शिव शिव रे काऊ | हा पिंडाचा घेई खाऊ |

शिव शिव रे काऊ। हा पिंडाचा घेई खाऊ।
"शहाण्यांचा मूर्खपणा अर्थात् आपले प्रेतसंस्कार" या सुधारकातील लेखात आगरकर म्हणतात, "देशपरत्वे व धर्मपरत्वे उत्तरक्रियांचे अनेक प्रकार आहेत.मेलेल्या माणसाच्या प्रेताचा चटदिशी काहीतरी निकाल लावून मी आपला मोकळा होईन असे कोणालाही म्हणता येत नाही.शवाचा निकाल लावला म्हणजे हे काम आटोपते तर त्याविषयी विशेष चर्चा करण्याची गरज पडती ना.पण या दु:खदायक कामामागे त्याहूनही क्लेशकारक अशा विधींचे दुट्टें प्रत्येक धर्माने लावून दिले आहे. हिंदूंनी हे और्ध्वदेहिक प्रकरण भयप्रद,अमंगळ व कष्टमय केले आहे.गोवर्‍या रचण्यापासून राख होईपर्यंत आणि नंतरसुद्धा विधीच विधी.
हे भीषण अमंगळ हिंदुधर्मा ! तुझ्या आज्ञेने स्मशानात शेकडो वर्षे आम्ही क्षौरें केली,कणकेचे गोळे करून ते प्रेताच्या अनेक भागांवर ठेवले,गळके मडके डोक्यावर घेऊन प्रदक्षिणा घातल्या,त्याबद्दल तू आम्हांस काय दिलेस?...हिंदूंनो!, तुम्ही इतके गतानुगतिक कशासाठी होऊन बसला आहांत? मनुष्याच्या जन्माला येऊन असे मेषासारखे वर्तन का करता? डोक्यात जो मेंदू आहे त्याची माती का होऊ देता? जिवंत माणसाच्या आहारास लागणारे पदार्थ तुम्ही मेलेल्या माणसास अर्पण करता याचा अर्थ काय? मृत शरीराची राख झाल्यावर त्याच्या नावाने तुम्ही जें अन्न-पाणी देतां त्याचा उपभोग कोण घेतो? आत्म्याला नाक,तोंड,पोट असे अवयव असतात का? असतील तर जिवंतपणा आणि मृतावस्था यांत भेद काय?
खुळ्यांनो! असे पोराहून पोर कसे झालांत? गरुडपुराणातील किळसवाण्या गप्पांवर श्रद्धा ठेवणार्‍या मूढांनो,अरबी भाषेतील चमत्कारी कथा खर्‍या मानून त्यांना पुराणांच्या पदवीला चढवाल तर अधिक बरें होईल.अकलेची ऐट मिरविणार्‍या मतिमंदांनो ’अ’ व्यक्तीचा ’ब’ हा आप्त वारला तर ’अ’ला कोणत्या कारणानें सुतकी,अस्पृश्य मानून त्याला दहा दिवस वाळीत टाकता? ’अ’चा अपराध काय? बाप मेला तर मुलानें क्षौर केलेच पाहिजे असा हट्ट का ? दाढी-मिशा काढून तोंड असोल्या नारळासारखे गुळगुळीत केलें आहे, डोक्यावरील गळक्या मडक्यातून पाण्याची धार अंगावर पडते आहे, कमरेला एक पंचा, बाकी उघडाबंब आहे, असें मुलाचें नटणें मृत बापाच्या आत्म्याला आवडतें हें तुम्हाला कसे कळले ? कुणी सांगितले?" ...( "सुधारका"तील लेखाचा काही भाग)
.........खरें तर कुणाचा मृत्यू हा दु:खद प्रसंग.पण पिंडदान विधीत जें चालतें तें पाहून हसूं यावे. पिंड ठेवले आहेत .काकस्पर्शासाठी माणसे ताटकळत उभी आहेत.मग मृताचा मुलगा पुढे येऊन हात जोडून म्हणतो," बापू, चिंता करू नका.आत्याला आम्ही अंतर देणार नाही.शेवटपर्यंत सांभाळू."बापूंच्या आत्म्याला हे ऐकू येते.त्याच्या अदृश्य चेहेर्‍यावरील चिंतेचे भाव जाऊन समाधान पसरते.झाडावरील कावळ्याला हा बदल दिसतो.तो खाली येऊन पिंडाला शिवतो.हे सगळे खरे मानण्यात आपले काही चुकते आहे असे कुणाला वाटतच नाही.
माझ्या परिचयाच्या एका गृहस्थाने काकस्पर्शासंबंधीचा एक अनुभव गंभीरपणे सांगितला.तो त्याच्या शब्दांत:--"आमचे एक ब्रह्मचारी काका--म्हणजे माझ्या वडिलांचे धाकटे बंधू--आमच्याकडे राहात.ते वारले.दशक्रिया विधीला पिंड ठेवले.पण कावळा शिवेना.आम्ही दोन तास थांबलो.नाना प्रकारचे सांगणे झाले.पण व्यर्थ.काकांचे एक मित्र विधीला आले होते.ते म्हणाले की काकांना अश्लील पुस्तके वाचण्याची फार आवड होती. मी लगेच स्कूटरवरून घरी गेलो.काकांच्या खोलीतील टेबलावरील एक पुस्तक चाळले. त्यात वाचन खुण होती. म्हणजे गोष्ट वाचून पूर्ण झाली नव्हती.काकांची अतृप्त इच्छा हीच असावी हे जाणून मी ते पुस्तक घेऊन घाटावर आलो.खुणेच्या पानापुढील दोन पाने,काकांना जरा कमी ऐकू येत असे म्हणून, खड्या आवाजात वाचून गोष्ट संपवली. तुम्हांला सांगतो, दोन मिनिटात कावळा शिवला ."
काकांच्या आत्म्याला आपण सद्गती दिली याची कृतकृत्यता त्या गृहस्थाच्या चेहर्‍यावरून ओसंडत होती....(हा अनुभव ऐकून एक कल्पना सुचली की अनेकांचे असे अनुभव असतील. त्यांचे संकलन केले तर "काकस्पर्श अनुभव बृहत् कोश" सिद्ध होऊ शकेल.त्यात "त्वरित काकस्पर्शासाठी अकरा वचने आणि तेरा सूत्रे "समाविष्ट केली आणि कोशाच्या प्रती पिंडदानाच्या ठिकाणी मिळण्याची व्यवस्था केली तर त्याचा खप घाटोघाट होईल.मात्र अनुभव काल्पनिक नसावे.घाटावर जाऊन,लोकांना भेटून,त्यांना बोलते करून अनुभव संकलित करावे.म्हणजे कोश रंजक होईल.)
कल्पना करा की असले अंत्यविधी प्रकार आपल्याकडे नाहीतच. समजा आफ्रिकेतील एका जमातीत थेट असेच प्रकार रूढ आहेत.एका मराठी मासिकात "ऐकावे ते नवलच!" या सदरात त्या पिंडदान विधीची साग्रसंगीत माहिती छापून आली.आबांनी ती वाचली. तर ते म्हणतील, "काय हे घोर अज्ञान! मृताचा आत्मा तृप्त आहे की नाही ते कावळ्याला समजते म्हणे! एकविसाव्या शतकात कोणी हे खरे मानत असेल यावर विश्वास बसत नाही." यावर तात्या म्हणतील," म्हणजे तुम्हाला हे खरे वाटते की काय? अहो, हे संपादक लोक मासिकाची पाने भरण्यासाठी काही मनात येईल ते छापतात.काल्पनिक लिहावे. पण ते थोडेतरी खरे वाटेल असे असावे. आप्तांची आश्वासने काय,काकस्पर्श काय ,सगळे काल्पनिक.असले कधी कुठे असते काय? आफ्रिकेतील जमात असली म्हणून काय झाले? लोक इतके मूर्ख असणे शक्य नाही. आपले गंमत म्हणून वाचायचे झाले."
आज आपल्याकडे हे वास्तव आहे .प्रत्यही घडते आहे.अशा श्रद्धावंतांना सव्वा शतकापूर्वी "खुळ्यांनो,असे पोराहून पोर कसे झालांत? "असा प्रश्न आगरकरांनी विचारला तो आजही विचारणे योग्य आहे.
***************************************************************************************

Comments

मस्तच

पुण्यातील वैकुंठावरील पाटी
Vaikuntha

चार्वाकदर्शन.

पुढील श्लोक माधवाचार्यकृत ’सर्वदर्शनसंग्रह’ ह्या सर्व दर्शनांचे विवरण देणार्‍या ग्रंथात चार्वाकदर्शनाचे म्हणून दाखविले आहेत.

पशुश्चेन्निहत: स्वर्गं ज्योतिष्टोमे गमिष्यति।
स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते॥
ज्योतिष्टोम यागामध्ये मारलेला पशु जर स्वर्गाला जातो तर याग करणारा आपल्या पित्यालाच त्या मार्गाने स्वर्गाला का पाठवीत नाही?

मृतानामपि जन्तूनां श्राद्धं चेत्तृप्तिकारणम्।
गच्छतामपि जन्तूनां व्यर्थं पाथेयकल्पनम्॥
मेलेल्या व्यक्तींना जर श्राद्धाच्या मार्गाने अन्न मिळून ते तृप्त होतात तर प्रवासाला निघालेल्यांना वाटेसाठी काही बांधून द्यायची काय आवश्यकता? त्यांनाहि श्राद्धाच्या मार्गाने अन्न का पुरवत नाही?

कोल्हटकर साहेब

वरिल माहिती वाचुन उत्कन्ठा वाढ्ली आहे,तरी माधवाचार्यान्बद्द्ल माहिती देण्याची क्रुपा करावी.

माधवाचार्य

'सर्वदर्शनसंग्रह' ह्या विद्वन्मान्य ग्रंथाचे निर्माते माधवाचार्य हे विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हरिहर आणि बुक्क ह्यांचे मार्गदर्शक १४व्या शतकाच्या मध्यावर होऊन गेले अशी समजूत आहे. नंतरच्या काळात संन्यास घेऊन ह्यांनी विद्यारण्यस्वामी असे नाव घेतले होते.

वासुदेवशास्त्री अभ्यंकरसंपादित सर्वदर्शनसंग्रहाची जी आवृत्ति १९२४ साली निर्णयसागरने प्रसिद्ध केली तिच्या प्रस्तावनेमध्ये माधवाचार्यांबद्दल चरित्रवजा छोटी टिप्पणी आहे. तदनुसार ह्यांचे नाव सायणमाधवाचार्य असे दिले आहे आणि 'सायण' हे त्यांच्या कुटुंबाचे नाव असे म्हटले आहे. अर्थातच वेदांवरील 'सायणभाष्य' ही प्रख्यात टीका लिहिणारे सायण म्हणजेच माधवाचार्य असे दिसते.

परंतु अन्य खूप जागी सायण आणि माधव हे एकमेकांचे भाऊ होते असेहि उल्लेखिलेले आढळते

धन्यवाद

माहिती बद्दल आभार

अंत्यसंस्कार

नेहमीप्रमाणे यनावाला यांनी एका महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. त्याबद्दल धन्यवाद.कोणा नातलगाचा अंत्यसंस्कार म्हटले की आयुष्यात बाकी सर्व गोष्टी तारतम्य बाळगून करणारी मंडळी सुद्धा इतकी गतानुगतिक होतात की त्यांची मला कीव करावीशी वाटते. मध्यंतरी काकस्पर्श नावाचा एक चित्रपट येऊन गेला. त्यामुळे काकस्पर्शाची नवी फॅशन आल्यास नवल वाटायला नको. काही वर्षापूर्वी पंजाब मधे केला जाणारा करवा चौथ नावाचा एक अचरट विधी महाराष्ट्रात लोकप्रिय करण्याचे काम एका हिंदी चित्रपटाने केले होते. त्याच धर्तीवर हा काकस्पर्श चित्रपट हिंदीत काढल्यास या विधीला भारतभर लोकप्रियता मिळू शकेल.

कीव

कोणा नातलगाचा अंत्यसंस्कार म्हटले की आयुष्यात बाकी सर्व गोष्टी तारतम्य बाळगून करणारी मंडळी सुद्धा इतकी गतानुगतिक होतात की त्यांची मला कीव करावीशी वाटते.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.
बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
तुमच्या वरील उदाहरणात इतर वेळी तारतम्य बाळगणारी मंडळी देखील तडजोड स्वीकारणे हे तारतम्यच समजत असतात. अनेकदा आपल्याला पटत नसलेल्या गोष्टी आपण नाईलाजास्तव करत असतो. त्यातली ही एक असे म्हणुन मार्ग काढत असतात.
अडीच वर्षांपुर्वी माझी आई गेली. तिने देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्याजवळ देहदान हे पुस्तक सही केलेले होते. त्यामुळे मला इतर नातेवाईकांना पटवता आले व देहदान केले. तशी ती पारंपारिक,धार्मिक व श्रद्धाळू होती. मी कुठलेही अंत्य संस्कार केले नाहीत पण त्या निमित्ताने सिप्ला फाउंडेशनला देणगी दिली.. जर तिने देहदानाची इच्छा व्यक्त केली नसती तर काय करायचे हा प्रश्न माझ्यासमोर होताच. पण या निमित्ताने नातेवाइकांना एक प्रकारचे हे धाडस वाटले. नंतर माझ्या मामाचे ही देहदान केले.पण कुटुंबियांनी इतर धार्मिक विधी केले.
समाज हळू हळू बदलतो आहे. हा बदलाचा वेग कदाचित आपल्याला अपेक्षित असा नसेलही.

आशादायक बदल

श्री.प्रकाश घाटपांडे लिहितात,
"

समाज हळू हळू बदलतो आहे. हा बदलाचा वेग कदाचित आपल्याला अपेक्षित असा नसेलही."

हे खरे आहे. बदल दिसतो आहे. विद्युद्दाहिनीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे.धार्मिक विधींचे प्रमाण कमी झाले आहे.अंत्यविधीसाठी वेळ,ऊर्जा आणि पैसा यांचा अपव्यय होतो.तो टाळायला हवा.कावळ्याला मृताचा आत्मा दिसतो हे अनेकजण खरे मानतात ही गोष्ट कीव करण्यासारखी आहे. हे तडजोडीचे तारतम्य नव्हे.गतानुगतिकता आहे.पिंडदानाचा प्रकार पटत नसेल तर संबंधित व्यक्तीने पुढे येऊन तसे स्पष्ट सांगायला हवे. असे मला वाटते.

देव

कावळ्याला मृताचा आत्मा दिसतो हे अनेकजण खरे मानतात ही गोष्ट कीव करण्यासारखी आहे.

समाजातले बहुसंख्य लोक देव ही संकल्पना खरी मानतात, (त्याच्या स्वरुपाविषयी मतभिन्नता असेलही.) ही गोष्ट पण कीव करण्यासारखी मानावी लागेल. खर तर काही लोक अस मानतात देखील. पण उघडपणे तस बोलत नाहीत.समाजाचा रोष ओढवून जगता येणार नाही याचे अजुन तरी त्यांना भान आहे. देव ही संकल्पना मानणे ही सरळ सरळ अंधश्रद्धा आहे .अंधश्रद्धा ही बाब वै़ज्ञानिक दृष्टीकोणाच्या विरुद्ध आहे. घटनेत वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे असे मानले आहे.परिणामी देव ही संकल्पना मानणे ही बाब घटना विरोधी आहे अशी मांडणी देखील करता येते. नाही तरी घटनेच्या अन्वयार्थाचा शब्दच्छल कैक वर्षे चालू आहेच.
अंनिस अजून तरी अधिकृतपणे देव व धर्म या बाबत तटस्थ आहे. अघोरी अंधश्रद्धांकडून निरुपद्रवी अंधश्रद्धांकडे असलेला प्रवास हा देखील विवेकी प्रवास आहे.
डॉ श्रीराम लागू व नरेंद्र दाभोलकर यांच्यात वादसंवाद होत असत. लागू सरळ सरळ परमेश्वर ही अंधश्रद्धा आहे असे प्रतिपादन करीत पण दाभोलकर मात्र तशी भुमिका घेत नाहीत. कारण त्यांना चळवळ चालवायची आहे. समाजात राहून काम करायचे आहे. देव मानणारे सर्व अंधश्रद्ध अशी एका फटक्यात विभागणी करुन समाजाचा रोष ओढवून घेणे परवडणार नाही.
चाणक्य म्हणतात तस श्रद्धा अंधश्रद्धा हा चोथ्याचा विषय आहे.

हे तडजोडीचे तारतम्य नव्हे.गतानुगतिकता आहे.

माझा प्रतिसाद हा चंद्रशेखर यांच्या उधृताशी होता. त्यामुळे वरील उदाहरण हा शब्द म्हणजे आपल्या लेखातील उदाहरण नव्हते.

पिंडदानाचा प्रकार पटत नसेल तर संबंधित व्यक्तीने पुढे येऊन तसे स्पष्ट सांगायला हवे. असे मला वाटते.

हळू हळू लोकांच्यात ते धाडस येईल. अंत्यविधींना आता बर्‍या पैकी शॉर्ट कट मिळू लागले आहेत. उत्तरोत्तर हे विधी कमी कमी होत जातील.

देव

देव नाहीत किवा निरिश्वर वाद हा भगवान गौतम बुद्धानी सुद्धा मान्ड्ला होता तसेच वेगळा सम्प्रदाय सुद्धा सुरु केला त्याची परिणीति काय झाली तर गौतम बुद्धाचे भगवान गौतमबुद्ध झाले,तसेच जैन महावीरन्चे सुद्धा झाले,आणि दोन्ही सम्प्रदायान्चि मन्दिरे निर्माण झाली व होत आहेत्,तसेच्,मुर्तीपुजा निशिद्ध अस्णार्यन्ची सुद्धा मन्दिरे बान्धली जात आहेत.
"अंत्यविधींना आता बर्‍या पैकी शॉर्ट कट मिळू लागले आहेत. उत्तरोत्तर हे विधी कमी कमी होत जातील."
या विषयीची खात्री आहे कारण हे विधी करणारे 'किरवन्त'हेच कमी होत चालले आहेत.

पितृशांतीला पर्याय नाही....

विद्युद्दाहिनीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे

या संबंधात एक गंमतीशीर लेख वाचण्यात आला म्हणून टंकित आहे:

मातृऋण म्हणजे जन्मदात्या आईचे उपकार व पितृऋण म्हणजे वडिलांसह आपल्या खानदानाचे उपकार! ह्या ऋणांचे महत्व जाणणारे व जपणारे संस्कार आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबद्दल आग्रही असणारी शिकवण आपल्या हिंदूधर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करते. ...

वैयक्तिक जीवनात रममाण झालेल्या आपणास ह्या ऋणांचा विसर पडला आहे. ज्या वडिलधाऱ्या व्यक्ती जीवित आहेत त्यांच्यासाठी आपण बरेच काही करू शकतो किंबहुना करायलाच पाहिजे. पण आपले पूर्वज परलोकवासी झालेत त्यांचे काय? त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून नव्हे पण आपल्यावरील जबाबदारीची जाण ठेऊन पूर्वजांच्या मोक्षप्राप्तीकरिता प्रयत्न करणे आपले आद्य कर्तव्य आहे. अर्थात, हे कर्तव्य निभावताना भावनेच्या जोडीला योग्य ज्ञानाची आवश्यकता भासते. निश्चित काय व कसे करावयाचे हे शिकण्याकरिता ह्या समग्र विषयाचा अभ्यास करणे क्रमम्राप्त ठरते.

आपला हिंदू धर्म मरणोत्तर जीवनाचा पुरस्कर्ता आहे. म्हणजेच हिंदूधर्म हा व्यक्तीच्या मृत्युनंतरसुद्धा त्यांच्या आत्म्याचे अस्तित्व मानतो. शरीर व आत्मा हे विभिन्न असून जोवर आत्मा शरीराच्या आत वास करून असतो तोवर व्यक्ती जिवंत असते आणि आत्म्याने त्या शरीराचा त्याग केला की ती व्यक्ती मृत मानली जाते. पण मृत्यु हा जीवनाचा शेवट नसून मृत्यनंतर नष्ट होतो तो फक्त देह! जे जाते ते केवळ जड शरीर!

सध्याच्या कलियुगात पुण्यकार्याची वानवा असल्याने सद्गती प्राप्त होणारे आत्मे विरळाच! दुर्दैवाने बहुसंख्य अतृप्त आत्म्यांना अधोगती मिळून वर्षानुवर्षे ते तसेच खिजपत पडून असतात आणि त्यांचे वंशज असलेले आपण आपल्या व्यस्त जीवनात अगदी चैन करत असतो! त्यांना त्यातून सोडवणे आपले कर्तव्य नव्हे काय? ह्या महोत्तम कर्तव्याला पार पाडण्यासाठी आपला हिंदू धर्म आपल्याला सुयोग्य मार्गदर्शन पुरवितो.

अतृप्त आत्म्यास कमी पडणारे पुण्य त्याला कुठल्या माध्यमाद्वारे पोहोचविता येईल, ह्यावर प्राचीन ऋषीमुनींनी वर्षानुवर्षे केलेल्या अथक संशोधनाचे फलित म्हणजेच अग्नीसंस्कारादि अंत्यविधी आणि पिंडदानाची श्राद्धविधी!

सर्व शास्त्रशुद्ध विधीसहित योग्य प्रकारे मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जाणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तो मृतदेह आत्म्याचे त्या जन्माचे घर असतो व साहजिकच आत्म्याशी संलग्न भावना त्या देहाशी निगडित असतात. देहाला जमिनीत पुरून त्या भावनांतून आत्म्याला सोडविणे शक्य नसते. पुन्हा पुन्हा आत्मा त्या देहाकडे आकर्षित होऊन मुक्तीच्या मार्गापासून ढळू शकतो आणि अंतिम ध्येयापासून वंचित राहतो. ह्याकरिता देहाचे पूर्णत: ज्वलन करून तो संपूर्ण नष्ट करण्यासाठी अंत्यसंस्कारात देहाला अग्नी दिला जातो. शिवाय परमेश्वराने दिलेल्या देहाचे हवन करून ती त्यास समर्पित करण्याचा भाव त्यामागे आहे. व्यक्तीच्या देहाचा हा होम साहजिकच त्यास ईश्वराकडे नेऊ शकतो कारण शास्त्रान्वये ईश्वरापर्यंत वस्तू पोहोचविण्याचे अग्नी हे माध्यम आहे. त्याखेरीज ईश्वरी शक्तीच्या विरुद्ध कार्य करणाऱ्या असुरी शक्ती अग्नीला घाबरतात आणि म्हणूनच त्या मृतदेहाचा व पर्यायाने त्या आत्म्याचा ताबा घेण्यास अशा शक्ती धजावत नाहीत.

काही महाभाग मृतदेहास अग्नी न देता विद्युतदाहिनीत जाळतात. लाकूड बचतीच्या उद्देशाने तसेच आर्थिक सुलभतेच्या दृष्टिकोनातून ते सोयिस्कर असले तरीही शास्त्रान्वये पूर्णत: अयोग्य असून असे कदापि करू नये. सकारण समजून घेतल्यास तुम्हीदेखील सहमत व्हाल.

लाकडात सुप्त पवित्र शक्ती असल्याने लाकडांना धार्मिक महत्व आहे. पुरातन काळापासून होम हवनासाठी चंदन, वड, पिंपळ, आंबा, खैर, उंबर, कडुनिंब ह्या झाडांच्या लाकडांचे तुकडे म्हणजे समिधा वापरतात. चंदनाचे लाकूड तर सर्वश्रेष्ट मानतात. .... चंदनाचे लाकूड पवित्र तर असतेच पण चंदनाची शीतलता आत्म्यास उद्विग्नता येऊ न देता शांत आणि विरक्त मार्ग दर्शवून मोक्षाकडे नेते. अंग्नीसंस्कारात म्हणून लाकडाचा अग्नी असावा हेच खरे!

अजूनही भरपूर मसाला या लेखात आहे. तुर्तास इतके पुरे!

अवाक

हा लेख वाचल्यावर पुढे लिहिण्यासारखे काही उरलेलेच नाही. इतके महत्त्वाचे संशोधन ज्या महाभागांनी केलेले आहे त्यांचा परिचय हो ऊन त्यांच्या पदकमलांजवळ शेवटचा श्वास सोडावा म्हणतो म्हणजे नक्कीच मोक्षप्राप्ती हो ऊन आत्म्याला शांती लाभेल.

चंदनाचे लाकूड पवित्र तर असतेच पण चंदनाची शीतलता आत्म्यास उद्विग्नता येऊ न देता शांत आणि विरक्त मार्ग दर्शवून मोक्षाकडे नेते

धन्य धन्य ते चंदनाचे लाकूड

सहमत

प्रतिसादातल्या प्रत्येक वाक्याशी सहमत आहे.विवेकवाद आणि अंधश्रद्धा हा नेहमीचा आणि चवीने चोथा करायचा विषय आहे. असो...
अंधश्रद्धांना आपली श्रद्धा कधीच अंध वाटत नाही तर विवेकवाद्यांना किव करण्यात धन्यता वाटते. दोघांच्यातला दुरावा कमी करण्यासाठी खरा पुढाकार विवेकवाद्यांनी घ्यायला हवा पण त्यांना कदाचित तो कमीपणा वाटतो. कदाचित लेख लिहिल्यामुळे हि अपराधीपणाची भावना कमी करण्याला मदत होत असावी.
घाण स्वच्छ करायची तर हात घाण करायला हवेत. राहिला प्रश्न मृत्युपश्वातचे विधी. मला वाटते त्यामध्ये हि भावनेचा भाग अधिक आहे. अर्थात आपण म्हणता त्या प्रमाणे समाज हळू हळू बदलतो आहे आणि हे बदल चटकन घडणारे नाहीत. आम्हा भारतीयांना सामाजिक शिस्तीचे, शिकवणुकीचे वावडे आहे. असा समाज बदलायला वेळ लागणारच.

विद्वान ?

त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते.

अगदी बरोबर. तेव्हढे तारतम्य बाळागावेच लागते

आश्चर्य वाटते!

श्री.चाणक्य लिहितात,

"दोघांच्यातला दुरावा कमी करण्यासाठी खरा पुढाकार विवेकवाद्यांनी घ्यायला हवा पण त्यांना कदाचित तो कमीपणा वाटतो. कदाचित लेख लिहिल्यामुळे हि अपराधीपणाची भावना कमी करण्याला मदत होत असावी."

..याचे आश्चर्य वाटते. गेली दोन दशके अंनिसचे कार्यकर्ते कृतिशील आहेत.समाजात मिसळून काम करीत आहेत. त्याची श्री चाणक्य यांना कल्पना नसावी. विवेकवाद्यांच्या मनात अपराधीपणाची भावना कसली? का असावी? आणि ती कमी होण्यासाठीलेख लिहायचे? हे तर्कशास्त्र कुठले? कृपया पूर्वग्रह न बाळगता वास्तवाचे भान ठेवून विचार करावा. प्रेतसंस्कारांविषयींच्या अंधश्रद्धांमुळे अनेकांचा वेळ,ऊर्जा आणि पैसा यांचा अतोनात अपव्यय होतो.विशेषतः गरिबांची आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे प्रगती खुंटते. सुशिक्षितांनी हा खुळेपणा सोडला तर त्यांच्या अनुकरणाने अशिक्षितही सोडतील या हेतूने लिहितो.

माझा अनुभव

माझे वडील १० वर्षांपूर्वी गेले. ओंकारेश्वरावर जावून विधी करायची मला अजिबात इच्छा नव्हती. मात्र वडिलांपेक्षा २ मोठे काका असल्याने काहीतरी मधला मार्ग म्हणून भरपूर रोष पत्करून शेवटी ज्ञानप्रबोधिनी द्वारे घरातच विधी केले. सगळ्यात मोठे काका जावून २५ वर्ष झाली आणि आता त्यांचे श्राद्ध करायच्या फंदात त्यांचीच मुले पडत नाही. पुढील पिढीला त्यात फारसा अर्थ वाटत नाही. म्हणजे समाज हळूहळू बदलतो आहे. बहुदा माझी सध्याची पिढी जी ४०च्या आत बाहेर आहे ते जेंव्हा मारायला लागतील तेंव्हा बराच बदल झालेला दिसेल. अजून २०-३० वर्ष तरी लागतील. त्याच्या आधी एकदम बदल होतील असे संभवत नाही पण झाले तर उत्तम.

कल्पना आहे

कल्पना आहे हो. फक्त अनिसचा कार्यकर्ता बनुन अंधश्रद्धा जाणार थोडीच आहे? त्यांचा भर प्रसिद्धीकडे झुकलेला जास्त आहे हे माझे मत. भारतातली श्रद्धा हाच मुळा एक अंधश्रद्धेचा भाग आहे. देश चालवणारे लोकं ज्याप्रकारे अंधश्रद्धा बाळगतात तिथे त्यांचे तळागाळातले कार्यकर्ते त्यांचे अनुकरण करणारेच असणार ना? जिथे इस्रोचा अधिकारीच देवाला सांगतो तिथे सर्वसामान्यांचे काय?
लेखापेक्षा कृती महत्वाची आहे.
असो, चर्चेचा उपमुद्दा मला मांडायचा आहे. आपण हे मान्यकरु की अंत्यसंस्कार आणि श्राद्ध वगैरे थोतांड आहे. पण मनुष्याचा अंत्यसंस्कार कसा करावा? देहाची विल्हेवाट कशी लावावी? जाळावे की पुरावे? कि देहदान करावे?
माझ्या मृत्यु पश्चात माझे श्राद्ध होणार नाही याची काळजी जर मी घेतली तर बरेच काम हलके होईल. हे काम प्रत्येकाने केले तर आणखीनच चांगले. मी माझ्या पिढीबद्दल नक्कीच खात्रीने सांगतो की हे होईल. मागच्या पिढी बद्दल हा भावनेचा भाग अधिक आहे. या भावनांवर विश्वास ठेवणे अथवा मागच्या पिढीसाठी हो म्हणने ही जर अंधश्रद्धा असेल सरकार चांगली धोरणे ठरवेल, विज्ञानाचा वापर करुन माझे सामाजिक आयुष्य सुधारेल अशी अपेक्षा करुन मतदान करणे हे देशाल अंधश्रद्धेचे पालन करणेच आहे. कृती महत्वाची आहे. घाटपांदे म्हणतात त्या प्रमाणे आपला समाज ते करतो आहे. त्याचा वेग कमी आहे आणि मला वाटते तो योग्यच आहे.
मला गंमत याची वाटते की जाणती माणसे प्रेतसंस्कारांमुळे वेळ,ऊर्जा आणि पैसा यांचा अपव्यय होतो म्हणतात. पण हेच जाणते लोकं सरकार, प्रशासन यांच्याकडून होणार्‍या याच सामान्य माणसांच्या वेळ,ऊर्जा आणि पैसा याच्या होणार्‍या अपव्यया बद्दल एक शब्द देखील लिहायला अथवा समाज जागृती करायला धजत नाहीत.
आजची समाजाची गरज काय आहे हे ओळखून कृती करणे मला जास्त महत्वाचे वाटते या विषयांवर असे लेख लिहिणे हि निव्वळ आत्मशांती वाटते.

सहमत

चाणक्य आपल्या विचारान्शी सहमत आहे.

प्रेतसन्स्कार

प्रेतसन्स्कार ,मला आपणास एक विनन्ती करावयाची आहे की आपण एखादी नवी पद्धत सान्गावी ज्याने ," प्रेतसंस्कारांविषयींच्या अंधश्रद्धांमुळे अनेकांचा वेळ,ऊर्जा आणि पैसा यांचा अतोनात अपव्यय होतो".आता आपण मला सान्गाल की घाट्पन्डे साहेबानी सन्गितल्या प्रमाणे देह्दान करावे,म्हन्जे झाले,पण उद्या सर्व लोक जर देह्दान करतील तर एव्हड्या प्रेतान्ची विल्हेवाट कशी लावणार्,असो याचा विचार सुद्धा अनिस ने केला असेलच.

वैज्ञानिक दृष्टीकोण म्हणजे रे काय भाउ ?

घटनेत वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगणे हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे असे मानले आहे.

होय, पण समस्या अशी आहे कि वैज्ञानिक दृष्टीकोण म्हणजे काय हे कुठेच clear केलेले नाही. आपल्या कडे शाळा कॉलेजात बरेच विज्ञान (physics, chemistry, maths) शिकवितात पण मुळात विज्ञान म्हणजे काय (the method of science) हे सांगत नाहीत. त्यामुळे वेद पुरणातून उत्पन्न ते पण प्राचीन विज्ञानच असा युक्तीवाद करता येतो, व केला जातो.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत एक म्हणावेसे वाटते. ऐहिक सुखे व जीवनातील चिंतांपासून मुक्ती प्रत्येकालाच हवी असते. पण गरीबांना चिंता जास्त कष्ट्दायक असतात कारण अनेक चिंता अश्या असतात ज्या पासून पैसे खर्च करून काही प्रमाणात तरी उपाय करता येतो, जसे, वैद्यकीय उपचार. ज्या माणसाच्या आप्ताला काही गंभीर आजार झालेला आहे, व तो curable असला तरी त्याच्या कडे उपचारा करता पैसेच नाहीत, असा परीस्थीतीने पिडलेला माणूस अंधश्रद्धांच्या आहारी जाणे समजण्या सारखे आहे. त्याच प्रमाणे ज्या अंधश्रद्धांचा उगम धर्मात आहे त्यांचा शेकडो वर्षां पासूनचा पगडा मनावर असतो, व त्या अंधश्रद्धांना आव्हान देणे जास्त कठीण असते.

पण ज्यांचा उगम धर्मात नाही व ज्या सुशिक्षित वर्गाच्या लाडक्या आहेत त्या अंधश्रद्धांना आव्हान देणे सोपे असावे. (असे मला तरी वाटते). उदाहरणार्थ - रेकी, फेंगशुइ, Tarrot Card Reading, Numerology, वास्तु, इत्यादी. आज सुशिक्षित वर्ग या अंधश्रद्धांच्या आहारी जात आहेत, हे मला बोकड बळी देण्याच्या अंधश्रद्धे पेक्षा जास्त काळजीचे वाटते. अंनिस ने सुशिक्षितांच्या "आधुनिक" अंधश्रद्धांना आधी आव्हान दिले तर जास्त चांगले.

वैज्ञानिक दृष्टिकोन

श्री.चेतन पन्डित विचारतात

,"वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय रे भाऊ?"

विज्ञानाचे नियम आणि सिद्धान्त पाठ असणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे हे उघडच आहे.कोणत्याही गोष्टीवर आपल्या निरीक्षणांच्या ,अनुभवांच्या आणि तर्कबुद्धीच्या आधारे विचार करून तिची तात्त्विक सत्यासत्यता ठरविणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन.इतर अनेकजण करतात,थोरामोठ्यांनी सांगितले आहे, ग्रंथात लिहिले आहे म्हणून आपण सुद्धा तसेच करावे याला गतानुगतिकता म्हणतात.ती वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरुद्ध असते.

अंत्यसंस्कार

कोणत्याही गोष्टीला संस्कार म्हटले की तिच्याभोवती एक आध्यात्मिक वलय येते. मुंज या फालतू विधीचे उदाहरण घ्या. माझ्या नात्यातला एक अमेरिकेत राहाणारा मुलगा त्याच्या आठ आणि दोन वर्षांच्या लहान मुलांना घेऊन या रणरणत्या उन्हाळ्यात भारतात फक्त मुलाची मुंज करण्यासाठी म्हणून आला आहे. हे कळाल्यावर मला हसावे की रडावे ते कळेनासे झाले. असो.
अंत्यसंस्कार या विषयावर मनोगतावर फार पूर्वी एक वाद रंगला होता. त्यात मरणानंतर मानवी शरीर म्हणजे काही लिटर पाणी आणि क्षारांची एक पिशवी असे मी म्हटल्यावर त्यावर बरेच विद्वान तुटून पडले होते. त्यात रसायनशास्त्रात पी.एच.डी केलेले काही लोकही होते. तात्पर्य शिक्षणाचा ज्ञानाशी संबंध नाही.
'काकस्पर्श' सारखा निव्वळ आचरट सिनेमा लोक कला, कलाकारांचा अभिनय यापुढे जाऊन बघतात आणि त्यावर घसा भरभरुन लिहितात, बोलतात हे पुरोगामी महाराष्ट्राच्या थोबाडात मारल्यासारखे आहे. आता तर ग्रामीण महाराष्ट्रात विशेषतः ब्राह्मणेतर समाजात अंत्यविधी, रक्षाविसर्जन, माती, दिवस यांचे प्रस्थ फारच बोकाळले आहे. एक विनोदी उदाहरण बघायचे तर 'सकाळ' च्या पुणे आणि कोल्हापूर आवृत्तीवर नजर टाकावी. कोल्हापूरच्या आवृत्तीत अर्धे पान 'पुण्यस्मरण' सदराचे असते. त्यात प्रत्येक मयताच्या बातमीचा शेवट 'रक्षाविसर्जन अमुकामुक तारखेस आहे' असा असतो. जिवंत असताना दोन वेळच्या भाकरीला महाग असलेल्या म्हातारीच्या मरणानंतर वर्तमानपत्रात बातमी छापून आणणे, अंत्यसंस्काराच्या वेळी 'रुदाली' मध्ये शोभेल असा व्यावसायिक हंबरडा फोडणे, 'पडून होती, पण आम्हाला मोठा आधार होता' असे म्हणून हुकमी घेरी येऊन पडणे, 'माती' ला पंचायत समितीचे सदस्य, एखादा आमदार आला की कृतकृत्य झाल्यासारखे वाटणे, मराठी मालिका बघून त्याप्रमाणे सांत्वनाला येणार्‍या माणसांना भेटण्यासाठी पांढरे कपडे घालून हात जोडून उभे राहाणे, मयत व्यक्तीचा एक तात्काळ एन्लार्ज केलेला फोटो लावून त्याला हार, सुगंधी उदबत्त्या वगैरे अशी फिल्मी आरास करणे.. असो.
शेवटचा मुद्दा असा की तुम्ही एखाद्याच्या मरणानंतर काहीही गाजावाजा नकरता शांतपणे त्या देहाचे दान करुन मोकळे व्हा, किंवा अगदी 'इव्हेंट मॅनेजमेंट' केल्यासारखे आठ-पंधरा दिवस जल्लोष उडवून द्या, बोलणारे बोलतातच. 'आमची इच्छा नव्हती, पण वडीलधार्‍यांचे मन मोडवेना' असे म्हणणार्‍यांनी हे ध्यानात ठेवावे. माझ्या काही नातलगांच्या मरणानंतर मी त्यांच्या देहांचे कोणतेही 'संस्कार' न करता दहन केले आणि स्मशानातच 'हे आता संपले, यापुढे दिवस-बिवस काही नाहीत' असे जाहीर केले. त्यानंतर आणि त्यामुळे काही लोकांचे माझ्याशी असलेले संबंध दुरावले. पण मग ते दुरावण्याच्याच लायकीचे होते असे माझ्या ध्यानात आले.

काकस्पर्श आवडला.

काकस्पर्श चित्रपट आपल्याला तर आवडला बुवा! टीव्हीवर पाहिला. चित्रपट अर्थातच मनोरंजन पट म्हणुन पाहिला प्रबोधनपट म्हणुन नाही. सचिन खेडेकर ची भूमिका आवडली.
बाकी ग्रामीण भागातील आपले मयतीचे निरिक्षण पटले. लग्न प्रसंगाला पण ते लागू होते. राजकीय पुढार्‍यांना माणस (मतदार) जोडण्याची ही नामी संधी असते. काही लोक इतर आनंदाच्या प्रसंगी एकवेळ जात नाही पण मयतीला मात्र जातात.
बाकी तुमचे मुंजीचे उदाहरण अगदी नक्की दिसते. आता त्या मुंज मुलाच्या पुढच्या पिढीत तो आपल्या मुलाची मुंज करेल का? या बद्दल मला शंकाच वाटते. भारतातील आई वडिल जेव्हा मरण पावतात तेव्हा परदेशस्थ मुलांच्या मनात 'आता आपण जाउन ते थोडेच परत येणार आहेत. उगाच भारत भेटीचे पन्नास हजार डॉलर कशाला फुकट घालवा?' असा ही विचार एव्हाना मनात येउ लागला असेल. अजुन लाजेकाजेस्तव तरी येतात. पुढची पिढी ते ही येणार नाही. भारतात इव्हेंट मॅनेजमेंटचे कंत्राट देउन ठेवतील.

मुंज या फालतू विधीचे उदाहरण घ्या

आपल्या या विचाराशी मी पुर्णपणे सहमत आहे,कारण पुर्वि हा तथाकथित विधी हा एका जीवनशैलीचा भाग होता,आणि आता ती जीवनशैली,जवळ्जवळ नामशेश होत चालली आहे,तरीसुद्धा मला आपल्या मित्राचे कौतुक वाटते की ईतक्या फालतु अश्या सन्स्कार विधी साठी हा मनुश्य सातासमुद्रा पलिकडुन भारतात येत आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन

कोणत्याही गोष्टीवर आपल्या निरीक्षणांच्या ,अनुभवांच्या आणि तर्कबुद्धीच्या आधारे विचार करून तिची तात्त्विक सत्यासत्यता ठरविणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. यनावाला
हे तितकेसे बरोबर नाही, कारण आपली तर्कबुद्धी चुकीच्या मार्गाने जाऊ शकते. आऐझॅक असिमोव एक छान उदाहरण देतात. एल प्रयोग केला. पाच लोकांना पाच द्र्व्ये पिण्यास दिली. पाणी+व्हीस्की, पाणी+ब्रॅन्डी, पाणी+रम, पाणी+वोडका, व पाणी+जिन. निरीक्षण - पाची लोक झिंगले. याचा अर्थ पाणी पिल्याने माणूस झिंगतो. हे अर्थातच चुकिचे आहे, पण तर्कबुद्धी कशी चूक करू शकते याचे उदाहरण आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे आपल्याला नक्कीच माहीत असणार. ही प्रतिक्रिया तुमच्या करता नव्हे तर ज्यांना ते माहीत नसेल त्यांच्या करता आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ज्याला इंग्रजीत method of science म्हणतात त्याचे काही नियम आहेत :
- कोणतीही गोष्ट कोण्या महान व्यक्तीने सांगितली म्हणून ती मान्य होत नाही
- कोणतीही गोष्ट कोण्या ग्रंथात लिहीली आहे म्हणून ती मान्य होत नाही
- जर method of science च्या नियमां प्रमाणे ती सिद्ध झाली तरच ती मान्य होते
- एकच प्रयोग जर इतरांनी केला तर त्याचे रिझल्ट तेच यायला हवेत
- जर रिझल्ट तेच आले नाहीत तर त्याचे स्पष्टीकरण हुडकण्याचा प्रयत्न केला पाहिजे
इत्यादी

योग्य विवेचन

- कोणतीही गोष्ट कोण्या महान व्यक्तीने सांगितली म्हणून ती मान्य होत नाही
- कोणतीही गोष्ट कोण्या ग्रंथात लिहीली आहे म्हणून ती मान्य होत नाही
- जर method of science च्या नियमां प्रमाणे ती सिद्ध झाली तरच ती मान्य होते
- एकच प्रयोग जर इतरांनी केला तर त्याचे रिझल्ट तेच यायला हवेत
- जर रिझल्ट तेच आले नाहीत तर त्याचे स्पष्टीकरण हुडकण्याचा प्रयत्न केला पाहिजे
इत्यादी

वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी श्री.चेतन पंडित यांनी केलेले हे विवेचन योग्यच आहे.
२/

पाच लोकांना पाच द्र्व्ये पिण्यास दिली. पाणी+व्हीस्की, पाणी+ब्रॅन्डी, पाणी+रम, पाणी+वोडका, व पाणी+जिन. निरीक्षण - पाची लोक झिंगले. याचा अर्थ पाणी पिल्याने माणूस झिंगतो

.."पाणी पिल्याने माणूस झिंगतो" असा निष्कर्ष कोणी काढणार नाही. कारण हा निष्कर्ष आपल्याला नित्यशः येणार्‍या अनुभवाच्या विरुद्ध आहे.आयझॅक आसिमॉव यांनी हे उदाहरण एक विनोद म्हणून दिले असावे.तसेच मानवी बुद्धी योग्य मार्गाने जाण्यासाठी विकसित झाली आहे.क्वचित चूक होते हे खरे.

विनोद म्हणून नसावे

आयझॅक आसिमोव्हचे उदाहरण मिष्किल आहे, पण निव्वळ विनोदी नाही.

नवीन अनुभवांची व्यवस्था लावण्याकरिता आपण "अन्वय-व्यतिरेक" ही पद्धत अवलंबतो.

म्हणजे ज्या गोष्टी वेगवेगळ्या अनुभवांत समान आहेत, त्या एकमेकांशी संबंधित आहेत. मात्र ज्या गोष्टी वेगवेगळ्या अनुभवांत असमान आहेत, त्या एकमेकांशी संबंधित नाहीत.

अन्वय-व्यतिरेकाच्या पद्धतीची बले आणि मर्यादा समजून घेण्यासाठी कल्पक उदाहरणे लागतात. आयझॅक आसिमोव्हच्या "दारूचे प्रकार ज्याला माहीत नाही" अशी व्यक्ती आपण कल्पितो, आणि हा व्यक्ती दारूच्या नव्या अनुभवांची काहीतरी व्यवस्था लावू बघत आहे, असे कल्पितो. ही कल्पना करणे वेडगळ नाही. काही जमातींमध्ये जालिम दारू उपलब्ध नसे, युरोपियन लोकांच्या वसाहतीनंतर दारू उपलब्ध होऊ लागली. केवळ दारूबाबत ज्ञान नसणे, म्हणजे काही तर्कविहीन असणे नव्हे. तर ही कल्पना करणे शक्य आहे आणि सयुक्तिकही आहे.

तर असो - दारूबाबत ज्ञान नसलेला व्यक्ती वर सांगितल्याप्रमाणे प्रयोग करतो : (पाण्याऐवजी मी "सोडा" वापरला आहे. कारण नुसते पाणी न-प्यालेला व्यक्ती दूर कुठल्या जमातीतही सापडणार नाही.) : सोडा+व्हीस्की, सोडा+ब्रॅन्डी, सोडा+रम, सोडा+वोडका, व सोडा+जिन. निरीक्षण - पाची लोक झिंगले. याचा अर्थ सोडा पिल्याने माणूस झिंगतो.

(अर्थात आसिमोव्हच्या उदाहरणातली चूक ही आहे, की "व्हिस्की+ब्रँडी", "व्हिस्की+रम", वगैरे जोड्या जुळवलेल्या नाहीत. त्यामुळे अन्वय-व्यतिरेकाबाबत काही निष्कर्ष अपुरे राहातात. परंतु हेसुद्धा ओळखले पाहिजे, की नवेच काही सापडले, तर प्रयोग करताना सर्वच वांछित प्रयोगांची निरीक्षणे लगेच हातात येत नाहीत. पुष्कळदा अर्धे प्रयोग झाल्यानंतर काही कामचलाऊ निष्कर्ष काढणे आवश्यक असते.)

सारांश : आसिमोव्हचे उदाहरण खेळकर असले, तरी निव्वळ विनोदी नाही. "नित्यशः येणार्‍या अनुभवाच्या विरुद्ध" उदाहरण देण्याचे कारण असे, की अन्वय-व्यतिरेकाच्या मर्यादा लगेच समजू याव्या. नाहीतर "नित्यशः येणार्‍या अनुभवापेक्षा वेगळ्या" अशा संशोधनात पुष्कळ वेळ खर्च करावा लागेल.

कारण व त्याचा प्रभाव संबंध

सदर पुस्तक माझ्या संग्रही आहे, व त्यातील उतारा स्कॅन करून पाठवणार होतो, पण ते आत्ता लगेच सापडले नाही. लवकरच पाठवीन.
उदाहरण निव्वळ विनोद नाही. the context was explaining the importance of seeking cause and effect relationship. विज्ञान व अ-विज्ञान यांच्यात एक मोठा फरक हा, कि अ-विज्ञान कारण व त्याचा प्रभाव यांच्यात संबंध प्रस्थपित करण्याला महत्व देत नाही. अमूक ग्रह अमूक स्थानी असले (याचा अर्थ जो काय असेल तो असो) कि अमूक घडते असा विश्वास लोक ठेवतात कारण अमूक ग्रहाचे अमूक स्थानी असणे व मानवी जीवनातील घटना यांच्यात cause and effect relationship काय, हे तपासण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही.

हा cause and effect relationship चा मुद्दा वाटतो तेवढा सोपा नाही. विज्ञान नेहमीच असा संबंध प्रस्थापित झाल्या नंतरच हे कारण व हा त्याचा प्रभाव असे मान्य करते, असे नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एल निनो इफेक्ट. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमे कडच्या महासागरात या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात तापमान जरा जास्त असल्याने पुढच्या जुलै मधे भारतात पाऊस कमी का होतो याचे cause and effect relationship अजून प्रस्थापित झालेले नाही, तरी आपण मान्सून प्रेडिक्शन करता एल निनो इफेक्ट वापरतो. तसेच, पॅरसेटमोल घेतल्याने ज्वर कमी का होतो याचे cause and effect relationship पण अजून प्रस्थापित झालेले नाही, तरी आपण पॅरसेटमोल ज्वर कमी करण्याचे औषध म्हणून मान्य करतो.

पाच माणसांना संत्र्याचा ज्यूस+वोडका, उसाचा रस+वोडका, टॉमेटो ज्यूस+वोडका, पाणी+वोडका, सोडा+वोडका, असे पिण्यास दिले व पाची लोक झिंगले. याचा अर्थ वोडका पिल्याने माणूस झिंगतो. हे मान्य.

पाच लोकांना व्हीस्की+पाणी, ब्रॅन्डी+पाणी, रम+पाणी, वोडका+पाणी, व जिन+पाणी असे पिण्यास दिले व पाची लोक झिंगले. पण याचा अर्थ पाणी पिल्याने माणूस झिंगतो हे मात्र अ-मान्य. हे कसे काय? तर अ‍ॅसिमोव त्या पुस्तकात निरिक्षण व निष्कर्श यांचा गुंता समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता.

 
^ वर