नाणेघाट
ट्रेकिंगसाठी प्रायवेट बस करावी की आपल्या महामंडळाचा लाल डबा वापरावा यावर थोडी चर्चा झाली. पण जवळपास बस थांबतील असा मोठा बस थांबा नसल्याने लाल डब्याने प्रवास करणे फारच गैरसोयीचं होतं. त्यामुळे प्रायवेट बस केली. ६ तारखेला रात्री १० वाजता शिवाजीनगरहून बस निघाली. जेवणासाठी मध्ये एक थांबा घेऊन पुणे-नाशिक महामार्गाने आळेफाट्यापर्यंत आलो आणि तेथून माळशेजकडे जाणार्या रस्त्याला वळलो. रात्री एक-दीडच्या सुमारास माळशेज घाटात खुबी जवळ पाण्याच्या बाटल्या भरुन घेण्यासाठी उतरलो तेव्हा समोर धुक्याने लपेटलेला रस्ता आहे याची जाणीव झाली. जवळच्याच टपरीत एकएक चहा मारुन परत बसमध्ये येऊन बसताना पुढचा प्रवास धुक्यामुळे अवघड आहे याची जाणीव झाली होती. फार तर दहा फुटांपर्यंतच्या रस्त्याचा अंदाज येत होता. ड्रायवर साहेबांना मात्र तशी काळजी वाटत नसावी. दुभाजकाच्या पट्ट्यांचा अंदाज घेऊन मस्त ६० च्या स्पीडने गाडी मारत होते. मध्ये एका वळणाचा अंदाज जरा चुकला आणि जोरदार ब्रेक मारुन गाडी अगदी कड्याजवळ थांबवली तेव्हा साहेब जरा भानावर आले आणि आमच्या नशीबाने आता पुढे असलेल्या एका एस.टीच्या मागच्या दिव्यांचा अंदाज घेत आमची गाडी हळूहळू पुढे जाऊ लागली.
नाणेघाटाला जाण्याचा एक रस्ता साबर्णे गाव गेल्यानंतर वैशाखरेच्या थोडा अलीकडे डावीकडे जातो. तिथे बस थांबल्यावर कपडे वगैरे बदलून सगळेजण तयार झाले. हातातल्या बॅटर्या, सर्व वस्तू वगैरे एकदा तपासून डोंगर चढायला सुरुवात केली तेव्हा रात्रीचे पावणेतीन वाजले होते. दगडांवर असलेल्या दिशादर्शक बाणांच्या सहाय्याने मार्गक्रमणा सुरु झाली. रात्रीची वेळ असल्यामुळे चढताना फारसा थकवा जाणवत नव्हता. चढणही अगदी सोपी नसली तरी फारशी त्रासदायक नव्हती. अधनंमधनं पावसाच्या जोरदार सरी येत होत्या. साधारण एक तासाच्या चढणीनंतर ट्रेकला पहिल्यांदाच आलेल्या सदस्यांची दमछाक झाल्याचे लक्षात आले आणि पाच मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा चढायला सुरुवात केली.
सकाळी पावणेपाचाच्या आसपास बर्यापैकी वर चढून आलो तेव्हा आकाशात पांढरट फिकट प्रकाश जाणवू लागला. इतका वेळ आम्हाला रस्ता दाखवणार्या हातातल्या बॅटर्याही एकेक करुन मंद व्हायला लागल्या होत्या. त्यांचे आभार मानून त्या बॅगेत टाकून दिल्या आणि विसाव्याची जागा केव्हा येते याची प्रतीक्षा करत चालू लागलो. इथंही प्रचंड धुकं होतं. ढगच असावेत कदाचित. त्यामुळं अजून वर किती चढायचं आहे, डोंगर किती उंच आहे याचा अंदाज येत नव्हता. भिजल्यामुळं थंडीही वाजू लागली होती. त्यातच भर म्हणून पायर्यांसदृश दगड सुरु झाले होते. दगडांवर जमलेल्या शेवाळामुळे आणि दगडाच्या आजूबाजूने वाहणार्या पाण्यामुळे दगडावर पायाची पकड व्यवस्थित होत नव्हती. क्वचित पाय सटकतही होते.
काही क्षणासाठी ढग थोडेसे बाजूला झाले आणि नाणेघाटाचा रम्य परिसर दृष्टीस पडला. सगळा थकवा क्षणात पळून गेला. ढग पुन्हा येईपर्यंत आम्ही मुक्कामाच्या गुहेपर्यंत येऊन पोचलोही होतो. मुंबईहून आलेले लोक गुहेमध्ये आधीच निवांत पहुडले होते. आम्हाला पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यात आता जोरदार वारा सुरु झाला होता. त्यामुळे थोडा वेळ नाईलाजाने गुहेतच उभे राहण्याचा निर्णय घेतला.
गुहेच्या बाहेर आल्यावर पायर्यांवरुन वर चालत गेले की एक खिंडीसारखा भाग लागतो. ही खिंड धुक्यामुळे आणि कुंद वातावरणामुळे खूपच haunting वाटत होती.
खिंडीच्या पलीकडे गेल्यावर जमिनीत पुरलेले सातवाहनकालीन रांजण, पडक्या भिंती वगैरे दिसू लागल्या. एव्हाना वारा फारच जोरदार झाला होता. गुहेत परत आलो तर गरमागरम उपीट-चहा वगैरे खाण्यासाठी तयार होते. ते खाऊन जरा मोकळ्या झालेल्या जागांवर ओल्या कपड्यातच रात्रीच्या चुकलेल्या झोपेची भरपाई म्हणून थोडी विश्रांती घेतली.
आम्ही जागे झालो तेव्हा प्रस्तरावरोहणाचा कार्यक्रम वरती कड्यावर सुरु झाला होता. पुन्हा थोडंसं खाऊन :) आणि आवश्यक ती सुरक्षेची साधने बांधून तयार झालो. आधी जाऊन आलेली मंडळी "एकदम रावस आहे... मख्खन ...पण उतरल्यावर तो शेवटचा patch थोडा problematic आहे." "simply amazing... फक्त परत येताना सांभाळा" वगैरे सांगत होती.
शेवटच्या तुकडीत आम्ही नंबर लावून निघालो. खिंडीच्या पलीकडे येऊन कड्यावर जाताना वार्याचा वेग किती वाढला आहे हे जाणवलं. अगदी एक एक पाऊल मोठ्या मुश्किलीने पुढे पडत होतं. सपाट रस्त्यावर चालतानाही तोल जात होता. वार्याच्या दिशेला तोंड केले तर श्वास घेणेही अवघड व्हावे अशी परिस्थिती होती. त्यात अजून जोरदार धुकं असल्यामुळे कार्यक्रमात काही अप्रिय घटना तर घडणार नाही ना याची शंका लागून राहिली. वार्याचा अंदाज घेऊन हळूहळू चालत चालत कड्यावर चढू लागलो. जोरदार झोत आला की खाली मान घालून बसावं लागत होतं. असं धडपडत, अडखळत एकदाचे कड्यावर येऊन पोचलो तेव्हा राहिलेल्या लोकांबरोबर वारा कमी होण्याची वाट बघत बसणे क्रमप्राप्त होतं. चालण्याचा प्रयत्न करणार्या एका माणसाचे पाय वार्याने उचलले गेले आणि आमच्याच ग्रुपमधल्या एका मुलीचं rappeling चं हेल्मेट डोक्यावरुन उडून गेलं तेव्हा वार्याचा झोत किती वेगवान आहे याचे पुरावेच आम्हाला मिळाले.
तास-दीडतास वाट पाहूनही वार्याचा वेग कमी होण्याची काही लक्षणं दिसेनात. तेव्हा कार्यक्रम पुन्हा चालू करण्याचे ठरलं. उतरण्यासाठी एकंदर तीन दोरखंड बांधले होते. त्यापैकी दोन हे कड्याचा आडोसा घेऊन वार्याचा त्रास कमी होईल अशा पद्धतीने १०-१५ फूट खाली तर एक दोरखंड अनुभवी किंवा जास्त ऊत असणार्या पटूंसाठी होता. जन्मजात आगाऊ स्वभाव व आधी एकदा प्रपातावरोहण केल्याचा "अनुभव" असल्यामुळे "वार्याचा त्रास काय थोडावेळ होईल... पण इथवर आलोच आहोत तर जरा थोडं जास्त adventure करु" या हेतूने "अनुभवी" दोरखंडाकडे गेलो.
व्यावसायिक मंडळींनी आयोजित केलेल्या अशा कार्यक्रमांमध्ये धोका खूपच कमी असतो. दिलेल्या सूचना व्यवस्थित पाळणे व स्वत:चे डोके न लावणे हे लक्षात ठेवले की फारसा त्रास होत नाही. कमरेच्या पट्ट्यामध्ये दोरखंड अडकवून हळूहळू खाली उतरु लागलो. उतरण्यासाठी पहिली एक दोन पावले तेव्हाच वार्यामुळे तोल जात होता. एकदा "लटकलो" की मग ठीक होईल या विचाराने तसाच पुढे उतरु लागलो. नाणेघाटाचा हा कडा शेवटचे ५०-६० फूट वगळता शेवटपर्यंत पायाला आधार देण्यासाठी आहे. मात्र अशा परिस्थितीत तुम्हाला "लटकून" शरीराचे वजन संपूर्णपणे दोरखंडावर टाकणे अवघड जाते. पाय कड्यावर टेकणे अतिशय आवश्यक ठरते. अन्यथा शरीराचा कोणताही भाग कड्यावर जोरात घासू शकतो.
पायांमध्ये व्यवस्थित अंतर ठेवत १०० फुटांपर्यंत खाली उतरलो तेव्हा अचानक एका ठिकाणी पायाला व्यवस्थित पकड न मिळाल्यामुळे कड्यावर आदळलो. दोन्ही गुडघ्याला, एका हाताला खरचटले. हेल्मेटमुळे डोक्याला फारसे लागले नाही. त्यात धुक्यामुळे किती खाली आलो आणि अजून किती खाली उतरायचं आहे याचा अंदाज येत नव्हता. दमट वातावरण आणि मधूनमधून पडणारा पाऊस यामुळे दोरखंड ओला झाला होता. हातमोजेही ओले झाले होते. उतरण्यासाठी आवश्यक ती पकड दोरखंडावर घेणे अवघड जात होते. ओला दोरखंड कमरेच्या कडीतून लवकर सरकतही नव्हता. खूप जोर लावावा लागत होता. अजून थोडा वेळ प्रयत्न करुन ५० फुटांपर्यंत खाली आल्यावर दोर खेचून खेचून उजवा हात भरुन आला. खरचटले होते त्या ठिकाणी भाजल्यासारखी आग होत होती. शिवाय अजून किती उतरायचं आहे याचा अंदाज येत नव्हता. घशाला कोरडही पडली होती. कड्यामध्ये समोर पाय ठेवण्यासाठी/बसण्यासाठी योग्य अशी एक खोबण दिसली आणि त्यातच मग एक दोन मिनिट विश्रांती घेऊन आता डाव्या हाताने दोर खेचूया असा विचार करुन पुन्हा खाली यायला सुरुवात केली. आता खाली येताना फारसा त्रास होत नव्हता. शक्य तितका जास्त दोर खेचून वेगात खाली जावे असे वाटत होते. मध्ये एका ठिकाणी दोर एका दगडात अडकला होता. त्याला जोरात खेचले तर दगडाचा एक मोठा टवका उडाला. असा मोठा दगड वरुन सटकला तर काय या विचाराने घाबरुनच गेलो आणि मग जोरजोरात दोर खेचत खाली येऊ लागलो. :)
एकदोन मिनिटांनंतर खाली एका कॅम्प फायर वाल्याचा लाल शर्ट दिसू लागला तेव्हा जरा बरं वाटलं. खाली उतरलो तर दोन्ही हातांमधला जीव गेला होता. तिथंच बसावं असा विचार होता पण आता २ वाजले होते आणि भूकही फार लागली होती.
आता फक्त कड्याला वळसा घालून गुहेमध्ये चालत जायचं शिल्लक होतं. पण rapelling तर "रावस" होतं... एकदम सोपं... पुढंच थोडं problemtic आहे... असंच सगळेजण म्हणत होते. त्यामुळं आता पुढं काय दिव्य आहे याचा अंदाज घेत चालू लागलो. पुढे एका छोट्या गुहेसारख्या दिसणार्या भागातून थोडं सरपटत आणि बर्याच ठिकाणी थोडा दोरीचा आधार घेऊन असं जावं लागत होतं. मात्र हा patch फारसा अवघड वाटला नाही.
मुक्कामाच्या गुहेत परत आल्यावर जेवण तयार होतंच. हातपाय स्वच्छ करुन जेवण केलं. आणि ओले कपडे बदलून कोरडे घातले तेव्हा जरा बरं वाटलं. थोड्या वेळाने परतीचा प्रवास सुरु करुन जुन्नर-नारायणगाव मार्गे ८ च्या सुमारास पुण्यात घरी पोचलो आणि गरम पाण्याने आंघोळ केली तेव्हा हातपाय जरा जिवंत झाले आणि लागलं होतं तिथं ठणकू लागले.
नाणेघाटाच्या अनेक दंतकथा आहेत. काही लोक सांगतात की सातवाहन काळात कोकणातून जुन्नरकडे येणार्या या रस्त्यावर टोल पद्धत सुरु करण्यात आली होती. टोल म्हणून नाणी द्यावी लागत. म्हणून हा नाणेघाट. तर कुणी सांगतं की शिवाजीराजांनी लुटलेल्या सुरतचा खजिन्याचा काही भाग इथे लपवून ठेवण्यात आला होता, त्यातली काही नाणी इथं सापडतात म्हणून हा नाणेघाट. मला ती नाणी काही सापडली नाही. पण हातापायाला झालेल्या जखमांबरोबरच परत आलो ते आदित्य, सागर सारख्या मित्रांबरोबर नाणेघाटाच्या धुंद वातावरणाच्या आठवणी घेऊन. हाच खरा खजिना. खरं तर जे अनुभवलंय ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण जी काही भटकंती करणार आहे त्याची नोंद ठेवण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच.
सागरने काढलेले नाणेघाटाचे अजून काही "रावस" फोटो.
अवघड शब्दांचे अर्थ:
प्रस्तरावरोहण: rapelling
कार्यक्रम: event
चढण: climb
सदृश: like
अशा माहितीपूर्ण लेखांसाठी आम्हाला येथे भेट द्या.
Comments
डोळे थंडावले.
काय प्रकाशचित्रे आहेत? सर्वच हाँटींग आहेत. सोबतचे वर्णनही आवडले. परंतु पावसाळ्यात हे उद्योग करताना सांभाळून राहा, एक दुर्दैवी कथा गाठीशी असल्याने तुला त्याची कल्पना असेलच.
अवांतरः
पुरलेले रांजण, पडक्या भींती, कुंद वातावरण, डोंगरमाथ्याला टेकलेले ढग, धुकं, चिंचोळी खिंड वाहवा!! गूढकथेसाठी उत्तम वातावरण निर्मिती. :)
असेच...
काय प्रकाशचित्रे आहेत? सर्वच हाँटींग आहेत. सोबतचे वर्णनही आवडले.
बंधो - तुमच्या गँगची झलक देणाराही एखाददुसरा फोटो झळकवा येथे!!
चीअर्स्!
सही!
लै च धमाल करू र्हायलेराव तुमी लोक!
फोटो बघून मस्त वाटले. एकदम जुन्या आठवणी आल्या.
हरीहरेश्वर चा ट्रेक आठवला. असंच रॅप्लींग केले होते...
शिवाय रतनगड! अहाहा! अगदी असंच रे...
रतनगड जमले तर नक्की कर. गडावर कड्याच्या टोकाला एक भोक आहे खुप मोठे!!! तिथे बसायला फार मस्त वाटते! वारा पण मस्त येतो.
[वर पाण्याचे सोय आहे एक गुहेत! (सरपटत आत उतरून.) इतर ठिकाणचे पाणी घाण आहे/होते]
अप्रतीम अनुभव मिळेल.
जाताना चांगला कॅमेरा नेणे.. विस्तीर्ण व्ह्युज अप्रतीम आहेत वरचे!
रतनवाडीचे धरणाचे पाणे समोर असलेले सुरेख दगडी मंदिर शांतपणे बघायला विसरू नकोस!
तुला तर माहित असणारच कसे जायचे वगैरे पण नसेल तर माहिती देतो!
गुंड्या
मस्त
लेख आणि सोबतची छायाचितत्रे एकदम आवडली! "रावस" फोटो हा शब्दपण छान आहे!
लयी भारी.
प्रवासवर्णन आणि नाणेघाटाची चढण -उतरण दोन्ही खासच,फोटो तर लयी भारी. इतका मोठा अनुभव सहज शब्धबध्द केलाय त्यामुळेच तो वाचनीय झाला आहे.मनापासून अभिनंदन.
अवांतर ;)प्रस्तरावरोहण या शब्दाचा दगड त्या घाटावरुन सारखा माझ्या अंगावर येत होता ;)
धन्यवाद
ही प्रकाशचित्रे माझा एक मित्र सागर याने काढली आहेत. अतिशय उत्तम प्रकाशचित्रे काढतो. धुक्यामुळे बरीच चित्रे चांगली आली नाहीत.
रतनगड, भीमाशंकर, नाणेघाट सारख्या ठिकाणी ट्रेक करताना येणारे अनुभव हे शब्दात बांधता येणे खरंच अशक्य आहे. हरिश्चंद्रगड अद्याप केला नाही पण या वर्षी नक्कीच.
लेखात उल्लेख केल्याप्रमाणे जर व्यावसायिक ट्रेकर्स मंडळींसोबत गेलो तर प्रस्तरारोहण/प्रस्तरावरोहण अशा साहसी कार्यक्रमांमधले धोके बरेच कमी असतात.
असो. आमच्या ग्यांगचा एक फोटु.
झकास मधी मकास
लय भारी ...लय बेष्ट...
ट्रेकपण आणि फोटु पण..रापचिक एकदम.
(आपला सवंगडी)अभिजित
फोटू
साहेब
तुमच्या ग्यांगचा फुटू पायला. पन् तुमी कंचे व?
आजानुप्यांट
छायाचित्रामध्ये अस्मादिकांची आजानुप्यांट असून पिवळ्या रंगाचे बाण असलेला कृष्णवर्णीय सदरा घातला आहे. उजव्या हाताला शेवटचा फोटु.
वा! उत्तम लेख
लेखन, माहिती, प्रवासवर्णन, साहसक्रीडा, प्रकाशचित्रे या सार्याच बाबी उत्तम . लेख आवडला.
असेच
असेच वाटते. प्रत्ययकारी वर्णनामुळे तुमच्या मोहिमेचा आनंद आमच्यापर्यंत पुरेपूर पोचला. छायाचित्रेही मस्त.
एक विनंती - वर्णनाबरोबरच, कसे जावे? कोण कोण (तरूण/वृद्ध/शिशु) जाऊ शकते? काय काळजी घ्यावी? काय 'मिस' करू नये? असा एक छोटा परिच्छेद लेखाच्या शेवटी दिल्यास उत्सुक गिर्यारोहकांना/पर्यटकांना सोयीचे होईल.
छान!
लेखन, माहिती, प्रवासवर्णन, साहसक्रीडा, प्रकाशचित्रे या सार्याच बाबी उत्तम . लेख आवडला.
असेच!
सन्जोप राव
मस्त!
चित्रे आणि लेखन दोन्ही!
छान
छान लेख
हिरवेगार फोतोज छान आहेत.
शिवानी
लै भारी
लै भारी लिवलय तुमी. सागररावांस्नीं सांगावा धाडा फुटू काडाला आमास्नी बी शिकवा.
आवडले
लेख, फोटो, माहिती फार आवडले.
सुमीत, नावा प्रमाणेच असलेला "चांगला मित्र"