श्रमदानाने बदलले हरपुडे गाव

एकेकाळी कोकणातील हरपुडे गावात पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. दारूचा सुळसुळाट होता. कोणी कोणाला विचारत नव्हते. गावकरी पाणी नाही म्हणून त्रस्त होते. दारूमुळे अनेक घरेदारे उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर होती. अशा वेळी या गावात दारूबंदी आणि पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामासाठी "मातृमंदिर' या संस्थेने पुढाकार घेतला. त्यातून गावाचा पाण्याचा प्रश्‍न तर सुटलाच; पण दारूबंदी होण्यासही मदत झाली.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्‍याच्या देवरूख भागात मातृमंदिर ही संस्था सामाजिक परिवर्तनाचे काम करत आहे. ही संस्था श्रीमती इंदिराबाई हळबे यांच्या प्रेरणेने स्थापन झाली. सुरवातीला केवळ रुग्णसेवा, बालसंगोपन याकरिता निर्माण झालेल्या या संस्थेने नंतर अनाथाश्रम, बालवाड्या, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, वसतिगृहे, लोकसंख्या नियंत्रण, बचत गट अशा विकासाच्या कामांवरही आपले लक्ष केंद्रित केले. ग्रामविकासाच्या कामांत या संस्थेचा सहभाग मोलाचा आहे.

गावातील लोकांच्या सहभागाशिवाय ग्रामसुधारणेचे काम चांगले होऊ शकत नाही, यावर या संस्थेचा विश्‍वास असल्यामुळे हरपुडे या छोट्याशा गावाच्या विकासात निर्णय प्रक्रियेपासून श्रमदानापर्यंत सर्व पातळ्यांवर गावातील लोकांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे काम या संस्थेने केले आहे. या प्रयत्नांमधूनच गावातील पाण्याचा प्रश्‍न सुटला. या गावात 242 कुटुंबे असून, गावाचे क्षेत्र 711 हेक्‍टर आहे. या गावाचा विकास करण्यासाठी मातृमंदिर या संस्थेने जवळजवळ दीड वर्ष प्रयत्न केले.

ग्रामस्थांना पाणलोट क्षेत्र विकासासंदर्भातील संकल्पना समजावून सांगितली. ज्या जमिनीवर पाणलोटाचे काम करण्याची आवश्‍यकता होती, त्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे संबंधित ग्रामस्थांनी आपापल्या जमिनीवर काम करायला लेखी परवानगी दिली. संपूर्ण गावाने श्रमदान करण्याची तयारी दाखवली. पाणलोटाच्या कामासाठी सलग चार-पाच दिवस वेळ देणे भाग होते, त्यासाठीही लोक पुढे आले. या कार्यक्रमात डोंगराच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत चर खणणे म्हणजेच सलग समतल चर, छोटे-मोठे नाले अडवून पाण्याचा वेग कमी करणे, जमिनीला समांतर असे बांध घालणे, शेतीबांध दुरुस्ती व वनीकरण इत्यादी गोष्टींचा समावेश केलेला होता.

उन्हाळ्याच्या दिवसांत पाणलोटाचे काम केल्यामुळे पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचा थेंब न्‌ थेंब साठवला जातो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही गावाला पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करावा लागत नाही, हे आता गावकऱ्यांच्या लक्षात आले आहे. पाणलोटाच्या कामाबरोबरच ग्रामसभेच्या सक्रिय सहभागातून दारूबंदी आणि बचत गटांची चळवळ गावात उभी करण्यात हे गाव यशस्वी झाले आहे. सुरवातीला पहिल्या ग्रामसभेला एकच महिला उपस्थित होती.

आता मात्र ग्रामसभेला महिलांची उपस्थिती लक्षात येण्याइतकी वाढली आहे. त्याचबरोबर या गावात महिला बचत गटही तयार झाले आहेत. सध्या या पाच-सहा बचत गटांमध्ये महिला दरमहा 10 रुपये जमा करत आहेत. या बचत गटांतील महिलांनीच गावातील दारूचे गुत्ते बंद पाडले. त्यासाठी त्यांनी अक्षरशः "गांधीगिरी' केली. त्यांनी एका महिला सभेमध्ये चक्क दारू विक्रेत्यांना बोलावले. सहा हातभट्टीवाले या सभेला उपस्थित राहिले. त्यांना गावावर आणि कुटुंबांवर होणारे दारूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. शेवटी त्या सहा जणांनी दारूचा धंदा बंद करत असल्याचे लिहून दिले.

शांततेच्या मार्गाने गावात दारूबंदी झाली. कोणतीही चळवळ ही धाकदपटशा दाखवून पुढे जात नसते, तर ती मनापासून असावी लागते. चांगले बदल घडवण्याचे विचार मनात असावे लागतात, तरच ते तडीस नेण्यास मदत होते, हे हरपुडे गावाच्या माध्यमातून मातृमंदिर या संस्थेने दाखवून दिले आहे.

Comments

छान!/एक शंका..

श्रमदान करून पाणीप्रश्न सोडवणार्‍या गावकर्‍यांचे अभिनंदन. .

एक शंका -

शांततेच्या मार्गाने गावात दारूबंदी झाली.

आपण गावात दारुबंदी झाली असे म्हटले आहे. गावकर्‍यांपैकी कुणीही गावाच्या हद्दीबाहेर जाऊनदेखील दारू पीत नाही किंवा पितो याबद्दल काही सांगता येईल का?

जर गावातील एकही जण गावाबाहेर जाऊनदेखील एक थेंबसुद्धा दारू पीत नसेल तर खर्‍या अर्थाने गावातील दारुबंदी प्रोजेक्ट आणि गांधिगिरी सफल झाली असे म्हणता येईल!

अवांतर - गुजरातमध्ये गेले अनेक वर्षे दारुबंदी आहे तरीही कुठल्याही ब्रँडची दारू गुजरातमध्ये अगदी पाहिजे तेवढी मिळते! त्याचप्रमाणे गुजरात मधील कायदा पाळणार्‍या काही पापभिरू व्यक्ति दीव, दमण, सिल्वासा यासारख्या ठिकाणी येऊन यथेच्छा दारू पितात! ;)

असो..

तात्या.

लेख माहितीपूर्ण !

श्रमदानाने बदलले हरपुडे गाव.
चांगले बदल घडवण्याचे विचार मनात असावे लागतात, तरच ते तडीस नेण्यास मदत होते,
सहमत !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुकरणीय

छान लेख. हरपुडे ग्रामस्थांच्या उपक्रमांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आभार! ग्रामीण भागांमध्ये सामाजिक जाणीव अधिक प्रबळ असते, दुसर्‍यांसाठी काही करण्याची इच्छा असते. त्या इच्छेला विधायक वळण लावणार्‍या मातृमंदिर सारख्या संस्था मिळाल्या की समाजाचे चित्र बदलण्यात वेळ लागत नाही. खरेच अश्या संस्था सुरू करणार्‍या आणि नि:स्वार्थ वृत्तीने त्यांचे काम करणार्‍या लोकांचे कार्य अनुकरणीय आहे.
आपला
(गुणग्राहक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

 
^ वर