खूब लड़ी मर्दानी ...

सध्या मी The hero with a thousand faces हे जोसेफ कॅम्पबेल यांचे पुस्तक वाचत आहे. जगातील सर्व परीकथा, पौराणिक कथा आणि धार्मिक कथा यांतून येणार्‍या नायकांची (legendary heroes)  कथा ही एकमेकांशी मोठ्या प्रमाणात साम्य दाखवते अशी या पुस्तकाची मध्यवर्ती संकल्पना आहे. स्टार वॉर्सचा निर्माता/ दिग्दर्शक जॉर्ज ल्युकस याने या संकल्पनेचे आपण ऋणी असल्याचे सांगितले असल्याचे वाचनात येते.

पौराणिक कथा आणि परीकथांप्रमाणेच बर्‍याचशा ऐतिहासिक व्यक्तींमध्ये आणि त्यांच्या जीवनकार्यातही एक विलक्षण साम्य दिसते. अनन्वित अन्याय, त्यातून निर्माण होणारा असंतोष, नायकाचा जन्म, त्याचे निराळे अनुभवविश्व आणि प्रस्थापित शक्तीविरुद्ध त्याने दिलेला लढा, त्यात मिळालेला अंतिम विजय किंवा प्राणांची आहुती. कथानायकांचे जीवन बरेचदा एकाच चाकोरीतून गेल्याचे आढळते.

मध्यंतरी अचानक सुभद्राकुमारी चौहान यांची 'खूब लड़ी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी।' ही कविता बर्‍याच वर्षांनी पुन्हा वाचण्याचा योग आला. आपल्यापैकी बरेचजण शाळेत ही कविता शिकले असतील. झाशीच्या राणीविषयी वेगळे काय लिहायचे? तिचे शौर्य, तिचा पराक्रम सर्वज्ञात आहे. भारतीय इतिहासात राणी लक्ष्मीबाईची कथा माहित नाही असा माणूस मिळणे कठिण. राजघराण्यात झालेला विवाह, अकाली वैधव्य, ब्रिटिशांकडून दत्तक विधान नाकारले जाणे, १८५७ चे बंड, 'मेरी झांसी नहीं दूंगी' असा राणीने घेतलेला कणखर पावित्रा, ब्रिटिशांशी निकराने दिलेली झुंज आणि पत्करलेले वीरमरण.

राणीची कहाणी शब्दांत बांधणार्‍या सुभद्राकुमारी चौहान या स्वत: भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सत्याग्रही होत्या. त्यांची जालियांवाला बागेवरील कविताही प्रसिद्ध आहे. 'खूब लड़ी मर्दानी...' या कवितेत त्यांनी राणीच्या बालपणाचे, लग्नाचे, वैधव्याचे, ब्रिटिशांच्या मुजोरीचे, राणीने शर्थीने दिलेल्या झुंजीचे आणि तिच्या बलिदानाचे यथार्थ वर्णन केले आहे.

सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।

चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

जे काही माझे आहे ते मी तुम्हाला कदापि देणार नाही या भावनेतून एक मध्ययुगीन स्त्री प्रबळ ब्रिटिश सैन्यासमोर उभी राहते, शर्थीने मुकाबला करते आणि त्या यज्ञात आपली आहुती देते. आपले प्रेतही ब्रिटिशांच्या हाती लागू नये अशी इच्छा बाळगणार्‍या राणी लक्ष्मीबाईची कहाणी स्वातंत्र्यलढ्यासाठी  प्रेरणादायी ठरली.

याच धर्तीवर मला इ.स.६०-६१ साला दरम्यानच्या आयसेनी जमातीच्या केल्टिक राणी बुडिका (बोअडिसिया) हिची कहाणी वाचायला मिळाली आणि दोन्ही गोष्टींत साम्य जाणवले. बुडिका या शब्दाचा अर्थ विजयी (विजया) असा होतो. पूर्व इंग्लंडच्या नॉरफोक प्रांताचा राजा रोमन साम्राज्याला पाठिंबा देणारा परंतु स्वतंत्र राज्याचा राजा होता. आपल्या मृत्यूनंतर त्याने आपल्या राज्याची धुरा आपल्या दोन मुली आणि रोमन साम्राज्यावर यावी असे सुचवले होते. परंतु रोमन साम्राज्य मुलींना राज्याचा उत्तराधिकारी मानत नसल्याने त्यांनी हे राज्य खालसा केले आणि ते रोमन साम्राज्याच्या घशात घातले. राणी बुडिकाने या जुलुमाविरुद्ध आवाज उठवला असता तिच्या दोन्ही मुलींवर बलात्कार करण्याची आणि राणीला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. याप्रकाराने संतप्त झालेले आयसेनीचे नागरिक आपल्या राणीच्या बाजूने उभे राहिले आणि राणीने आपल्या मुलींना रथात आपल्या बाजूला उभे करून स्वत: जातीने या बंडखोरांच्या सैन्याचे नेतृत्व केले.

रथावर स्वार झालेली राणी बुडिका
रथावर स्वार झालेली राणी बुडिका

टॅसिटस या रोमन इतिहासकाराने राणीच्या तोंडी आवेशपूर्ण भाषण घातले आहे त्याचा गोषवारा पुढीलप्रमाणे - “मी माझी गमावलेली दौलत मिळवायला निघालेली राजस्त्री आहे असे कोणी समजू नये तर मी चाबकाच्या फटक्यांनी जखमी झालेली आणि माझ्या मुलींच्या अब्रूचे धिंडवडे काढणा‍र्‍यांविरुद्ध माझे गमावलेले स्वातंत्र्य मिळवायला पेटून उठलेली सामान्य नागरिक आहे. आपले ध्येय न्याय्य आहे आणि देव आपल्या पाठीशी आहे. मी एक स्त्री असूनही या युद्धात जिंकणे किंवा मरणेच पसंत करते, पुरुषांना गुलामगिरीत जगायचे असेल तर तो त्यांचा निर्णय असेल.”

राणीच्या नेतृत्वाखाली सुरुवातीच्या काही चकमकींत आयसेनीच्या सैन्याला विजय प्राप्त झाला परंतु पुढे जरी राणीच्या सैन्याची संख्या रोमन साम्राज्याच्या सैन्याहून अधिक असली तरीही आधुनिक शस्त्रांत्रांचा अभाव, शिस्त आणि मैदानी लढाई खेळण्याचा अनुभव नसलेल्या राणीच्या सैन्याचा रोमन साम्राज्याशी झालेल्या तुंबळ युद्धात पराभव झाला आणि शत्रूच्या हाती लागण्याऐवजी तिने विष खाऊन मरण पत्करले.

राणी विक्टोरियाच्या काळात विक्टोरिया बुडिकाला आपला आदर्श मानत असल्याने तिला असामान्य महत्त्व प्राप्त झाले. आजही इंग्लंडमध्ये तिला सांस्कृतिक प्रतिक मानले जाते.

कधीतरी एखादी गोष्ट वाचताना अचानक त्यातील प्रसंग आपण पूर्वी कधीतरी वाचले आहेत (deja vu) याची जाणीव आपल्याला होते. एखादे व्यक्तीविशेष वाचतानाही असाच भास बरेचदा होतो. इतिहास आमचा त्यांचा या समुदायासाठी लिहिलेला पहिला लेख मला एखाद्या कर्तृत्ववान ऐतिहासिक स्त्री विषयी लिहिण्याचे मनात होते,  The hero with a thousand faces, बुडिका आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल  एकाच वेळी वाचन करण्याचा योग आला. दोन्ही व्यक्तिंच्या जीवनकथेत विलक्षण साम्य दिसले आणि तारा आपोआप जुळत गेल्या.

१. या पुस्तकाच्या सुचवणीबद्दल मी आपले सदस्य राजेंद्र यांची आभारी आहे. हे पुस्तक मी सध्या वाचत आहे, पूर्ण वाचलेले नाही. वरील लेख या पुस्तकावर आधारित नसून केवळ त्याच्या संकल्पनेवरून सुचलेला आहे.
२. मूळ शब्दाचा उच्चार (Boudica) बुडिका करावा की बौडिका हे लक्षात न आल्याने त्यातल्यात्यात जुळता उच्चार ठेवला.

अधिक माहिती:
विकिपीडियावर राणी बुडिका
सुभद्राकुमारी चौहान यांच्या रचना

Comments

छान

लेख छान आहे आणि या विषयाचे मानसशास्त्राच्या दृष्टीने विशेष महत्व आहे.
माझा हॉबी हॉर्स उधळू पाहतो आहे :-)
थोडक्यात सांगायचे झाले तर प्रत्येक माणूस एका स्क्रिप्टच्या आधारे आपले आयुष्य व्यतीत करतो. ही स्क्रिप्ट लहानपणीच ठरते आणि बर्‍याच वेळा ही एखाद्या कथेवर आधारलेली असते. या दोन राण्यांच्या जीवनातील साम्य हे याचे उदाहरण आहे. अधिक माहीती इथे मिळू शकेल. या विषयावरील बायबल म्हणजे हे पुस्तक.
जोसेफ कॅम्पबेलचे पुस्तकही छान आहे. एकदा वाचले आहे पण परत वाचायला हवे. लेखकाचा व्यासंग पाहून अवाक व्हायला होते.
राजेंद्र

उत्तम लेख

उत्तम लेख. लेखाचा झाशीच्या राणीवरील भाग आणि बूडिका* चे भाषण विशेष आवडले. दोन्ही व्यक्तिमत्त्वांमधील आणि त्यांच्या परिस्थितीमधील साम्य उल्लेखनीय आहे.

*Boudica चा उच्चार 'बूडिका' असा करतात असे वाटते. चूभूद्याघ्या.

चालेल

ब नंतर थोडे थांबून ऊ चा उच्चार आल्याने हा शब्द मराठीत कसा लिहावा याबाबत मी साशंकच होते. दीर्घ बू चालेल असे वाटते. धन्यवाद.

उत्तम.

झाशीची राणी आणि बूडिका यांच्यातले साम्य दर्शवणारा उत्तम लेख.

ईश्वरी.

मेरी झासी नही दुंगी..

राणी लक्ष्मीबाई आणि बूडिका या दोघींनाही आपला सलाम!
प्रियाली, इतिहासाबद्दलचा तुझा व्यासंग पाहून तुलाही सलाम!

एक प्रश्न-

'इतिहास हा नेहमी जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो,' या म्हणण्यात तुला कितपत तथ्य वाटते?

आपला,
(ऐतिहासिक) तात्या.

धन्यवाद/ राजेंद्र आणि तात्या

वाचक आणि प्रतिसादकर्त्यांना अनेक धन्यवाद

राजेंद्र,
दुव्यांसाठी अनेक धन्यवाद. गाडी इड, इगो आणि सुपर इगो आणि फ्रॉइडवर येईल याची कल्पना होतीच. या विषयावर लेख टाकायचे वेळ मिळाला की मनावर घेच. दुव्यांबद्दल धन्यवाद.

कॅम्पबेलचा व्यासंग पाहून मी ही चकित आहे. विशेषतः तो खोलात शिरू लागला की माझ्या अल्पमतीला जाम गोंधळल्यासारखे होते. त्याची विविध संस्कृती आणि पौराणिक कथांकडे पाहायची दृष्टी आणि खोली पाहून खरेच आश्चर्य वाटते.

तात्या,

'इतिहास हा नेहमी जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो,' या म्हणण्यात तुला कितपत तथ्य वाटते?

तथ्य नक्कीच आहे. परंतु बरेचदा इतिहासकाराचे काम हे पुरावे मांडणे असते. अगदी पूर्वीही जेत्यांचा इतिहास लिहिताना प्रत्येक इतिहासकाराने शत्रूपक्षाला/ पराजीताला कमी लेखले किंवा त्यांच्याबद्दल खोटी आणि कलुषित विधाने केली असे म्हणता येत नाही. पक्षपात नक्कीच जाणवतो. महाभारताला इतिहास संबोधले गेले तरी तो इतिहास ठरत नाही ते महाकाव्यच आहे त्यामुळे रामायण-महाभारत यांची गणना इतिहास म्हणून येथे होऊ शकत नाही. परंतु काही इतिहासकारांचे ग्रंथ आजही इतिहास लिहिण्यासाठी ग्राह्य मानले जातात. जसे अलेक्झांडर द ग्रेटचा इतिहास लिहिणारे प्लुटार्क आणि एरिअन. यांनी केलेले भारताचे आणि पुरुचे, लढाईचे वर्णन पाहिले तर भारताबद्दल, भारतीय विद्वानांबद्दल किंवा पुरुबद्दल कलुषित विधाने लिहिलेली नाहीत. टॅसिटसने केलेले बूडिकाचे वर्णन असेच आहे. तरीही प्रत्येक इतिहासकार नि:पक्षपातीपणाच्या कसोटीवर खरा ठरेल असे नाही.

धन्यवाद..

खुलाश्याबद्दल धन्यवाद, प्रियाली..

तात्या.

जय हो!

जय हो झासीवाली रानी मर्दानी!

जय भोलेनाथ!

बाबा त्रिकाल!

विरोधाभास

बूडिका आणि त्याकाळच्या इंग्रजांनी ज्या अपप्रवृत्तीविरुद्ध लढा दिला तीच अपप्रवृत्ती त्यांच्या वंशजांनी भारतात अंगिकारली होती हा एक विरोधाभास या लेखाच्या निमित्ताने ध्यानात आला.

अगदी

माझ्याही अगदी असेच लक्षात आले होते :) परंतु काळ् फारच वेगळा असल्याने आणि केल्टिक (पेगन संस्कृती) इ. नंतर लयाला गेल्याने (अर्थात त्यामुळे माणसे/ देश बदलले असे नाहीच म्हणा) मी त्याचा उल्लेख टाळला.

हम्म्!

पूर्णतः लयाला गेली असा शब्द वापरणे कदाचित बरोबर नसावे. काही उत्साही लोक पेगनिज़मचा प्रसार आणि प्रचार करताना आढळतात (तसे व्हंपायरिज़मचा, नाझीज़मचा ही करताना आढळतात.) परंतु पेगन संस्कृतीवर केलेल्या थोड्याफार वाचनातून मूळ् पेगन संस्कृती आणि तिची खोली किंवा शामनिज़म्, विक्का इ. ची इत्यंभूत माहिती यांना नाही, असलेले ज्ञान फार वरवरचे आहे. फक्त 'हे असे असू शकेल' असे निष्कर्ष आणि गृहितके आहेत.

यावरून आठवले की धार्मिक विधींसाठी विविध संस्कृतीत वापरली जाणारी चिन्हे आणि त्यातील साम्य याबाबतही लेख टाकता येईल.

छान गोष्ट

गोष्ट वाचून छान वाटलं. ही कवीता मी आधी वाचली नव्हती (पण खूब लढी मर्दानी हे वाक्य मात्र कानी पडलं होतं)

खिरे

सुंदर लेख.

लेख माहितीपूर्ण आणि सुंदर आहे.
अधिक माहिती मध्ये सुभद्राकुमारी चौहान यांच्या रचनां जो दुवा दिला आहे त्यामुळे अनेक हिंदी कविंच्या रचनांचे दालन् मिळाले. खूब लढी हे काव्य पूर्वी ऐकले होते पण् ते पूर्ण वाचायला मिळाले. आभार.

यावरून आठवले की धार्मिक विधींसाठी विविध संस्कृतीत वापरली जाणारी चिन्हे आणि त्यातील साम्य याबाबतही लेख टाकता येईल.
धर्मिक चिन्हांबद्दलच्या लेखाविषयी उत्सुकता आहे. लवकरच टाका :)
मानसशास्त्रद्न्य युंग यांच्याबद्दलच्या एका पुस्तकात वाचले होते की त्यांच्या मते अशी चिन्हे (साइन्स) म्हणजे दर्शनेच असतात (असेच आपल्या कडे सुद्धा म्हटले जाते).
-- लिखाळ.

धन्यवाद

खिरे आणि लिखाळ धन्यवाद.

मानसशास्त्रद्न्य युंग यांच्याबद्दलच्या एका पुस्तकात वाचले होते की त्यांच्या मते अशी चिन्हे (साइन्स) म्हणजे दर्शनेच असतात (असेच आपल्या कडे सुद्धा म्हटले जाते).

हम्म्! मी ही वाचलंय, याबरोबरच बरीचशी चिन्हे संस्कृती बदलल्यातरी साम्ये दाखवतात. नवा लेख कोणता लिहायला घ्यावा त्याबद्दल थोडी साशंक आहे. आधीचे एक दोन विषय डोक्यात आहेत ते पूर्ण झाले की हा लिहायला घेईन. धन्यवाद.

खूब लडी़ हे काव्य हल्लीच एका अकरा वर्षाच्या अमेरिकेत जन्मलेल्या वाढलेल्या मुलीने फर्ड्या हिंदीत सादर केले होते. ही कविता फारच दीर्घ असल्याने तिने ८ कडवी निवडली परंतु अतिशय उत्तम सादरीकरण होते. तेव्हा मी ती शोधून काढली, त्याबरोबर अनेक इतर हिंदी रचना आहेतच.

 
^ वर