सुरकोटला अश्व भाग 3

(मागील भागावरून पुढे)
भारतीय उपखंडावर, इतिहासपूर्व कालामध्ये झालेल्या आर्यांच्या तथाकथित आक्रमणाचा सिद्धांत अशा रितीने मोडीत निघाल्याने, 2 सहस्त्रके अस्तित्वात असलेली सिंधू-सरस्वती संस्कृती यानंतर अचानक विलयास कशी गेली? या कोड्याचे उत्तर आता आतापर्यंत पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि इतिहासकार यांना मिळत नव्हते. Woods Hole Oceanographic Institution (WHOI) या संस्थेच्या विद्यमाने व लिव्हिउ जिओसान (Liviu Giosan) या भूगर्भशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली 5 वर्षे कालावधीसाठी चाललेला एक विस्तृत अभ्यास या आंतर्राष्ट्रीय अभ्यासगटाने नुकताच पूर्ण केला. या अभ्यासाच्या अहवालात, या कोड्याचे उत्तर आता मिळाले असल्याचा दावा केला गेलेला आहे. या अभ्यासगटाची निरीक्षणे व निष्कर्ष याबद्दल माहिती एका निराळ्या लेखात मी दिली आहे व रुची असणारे वाचक हा लेख बघू शकतील. परंतु आपल्या सध्याच्या विषयाची सुसूत्रता रहावी म्हणून या अहवालातील काही मुख्य निरीक्षणे मी येथे परत देत आहे.

सिंधू-सरस्वती नद्यांच्या खोर्‍यात ही विशाल मानव संस्कृती स्थिर होण्याच्या सुमारे 10000 आधीच्या वर्षांत, बेफाम व अफाट रितीने वाहणारी सिंधू व तिच्या उपनद्या, यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात, सुपीक मातीचा गाळ, नदीकाठ व या नद्यांमधल्या प्रदेशात आणून भरला होता. लिव्हिउ जिओसान यांच्या पथकाला या सपाट प्रदेशात 10-20 मीटर उंच, 100 किमी रूंद आणि सिंधू नदीच्या प्रवाहाला समांतर अशा रितीने 1000 किमी लांबवर पसरलेल्या एका महा-टेकडीचा शोध लागला. या टेकडीला सिंधू महा-टेकडी (Indus mega-ridge) असे नाव या पथकाने दिले. हे नाव देण्याचे कारण म्हणजे ही टेकडी, सिंधू नदीने वरून वाहत आणलेला सुपीक गाळ खालच्या संपूर्ण नदीकाठच्या प्रदेशात आणून पसरवून निर्माण केली होती. आतापर्यंत सिंधू खोर्‍यात सापडलेल्या सर्व हडप्पा कालीन वसाहती या महा-टेकडीच्या खाली गाडल्या गेलेल्या नसून ही टेकडी प्रत्यक्षात या उत्खनन केलेल्या वसाहतींच्या खाली सापडते आहे. यावरून असे म्हणता येते की सिंधू खोर्‍यातील मानव संस्कृती ही या गाळाच्या महा-टेकडीच्या खाली नसून पृष्ठभागावर वसली होती.

सिंधू- सरस्वती खोर्‍यातील नद्यांना महापूर आणणारा मॉन्सूनचा पाऊस याच काळात हळू हळू कमी होऊ लागला. हा कमी होणारा पाऊस आणि त्यामुळे हिमालय आणि इतर पर्वतांच्या उतारावरून वाहत येणार्‍या पाण्याचे कमी प्रमाण यामुळे या नद्यांच्या काठांवर शेती करणे शक्य झाले. शेतीच्या या शक्यतेमुळे या भागात मानवी वसाहती हळू हळू वाढू लागल्या. कमी होत राहिलेल्या पावसाच्या प्रमाणाने सुमारे 2 सहस्त्र वर्षांचे एक काल-गवाक्ष (window of opportunity) हडप्पा संस्कृतीवासियांना एखाद्या सुवर्ण संधीसारखे उपलब्ध झाले.( a window of about 2000 years in which Harappans took advantage of the opportunity) व त्याचा भरपूर फायदा या संस्कृतीने घेतला व ही विशाल संस्कृती सिंधू-सरस्वती आणि त्यांच्या उपनद्या या नदी खोर्‍यांच्यात विकसित झाली. ही संस्कृती भरपूर पाणी व उत्तम हवामान यांच्यामुळे दरवर्षी हातात येणार्‍या अमाप अन्नधान्याच्या उत्पन्नावर अवलंबून होती. शेती व नंतर धान्याचा व्यापार यासाठी खूप मोठ्या संख्येने श्रमिकांची आवश्यकता असल्याने जेथे असे श्रमिक मोठ्या संख्येने एकाच स्थानी उपलब्ध होऊ शकतील अशी मोहेंजो-दाडो किंवा हडप्पा सारखी महानगरे या संस्कृतीमध्ये विकसित झाली.

पुढे हा मॉन्सूनच्या पावसाचे प्रमाण आणखी आणखी कमी होऊ लागले व 2000 वर्षाचे हे काल-गवाक्ष हळूहळू बंद होण्याच्या मार्गाला लागले. पूर्वी जेथे उदंड पाणी उपलब्ध होते तेथे आता फक्त मरूभूमी दिसू लागल्या. पावसाच्या कमी प्रमाणाने पूर्वी अमाप येणारी पिके आता रोडावू लागली व महानगरातील श्रमिकांना कामधंदा मिळणे दुरापास्त होऊ लागले. या सर्व कारणांमुळे उत्तरेकडे विकसित झालेल्या सिंधू खोर्‍यातील रहिवासी इ.स.पूर्व 1500 च्या आसपास, जेथे मॉन्सूनचा पाऊस अजूनही स्थिर प्रमाणात पडत होता अशा गंगा खोर्‍याकडे सरकू लागले. या भागातील मॉन्सूनचा पाऊस जरी स्थिर स्वरूपाचा असला तरी पावसावर अवलंबून असलेली शेती व नद्यानाल्यातील उपलब्ध पाणी हे फक्त छोट्या स्वरूपातील शेतीसाठीच उपयुक्त होते. या कारणामुळे सिंधू खोर्‍यातील मोठ्या शहरांसारखी शहरे गंगा खोर्‍यात निर्माण न होता, मर्यादित स्वरूपाच्या शेतीच्या आधारावर टिकू शकतील अशा लहान नगर राज्यांची अर्थव्यवस्था (City States) येथे स्थापली गेली. मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या. आणि स्थलांतरित जनसंख्या लहान लहान गावात विखुरली गेली.

या अभ्यासात आणखी एका गूढाचा उलगडा करता आला आहे असे हा अहवाल म्हणतो. ते गूढ म्हणजे सरस्वती नदी अदृष्य होण्यामागचे कारण. सरस्वती नदी म्हणजे सध्याची घग्गर नदी असेही हा अहवाल म्हणतो. घग्गर-हाकरा नदीच्या खोर्‍यात, हडप्पा कालात अतिशय दाट स्वरूपात वस्ती असल्याचे पुरावे या भागात केलेल्या उत्खननात आढळून आलेले आहेत. नदीच्या काठावर असलेले गाळाचे थर व नदी खोर्‍यातील भूपृष्ठभाग रचना या स्वरूपाच्या व या अभ्यासातून प्राप्त झालेल्या भूशास्त्रीय पुराव्याप्रमाणे या नदीचे पात्र खरोखरच विशाल व मुबलक पाणी असलेले होते असे दिसते. परंतु या कालात सुद्धा या नदीला असलेले मुबलक पाणी हे सध्याप्रमाणेच पण केवळ त्या काळात पडणार्‍या सशक्त मॉन्सूनच्या पावसामुळेच होते. या नदीला हडप्पा कालात सुद्धा हिमालयातून पाणी उपलब्ध होत नव्हते. त्याचप्रमाणे या नदीच्या जवळून वाहणार्‍या सतलज किंवा यमुना नद्यांमध्ये जे पाणी हिमालयातून येत होते ते या नदीच्या पात्रात वहात आल्याचा काहीच पुरावा मिळत नाही. या नदीला बारमाही पाणी असले तरी ते त्या काळातील सशक्त मॉन्सूनचेच होते.

मात्र काही भारतीय शास्त्रज्ञ हा दृष्टीकोन अमान्य करतात त्यांच्या मताने सरस्वती नदीला मॉन्सूनच्या पावसाशिवाय, यमुना व सतलज या नद्यांचे पाणीही येऊन या काळात मिळत असे. मात्र पुढे भूगर्भातील हालचालींमुळे हे पाणी सरस्वती नदीत येऊन मिळणे बंद झाले झाले. वार्‍यामुळे सतत उडणार्‍या धुळीने हे कोरडे पात्र हळूहळू भरत गेले व सरस्वती नदी अदृष्य झाली. (शंकरन ए व्ही, 1999; रॉय व जाखर, 2001) अर्थात यापैकी कोणतीही कारण मीमांसा मान्य केली तरी अमाप पाणी कच्छ्च्या रणात वाहून नेणारी ही विशाल नदी याच सुमारास मृत झाली याच निष्कर्षाप्रत आपण शेवटी येतो.

सिंधू सरस्वती संस्कृतीमधील दक्षिणेला असलेल्या धोलाविरा सारख्या महानगरांवर मॉन्सूनच्या पावसाच्या कमी होत चाललेल्या प्रमाणाचा थोडाफार परिणाम झाला असला तरी त्यांच्यावर मुख्य आघात सरस्वती नदी लुप्त होण्याचा झाला असे मला वाटते. कच्छ्च्या रणात भरले जाणारे सरस्वती नदीचे पाणी कमी होत गेल्याने तेथून होणारी जहाजांची ये जा बंद झाली व येथून मेसापोटेमिया आणि उत्तरेला असलेल्या कालीबंगा यासारख्या शहरांकडे सरस्वती नदीमधून होणारी मालवाहतूक संपुष्टातच आली. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या शोधाप्रमाणे याच सुमारास एक जबरदस्त भूकंप कच्छ मध्ये झाला व रणाचा सर्व भूगोलच बदलून गेला. एकेकाळी अत्यंत सुपीक असलेला हा भाग आता वाळवंटाचा आणि दलदलीचा प्रदेश बनला. जिओसान यांच्या अहवालाप्रमाणे या भागातील रहिवासी हळूहळू, जेथे वास्तव्य करण्यास जास्त अनुकूल परिस्थिती होती त्या दक्षिणेकडे (गुजरात व महाराष्ट्र) आणि पूर्वेला (राजस्थान) कडे सरकू लागले.

काही शास्त्रज्ञांच्या मताने, सरस्वती नदी, कच्छच्या रणात सध्याच्या पाकिस्तान मधील बादिन शहराजवळ आपले पाणी आणून टाकत असे. हे पाणी व या नदीच्या थोड्या पश्चिमेला असलेल्या सिंधू नदीच्या प्रवाहाचे पाणी हे ‘कोरी‘ नदीच्या खाडीमधून अरबी समुद्राला मिळत असावे. हे असे जर असले तर कच्छच्या रणाच्या जागी त्या वेळेस केवढा मोठा जलाशय अस्तित्वात असला पाहिजे व त्याच्या काठावर असलेल्या धोलाविरा किंवा सुरकोटला सारख्या वसाहती केवढ्या समृद्ध असल्या पाहिजेत याची सहज कल्पना करता येते.

2 वर्षांपूर्वी नवी दिल्ली येथे असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देण्याचा मला योग आला होता. या संग्रहालयात सिंधू-सरस्वती संस्कृतीमधील शहरे व वसाहती जेथे होती, त्या स्थांनावर उत्खनन केल्यानंतर मिळालेल्या अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. यापैकी बैलगाडीचा आराखडा, स्वैपाकघरातील भांडी, पाटा-वरवंटा, मुलांची खेळणी या सारख्या अनेक वस्तूंचे साम्य अगदी 50 वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय समाजात नित्य वापरात असलेल्या वस्तूंशी कमालीच्या प्रमाणात जुळते आहे हे बघून मला सिंधू-सरस्वती संस्कृतीचे नाते भारतीय समाजाशी अजूनही जुळलेले आहे याची खात्री पटली होती.

भारतीय पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संचालक, श्री. ब्रज बासी लाल यांनी 2002या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात NCERT या संस्थेच्या विद्यमाने भोपाळ येथे दिलेल्या एका भाषणात हडप्पा संस्कृतीबद्दल आणि ही संस्कृती व सध्याची भारतीय संस्कृती यातील साम्यस्थळे या बद्दल मोठे मार्मिक विवेचन केले होते. त्या भाषणातील काही भाग मी खाली देत आहे.

” भारतीय संस्कृतीच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी त्यावर उमटलेला हडप्पा संस्कृतीचा प्रभाव अजूनही स्पष्टपणे दिसून येतो. या प्रभावाची काही उदाहरणे म्हणून शेती, स्वैपाक, वैयक्तिक प्रसाधन, अलंकार, मुलांची खेळणी, मोठ्यांचे बैठे खेळ, नदी किंवा रस्ता मार्गे होणारे दळणवळण, लोककथा, धार्मिक विचार आणि आचार यांचा उल्लेख करता येईल. या प्रभावाची काही प्रत्यक्ष उदाहरणे मी (श्री.लाल) खाली देत आहे.

सध्याच्या उत्तर राजस्थान मध्ये शेतांची नांगरणी करताना उभ्या आडव्या रेषांमधील घळी जशा शेतकरी तयार करतात बरोबर तशाच घळी असलेले इ.स.पूर्व 2800 मधील एक शेत कालीबंगा येथील उत्खननात सापडले आहे.

हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश यात मोहरीचे पीक घेताना या नांगरलेल्या घळी दूर अंतरावर पाडण्यात येतात तर हरबर्‍याचे (छोले) पीक घेताना या घळी जवळ जवळ पाडल्या जातात. हडप्पा कालात हीच पद्धत अवलंबली जात होती याचा स्पष्ट पुरावा आम्हाला मिळाला आहे.

सध्या पूजले जाणारे शिवलिंग व त्याच्या खाली असलेला योनीचा भाग यांसारखेच बरोबर दिसणारे लिंग कालीबंगा येथे मिलाले आहे.

बाणावली, राखीगंगा व लोथल येथे अग्निकुंडा सारखी दिसणारी बांधकामे सापडली आहेत.

भाजलेल्या मातीतून बनवलेल्या प्रतिकृतींमध्ये, योगासने करणार्‍या व्यक्ती, कपाळावर लाल टिळा, काळ्या रंगाच्या केसात पाडलेल्या भांगात लाल शेंदूर व अंगावर पिवळ्या रंगात सोन्याचे दागिने रंगवलेल्या स्त्रिया आणि हात जोडून नमस्ते पद्धतीचे अभिवादन करणार्‍या प्रतिकृती आश्चर्यजनक आहेत. ”

श्री लाल यांच्या भाषणातील इतर भाग आतापर्यंतच्या आपल्या सर्वसाधारण समजुतींना मोठ्या प्रमाणात धक्का देणारा असल्याने त्याचा विचार तज्ञांनीच करणे जास्त योग्य ठरेल. मात्र आपण यातून एवढेच तात्पर्य उचलायचे की हडप्पा संस्कृती ही नष्ट झाली किंवा विलयास गेली हा तर्क योग्य नसून कदाचित या संस्कृतीतूनच नवी वैदिक संस्कृती उदयास आली असे म्हणणे जास्त योग्य ठरावे.

सिंधू संस्कृतीमधील दक्षिणेकडच्या वसाहतीतील मानव, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र याकडे सरकू लागले असा उल्लेख मी वर केला आहे. परंतु याला काही पुरावा आहे का असा प्रश्न साहजिकपणे समोर येतो. मात्र मात्र असा पुरावा पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या श्री. सांकलिया, श्री ढवळीकर वगैरे शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रातील, प्रवरा आणि घोड नद्यांच्या खोर्‍यात केलेल्या उत्खननात निर्विवाद्पणे आढळून आला आहे. पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या परिभाषेत इ.स.पूर्व 1700 ते 1400 या कालखंडातील ब्रॉन्झ युगातील संस्कृतीला मालवा संस्कृती असे म्हटले जाते. ही मालवा संस्कृती आणि धोलाविरा किंवा सुरकोटला येथील संस्कृती, यात कमालीची साम्यस्थळे आढळून येतात. प्रवरा खोर्‍याच्या दक्षिणेकडे घोड नदीच्या काठावर असलेल्या इनामगाव येथील उत्खननात इ.स.पूर्व 1700 ते 800 या प्रदीर्घ कालखंडातील मानवी वसाहती सापडल्या आहेत. या कालखंडात येथे स्वत:ची खास वैशिष्ट्ये असणार्‍या तीन (मालवा, पूर्वकालीन जोरवे-1 आणि जोरवे-2) मानवी संस्कृती होऊन गेल्या असे हे शास्त्रज्ञ सांगतात. या निष्कर्षांमुळे सिंधू संस्कृतीचा अस्त झाला या म्हणण्यात फारसे हंशील नसून ही संस्कृती भारतात इतरत्र पसरत गेली असेच मान्य करावे लागते. इनामगाव उत्खननातील एक महत्त्वाची बाब म्हणजे सिंधू सरस्वती संस्कृतीतील फलधारकत्व किंवा मातृत्व यांची प्रतिमा म्हणून स्त्री मूर्तीचे केले जाणारे पूजन तसेच पुढे चालू राहिलेले दिसते. या शास्त्रज्ञांच्या मताने ही स्त्री मूर्ती बहुदा या कालात जगन्माता म्हणून पूजली जाऊ लागली असावी. याशिवाय दाइमाबाद येथे सापडलेला ब्रॉन्झ रथ व इतर प्राणी अप्रतिम आहेत.

यानंतर शेवटी आपण इ.स.पूर्व दुसर्‍या सहस्त्रकात वैदिक धर्माच्या भारतात झालेल्या प्रसाराकडे वळूया. वैदिक धर्म कोठे उदयास आला याबाबत तज्ञात बरेच मतभेद आहेत. यापैकी प्रसिद्ध इतिहास तज्ञ श्रीमती रोमिला थापर व इतर काही तज्ञांच्या मते हा धर्म उत्तर अफगाणिस्तान मधील मार्जिनिया / बॅक्ट्रिया या भागात प्रथम उदयास आला तर वर मी उल्लेख केलेले बी.बी.लाल व इतर यांच्या मताने हा धर्म भारतामध्येच सरस्वती नदीच्या खोर्‍यातच उदयास आला. हा धर्म कोठेही उदयास आलेला असला तरी हडप्पा संस्कृतीतील लिंग व फलधारकत्व किंवा मातृत्व पूजन, प्रतिमांच्या माध्यमातून करण्याची परंपरा खंडित करून ती जागा या वैदिक धर्माने इ.स.पूर्व दुसर्‍या सहस्त्रकात कशी घेतली हे आपल्यासमोरचे मूळ कोडे आहे.

या कोड्याचे उत्तर शोधण्यासाठी इ.स.पूर्व पहिल्या सहस्त्रकाच्या अखेरीस, चीन, कोरिया, जपान, थायलंड आणि कंबोडिया या सारख्या भारतापासून अतिशय दूर असलेल्या एशिया खंडातील अनेक राष्ट्रांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार कसा झाला याचा विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते. इ.स.पूर्व 300 नंतर, सम्राट अशोकाने या ठिकाणी पाठवलेल्या बौद्ध भिख्खूंच्या माध्यमातून, या देशांनी हा धर्म स्वीकारला होता. या भिख्खूंनी कोणावरही सक्ती किंवा कसलीही लालूच न दाखवता धर्मप्रसाराचे हे कार्य पार पाडले होते. माझ्या मताने याच पद्धतीने भारतीय उपखंडात ही संपूर्ण नवीन विचारधारा असलेला वैदिक धर्म, प्रथम त्या काळात सगळीकडे पसरलेल्या छोट्या छोट्या नगरराज्यांच्या राजांनी स्वीकारला असावा व यथा राजा तथा प्रजा या न्यायाने त्याचा प्रसार झाला असावा.

परंतु हा नवीन धर्म स्वीकारल्यावरही सिंधू संस्कृतीतील लिंग पूजा व फलधारकत्व पूजन या दोन्ही गोष्टी समाजात चालूच राहिल्या. वैदिक धर्मातील रुद्र या पंचमहाभूतांशी संबंधित नसलेल्या देवाबरोबर लिंगपूजन जोडले गेले तर फललधारकत्व किंवा मातृत्व पूजन हे जगन्माता किंवा दुर्गा पूजन या नावाने ओळखले जाऊ लागले. वर उल्लेख केलेल्या इनामगाव उत्खननात सापडलेल्या जगन्मातेच्या प्रतिमा या तर्काला पुष्टी देतात असे मला वाटते.

2011/ 12 या वर्षी भारतातील कौन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेने भारतीय उपखंडामध्ये झालेले आधुनिक मानवांचे स्थलांतर या विषयामध्ये केलेल्या जनुकांच्या अभ्यासावर आधारित असलेल्या एका संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासाप्रमाणे भारतात झालेली स्थलांतरे मध्य एशिया, मलेशिया आणि अंदमान बेटे या 3 स्थानांवरून झालेली असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे अशी पूर्ण शक्यता वाटते की सिंधू-सरस्वती संस्कृतीमधील मानव हे मुळात मध्य एशिया मधून येथे आले असावेत. सिंधू-सरस्वती खोर्‍यांत ते 2 ते 3 सहस्त्रके राहिले असावेत व नंतर तेथे राहणे कठीण बनल्यावर पूर्वेकडे व दक्षिणेकडे त्यांनी प्रयाण केले असावे. इनामगाव उत्खननामुळे या तर्काला चांगलीच पुष्टी मिळते असे मला तरी वाटते.

थोडक्यात सांगायचे तर सिंधू-सरस्वती संस्कृतीवर कधीच आर्यांचे आक्रमण झाले नाही आणि ती कधीच लयास गेली नाही. भारतीय संस्कृती या नात्याने ती अजूनही जोमाने टिकून आहे नव्हे तर वृद्धिंगतही होते आहे.

(समाप्त)

या लेखासोबत असलेली छायाचित्रे पहाण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

हाही भाग उत्तम. अतिशय रोचक +माहितीपूर्ण मालिकेबद्दल चंद्रशेखर ह्यांचे अनेक आभार.

उत्तम

अतिशय उत्तम आणि माहितीने भरलेली मालिका. बर्‍याच कोडयांची उत्तरे ह्या मार्गाने मिळू शकतील.

वाचत आहे.

माहितीपूर्ण मालिकेबद्दल एक वाचक म्हणून मानावेत तितके आभार कमीच.
घग्गर चंदिगडजवळ जी आहे ती इतर उत्तर बहरतीय नद्यांच्या मानाने इवलिशी आहे हे खरेच.
सरस्वती बद्दल बरेच उलटसुलट ऐकण्यास येते. मागे कुणीतरी उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रातून राजस्थानातून गुजरातेत जाणारा, आता कोरडा पडलेला (की जमिनीत गेलेला ?) प्रवाह शोधून काढला होता. त्याचे पुनरुज्जीवन(कसे ते ठाउक नाही) करण्याचा केंद्र प्रशासन विचार करीत होते असे ऐकले आहे.

मस्त

हा भाग पण उत्तम. फारच माहितीपुर्ण लेखमाला. पुढची लेखमाला कधी सुरु होतेय याची वाट पाहतोय.

दोन शंका

अनेक लेखमालिकांप्रमाणे हीही मालिका आवडलीच.
मी काही इतिहासतज्ञ नाही, वाचनही फारसे नाही, पण एका सर्वसामान्य वकूबाच्या व्यक्तीसच येतील अशा दोन शंका मला पडल्या आहेत.
१)सरस्वती आणि तिच्या उपनद्या ह्या हिमपोषित नव्हत्या, ऋतुपर्जन्यपोषित होत्या आणि या भागात ऋतुपर्जन्याचे प्रमाण पुष्कळ होते हे संशोधनामधले एक गृहीतक स्वीकारले तर या खोर्‍यापासून फार दूर नसलेल्या यमुना गंगा खोर्‍यात मात्र ते प्रमाण स्थिर राहिले आणि केवळ सरस्वती खोर्‍यात ते कमी झाले हे कसे? अर्थात याला ऋतुपर्जन्याचा भौगोलिक अनियमितपणा (सर्वत्र समान वृष्टी न होणे) हे उत्तर असू शकते, पण इतकी तफावत असेल असे वाटत नाही. आपल्या महाराष्ट्रात सह्याद्रीमुळे ढग अडवले जाऊन कोंकणात अतिवृष्टी तर तिथून पूर्वेकडे शंभर मैलांवर अवर्षण होते खरे, पण अशी ढग अडवणारी कोणतीही पूर्वपश्चिम व्यवस्था या भागात नाही. शिवालिक मालिका खूप उत्तरेला आहे.
(२) या भागातील मॉन्सूनचा पाऊस जरी स्थिर स्वरूपाचा असला तरी पावसावर अवलंबून असलेली शेती व नद्यानाल्यातील उपलब्ध पाणी हे फक्त छोट्या स्वरूपातील शेतीसाठीच उपयुक्त होते असे का? जर इथल्या नद्या पर्जन्याच्या साथीने हिमपोषितही होत्या, तर इथल्या मुबलक पाण्यावर छोट्या प्रमाणातच शेती का होऊ शकली? मुबलक पाणी व उत्तम हवामान यांच्या जोरावर अन्नधान्याचे अमाप उत्पादन येथे का होऊ शकले नाही आणि या सुबत्तेमुळे शेती व धान्याचा व्यापार वाढून इथे मजूरांची वगैरे स्थलांतरे आणि त्या द्वारे (हडप्पा संस्कृतीप्रमाणे) मोठ्या शहरांची निर्मिती का होऊ शकली नाही?

तफावत

मध्यंतरी लोकसत्ते मध्ये एक लेख आला होता. त्यात मराठवाड्यात जिथे आत्ता पर्जन्याछायेचा भाग आहे तिथे उत्खननात तांबडी माती सापडली. तांबडी माती कोकणात जशी भरपूर पाऊस पडतो तशी सापडली. ह्याचा अर्थ ह्या भागांमध्ये खूप पूर्वी भरपूर पाऊस पडत असणार. त्यामुळे अशी तफावत असणे स्वाभाविक असावे.

तांबडी माती

कोंकणातल्या मातीचा तांबडा रंग हा त्या मातीत असलेल्या लोहखनिजामुळे आला आहे असे म्हणतात. लोह आणि मँगनीझ यांचे क्षार आणि भस्मे गडदरंगीत असतात. कोंकणातला जांभा दगड हा लालच असतो आणि झिजून त्याचा मुरुम आणि पुढे माती होते तीही लाल असते. ह्याचे भूवैज्ञानिक कारण मात्र ठामपणे असे माहीत नाही. आसाम बंगालात पुष्कळ पाऊस पडतो. तिथली मातीही लाल आहे किंवा कसे या विषयी कुणास काही ठाऊक आहे का?
अर्थात पाऊसप्रमाण कालौघात बदलले आहे हे खरेच. ठाणे जिल्ह्याच्या ( म्हणजे सध्याच्या मुंबईचा बहुतेक भाग) जुन्या गॅझेटिअर मध्ये या भागातले पावसाचे प्रमाण शंभर इंच असून येथे हिवाळी पाऊसही पडतो अशी नोंद मी वाचलेली आहे.
माझी मूळ शंका अशी होती की काळाच्या एकाच तुकड्यात नजीकच्या प्रदेशात अशी तफावत का पडावी.

शंका

राही यांच्या शंका रास्तच आहेत.परंतु त्यांचे निरसन करण्यासाठी असा खुलासा करता येऊ शकेल.

1. गंगा खोर्‍यात जरी पर्जन्य प्रमाण कमी झाले असले तरी ती नदी हिमालयात उगम पावत असल्याने तिला बारा महिने पाणी राहिले. याच कारणासाठी सिंधू खोर्‍यातही वस्ती राहिलीच मात्र तिचे स्वरूप छोट्या नगर राज्यात झाले. सरस्वती नदीला फक्त मॉन्सूनचे पाणी मिळत असल्याने, महाराष्ट्रातील नद्यांप्रमाणे पाऊस संपला की तिचे स्वरूप छोटे असणार व पर्जन्यमान एकूणच कमी झाल्याने ही नदी आटली व सध्याची घग्गर नदी आहे त्या स्वरूपात शिल्लक राहिली.
2. गंगा खोर्‍यात पाऊस असला तरी भरपूर जंगले व त्यात अदिवासी राज्ये होती. मोठ्या प्रमाणात शेती करण्यासाठी मोकळ्या नदीकाठच्या जागा उपलब्ध नसाव्यात त्यामुळे छोटी नगर राज्ये स्थापन केली गेली असावीत.

छान!

उत्तम!
असाही एक प्रतिवाद ऐकला आहे की मोहंजोदडो, हडप्पा वगैरे या भागातील भूगर्भीय बदलांमुळे तेथील "रेडीयोअ‍ॅक्टिव्हीटी" काही कारणाने इतकी वाढली की तेथे रहाणे अशक्य झाले आणि शहर सोडणे भाग पडले. याबद्दल काही माहिती आहे का? का केवळ कल्पना आहेत?

दुसरे असे की ही शहरे अचानक बंद पडलेली वाटतात असे म्हणतात. कारण गाडल्या गेलेल्या शहरातील अनेक गोष्टी गाडल्या जाण्यापूर्वी वापरात होत्या व सुस्थितीत होत्या. कोणतेतरी बाह्य आक्रमण किंवा नैसर्गिक आपत्तीत असे होऊ शकते. मात्र वरील उदाहरणात तेथील जनता हळू हळू स्थित्यंतर करत असेल व ही शहरे हळू हळू ओस पडली असतील तर तेथील वास्तु, गटारे वगैरे सुस्थितीत कशी राहिली असतील? स्थलांतर करताना स्वयंपाकघरातील वापरत्या व वाहून नेण्यास सोप्या अश्या वस्तु, खेळणी वगैरे तिथेच का सोडली गेली असतील? याविषयी सुद्धा वाचायला आवडेल.

शहर सोडणे

मी केलेले लेखन ज्याला स्पष्ट पुरावे म्हणता येतील अशांवर आधारित असल्याने, एकदम अणुसंत्सर्ग वाढला वगैरे अंदाज मी विचारात घेत नसल्याने मला याबद्दल काहीही सांगणे कठीण आहे.

मला मोहेंजोदाडो व हडाप्पा याबद्दल सांगता येणार नाही.परंतु भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी उत्खनन केलेल्या स्थळांवर त्यांच्या अहवालानुसार शहरे अचानक बंद पडल्याचे कोठेही आढळून आलेलेनाही. हळूहळू आर्थिक दुरावस्था किंवा भूकंप आग यासारख्या आकस्मिक कारणांनी ही स्थळे नष्ट झाल्याचे पुरावे स्पष्टपणे आढळून आलेले आहेत.

जेंव्हा एखाद्या शहरातून जनता स्थलांतर करते तेंव्हा दगडांनी बांधून काढलेल्या गटार किंवा पाणी पुरवठा चॅनेल्सना काय होणार आहे? ती आहे तशीच राहतात व हळूहळू मातीत गाडली जातात.

उत्खनन करताना शास्त्रज्ञ त्या ठिकाणातील कचरा फेकण्याच्या जागा, मसणवटी, पाणी साठवण्याच्या तलावांचे तळ येथे त्या कालच्या वस्तूंचा किंवा हाडांचा शोध घेतात.अशा वस्तू तत्कालीन घरांत किंवा रस्त्यावर पडलेल्या मिळत नाहीत.स्थलांतर करताना कोणीच अशा गोष्टी घरात सोडून जात नाही.

खेळणी, दागिने यांचे काय?

अणुसंसर्गाबद्दलही दोन थियरीज आहेत. एक अणूबॉम्बची कल्पना कल्पनाविलास म्हणून सोडून देता येते. मात्र दुसरी कल्पना अशी आहे की शहरापासून काहि अंतरावर 'अशनीपात' झाला होता. व त्यायोगे मोठा अणूविस्फोट झाला होता. ज्यामुळे शहर नष्ट होण्याऐवजी वितळून पुन्हा 'क्रिस्टलाईज' झाले.
येथे सापडलेली प्रेते जमिनीच्या आत नसून रस्त्यावर, घरात वगैरे सापडली आहेत असे सांगतात. तसेच मुख्य रस्त्यावर ४४ प्रेते काहि नैसर्गिक अवस्थेत (पोझिशन्स) मध्ये सापडल्याचे अनेकदा वाचनात येते. (या ४४ प्रेतांच्या हाडांमध्ये रेडीयोअ‍ॅक्टीव तत्त्वे सापडल्याचाही दावा काही ठिकाणी केला जातो)

असो.

जेंव्हा एखाद्या शहरातून जनता स्थलांतर करते तेंव्हा दगडांनी बांधून काढलेल्या गटार किंवा पाणी पुरवठा चॅनेल्सना काय होणार आहे? ती आहे तशीच राहतात व हळूहळू मातीत गाडली जातात.

सहमत आहे.
मात्र स्वयंपाकघरातील भांडी, खेळणी, मुर्ती आणि सोन्याचे दागिने वगैरे शहर सोडताना कोणी सोडून जाईल असे वाटत नाही.

सोडलेल्या वस्तू

यासाठी धोलाविराचे एक उदाहरण मी प्रातिनिघिक म्हणून देतो. येथे सापडलेले सोन्याचे दागिने किल्ल्यात असलेल्या विहिरीच्या तळाशी असलेल्या गाळात सापडलेले आहेत. मातृदेवतेच्या मूर्ती सांडपाण्याच्या गटाराच्या एका कोपर्‍यात मिळालेल्या आहेत. भांडी तलावांच्या तळाशी मिळालेली आहेत. याबद्दल आपल्याला जास्त वाचन करायचे असले तर पुरातत्त्व विभाग दर वर्षी प्रसिद्ध करत असलेल्या 'इंडियन आर्किऑलजी' या प्रकाशनामध्ये यासगळ्या गोष्टी कुठे सापडल्या याचे स्पष्ट उल्लेख केलेले आहेत ते बघता येतील. आपल्याला काय वाटते याच्या पेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे बघणे जास्त महत्त्वाचे ठरावे. हे प्रकाशन जालावर उपलब्द्ध असून उतरवून घेता येते.

आभार!

आभार! ही माहिती अन्यत्र मिळाली नव्हती.

आपल्याला काय वाटते याच्या पेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे बघणे जास्त महत्त्वाचे ठरावे.

सहमत आहे.
याच उद्देशाने तुमच्या लेखावर प्रतिसाद देऊन प्रश्न विचारले होते. सार्थक झाले. :)

गम्मत

भूगर्भीय बदलांमुळे तेथील "रेडीयोअ‍ॅक्टिव्हीटी" काही कारणाने इतकी वाढली की तेथे रहाणे अशक्य झाले

या बद्दल कोणी खुलासा करु शकेल का? हे वाचुन गम्मत वाटली. कि रेडीयोअ‍ॅक्टिव्हीटीने उष्णता वाढली मग उष्णतेने सरस्वती नदीच्या पाण्याचे अचानक बाष्पीभवन झाले आणि ती गायब झाली. कल्पनाविलास म्हणून पटण्यासारखे आहे ना?
जर हे ग्राह्य मानले तर रेडीयोअ‍ॅक्टिव्हीटीने काही झाले हे तपासणे जास्त सोपे नाही का?

राहून गेला होता वाचायचा

हा भाग वाचायचा राहून गेला होता. आज वाचला. आवडला हे वेगळ्याने सांगायला नको. अतिशय माहितीपूर्ण.

 
^ वर