.... आणि कोकणातील श्रावणगाव बनले आदर्शगाव !

2 मार्च, 2006. पुण्यातील साखर संकुलचे सभागृह. कोणाला आदर्श ग्राम पुरस्कार मिळणार, ही सर्वांनाच उत्कंठा. या वेळी दोन गावांची नावे उच्चारली गेली. ही दोन गावे म्हणजे कोकणातले श्रावण व मराठवाड्यातले गुंजेगाव. पैकी श्रावणगावाची माहिती बघूया !

श्रावण हे गाव कोकणातल्या सिंधुदुर्गमधील. या गावात दर पावसाळ्यात सरासरी अडीच ते तीन हजार मिलिमीटर पाऊस पडणार. हे गाव कणकवलीच्या जवळ, निसर्गाच्या कुशीत. गावाच्या चारही बाजूंना डोंगर. खूप वर्षांपूर्वी निसर्गाने वरदहस्त ठेवलेल्या या हिरव्यागार गावात तिथल्याच माणसांची वक्रदृष्टी फिरली नि गाव उजाड झाले. गावात प्रचंड वृक्षतोड झाली. भरपूर पाऊस पडूनही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. इतके उजाड झाले होते हे गाव.

या गावाची ग्रामपंचायत 1956 मध्ये स्थापन झाली. गावाचे एकूण क्षेत्र 1088 हेक्‍टर इतके आहे. गावाची प्रमुख पिके म्हणजे भात, आंबा आणि काजू. गावाभोवती पूर्ण जंगल. अशा या पाचूच्या बेटांची प्रचंड वृक्षतोडीमुळे वाईट अवस्था झाली होती. पिके येईनाशी झाली. उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. अशा वेळी काही ठोस पावले उचलणे गरजेचे होते.

त्यातले मोठे पाऊल म्हणजे पाणलोट विकास कार्यक्रम. कोणत्याही गावात पाणी मुबलक असले, की त्या गावातील इतर विकासास चालना मिळते. म्हणूनच त्या गावातील लोकांनी एकजुटीने सर्वांत प्रथम पाणलोटाचे काम हातात घेतले. डोंगर उतारावर सलग समतल चर खणले, शेततळी, गॅबियन बंधारे, सिमेंट बांध, मातीनाला बांध, दगडी बांध उभे राहिले. या गावाचा 5 वर्षांचा पाणलोट क्षेत्र विकासाचा एकूण आराखडा 50 लाख रुपयांचा असून, त्यातून एवढे मोठे काम उभे राहिले. पाणलोटाचे एवढे मोठे काम या गावातल्या सर्व स्त्री-पुरुषांनी केले.

या गावात भारतीय लोक विकास कार्यक्रमांतर्गत स्थानिक बेरोजगारांना सुमारे साडेपाच लाख रुपयांचा रोजगार मिळाला. अतिशय उत्तम पाणलोट कार्यक्रमामुळे या गावातल्या जमिनीत पाणी मुरले. त्यातून विहिरींमधील पाण्याची पातळी वाढली. गावात बागायती नगदी पिकांना पुन्हा चालना मिळाली. या गावामध्ये तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे गावात बेरोजगारीचे प्रमाण भरपूर होते. दुसरे म्हणजे भरपूर पाऊस असूनही उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष असायचे आणि तिसरे म्हणजे भरपूर होत असलेली वृक्षतोड. मग गावात पंचसूत्री कार्यक्रम राबवण्याचा ठराव झाला.

त्यात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी हेही महत्त्वाचे मुद्दे होते. गावाचे सरपंचांनी हे कार्यक्रम राबवायचे ठरवल्यावर खूप प्रतिक्रियांना सुरवातीला तोंड द्यावे लागले; पण तरीही त्यांनी धीर सोडला नाही. मग गावाने एक होऊन या तीन प्रश्‍नांवर नेटाने काम सुरू केले. गावातल्या बेरोजगारीबाबतही ठोस पावले उचलली गेली. रामदास पवार व अंकुश या दोन मुंबईहून परतलेल्या तरुणांना नर्सरीचे प्रशिक्षण देण्यात आले. आज ते दोघे जण अतिशय उत्तम रीतीने फळबागा फुलवत आहेत. आपली कुटुंबे पोसत आहेत. गावातील बेरोजगार तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करून दिला व त्याचबरोबर गावाची जमीनही समृद्ध झाली.

या गावात आता पंचसूत्रीचे काटेकोर पालन केले जाते. गावात 100 टक्के कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम झाला आहे. लोक झाडांवर कुऱ्हाड चालवत नाहीत. देवराईला सुरक्षित ठेवले आहे. गावात नशाबंदी, चराईबंदी आणि अंधश्रद्धा निर्मूलन या गोष्टींसाठी आता तरुणवर्ग जोमाने प्रयत्न करत आहे. गावात गेले, की या गावाला पुरस्कार मिळाल्याचे महत्त्व पटते. असे म्हटले जाते, की या गावात श्रावण बाळाचा मृत्यू झाला. म्हणूनच या गावाचे नाव "श्रावण' पडले असावे. श्रावणबाळाच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आता आदर्श म्हणून खऱ्या अर्थाने रूढ झाले आहे.

Comments

अरे वा!

अजुन एक गाव सुधारलेले. वाचून छान वाटले.

आपला
गुंडोपंत

सहमत.

अजुन एक गाव सुधारलेले. वाचून छान वाटले.
सहमत.

वेगवेगळ्या गावांची अशीच प्रगती होत राहिली पाहिजे.

श्रावण गाव.

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
**********************************
शिल्पा दातार जोशी यांनी श्रावण गावाची फार छान ओळख करून दिली आहे.गावकर्‍यांनी केलेले पाणलोट़क्षेत्र विकासाचे काम इतर गावांना प्रेरणादायी ठरणारे आहे. यावर्षी कोकणात जाईन तेव्हा कुडाळला मुक्काम करून या श्रावण गावाला निश्चित जाऊन येईन. आणि सगळे डोळे भरून पाहीन. शिल्पा दातार यांचे मनःपूर्वक आभार.

आश्चर्य वाटले!

गावात गेले, की या गावाला पुरस्कार मिळाल्याचे महत्त्व पटते.

सदर लेखात श्रावण गावात दारुबंदी झाल्याचा, तसेच बायकांनी आणि लहान मुलांनी मिळून दारुचे गुत्ते वगैरे बंद पाडल्याचा उल्लेख नाही तरीही गावाला पुरस्कार मिळाला हे पाहून आश्चर्य वाटले! :)

चला! म्हणजे आमचं कोकण अजून पूर्णपणे सुधारलं नाही म्हणायचं! :))

आपला,
(कोकणी) तात्या देवगडकर.

प्रयत्न सुरू आहेत.

गावात नशाबंदी, चराईबंदी आणि अंधश्रद्धा निर्मूलन या गोष्टींसाठी आता तरुणवर्ग जोमाने प्रयत्न करत आहे.

प्रयत्न सुरू आहेत. सफल झाल्यावर इतर पुरस्कार मिळतीलच. धीर धरावा.

जरूर!

प्रयत्न सुरू आहेत. सफल झाल्यावर इतर पुरस्कार मिळतीलच. धीर धरावा.

तोपर्यंत जरूर धीर धरू. आणि सफल झाल्यावर 'श्रावण गावातली दारू नांवाची अवदसा हाकलली गेली' अशी बातमी उपक्रमावरही झळकेलच! :)

आपला,
(प्रयत्नवादी!) तात्या.

केवळ् स्त्रित्वाचा अपमान

उपक्रमी मित्रांनो,
प्रतिसाद द्यायला मलाही आवड्ते. परंतु आत्तापर्यंतच्या प्रतिसादांचा रोख लक्षात घेता, त्यामुळे वादच निर्माण होऊ शकतो, असे वाटते. अन् विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही. कारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत. समाजातील वेगळ्या विषयावरची माहिती द्यावी हा माझा शुध्द हेतू आहे. आपल्याला भारतीय समाजात चाललेले वेगळे आणि चांगले प्रयोग वाचायला आवडत नसतील तर इथून पुढे मी येथे लिहिणार् नाही.

मी माघार घेत नाही, चांगल्या गोष्टींची कदर करणारेही आहेत, ते माझे लिखाण यापुढे याठिकाणी वाचू शकता.

माझे उपक्रमावरील खाते त्यावरील् लेख् व प्रतिसादांसह बंद करावे अशी उपक्रमाच्या प्रशासकांना विनंती करते.

 
^ वर