सिंधू संस्कृतीच्या र्‍हासामागचे कोडे

भारतीय द्वीपकल्पामध्ये कधी काळी अस्तित्वात असणार्‍या व सर्वात पुरातन असलेल्या सिंधू संस्कृतीचा शोध 1920च्या दशकात प्रथम लागला. त्या काळापासून ते आजपर्यंत, सिंधू नदीच्या खोर्‍यामध्ये आणि पंजाब मधील सिंधू नदीच्या उपनद्यांच्या खोर्‍यांमध्ये, अगदी समुद्र तटापासून ते हिमालयाच्या पायथ्यापर्यंतच्या प्रदेशापर्यंत, विपुल प्रमाणात उत्खनन व या संस्कृतीबद्दल संशोधन केले गेलेले आहे. या संशोधनाचे फलद्रूप म्हणून आता सर्वसाधारणपणे असे मानले जाते की सिंधू नदीच्या खोर्‍यामध्ये व सध्याच्या पाकिस्तान मधील मेहरगढ या गावाजवळ खेडेगाव या स्वरूपातली मानवी नागरी वस्ती सर्वप्रथम इ.स.पूर्व 4500-5000 या कालात वसवली गेली. या मानवी वसाहतींचे मोहोंजोडारो किंवा हडाप्पा सारख्या मोठ्या शहरांच्यात इ.स.पूर्व 3900 च्या सुमारास रूपांतर झाले व ही शहरी वस्ती इ.स.पूर्व 1500 या कालापर्यंत तरी अस्तित्वात होती.

सिंधू संस्कृतीचा काल व स्वरूप यासंबंधी जरी एकवाक्यता असली तरी ऐन बहरात असलेल्या या संस्कृतीचा एकाएकी व अचानक र्‍हास का व कसा झाला? या कोड्याचे समाधानकारक उत्तर आजपर्यंत तरी कोणालाही देता आलेले नाही. मागच्या 80किंवा 90वर्षांत हे उत्तर देण्यासाठी आर्यांचे आक्रमण,मोठ्या प्रमाणातील भूकंप किंवा नदीपात्रातील मोठ्या प्रमाणातील फेरफार यासारखी कारणे दिली गेली. मात्र शास्त्रीय संशोधनाच्या मानकावर यापैकी कोणतेही कारण टिकू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे.
वैदिक संस्कृतीचे मूळ आधार असलेल्या धर्मग्रंथांत, गंगा नदीच्या पश्चिमेला असलेल्या भारतीय द्वीपकल्पाच्या भूभागाचे सप्तसिंधू प्रदेश म्हणून वर्णन केले गेलेले आहे. या सात नद्यांपैकी सिंधू व तिच्या 5उपनद्या यांची सहज ओळख पटवता येते. वेदात, सरस्वती या नावाने व विशालता आणि सौंदर्य या दृष्टीकोनातून सर्वश्रेष्ठ नदी असा उल्लेख केली गेलेली, 7वी नदी मात्र ज्ञात इतिहास कालखंडात कधीच सापडलेली नाही. धर्मग्रंथातील उल्लेखाप्रमाणे ही नदी हिमालयातील हिमनदापासून उगम होत असून तिचे जल, पर्वत ते समुद्र किनारा या संपूर्ण प्रवासात अतिशय शुद्ध असल्याचे मानले जाते. पंजाबमधील हाकरा खोर्‍यात वाहणारी घग्गर नदी ही धर्मग्रंथातील सरस्वती नदी बहुदा असावी असे आता अनेक तज्ञ मानतात. मात्र या घग्गर नदीला कोणत्याही हिमनदाकडून जल पुरवठा न होता फक्त मॉन्सूनच्या पाऊसकाळातच पाणी असते व पुढे ही नदी कोणत्याच समुद्राला जाऊन न मिळता या नदीचे पाणी हाकरा खोर्‍याच्या टोकास असणार्‍या वाळवंटात फक्त लुप्त होते ही गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे.

सिंधू संस्कृतीचा झालेला अचानक र्‍हास व सरस्वती नदीचे अदृष्य होणे या दोन गोष्टी,भारतीय द्वीपकल्पाच्या प्राचीन इतिहासातील सर्वात अतर्क व अगम्य असलेली गूढे म्हणून यामुळेच मानली जातात. Proceedings of the National Academy of Sciences या प्रकाशनाच्या 28मे 2012 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात या दोन्ही कोड्यांची उकल करण्यात शास्त्रज्ञांचा एक गट यशस्वी झाला असल्याचे नमूद केले गेले आहे. Woods Hole Oceanographic Institution (WHOI) या संस्थेत संशोधन करणारे Liviu Giosan या भूशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली संशोधन करणार्‍या 16शास्त्रज्ञांच्या एका आंतर्राष्ट्रीय गटाने या दोन्ही कोड्यांची उत्तरे शोधण्यात आपल्याला यश आले आहे असा दावा केला आहे. चेन्नई येथील Institute of Mathematical Sciences या संस्थेतील एक शास्त्रज्ञ श्री. रोनोजय अधिकारी हे भारतीय शास्त्रज्ञ सुद्धा या गटाचे एक कार्यरत सभासद होते. शस्त्रज्ञांच्या या गटाने 2003ते 2008या कालखंडात पाकिस्तान मधील अरबी समुद्र काठचा भाग, पंजाबमधील सुपिक खोरी, थर वाळवंटाचा उत्तरेचा भाग या सर्व भूभागाचा बारकाईने अभ्यास करून आपले निष्कर्ष काढले आहेत. या गटाने उपग्रहावरून प्राप्त झालेली छायाचित्रे व Shuttle Radar Topography Mission या मोहिमेकडून प्राप्त झालेली भूपृष्ठरचनेसंबंधीची माहिती (topographic data) यांचा वापर करून सिंधू व इतर नद्यांच्या खोर्‍यामधील भूपृष्ठ वैशिष्ट्यांचे (landforms) डिजिटल नकाशे प्रथम तयार केले. या विश्लेषणात्मक कार्याला सर्व नद्यांच्या खोर्‍यांना प्रत्यक्ष भेटी देऊन जमिनीत खोल बोअर आणि खंदक स्वरूपी खड्डे घेतले गेले व या खोल बोअर मधून मिळालेल्या जमिनीच्या कोअर्सचे क्रॉस सेक्शन्स व खड्यांच्या भिंतींचे क्रॉस सेक्शन्स यांच्या अभ्यासाची जोड देण्यात आली.
या सर्व माहितीच्या आधाराने Giosan यांच्या नेतृत्वाखालील या गटाला 5200 वर्षांपूर्वी (3100इ.स.पूर्व) सिंधू संस्कृतीचे वसतीस्थान असलेल्या सिंधू नदी व इतर नद्या यांच्या काठावरच्या सपाट भूपृष्ठांच्या आसमंतांची पुनर्र्चना संगणकावर करण्यात यश मिळाले. याच बरोबर हडाप्पा सारखी मोठी शहरे कशी वसवली गेली? व या नदीकाठच्या सपाट भूपृष्ठांच्या आसमंतांचा र्‍हास 3900 to 3000 वर्षांपूर्वी (1800 BCE- 900 BCE) या कालखंडात हळूहळू कसा होत गेला? हे नेमकेपणे सांगणे शक्य झाले. Giosan यांचा गट या अभ्यासानंतर खालील निष्कर्षांप्रत येऊन पोचला.

अरबी समुद्रापासून ते गंगेचे खोरे एवढ्या विस्तीर्ण व अंदाजे 10,00,000चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या भूप्रदेशावर पसरलेली सिंधू संस्कृती ही प्राचीन नागरी संस्कृतींपैकी सर्वात मोठी असली तरी या संस्कृतीबद्दलची जगाला असलेली माहिती फारच अपुरी आहे. इजिप्त किंवा मेसोपोटेमिया येथील प्राचीन संस्कृतींप्रमाणेच सिंधू संस्कृती हीसुद्धा विशाल नद्यांच्या काठाने फुलत गेली. परंतु सिंधू संस्कृतीचे पुरातन अवशेष जसे आज अस्तित्वात असलेल्या नद्यांच्या काठी सापडतात त्याचप्रमाणे नदीपासून बर्‍याच दूर असलेल्या मरूभूमीमध्येही सापडतात. असे मानले जाते की दक्षिण एशिया खंडातील या पुरातन संस्कृतीत त्या वेळच्या जगाच्या लोकसंख्येच्या किमान 10टक्के तरी लोक रहात असावेत. असे असूनही 1920 सालामध्ये या संस्कृतीचा आधुनिक जगाला शोध लागेपर्यंत ही संस्कृती पूर्णपणे विस्मृतीच्या पडद्यामागे गेलेली होती. 1920 सालानंतर झालेल्या पुरातत्व संशोधनानुसार ही संस्कृती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण नागरी संस्कृती होती.या संस्कृतीच्या अंतर्गत जी शहरे किंवा नगरे वसलेली होती त्यांच्यामध्ये चालू असलेल्या परस्पर व्यापारासाठी व्यापारी मार्ग तयार केले गेले होते. त्याचप्रमाणे मेसोपोटेमिया बरोबर या संस्कृतीचा समुद्र मार्गे व्यापार चालत असे. शहरांच्यात बांधलेल्या इमारती एका मानकाप्रमाणे बांधलेल्या असत. मैला व सांडपाणी वाहून नेण्यासाठी या शहरांच्यात उत्तम व्यवस्था केलेली असे. कला व हस्तकौशल्य यांना या संस्कृतीत महत्व होते व या संस्कृतीची स्वत:ची अशी लिपी लेखनासाठी होती. दुर्दैवाने ही लिपी अजुनही आपल्यासाठी दुर्बोधच राहिलेली आहे.

या अभ्यासात भाग घेतलेले व University College London येथे संशोधन करणारे भूशास्त्रज्ञ
Dorian Fuller म्हणतात की " या प्रदेशाच्या भू प्रस्तरांविषयी ही नवीन माहिती आम्हाला मिळल्यानंतर, या पुरातन संस्कृतीमधील वस्त्या ज्या ज्या ठिकाणी होत्या त्या वस्त्यांसंबधी पूर्वी ज्ञात असलेली माहिती, कोणती पिके येथे काढली जात होती? व येथील वस्त्या व कृषी उत्पादन कालानुसार कसे बदलत गेले? या सर्व बाबींची पुन्हा तपासणी आम्ही करू शकलो. या अभ्यासामुळे, सिंधू संस्कृतीतील लोकसंख्येचे, पूर्व दिशेला झालेले स्थलांतर, मोठ्या शेती कडून लघु आकाराची शेती करणार्‍या व शहराकडून छोट्या खेडेगावांकडे जाणार्‍या समाजरचनेची प्रक्रिया आणि उत्तर हडप्पा कालात झालेला शहरी लोकसंख्येचा र्‍हास या गोष्टींवर नवा प्रकाश टाकता आला."

सिंधू संस्कृती या अतिशय विशाल अशा भूप्रदेशावर वसली जाण्याच्या आधीची अंदाजे दहा सहस्त्र वर्षे तरी सिंधू व तिच्या उपनद्या वहात असलेल्या भूभागात मॉन्सूनचा पाऊस जवळ जवळ वर्षभर आणि तुफान स्वरूपात पडत होता व यामुळे या सर्वच नद्या अतिशय बेफाम स्वरूपात व कोठेही व कशाही वहात राहिल्या होत्या. नद्यांच्या या बेफाम वाहण्यामुळे या सर्व प्रदेशात नद्यांतून वहात आलेल्या व पिकांना अतिशय उपयुक्त असलेल्या गाळाचे थर या नद्यांनी रचले होते. Giosan यांच्या संशोधन गटाला सिंधू नदीच्या दक्षिणेकडील पात्राला समांतर असलेली, 10ते20मीटर उंच, 100पेक्षा जास्त किलोमीटर रूंद व अंदाजे 1000किलोमीटर लांबीची एक सपाट टेकडी किंवा पठार या कालात या बेफाम वाहणार्‍या नद्यांनी गाळाचे थर एकावर एक रचून निर्माण केल्याचे आढळून आले. या पठारवजा सपाट टेकडीचे या गटाने Indus mega-ridge असे नामाकरण केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सिंधू संस्कृतीचे जे जे पुरातन अवशेष गेल्या 90वर्षात सापडलेले आहेत ते सर्व या Indus mega-ridge च्या जमिनीखाली न सापडता फक्त पृष्ठभागावरच सापडलेले आहेत.

या सर्व नद्यांना सतत पूर आणत रहाणारा मॉन्सूनचा पाऊस यानंतरच्या कालात कमी कमी होऊ लागला. यामुळे व हिमालयातून घेतले गेलेले पाणी कमी प्रमाणात नद्यांच्यात आल्याने या सर्व नद्यांचे बेफाम वागणे नियंत्रित झाले आणि या सर्व भूप्रदेशात कृषी उत्पादने घेण्यासदृष्य परिस्थिती निर्माण झाली. सिंधू व इतर नद्यांच्या काठाने अरबी समुद्र ते हिमालयाचा पायथा या सर्व प्रदेशात मानवी वस्त्या स्थापन झाल्या. कमी झालेल्या मॉन्सूनच्या पावसामुळे हडप्पा कालीन लोकसंख्येला उत्तम हवामान, भरपूर पाणी आणि सुपिक जमीन या गोष्टी मिळून एक मोठी सुसंधी प्राप्त झाली असे म्हणता येते. पुढची 2000वर्षे तरी टिकून राहिलेल्या या सुसंधीमुळे हडप्पा कालीन लोकसंख्येला या प्रदेशात एक मोठी संस्कृती निर्माण करण्यात यश मिळाले व आपल्या कष्टाळू व उद्यमप्रिय स्वभाव वैशिष्ट्यांमुळे त्यांनी या सुसंधीचे सोने केले. सिंधू व घग्गर-हाकरा नद्यांच्या काठालगत असलेल्या पाण्याच्या भरपूर उपलब्धतेमुळे सिंधू संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य अमाप कृषी उत्पादन हेच राहिले होते. या कृषी उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात शेतमजुरांची आवश्यकता भासू लागली व त्यामुळे मानवी स्थलांतर सुरू होऊन मोहेंजोडारो किंवा हडप्पा सारखी मोठी शहरे निर्माण झाली.
मॉन्सूनचा पाऊस पुढे पुढे सतत कमी होत गेल्याने 2000वर्षांची ही सुसंधी आटत चालली व त्याच बरोबर विस्तृत प्रमाणात ज्या ठिकाणी पूर्वी मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध होते अशा भूभागाचे मरूभूमीकरण होण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. या मरूभूमीकरण प्रक्रियेमुळे हडप्पाकालीन लोकसंख्येचे पूर्वेकडे म्हणजे गंगा नदीच्या खोर्‍याकडे स्थलांतर साधारण 1500 इ.स.पूर्व या कालखंडापासून सुरू झाले. या भागातील मॉन्सूनचा पाऊस जरी स्थिर स्वरूपाचा असला तरी पावसावर अवलंबून असलेली शेती व नद्यानाल्यातील उपलब्ध पाणी हे फक्त छोट्या स्वरूपातील शेतीसाठीच उपयुक्त होते. या कारणामुळे सिंधू खोर्‍यातील मोठ्या शहरांसारखी शहरे गंगा खोर्‍यात निर्माण न होता मर्यादित स्वरूपाच्या शेतीच्या आधारावर टिकू शकतील अशा फक्त लहान नगर राज्यांची अर्थव्यवस्था येथे स्थापली गेली. मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या. आणि स्थलांतरित जनसंख्या लहान लहान गावात विखुरली गेली.

या अभ्यासात आणखी एका गूढाचा उलगडा करता आला आहे असे हा अहवाल म्हणतो. ते गूढ म्हणजे सरस्वती नदी अदृष्य होण्यामागचे कारण. सरस्वती नदी म्हणजे सध्याची घग्गर नदी असेही हा अहवाल म्हणतो. घग्गर-हाकरा नदीच्या खोर्‍यात, हडप्पा कालात अतिशय दाट स्वरूपात वस्ती असल्याचे पुरावे या भागात केलेल्या उत्खननात आढळून आलेले आहेत. नदीच्या काठावर असलेले गाळाचे थर व नदी खोर्‍यातील भूपृष्ठभाग रचना या स्वरूपाच्या व या अभ्यासातून प्राप्त झालेल्या भूशास्त्रीय पुराव्याप्रमाणे या नदीचे पात्र खरोखरच विशाल व मुबलक पाणी असलेले होते असे दिसते. परंतु या कालात सुद्धा या नदीला असलेले मुबलक पाणी हे सध्याप्रमाणेच पण केवळ त्या काळात पडणार्‍या सशक्त मॉन्सूनच्या पावसामुळेच होते. या नदीला हडप्पा कालात सुद्धा हिमालयातून पाणी उपलब्ध होत नव्हते. त्याचप्रमाणे या नदीच्या जवळून वाहणार्‍या सतलज किंवा यमुना नद्यांमध्ये जे पाणी हिमालयातून येत होते ते या नदीच्या पात्रात वहात आल्याचा काहीच पुरावा मिळत नाही. या नदीला बारमाही पाणी असले तरी ते त्या काळातील सशक्त मॉन्सूनचेच होते.

या अभ्यासामध्ये, आजच्या घटकेला असलेल्या सिंधू नदीच्या जलसिंचन योजनांना एक धोक्याचा कंदील दाखवलेला आहे. या अभ्यास गटाचे प्रमुख Giosan म्हणतात की " आजमितीला सिंधू नदी जलसिंचन योजना ही जगातील सर्वात मोठी या स्वरूपाची योजना आहे. या योजनेत सिंधू नदीचे पाणी अनेक धरणे व कॅनॉल्स मार्फत अडवले गेलेले आहे. भूतापवृद्धीमुळे जर काही लोक म्हणतात तशी मॉन्सूनच्या प्रमाणात वाढ झाली तर 2010 सारख्या भयंकर पुरासारखी परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते. नियंत्रित स्वरूपात वाहणार्‍या सिंधू नदीवरील जलसिंचन योजना मॉन्सूनच्या पावसात वाढ झाल्यास केंव्हाही कोलमडू शकते.” पाकिस्तानसाठी हा एक धोक्याचा इशाराच समजला पाहिजे.
8जून 2012

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

एका महत्त्वाच्या संशोधनाचीओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. या विषयी बातमी वाचली होती. पण हे संशोधन इतक्या बारकाईने केले गेले असेल हे माहित नव्हते.
हा अभ्यासलेख आंतरजालावर उपलब्ध आहे काय? असल्यास कोठे मिळेल?

या विषयी एका वेगळ्या समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून लिहिलेला एक अभ्यासलेख येथे सापडतो. यामध्ये हरप्पा संस्कृतीच्या र्‍हासाची काहीशी समांतर कारणे आढळतात.

मूळ अभ्यासलेख

या संकेतस्थळावरून तुम्हाला मूळ लेख उतरवून घेता येईल.

त्याशिवाय या अभ्यासलेखाचा अतिशय सुरेख सारांश या दुव्यावर तुम्हाला वाचता येईल.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

लेख आवडला.

लेख आवडला. पाण्याच्या कमतरतेमुळे शेती करणे कठीण झाल्याने सिंधू संस्कृतीतील लोकांनी स्थलांतर केले यावर माझा विश्वास आहे.

मोठी शहरे नष्ट झाल्याबरोबर शहरी वास्तव्यासाठी उपयुक्त अशा लेखनासारख्या कला कालौघात नष्ट झाल्या.

येथे नेमके काय म्हणायचे ते कळले नाही. मोठी शहरे नष्ट झाली तरी गंगेच्या खोर्‍यात लहान नगर-राज्ये अस्तित्वात आली. माणूस जेव्हा शेती करतो आणि शेतीमुळे एका जागी वस्ती करतो तेव्हा कळपातील प्रत्येक माणसाला पोटासाठी अन्नोत्पादन करावे लागत नाही. कारण शेतीमुळे अनेकांची व्यवस्था लागेल इतके अन्नोत्पादन होते. अशावेळी संस्कृती जन्माला येते. शेतीवर आधारित नसणारे उद्योग (राजा, मंत्रीगण, सैन्य, लेखक, इतिहासकार, लेखनिक, कवी इ. ) आपोआप उदयास येतात. गंगेच्या खोर्‍यातही हेच झाले आणि स्थलांतर झाल्यावर माणूस लेखनकला विसरला नसावा असे वाटते.

या उलट, सिंधू संस्कृती लिपी ही अद्याप दुर्बोध असण्याचे एक कारण बहुधा अतिशय लहान स्वरुपातील लेखन (शिक्क्यांवरील लेखन) आहे असे दिसते. मोठमोठ्या टॅब्लेट्सवर किंवा खांबांवर, भुर्जपत्रांवर (भुर्जपत्रे तेव्हा तयार होत का या बाबत अनभिज्ञ आहे.) सिंधू संस्कृतीत लेखन झाल्याचे पुरावे मिळत नाहीत असे वाचले आहे. चू. भू. द्या. घ्या. मुद्रांवर लिहिलेले शब्द हे बहुधा मुद्राधिशांची नावे असण्याचा एक कयास व्यक्त केला जातो. यामुळेही डिकोडींग थोडे कठीण झाल्याचे सांगितले जाते. किंबहुना, सिंधू संस्कृतीत डेवलप झालेली लेखनकला ही प्रत्यक्ष लेखनलिपी आहे की केवळ चिन्हांत्मक चित्रलिपी आहे याबाबत मतभेद आहेत. व्यक्तिशः मला ती लेखनलिपी वाटत नाही. (सुरुवातीची लेखनलिपी ही विशेषतः, नागरिकांसाठी नियम, राज्यकारभाराच्या नोंदी, दानपत्रे आणि राजा किंवा शासनकर्त्याचे गुणगान या पद्धतीतील आहे.)

अशा परिस्थितीत, सिंधू लिपी ही अस्तित्वात असली तरी किती प्रचलित होती हे सांगता येत नाही. कदाचित, ती समाजातील अतिशय कमी लोकांकडून वापरली गेली असेल आणि त्यामुळे स्थलांतर होताना, नव्या वस्तीत, अन्नोत्पादनात आणि पुन्हा वस्ती करण्यात मग्न झाल्याने आणि ही लिपी आधीही महत्त्वाची भूमिका बजावत नसल्याने मागे पडली असेल असा एक अंदाज मांडते. चू. भू. द्या. घ्या.

अवांतरः सिंधू नदी खोर्‍याप्रमाणे गंगेच्या खोर्‍यात उत्खनन होऊन काही हाती लागल्याचे पुरावे आहेत का? माझ्या पाहण्यात तरी ब्राह्मी लिपी येईपर्यंत काही नाही. चू. भू. द्या. घ्या. म्हणजे इ.स. पूर्व ५००च्या आसपास. तोपर्यंत कोणतीही लिपी असल्याचे पुरावे मिळत नाहीत का?

सिंधू संस्कृतीमधील लिपी

स्थलांतर होताना, नव्या वस्तीत, अन्नोत्पादनात आणि पुन्हा वस्ती करण्यात मग्न झाल्याने आणि ही लिपी आधीही महत्त्वाची भूमिका बजावत नसल्याने मागे पडली असेल असा एक अंदाज मांडते.
अगदी बरोबर! अभ्यासगटाच्या अहवालात हेच म्हटले आहे असे मला वाटते. ही लिपी मुख्यत्वे सील्स आणि सीलिंग्स यावरच सापडलेली आहे आणि या दोन्ही गोष्टी धंद्यात वापरण्याचे चलन, वैयक्तिक ओळखपत्र, दागिना आणि एक टॅग या प्रकारच्या उपयोगांसाठीच वापरात होत्या असे पुरातत्व तज्ञ सांगतात.बहुसंख्य लोक जे शेतमजूर असणार त्यांना या लिपीशी फारसे देणेघेणे सिंधू काठीही नसावे व पूर्वेकडे आल्यावरही नसावे. ज्या कारणासाठी ही सील्स व सिलींग्स वापरली जात होती ती कारणेच न उरल्याने सील्स/सिलींग्स व त्याबरोबर लिपी आणि लेखनवाचनाची कला कालौघात नष्ट झाली असावी.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सरस्वतीबाबतचे निष्कर्ष पटत नाहीत...

ऋग्वेदातील दहाव्या मंडलात वैदिक संस्कृतीकालीन नद्यांचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जे वर्णन दिले आहे त्यात या नद्यांचे क्रमही अचूक आहेत. मुद्दा सरस्वतीचा असल्याने आपण पहिल्या दोन ओळींचा अर्थ बघू कारण पुढच्या दोन ओळीत सिंधू नदीच्या उपनद्या व मार्ग वर्णन केला आहे.

इमं मे गंगे यमुने सरस्वती शुतुद्रिस्तोमम् सचता परुष्ण्या
असिक्न्या मरुद्वृधे वितस्त्या आर्जीकीये श्रीणुहा सुषोमया
तृष्टामया प्रथम् यातवे सजु: सुस्र्त्वा रसया श्वत्या त्या
त्वम् सिंधो कुभया गोमतीम् क्रुमुम् मेहत्न्वा सरथम् याभिरीयसे
(गंगे, यमुने, सरस्वती, शतुद्रि (सतलज), परुष्णि (रावी), मरुद्व्रुधे व असिक्नि (चिनाब), आर्जिकिया, वितस्ता (झेलम) व सुसोम (सोहन) ऐका व माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करा.)

यावरुन सरस्वती नदीचे स्थान यमुना व सतलज यांच्या मध्ये आहे, हे स्पष्ट होते. याच ऋग्वेदाच्या सातव्या मंडलात ही सरस्वती 'गिरीभ्यां आसमुद्रात्' वाहते, असा उल्लेख आहे. म्हणजे सरस्वतीचा उगम पर्वतीय प्रदेशात व विस्तार समुद्रापर्यंत आहे, हेही समजते. ज्या नदीचा उल्लेख ३२ वेळा आहे आणि जिला 'नदीतमे, अंबितमे, देवितमे (सर्वश्रेष्ठ नदी,माता व देवी) म्हटले आहे, ती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून नव्हती. तिला हिमालयातील पाण्याचा पुरवठा स्वतःचा व यमुना व सतलजमधून होत होता कारण या नद्या प्रारंभी सरस्वतीलाच मिळत होत्या. सरस्वती हिमालयाच्या पायथ्याच्या शिवालिक टेकड्यांमधून (गढवाल) उगम पावून हरयाणा व राजस्थानमध्ये येत होती व कच्छच्या आखातात अरबी समुद्राला मिळत होती (आजची घग्गर नदी हीच सरस्वती). यमुना, सरस्वती व सतलज यांचा संगम पतियाळाच्या दक्षिणेस ६०किलोमीटरवरील शत्राणा येथे होतो. पुढे अनुपगढजवळ या नद्यांचे प्रवाह बदलतात. भूकंप किंवा नैसर्गिक पात्र बदलण्याच्या सवयीने एकेकाळी सरस्वतीला विपुल पाणी पुरवणार्‍या यमुना व सतलजनेही प्रवाह बदलला. यमुना वळून पुढे गंगेला जाऊन मिळाली (अलाहाबाद), तर सतलज सिंधु नदीला मिळाली. जर सतलज पूर्वीपासून सिंधूला मिळत असती तर ऋग्वेदात वरील तिसर्‍या व चौथ्या ओळीत तिला सिंधूची उपनदी म्हटले असते. त्यात तर सिंधूच्या त्रिस्तमा, सुसर्तु, रसा, श्वेता, कुभा (काबुल),गोमती (गोमल), क्रमु (कुर्रम) व महलु या नद्यांचा उल्लेख आहेत.

यमुना व सतलजने प्रवाह बदलल्याने सरस्वतीचे खालच्या खोर्‍यातील पात्र रोडावत गेले व लुप्त झाले. तरीही आज ते घग्गर नदी किंवा हरयाणातील काही सरोवरे यांच्या रुपाने दिसून येते. यमुनेच्या खोर्‍यातील मातीचे नमुने घग्गरकाठच्या मातीशी जुळतात, हे उत्खननात पूर्वीच दिसले आहे. सरस्वतीचा प्रवाह आटल्याने तिच्या खोर्‍यातील रहिवाशांनी सिंधूच्या खोर्‍यात व गंगेच्या खोर्‍यात स्थलांतर केले. ऋग्वेदाची रचना मुख्यत्वे सरस्वती व सिंधू यांच्या दरम्यानच्या खोर्‍यात (सप्तसिंधु) झालेली असल्याने सरस्वतीचा उल्लेख ३२ वेळा तर सिंधुचा उल्लेख केवळ ३ वेळा येतो. ही श्रेष्ठ नदी आटल्याने मगच नाईलाजाने तेथील वैदिक संस्कृती सिंधु व गंगा खोर्‍यात विस्थापित झाली आणि लोकसंख्येचा लोंढा वाढल्याने पुढे मोहंजेदोडो व हरप्पासारखी नगरे विशाल झाली असावीत. अर्थात मागे एका धाग्यावर मी विधान केले होते तेच आजही वाटते. 'सिंधु संस्कृती ही अगदी भिन्न अशी संस्कृती नसून वैदिक संस्कृतीचाच एक उपसंच होती. हे लोक वरुणपूजक व वैश्य (ज्यात व्यापार, कृषिकर्म व गोपालन हे मुख्य व्यवसाय) होते. सिंधु नदी व वरुणाचे नाते ऋग्वेदात वर्णिले आहे. इंद्राने वज्राने पर्वत फोडून सर्व नद्यांना प्रवाहित केले असे इंद्राच्या स्तुतीपर ऋचांत म्हटले आहे. तसेच सिंधु नदी वरुणाच्या दरबारात त्याची सेवा करते, असाही उल्लेख वरुणसूक्तात आढळतो. सिंधु नदीच्या खोर्‍यातील जे वैदिकधर्मीय (सिंधी) भारतात विस्थापित झाले त्यांच्या परंपरागत जपलेल्या चालीरीती पाहिल्या तर त्यांच्यात झुलेलाल हा वरुणाचा अवतार देव म्हणून मानतात. सिंधी समाजावर ब्राह्मणी कर्मकांडांचा पगडा नाही आणि व्यापाराची ओढ त्यांच्या रक्तातच असते. यावरुनही त्यांचे वरुणपूजक वैश्यत्व पटू शकते.'

असो लेख चांगला आहे. 'आर्यांच्या आक्रमणाने सिंधु संस्कृतीचा नाश' ही मांडणी आधुनिक संशोधनाने फोल ठरवली आहे. पर्यावरण बदलाच्या मुद्यावरही विद्वानांची मतमतांतरे आहेतच. वारंवार दुष्काळ पडल्याने उपजीविकेवर संकट येऊन लोक विस्थापित झाले, हे सत्य असले तरी मान्सूनच्या चक्रात खूप मोठा बदल झाला नसल्याचेही जाणवते कारण एक सरस्वती सोडली तर ऋग्वेदात वर्णन केलेल्या बहुतेक नद्या आजही वाहात आहेत. म्हणजेच भूकंपाने उपनद्यांचे प्रवाह वळून पुढील नदी लुप्त होणे सत्याला जवळचे वाटते. सरस्वतीबाबत महाभारताच्या शल्यपर्वात एक कथा आहे. हीच कथा सारस्वत ब्राह्मण समुदायाच्या स्थलांतराचा उगम म्हणून सांगितली जाते. त्यानुसार सरस्वती आटू लागल्यावर तेथील वैदिक ब्राह्मण तो भाग सोडून जाऊ लागले. तेव्हा सरस्वती नदीने आपला पुत्र सारस्वत याला 'जाऊ नकोस. येथेच राहून वेदांचे रक्षण कर.' अशी विनंती केली. उपजीविकेसाठी मासे देण्याचे कबूल केले. सारस्वताने दीर्घकाळ मत्स्याहारावर राहून वेदांचे रक्षण केले. पुढे दुष्काळ सरल्यावर पुन्हा लोक आले व सारस्वत जिवंत असल्याचे बघून चकित झाले. तेव्हापासून सारस्वत ब्राह्मणांच्या आहारात मासे वर्ज्य नसल्याचे समजले जाते. असो. मुद्दा हा, की दुष्काळ संपल्यावर पाऊस पडल्यावर लोक पुन्हा पूर्वीच्या प्रदेशात परतत. मग सरस्वतीबाबत तसे का झाले नाही? अगदी १२ वर्षांचा दुर्गादेवीच्या दुष्काळाप्रमाणे काळ मानला तरी त्यानंतर तरी पावसाचे चक्र नियमित झाले असेलच. मग लोकांनी कायम स्थलांतर का केले असेल. याचेही उत्तर सरस्वतीचा प्रवाह कायमचा कोरडा पडला आणि त्याला मान्सूनखेरीज भूकंपामुळे भूस्तररचना व नदीप्रवाह बदलासारखे अन्य काही ताकदवानच कारण असले पाहिजे, यात आहे, असे मला वाटते.

वेद्ग्रंथातील वर्णने

ज्या घडामोडी वैदिक संस्कृती भारतीय द्वीपकल्पात प्रचलित होण्याआधी घडल्या आहेत त्या गोष्टींबद्दल वैदिक संस्कृतीच्या धर्मग्रंथांत काय सांगितले आहे ते कितपत ग्राह्य धरता येईल? वैदिक ग्रंथातील गत गोष्टींबद्दलची ही वर्णने ऐकिव माहितीवर अवलंबून असल्याने तितकीशी विश्वासार्ह धरता येणार नाहीत.

'सिंधु संस्कृती ही अगदी भिन्न अशी संस्कृती नसून वैदिक संस्कृतीचाच एक उपसंच होती.

हे वाक्य ' वैदिक संस्कृती ही अगदी भिन्न अशी संस्कृती नसून सिंधू संस्कृतीचाच एक उपसंच होती' असे लिहिल्यास इतिहासाला जास्त धरून व्हावे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

वेदग्रंथामधील् संदर्भ्

माझ्या प्रतिसादातून् मला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट् झाले नसावे. एखादी घटना घडून् हजार् पाचशे वर्षे गेल्यावर् जेंव्हा एखादा कवी त्या घटनेवर् काव्य् करतो तेंव्हा त्या काव्याची विश्वासार्हता इतर् परिस्थितीजन्य पुरावा तपासल्या शिवाय् ग्राह्य् धरता येत् नाही असे मला वाटते.त्यामुळे त्या काव्याचे संदर्भ् देऊन् त्या घटनेबाबत् भाष्य करणे योग्य ठरणार् नाही.

उपलब्ध पुरावे वैदिक संस्कृतीला सिंधु संस्कृतीच्या पूर्वीचे ठरवतात.

हे वाक्य् मला पूर्णपणे मान्य् आहे. प्रश्न् एवढाच् आहे की ही वैदिक् संस्कृती भारतीय् उपखंडात् कधी आली? सिंधू संस्कृतीच्या आधी किंवा नंतर्? माझ्या मताने ती या लेखातील् स्थलांतरे घडून् गेल्यानंतर् आली. त्यामुळे वैदिक् काव्यातील् सरस्वती नदीबद्दलची वर्णने मला विश्वासार्ह् वाटत् नाहीत् व ती अतिरंजित् वाटतात्.

वैदिक संस्कृती यज्ञप्रधान (वेदी, पशुबळी, अग्नी), पशुपालक, कृषीप्रधान, चातुर्वण्य चौकटीची होती. त्याची चिन्हे सिंधु उत्खननात आढळली आहेत.
उत्खननात् आढळलेल्या या गोष्टींचे संदर्भ् (इतर् पुस्तके किंवा आंतरजाल्) श्री. योगप्रभू यांनी दिल्यास् माझ्या व इतर् वाचकांच्या माहितीत खूपच् मोलाची भर पडेल असे वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

जशी आपली इच्छा...

संस्कृतीचा /प्राचीन कालखंडाचा वेध घेताना इतिहास, भूगोल, पर्यावरण शास्त्र, धर्मशास्त्र, पुरातत्वशास्त्र, मानववंश शास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, भाषाशास्त्र, नाणकशास्त्र अशा अनेक शाखांनी वेध घ्यावा लागतो. अलिकडे उपग्रह छायाचित्रण व संगणक तंत्रज्ञानानेही महत्त्वाचा हातभार लावला आहे. खरे अभ्यासक कुठच्याही साधनाला दुय्यम/अविश्वासार्ह लेखत नाहीत. नांणी, मुद्रा, दागिने, भांडी, शस्त्रास्त्रे, हाडे, राखेचे/मातीचे थर ही जशी साधने तशीच लिखित वर्णनेही शोध साधनांतच मोडतात. पुराणांबाबतही विश्वासार्हतेचे कारण दाखवून असेच प्रश्नचिन्ह उभे केले गेले. प्रा. पोर्जिटेर यांनी पुराणांचा चिकित्सक अभ्यास इतिहास समजून घेण्याचे उत्तम साधन ठरते, हे दाखवून दिले. अर्थात 'मला मानायचेच नाही,' असा पाया असेल तर तिथे संवाद खुंटतो. विश्वासार्हतेबाबत तुमचा दृष्टीकोन व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मानणे उचित ठरावे.

<< ' वैदिक संस्कृती ही अगदी भिन्न अशी संस्कृती नसून सिंधू संस्कृतीचाच एक उपसंच होती' असे लिहिल्यास इतिहासाला जास्त धरून व्हावे.>>

... माझ्या वाचनानुसार नाही. उपलब्ध पुरावे वैदिक संस्कृतीला सिंधु संस्कृतीच्या पूर्वीचे ठरवतात. वैदिक संस्कृती यज्ञप्रधान (वेदी, पशुबळी, अग्नी), पशुपालक, कृषीप्रधान, चातुर्वण्य चौकटीची होती. त्याची चिन्हे सिंधु उत्खननात आढळली आहेत.

भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना स्वतःला वाटेल अशा व्युत्पत्त्या रेटून सांगण्याचा काही पाश्चिमात्य विद्वानांचा खोडसाळपणा 'आर्यन थिअरी' मधून उघडा पडला आहे. अवांतर म्हणून अलिकडच्या काळातील एक गंमत नमूद करतो.

तुर्कस्तानात १९८३ ते १९९३ या काळात नेवाली कोरी भागात झालेल्या उत्खननात सापडलेल्या वस्तू अद्यापही तेथील संग्रहालयात आहेत. हे उत्खनन क्षेत्र मात्र आता त्या परिसरात झालेल्या धरणाच्या पाणीसाठ्यात लुप्त झाले आहे. या वस्तूंमध्ये तुळतुळीत गोटा व मागे रुळणारी शेंडी असा एक दगडी पुतळा सापडला आहे. (त्याचा फोटो गुगलवर नेवाली कोरी आर्टेफॅक्ट्स सर्चखाली चित्रसंग्रहात पाहता येईल.) आता याचे वर्णन करताना संशोधकांनी 'तत्कालीन रहिवाशांना डोक्यावर साप गुंडाळून सुशोभित करण्याची सवय असावी' असा तर्क मांडला, पण हे ब्राह्मणाचे शिखासहित मस्तकाचे शिल्प आहे, हे भारतीय संस्कृतीचा कुणीही माहीतगार बघताक्षणी सांगू शकतो. कार्बन डेटिंग पद्धतीने या वस्तूंचा कालावधी साडेआठ हजार वर्षे मागे जातो. ज्याअर्थी साडेआठ हजार वर्षांपूर्वी शेंडीवाला ब्राह्मण तुर्कस्थानात माहीत होता तर ब्राह्मण निर्गमित वैदिक संस्कृती त्याकाळी असणारच. सिंधु संस्कृतीचा काळ साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या मागे जात नाही. मग कोणती संस्कृती आधीची? असो, प्रगत विज्ञान आणि अभ्यास यातून इतिहासातील सत्य अधोरेखित होईलच.

अबब!

या वस्तूंमध्ये तुळतुळीत गोटा व मागे रुळणारी शेंडी असा एक दगडी पुतळा सापडला आहे. (त्याचा फोटो गुगलवर नेवाली कोरी आर्टेफॅक्ट्स सर्चखाली चित्रसंग्रहात पाहता येईल.) आता याचे वर्णन करताना संशोधकांनी 'तत्कालीन रहिवाशांना डोक्यावर साप गुंडाळून सुशोभित करण्याची सवय असावी' असा तर्क मांडला, पण हे ब्राह्मणाचे शिखासहित मस्तकाचे शिल्प आहे, हे भारतीय संस्कृतीचा कुणीही माहीतगार बघताक्षणी सांगू शकतो.

योगप्रभूंच्या प्रतिसादाचा आणि त्यातून दिसणाऱ्या त्यांच्या वाचनाचा, व्यासंगाचा आवाका बघितला आणि थक्क झालो. अबब! केवढी ही विलक्षण विचक्षणा! सुतावरून स्वर्ग गाठणे माहीत होते. त्याच धरतीवर शेंडीवरून ब्राह्मण गाठणे म्हणजे केवळ अद्भुत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तफावत

आता याचे वर्णन करताना संशोधकांनी 'तत्कालीन रहिवाशांना डोक्यावर साप गुंडाळून सुशोभित करण्याची सवय असावी' असा तर्क मांडला, पण हे ब्राह्मणाचे शिखासहित मस्तकाचे शिल्प आहे, हे भारतीय संस्कृतीचा कुणीही माहीतगार बघताक्षणी सांगू शकतो.

ज्याप्रमाणे मस्तकावर साप गुंडाळलेला असणे या अनुमानाला येणे हास्यास्पद आहे त्याचप्रमाणे एखाद-दुसर्‍या शिल्पावरून तो ब्राह्मणच असून तुर्कस्तानात भारतीय संस्कृती पोहोचलेली होती असे म्हणणेही तितकेच हास्यास्पद आहे.

साडे आठहजार वर्षांपूर्वीच्या नेवाली कोरीचे उदाहरण देताना नेवाली कोरीबद्दल आपल्याला इतर कोणत्या गोष्टी माहित आहेत हे ही बघायला हवे. याचबरोबर ते कोणती चिन्हे वापरीत, ती इतर ठिकाणी कोरलेली दिसतात का हे तपासायला हवे. अश्मयुगातील या संस्कृतीत कोणते लोक राहत होते, त्यांच्या धारणा, व्यापार, प्रवासाची साधने, त्यांचे देव, त्यांची संस्कृती याविषयी पुरेशी माहिती नसताना एकदम ब्राह्मण तेथे पोहोचले होते असे म्हणणे हे पटण्याचा प्रश्नच येत नाही.

योगप्रभू त्यांच्या प्रतिसादात सुरुवातीला म्हणतात -

संस्कृतीचा /प्राचीन कालखंडाचा वेध घेताना इतिहास, भूगोल, पर्यावरण शास्त्र, धर्मशास्त्र, पुरातत्वशास्त्र, मानववंश शास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, भाषाशास्त्र, नाणकशास्त्र अशा अनेक शाखांनी वेध घ्यावा लागतो.

हे पटण्यासारखे आहे. पण ते प्रतिसादाचा शेवट बेधडकपणे

ज्याअर्थी साडेआठ हजार वर्षांपूर्वी शेंडीवाला ब्राह्मण तुर्कस्थानात माहीत होता तर ब्राह्मण निर्गमित वैदिक संस्कृती त्याकाळी असणारच.

करतात ते अजिबात पटणारे नाही. प्रतिसादाची सुरुवात आणि शेवट यांत प्रचंड तफावत आहे.

इत्यलम्

७९ पुस्तकांचे सुप्रसिद्ध लेखक

७९ पुस्तकांचे सुप्रसिद्ध लेखक आणि इतिहासाची जबरदस्त माहिती असणारे श्री. संजय सोनावणी यांच्या ब्लॉगवर एक नवा लेख मिळाला. त्यात ते लिहितात की संघ व त्याच्या अनेक शाखा-उपशाखा स्वत:ला हिंदु धर्मीयांचे तारणहार समजतात. तत्वद्न्य आणि समर्थक समजतात. त्यासाठी असंख्य धादांत खोट्या गोष्टी रचुन सांगत असतात. (उदा. हडप्पा/लोथल येथे सापडलेल्या तंदुर भट्ट्यांचे अवशेष हे यद्न्यकुंडांचे अवशेष आहेत...तात्पर्य सिंधु संस्कृती ही वैदिकांनी घडवली. इति. एम. के ढवळीकर. पु. ना. ओक ते वर्तक असेच तारे तोडत असतात.)

हा लेख इथे वाचा. त्यांचे मत इथल्या प्रतिसादांतील मतापेक्षा वेगळे वाटते.

लोथल

>>लोथल येथे सापडलेल्या तंदुर भट्ट्यांचे अवशेष हे यद्न्यकुंडांचे अवशेष आहेत

संजय सोनावणी लोथलला गेले आहेत की नाही हे ठाऊक नाही. (मी गेलो आहे).

मला तरी तेथे तंदूरभट्ट्या/यज्ञकुंडांसारखे (इ.स. २०१० मध्ये) दिसले नाही.

नितिन थत्ते

लोथलच्या यज्ञवेदी

लोथलला यज्ञवेदी असण्याबद्दल अनेक तज्ज्ञांचे लेखन वाचले आहे, नेटावर शोध घेतल्यास सहज उल्लेख मिळतील आणि माझ्याही मते त्या तशा असाव्यात. मला फोटो पाहिल्याचेही आठवते. आता त्या यज्ञवेदी आहेत की तंदूर भट्ट्या आहेत या विषयी मी अनभिज्ञ आहे.

परंतु येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे की लोथल हे हडप्पानंतरचे शहर आहे. कदाचित हडप्पामधील रहिवाशांनी स्थलांतर करून लोथलमध्ये वस्ती केली असावी असे काही तज्ज्ञांचे मत पडते. कसेही असले तरी लोथलच्या उन्नतीचा काळ हा सिंधू संस्कृती परिपक्व झाल्यावरचा आहे. लोथलची वस्ती संपणे आणि वैदिक संस्कृती बहरात येणे हे काळ जवळ-जवळ आहेत यामुळे वैदिक संस्कृतीच्या ज्या खुणा हडप्पाला दिसत नाहीत त्या लोथलला दिसणे शक्य आहे किंवा वैदिक संस्कृतीची पूर्वावशक्यता लोथलमध्ये पूर्ण होत असल्याचे पुरावे मिळू शकतील.

लोथलवासीयांना घोडा माहित होता असे मी मध्यंतरी वाचले आहे. मला हे नेमके खरे का माहित न्सले तरी यात काही खोटे आहे असेही वाटत नाही.

तंदूर भट्टी असेल तर लोथलचे रहिवाशी तंदूरी चिकन आणि नान खात होते का हे ही मला माहित नाही. ;-)

लोथलमध्ये घोडा

लोथलचे माहिती नाही, पण गुजरातमध्येच सुरकोटडा येथे इसपू १७०० ह्या सुमारास घोड्याचे अवशेष सापडले आहेत. संदर्भ

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

गुजराथेतील स्थळे

लोथल, सुरकोटडा आणि इतर गुजराथेतील स्थळे ही सिंधू संस्कृती परिपक्व झाल्यावर (होऊन गेल्यावर) नावारुपाला आलेली आहेत. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती अशी की ही शहरे बंदरे आहेत आणि येथून जलवाहतूक चालत असे. मेहरगढ आणि तिथून पुढे निपजलेली सिंधू संस्कृती ही वैदिक संस्कृती नावारुपाला येण्यापूर्वीच मध्य आशियातून स्थलांतरित झाली असावी. मधील काही हजार वर्षे तरी दोन्ही संस्कृतींचा फारसा संबंध उरला नसावा. त्यामुळे कोण कोणाचे संच-उपसंच होते हा फक्त मला पावर-गेम वाटतो.

घोड्याला जेव्हा पाळीव प्राण्याचे महत्त्व आले तेव्हा सिंधू आणि मध्य आशियातील संस्कृती यांचा संबंध उरला नसल्याने हडप्पा आणि मोहेंजेदारो आणि इतर समकालीन शहरांना घोडा माहित नाही. परंतु अशी शक्यता मला वाटते की पुढे जलवाहतूकी मार्गे घोडे जहाजांतून गुजराथेत आले असावे. अर्थातच, याचा अर्थ असा होत नाही की आल्याआल्या लोकांनी घोड्याला पाळीव प्राणी बनवले. कदाचित ते घोडे फक्त परदेशी व्यक्तींकडे असावे. कालांतराने ते एतद्देशीयांनी स्वीकारले. त्यानंतर काही काळाने त्यांची स्वतःहून पैदास सुरु केली वगैरे. म्हणून मी एवढेच म्हणते की लोथल किंवा इतर समकालीन स्थळांना घोडा माहित असावा. घोड्याचा राजरोस वापर होत होता असे चटकन म्हणता येत नाही/ मला त्याबद्दल ठोस विधान करता येत नाही.

येथे एक अवांतर उदाहरण द्यावेसे वाटते. अमेरिकेतील नेटिव इंडियन म्हटले की डोक्याला पिसे बिसे लावून, हातात भाले आणि धनुष्य बाण घेऊन, तोंडाने चित्रविचित्र आवाज काढत घोड्यावर दौडत येणारी जमात असे चित्र हॉलिवूडपटांनी समोर ठेवले आहे. प्रत्यक्षात घोडा हा प्राणी स्पॅनिश आणि पोर्तुगीज कॉन्विकीस्टॅडॉरनी जहाजावरून अमेरिकेत नेण्यापूर्वी अमेरिका खंडाला माहितही नव्हता पण लवकरच तो एतद्देशीयांनी आपलासा करून घेतला. याला काही शे वर्षे लागली. हजारो वर्षे नाही. तसेच काही भारतातही घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधी सिंधू संस्कृतीला घोडा माहित नव्हता हे विधान योग्य आहे. सिंधू संस्कृतीच्या उतरत्या काळात घोडा भारतीय उपखंडात येऊन पोहोचला होता ही शक्यताही योग्य वाटते.

काही शंका/विचार

रेड् इंडियनचे उदाहरण समर्पक आहे :) बाकी सुरकोटडाचे उदाहरण हे औट्लायर आहे, त्यावरून इतर निष्कर्ष काढता येणार नाहीत हे मात्र नक्की. तो एक अवशेष सोडला तर मग घोड्याचा सर्वांत जुना अवशेष हा स्वात खोर्‍यात आढळला आहे. पण या निमित्ताने अजून एक प्रश्न असा आहे, की निव्वळ एका घोड्याच्या मुद्द्यावरून वैदिक-अवैदिक असे निष्कर्ष काढणे कितपत बरोबर आहे? कारण ऋग्वेदात एके ठिकाणी उल्लेख आहे की त्यांचे शत्रू जे दस्यू यांनी घोड्यांवरचा कर भरला आहे. (७व्या मंडलातले १८ वे सूक्त, त्यातली १९वी ऋचा) त्यामुळे घोडा=वैदिक ही मोनॉपॉली चूक ठरते. पण मग घोडा नसेल तरचा सिनॅरिओ काय् आहे हेदेखील पहायला हवे. अश्वमेधातला घोडा हा ३४ बरगडीवाला तर इक्वस् कॅबॅलस् हा ३६ बरगडीवाला असेही वाचले आहे. मग जर वैदिक आर्यांचा घोडा एक्वस् फेरस् कॅबॅलस् असेल तर त्याचा काळ हा इसपू २००० च्या आधीदेखील जाऊ शकतो.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

घोडा नसेल तरचा सिनारिओ

निव्वळ एका घोड्याच्या मुद्द्यावरून वैदिक-अवैदिक असे निष्कर्ष काढणे कितपत बरोबर आहे?

तसे नव्हे. वैदिक-अवैदिक वादात घोड्याचा मुद्दा महत्त्वपूर्ण मानला जातो असे काहीसे असावे.

घोड्याला इतके महत्त्व देण्याचे मूळ कारण असे आहे की मागास आर्य घोड्यावर बसून आले आणि त्यांनी सिंधू संस्कृतीतील लोकांवर आक्रमण केले या एका गृहितकाने घोडा सिंधू संस्कृतीत महत्त्वपूर्ण ठरतो. खरेतर जगाच्या पाठीवर अशा अनेक वस्ती आहेत की जेथे घोडा नव्हता. तरीही त्या एकमेकांशी लढत होत्या, व्यापार करत होत्या आणि वाहतूक करत होत्या. वशिंडांचे प्राणी (झेबू) हे सिंधू संस्कृतीतील प्रमुख पशु. त्यामुळे घोड्यावाचून सिंधू संस्कृतीचे काही अडले नसावे.

घोड्यासदृश एखादा प्राणी या संस्कृतीत असावा का? असू शकेल परंतु त्यावर बसून युद्ध केल्याचे वगैरे दाखले मिळत नाहीत. तसा काही शिक्क्यांवर दिसणारा एकशिंगी प्राणी (युनिकॉर्न) दिसतो तो कोणता याची देखील कल्पना नाही.

परंतु ऋग्वेद काळापर्यंत घोडा भारतीय उपखंडात रुजला असावा असे वाटते.

घोडा

>>परंतु ऋग्वेद काळापर्यंत घोडा भारतीय उपखंडात रुजला असावा असे वाटते.

सहमत. अजूनपर्यंत तरी सुरकोटडामधील अवशेषापेक्षा जुना घोड्याचा अवशेष भारतीय उपखंडात नाही आढळला. कझाखस्तान येथे माणसाळवलेल्या घोड्याचे सर्वांत जुने अवशेष सापडतात. गनेरीवालासारखी (तिथे ganeriwala असे सर्च् करावे, कारण लेखाचा विषय वेगळा आहे) प्रचंड मोठी ठिकाणे अजूनपर्यंत अनुत्खनित आहेत. काय माहिती, अजून घोड्याचे अवशेष सापडतीलही. तोपर्यंत मात्र घोडा आणि वैदिकांचे उत्तरसिंधू काळातील साहचर्य मान्य करावे लागेलच.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

घोडेस्वारी

>>मागास आर्य घोड्यावर बसून आले आणि त्यांनी सिंधू संस्कृतीतील लोकांवर आक्रमण केले

घोड्यांचे रथ कॉमन असले तरी घोड्यावर बसण्याची कला बरीच नंतर (इसवीसनानंतर?) अवगत झाली असे वाचल्याचे स्मरते.

नितिन थत्ते

रिकीब तर नव्हे?

घोडेस्वारीबद्दल नाही पण रिकिबीबद्दल असा उल्लेख वाचल्याचे आठवते. इसवी सनानंतर नाही पण त्याच्या॓ २-३ शतकेच आधी म्हणून.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

इसवीसनानंतर नक्कीच नाही.

घोडेस्वारी नेमकी कधी सुरू झाली हे माहित नाही पण घोड्यांचा उपयोग बैलांसारखाच वाहतूकीसाठी आधी निर्माण झाला असावा. त्यामुळे घोडेस्वारी ही नंतरची म्हटले तर योग्य ठरावे. महाभारतातही घोडेस्वार होते का याची कल्पना नाही. रथांविषयी नक्की लिहिलेले आहे. परंतु घोडेस्वारी इसवी सनानंतरची नक्कीच नाही. थोडासा शोध घेता असीरियन घोडेस्वारांची शिल्पे इ.स.पूर्व ८०० वगैरेमधील आहेत असे दिसले. अर्थातच खोगीर, रिकिब वगैरे प्रकार त्यामानाने खूपच अर्वाचीन आहेत त्यामुळेच घोड्याच्या पाठीवर बसून युद्ध वगैरे करणे कठीण होते आणि "घोड्यावर बसून आले आणि युद्ध केलेचे.."चे गृहितक चुकीचे ठरते परंतु वाहतूकीच्या निमित्ताने घोड्यावर बसून आले नसावेत असे म्हणता येत नाही. (अर्थातच ही गृहितके आहेत.)

परंतु घोडेस्वारी इसवी सनानंतरची नक्कीच नाही. अलेक्झांडर आणि त्याचा भारतावरील स्वारीत मेलेला ब्युसाफेलस हा लाडका घोडा आठवतो का? :-)

माझा मागचा एक लेख चाळला -

पुत्राच्या मृत्यूची बातमी आणि दोन्ही बाजूंनी सरकणारे अलेक्झांडरचे सैन्य पाहून नेमकी कोणती युद्धनिती वापरावी हे पुरुला कळेना. शेवटी त्याने अलेक्झांडरच्या रोखाने सैन्य वळवण्याचे आदेश दिले. वळवलेल्या सैन्यात ३०, ००० चे पायदळ, ४००० चे घोडदळ, सुमारे ३०० रथ आणि २०० हत्ती होते.

यानुसार इ.स.पूर्व ३२६मध्ये भारतीय उपखंडात घोड्याच्या पाठीवरून लढाई होत होती. (संदर्भः अलेक्झांडर-पुरु युद्ध)

अबब! ४००० चे घोडदळ? हा आकडा मला नेहमीच मोठा वाटत आला आहे परंतु एरियनवर विश्वास ठेवणे (आणि एरियनला टोलेमीवर विश्वास ठेवणे) भाग आहे. :-(

मोठा नाही वाटत.

>>अबब! ४००० चे घोडदळ? हा आकडा मला नेहमीच मोठा वाटत आला आहे परंतु एरियनवर विश्वास ठेवणे (आणि एरियनला टोलेमीवर विश्वास ठेवणे) भाग आहे. :-(

हा आकडा का मोठा वाटावा? पुरु हा पंजाब भागातला राजा होता. उत्तम घोडे त्याला बर्‍याच मोठ्या संख्येने उपलब्ध असणे सहज शक्य आहे त्याच्या विशिष्ट भौगोलिक ठिकाणामुळे.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

मोठा वाटतो कारण...

पुरु हा पंजाब भागातला राजा होता. उत्तम घोडे त्याला बर्‍याच मोठ्या संख्येने उपलब्ध असणे सहज शक्य आहे त्याच्या विशिष्ट भौगोलिक ठिकाणामुळे

पुरु हा किती मोठा राजा होता याची नेमकी माहिती नाही. तो फक्त पूर्व पंजाबातील राजा होता पण व्यवस्थित राज्य राखणारा राजा असावा. अर्थात, पुरुच्या सोबत आजूबाजूचे इतर लहान राजेही लढले असावे पण नेमकी कल्पना नाही. पंजाब क्षेत्र सुपीक असले तरी ४००० हा आकडा का कोणास ठाऊक मला मोठाच वाटतो. या उलट, कलिंगचे राज्य चांगले मोठे होते असे वाटते परंतु मेगॅस्थेनिस आणि प्लीनी द एल्डर यांच्यामते तेथे फक्त १००० चे घोडदळ होते. अर्थातच, यातून काही सिद्ध होत नाही. सैन्यरचना, व्यूहरचना आणि इतर अनेक गोष्टींवरून घोडदळाचा आकार ठरत असावा. मला आपली उगीच शंका आहे.

पंजाबहून गांधार जवळ आहे.

बाकी ठीक, पण तो 'पंजाबातला' राजा होता, पंजाब हा गांधारजवळचा म्हणजे घोडे जिथून आणले जायचे त्या प्रदेशाजवळचा भाग , त्यामुळे म्हणालो.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

नाय

पहिले वाक्य कलिंगचे राज्य चांगले मोठे होते असे वाटते

परंतु मेगॅस्थेनिस आणि प्लीनी द एल्डर यांच्यामते तेथे फक्त १००० चे घोडदळ होते.
हे काय विरोधी नाय.

कलिंगची खरी मदार हत्तीदलावर होती. त्याकाळातल्या सर्वात मोठ्या हत्तीदळापैकी एक त्यांच्याकडे होते म्हणून त्यांचा दबदबा होता असे ऐकले आहे.
घोडदळ लहान असले तरी ते हत्तीने कॉम्पनसेट करत असावेत.

४००० घोडे म्हणतात तेव्हा त्यातले सर्वच काही उत्तम प्रजातीचे अरबी घोडे किंवा उंच असे ब्रिटिश घोडे असतील असे नव्हे. ते त्या काळात त्याच्या पप्पाला तरी कसे परवडले असते?
प्रामुख्याने स्थानिक प्रजातीची घोडी, मुद्दाम अधिक सांभाळलेली, सातत्याने पागेत पैदास केलेली असावीत. हे जर असेल तरीही ४००० हा आकडा मोठा वाटतो का?

--मनोबा

मोठा-लहान

४००० घोडे म्हणतात तेव्हा त्यातले सर्वच काही उत्तम प्रजातीचे अरबी घोडे किंवा उंच असे ब्रिटिश घोडे असतील असे नव्हे. ते त्या काळात त्याच्या पप्पाला तरी कसे परवडले असते?

हाहाहा! अहो पप्पा, ४००० असोत की १००० त्यांच्या पोटापाण्याचा आणि घोडेस्वाराच्या पोटापाण्याचा प्रश्न आहेच की नाही. मगध सम्राटाकडे ३००००चे घोडदळ होते आणि बाकीचे सैन्य. त्यांना रोजच्यारोज पगार मिळत असे म्हणे पण ते पडले सम्राट. असो.

आकडा खोटा असेल असे नाही. पुरुला युद्धासाठी स्थानिक राजांनी मदत केली असेल. अलेक्झांडरच्या सैन्याला तोंड द्यायला तो ५०० घोडे घेऊन गेला नसेलच. किंवा युद्धात आकडे वाढवून चढवून सांगण्याची पद्धत आहे. असे अनेक युद्धांत दिसते. दोहोंपैकी एक खरे. असो. हा काही वादाचा मुद्दा नाही. माझ्या नसत्या शंका इतकेच.
मी ४००० चे घोडदळ मान्य केले आहे.
बाकी,

कलिंगची मदार हत्तींवर होती हे खरेच. त्यांच्याकडे १००० घोडे आणि ७०० हत्ती. कलिंगवासी हत्तीला नांगर लावून शेत नांगरत असेही सांगितले जाते.


(हे ब्रिटिश आणि अरबी कुठे आले मध्येच. ह. घ्या. ;-) )

ओके

पटले. घोडेस्वारी इसवीसनानंतरची नसावी. माझा आठवणीचा काहीतरी गोंधळ झाला असावा.

नितिन थत्ते

कीर्तनानंतरचा तमाशा....

उपक्रम हे निकोप वैचारिक देवाणघेवाणीचे व्यासपीठ आहे, ही माझी समजूत आता डळमळीत झाली आहे. धम्मकलाडू यांनी कुजकट उपरोधापेक्षा माझा मुद्दा खोडणारी काही माहिती दिली असती तर बरे वाटले असते. असो, चंद्रशेखर यांनी माझ्या प्रतिसादातील मुद्यांचा परामर्श न घेता केवळ लिखित साधनांच्या विश्वसनीयतेचा मुद्दा उपस्थित करुन त्यांना काय अभिप्रेत आहे, हे सूचित केले आहे. 'वाहव्वा! क्या बात है! अत्यंत माहितीपूर्ण' अशाच प्रतिक्रिया त्यांना आवडणार असतील तर कुणी ना कुणी ती अपेक्षा पूर्ण करेलच.

पण 'खी खी खी!' 'काय तो व्यासंगाचा अफाट आवाका?' इ. कुचेष्टा मला अजिबातच अभिप्रेत नव्हती. किमान या गंभीर प्रवृत्तीच्या व्यासपीठावर तरी. हा काही सूचक इशारा असावा का?
हरकत नाही. तुम्हा लोकांना जे आनंददायी वाटेल ते करा. तशीही माझी विधाने बाष्कळ, हास्यास्पद ठरवली गेली असल्याने विद्वानांच्या मांदीयाळीत अनधिकारी व्यक्तीने जास्त वेळ बसू नये.

उपक्रमाच्या पुढील वाटचालीस चालक व संपादकांना शुभेच्छा. थांबावे म्हणतो.

--------------------------***---------------------------

गहिवरलो

माझा ह्याआधीचा प्रतिसाद गंभीरच आहे हो. मी इतर कशावरही भाष्य केलेले नाही. म्हणजे वैदिक स्रोत वगैरे वगैरे. पण तुर्कस्तान, शेंडी आणि ब्राह्मण ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर आणि त्यातून निघालेला निष्कर्ष पाहिल्यावर गहिवरलो आणि राहवले नाही एवढेच. आणि माझा प्रतिसाद वाचून तुम्हीसुद्धा गहिवरलात! मी थांबतो आता. असो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

इजिप्त

बुद्धिजीवी पद्धतीचे काम करणार्‍या लोकांची शिल्पे इजिप्तच्या प्राचीन काळातील पिरॅमिडशी संबंधित शिल्पांमध्येही सापडतात हे इथल्या काहींना माहिती असावे. हे लोक कारकून, शिक्षक किंवा शिलालेख कोरण्याचे काम करीत. विकि वरील माहितीप्रमाणे यांना 'सेश' म्हणत- उच्चार निश्चित माहिती नाही. हे लोक आपल्या वडिलांचा पेशा पुढे चालवत असेही उल्लेख आढळतात.

http://en.wikipedia.org/wiki/Scribe#Ancient_Egypt

योगप्रभू यांच्या प्रतिसादातील शिल्प आणि इजिप्तमधील शिल्पांत काही साम्य आहे का हे बघावे लागेल.

धन्य ते माहीतगार

परवाच भारतीय संस्कृतीच्या माहितगारांना नेटावरून काही छायाचित्रे आणि रेखाटने दाखवली.

त्यावर शेंडीवर फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे आणि ब्राह्मणधर्म हा सर्व जगभर पसरला होता आणि तो ह्या ना त्या फॉर्ममध्ये (म्हणजे कुठे शेंडीच्या ) अजूनही टिकून आहे असेच म्हणता येईल असे मला ठामपणे सांगितले. हा कंटिन्युटीचाच प्रकार आहे. असो. धन्य आमची भारतीय संस्कृती, धन्य तो ब्राह्मणधर्म, धन्य ती शेंडी आणि धन्य ते माहीतगार.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

शेंडीला गाठ बांधायची गरज नाही

धम्मकलाडूंनी दिलेली शेंडीची उदाहरणे ठीक आहेत पण खरेतर त्यांची गरज नाही. :-)

इ.स.पूर्व ८००० ते ९००० च्या दरम्यान जगात कोणताही धर्म आणि संस्कृती नांदत नव्हती. मनुष्य शिकार गोळा करण्याच्या अवस्थेतून बाहेर येऊन हळूहळू शेती करू लागला होता. शेतीचं महत्त्व त्याच्या ध्यानात येत होतं.

माणसाने शिकार कमी करून शेतीकडे लक्ष वळवल्यावर, शेतीचे पूर्ण फायदे लक्षात येण्यास आणि शिकार्‍यापासून शेतकर्‍यापर्यंत त्याचा प्रवास होण्यास शेकडो आणि हजारो वर्षांचा कालावधी गेला आहे. हे लक्षात घ्यायला हवे की हा अश्मयुगाचा काळ आहे. माणसाकडे धातूची शस्त्रे नाहीत, नव्हती. ती तशी नेवाली कोरीलाही आढळत नाहीत. या काळात धर्म, संस्कृती इ. सोडाच पण शेतीशिवाय इतर उद्योगही करायचेही माणसाला माहित नव्हते. इ.स.पूर्व ८-९००० वर्षांपूर्वी माणूस हळू हळू गावे बांधून राहायला लागला होता. जे काही धर्म म्हणून तो पाळत होता तो "शॅमॅनिजम" (याला मराठी शब्द माहित नाही.) प्रकारचा होता. माणसाला समाज आणि समाजरचनेची जाणीव हळूहळू होऊ लागली होती.

नेवाली कोरी आणि गोबेक्ली टेपी वगैरे प्रदेशांतील उत्खनन नक्कीच महत्त्वपूर्ण आहे कारण आतापर्यंत इतकी जुनी साइट न सापडल्याने इ.स.पूर्व ९००० वर्षांपूर्वी मानवी प्रगती कितपत होती ते माहित नव्हते. विशेषतः शेतीला सुरुवात झाल्यावर माणूस घरे, प्रार्थनास्थळे बांधू लागला आणि एका जागी स्थिरावला असे मानले जाते परंतु गोबेक्ली टेपीमुळे लक्षात आले की शिकारसंचय (हंटरगॅदरिंग) करणार्‍या जमातीसुद्धा एका जागी स्थिरावत होत्या आणि गावे बांधून राहत होत्या. पण अर्थातच, हे लक्षात घ्यायला हवे की वायव्य आशियामध्येच प्रथमतः शेतीला सुरुवात झाली आणि माणसाने वस्ती करण्यास सुरुवात केली. दुसर्‍या शब्दांत, या काळात वायव्य आशिया सोडून इतरत्र शेतीभाती - पशुपालन होत नव्हते.

इथे वर सांगितलेला मुद्दा असा की गोबेक्ली टेपीमधील लोक शेतकरी नव्हते. त्यांना शेती आणि पशुपालन यांची माहिती नव्हती पण त्यानंतर १००० वर्षांनी तयार झालेल्या स्थळांवर शेती आणि पशुपालनाचे पुरावे मिळतात. याचाच अर्थ हा काळ, वायव्य आशियातच ट्रांझिशनचा होता. इतरत्र शेती-भाती, धर्म, संस्कृती यांना सुरुवात झाली नव्हती. इजिप्त आणि भारतीय उपखंड या दोन्ही ठिकाणी वायव्य आशियातील पिके काढावयास सुरुवात होऊन शेतीला सुरुवात झाली आहे आणि तिचा काळ इ.स.पूर्व ५००० व पुढे असावा. त्यामुळे अस्तित्वात नसलेल्या हिंदू संस्कृतीतील कोणी ब्राह्मण तेथे पोहोचला ही कल्पनेची भरारी म्हणून उत्तम आहे.

सिंधू

चंद्रशेखर ह्यांच्या इतर कुठल्याही लेखाप्रमाणेच हाही उत्तम,माहितीपूर्ण, अभ्यस्त जमलाय.
सिंधू-हिंदू-वैदिक-सरस्वती-आर्य्-ब्राम्हण- दस्यू- शूद्र ..........
हुस्श थकलो आता मात्र ह्या विषयावरचे perpetual,निरंतर वाद अन् थेर्‍या पाहून.

--मनोबा

 
^ वर