्रिनेशन मुळेच आलेले आहेत.

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

तेच तेच

देवनागरी आणि रोमन अंकलिपी वाचल्यावर आणखी वाचायचे ते काय?

तीच तीच अक्षरे वाचून वाचकांना कंटाळा कसा येत नाही देव जाणे.

अवांतर :
१. एकूण मूळाक्षरे पाहता इंग्रजीत ठराविक शब्द मर्यादेच्या किती लघुकथा लिहीणे शक्य आहे?
२. संगणकाच्या सहाय्याने अशा सार्‍या कथा लिहून पेटंट मिळवणे कशी कल्पना आहे?
३. वरील कल्पना त्याची आहे. कल्पनेचे पेटंट मिळत असेल (जसे सोनी ने घेतल्याचे ऐकिवात आहे तसे घ्यावे म्हणतो.)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

संसदेवरील हल्ला

असो, संसदेवरचा हल्ला भारतीय माध्यमांनी हा विषय कसा 'जळता ठेवायचा' याचे काहीच प्लनींग सरकार कडे नाही. मग काय होणार? सरकारचे यात लाँग टर्म धोरण अत्यावश्यक झाले आहे.

जर माध्यमांनी हा विषय जळता ठेवला असता तर देशात दंगेधोपे झाले असते. अमेरिकेतील गोष्ट वेगळी आहे. अस्मिता जोपासण्याच्या प्रक्रियेत आपण आपलेच नुकसान करुन घेत असतो. इथली विविधताच एकात्मतेला घातक ठरत आहे. विविधतेतील संतुलन राखण्यासाठी आवश्यक असणारा इंटरफेस जर सक्षम कार्यरत असेल तर्च विविधतता ही ताकद असते. Democracy without education is hippocracy without limitation. हे कुणाच वाक्य आहे ते माहीत नाही पण वस्तुस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे आहे.

प्रकाश घाटपांडे

या मुद्याला

या मुद्याला आवश्यक ते विवेचनही मी केलेच शेवटी आहे.
संसदेवर हल्ला हा मुद्दा 'विधायक रीतीनेही जळता' ठेवता येईलच. त्याचा समाजाच्या एकत्रीकरणासाठीही तितकाच उपयोग होवू शकेल. किंबहुना ती आयती आलेली संधीच आपण घालवली आहे असेही म्हणायला हरकत नाही.

माध्यमांनी 'माहीती योग्य रीतीने देणे' यावर काहीतरी पॉलीसी डिसिजन आवश्यक आहे यात शंका नाही!

आपला
गुंडोपंत

चपखल

Democracy without education is hippocracy without limitation.

फारच चपखल वाक्य आहे. अस्मिता जोपासणे हे अमेरिकेत देखील होते. ९११ ची अनंत स्टिकर्स आणि दरवर्षी गावोगावी होणार्‍या सभा या बरेच काही सांगून जातात. येथे विषय जागृत ठेवला गेला आहे जळता नाही एव्हढाच काय तो मला फरक सांगावासा वाटेल. जळता ठेवणे म्हणजे द्वेष तयार करणे आणि "पॉलीटीकली करेक्ट"चा कधीकधी अतिरेक करणार्‍या या देशात कायद्यावरील एकंदरीत विश्वासामुळे, सामान्यांमधे द्वेष तयार झाला नाही - अढी मात्र तयार झाली.

मी वर लिहीले नव्हते पण काही कामानिमित्त न्यू यॉर्क शहरात गेल्या आठवड्यात होतो. आज अशी अवस्था आहे की "कातडीचा" रंग तोच दिसत असला तरी, वेगवेगळ्या स्तरावरील माणसे "तुम्ही भारतीयच" का असे विचारतात. एका अर्थी हे "तुम्ही पाकीस्तानी नाही आहात ना असे विचारणे असते". बरं त्याहून ही गंमत म्हणजे जेथे मी होतो तेथे विविध ठिकाणचे अनेक उच्चपदस्थ होते. त्यात आपले शेजारील देशातीलपण होते. पण तू कुठला म्हणल्यावर मी बॉस्टनमधील आणि भारतीय म्हणायचो (कारण तेथे मूळ देश कुठला हे सर्वजण एकमेकांस विचारत होते..), पण ही लोकं मात्र "मी अमेरिकेत राहतो" यापढे स्वतःच्या देशाविषयी सांगू इच्छीत नसत!

विविधतेतील संतुलन राखण्यासाठी आवश्यक असणारा इंटरफेस जर सक्षम कार्यरत असेल तरच विविधतता ही ताकद असते.
छान वाक्य आहे आणि सत्य ही आहे. फक्त हे संतुलन जेंव्हा सर्वांना समान दृष्टीकोनातून बघणारी दृष्टी राज्यकर्ते, माध्यमे आणि विचारवंत आत्मसात करतील तेंव्हा आपोआप साध्य होईल.

अमेरिकेतील कितीही चांगल्या वाईट गोष्टी बोलता आल्या तरी सबघोडे बारा टक्के या नजरेने बघणारी कायदा-सुव्यवस्था आणि बहुतांशी (१००%) नाही राजकीय आणि सामाजीक इच्छाशक्ती हे त्याच्या सामाजीक सक्षमतेचे कारण आहे असे वाटते.

भारतीयांना अमेरिकेत आल्यावर काय होते ?

सब घोडे बारा टक्के असे अमेरिकेच्या कायदाव्यवस्थेचे वर्णन करणारे भारतीय, भारतात असताना संघ, शिवसेना, आणि अशाच अत्यंत संकुचित दृष्टिकोणांच्या संस्थांना पाठिंबा देत असतात. बांगलादेशींना घरी पाठवा, वगैरे बडबडत असतात. आणि इथे आल्यावर मात्र पक्के लिबरल होतात. अवैध स्थलांतरितांना पाठिंबा देणार्‍या हिलरी, मकेन, आणि इतर सर्वांना (बुशच्या अर्धनारीनटेश्वर मधल्या नारीला देखील) डोक्यावर घेऊन नाचतात.

मला खरेच ह्यांचे काहीही कळत नाअही. विविधतेतील संतुलन हे सर्वांना समान असावे, असे म्हणणारे लोक जेव्हा डेमोक्रॅट्स ला पाठिंबा देतात, तेव्हा त्यांची कीव येते. विविधतेत गोरे खिश्चन लोकही आहेत, इतके सुद्धा त्यांना कळू नये ?

(गोर्‍या ख्रिश्चनांचा असाच छळ झाला तर आम्हाला बरेच. त्यांना बौद्ध धर्मात आणता येणे शक्य होईल.)

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

ते तयार नाहीत का?

(गोर्‍या ख्रिश्चनांचा असाच छळ झाला तर आम्हाला बरेच. त्यांना बौद्ध धर्मात आणता येणे शक्य होईल.)

का??
ते यायला तयार नाहीत का?
नि गोरेच ख्रिश्चन का? काळे ख्रिश्चन नाही का चालत? का त्यांची 'ती लायकी' अजून झालेली नाही?

आपला
अज्ञ
बुद्धोपंत

काळे ख्रिश्चन

काळे ख्रिश्चन मोठ्या संख्येने इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करून चुकीच्या वाटेने जात आहेत. त्यांना योग्य वाट दाखवणे अवघ्या बौद्ध धर्मियांचे कर्तव्यच आहे. (एक षष्टमांश जग त्यांच्या मदतीला तयार आहे.)

- तथागत

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

समानता

मला खरेच ह्यांचे काहीही कळत नाअही. विविधतेतील संतुलन हे सर्वांना समान असावे, असे म्हणणारे ...

विचारांचे आणि आचारांचे कायद्याच्या चौकटीत सर्वांना स्वातंत्र्य आहे. कुणाला कोण आवडते - व्यक्तिगत जीवनात आणि सामाजीक स्तरावर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेंव्हा कायदा लागू करण्याची वेळ येते तेंव्हा तो सर्वांना समान लागू होतो असा "सब घोडे बारा टक्के" याचा अर्थ आहे.

जो पर्यंत कायद्याच्या चौकटीत व्यक्ती आणि संघटना वागताहेत तो पर्यंत एखाद्यास ती आवडणार आणि दुसर्‍यास नाही पण तरी असे विविधत्व मान्य करणे ही लोकशाही आहे. नाहीतर उद्या तुम्ही फक्त बुद्धाचेच नाव घेता म्हणल्यावर तुम्हाला पण कोणी संकुचीत म्हणू शकेल असे वाटत नाही का?

बोध जेवढा शक्य आहे तेवढेच

या निमीत्ताने भारतात् देखील गुप्तचरखाते, वेगवेगळ्या सरकारी खात्यातील समन्वय, सहकार्य ह्यात सुधारणा व्हावी.

राजकीय पक्षांना बोध व्हावा की आपली मतपेटी राजकारण व दहशतवाद ह्यात गल्लत होता कामा नये.

एवढे झाले तरि पावले.

बाकी अमेरीकेचे राजकारण, उपाययोजना ह्या उपचारपद्धती ज्या असतिल ते भारताला लागू होईलच असे नाही. आपल्या वेगळ्या औषधाचा वापर करावा लागणार.

अभिनंदन

विकास,

सर्वप्रथम लेख म.टा.मध्ये छापून आल्याबद्दल अभिनंदन!

अमेरिकेत झालेल्या या घटनेची मोठ्या शहरांना (लोकवस्ती, येथेही हल्ले होतील का काय अशी घबराट) जेवढी झळ बसली तेवढी लहान शहरांना बसली नाही असे वाटते. अर्थात, हे जगात सर्वत्रच होत असावे. त्यामुळे या घटनेची प्रत्यक्ष झळ आम्हाला बसली नाही. विमानप्रवास, विसाचे प्रश्न, ड्रायविंग लायसन्स इ. इ. साठी बरीच काथ्याकूट करावी लागली हे मात्र खरे.

होमलॆंड सिक्युरिटीबद्दल एक गोष्ट अनुभवली ती येथे देते. २००५ च्या मे महिन्यात आम्ही टोरॆंटोला गेलो होतो, जाताना नायाग्रावरून गेलो तेथे कॅनेडियन सुरक्षा बर्‍यापैकी होती. येताना डेट्रॉईटवरून आलो. अमेरिकेत चेकपोस्टवर गाडी थांबवली तेव्हा आम्हाला वाटले की आमच्या बॅगा, कार, कारची ट्रंक तपासली जाईल. आश्चर्य म्हणजे तसे काहीच झाले नाही. अवध्या दहा मिनीटात आमच्या पारपत्रावर रि-एंट्रीचे श्टॅम्प ;-) मारले गेले आणि आम्हाला देशात शिरण्याची परवानगी दिली गेली.

धन्यवाद आणि विमानतळे

सर्वप्रथम लेख म.टा.मध्ये छापून आल्याबद्दल अभिनंदन!

धन्यवाद, पण त्यात विशेष असे काही नाही. परवा म.टा. वाचताना लक्षात आले की त्यांनी तसे अनुभव विचारलेत. येथे वादावादी करताना झटपट मराठी लिहीण्याची सवय झाली असल्याने पटकन लिहून पाठवला....

...तेव्हा आम्हाला वाटले की आमच्या बॅगा, कार, कारची ट्रंक तपासली जाईल. आश्चर्य म्हणजे तसे काहीच झाले नाही.

भारतातून बॉस्टन मधे येताना मला दोनदा येथील कस्टम अधिकार्‍याने चक्क नमस्कार करून "नमस्ते, वेलकम होम" असे म्हणत न तपासता सोडून दिले होते. ९/११ नंतर काही महीन्यांमधे भारतात जाताना, विमानतळावर मला आणि माझ्या पत्नीस तपासले नाही पण माझ्या ७०च्या घरातील वडलांना मात्र बूट काढायला लावले... त्या बाबतीत सगळा अनकलनीय प्रकार आहे.

सर्वात हाईट म्हणजे, या विमानतळांवर अतिरेकी सदृश नावांची होमलँड सिक्यूरीटीने यादी देऊन ठेवली आहे आणि त्यांची विशेष चौकशी होते त्यांना जास्त वेळ अडकून थांबायला लागते. त्या यादीत बॉस्टनचे सिनेटर (आणि प्रस्थ) जॉन केनडीचे बंधू "टेड केनडी" हे नाव होते. ते विमानतळांवर त्यामुळे बर्‍याचदा अडकून पडायचे. त्यांना त्यांचे नाव सिस्टीम मधून काढायला जवळ जवळ दिड वर्षे लागले. तेच म्हणाल्याप्रमाणे "इतका वेळ जर मला लागला, तर इतरांचे काय?"

सरदार हिलरी क्लिंटन !

वरील लेख/चर्चेशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी अप्रत्यक्ष आहे...

आत्ताच वाचले की हिलरी क्लिंटन (अर्थातच राजकीय स्वार्थासाठी) म्हणाली "भारतीय माणसांनी ठेवलेल्या फंडरेझिंग" च्या कार्यक्रमात म्हणाली की , सरदार पटेलांप्रमाणेच मला अमेरिकेस एकत्र ठेवायचे आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने भारताला बलशाली करायचा प्रयत्न केला तसा करायचा आहे. पुढे भारताच्या लोकशाहीचे , निवडणूक पद्धतीचे आणि स्त्रीया निवडून आल्या बद्दलचे कौतूक वगैरे केले.

सरदार पटेल

परत एकदा आपल्या देशातील चांगल्याची किंवा कर्तृत्वाची कदर किंवा दखल बाहेरच्या लोकांकडून घेतली गेली. आपल्या इकडे मात्र स्वतःला जो जास्त फायदा करून देईल त्याचा उदो उदो करण्याचा प्रकार आहे.

सरदार पटेलांचे कौतुक करण्यामागे अमेरिकेतील गुजराती लोकांची मते वगैरे मिळविण्याचा डाव तर नाही ना हा?

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो.

अर्थातच

सरदार पटेलांचे कौतुक करण्यामागे अमेरिकेतील गुजराती लोकांची मते वगैरे मिळविण्याचा डाव तर नाही ना हा?

अर्थातच! मतांपेक्षा पैसे..

शहा नावाच्या व्यक्तीने ठेवलेल्या कार्यक्रमात हे उद्गार काढले होते. बाहेर पटेलांचा पुतळा होता, त्याला अभिवादन करून समयसुचकतेने असे म्हणणे आणि त्यासाठी माहीती असणे अथवा करून घेणे आणि योग्य बोलणे हे मात्र हिलरीबाईंचे काम आहे. त्यात त्या कमी पडल्यानाहीत... असेल कुणाचा तरी पुतळा असे म्हणत त्या पुढे गेल्या नाहीत ..

९११-मय प्रसारमाध्यमांत एक वेगळा दृष्टिकोन

गेले दोन दिवस अमेरिकेतली प्रसारमाध्यमे ९-११ च्या स्मरण कार्यक्रमांनी भरलेली होती. यांत अमेरिकन दृष्टिकोनांतून अमेरिकन श्रोता अपेक्षित होता. तुम्ही म.टा.मध्ये लिहिलेले सदर वेगळे होते. अमेरिकेतली परिस्थिती जवळून बघितलेल्या, मूळ भारतीय माणसाने आपल्या दृष्टिकोनातून भारतीय श्रोत्यांसाठी लिहिलेले होते. विचारास उत्तेजना देणारे ठरले.

इराक आणि ९/११

काल सिनेट कमिटीपुढे साक्ष देताना इराकमधील सैन्यप्रमुख जनरल पेट्रॉस यांनी कबूल केले की ९/११ चे हल्ले आणि इराक आक्रमण यांचा काहीही संबंध नव्हता. आता अपेक्षा एवढीच की यावर मा. बुशसाहेब काहीतरी ईनोदी वक्तव्य करतील.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

उत्तम लेख

विकासराव,
लेख उत्तम आहे आणि त्यात मांडलेले मुद्दे भारत आणि इतर आतंकवादग्रस्त देशांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत. आतंकवादी हल्ले रोखणारी व्यवस्था कितपत कार्यक्षम आहे हा प्रश्न वेगळाच पण असे हल्ले झाल्यानंतरची परिस्थिती अजूनही योग्यप्रकारे हाताळली जात नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागते.

धन्यवाद

धन्यवाद,

आपत्कालीन व्यवस्थापन शिकण्याचा जरा संबंध आला होता (आणि अजूनही अधून मधून येतो - जरी त्यात सरळ सहभाग नसला तरी) म्हणून त्यावर लिहावेसे वाटले. असे म्हणावे की ९/११ ची कल्पना नव्हती, तर २००० सालातच (बूश येण्या अगोदर), राष्ट्रीय पातळीवर प्रत्येक शहरागणित अतिरेकी हल्ले कुठे होऊ शकतील आणि काय करावे यावर शहरातील अधिकारी, धंदे, इस्पितळे इत्यादींबरोबर सल्ला मसलत करून सर्वेक्षण केले गेले होते. अर्थातच त्यात न्यू यॉर्क पण होत. काय आणि कसे होऊ शकेल यावर विचारही त्यात झाला असेल/होता. तरीपण तृटी या प्रत्यक्ष भोगावे लागल्यावरच समजल्या..

 
^ वर