एका काडातून "मार्केट'पर्यंत

शेतकऱ्यांच्या पोटापुरतेही उत्पादन होत नाही, मग त्याची विक्री तर लांबच राहिली, परंतु शेतीच्या पद्धतीत बदल करून उत्पादन वाढविले तर कुटुंबाची गरज भागवून अतिरिक्त उत्पन्नाची विक्रीही करता येते. वेल्हा तालुक्‍यातील कागदे गावच्या शेतकऱ्यांनी हे सप्रयोग सिद्ध केले. भाताच्या एका काडाच्या आधारे आपल्या उत्पादनाला बाजारात आणण्याची त्यांची धडपड इतरांनाही प्रेरणादायक आहे.

तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. जानेवारीचा महिना. पुण्यातील "बालगंधर्व'मधील सेंद्रिय तांदूळ महोत्सव. वेल्हा तालुक्‍यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांचा आपल्या तांदळासह सहभाग. "इंद्रायणी' जातीच्या तांदळाला प्रति कि. ग्रॅ. 20 रुपयांपर्यंत भाव मिळतो, तर याच प्रकारच्या हातसडीच्या तांदळाला 35 रुपयांपर्यंत भाव मिळतो. 5 पोती हातोहात विकली जातात. तांदळाची चव गुणवत्तेची ग्राहक प्रशंसा करतात. कादवे आणि बाजूच्या गावांतील शेतकऱ्यांचा "मार्केट'चा प्रयत्न काही प्रमाणात सफल होतो. विशेष म्हणजे आपल्या शेतमालाचा भाव आता ते ठरवू शकतात.

पुणे जिल्हातील वेल्हा तालुक्‍यात, पानशेत धरणापासून काही अंतरावर डोंगररांगात कादवे नावाचे शे-सव्वाशे उंबऱ्यांचे छोटेसे गाव आहे. कादवे आणि बाजूच्या वाड्यामिळून येथे एक ग्रुप ग्रामपंचायत आहे. अशा या गावातील शेतकरी धोंडिबा सोनबा जागडे आणि त्यांच्यासारखे काही प्रयोगशील आणि जिद्दी शेतकऱ्यांची ही भातउत्पादन आणि बाजारपेठेची ही कथा.

साधारणत: पाच वर्षांपूर्वी हे शेतकरी तांबडी साळ, पांढरी साळ, हळवा आंबेमोहोर यांसारख्या पूर्वापार चालत आलेल्या भाताच्या वाणांची लागवड करायचे. त्यांच्यापासून कमी उत्पादन मिळायचे. या कीड व रोगांनाही जाती लवकर बळी पडायच्या. परिणामी स्वत:च्या व कुटुंबीयांच्या पोटापुरताही भात व्हायचा नाही, मग कमतरता भासल्यावर नाइलाजाने रेशनचा तांदूळ विकत घ्यावा लागायचा, त्यामुळे आर्थिक समस्याही उत्पन्न व्हायच्या.

आतासारख्या चार सूत्री आणि नियंत्रित पद्धतीने भाताची लागवड तेव्हा होत नसे, त्यामुळे भाताच्या दाढा (रोपवाटिका) तयार करण्यासाठी बियाणे आणि शेतजमीन मोठ्या प्रमाणात लागायचे. मजूरही जास्त लागून एकूण उत्पादनखर्च जास्त व्हायचा; परंतु त्यामानाने येणारे उत्पन्न कमीच मिळायचे. त्यातही ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन जास्त असायची व कुटुंबाच्या अन्नाच्या गरजा बऱ्यापैकी पूर्ण व्हायच्या, तेच फक्त केव्हातरी आपल्या भाताला बाजार दाखवू शकत होते. अर्थात तुलनेने कमी किंमत घेऊन. बाजाराविषयी त्यांना विशेष माहिती नव्हती आणि बाजारभाव ठरविण्याविषयीसुद्धा ज्ञान नव्हते.

चार सूत्रीचा प्रयोग
मात्र गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणची परिस्थिती बदलली. कृषी विभागातील काही तळमळीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने या भागातील गावांमध्ये भाताच्या चार सूत्री लागवडपद्धतीचा प्रयोग राबविला गेला आणि परिसरातील 50% पेक्षाही जास्त शेतकऱ्यांचे भाताचे उत्पादन वाढले आणि बाजारापर्यंत भात जायला लागला. अर्थात सुरवातीला लोकांची मानसिकता बदलायला वेळ लागला. त्यातून केवळ दोन/तीन शेतकरी "चार सूत्री'च्या प्रयोगासाठी तयार झाले. त्यापैकी एक म्हणजे धोंडिबा जागडे. त्यांनी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर विश्‍वास दाखवून नव्या पद्धतीने भातलागवड करायची ठरविली. "चार सूत्री' तील युरिया ब्रिकेटस्‌, नियंत्रित पुनर्लागवड, सुधारित वाणांचा वापर या गोष्टींचा त्यांनी अवलंब केला. पूर्वी दोन हेक्‍टर जमिनीतून 25 पोते भाताचे उत्पादन व्हायचे. नव्या पद्धतीमुळे त्यात दुपटीने वाढ झाली. उत्पादनखर्च कमी झाला आणि बाजाराच्या अंगानेही विचार करता येणे शक्‍य झाले. त्यातून थोड्याफार प्रमाणात आर्थिक उत्पन्नही मिळाले. बाजारपेठेची माहिती त्यांनी करून घेतली. त्यानुसार ते गेल्या चार वर्षांपासून आपल्या जमिनीपैकी एक हेक्‍टरवर सेंद्रिय पद्धतीने शेती करतात आणि उरलेल्या जमिनीवर रासायनिक पद्धतीने शेती करतात. सेंद्रिय तांदळाला तुलनेने चांगली मागणी असते आणि त्याला भावही चांगला मिळतो याची त्यांना पूर्ण माहिती आहे.

नियंत्रित लागवड आणि सेंद्रिय शेती
आपल्या शेतातील लागवडीविषयी सांगताना धोंडिबा जागडे म्हणतात, की "मी इंद्रायणी या सुधारित वाणाच्या भाताची लागवड करतो. यंदाही इंद्रायणीच वापरला आहे. दोन हेक्‍टरसाठी केवळ 40 किलो बियाणे लागले. पूर्वी 100 किलो बियाणे लागायचे. एक हेक्‍टर केवळ सेंद्रिय भातासाठी राखून ठेवले आहे. नियंत्रित पद्धतीने रोपांची पुनर्लागवड केली. पुनर्लागवड करताना एका वेळी भाताच्या फक्त 3 ते चार काड्या लावतो. तरीही त्यांना फुटवे चांगले येतात. एका काडीपासून 17 ते 18 फुटवे येतात. त्यामुळे भाताचे उत्पन्नही वाढते. सरींमध्ये अंतर ठेवल्याने रोपांना सूर्यप्रकाश मिळतो. रोग-किडींना थारा उरत नाही. रोग-किडींच्या बंदोबस्तासाठी अडुळसा, कडुनिंब, रुईचा पाला, दशपर्णी, मिरचीची पूड यांचे मिश्रण वापरतो. भातासाठी गांडूळ खत आणि शेण खत देतो. बाजारातील औषधे आणि खते वापरली नाहीत, ती महागडी असतात. तीन वर्षांपूर्वी आमच्या भागात प्रचंड पाऊस झाला. भाताची खाचरे 10-12 दिवस पाण्याखाली होती. परंतु माझ्यासारख्या ज्यांनी भाताला गांडूळ खत दिले त्यांची रोपे अशा प्रतिकूल स्थितीतही तगली. खाचरात पाणी भरलेल्या बाकिच्यांच्या भातशेतीचे मात्र नुकसान झाले, असे असले तरी त्यांना पुनर्लागवडीसाठी रोपे उपलब्ध होऊ शकतात. कारण नियंत्रित पद्धतीच्या लागवडीत जी रोपे उरतात त्यांचा अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपयोग होतो. त्यामुळे त्यांची जमीन नापेर राहत नाही.'

धोंडिबा जागडेंचा हा प्रयोग बघून गावातील इतर शेतकऱ्यांनीही प्रेरणा घेतली आणि आपापल्या शेतात चार सूत्री भातशेतीचा प्रयोग राबविण्यास सुरवात केली. आजमितीस कादवे गावातील 50% पेक्षाही जास्त शेतकरी हा अशा पद्धतीने प्रयोग करतात. त्यांना पहिल्यापेक्षा जास्त उत्पादन मिळते. इंद्रायणी सारखे सुधारित आणि सह्याद्रीसारख्या संकरित वाणांचा ते वापर करतात. आपल्या पिकांच्या लागवड पद्धतीत कादवे आणि परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी बदल करायला सुरवात केली आहे, त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबीयांच्या गरजा भागतील इतके उत्पादन मिळते. याशिवाय अतिरिक्त उत्पादनाची ते काही प्रमाणात विक्री करतात.

बाजारपेठेची जाण आणि निर्मिती
सेंद्रिय पद्धतीच्या तांदळाला बाजारात चांगला दाम मिळतो, तसेच हातसडीच्या तांदळाला तर "मोठ्या' वर्गातल्या ग्राहकांकडून खास मागणी असते. या गोष्टींची या शेतकऱ्यांना जाणीव होऊ लागली आहे. त्यानुसारच ते आपल्या मालाची किंमतही ठरवीत आहेत. धोंडिबा जागडेंना यंदाच्या हंगामात 50 पोते भाताचे उत्पादन झाले, त्यांपैकी त्यांनी 15 पोत्यांची विक्री केली. शेतकरी शिबीर, तांदूळ महोत्सव याव्यतिरिक्त थेट ग्राहकांना ते विक्री करतात. लहान प्रमाणावर का होईना त्यांनी ग्राहक शोधले आहेत. हे लोक त्यांच्याकडून खास सेंद्रिय तांदूळ घेऊन जातात. एका किलोमागे त्यांना 17 ते 18 रुपये मिळतात. पूर्वी बाजारात तांदूळ विकायला गेले तर त्यांची फसवणूक व्हायची. किंमत कमी मिळायची. आता बऱ्यापैकी किंमत मिळते.

मुळात इतक्‍या दुर्गम प्रदेशातून आपली गरज भागवून भाताची चांगल्या प्रकारे विक्री करणे तितकेसे सोपे काम नाही. त्यासाठी अंगी प्रचंड चिकाटी आणि जिद्दीची गरज असते. तशी चिकाटी या शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यांच्या या चिकाटीला कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही जोड लाभली आहे. कादवे गावात शासकीय अनुदानातून गांडूळ खताचे प्रकल्प उभे राहिले आहेत. ते उत्तम स्थितीत असून शेतकरी त्यापासून चांगल्या प्रकारे गांडूळ खताची निर्मिती करत असतात. याशिवाय कृषी वाचनालय, शेतीशाळा असेही उपक्रम येथे राबविले जातात. पुरुषांप्रमाणेच महिलाही या नव्या प्रयोगात मागे नाहीत. पुरुषांच्या जोडीने त्या शेतात काम करतात. चार सूत्री पद्धतीची त्यांनाही उत्तम जाण आहे, म्हणूनच लहानसा असला तरी या धोंडिबा जागडेंसारख्या शेतकऱ्यांचा भातविक्रीचा प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे.

Comments

सेंद्रिय खते

पंकज, लेख वाचून बरे वाटले. प्रयोगशील शेतकरी, तसेच ज्ञानाधरीत व व्यवस्थापनाधारीत शेती केली तर ती यशस्वी, फायदेशीर होउ शकते याचे हे चांगले उदाहरण आहे. हल्ली सेंद्रिय खतांचा वापर चांगलाच वाढलेला दिसतो आहे. सेंद्रिय खतांबद्दल काही माहिती देउ शकलात तर आनंद होईल.

आपले लेख वाचुन भारतात अश्या गोष्टीसुद्धा होत असतात याचा अभिमान वाटतो. शक्य असेल तर हे लेखन आंग्ल भाषेत येउन जगासमोर येणे गरजेचे आहे. आपल्या माहितीपूर्ण लेखनाला सलाम आणि शुभेच्छा....





मराठीत लिहा. वापरा.

धन्यवाद

कादव्याच्या शेतकर्‍यांचे कौतुक वाटले. इथे माहिती दिल्याबद्दल आभार, पंकज.

वाखाणण्याजोगे

धोंडिबा जागडे आणि कादव्याच्या शेतकर्‍यांचे प्रयोग आणि प्रयत्न खरेच वाखाणण्याजोगे आहेत. निम्म्याहून कमी बियाणांत ते शेती करू लागले हे वाचून आश्चर्यही वाटले. अशा प्रयोगांनी लहान शेतकरीही यशस्वी होऊ शकतील असे वाटले.

लेख आवडला.

चांगली माहिती

येथे दिल्याबद्दल आभार.
प्रगतीशील शेतकर्‍यांनी मोठ्या मेहनतीने मिळवलेले यश पाहून समाधान वाटले.
कादव्याचे नैसर्गिक (सेंद्रीय) तांदूळ कोठे (विकत) मिळू शकतात याची काही माहिती मिळेल काय?

छान

माहिती दिल्याबद्दल आभार. अशा बातम्यांवरून चांगली बाजूही समोर येते. धोंडीबांसारख्या प्रगतीशील शेतकर्‍यांची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

चार् सूत्री

लेख उत्तम आहे. पकंज, आपल्या लेखांमधून् खुप चांगली माहीती मिळते.
येथे आपण चार सूत्री चा उल्लेख केला आहे. ती चार सूत्रे कोणती. (की चार सूत्री म्हणजे अजुन काही वेगळे ? )

- सूर्य.

वाचून आनंद झाला

हे तांदूळ पुढच्यावेळी पुण्यात येतील तेव्हा आम्हीपण घ्यायला जाऊ.

उत्तम लेख

पंकजराव, लेख अतिशय आवडला. आपले विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन खरेच वाचनीय आणि संग्रहणीय असते. आता पुढच्या लेखात कोणत्या विषयावर लिहिणार बरे?
आपला
(वाचनोत्सुक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

अगदी असेच

पंकजराव, लेख अतिशय आवडला. आपले विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन खरेच वाचनीय आणि संग्रहणीय असते. आता पुढच्या लेखात कोणत्या विषयावर लिहिणार बरे?

अगदी असेच वाटते. हा लेखही आवडला.

अगदी असेच...

... म्हणतो आणि वाट पाहतो.

 
^ वर