शारुबाईचा बचतगट

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लमाण तांड्यातील जेमतेम लिहिता-वाचता येणाऱ्या शारुबाई शिवाजी चव्हाण या महिलेला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम्‌ यांच्या हस्ते नाबार्डचा "बेस्ट परफॉर्मिंग सेल्फ हेल्प ग्रुप 05' हा पुरस्कार मिळाला. उस्मानाबादमधल्या छोट्या खेड्यातील चार उंबरे न ओलांडलेली ही बाई तो पुरस्कार स्वीकारायला नवी दिल्लीला गेली, हे पाहून आपला देश परिवर्तनाच्या मार्गावर आहे, हे पटते.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरग्यामधील लमाण तांडा. डोंगराच्या कुशीतल्या अचलबेट देवस्थानाच्या पायथ्याशी या लमाण तांड्याचे वसतिस्थान. ही वस्ती निरक्षर, अज्ञानी आणि व्यसनाधीन, बाहेरचे जग माहीत नसल्यामुळे वर्षानुवर्षे तेच ते व्यवसाय करायचे आणि तुटपुंजे उत्पन्न मिळवायचे. त्यामुळे नवीन व्यवसाय करायचा, त्यासाठी अर्थसाह्य मिळू शकते, हे त्यांना माहीतच नव्हते.

दिवस उगवायच्या वेळेला पोटापाण्यासाठी घराबाहेर पडायचे ते मावळतीलाच घरात यायचे, ही त्या तांड्याची परंपरा. या पलीकडील जगच त्यांना माहीत नव्हते. अशा या तांड्यावर एके दिवशी सामाजिक कार्यकर्त्या इंदूबाई वडदरे या तांड्यावर पोचल्या. तिथून त्या भागाच्या कलाटणीला सुरवात झाली. त्या भागात इंदूबाईंच्या मार्गदर्शनाखाली "आज गप्पा स्वयंसाहायता ग्रुप' सुरू झाला आणि त्यात शारुबाईंनी पुढाकार घेतला. जीव ओतून काम करायला सुरवात केली. शारुबाईंना जेमतेम लिहिता वाचता येत होते.

त्यांची परिस्थितीही तांड्यावरच्या इतर महिलांसारखीच होती, पण स्वत:ची परिस्थिती बदलायची त्यांची प्रबळ इच्छा होती. त्यामुळे स्वयंसाहायता गटाची प्रतिनिधी बनल्यावर त्यांनी पाड्यावरच्या लोकांना एकत्र आणून बचतगटाचे महत्त्व सांगायला सुरवात केली. त्यामधून एक-दोन नाही, तर त्या भागात 27 बचतगट उभे राहिले. "आज गप्पा स्वयंसाहायता' गटाच्या 11 सभासदांना मराठवाडा-ग्रामीण बॅंक दुहेरी, या बॅंकेचे अर्थसाह्य, त्याचबरोबर बचतगटाकडून 15 हजार रुपयांचे कर्ज मिळाले.

त्यातून जन्मात कधी विचारही केला नव्हता अशा उद्योगांचा विचार करायला तांड्यातल्या लोकांनी सुरवात केली. त्यामधून शेतीला उपयोगी पडणारी अवजारे, बैलगाड्या, शेळ्या इत्यादी वस्तूंची खरेदी झाली. त्यातून नवीन व्यवसाय सुरू झाले. महिला पायावर उभ्या राहिल्या. त्यांना जीवन जगण्याचा नवा मार्ग दिसला. 300 महिला या उपक्रमात सहभागी झाल्या. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. बचतगटाच्या माध्यमातून इतर महिलांना प्रेरणा देतानाच शारुबाईंनी इतरही विधायक उपक्रम हातात घेतले. दारूमुक्तीचे महत्त्व लोकांना पटवून दिले. विकासात्मक योजनांची माहिती दिली.

शिक्षण, आरोग्य, साक्षरतेचे महत्त्व तांड्यावरील महिलांना पटवून दिले. त्यातून लमाण तांड्याचे चित्रच बदलून गेले. "आज गप्पा बचतगटा'ने या भागाला बदलविण्याचे काम केले. त्यामुळे या बचतगटांना 10 हजार रुपयांचे "बेस्ट परफॉर्मिंग सेल्फ हेल्प ग्रुप' हे पारितोषिक मिळाले. ते स्वीकारताना शारुबाईंना धन्य धन्य वाटले. त्यांनी त्याचे श्रेय तांड्यावरच्या सर्वांनाच दिले. गावागावांत असे चांगले काम करणारे बचतगट व शारुबाई उभ्या राहिल्या, तर गावांमधले दीनवाणे, असहाय चित्र बदलून जाईल. गाव खरंच स्वयंपूर्ण होतील.

Comments

छान.

वरील हकीकत काहींना समाजकार्याची प्रेरणा देणारे ठरेल. तसेच अगोदरच समाजकार्य करणारांचा उत्साह द्विगुणित करील.

तांड्यांत वरील क्रांतिकारक बदल व्हायला किती काळ लागला?

शारुबाईंचे अभिनंदन!

वा शिल्पाताई! अजून एक सुंदर लेख. खरं तर आपल्या लेखाची मी वाटच पाहात होतो.

बचतगटाच्या माध्यमातून इतर महिलांना प्रेरणा देतानाच शारुबाईंनी इतरही विधायक उपक्रम हातात घेतले. दारूमुक्तीचे महत्त्व लोकांना पटवून दिले.

आं? पुन्हा दारुबंदी?? ;)

शिल्पाताई, लेख जसा वाचू लागलो तसे शारुबाईंनी दारुबंदी आणि गुत्तेबंदी केल्याचे उल्लेख कुठे दिसेनात. त्यामुळे अंमळ अस्वस्थ व्ह्यायला लागलो तेवढ्यात वरील ओळ वाचली आणि बरे वाटले! ;)

असो! पुढचा दारुबंदी आणि गुत्ताबंदीचे उल्लेख असलेला लेख कधी टाकताय? वाट पाहात आहे!

आज आमच्या ठाण्यामुंबईसारख्या शहरात अनेक गुत्त्यांमधून आणि बार्समधून माणसांचे तांडेच्या तांडे दारू पीत बसलेले असतात. या बार्समध्ये शारूबाईंसारख्या आणि भीमराव मान्यांसारख्या किंवा लहानग्या अजयकुमारसारख्यांनी येऊन दारुबंदीचे लोकशिक्षण द्यावे आणि लाखो-करोडोंची उलाढाल करणार्‍या शेट्टी लोकंचे गुत्ते आणि बार्स बंद पाडावेत असे मनापासून वाटते!

आपला,
(उपक्रमाच्या तांड्यातला!) तात्या.

मिसळपाव डॉट कॉम वर 'दारुबंदी' विषयक एखादे साप्ताहिक संपादकीय सदर सुरू करावे की काय असे आताशा संत तात्याबांना वाटू लागले आहे! ;)

प्रभावी

'आज गप्पा' हे स्वयंमदतगटाचे नाव आवडले. शारूबाईंचे मनःपूर्वक अभिनंदन.

शिल्पाताई...

... आपले लेख वाचले. मनापासून आवडले.

या आणि अशा बातम्या ना दूरदर्शनावर दाखविल्या जातात की वर्तमानपत्रांतून झळकतात. त्यांना म्हणे "न्यूज"व्हॅल्यु नसते. येथे आपला वेळात वेळ काढून ही माहिती मिळवून येथे उपक्रमावर लिहून आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल आभार.

(न्यूजव्हॅल्यु नसलेला) एकलव्य

मनातले

... आपले लेख वाचले. मनापासून आवडले.
आपला वेळात वेळ काढून ही माहिती मिळवून येथे उपक्रमावर लिहून आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल आभार.

एकलव्यांनी आमच्या मनातलेच सांगितले.

आपला
(आभारी) वासुदेव

First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win. - मोहनदास गांधी

 
^ वर