वाल्याचा वाल्मीकी होतो तेव्हा...

जेव्हा एखादे गाव सुधारण्याचे किंवा गावाला नवी दिशा दाखवण्याचे काम तडफदार सुशिक्षित तरुण करतात, तेव्हा आपल्याला त्याचे फारसे आश्‍चर्य वाटत नाही, पण वाम मार्ग सोडून जेव्हा एका व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतो आणि ती गावाचा कायापालट करते, एक कर्तबगार सरपंच म्हणून नाव मिळवते तेव्हा ती खरेच एक बातमी होते. कौतुकास्पद गोष्ट होते. कवठेपिरान या गावातील भीमराव माने यांची ही कहाणी खरोखरच आपल्याला भारावून टाकते. एकेकाळी गुन्हेगारीच्या मार्गावर गेलेले माने आता त्याच गावाचे कर्तबगार सरपंच आहेत; पण हा कायापालट काही एका रात्रीत झालेला नाही, तर त्याची कहाणी आहे.

सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान गावातील ख्यातनाम पैलवान हिंदकेसरी मारुती माने यांचे भीमराव माने पुतणे. भीमराव माने यांनी केवळ पाच वर्षांच्या कालावधीत स्वतःतच सकारात्मक बदल घडवला असे नाही, तर गावामध्येही चांगला बदल घडवून आणला. कवठेपिरान या गावाला घाणीच्या गर्तेतून निर्मलग्रामच्या दिशेने नेण्याचे श्रेय गावकरी माने यांनाच देतात.

कवठेपिरान गावाला निर्मलग्राम पुरस्कार मिळाला त्यामध्ये माने यांचे चांगले योगदान आहे. गावाचा कायापालट झालेला पाहून त्या गावाचे नेतृत्व एके काळी गुन्हेगारीच्या गर्तेत अडकले होते, हे सांगूनही खरे वाटत नाही. सन 2000पर्यंत माने या दुष्टचक्रात अडकले होते. दारूचे व्यसन होते. व्यसनी माणूस ज्या चुका करतो त्या त्यांच्या हातूनही होत होत्या. त्यासाठी तुरुंगातही जावे लागले होते; पण 1 ऑक्‍टोबर 2001 रोजी जामीन मिळाल्यावर या अनिष्ट मार्गातून बाहेर पडून चांगला माणूस बनण्याचे विचार त्यांना साद घालू लागले.

व्यसन सुटले तरच आयुष्यात आपण चांगली कामे करू शकू, असे त्यांना वाटत होते. म्हणूनच सर्वांत प्रथम त्यांनी स्वतःला दारूच्या विळख्यातून सोडवायचे ठरवले. आयुष्य बदलायचे ठरवले. राजकारणात जाऊन चांगले काम करण्याचेही त्यांनी मनावर घेतले. ते म्हणतात, ""गावातील माणसे मला घाबरत. मी जेव्हा सरपंचपदाची निवडणूक लढवायचा निर्णय घेतला, तेव्हा भीतीपोटीच गावातील कोणीही मला विरोध करू शकले नाही; पण राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णयच माझ्या दृष्टीने कलाटणी देणारा होता.''

सरपंच होताना माने यांनी सर्वांत प्रथम एक गोष्ट केली, ती म्हणजे ग्रामसभेसमोर त्यांनी माफी मागितली; पण त्यांच्यावर त्या वेळी कोणीही विश्‍वास ठेवला नाही. चांगल्या कामातून ग्रामस्थांचा विश्‍वास मिळवायचाच, असा विचार माने यांनी केला आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरवात केली. सरपंचपदी निवडून आल्यावर सर्वांत पहिल्यांदा माने यांनी गावातील लोकांना व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला. गावातील दारूचे गुत्ते बंद पाडले.

त्यासाठी गावातील मित्रांची मदत घेतली. दारूबंदीच्या कार्यक्रमामुळे कवठेपिरानच्या महिलांनी माने यांना मनापासून सहकार्य केले. दारूबंदीसाठी एक उपक्रम राबवला. गावातील कोणी जर दारू पिऊन आलेले दिसले, तर त्याच्या डोक्‍यावरील केस काढण्याचा उपक्रम गावातील लोकांनी सुरू केला. त्यामुळे कवठेपिरानमध्ये कोणी दारू पिऊन आलेले असले, तर त्याच्या डोक्‍याकडे पाहून गावातील इतरांना ते बरोबर समजायचे. लोकलज्जेस्तव गावातील व्यसनाधीनांची संख्या कमी होऊ लागली. आता गुटखा आणि जुगार याविरोधी मोहीम माने यांनी गावात उघडली.

ते म्हणतात, ""गावात गुटख्याची रोजची विक्री 12 हजार रुपयांची होते. या गोष्टी गावाच्या विकासासाठी तत्परतेने बंद करणे आवश्‍यक आहे.'' इतकेच नाही, तर माने यांनी गावात शाकाहाराबाबतही मोहीम उघडली आहे. गावातील प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ग्रामस्वच्छतेसाठी प्रत्येकाचा हातभार लागावा यासाठीही ते प्रयत्नशील असतात.

आपले गाव हे घर आहे असे समजून प्रत्येक व्यक्तीने श्रमदान करावे, असे त्यांना वाटते. इतकेच नव्हे, तर संततीनियमनाचे महत्त्वही ते ग्रामस्थांना ग्रामसभेच्या वेळेला समजावून सांगत असतात. कवठेपिरान हे गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी माने यांनी विशेष प्रयत्न केले. गावात सार्वजनिक शौचालये बांधली. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. प्रगतीचे सर्वांत मोठे पाऊल होते, ते म्हणजे निर्मलग्राम योजनेत भाग घेण्याचे.

केवळ आजूबाजूची गावे या स्पर्धेत भाग घेतात म्हणून नव्हे, तर गावातील लोकांना आरोग्य आणि स्वच्छता यांचे महत्त्व पटवून देण्याकरिता त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व निर्मलग्राम योजनेत भाग घेतला. त्यानंतर अक्षरशः कात टाकल्यासारखे हे गाव बदलले.

गावातील सर्व जण झटून कामाला लागले. एका गलिच्छ गावाचे रूपांतर स्वच्छ आणि सुंदर अशा गावात झाले. त्याचाच परिणाम म्हणून या गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व निर्मलग्राम योजनेअंतर्गत पारितोषिक मिळाले. चक्क 88 लाख रुपयांचे बक्षीस या गावाला मिळाले. राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते बक्षीस घेण्याचा मानही माने यांना मिळाला. एक माणूस इच्छाशक्तीच्या जोरावर वाल्याचा वाल्मीकी होतो हे आताच्या काळातही भीमराव माने यांच्या रूपाने पाहायला मिळते.

Comments

मानेसाहेबांचे हार्दिक अभिनंदन!

जेव्हा एखादे गाव सुधारण्याचे किंवा गावाला नवी दिशा दाखवण्याचे काम तडफदार सुशिक्षित तरुण करतात, तेव्हा आपल्याला त्याचे फारसे आश्‍चर्य वाटत नाही,

खरं आहे! तरुणांबरोबरच ही कामे हल्ली १०-१२ वर्षांची मुलेही करतात अशी बातमी ऐकून आहे! ;)

एक कर्तबगार सरपंच म्हणून नाव मिळवते तेव्हा ती खरेच एक बातमी होते.

'सामना'तल्या निळूभाउंची उगाचंच आठवण झाली! ;)

पण 1 ऑक्‍टोबर 2001 रोजी जामीन मिळाल्यावर या अनिष्ट मार्गातून बाहेर पडून चांगला माणूस बनण्याचे विचार त्यांना साद घालू लागले.

हे मात्र खरंच कौतुकास्पद आहे!

सर्वांत पहिल्यांदा माने यांनी गावातील लोकांना व्यसनमुक्त करण्याचा निर्धार केला. गावातील दारूचे गुत्ते बंद पाडले.

अहो शिल्पाताई, गावोगावी दारुचे गुत्ते धडाध्धड बंद पाडल्याच्या बातम्या तुम्ही आणता तरी कुठून? ;)

गावातील कोणी जर दारू पिऊन आलेले दिसले, तर त्याच्या डोक्‍यावरील केस काढण्याचा उपक्रम गावातील लोकांनी सुरू केला.

अहो पण ही शिक्षा फारच माफक झाली. कारण समजा आज केस कापलेला माणूस उद्या पुन्हा दारू पिऊन गावात आला तर मग त्या गावात काय शिक्षा करतात हे कळेल का? ;)

लोकलज्जेस्तव गावातील व्यसनाधीनांची संख्या कमी होऊ लागली.

आश्चर्य आहे! कारण व्यसनाधीन माणसाला लोकलज्जा नसते असे आमच्या पाहण्यात आहे!

एक माणूस इच्छाशक्तीच्या जोरावर वाल्याचा वाल्मीकी होतो हे आताच्या काळातही भीमराव माने यांच्या रूपाने पाहायला मिळते.

मानेसाहेबांचे हार्दिक अभिनंदन!

आपला,
(चमनगोटा केलेला!) तात्या.

अभिनंदन

शिल्पा,

तुमचे नुकतेच आलेले दोन्ही लेख खूपच माहितीप्रद आहेत. तुम्ही एखाद्या सामाजिक प्रबोधन करणार्‍या संस्थेत काम करता का किंवा व्यवसायाने पत्रकारच आहात ते जाणून घ्यायला आवडेल.
माने यांचे आणि त्यांच्या कवठेपिरान गावाचे अभिनंदन तसेच तुमचेही कारण ही माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत. माने यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा वापर चांगल्या कामासाठी केलेला पाहून कौतुक वाटले.

तसेच अजून एक विनंती : ही माहिती जशी उद्बोधक आहे, तशीच येथील बहुसंख्य लोकांना अश्या कामाची आवड असू शकते. सामाजिक काम सुरू करताना अनेकांना ते कसे करावे उमजत नाही. वेळ द्यायची तयारी नसते किंवा कधीकधी तो नसतोही. वेळ असला तर पैसे कमी पडतात. यावर अनेक उपाय असतात / मदत करायला संस्था किंवा शासकीय योजनाही असतात (अगदी भारतातही) पण ते लोकांना सहजी उपलब्ध नसतात, किंवा अनेकदा अशा resources ची माहितीसुद्धा नसते. पाण्यात पडल्यावर पोहता येते हे सर्वच म्हणतात, पण काही बाबतीत मार्गदर्शन मिळाल्यास ही वाटचाल सर्वांनाच हितकारक होऊ शकते. त्यामुळे तुम्ही किंवा जी माणसे अशा सामाजिक कामात अग्रेसर आहेत त्यांच्या प्रेरणा, त्यांच्या मार्गात आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी (किंवा तुम्हीही) कशी मात केली इत्यादी अधिक माहिती मिळाल्यास अधिक लोक अशा कामाकडे आकर्षित होऊ शकतील. अन्यथा लेख वाचून काही काळाने विसरून जाण्याचीच शक्यता जास्त. प्रत्येक लेखात आपल्याला ही माहिती देता येणार नाही कदाचित पण येथील आपल्या आणि पंकज जोशी यांच्या लेखांवरील प्रश्न वाचून कल्पना येईल की अनेकांना या प्रकारच्या कामात रस असू शकतो. त्यामुळे एखादा लेख असाही लिहू शकलात तर वाचायला खूप आवडेल तसेच येथील अनेकांच्या (मला धरून) मनातील उत्सुकतेचे निरसन होईल.

चित्रा

लेख भन्नाटच असतात.

लेख खूपच माहितीपूर्ण आहे.त्यातील माहिती भन्नाटच असते.
(लिखाणात दारुचे अधिक संदर्भ का येतात.ते वाचल्यावर सर्वांनी दारु सोडली पाहिजे असे उगाचच वाटते ;)
तुम्ही एखाद्या सामाजिक प्रबोधन करणार्‍या संस्थेत काम करता का किंवा व्यवसायाने पत्रकारच आहात ते जाणून घ्यायला आवडेल.
हो ना ! मी ही जाणून घेण्यास उत्सूक आहे.
तशीच येथील बहुसंख्य लोकांना अश्या कामाची आवड असू शकते.
मला सामाजिक विषयावर लिहिण्याची आवड निर्माण होत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन

माने यांचे आणि त्यांच्या कवठेपिरान गावाचे अभिनंदन तसेच तुमचेही कारण ही माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत. माने यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा वापर चांगल्या कामासाठी केलेला पाहून कौतुक वाटले.

असेच मलाही म्हणायचे आहे.

त्यामुळे तुम्ही किंवा जी माणसे अशा सामाजिक कामात अग्रेसर आहेत त्यांच्या प्रेरणा, त्यांच्या मार्गात आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी (किंवा तुम्हीही) कशी मात केली इत्यादी अधिक माहिती मिळाल्यास अधिक लोक अशा कामाकडे आकर्षित होऊ शकतील. अन्यथा लेख वाचून काही काळाने विसरून जाण्याचीच शक्यता जास्त. प्रत्येक लेखात आपल्याला ही माहिती देता येणार नाही कदाचित पण येथील आपल्या आणि पंकज जोशी यांच्या लेखांवरील प्रश्न वाचून कल्पना येईल की अनेकांना या प्रकारच्या कामात रस असू शकतो. त्यामुळे एखादा लेख असाही लिहू शकलात तर वाचायला खूप आवडेल तसेच येथील अनेकांच्या (मला धरून) मनातील उत्सुकतेचे निरसन होईल.

अगदी योग्य. शिवाय अशी माहिती मिळवण्यासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव झाली की अधिकाधिक लोक उचित गांभीर्याने घेतील.

आपला
(औचित्यवादी) वासुदेव

First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win. - मोहनदास गांधी

चांगली माहिती

मान्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

अशाप्रकारचे लेख मुलाखत स्वरूपात संकलित करणे शक्य असेल तर तसेही करून पाहावे.

धन्यवाद

माहितीबद्दल धन्यवाद. चित्रा म्हणतात तशी आणखी माहिती मिळाली तर आवडेल.

 
^ वर