भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 3/3)

भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 1/3)
भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 2/3)


इलेक्ट्रॉनिक झेड् नोज

दहशतवाद्यांच्या दुष्कृत्यामुळे जनसामान्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. ठिकठिकाणी CCTV यंत्रणा बसवत आहे. एअर पोर्ट, रेल्वे स्टेशन, प्रेक्षणीय ठिकाणं, मोठमोठे हॉटेल्स इत्यादीसाठी कडक सुरक्षा यंत्रणा राबवली जात आहे. यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी दबाव वाढत आहे. परंतु सक्षम यंत्रणेसाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळ लागते व सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळही लागतो. एअरपोर्टवर चेकिंगसाठी 2-3 तास अगोदर पोचावे लागते. त्यामुळे बहुतेक जण वैतागतात. अनेकांना ही सुरक्षा यंत्रणा म्हणजे भीक नको, कुत्रा आवर असे वाटत आहे. एअरपोर्टवरच्या सुरक्षिततेसाठी लपवून ठेवलेल्या स्फोटकांचा साठा वासावरून ओळखणाऱ्या प्रशिक्षित कुत्र्यांचा ताफा बघितल्यावर प्रवासी घाबरून जातात.

यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून इलेक्ट्रॉनिक नोजची कल्पना पुढे आली. ही यंत्रणा दहशतवादी कृत्य करण्यात वापरण्यात येणाऱ्या गुप्तपणे ठेवलेल्या स्फोटकांचा अंदाज घेऊन संशयिताकडे निर्देश करू शकते. खरे पाहता ही संकल्पना फार पूर्वीची आहे. त्यावेळी याची मांडणी करणाऱ्यांना मूर्खात काढले होते हेही तितकेच सत्य आहे. अन्न पदार्थांची गुणवत्ता शोधण्यासाठी अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक नोजचा सर्रासपणे वापर केला जातो. परंतु ही य़ंत्रणा आकाराने मोठी व अत्यंत खर्चिक आहे म्हणून स्फोटकासाठी वापरता आली नाही. यासंबंधातील अनेक पेटंट्स पडून आहेत.

उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी काही निमित्त लागते. 1912 साली टायटानिक बोट बुडाल्यानंतर जहाजांच्या सुरक्षिततेसाठी उपाय सुचवणाऱ्या पेटंट्सची संख्या कमी नव्हती. हिमनगांना फोडणारी कल्पना, जहाजातून काही क्षणात बाहेर पडण्यासाठीचे चित्र विचित्र उपायांची संख्याही कमी नव्हती. 9/11च्या भीषण अपघातानंतरसुद्धा अशाच प्रकारच्या कल्पना लढवलेल्या पेटंट्सचा पाऊस पडला होता. वैमानिक असलेल्या फ्लाइट डेकपासून पॅसेंजर कॅबिनला काही सेकंदातच वेगळी करण्याची कल्पना एका पेटंटची होती!

झेड् नोज हे कॅलिफोर्निया येथील इलेक्ट्रॉनिक सेन्सार टेक्नालॉजी या कंपनीचे उत्पादन आहे. एखाद्या पदार्थाच्या वासावरून पदार्थातील रासायनिक रचनेचे विश्लेषण करणे व या विश्लेषणातून धोका ओळखून संबंधितांना जागृत करणे या ठळक गोष्टींचा यात समावेश आहे. छोट्या बॅगेत मावणारी व सेंद्रीय, जैविक वा रासायनिक पदार्थांची कमीत कमी वेळेत विश्लेषण करू शकणारी त्यांची ही यंत्रणा आहे. ही यंत्रणा 10 सेकंदात पदार्थाबद्दलची सर्व माहिती गोळा करून विश्लेषण करू शकते. या यंत्रणेत एका चिप् वर सेन्सार्स व प्रोसेसर्स बसवून संगणकाशी जोडलेले आहेत. सॉफ्टवेअरच्या सहाय्याने विश्लेषण करून स्फोटकं असल्यास धोक्याचा इशारा देण्याची सोय यात आहे. वजन कमीत कमी ठेवल्यामुळे सहजपणे कुठेही नेता येते. कार्गो वा गोडाऊनमध्ये झाकून ठेवलेल्या वा डबाबंद वस्तूंचीसुद्धा ही यंत्रणा शोध घेऊ शकते. कंपनीच्या मते या यंत्रणेत काही बदल करून क्षय वा एड्स सारख्या रुग्णांचीसुद्धा निदान करणे शक्य होणार आहे.

कंपनीने दावे केल्याप्रमाणे झेड् नोज खरोखरच काम करू शकेल की नाही हे काळच ठरवू शकेल!

अधिक माहितीसाठी


यूमी बेबी बॉटल्

जिम शेख व त्याची पत्नी फरह, मूल होण्याच्या प्रतीक्षेत होते. परंतु काही कारणामुळे पूर्ण दिवस भरायच्या आतच बाळ झाल्यामुळे पती-पत्नींना फार काळजी वाटू लागली. डॉक्टरांनी आईच्या दुधाऐवजी या प्रीटर्म बाळाला बाटलीतून दूध पाजण्याचा सल्ला दिला. मात्र दूध फार थंड किंवा गरम असता कामा नये व दुधाची उष्णता आईच्या दुधाइतकेच - म्हणजे 32 - 34 डिग्री सेल्सिअस - असावे अशी अटही घातली. फरह कायम बाळापाशी असल्यामुळे जिमलाच दूध तापवून आणण्यासाठी पळापळ करावी लागत असे. दूध तापवून आणण्यासाठी वर खाली करावे लागत असे. कितीही गरम केले तरी योग्य उष्णतेचे दूध बाळाला पाजले जात आहे की नाही याची दोघाना खात्री नव्हती. दूध जास्त गरम असल्यास थंड पाण्याखाली काही वेळ धरून दूध कोमट करावे लागत असे. तू इंजिनीअर असून काही उपयोगाचा नाहीस. आपोआपच निर्दिष्ट तापमानापर्यंत गरम होऊ शकणाऱ्या बाटलीचा शोध घेऊ शकत नाहीस. बायकोचा हा टोमणा ऐकल्यानंतर जिम खरोखरच अशा बाटलीच्या शोधाच्या मागे लागला. पुढील 4-5 वर्ष प्रोटोटाइपशी झटपट करत, काही वेळा मित्रांची मदत घेत यूमी बेबी बॉटलचा शोध लावला.

या बाटलीच्या बाहेरच्या आवरणात वार्मर असून हे वार्मर द्रव पदार्थाला घन पदार्थात बदलू शकणाऱ्या phase change पदार्थापासून बनवण्यात आलेले आहे. घनपदार्थातून उष्णता उत्पन्न होऊन बाटलीतील दूध गरम होऊ शकते. बाटलीच्या वरच्या बाजूचे बटन ऑन केल्यावर इंडीकेटर वरील एलइडीचा रंग काही वेळात बदलतो व दूध योग्य उष्णतेपर्यंत तापलेली सूचना मिळते. दूध पिऊन संपल्यानंतर यूमी बाटलीला तापलेल्या पाण्यात किंवा इलेक्ट्रॉनिक स्टीम स्टेरिलायझर मध्ये काही वेळ ठेऊन बाहेर काढल्यानंतर वार्मर पुन्हा एकदा वापरण्यास तयार होते. अशा प्रकारे ही बाटली 100 वेळा तरी वापरता येऊ शकते.

जिम शेखच्या या तंत्रज्ञानाला 2008 साली लंडन टेक्नालॉजी फंड यांचे डिझाइन व इंजिनियरिंगचे पारितोषक मिळाले आहे.

अधिक माहितीसाठी


सेगवे ट्रान्सपोर्टर

डेका प्रॉडक्ट्स या कंपनीचा डीन कार्मेन काम करता करताच शिकून तयार झालेला डिझायनर होता. त्याच्याकडे कुठलीही पदवी नव्हती. पोर्टेबल डायलॅसिस मशीन, ड्रग् डिफ्युजन पंप च्या विकासकामात याचा मोठा सहभाग होता. याचीच कंपनी जिना चढू शकणाऱ्या सहा चाकी व्हीलचेअर्सचे उत्पादन करत होती. त्याच व्हीलचेअर्सवरून पर्यावरण पोषक दोन चाकी ट्रान्सपोर्टरची कल्पना त्याला सुचली. कंपनीतील इंजिनीयर्सची टीम या प्रकल्पावर काम करू लागली. ऍपलचे स्टीव्ह जॉब्स व अमेझॉनचे जेफ बेझोज या उद्योजकांनी ही कल्पना उचलून धरली. कार्मेनच्या मते या शतकाचे हे महत्वाचे वाहन ठरणार होते.

सेगवे स्कूटरमध्ये (सेगवेला स्कूटर असे म्हणणे कार्मेनला अजिबात आवडत नव्हते!) लहान मुलांच्या सायकलीत असलेल्या चाकासारखे दोन चाकं असून या चाकांच्या मधल्याजागेत उभे राहण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्मवर उभे राहून हँडलचे नियंत्रण करत स्कूटरला वेगाने पळवता येते. या ट्रान्सपोर्टरच्या पेटंटमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे यात दहा मायक्रोप्रोसेसर्स, कित्येक गायरोस्कोप्स, बॅटरी, मायक्रोचिप्स, इत्यादींचा समावेश आहे. ही स्कूटर ताशी 20 किमी वेगाने धावू शकते. शरीर ताठ ठेऊन गाडी चालवताना शरीर थोडेसे मागे पुढे केल्यास वेग नियंत्रित करता येते. पेटंटधारकाच्या मते ही गाडी माणसाच्या हालचालींची हुबेहूब नक्कल करू शकते व त्यासाठी गायरोस्कोप्स कानासारखे, यातील कॉम्प्युटर मानवी मेंदूसारखे व चाकं पायासारखे काम करू शकतात.

अशा प्रकारचे वाहन भर रस्त्यावर आणण्यासाठी भरपूर अडथळे आहेत. वेग कमी असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. पादचारी मार्गावर चालविण्यास अनुमती दिल्यास पादचार्‍यांना अडथळा येऊ शकतो. याच्यासाठी स्वतंत्र ट्रॅक फार खर्चिक होणार. या सगळ्या अडचणीमुळे या ट्रान्सपोर्टरचा वापर एअरपोर्ट, मिलिटरी डेपो, इत्यादी प्रकारच्या बंदिस्त जागेतील टेहळणीसाठी सुरक्षा ऱक्षक वापरत आहेत. गोल्फ क्लबच्या मैदानावरील वाहकासाठी हे ट्रान्सपोर्टर वरदान ठरत आहे.

अधिक माहितीसाठी
१. २.

 
^ वर